कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मागां वर्णिली कथा सूंदर ॥ कीं मथुरे आले यादवेश्वर ॥ आणि भयभीत होऊनि कंसासुर ॥ चिंतावला अंतरीं ॥१॥

मग बोलावोनियां प्रधाना ॥ तयांसी विचारिली योजना ॥ ह्नणे कैसा उपाय विघ्रा ॥ करावा आतां ॥२॥

अक्रुर आला कृष्ण घेउनी ॥ उत्पात उठिले मथुराभुवनीं ॥ नंदकुमर कोणासि न मानी ॥ विक्रमी तो ॥३॥

तंव प्रधानवगीं बोलिलें ॥ राया गौळियां पासाव पातले ॥ ते वसुदेवकुमर ऐकिले ॥ रामकृष्ण ॥४॥

आतां उपाय येथें करिजे ॥ गोकुळ अवधें विध्वंसिजे ॥ मग गोधनें सकळ हरिजे ॥ दुग्धालागीं ॥५॥

आजि स्वभावतः रात्र जाहली ॥ ह्नणोनि ही वेळ त्यांसि फावली ॥ असो आपण जे इच्छा चिंतिली ॥ ते सकाळीं पाहूं ॥६॥

ऐसें प्रधानीं विनविलें ॥ तें कंसासि हित मानवलें ॥ मग मालखेडी यांसि सुचविलें ॥ सकळ गौप्य ॥७॥

तंव रामकृष्ण येरीकडे ॥ इतुके करोनियां पंवाडे ॥ चालिले आपुल्या बिर्‍हाडाकडे ॥ गोपाळांसहित ॥८॥

नंदासि वर्तमान सांगती ॥ कीं कंसें मल्लांची केली आयती ॥ आतां निवटोनियां प्रभातीं ॥ मारुं सकळ ॥९॥

असो होतां प्रभातमंगळा ॥ उठला घनश्याम सांवळा ॥ करोनि दंतधावन गुरळा ॥ प्रक्षाळिलें मुख ॥१०॥

वस्त्रालंकारीं श्रॄंगार केले ॥ जावया सकळ उदित जाहले ॥ वृद्धां अग्रभागीं योजिलें ॥ सकळिकांहीं ॥११॥

इष्टदेवांची पूजा जाहली ॥ नंदादिकांची आज्ञा घेतली ॥ कैसी मालरंगीं क्रिडा मांडिली ॥ तो विनोद पाहुं आले ॥१२॥

तंव अक्रुर आला वोळंगें ॥ ह्नणे मजवरी कृपा करणें लागे ॥ घरवरी यावें हो श्रीरंगे ॥ माझिये तुवां ॥१३॥

कृष्ण ह्नणे जी प्रियदर्शना ॥ तूं अखंड वर्तसी माझिये मना ॥ मज येणें असे तुझिये भुवना ॥ कार्यसिद्धी पावलिया ॥१४॥

ऐसें अक्रुरा निरोपोनी ॥ आपण चालिले तेथुनी ॥ रामकृष्ण गोपाळ मिळूनी ॥ एकमेळें ॥१५॥

प्रवेशले नगरद्वारवटा ॥ चालतां हाटबिदीचोहटा ॥ स्त्रिया पाहती व्यंकटा ॥ कटाक्षबाणीं ॥१६॥

चंद्रवदना देखोनि वेल्हाळा ॥ नयनकुरवंडी करिती अबळा ॥ मदनें विव्हळ जाहला ॥ मुग्धाजन ॥१७॥

अबळा अंतरीं चकित होती ॥ देखोनियां यादवपती ॥ मार्गी चालतां गजगती ॥ लुब्धलिया सकळा ॥१८॥

विनोदें पाहती कृष्णरामां ॥ तंव सामोरा आला माळी सुदामा ॥ धांवोनि दंडवत करी प्रेमां ॥ साष्टांग भूमीं ॥१९॥

ह्नणे सेवका कृपेनें पहावें ॥ मनोरथ परिपूर्ण व्हावे ॥ मज पतीता पावन करावें ॥ दर्शनमात्रें ॥२०॥

मग तथां घरासि आणिलें ॥ रामकृष्ण पालखी बैसविले ॥ आरती अक्षयवाण केलें ॥ कुटुंबिनीनें ॥२१॥

प्रेंमें षोडशोपचारें पूजा ॥ संपूर्ण केली गरुडध्वजा ॥ मग संतोषोनि कृष्णराजा ॥ जाहला बोलता ॥२२॥

ह्नणे आतां तूं राहें येथें ॥ आह्मां कार्ये असती बहुतें ॥ कार्य जालिया सांभाळीन समस्तें ॥ प्रजाजनांसीं ॥२३॥

इतुकें बोलूनियां निघालें ॥ रंगमंडपीं उभे ठेले ॥ तेथेम कोणीं कैसें देखिलें ॥ कृष्णानाथासी ॥२४॥

मल्ल चाणुरादि मुष्टिक ॥ तिहीं देखिले अलोलिक ॥ रामकृष्ण यदुकुळटिळक ॥ पर्वताकार ॥२५॥

साधुजनांसि शांतरुप ॥ स्त्रियांलागीं मूर्तकंदर्प ॥ मुनिवृंदासी विश्वरुप ॥ आदिपुरुष ॥२६॥

गौळी ह्नणती हा गोपाळ ॥ वृद्ध ह्नणती हा लीलाबाळ ॥ कंस देखे प्रत्यक्श काळ ॥ मूर्तिमंत मरण ॥२७॥

साधू हदयीं देखती ॥ योगीश्वरांची घ्यानमूर्ती ॥ सांख्यायनां सकळां भूतीं ॥ सारखा दिसें ॥२८॥

भक्तां दिसे परमेश्वर ॥ उपासकांसि मंत्राधार ॥ जो ज्या स्वरुपीं असे तत्पर ॥ तैसेंच त्यासी भासलें ॥२९॥

परि आक्रोशोनि नगरीं अबला ॥ ह्नणती या सुकुमारा वेल्हाळा ॥ कटकटा कंसा चांडाळा ॥ नासूं पाहसी ॥३०॥

केवीं पर्वत केउता हस्ती ॥ केवीं नदी कैं सरितापती ॥ हे जुनाट झूंजो पाहती ॥ या बाळांसवें ॥३१॥

श्रीकृष्ण देखोनि सौंदर्यनिधी ॥ हाहाकार केला विबुधीं ॥ धन्य धन्य जननी त्रिशुद्धी ॥ प्रसवली यासी ॥३२॥

याचे अंगीं दिसे देवकळा ॥ केवीं मनुष्य ह्नणावें गोपाळा ॥ याची दिसे क्रीडा लीळा ॥ वेगळीच ॥३३॥

परमेष्ठि देवा कां चुकलासी ॥ भूमंडळीं जन्म या रत्नासी ॥ कंसाहातीं कां वोपिसी ॥ नासावया कारणें ॥३४॥

अहो दुर्गे यक्षिणी माते ॥ रणीं रक्षी या बाळकांतें ॥ श्यामे गौरी शिवकांते ॥ पाव वेगीं ॥ ॥३५॥

चांमुडे अंबिके भद्रकाळी ॥ नवसें तुज देऊं पशु बळी ॥ तुझे यात्रे येऊं सकळी ॥ महामाये ॥३६॥

कृष्णदर्शनीं जडली लालसा ॥ डोळां पहावयाची आशा ॥ दुःखसागराचिया वळसां ॥ पडिलों आह्मीं ॥३७॥

ऐशा काकुळतीं बोलती सुंदरी ॥ तंव रामकृष्ण सहपरिवारीं ॥ प्रवेशोनियां राजद्वारीं ॥ जवळी आले ॥३८॥

तया महाद्वारीं भद्रजाती ॥ कुवलयापीढ नामें हस्ती ॥ तो सन्नद्ध करोनि महातीं ॥ उभा केला ॥३९॥

तंव कृष्ण ह्नणे रे महाता ॥ हस्ती काढोनि करीं परता ॥ मालरंगीं जाणें त्वरितां ॥ असे आह्मां ॥४०॥

तंव हांसोनि हस्तिपाळ बोलिले ॥ तुह्मी गोपाळ गोलाटी भले ॥ जरी येथें हस्तीसि भ्याले ॥ तरी पुढें काय काज ॥४१॥

सोपें नव्हे राजमंदिर ॥ हें काळाचें कीं घर ॥ येथें असती महावीर ॥ कंससभेचे ॥४२॥

महावंत ऐसें बोलिला ॥ तंव कृष्ण अत्यंत कोपावला ॥ जैसा अग्नी सिंपिला ॥ घृतें करोनि ॥४३॥

ह्नणे कांरे दुष्टा बोलसी ॥ हस्तीसरसा तूंहि मरसी ॥ आपुलीं पूर्व कर्मे भोगिसी ॥ पापबुद्धीस्तव ॥४४॥

तंव तो लोटला मदोन्मत्त ॥ जैसा उलथला पर्वत ॥ तैसा कृष्णावरी चालत ॥ परमावेशें ॥४५॥

तो खवळलासे दारुण ॥ मग कृष्णें पाडिला बळेंकरुन ॥ परि हस्ती शुंडादंडें करुन ॥ कवळूं पाहें ॥४६॥

ते कृष्णें धरिली एके हातें ॥ दुजेनें धरिलें दंतातें ॥ ह्नणे काय खेळावें यातें ॥ पुढें कार्य असे बहु ॥४७॥

उलथूनि पाडिला भूमीसी ॥ सर्वेचि धरिला असे पुच्छीं ॥ भवंडोनि आफळितां प्राणासी ॥ मुकला गज ॥४८॥

जेणें गोवर्धन धरिला करीं ॥ तेथें गजाची काय थोरी ॥ असो दंत उपटोनि शिरीं ॥ दीधला घाव ॥४९॥

तेणें फुटलें कुंभस्थळ ॥ भडभडां वाहे अशुद्ध बंबाळ ॥ मग प्रवेशले गोपाळ ॥ राजभुवना ॥५०॥

तंव धांवले काठीकर ॥ त्यांहीं मल्लां हाकारिलें सत्वर ॥ जे प्रतापप्रौढीचे डोंगर ॥ जाणिले त्रिभुवनीं ॥५१॥

चाणूर मुष्टीक सबळ ॥ कपटजेठी आणि सकुळ ॥ जे नवनागसहस्त्रबळ ॥ समान चौघे ॥५२॥

मल्लांसि ह्नणे कंसराणा ॥ कृष्णासि करावी साधना ॥ ह्नणोनि नेत्रीं दाविली खुणा ॥ मारावयाची ॥५३॥

तंव चाणूर रंगीं उभा ठेला ॥ तयासि कृष्णें पाचारिला ॥ बाप माझा ऐसें ह्नणितला ॥ सांभाळीं रे ॥५४॥

दुरोनि ऐकितों तुझे बळा ॥ कीं मल्लविद्येंत आगळा ॥ तरी ते आजि सकळ कळा ॥ आली पाहिजे ॥५५॥

येरु ह्नणे रे नव्हे गोपाळें ॥ जीं नटती रानटळें ॥ जैसी गिळिजे अमृतफळें ॥ तेवीं युगुल गिळीन हें ॥५६॥

जैसे दातीं चणे चाविती ॥ तैसे लोहगोलक चाऊं ह्नणती ॥ कीं झूंजकथा सांगिजती ॥ परि घाव न साहवे ॥५७॥

कृष्ण ह्नणे रे चाणूरा ॥ तुं न करीं बोलिया फारा ॥ तुज ऐसिया झुंजारा ॥ भिडों आह्मीं ॥५८॥

तुह्मी रायाचेम पाळींव मल्ल ॥ आह्मी डोंगरीचें रानभिल्ल ॥ आह्मां बोलतां न येती बोल ॥ परी करुं निवाडा ॥५९॥

तूं मदमत्त हस्ती कंसाचा ॥ मी पाळींव या नंदरायाचा ॥ परी पाडू दिसेल झुंजाचा ॥ तो पाहूं आतां ॥६०॥

ऐसें दोघे सरसावले ॥ जैसे भद्रजाती मातले ॥ एकमेकां त्वेषें भिडले ॥ मल्लविद्ये ॥६१॥

असो हा सांगतां विचार ॥ येथेंचि ग्रंथा होईल पसर ॥ मग मुष्टिघातें चाणूर ॥ मर्दिला कृष्णें ॥६२॥

देखे चाणूर निमाला ॥ तंव आवेशें मुष्टीक धांवला ॥ त्यासी बळभद्र लोटला ॥ हांक देत ॥६३॥

दोघे बडिवार बोलत ॥ उचलोनि हदयी मुष्टी हाणित ॥ जाणोम पडती वज्रघात ॥ वक्षस्थळी ॥६४॥

मुष्टिकासी बळदेव बोले ॥ तुझें नांव मुष्टिक ठेविलें ॥ ज्या गुरुनें तुजला शिकविलें ॥ तो होता नपुंसक ॥६५॥

ऐकतां मुष्ठिक खवळला ॥ ह्नणे सावध रे सावध गोवळा ॥ हा देख पां तुजवरी आला ॥ वज्रघात ॥६६॥

येतां रामें अवचितां धरिला ॥ मध्यें आडवा हात घातला ॥ त्राहाटोनि दूरी झुगारिला ॥ भूमीवरी ॥६७॥

मग धरोनि दोनी चरण ॥ छकलें केलीं चिरोन ॥ तें घोरकर्म कंसें देखून ॥ घाबरलासे ॥६८॥

चाणूर मुष्टिक मारिले ॥ रामकृष्ण विजयी जाहले ॥ भोंवतें पाहों लागले ॥ झुंझारांकडे ॥६९॥

मग धांवले शल तोशल ॥ दोन भावांचा बंधुमेळ ॥ आणि तिजा कुट अति प्रबळ ॥ बळभद्रावरी ॥७०॥

तंव कृष्णें क्षणाभीतरीं ॥ शल आदळिला भूमीवरी ॥ परि मागुती धरोनि झुंझारी ॥ लोटला तो ॥७१॥

धांवोनि मुष्टिघात दीधला ॥ कृष्णेम वामकरें लोटिला ॥ मुष्टिघातें उरावरी ताडिला ॥ महावातें द्रुम जेवीं ॥७२॥

भूमीं उताणा पडिला ॥ भडभडां अशुद्ध असे वमिला ॥ मग चरफडोनियां त्यजिला ॥ प्राण तेणें ॥७३॥

तें देखोनियां बधू लोटला ॥ तो तोशल बळानें आथिला ॥ परि वेगें तया उजू आला ॥ कृष्णनाथ ॥७४॥

हातीं घेवोनि गजदंत ॥ श्रीकृष्ण त्यावरी पेलित ॥ येरें धांवोनि अंगघटित ॥ चुकविला तो ॥७५॥

वामकरीं धरोनि केशीं ॥ उभा केला आपणापाशीं ॥ ह्नणे कोणा शरण जाशी ॥ सांग आतां ॥७६॥

परि तो बळें मुष्टि हाणित ॥ कृष्ण पोटकुळिया देत ॥ बळदेव ह्नणे कां खेळवित ॥ बैसलासी ॥७७॥

तें ऐकोनि कृष्णनाथें ॥ सवेंच तो वोपिला गजदंतें ॥ तंव देह चेंदा होवोनि पडतें ॥ जाहलें तेथें ॥७८॥

असो बळदेवासी कुट झोंबत ॥ प्रतिघातें समफळी देत ॥ गदा पडताळूनि बोलत ॥ बलभद्रासी ॥७९॥

ह्नणे झुंजता मजपाशीं ॥ वायांच पडसी रे फशीं ॥ किती विद्या असे तुजपाशीं ॥ ती दावीं मज ॥८०॥

बळदेव ह्नणे सांडीं बडिवार ॥ कायसें तुजजवळी हतियार ॥ जैसा वांकुल्या दावी उंदीर ॥ माजरासी ॥ ॥८१॥

ऐसें बोलतां वेळ लागला ॥ तंव धांवोनि कुट अंगा झोंबला ॥ जैसा सर्पा सन्निध निघाला ॥ क्षुद्र मूषक ॥ ॥८२॥

रामें तैसाचि दाटिला ॥ वरिच्यावरी उचलिला ॥ वोळंगूनि घोळशिला ॥ भूमिसरसा ॥८३॥

हातें कंठनाळ दाटित ॥ पायीं पाय असे चेपित ॥ उरावरी दीधली लाथ ॥ एके चरणीं ॥८४॥

काळीज फुगोनि अशुद्ध वोकी ॥ आंतडीं निघालीं आणखी ॥ वारा जाऊनि कानीं नाकीं ॥ सोडिला प्राण ॥८५॥

अहारे मारिल मल्लजेठी ॥ ह्नणोनि वीर धांवले एकवटी ॥ त्यांहीं रोधिला महाद्वार नेहटीं ॥ बळदेव तो ॥८६॥

कुटक देहावरुनि उठिला ॥ बळभद्र मल्लां उजू जाहला ॥ जेवीं महाकाळ खवळला ॥ भूतजंतूंसी ॥८७॥

घेवोनियां गजदंत ॥ निघाला मल्लां हाणित ॥ जेठी अंतरजेठियां देत ॥ यमपंथपैं ॥८८॥

माघारे पळावया उदेले ॥ तंव ते कृष्णें रोधिले ॥ दोहींकडे अडकविले ॥ मग झोडिती दंतेवरी ॥८९॥

ते झुंजतां दोघेच दिसती ॥ परी नेणिजे व्यापिले किती ॥ अवचितें शरीरीं मार होती ॥ परि निर्धारु न कळे ॥९०॥

गति न चोजवे झुंजाची ॥ मल्लां न कळे माव या वीराची ॥ ह्नणती महामारी कैंची ॥ आली आह्मां ॥९१॥

आतां सभेचा करा वोहट ॥ या कंसाची सोडा वाट ॥ हा वोढवला दुर्धट ॥ मार्ग देखा ॥९२॥

मग तिहीं उपाव शोधिल ॥ महाद्वारीं पळ काढिला ॥ मेळ फुटोनियां निघाला ॥ बारावाटे ॥९३॥

कोणी नगरजन त्यांतें पुसे कां रे पळता तुह्मीं ऐसे ॥ ते ह्नणती मारिलीं माणसें ॥ दोघां वीरीम ॥९४॥

तुह्मीं जाऊं नका येणें मार्गे ॥ ते येतील पाठिलागें ॥ नेणिजे काय वर्तलें मागें ॥ आह्मी आल्यावरी ॥९५॥

तुह्मांसि ते जरी पुसती ॥ कीं मल्ल कोणीकडे असती ॥ तरी ह्नणारे त्यांप्रती ॥ आह्मी नेणों ॥९६॥

ऐसे रामकृष्ण दोघे सुभट ॥ त्यांहीं पळविले मल्लांचे थाट ॥ रंगीं बहुतां दाविली वाट ॥ यमपुरीची ॥९७॥

बहुत परिवार आटला ॥ देखोनि कंस भयें व्यापिला ॥ मग कोपें बोलता जाहला ॥ जवळील यांसी ॥९८॥

ह्नणे काय हो पाहता वीर ॥ परिवाराचा केला चूर ॥ तरी आतां वधारे सत्वर ॥ दोघांजणासी ॥९९॥

हे धाकुटे परि महाधीट ॥ आणि तुह्मी अवघे वरिष्ठ ॥ तरी सर्वही मिळोनि येकवट ॥ हाणा शस्त्रें ॥ ॥१००॥

ऐसा क्षोभोनि कंस बोले ॥ ह्नणे वेढारे वेढा वहिले ॥ तंव रामकृष्ण पुढां लोटले ॥ न बोलतांची ॥१॥

मग ह्नणे धरा धरारे ॥ बांधोनियां आणा सामोरे ॥ जेथें वसुदेव देवकीरे ॥ तेथें वधा नेउनी ॥२॥

तंव निःशंक दोघे पातले ॥ सिंहासना जवळी ठेले ॥ कृष्णें निजदृष्टीं देखिले ॥ तुकोनि माथा ॥३॥

कंस ह्नणे या दोघांतेम मारा ॥ गोपांसहित नंदासि धरा ॥ तया सकळांचा वध करा ॥ न पुसतीचें ॥४॥

हे व्याघ्र म्यां घरांत पोशिले ॥ ते माझिये जीविता रुसलें ॥ नगर आमुचें घेतलें ॥ कपटें करोनी ॥५॥

आधीं गौळियांतें मारा ॥ मग त्यांचीं गोधनें हरा ॥ सवेंचि गोकुळाच्या करा ॥ बारा वाटा ॥६॥

हा उग्रसेन नव्हे माझा पिता ॥ ह्नणोनि मिळाला गौळियां समस्तां ॥ आणि तो यादवांचे हिता ॥ प्रवर्तलासे ॥७॥

इतुकेन खळबळली सेना ॥ तोषवावया कंसराणा ॥ मग रामकृष्ण दोघांजणां ॥ वेंटाळिलें तयेनें ॥८॥

अवघे येकतुकें चालिले ॥ नानाशस्त्रीं उदित जाहले ॥ शस्त्रजुंबाडे वर्षले ॥ चहूंकडूनी ॥९॥

ऐसें जंव तेथे वर्तलें ॥ तंव कृष्णें मनीं विचारिलें ॥ ह्नणे हे तरी बळें उठिले ॥ मरणावरी ॥११०॥

हे झुंजतां जातील मेले ॥ यांचे परिवार भंगिले ॥ परि स्वामिद्रोही नव्हती भले ॥ यांसि मारावें कैसें ॥११॥

असो जो परिवार उठावला ॥ त्यासी बळभद्र उभाठेला ॥ अवधियां रोधूनि राहिला ॥ सैनिकांसी ॥१२॥

हाती भवंडीं गजदंत ॥ जैसा जणूं वळला कृतांत ॥ ते ह्नणती पुरला अंत ॥ आजि आह्मां ॥१३॥

जंव परिवार इतुकें चिंती ॥ तंव देखिली कृष्णव्याप्ती ॥ कृष्णमूर्ती अनंत दिसती ॥ सभे माजी ॥१४॥

मग वळंघोनियां सरसा ॥ देव उपिन्नला आकाशा ॥ जेथें सप्तखणाउपरि कंसा ॥ तेथें उडी घातली ॥१५॥

कंस अवचितां दचकला ॥ ह्नणे हा कोणीकडेनि आला ॥ जैसा थडक वाजिन्नला ॥ अवचितपणें ॥१६॥

मग आपणा सांभाळों पाहें ॥ स्वर्ग हातीं घेऊं जाये ॥ तंव धरिला कृष्णरायें ॥ हालों नेदी ॥१७॥

ऐसा कृष्णें धरिला केशीं ॥ ह्नणे आतां केउता जाशी ॥ वाढवेळ जगविलासी ॥ चुकवोनि मरणा ॥१८॥

परि कंसें कृष्ण पाचरिला ॥ ह्नणे काळ तूतें घेवोनि आला ॥ आतां हातीं सांपडला ॥ नरदेह तुझा ॥१९॥

माझा परिवार त्वां मारिला ॥ ढोरीं राहोनि होतासि जगला ॥ जेवीं ससा भाणवसां आला ॥ तो मुके प्राणां ॥१२०॥

ऐसेम ह्नणोनि आंसडूं पाहे ॥ येरु अधिक धरिता होय ॥ ऐसी दोघां कवळी होये ॥ वाढवेळ ॥२१॥

यापरी दोघे झोंबत ॥ येकयेका बळें दाटित ॥ गिरीमस्तकावरी भिडत ॥ सिंह शार्दूळ जेवीं ॥२२॥

कृष्णे हदयीं वाहिली मुष्टी ॥ येरें सांडिली वीरगुंठी ॥ दोघे मिळाले हातोटी ॥ परमावेशें ॥२३॥

कृष्णें घेतले वोडण खांडे ॥ दोघे मीनले सबळ गाढे ॥ त्या झुंजारांचे गाती पंवांडे ॥ सभालोक ॥२४॥

कंसें वज्रघाय उचलिला ॥ कृष्णें वरी मनगटी धरिला ॥ हात मुरडोनि हिंडविला ॥ भोंवताला ॥२५॥

कृष्ण ह्नणे रे पापबुद्धी ॥ तुझें खड्र तुजलाचि वधी ॥ परी तुझी परिवारमांदी ॥ नाहीं येथें ॥२६॥

ह्नणतील देखोनि येकला ॥ कृष्णेम अवचितें हा मारिला ॥ तरी परिवारापाशीं ये भला ॥ ह्नणोनि खालीं पाडित ॥२७॥

तेथोनि दोघे उडाले ॥ श्रीमंचकावरोनि पडले ॥ युद्धीं न विसंबती गुंतले ॥ एकमेकां ॥२८॥

एक आवेशपणें न सोडी ॥ दुजा त्यासी बळेंचि वोढी ॥ यापरीं रंगीं वर्तली घडी ॥ तये वेळीं ॥२९॥

दोघे तळा येवोनि झुंजती ॥ जैसे मातले भद्रजाती ॥ ते साजे सिंहशार्दूलाप्रती ॥ उपमा थोडी ॥१३०॥

एक काळ कीं एक कृतांत ॥ एक अग्नी उदक सत्य ॥ कीं मेरु मांदार मूर्तिमंत ॥ गमले तैसे ॥३१॥

दोघे झुंजती सबळ ॥ देखती बाळगोपाळ ॥ देवीं दाटलें अंतराळ ॥ विमानेंसी ॥३२॥

कंस दैत्य महाबळी ॥ जो अजेय भूमंडळीं ॥ तो महायोद्धा हातोफळी ॥ खेळत असे ॥३३॥
कंसें कृष्ण उचलिला ॥ आपुले बळें दूरी टाकिला ॥ परि तो सवेंचि उठिला ॥ पुढेंयेत ॥३४॥

येवोनि दोंबाहीं वहिला ॥ कंसाचें कंठीं झोंबला ॥ खालता तेव्हां आपटिला ॥ भूमंडळीं ॥३५॥

शिर मुकुटेंसीं गुंतलें ॥ वस्त्रामाजी गुंडाळलें ॥ कंसशरीर मोडलें ॥ पडिलें विकळ ॥३६॥

सुरदुंदुभी लागल्या गगनी ॥ जयजयकार जाहला त्रिभुवनीं ॥ सुमनवृष्टी अमरगणीं ॥ केली मथुरेवरी ॥३७॥

स्वर्गी सहस्त्राक्ष आनंदें ॥ यक्ष गणगंधर्ववृंदें ॥ किन्नर चारण गीतनादें ॥ सुखावलें विश्व ॥३८॥

कृष्ण रंगीं उगाच पाहत ॥ तंव देखोनि कंसाचा अंत ॥ तिघे प्रधान धांवले त्वरित ॥ कंस कैवारें ॥३९॥

मग कृष्ण त्यांसि बोलत ॥ तुह्मीं कां मरता रे व्यर्थ ॥ मीतुह्मातें नाही मारित ॥ कां मरण इच्छिता ॥१४०॥

मग गजदंत उचलिला हातीम ॥ ह्नणे तुह्मीं असा रे किती ॥ ते ह्नणती घेई रे झडती ॥ तो बापुडा कंस नव्हे ॥४१॥

त्या तिघीं मुद्रल घातले ॥ ते घाव कृष्णें साहिले ॥ मग तिघांसही दीधले ॥ गजदंतघाय ॥४२॥

घावो उचलोनि मारिला ॥ तेणें त्रिभाग मस्तक जाहला ॥ कंसा ऐसाच मोक्ष दीधला ॥ त्रिवर्गासी ॥४३॥

तंव आणीक तिघे आले धांवुन ॥ इंद्र इंद्रक इंद्रद्युस्त्र ॥ त्यांहीं पाचारिला सकर्षण ॥ युद्धालागीं ॥४४॥

ह्नणती कंस तुह्मी मारिला ॥ इतुकेन पुरुषार्थ नाहीं जाहला ॥ बंधू आमुचा गिळिला ॥ तो आतां काढूं पोटीचा ॥४५॥

तंव बळदेवें बोलिलें ॥ जेणें मार्गे तिघे गेले ॥ तोचि पंथ पावाल वहिले ॥ तुह्मी आतां ॥४६॥

तिघीं भोवंडिले मुद्रर ॥ आले धांवूनि बळदेवावर ॥ वाजताती रणगजर ॥ महाशब्दें ॥४७॥

मग खवळला हलधर ॥ दंत भोवंडीतसे समोर ॥ जैसा वज्रघातें गिरीवर ॥ शक्र पाडी खालता ॥४८॥

त्यां दाविली पुढिलांची वाटा ॥ साही मिळाले येकवटा ॥ मग येर सैन्य बारावाटां ॥ होतें जाहलें ॥४९॥

कंस बंधुवेंसि वधिला ॥ प्रधानवर्ग क्षया नेला ॥ तंव नगरजन मिळोनि आला ॥ कृष्णासि शरण ॥१५०॥

नगरजन आनंदले ॥ मृदंग निशाणेंसीं गर्जले ॥ भेरी काहळा पसरले ॥ त्राहाटलें गगन ॥५१॥

बंदीजन यादवां स्तविती ॥ विप्र वेदसूक्तें पढती ॥ रामकृष्णां आशीर्वाद देती ॥ नारदादिक ॥५२॥

असो रणभूमी सोडोनि निघाले ॥ महाद्वारीं उभे ठेले ॥ तंव जयजयशब्द प्रगटले ॥ नगरामाजी ॥५३॥

दोघे अशुद्धे बंबाळले ॥ जैसे वसंती किंशुळ फुलले ॥ नातरी अरुणोदयीं शोभलें ॥ अर्कबिंब ॥५४॥

तंव येरीकडोनि राणीया येती ॥ कंसशोकें आक्रंदती ॥ नानापरी विलाप करिती ॥ दीनवदनें ॥५५॥

ह्नणती अगा हे प्राणनाथा ॥ तूं कां आह्मासि न बोलतां ॥ आमुची शुद्धी न करिता ॥ त्यजिले प्राण ॥५६॥

वीरश्रीचेनि वल्लभे ॥ आमुतें सांडिलें सौभाग्यशोभे ॥ रमावया सुखलोभें ॥ मुक्तिराणीसी ॥५७॥

जीवीं आवडी पडे ज्याची ॥ ती सोयरीक नव्हे जन्माची ॥ हानी करीतसे जीवाची ॥ संसार नुरे ॥५८॥

केश रुळती भूमीवरी ॥ देखती अवघी शून्य नगरी ॥ जैसी अभक्ताचे मंदिरीं ॥ न राहे लक्ष्मी ॥५९॥

पतिविणें दाही दिशा ॥ तयांसि दिसती विध्वंसा ॥ दुःखसागराचिये वळसां ॥ सांवरी कोण आह्मां ॥१६०॥

तुवां वैकुंठा गमन केलें ॥ आह्मां भवजळीं कां सांडिलें ॥ येथें कवणासि निरविलें ॥ प्राणेश्वरा हो ॥६१॥

अगा ये सर्वागसुंदरा ॥ संभोगसदना गुणोदरा ॥ आह्मां जीवांच्या जीवनोद्वारा ॥ गेलासि कोठें ॥६२॥

यापरी स्त्रिया विलाप करिती ॥ देखोनि कृपा आली श्रीपती ॥ मग मातुळस्त्रियांसि संबोखिती ॥ ज्ञानोपदेशें ॥६३॥

ह्नणे तुह्मी कुळस्त्रिया कंसा ॥ जन्मलियाती क्षत्रियवंशा ॥ तरी रुदन न करावें सहसा ॥ विवेकपणें ॥६४॥

क्षत्रिया जैत कीं मरण ॥ हें आश्वर्य न ह्नणावे कवणें ॥ समरंगणी देह विसर्जन ॥ त्याचेम दुःख कायसें ॥६५॥

सुभट संग्रामी पडती ॥ ते न सांडिती शौर्यवृत्ती ॥ कीं स्त्रिया सहगमन करिती ॥ हे नीती धर्मशास्त्री ॥६६॥

जये दिशे नदी वाहत ॥ तिकडे काष्ठेंसीं काष्ठ मिळत ॥ तेथें संयोग वियोग होत ॥ त्यांत दुःख कायसें ॥६८॥

तुह्मां दुःख करणें नलगे ॥ स्वभावें सुख होय प्रसंगें ॥ दुःख तरी योगवियोगें ॥ भविष्यभावी ॥६९॥

ऐसें कृष्णें सांडविलें रुदना ॥ समजावोनि राजांगना ॥ केलें कंसाचे संसारबंधना ॥ ऊर्ध्वदैहिक ॥१७०॥

मग चालिले आत्मभुवना ॥ जेथें वसुदेव देवकी बंधना ॥ तयां करोनि बंदिमोचना ॥ आणिलीं मंदिरीं ॥७१॥

मग आंवरोनि देहभावना ॥ मायबापां करिती वंदन ॥ नेत्रीं वाहतसे जीवन ॥ उभययोगें ॥७२॥

वसुदेवा न सांवरती अश्रुपात ॥ द्रवत ॥ जेवीं व्योमगत मेघ वर्षत ॥ अमृतधारीं ॥७३॥

देवकीये मोहपान्हा येत ॥ दोनीं स्तनीं क्षीरे द्रवत ॥ जेवीं व्योमगत मेघ वर्षत ॥ अमृतधारी ॥७४॥

नातरी दोघांचे अश्रुपात ॥ जैसे ब्रह्मगिरीसि प्रवाह वाहत ॥ कीं त्र्यंबका स्त्रपन होत ॥ भूलिंगासी ॥७५॥

दोघां प्रेमभरें आलिंगनें ॥ उचलोनि देती दोघेंजणें ॥ ललाट चुंबूनि कुरुवाळिती वदनें ॥ मग मांडिये बैसविलें ॥७६॥

देवकी ह्नणे पुत्रा कृष्णा ॥ आह्मा न ठेवीं यामाना ॥ काय सुख भोगिले वडीलपणा ॥ माझेनि तुवां ॥७७॥

तुज दीधलें नाहीम स्तनपाना ॥ या श्रीमुखाचिया चुंबना ॥ आणि निवतीच ना नयना ॥ खेळतां देखुनी ॥७८॥

कडिये वोसंगां नाहीं घेणें ॥ नाहीं घृतदुग्ध पाजणें ॥ बाळा प्रेंमें नाहीं न्हाणें ॥ निर्दैवेंसीं ॥७९॥

पाळण्या न हालविली दोरी ॥ निजविलें नाहीं तुजला शेजारीं ॥ काहीं खेळ खेळतां मुरारी ॥ देखिलें नाहीं ॥१८०॥

वसुदेव ह्नणे कायसंतोषें ॥ बाळक दृष्टीनें कधीं न देखें ॥ अंगावरी खेळतां हरिखे ॥ न निवालों आह्मीं ॥८१॥

बाळ पौगंड आणि कौमारा ॥ तीनवयसा न देखो पुत्रा ॥ पिता काय होतसे पवित्रा ॥ बाळपोषणाविणें ॥८२॥

पितयानें न पोशितां बाळ ॥ श्रुतिस्मृतीचें नपवे फळ ॥ अधिकारत्व लाधे सकळ ॥ पुत्रपोषणें ॥८३॥

पुत्रां वृत्तिनिर्वाह न करितां ॥ ऋणमुक्त नाहीं होत पिता ॥ आणि नाहीं संतोष आरोग्यता ॥ ऐसें संत बोलती ॥८४॥

कृष्ण ह्नणे अहो जी ताता ॥ तुमचा अपराध नाहीं सर्वथा ॥ आह्मी पुत्रपणाच्या हिता अंतरलों कीं ॥८५॥

तुह्मां कायसा जी दोष ॥ आमुच्या पुत्रपणाचा विशेष ॥ विरोध न मानावा बहुवस ॥ प्रीतिपणाचा ॥८६॥

पुत्राचें जे इच्छिती कुशल ॥ ते उद्धार पावती तत्काळ ॥ कीं सकळांमाजी श्रेष्ठ फळ ॥ पुत्रनामें ॥ ॥८७॥

आह्मीं संसारीं जन्मणें ॥ हें तुमचें नव्हे करणें ॥ उपजतांचि न केलें मोचन ॥ तुमचिये श्रृंखळांचें ॥८८॥

ऐसिया दोषांसी करीं क्षमा ॥ तुह्मी उपहास न करावा आह्मां ॥ यया संसारप्राक्तनकर्मा ॥ मान देणें ॥८९॥

इतुका अपराध बोलिले ॥ मागुते पायांसि लागले ॥ प्रेंमें मातेसि बुझाविलेम ॥ बहुतांपरी ॥१९०॥

ह्नणती त्वां वाहिलें नवमास ॥ नाहीं अन्नपान सुवास ॥ गर्भी बाळकांचे सायास ॥ सोशिले तुवां ॥९१॥

ऐसें बोलेनि कृपावचनीं ॥ संतोषविलीं जनकजननी ॥ माता वोसंगां घेउनी ॥ स्तनपान देत ॥९२॥

अशुद्धें माखलीं होतीं अंगें ॥ तीं प्रक्षाळिलीं सर्वोगें ॥ वस्त्रें परिधान केली चांगें ॥ सुपरिमळें ॥९३॥

मग उग्रसेनाचिया दर्शना ॥ आपण चालिला कृष्णराणा ॥ जेथें केलें निगडबंधना ॥ कंसासुरें ॥९४॥

श्रृंखळां करोनि विमोचन ॥ दोघीं धरिले दोनी चरण ॥ नानापरी स्तुति करुन ॥ राजभद्रीं आणिला ॥९५॥

तंव येवोनि प्रधान मंडलीक ॥ राजवर्ग आणि नागरीक ॥ विप्र मिळोनियां सकळिक ॥ अभिषेक करिती ॥९६॥

कृष्ण ह्नणे म्यां तुज स्थापिलें ॥ आतां राज्य पाहिजे चालविलें ॥ आह्मीं यदूचें वचन पाळिलें ॥ की राज्य न करणें ॥९७॥

तुह्मां भुजबळें पाळीन ॥ शत्रुवर्गासि संहारीन ॥ निष्कंटक राज्य करीन ॥ तुमचें स्वांगें ॥९८॥

आतां राज्य भोगी सुखें ॥ कोणासि न वर्तावें द्वेषें ॥ प्रजापाळण करोनि निकेम ॥ चालवीं धर्म ॥९९॥

राजा वृक्ष आणि द्विज कुळ ॥ मंत्री शाखा प्रजा फळ ॥ धन धान्य वंश कुळ ॥ वृद्धि पावो ॥२००॥

प्रजेचिनि आशिर्वादें ॥ रायांची दुणावती राज्यपदें ॥ त्यांही पाळावीं ब्रह्मवृदें ॥ आणि वडिलां समस्तां ॥१॥

सांभाळावे नगरजन ॥ दंडावे द्वेषी आणि दुर्जन ॥ अंधकवृत्ती यातिहीन ॥ हे विचारावे रायें ॥२॥

इतुकेम बोलिला श्रीकृष्ण ॥ तेणें संतोषला उग्रसेन ॥ दोघां आशिर्वाद देऊन ॥ सकळ आले मंदिरा ॥३॥

देखोनि वसुदेव देवकी ॥ परस्परें जाहलीं सुखी ॥ मग मांडिये बैसले कौतुकीं ॥ रामकृष्ण ॥४॥

भेटी जाहली वर्षे आठां ॥ चुंबन देती अधरपुटां ॥ हदयीं धरी नाथ वैकुंठा ॥ कवळूनि माता ॥५॥

मग सकलसंस्कारें व्रतबंध ॥ पित्यानें केले वेदविद ॥ ब्रह्मचर्ये राहिला गोविंद ॥ बळदेवासहित ॥६॥

राज्य दीधलें उग्रसेना ॥ आपण नातळे सिंहासना ॥ तो देव पाळितसे वचना ॥ वडिलांचेनी ॥७॥

असो मारिलिया मल्लकोटी ॥ मग नाम ठेविलें जगजेठी ॥ मथुरे करिती कृष्णगोष्टी ॥ नागरीक ॥८॥

हें नाहीं न ह्नणावें श्रोतीं ॥ वर्णिलें असे भागवती ॥ कीं दुमिलें शापिलें ही भारती ॥ जाहली साच ॥९॥

कीं नरवाहनीं नरेंद्रा ॥ संतोष होतसे येकसरां ॥ तैसा संतोष मातापितरां ॥ जाहला तेव्हां ॥२१०॥

मग जावोनि वाराणसी ॥ भेटले संदीपनॠषीसी ॥ सकळविद्या पूर्ण राशी ॥ अभ्यास केला ॥ ॥११॥

तया देवोनि गुरुदक्षिणा ॥ मागुते आले मथुराभुवना ॥ राज्यपदवी उग्रसेना ॥ देवोनि राहिले अलिप्त ॥ ॥१२॥

असो मंत्रियांमाजी मुकुटवर्धन ॥ जो बोलका बृहस्पतीसमान ॥ तो उद्धवदेव आदिकरुन ॥ चालविती राज्य ॥१३॥

अक्रुर केला सभासद ॥ तो धर्मे नगर असे रक्षित ॥ यादव सर्व वोळगंत ॥ उग्रसेनासी ॥१४॥

असो ही सरली कंसकथा ॥ बाळक्रीडा गोपिनाथा ॥ जनसुखें हरिली व्यथा ॥ मेदिनीची ॥१५॥

देवकीच्या षड्रभौचें ॥ उसणें फेडिलें कंसाचें ॥ काळांतरे दीधलें मोक्षाचें ॥ तया स्थान ॥१६॥

ऐसी हे वर्णिली बाळक्रीडा ॥ फळश्रुती सांगतां ब्रह्मा बोबडा ॥ कृष्णनामाचा करितां धडा ॥ व्हावें धन्य मानवें ॥१७॥

कृष्णनामाची फळश्रुती ॥ ऐकतां उपजे ज्ञान भक्ती ॥ चतुर्विध वोळंगती मुक्ती ॥ अनायासें ॥१८॥

आचारखड्राचे आधारें ॥ चालतां तरी पाऊल न धरे ॥ नधरतियासी होती फेरे ॥ जीविताचे ॥१९॥

मग होवोनि अधःपात ॥ अयागमन असे भोगित ॥ कल्पसंख्या अपरिमित ॥ गर्भवास ॥२२०॥

ह्नणोनि कीजे श्रवण मनन ॥ सदा असिजे कीर्तन करुन ॥ तल्लीन परम भक्तिभावन ॥ हेंचि राहे चिरंजीव ॥२१॥

संपलें कथेचे पुर्वार्ध ॥ बाळलीला क्रीडा विनोद ॥ श्रोता होवोनियां सावध ॥ उत्तरार्ध परिसावें ॥२२॥

शेतीं धान्य पेरिती शेती ॥ त्यामाजी किंचित वरवा घालिती ॥ तैसी माझी काहीं युक्ती ॥ असे येथें ॥२३॥

ऐसी हे श्रीकृष्णाची कथा ॥ जे ऐकती गाती भारता ॥ ते यमपुरीचे दुष्टपंथा ॥ न पावती वास ॥२४॥

आतां पुढील हरिकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ कंसहननप्रकारु ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥२२६॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP