यः स्वदत्तां परैर्दत्तां, हरेत सुरविप्रयोः ।
वृत्तिं स जायते विड्भुग्वर्षाणामयुतायुतम् ॥५४॥
कर्तुश्च सारथेर्हेतोरनुमोदितुरेव च ।
कर्मणां भागिनः प्रेत्य, भूयो भूयसि तत्फलम् ॥५५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धवसंवादे सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥
जो देवालयाची वृत्ति हरी । जो ब्राह्मणवृत्तीचा लोप करी ।
तो अयुतायुतवर्षसहस्त्रीं । योनी सूकरी विष्ठा भोगी ॥९३॥
जो द्विजदेवांची वृत्ति हरी । त्यासी जो होय सहाकारी ।
कां जो अनुमोदन करी । ते तिघे अघोरीं पचिजेती ॥९४॥
ते जन्ममरणांच्या आवर्ती । तेंचि फळ पुढतपुढतीं ।
मरमरोनि गा भोगिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९५॥
माझे प्राप्तीची चाड चित्ता । तरी नातळावी अधर्मता ।
अधर्मवंताची कथा । स्वभावें सर्वथा न करावी ॥९६॥
न देखावें दोषदर्शन । न बोलावें मर्मस्पर्शन ।
भूतमात्रांचा द्वेष जाण । सर्वथा आपण न करावा ॥९७॥
नायकावी परनिंदा । न बोलावें परापवादा ।
अधर्माचिया संवादा । कोणासी कदा न मिळावें ॥९८॥
त्रिलोकींचें पाप असकें । ज्यास घेणें असेल आवश्यकें ।
तैं साधुनिंदा निजसुखें । यथासुखें करावी ॥९९॥
सकळ दुःखांचिया राशी । अवश्य याव्या मजपाशीं ।
ऐसी आवडी ज्याचे मानसीं । तेनें ब्रह्मद्वेषासी करावें ॥४००॥
सकळ काळ वृथा जावा । ऐसें आवडे ज्याचे जीवा ।
तेणें सारिपाटादि आघवा । खेळ मांडावा अहर्निशीं ॥१॥
मी हृदयस्थ आत्माराम । स्वतःसिद्ध परब्रह्म ।
तो मी व्हावया दुर्गम । अधर्म कर्म जगासी ॥२॥
तें निर्दाळावया कर्माकर्म । वर्म आहे गा अतिसुगम ।
अखंड स्मरावें रामनाम । पुरुषोत्तम अच्युत ॥३॥
जेथें हरिनामाचा गजर । तेथ कर्माकर्मांचे संभार ।
जाळूनि नुरवीं भस्मसार । ऐसें नाम पवित्र हरीचें ॥४॥
नाम निर्दळी पाप समस्त । हें सकळशास्त्रसंमत ।
जो विकल्प मानी एथ । तो जाण निश्चित वज्रपापी ॥५॥
वज्रपापाचे पर्वत । निर्दळी श्रीमहाभागवत ।
तें जनार्दनकृपा एथ । झालें प्राप्त अनायासें ॥६॥
ते भागवतींचा पाहतां अर्थ । हरीचें नाम अतिसमर्थ ।
वर्णिलेंसे परमाद्भुत । स्वमुखें अच्युत बोलिला ॥७॥
एथही जो विकल्प धरी । तो अतिअभाग्य संसारीं ।
महादुःखदोषसागरीं । विकल्पेंकरीं बुडाला ॥८॥
संकल्पविकल्पेंकरीं जाण । जनांसी झालें दृढ बंधन ।
त्या भवबंधाचें छेदन । जनार्दन निजनाम ॥९॥
जनार्दनाचें निजनाम । निर्दळी भवभय परम ।
तें नाम स्मरे जो सप्रेम । तो पुरुषोत्तम स्वयें होय ॥४१०॥
स्वयें होणें ब्रह्म पूर्ण । ये अर्थीचें गोड निरुपण ।
अठ्ठाविसावे अध्यायीं जाण । उद्धवा श्रीकृष्ण सांगेल ॥११॥
ते कथा जैं श्रवणीं पडे । तैं जीवीं स्वयंभ सुख वाढे ।
मग आंतबाहेर दोंहीकडे । करी वाडेंकोडें समसाम्य ॥१२॥
जे कथेचें गोडपण । जीव गेल्या न सोडी जाण ।
ऐसें रसाळ निरुपण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥१३॥
श्रवणें उपजे ब्रह्मभावो । तो हा अठ्ठाविसावा अध्यावो ।
उद्धवासी देवाधिदेवो । निजकृपें पहा हो सांगेल ॥१४॥
अक्षरें भरोनि अक्षररसीं । देव सांगेल उद्धवासी ।
तें निरुपण अठ्ठाविसाव्यासी । ब्रह्मसुखेंसीं लगडेल ॥१५॥
ब्रह्मसुखाची सांठवण । तो हा अठ्ठाविसावा जाण ।
ते उघडूनियां उणखूण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥१६॥
तें कृष्णउद्धवनिजज्ञान । एका विनवी जनार्दन ।
तुमचे कृपेंकरुनि पूर्ण । श्रोतां अवधान मज द्यावें ॥१७॥
श्रोतां दीधल्या अवधान । ग्रंथीं उल्हासे निरुपण ।
एका जनार्दना शरण । शिरीं श्रीचरण वंदिले ॥४१८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥