कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुम्यो नमः ॥ ओं नमोजी महागणपती ॥ वाग्देवी तूं सरस्वती ॥ गुरुप्रसादें देई मती ॥ बोलावया ॥१॥

नमूं श्रोते संत यांसी ॥ जयां अधिकार हरिकथेसी ॥ त्यांही परिसावें नेमेसीं ॥ भक्तियोगें ॥२॥

जयां हरिभक्तीची चाड ॥ त्यांहीं सांडावें येर काबाड ॥ ब्रह्मरस सेवावा गोड ॥ निरंतरें ॥३॥

ओं नमोजी आदिपुरुषा ॥ श्रीअनंता परम हंसा ॥ शेषशयननिवासा ॥ नारायणा ॥४॥

जयजय मंगलमहंता ॥ गुणरुपा तूं अद्वैता ॥ जन्मजरा विवर्जिता ॥ अच्युता तूं ॥५॥

जयजयाजी विश्वंभरा ॥ परमपुरुषा परात्परा ॥ वेदगर्भीचिया अक्षरा ॥ विश्वलिंगा तूं ॥६॥

जयजया तूं अव्यक्ता ॥ रुपविलासा पुराणभरिता ॥ गुणां निर्गुणां उभयतां ॥ तुंचि देवां ॥७॥

जयजयाजी लक्ष्मीवरा ॥ ब्रह्मरुपा योगेश्वरा ॥ लीलालाधविया चराचरा ॥ प्रसवलासि तूं ॥८॥

जयजयाजी कैवल्यदानी ॥ मंगळधामा चिंतामणी ॥ जयजयाजी शारंगपाणी ॥ गदाधरा ॥९॥

जय भक्तवज्रपंजरा ॥ जयजयाजी अपरंपारा ॥ जयजयाजी आदिकुमरा ॥ श्रीमुकुंदा तूं ॥१०॥

जयजयाजी ज्योतिलिंगा ॥ परमपुरुषा महाभागा ॥ आनंदमुर्ती श्रीरंगा ॥ माधवा तूं ॥११॥

जयजयाजी ज्योतिरुपा ॥ जय सच्चिदानंदरुपा ॥ धर्माधर्म भवतापा ॥ वेगळा तूं ॥१२॥

जयजयाजी श्रीअनंता ॥ परमपुरुषा परमार्था ॥ जय क्षराक्षरातातीं ॥ पुरुषोत्तमा ॥१३॥

आतां असो हे स्तवनस्तुती ॥ पुढें तुझीच असे कीर्ती ॥ जैसें अर्ध्य देइजे अपांपती ॥ तीर्थोदका ॥१४॥

करोनि सुवर्णाची पत्री ॥ कनकरासि पूजिजे क्षेत्रीं ॥ तैसें स्तवन तवचरित्रीं ॥ गमलें मज ॥१५॥

तरी हेचि पैं विनवणी ॥ ज्ञानप्रकाशें अंतःकरणीं ॥ ग्रंथपदाची दावणी ॥ दावीं मज ॥१६॥

जैसें अंधा वागवी डोळस ॥ नातरी सूत्रधारी बाहुल्यास ॥ तैसा बोलवीं नवरस ॥ ग्रंथरचनेचा ॥१७॥

मागें जाहला तृतीय स्तबक ॥ आतां चतुर्थस्तबकींचा विवेक ॥ कथाकल्पतरु नामघोष ॥ बोलवीं मज ॥१८॥

तुझिया नामाचेनि प्राप्तीं ॥ पूजा पावेन मी मंद्रमती ॥ जैसा देवद्वारींचा मानिती ॥ पाषाण वंद्य ॥१९॥

नातरी कनकाचा करोनि टांक ॥ संगें पूजा पावे लाख ॥ तैसा मी जडलों रंक ॥ तवचरणासी ॥२०॥

मग कृपा आली अनंता ॥ ह्नणे प्रसन्न जाहलों रे ग्रंथा ॥ जेणें तुटेल सर्व व्यथा ॥ ऐसा वर दीधला ॥२१॥

ऐसा नमिला गणेश ॥ जो सकलविद्याप्रकाश ॥ कमळ मोदक अंकुश फरश ॥ वक्रतूंड जो ॥२२॥

आतां नमूं ते सरस्वती ॥ जे ब्रह्मतनया महादीप्ती ॥ हंसवहनी आदिशक्ती ॥ भक्तवरदा ॥२३॥

प्रेमें नमिला श्रीगुरु ॥ ज्ञानविज्ञानवैराग्यतारुं ॥ पुनरावृत्तीचा व्यापारु ॥ निरसिला जेणें ॥२४॥

होय श्रीगुरुची कृपा ॥ तरीच येथींचा अर्थ सोपा ॥ मुक्यासि वाचा अमूपा ॥ स्फुरुंलागें ॥२५॥

आतां नमूं संतश्रोता ॥ जयां हरिकथेची आस्था ॥ त्या नमन केलें भक्तां ॥ वैष्णवांसी ॥२६॥

तुह्मीं द्यावें जी अवधान ॥ मज बोलतां हरिकीर्तन ॥ जेणें निवतील श्रवण ॥ वैष्णवांचे ॥२७॥

सर्वपुराणांचे सार ॥ जैसी इक्षुगर्भीची साखर ॥ नातरी क्षीर मंथोनि सार ॥ घृत जैसें ॥२८॥

हा नामें कथाकल्पतरु ॥ जो धर्मराशीचा सबळ मेरु ॥ प्रसंग पदोपदीं हरिहरु ॥ आठवलासें ॥२९॥

आतां असो हे वित्पत्ती ॥ जन्मेजय राजा भारती ॥ आणि वैशंपायन ब्रह्ममूर्ती ॥ व्यासशिष्य जो ॥३०॥

यादोहींचा अनुवादु ॥ तो बोलेन पुण्यसिंधु ॥ जेणें तुटेल भवबंधु ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥३१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमोऽध्यायीं कथियेला ॥३२॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP