कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

इकडे त्याचि समयांतरी ॥ मायादेवी जन्मली खेचरी ॥ नंदब्रजाचिये घरीं ॥ उदरीं यशोदेच्यां ॥१॥

मागें कथा जे सांगतां ठेविली ॥ कीं देवकीं देवातें प्रसवली ॥ जे प्रौढ मूर्ती होती प्रगटली ॥ तें जाहले बाळक ॥२॥

मग देवकी करी न्याहाळ ॥ तंव तो दों भुजांचा बाळ ॥ वसुदेवें घेतला दयाळ ॥ न्यावया तेथें ॥३॥

झांकोनियां पठ्ठकुळीं ॥ आलिंगिला हदयकमळीं ॥ ह्नणे तुज राखो ते भद्रकाळी ॥ बोलिली माता ॥४॥

दुगें शामले चामुंडे ॥ त्रिपुरभैरवी अखंडे ॥ रक्षा हो बाळक येवढें ॥ नाम यदूचें ॥५॥

अंधकारें दाटली रात्री ॥ घनगर्जना होत अंबरीं ॥ मेघ वर्षती जळधारीं ॥ मंदमंद ॥६॥

वरी विजूंचे चमत्कार ॥ वातें उडती तरुवर ॥ घूर्मे दाटले किंकर ॥ कंसासुराचे ॥७॥

दिधला होता दारवंटा ॥ कुलुपें अर्गळा त्या बळकटा ॥ तीं जाणोनियां वैकुंठा ॥ उ घडती कवाडें ॥८॥

मग तो निघाला वसुदेवो ॥ हदयीं धरोनि कृष्णदेवो ॥ वेगां जातां पातला ठावो ॥ यमुनानदीचा ॥९॥

माथां धरोनि सहस्त्र फणी ॥ शेष निवारी वात पाणी ॥ जंव वसुदेव पावे भुवनीं ॥ नंदव्रजाच्या ॥१०॥

तंव यमुनेसि दाटले जळ ॥ पूराचे उठती कल्लोळ ॥ ते देखोनि मन जाहलें व्याकुळ ॥ वसुदेवाचें ॥११॥

मग ते नदी कालिंदी ॥ सत्त्वर जाहली दुभंगी ॥ वाट दीधली अव्यंगी ॥ देवाधिदेवा ॥१२॥

येरु करुनियां विस्मयो ॥ नदी उतरला वसुदेवो ॥ वेगीं पावलासे ठावो ॥ नंदयशोदेचा ॥१३॥

तंव गोकुळींचे दारवंटे ॥ उघडोनि असती कपाटें ॥ भीतरीं जाय अति नेटें ॥ वसुदेवकृष्ण ॥१४॥

तंव यशोदा प्रसूतिणी ॥ निद्रा लागली तयेलागुनी ॥ कृष्ण ठेविला पालटोनी ॥ घेतली कन्या ॥१५॥

मग तो आला देवकीप्रती ॥ आपुली धरोनि पूर्व पद्धती ॥ कन्या आणि तांचि टाहो समस्तीं ॥ ऐकिला तेव्हां ॥१६॥

तंव धांवले कंसदूत ॥ रायासि सांगती मात ॥ कीं देवकी प्रसवली सत्य ॥ आठवा गर्भ ॥१७॥

मग तो आला लवडसवडी ॥ कुरळा बांधितसे जुडी ॥ कवाडें करोनि आडमोडी ॥ प्रवेशला आंत ॥१८॥

देखिली कन्या सुंदरी ॥ बाळक झांकिलें असे पदरीं ॥ चरणीं धरोनियां अंतरीं ॥ फिरविलें तें ॥१९॥

जंव हाणावें शिळेवरी ॥ तंव ते निष्टली सत्वरीं ॥ उभी राहोनि अंबरीं ॥ बोलिली काय ॥२०॥

ह्नणे अरे रे कंसासुरा ॥ महानष्टा परम अपवित्रा ॥ तूं गेलासि रे विपत्तिक्षेत्रा ॥ येणेंचि पातकें ॥२१॥

येणें पातकें साधिलें फळ ॥ वंशांचें होय निर्मूळ ॥ इहपरत्रीं सकळ ॥ होइजे बद्ध ॥२२॥

जैसा अंगार घेवोनि मूळीं ॥ वृक्ष नांदों पाहे पुष्पफळीं ॥ तैसें केलेंसि तात्काळी ॥ कुळघातक्या ॥२३॥

जो न मानी मातापिता ॥ गुरुद्रोह करी उभयतां ॥ भगिनी आणि जामाता ॥ श्वशुरादि करुनी ॥२४॥

हीं सत्कुळें जगीं बोलती । विस्तारें एकोत्तरशत होती ॥ यांसी न करी जो तृप्ती ॥ तो पडे अधःपातीं ॥२५॥

तैसें तुज जाहलें असुरा ॥ वायां कष्टविली वसुंधरा ॥ बाळहत्यारा ब्रह्मसूत्रा ॥ केविं सुटसी तूं ॥२६॥

तरी तुझा जो अंतक ॥ तो आणिके ठायीं असे बाळक ॥ वायां झालासि रे घातक ॥ भागिनेयांचा ॥२७॥

ऐसी बोलोनि भारती ॥ मग ते गेली गगनाप्रती ॥ महातेजाची पडली दीप्ती ॥ विजूपरी ॥२८॥

मार्केडेयपुराणीं सप्तशती ॥ योगमाया महादीप्ती ॥ ते हे अवतरली दिव्यशक्ती ॥ युगांअठ्ठाविसां ॥२९॥

तो कंसविचारी मनीं ॥ लटिकीचि रे गगनवाणी ॥ वायां आपुली दुखविली बहिणी ॥ आणि वसुदेव ॥३०॥

मग बैसोनियां भंद्रीं ॥ चिंतावला परम अंतरीं ॥ परि सोडिली ते सुंदरी ॥ देवकी माता ॥३१॥

सवें बोलाविले गुरुमंत्री ॥ विचार करिती नानापरी ॥ कंसें आदि अवसान विस्तारीं ॥ सांगितलें तयां ॥३२॥

तंव ह्नणती ते चांडाळ ॥ या वर्तमानींचे जे बाळ ॥ राया ते वधावे सकळ ॥ पाहोनियां ॥३३॥

चौफेर पाठवावे हेर ॥ न ह्नणावे राव किंकर ॥ जो वध करील त्यासी अपार ॥ द्रव्य द्यावें ॥३४॥

कंसासि ह्नणती प्रधान ॥ राया तूं देवांचा दमन ॥ तूं सदा निर्भय कवण ॥ छळील तुज ॥३५॥

त्या देवांचे साह्यकारी ॥ गाई द्विज अग्निहोत्री ॥ ते वधिलिया निर्धारी ॥ वधिलेचि देव ॥३६॥

इतुकिया वचना वरी ॥ वेषधरोनि नानापरी ॥ दैत्य धाविन्नले चौफेरी ॥ वधावयासी ॥३७॥

तंव पूतना नामें निशाचरी ॥ अघासुराची संहोदरी ॥ ते ह्नणे विडा द्यावा करीं ॥ माझिये तुह्मीं ॥३८॥

आह्मी जातीचे राक्षस ॥ आह्मां मनुष्यांचा त्रास ॥ तरी बाळांचे सायास ॥ फेडीन तुमचे ॥३९॥

मग वेष धरोनियां कुडा ॥ गोकुळींचा घेतला विडा ॥ स्तनीं लेपविला तेवढा ॥ विषकर्दम ॥४०॥

आतां असो हे पूतना ॥ देवकी प्रसवली श्रीकृष्णा ॥ संतोष जाहला प्रजाजनां ॥ कौतुक गोकुळीं ॥४१॥

उभविलीं गुढिया तोरणें ॥ नगरीं जाहलें वाधावणें ॥ नंदें दीधलीं महा दानें ॥ विप्रांसि बहु ॥४२॥

कुंकुम कस्तुरी चंदनें ॥ गोपिका करिती शिपणें ॥ नर नारी देती वाणें ॥ द्विजकुळासी ॥४३॥

दहीं दूध आणि लोणी ॥ हें शिंपणें केलें व्रजजनीं ॥ परस्परें खेळती कामिनी ॥ व्रजांगनांसी ॥४४॥

तंव आला गर्गाचारीं ॥ तेणें वर्तविली जन्मोतरी ॥ ह्नणे सकळ वंशोद्वारी ॥ करील बाळ हा ॥ ॥४५॥

करील सांधूंचें पाळण ॥ देवां ब्राह्मणांचें पूजन ॥ दुष्ट दैत्यांचेम मर्दन ॥ करील राज्य ॥४६॥

सोळा सहस्त्र अंतःपुरां ॥ आणि भोगील आवंतरां ॥ कन्या पुत्र लक्षें अपारा ॥ होईल संतती ॥४७॥

आणि पृथ्वीचे जे भूपाळ ॥ ते मानितील यासी सकळ ॥ हा असे लक्ष्मीचा राउळ ॥ बाळदेही ॥४८॥

पवाडे मल्ल महादानी ॥ नीतिधर्मीचा दिनमणी ॥ लोहपात आहे चरणीं ॥ आदान यासी ॥४९॥

ऐसा बोलिला श्रीगुरु ॥ तो कृष्णें मनीं धरिला विचारु ॥ ह्नणोनि मारिला कुमरु ॥ भीमसेनाचा ॥५०॥

असो नाम ठेवोनि श्रीकृष्ण ॥ मग तो निघाल ब्राह्मण ॥ तंव आली विडा घेऊन ॥ पूतना ते ॥५१॥

तें समजोनि सुकुमार बाळक ॥ आपण धरिला मनुष्य वेष ॥ पाहों आली आदिपुरुष ॥ प्रवेशली राउळी ॥५२॥

तंव तें कळलें मुरारी ॥ स्वयें मावेची रचना करी ॥ अंग टाकिलें भूमीवरी ॥ कोठें स्थिर न राहे ॥५३॥

तंव बोलिली पूतना ॥ नावेक द्यावाहो तान्हा ॥ मुखीं घालीन स्तना ॥ बाळकाचे ॥५४॥

चंद्र देखोनि सोमकांत कीं वन्हिदर्शनें जैसें घृत ॥ तैंसें हदय पान्हावत ॥ देखोनि यासी ॥५५॥

तंव त्या ह्नणती नगरनारी ॥ बाई तूं सदैव गे सुंदरी ॥ तुझे वोसंगी श्रीहरी ॥ राहिल उगा ॥५६॥

मग तो उचलिला कुमर ॥ जेवीं कां धगधगीत अंगार ॥ स्तनीं लाविला अजगर ॥ कृष्णसर्प ॥५७॥

घटघटां करीतसे पान ॥ करीं धरोनियां स्तन ॥ पयद्वारें पंचप्राण ॥ आकर्षिले देवें ॥५८॥

तंव ब्रह्मांडीं उठली व्यथा ॥ स्तन न सोडी नव्हे परता ॥ हदयीं कौतुके हाणी लाथा ॥ बाळक्रीडां ॥५९॥

सहजें साधिली समाधी ॥ जो न लक्षवे मनबुद्धीं ॥ तो भेटला प्राणसंबंधी ॥ पूतनेसी ॥ ॥६०॥

नाना तप व्रतें दान ॥ तीर्थ क्षेत्र देहदंडण ॥ तये पुण्येम हें अवसान ॥ पावली अंतीं ॥६१॥

प्राण सांडी निशाचरी ॥ भूमीं पडिली कलेवरीं ॥ दीड योजन तिची थोरी ॥ राक्षसरुप ॥६२॥

तेथें जाहला महा शब्द ॥ लोक धांवले विविध ॥ तंव स्तन पीतसे गोविंद ॥ राक्षसीचें ॥६३॥

मग हाहा ह्नणती लोक ॥ गौळिये उचलिला बाळक ॥ कुरवंडी सांडोनि दीपक ॥ लाविती द्वारीं ॥६४॥

तैं नंद नव्हता घरीं ॥ गेला होता मथुरे नगरीं ॥ नेल्या दहीं दुधाच्या घागरी ॥ कंसभेटीसी ॥६५॥

मग मिळती नगरजन ॥ तयेंची शतखंडें करुन ॥ तयेसि करितां दहन ॥ सुपरिमळ येतसे ॥६६॥

तंव नंद आला ते अवसरीं ॥ धूम्र देखिला नगरद्वारीं ॥ मग सांगती नरनारी ॥ अरिष्ट थोर चुकलें ॥६७॥

आतां असो हे पूतना ॥ ते नेली स्वर्गभुवना ॥ जैसें गंगे बुडालिया प्राणां ॥ अवगती नव्हे ॥६८॥

तथेचें कायसें जी नवल ॥ जे पूतनेनें अर्पिलें स्तनयुगुल ॥ ह्नणोनि पावली पुण्यफळ ॥ विरोधभक्तीं ॥६९॥

असो करभाराचेनि आदरें ॥ सहजें नंद आला मथुरे ॥ तेथें भेटला सादरें ॥ वसुदेवासी ॥ ॥७०॥

दोघां जाहली क्षेमकुशळी ॥ वसुदेव वर्षे नेत्रकमळीं ॥ पुत्र आठवले त्या वेळीं ॥ दोन्ही तयासी ॥७१॥

ह्नणे आमुची वल्लभा रोहिणी ॥ ते स्त्री आणि पुत्र दोनी ॥ तुज निरविलीं ह्नणोनी ॥ बोले वसुदेव ॥७२॥

मग नंद ह्नणे वसुदेवासी ॥ खेद न करीं गा मानसीं ॥ तुझीं स्त्रीपुत्रें मजपाशीं ॥ असती सुखें ॥७३॥

ऐसें सांगोनिया नंद ॥ गोकुळीं आला आनंदकंद ॥ परि वसुदेववाक्याचा भेद ॥ नकळे तयासी ॥७४॥

असो कोणे एके वेळां ॥ जन्मनक्षत्राचा सोहळ ॥ नंदगृहीं मिळाला मेळा ॥ गौळीजनांचा ॥७५॥

तंव तो गाड्याचा सांटा ॥ झोळिये घातलें वैकुंठा ॥ कृष्णे मुखीं घालूनि आंगठा ॥ मांडिलें रुदन ॥७६॥

परि तें श्रवणीं कोणी नायके ॥ मग युक्ती विचारिली बाळकें ॥ चरण टाकिला कौतुकें ॥ शकटावरी ॥७७॥

हरावया मातेचा शिण ॥ ह्नणोनि शकट केला शतचूर्ण ॥ हा भागवतींचा प्रश्न ॥ परि नव्हे कंसदूत तो ॥७८॥

मग कोणेएके शुभकाळीं ॥ यशोदेनें घेतला वनमाळीं ॥ तंव कृष्णे देखिला अंतराळीं ॥ तृणावर्त ॥७९॥

ह्नणोनि यशोदेचे कडिये ॥ भार घातला कृष्णदेवें ॥ मातेनें ठेविला स्वभावें ॥ धरणीवरी ॥८०॥

ऐसें जाणोनिया असुरें ॥ धुंधुवात सोडिला नावरे ॥ नगरीं उठले धुरोळे ॥ न दिसे भानू ॥८१॥

राया मग त्या तृणावर्तें ॥ तें बाळक नेलें गगनपंथें ॥ कृष्णें धरिला उभयहातें ॥ कंठ त्याचा ॥८२॥

जंव यशोदा करी न्याहाळ ॥ तंव जवळी न दिसे बाळ ॥ मग पिंड पडिला विकळ ॥ यशोदेचा ॥८३॥

नगरीं होतसे थोर वळसा ॥ गौळिये धांवती दशदिशां ॥ ह्नणती बाळक नेला कैसा ॥ कोपला देव ॥८४॥

ऐसा जाणोनि आवर्त ॥ मग कृष्णें चेपिला तो दैत्य ॥ कंठ धरोनि भूपिपात ॥ करी कृष्णदेव ॥८५॥

मग ते धांवोनि यशोदा ॥ कडिये घेतलें गोविंदा ॥ तुज रक्षो रे सर्वदा ॥ महांकाळी ॥८६॥

पुढें कोणे एके अवसरीं ॥ मृत्तिका भक्षितसे मुरारी ॥ तें सांगितलें कुमरीं ॥ मातेजवळी ॥८७॥

मग तो बोलिला श्रीपती ॥ म्यां नाहीं भक्षिली हो माती ॥ हे लटिकेचि सांगती ॥ साहीजण ॥८८॥

हीं गे अष्टादश बाळकें ॥ सांगती नाना विशेखें ॥ परि हे लटिके हो अंबिके ॥ मीचि सत्य ॥८९॥

या चौघांचा मनीं भरंवसा ॥ माते न धरीं तूं ऐसा ॥ हे धांवती दाही द्रिशा ॥ अंध जैसे ॥९०॥

या साहीजणांच्या युक्ती ॥ जैसा गर्भीच धांडोळी भिंती ॥ नातरी एकचि कुंजर जल्पती ॥ अनेक भेद ॥९१॥

ऐसें ह्नणोनि पसरिलें मुख ॥ ह्नणे पाहें पां सम्यक ॥ न्याहाळू करी तंव त्रैलोक्य ॥ देखे भीतरीं ॥९२॥

चंद्र तारा आणि दीनकरु ॥ समुद्र वनें महामेरु ॥ ब्रह्मा इंद्र महा रुद्रु ॥ लोकपाळसहित ॥ ॥९३॥

आणिक न्याहाळी जंव दृष्टीं ॥ तंव यशोदे कृष्ण कडियेवटीं ॥ गळां घालोनियां मिठी ॥ बैसलासे ॥९४॥

तो एक ब्रह्मांडा भीतरीं ॥ ब्रह्मांडें त्या एकाचे उदरीं ॥ ऐसा बाह्याभ्यंतरीं ॥ अवघा कृष्ण ॥९५॥

माता जाहली विस्मित ॥ ह्नणे तूं एकचि रे सत्य ॥ तंव माया घालोनि चित्त ॥ हरिलें तीचें ॥९६॥

पुढें कोणे एके वेळीं ॥ दधिमंथन मांडिलें प्रातःकाळीं ॥ तंव कृष्णे घेतली आळी ॥ मागे लोणी ॥९७॥

माता धरोनियां पदरीं ॥ भोवों नेदी मंथनदोरी ॥ तंव दुग्थ उतलें भीतरीं ॥ देखोनि धांवे ॥९८॥

इकडे येरें उलथिली माथणी ॥ बोटें चाटितसे लोणी ॥ तों धाविन्नली जननी ॥ धरावयासी ॥९९॥

हातीं घेवोनियां शिपटी ॥ माता लागली पाठोपाठी ॥ जैसी स्वरुपाचिये भेटी ॥ छाया धांवे ॥१००॥

कीं बहुतां देहांचे शेवटीं ॥ चरमदेहा होतसे भेटी ॥ तैसी माता देखोनि हिंपुटी ॥ दीधलें धरूं ॥१॥

मातेनें आणोनि गौकंठदोर ॥ बाधों आदरीलें शीघ्र ॥ तंव न पुरे अंगुलमात्र ॥ उरलें देखें ॥२॥

देवें देखोनि खेदक्षीण ॥ बांधूं पुरविलें संपूर्ण ॥ मातेनें उखळीं बांधोनि आपण ॥ भीतरीं गेली ॥३॥

इकडे वोढोनियां उखळ ॥ वृक्ष उन्मळिले समृळ ॥ ते यमलार्जुन बहुतकाळ ॥ होते तेथें ॥४॥

त्या यमलार्जुनांची कथा ॥ प्रथमस्तबकीं असे भारता ॥ ते पाहिली असेल श्रोतां ॥ सहज मागें ॥५॥

तंव पुढें एके अवसरीं ॥ वत्सें चारीतसे मुरारी ॥ गोपाळांसहित तीरीं ॥ कालिंदीचे ॥६॥

तेथें आला वत्सासुर ॥ तो जाणितला कंसहेर ॥ मग चरणीं धरोनि अपवित्र ॥ टाकिला कवटापरी ॥७॥

ऐसाचि आणखी एके अवसरीं ॥ वत्सें चारितसे मुरारी ॥ तो बाळक जाणोनिं श्रीहरी ॥ आला बकासुर ॥८॥

मुख पसरोनियां थोर ॥ कृष्ण गिळिला समोर ॥ कंठीं लागले शतसहस्त्र ॥ अंगार जैसे ॥९॥

मग तो सोडिला काकुळती ॥ चुंचु धरिला दोहों हातीं ॥ उभा चिरिला पत्रजांती ॥ नारायणें ॥११०॥

तंव तें जाणोनि अघासुर ॥ क्रोधें आला वेगवत्तर ॥ वेष धरोनि अजगर ॥ गिळावयासी ॥११॥

कृष्णें वांटितां दहींभात ॥ तंव पुढां देखती पर्वत ॥ ह्नणोनि गोवळे अनंत ॥ वेंधले वरी ॥ ॥१२॥

तेथें देखिली मुखदरी ॥ प्रवेशले तिये भीतरीं ॥ तेव्हां तया अजगरीं ॥ मेळविलें मुख ॥१३॥

येथें आक्षेप करितील श्रोतां ॥ तरी तो सर्प कळला होता ॥ आणि कृष्ण सांगत असतां ॥ रिघाले कैसे ॥१४॥

एतद्विषयीं परिहार ॥ बोलतसे कवीश्वर ॥ काळस्वरुपें संसार ॥ वर्णिजेल ॥१५॥

काळरुप हा संसार ॥ तेथें जन व्यापिला थोर ॥ महा मोहक फणिवर ॥ भ्रांतिरुप तो ॥१६॥

हा जन करितसे आचार ॥ तो गुणत्रयांचा प्रकार ॥ त्यामाजी तमोगुण जो नर ॥ तो चाले अज्ञानगतीने ॥१७॥

जो तरी रजोगुण प्राणी ॥ तो विषयीं सुख देखोनी ॥ नानाअर्थ फळसंधानीं ॥ आचरोनि चाले ॥१८॥

आणि जो असे सत्वगुणी ॥ तो कर्माकर्मी जाणे उभवणी ॥ धीर होवोनि तत्क्षणीं ॥ आचरे क्रिया ॥१९॥

याचिपरी कृष्णगोपाळ ॥ परि प्रवेशला तें बीळ ॥ सर्प सर्प ह्नणती बरळ ॥ परी विचार न करिती ॥१२०॥

एक ते नेणोनि निघाले ॥ त्यांचेमागील तैसेचि आले ॥ त्याही मागोनि प्रवेशले ॥ रामकृष्ण ॥२१॥

जैसा ज्ञानी करी संसार ॥ तो तरावया पैलपार ॥ तैसा निघाला शारंगधर ॥ सर्पमुखीं त्या ॥२२॥

असो हे रिघाले गोवळे ॥ तयां वैष्णवीमाया केवीं कळे ॥ मग विचारिलें गोपाळें ॥ मरण त्याचें ॥२३॥

तंव कृष्ण जाहला उंच तरु ॥ जैसा शीड उभारी नावकरु ॥ ब्रह्मरंध्रीं शारंगधरु ॥ निघता जाहला ॥२४॥

त्या असुराची आत्मज्योती ॥ बाहेर निघाली महादीप्ती ॥ ते प्राशिली श्रीपतीं ॥ मुखामाजी ॥२५॥

अधासुराचें मरण ॥ तें देवांसही दुर्लभ जाण ॥ देव अंतरिक्षीं येवोन ॥ करिती पुष्पवृष्टी ॥२६॥

अघासुरातें मोक्ष देखिला ॥ सुरनाथ विस्मित जाहला ॥ मग आनंदभरित सकळां ॥ हरिचरित्र सांगत ॥२७॥

सन्निध उद्धरिली तृणचरें ॥ एक मुक्तीसि पावलीं वैरें ॥ भक्ता दीधलें उदारें ॥ तें श्रीकृष्णचि जाणे ॥२८॥

ऐसा वधिला अघासुर ॥ देवीं केला जयजयकार ॥ मग घेवोनि गौपरिवार ॥ कृष्ण आले वृंदवनीं ॥२९॥

तें वृंदावन पावन ॥ तेथील न मना ॥ मग देता जाहला सूचना ॥ गोपाळांसी ॥३१॥

अरे स्वेच्छा करा उदकपानें ॥ बरवीं या यमुनेचीं पुलिनें ॥ तेथें करावीं भोजनें ॥ खेळमेळेंसी ॥३२॥

ऐसें ऐकोनि गोपाळीं ॥ काढिल्या खांदींच्या कांबळी ॥ आसनें रचिलीं तयेवेळीं ॥ कृष्णालागीं ॥३३॥

तो राव कैवल्याचा दानी ॥ बैसला त्या उंच आसनीं ॥ मग आपुल्या मोटा सोडोनी ॥ बैसते जाहले ॥३४॥

सन्मुख व्हावया श्रीकृष्णाकडे ॥ येर निघे येराकडे ॥ ऐसे अवघे चहूंकडे ॥ बैसते जाले ॥३५॥

गोपाळ तृप्त ब्रह्मरसें ॥ परी देवांसी प्रवृत्ति असे ॥ हें चरित्र करावया ऐसें ॥ केली भोजनरचना ॥३६॥

पाहतां नेत्र आनंदती ॥ ह्नणोनि दोघे अभिमुख होती ॥ तरी विश्वतोमुखी हे श्रुती ॥ देवें साच केली ॥३७॥

तया परमानंद चंद्राजवळी ॥ गोपाळ तारांगणांच्या ओळी ॥ कीं रायाभोंवत्या प्रभावळी ॥ रत्नपंक्तीच्या ॥३८॥

शशितारांहीं नभमंडळ ॥ तैसे दिसती गाई गोपाळ ॥ कीं ब्रह्मविद्या वोळंगतां सकळ ॥ इतरविद्या शोभती ॥३९॥

कीं परपुरुषाचिया गळां ॥ ब्रह्मगोलांचिया माळा ॥ तैसे कृष्णाजवळी तेवेळां ॥ गोपाळ शोभती ॥१४०॥

झोळिया मोटा शोभताती ॥ आपुलालीं अन्नें आणिती ॥ रुचिकर शाका वानिती ॥ हांतुरले पल्लव ॥४१॥

मग देवाच्या पांथिकरीं ॥ अन्नें घातलीं कमलदलावरि ॥ एकें सुरतरुचिया मंजिरी ॥ हांतुरलिया ॥४२॥

एकें घातलीं कर्दळीपानें ॥ येकें वृक्षत्वचेचीं भोजनें ॥ एकें वोविणीचीं पानें ॥ स्वीकारिलीं ॥४३॥

मग देवांचा राव मुरारी ॥ दधिभात घेऊनियां करीं ॥ अन्नें आंवळे बेले आंगोळी ॥ तयांमाजी मिरवती ॥४४॥

कीं तीं ब्रह्मादिक पदें ॥ हातीं घेउनी ॥ हिंडे पहावया लागोनि ॥ शरणागतातें ॥४६॥

ऐसा सुंदर चक्रधर ॥ आरोगणा करितसे परिवार ॥ मग ब्रह्मादिकां न धरवें धीर ॥ गगनीं पाहती ॥४७॥

पांथिकां होतसे जेवण ॥ तें अमृतासी आणी उणेपण ॥ तेवेळीं अन्नंब्रह्म हें वचन ॥ सत्य केलें ॥४८॥

देव अमृतपान करिती ॥ ते तेथोनि मागुती पडती ॥ परि जन्ममरण निवारिती ॥ श्रीकृष्णदास ॥४९॥

तयांचे देखोनि देवपण ॥ आपणा धिःकारिती सुरगण ॥ ह्नणती सांडोनि मुगुटभूषण ॥ रिघों गोपाळांमाझारी ॥१५०॥

परी देवपणीं नाहीं अधिकारु ॥ हा वोळंगावया चक्रधरु ॥ येर्‍हवीं याचेनिं भवसंसारु ॥ तरतों आह्मीं ॥५१॥

अवतरलासे कैवल्यदानी ॥ हे ध्वनी पडतांचि कानीं ॥ पाहों आला अष्टनयनी ॥ तये ठायीं ॥५२॥

अघासुराचा मोक्ष देखोन ॥ विस्मय पावला चतुरानन ॥ वरी देवांचा बोल ऐकोन ॥ काय बोलता जाहला ॥५३॥

गोपगोपाळांसी खेळणें ॥ अघासुरासी मोक्ष देणें ॥ हें आह्मां देवांत करणें ॥ महापुरुषास नोहे ॥५४॥

आतां गोप गाईस चोरुं ॥ मग कळेल याचा निर्धारु ॥ मागील सांगितला अवतारु ॥ नवलावाचा ॥५५॥

ऐसें विचारिलें चित्तीं ॥ सत्यलोकींचेनि पती ॥ तंव कैवल्यनाथा जाहली प्रवृत्ती ॥ आरोगणेंसीं ॥५६॥

गोपाळ प्रसादें आनंदले ॥ मी माझें हें विसरले ॥ तंव गोभार दुरावले ॥ चरतचरतां ॥५७॥

गोप ह्नणती हो वनमाळी ॥ धेनुवत्सें दुरावली ॥ तरी जावें तये स्थळीं ॥ पहावयासी ॥५८॥

मग तयांसि ठेवोनि तेथ ॥ धेनूंस पाहे कृष्णनाथ ॥ गिरिकाननें पहात ॥ परि न देखे गाई ॥५९॥

विस्मित जाहले श्रीपती ॥ ह्नणोनि आले गोपांप्रती ॥ तंव तेही तेथें न दीसती ॥ पूर्वील स्थळीं ॥१६०॥

ऐसीं दोहींकडे चतुराननें ॥ गाई गोप हरिलीं तेणें ॥ मग विचारिलें कमलनयनें ॥ अंतरामाजी ॥६१॥

जया ईश्वराचे प्रकृतीं ॥ ब्रह्मांडाच्या कोडी होती ॥ त्यासी गोपवांसुरें करावया मागुती ॥ सायास कैंचा ॥६२॥

परि ब्रह्मा निजरुपें मुलवावा ॥ थोर पवांडा दावावा ॥ गोपगोधनां संबंध द्यावा ॥ निजरुपाचा ॥६३॥

या काजा देव नेणता जाहला ॥ ब्रह्मा निजभुवना निघाला ॥ गोपवांसुरां सुरवाडला ॥ राउळींचीं ह्नणोनी ॥६४॥

कीं मज गमे अर्थ आन ॥ करितां श्रीकृष्णाचें सन्निधान ॥ तयां काय हें जाहलें विघ्र ॥ ह्नणोनि ब्रह्मपदा नेलीं ॥६५॥

श्रीकृष्णाचें उच्छिष्ट सेविती ॥ ते ब्रह्मपदासि वंद्य होती ॥ प्रारब्धें सत्यलोक भोगिती ॥ शेखीं कैवल्यपद ॥६६॥

कीं जाहलिया ईश्वरार्पण ॥ पशूंसहीं तिहीं लोकीं गमन ॥ हें दाविलें समर्थपण ॥ नारदादिकां ॥६७॥

अथवा वस्तूसी जवळिक जाहली ॥ ह्नणोनि सिद्धिअवस्था पावली ॥ तरीच भोगावयाचि नेलीं ॥ सत्यलोकीं ॥६८॥

असो बोलाचा विस्तार ॥ काय करितसे नंदकुमर ॥ जो आदिपुरुषाचा अवतार ॥ आर्तरक्षावया ॥६९॥

गोकुळीं जावयाची जाहली वेळ ॥ मग आपणचि जाहला वत्सें गोपाळ ॥ ऐसें त्यांचे पुण्य प्रबळ ॥ निरंतर जोडलें ॥७०॥

हा अवतरला परमात्मा ॥ तैं दुःख नाहीं भूतग्रामा ॥ तयाचे दृष्टिपुढें संसारधर्मा ॥ रिघाव नाहीं ॥७१॥

आधींच देव सर्वगत ॥ वरी तैसाचि जाहला मनोरथ ॥ तयांतुल्य रुप धरोनि वर्तत ॥ हें नवल नव्हे ॥७२॥

एक कैसा जाहला अनेक ॥ ऐसा बोलेल नेणता लोक ॥ तरी सहस्त्रघटीं शशांक ॥ प्रतिबिंबतसे ॥७३॥

जैसा मणिगुणीं तंतु ॥ मेघवोळी गगनाआंतु ॥ तैसा भूतीं विश्वनाथु ॥ भूतें तयामाजीं ॥७४॥

कोण करील हा निर्धार ॥ ज्याचा वेदांसि नकळे पार ॥ श्रीकृष्णकृपा होय सत्वर ॥ तरी भ्रांति फिटे ॥७५॥

जयाचे घरींची सहजपरी ॥ ब्रह्मांड निजरुपें आकारी ॥ तो वांसुरांचीं रुपे धरी ॥ हें काय नवल ॥७६॥

परि हे विश्वेश्वराची लीलावृत्ती ॥ ह्नणोनि संतजन वानिती ॥ जे ऐकोनि जीव सुटती ॥ संसारदुःखातें ॥७७॥

असो जंव पाहिलें अंतर्ज्ञानीं ॥ तंव वत्सें नेलीं ब्रह्मयानीं ॥ मग वर्ते आपणचि रुपें धरोनी ॥ सकळिकांचीं ॥७८॥

वत्सें गोवळे आणि घोंगडी ॥ शिरपांवे मोहरी कावडी ॥ खुजीं बोबडीं आणि रोडीं ॥ जाहला देवो ॥७९॥

कोशीं खैरीं आणि वाहळीं ॥ कावेरीं भिंगारीं पाटलीं ॥ बुची बोडकीं एकडोळीं ॥ जाहला देव ॥१८०॥

एक काळे गोरे सांवळे ॥ बोहक खुजटे रातआंधळे ॥ खुजे खरजुडे साअंगुळे ॥ नटला आपण ॥८१॥

एक बहिरे बोबडे ॥ एक दांतिरे आणि राखुंडे ॥ ठेंगणे वेडे बागडे धिगडे ॥ नटला देवो ॥८२॥

एक सगुण साकार ॥ एक श्रीमंत सुंदर ॥ जैसे देवांचे अवतार ॥ तैसे दिसती ॥८३॥

जयाची जैसी प्रकृती ॥ जैसा वर्ण जैसी आकृती ॥ तें तें जाहला कैवल्यपती ॥ येकाचि वेळे ॥८४॥

पांवे तरणी मोहरी ॥ शिंएं डांगा कुसरी ॥ राजस सत्व तामसांपरी ॥ तेंही जाहला ॥८५॥

ऐसें आवगोनि मुरारी ॥ येतसे त्या गोपाळांमाझारी ॥ तंव संभ्रम जाहला नगरीं ॥ तो वानूं नेणती ॥८६॥

ज्याचे कृपातुषारें सर्व जीविजे ॥ अमृताचा सागर पाविजे ॥ परमानंद प्राप्त होइजे ॥ क्षणामाजी ॥८७॥

जें गोकुळजनीं जाहलें ॥ तें न पाविजे कवणे बोलें ॥ तें घरासि पुसत आलें ॥ परब्रह्म ॥८८॥

प्रथम वानिजे यशोदानंद ॥ जयांचे घरीं बाळ गोविंद ॥ परि आतां घरोघरी परमानंद ॥ गौळियांचे ॥८९॥

सांडोनिया सकळसंगातें ॥ योगी चिंतिती जयातें ॥ तो गोपांघरी साळंकृतें ॥ लेंकुरें झाला ॥१९०॥

मुखें न वर्णवे शेषातें ॥ वाणी नेणिजे ज्यातें ॥ पुत्रभावें आलिंगिती त्यातें ॥ गौळीजन ॥९१॥

जो पूर्ण तृप्त ब्रह्मरसें ॥ आत्माराम होवोनि असे ॥ तो ढेंकरा देत असे ॥ तक्रदुग्धें ॥९२॥

वोंवाळोनि मंगळतुरें ॥ वेद मंत्रें स्तविजे द्विजवरें ॥ तो जाहला वांसुरें ॥ भक्तीस्तव ॥९३॥

असो उदेला दिनकरु ॥ बलरामासहित नंदकुमरु ॥ निघाला वांसुरें चारुं ॥ वृंदावनीं ॥९४॥

ऐसियापरी प्रतिदिनीं ॥ खेळत असे वृंदावनी ॥ तंव इच्छा जाहली मनीं ॥ चतुराननाचे ॥९५॥

ब्रह्मयाचा क्षणैक भरला ॥ तंव संवत्सर पालटला ॥ आपुलें केलें पाहों निघाला ॥ मॄत्युलोकीं ॥९६॥

मग विचारी निजचित्तीं ॥ सत्यलोकींचा अधिपती । रजोगुणाचेनि संगतीं ॥ भुलला व्यर्थ ॥९७॥

तो नेणें कृष्णाचें महिमान ॥ जें आनंदकंदाचें मंडण ॥ त्याचें मोह पावेल मन ॥ हें नवल नोहे ॥९८॥

सिंहाचें बाळ पाहों आला ॥ जैसा मदें जंबुक मातला ॥ तैसा अंतरीं बोलों लागला ॥ चतुरानन ॥९९॥

ह्नणे हा असता ईश्वर ॥ तरी सत्यलोकीं येता निर्धार ॥ गाई गोप वत्सें समग्र ॥ न्यावयासी ॥२००॥

कीं मनुष्यपणें अवतरला ॥ ह्नणोनि सत्यलोकीं येवों भ्याला ॥ अथवा नवलप्रपंच रचिला ॥ देवरायें तेणें ॥१॥

ऐसें बोलोनि चतुरानन ॥ आला निजभुवना पासोन ॥ तंव प्रताप देखिला गहन ॥ विज्ञानशक्ती ॥२॥

पांवे शिंगां मोहरी ॥ पडसाद उठे अंबरीं ॥ ताल संगीत नानापरी ॥ वाजताती ॥३॥

विसरोनि देहभावातें ॥ गाती कृष्णचरित्रातें ॥ गोपवांसुरें आनंदभरितें ॥ देखियेलीं ॥४॥

ह्नणे म्यां नेलीं समस्तें ॥ तींच आणिलीं या नंदसुतें ॥ मग ज्ञानदृष्टीं पाहे मागुते ॥ तंव देखे सत्यलोकीं ॥५॥

पुन्हां पाहे भूमंडळीं ॥ तंव सवत्स गोपवनमाळी ॥ कृष्ण मिरवे गोकुळीं ॥ अनुपम्यरुपें ॥६॥

यापरी दोहींसि पाहतां ॥ संदेहीं पडिला सृष्टिकंर्ता ॥ मग आणिक जाहला पाहता ॥ नवलाव एक ॥७॥

सकळ चतुर्भुज गोपाळ ॥ शंख चक्र गदा कमळ ॥ पीतांबरधारी सुनीळ ॥ कंठीं कौस्तुभ ॥८॥

पदकीं निळ्याची ठेवणी ॥ भुजीं अंदुवाची मिरवणी ॥ मकराकार कुंडलें श्रवणीं ॥ झळकताती ॥९॥

सकळीं मुकुट केले धारण ॥ कंठीं वनमाळा जाण ॥ अवघ्यांसी श्रीवत्सलांछन ॥ देखतअसे ॥२१०॥

धाता विस्मय पावला ॥ मनीं निर्धारुं लागला ॥ तंव देखता जाहला ॥ येकरुपासी ॥११॥

धरुनि साकार मूर्तीतें ॥ येकासवें सकळ तत्वें ॥ उपासिती ये कमेकांतें ॥ भक्तिचक्रेंसीं ॥१२॥

ब्रह्मा विष्णु महाकाळ ॥ सुरवर आणि दिक्पाळ ॥ सप्तकंदुक आणि कुलाचळ ॥ मूर्तिधारी ॥१३॥

भूचरें आणि खेचरें ॥ वनचरें आणि जलचरें ॥ देखिलीं सकळ परिवारें ॥ वोळंगंती तेथे ॥१४॥

कीं देव सदा वोळंगती ॥ परी तें रुप न देखती ॥ ह्नणोनि पाहों आला श्रीमूर्ती ॥ परब्रह्माची ॥१५॥

कृष्णाचे नवल कौतुकें ॥ ब्रह्म वसे नाभिकमळिके ॥ तो कृष्ण ब्रह्मांडें खेळे अनेकं ॥ भूमंडळीं पैं ॥१६॥

चतुराननाची कुंठित मती ॥ तेवेळीं विचारी चित्तीं ॥ हें अवघें साच कीं भ्रांती ॥ जाणवेना ॥१७॥

जैसें सांबरांचे दृष्टिबंधना ॥ तैसें जाहलें चतुरानना ॥ कवण मी आलों कवणे स्थाना ॥ विचारी मनीं ॥१८॥

गोपाळांची रिद्धि देखोन ॥ भुलला तो चतुरानना ॥ सांडिला थोर अभिमान ॥ जाणपणाचा ॥१९॥

ऐसिया ब्रह्माच्या अनंत कोडी ॥ रोमकूपीं असती परवडी ॥ त्या रुपाची थोरी केवढी ॥ कोण जाणे ॥२२०॥

त्या ईश्वराचें करणें ॥ ठाउकें करुं आला ब्रह्मपणें ॥ सुखें असे लेंकुरपणें ॥ सत्यलोकीं ॥२१॥

ह्नणोनि सांडारे अहंकार ॥ अनुसरारे चक्रधर ॥ मग जाणाल परात्पर ॥ विचारातें ॥२२॥

तोचि ध्यानीं आणि मनीं ॥ त्याचे पंवाडे ऐकावे कानीं ॥ स्मरण आणि कीर्तनीं ॥ घ्यावा निरंतर ॥२३॥

मग नारद ह्नणे ब्रहयातें ॥ आतां सोडोनि अहंकारातें ॥ वोळंगावें श्रीकृष्णातें ॥ भ्रांति फिटावया ॥२४॥

तेथोनि नारद आला गोकुळा ॥ तेणें श्रीकृष्ण देखिला ॥ मग विस्मयो पावला ॥ नेणवे चरित्र ॥२५॥

नारद ह्नणे हो मुरारी ॥ विधाता तुमची नेणे थोरी ॥ परि कृपा करावी तयावरी ॥ वत्सलपणें ॥२६॥

कीं मातापितरां देखतां ॥ बाळकां भुली जाहली सर्वथा ॥ तो बोल कवणासि आतां ॥ विचारीं कृष्णा ॥२७॥

सिंहाचें पहावया उड्डाण ॥ जंबुका काय असे आंगवण ॥ तुझे शक्तीचें विश्वमोहन ॥ तेथें ब्रह्मा कायसा ॥२८॥

राउळींची केली चोरी ॥ तें उपहासों नये जी मुरारी ॥ वर दीधलासे पूर्वापारीं ॥ सृष्टिकर्त्यासी ॥२९॥

तुझें चुकतां सन्निधान ॥ तें देहीं संचरे अज्ञान ॥ ह्नणोनि विश्वरुपीं सावधान ॥ असावें जी ॥२३०॥

ऐसें नारद बोलिला ॥ तेणें देव संतोषला ॥ मग हांसोनि अनुवादला ॥ नारदाप्रती ॥३१॥

ह्नणे वृद्धपणाची भ्रांती ॥ तेणें यासी पडली विस्मृती ॥ परी तुझी योगसंगती ॥ घडली चांग ॥३२॥

प्रसन्न जाहला कृष्ण देव ॥ आकर्षिला शक्तिप्रभाव ॥ देखिले तैं जाहले वाव ॥ एकलाच कृष्ण ॥३३॥

जैसीं गगनीं गंधर्वनगरें ॥ दिसती विचित्र मनोहरें ॥ परि क्षणें एकें निर्धारें ॥ लया जाती ॥३४॥

फिटली ब्रहयाची सर्वभ्रांती ॥ देखिली श्रीकृष्णआनंदमूर्ती ॥ सच्चिदानंद दिव्यकांती ॥ पुतळा कैवल्याचा ॥३५॥

तये वेळीं धांवत आला ॥ साष्टांगेसीं नमस्कार केला ॥ मग विनविता जाहला ॥ करद्वंद्वें ॥३६॥

ह्नणे जालिया रविप्रकाश ॥ नसे खद्योतांचा भास ॥ तैसा माझिये बुद्धिचा विकास ॥ तुजपुढें देवा ॥३७॥

परी भानूची काय थोरी ॥ तुझा प्रकाश ब्रह्मांडोदरीं ॥ तूं भक्तकाजकैवारी ॥ पूर्णरुपा ॥३८॥

जैसा मूढ तपाचे मेळीं ॥ शिवासि बोले ब्रीदावळी ॥ तैसी म्यां केली आळी ॥ आदिनाथा तुजसी ॥३९॥

उदरीं करी चळणवळण ॥ तया गर्भासि नाहीं ज्ञान ॥ परि मातेसि लोभाळपण ॥ तेणें बाळक सुखावे ॥२४०॥

रोगियावरी रोष बोलतां ॥ जरी वैद्य अव्हेर करिता ॥ तरी मग कैंचा तत्वता ॥ वांचे रोगी ॥४१॥

तूं निराकार निर्गुण ॥ जरी नहोतासी सगुण ॥ तरी मग पतितातें कवण ॥ तारिता देवा ॥४२॥

तूं न धरितां अवतार ॥ तरी कवणें वारावा भूभार ॥ दैत्यांचा करोनि संहार ॥ कवण देवां स्थापिता ॥४३॥

तुझे अनंत अवतार ॥ एकएक पंवाडे अपार । ते नवर्णवती अणुमात्र ॥ देवाधिदेवा ॥ ॥४४॥

तूं ओंकार गुणगुप्त ॥ तुं नामत्रयाचें जीवित ॥ तूं ब्रह्म गा मूर्तिमंत ॥ महाभागा ॥४५॥

तूं तत्वादि मनचतुष्ठा ॥ गुणेंद्रियांच्या आदिपीठा ॥ सृष्टिप्रळयादि त्रिकूटा ॥ तूंचि देवा ॥४६॥

तूं हदयकमळीची करंडी ॥ तूं भ्रंमरगुंफा ब्रह्मांडी ॥ तूं ज्ञानचक्राची गुढी ॥ पूर्णरुपा ॥४७॥

तूं योगाचा आदिअवकाश ॥ तूं अवनीचा परमश्वास ॥ तूं जीवांचा परमहंस ॥ गोपिनाथा ॥४८॥

तूं बिंबत्रयांचे ॥ उदयबिंब ॥ तूं अर्धमात्रा सौरभ्य ॥ कीं शब्दस्वानंदाचें नभ ॥ सत्यरुपा ॥४९॥

तूं परात्पर बीजांकुरा ॥ सर्वभूतांच्या आधारा ॥ लीलविग्रह परोपकारा ॥ धरोनि अससी ॥२५०॥

तुझें ध्यान नमन स्तुती ॥ तुझी दुर्लभ गा प्राप्ती ॥ भक्तिभावेंविण ऐसी गती ॥ नव्हे प्राणियांसी ॥५१॥

यज्ञादिकांच्या शत कोडी ॥ करुंजाती लवडसवडी ॥ ते सहजें उभारिती गुढी ॥ पुण्यफळाची ॥५२॥

परि तें सरलिया सुकृत ॥ मग होती भणंगावत ॥ तयांसि जन्ममरण गा सत्य ॥ नटळे पैं ॥५३॥

ऐसी इतर देवांची भक्ती । जैसी गणिकेची संगती ॥ कीं द्रव्य सरलिया पुढती ॥ न पाहे त्यास ॥५४॥

जैसें लोभियाचें मित्रपण ॥ परस्परें करिती भजन ॥ परि द्रव्यसरल्या संभाषण ॥ न करिती कदा ॥५५॥

कीं अष्टांगयोग साधन ॥ पंचप्राणांसि आकर्षण ॥ पश्विमे ठेवोनियां पवन ॥ नेती ऊर्ध्वमार्गे ॥५६॥

सुषुम्रेचेनि विवरें ॥ दहा भेदोनियां चक्रें ॥ परी तुजविणें ऐशा आधारें ॥ न फिटे काहीं ॥५७॥

जरी जाहला योगीश्वर ॥ उठे मोहमदांचा विकार ॥ ह्नणोनि तो मुकोनि निर्धार ॥ पडे पतनीं ॥५८॥

जया न ठाके तवभक्ती ॥ तयासि विरोधें कैंची मुक्ती ॥ श्रवणमननेंविण कल्पांतीं ॥ न घडे भजन ॥५९॥

ऐसिया तुज दंडवत ॥ तुं लीलालाघवी गा सत्य ॥ ह्नणोनि आतां पाहिलें येथ ब्रह्मरुप ॥२६०॥

तवभक्तीचेनि बळें ॥ हे रचितों ब्रह्मांड गोळे ॥ तेथें तुज खेळतां अवलीळे ॥ काय नवल ॥ ॥६१॥

आतां जाणितलासि सत्य ॥ तूं परब्रह्म गा मूर्तिमंत ॥ तुझेनि दैत्यविरोधियां जैत ॥ येईल आह्मां ॥६२॥

जयजयाजी कैवल्यपती ॥ जय भक्तजनां परमगती ॥ जयजय दीनदयाळमूर्ती ॥ परमेश्वरां ॥६३॥

स्तुति करितां देव मानवला ॥ ब्रह्मया नाभिकार दीधला ॥ मग गोवत्सें आणिता जाहला ॥ क्षणामाजी ॥६४॥

सत्यलोकीं होती ठेलीं ॥ अमृतें सुधेनें संतुष्टावलीं ॥ तीं गोपवत्सें उगाणिलीं ॥ गोपनाथासी ॥६५॥

मग देवांचा राव चक्रपाणी ॥ ब्रह्मया देतसे पाठवणी ॥ तंव तो लागोनियां चरणीं ॥ विनवीं आणिक ॥६६॥

ह्नणे अवधारीं मोक्षदानी ॥ त्वां रहावें माझिये मनीं ॥ सदा असावें लोचनीं ॥ श्रीकृष्णराया ॥६७॥

जे हा पावती तवयोग ॥ तयां देई गा भक्तिसंग ॥ तेथें तुझे कथेचा प्रसंग ॥ होईल नित्य ॥६८॥

चरणांवरी ठेवोनि माथा ॥ मग ह्नणे सृष्टिकर्ता ॥ मी अपराधी जी अनंता ॥ रक्षी मज ॥६९॥

ब्रह्मा गेला निजभुवनीं ॥ हें चरित्र ऐकोनि श्रवणीं ॥ जयजयकार स्वर्गभुवनीं ॥ करिती वृंदारक ॥ ॥२७०॥

मग सकळांसहित गोपाळीं ॥ कृष्णें आरोगणा सारिली ॥ देवें मागुतीं वत्सें आणिलीं ॥ चरतहोतीं तेथुती ॥७१॥

सकळ पांव्याचेनि छंद्रें ॥ हरिचरित्र गाती स्वानंदें ॥ ऐसें बिजें केलें गोविदें ॥ गोकुळामाजी ॥ ॥७२॥

गोपाळ सांगती घरोघरीं ॥ आजि पडिलों सर्पमुखाभीतरीं ॥ तेथें रक्षिलें मुरारीं ॥ या कृष्णानें ॥७३॥

पर्वतासारिखा थोर ॥ तो अवलीळा विषधर ॥ तयाचें नांव अघासुर ॥ ऐसें देव बोलती ॥७४॥

ऐकोनि बाळकांचीं वचनें ॥ विस्मय करिती व्रजजनें ॥ ह्नणती यांसी जाहलें झडपणें ॥ भूतबाधेचें ॥७५॥

कृष्णें मारिला अघासुर ॥ त्यासि तो जाहला एक संवत्सर ॥ यांसी जाहला भूतसंचार ॥ निरुतें पैं ॥७६॥

ह्नणोनि पुसती बाळकांतें ॥ काय सांगारे निरुतें ॥ तंव बोलती भयभीतें ॥ मातेप्रती ॥७७॥

आह्मीं करीत होतों भोजनें ॥ तो दूरी गेलीं गोधनें ॥ मग तीं पहावयाकारणें ॥ कान्हा गेला ॥७८॥

तंव चौंमुखांचा विप्र आला ॥ तो आह्मासि घेवोनि गेला ॥ जंव तयाचा गांव देखिला ॥ तंव वांसुरें तेथें होतीं ॥७९॥

त्या गांवीचे सकळ जन ॥ तें करिती अमृतभोजन ॥ तये गांवीचें महिमान ॥ न सांगवें आह्मां ॥२८०॥

ऐसीं बोलतीं बाळें बरलें ॥ देवें तें आच्छादिलें मायापडळें ॥ त्याचे लाघव कवणा नकळे ॥ जेथें ब्रह्मा भूलला ॥८१॥

असो जाहलें वत्साहरण ॥ आणि अघासुराचें मरण ॥ हे कथा पुण्यपावन ॥ सकळ जनांसी ॥८२॥

या चरित्राची महिमा ॥ न वर्णवे प्राकृतीं आह्मां ॥ जेथें लोकपिता ब्रह्मा ॥ भुलोनि गेला ॥८३॥

जेणें आराधिला असे ईश्वर ॥ तारावया घोरसंसार ॥ तयाचे हा पंवाडा निरंतर ॥ मनीं वसेल ॥८४॥

जितुकीं तीर्थे वसती क्षिती ॥ व्रतें दानें वाखणिती ॥ तीं तुल्यसरी न पावती ॥ कृष्णचरित्राची ॥ ॥८५॥

धर्माचिया कोडी बोलती ॥ परि केलियाविण फळें न देती ॥ ही चरित्रश्रवणें होय भक्तीं ॥ परमेश्वराची ॥ ॥८६॥

तो म्यां वर्णिला नेणतीं ॥ परी संतोष मानिला बहुतीं ॥ जेणें जाहली श्रवणतृप्ती ॥ हरिकथेनें ॥८७॥

तंव ह्नणे राजा भारत ॥ ब्रहयानें स्थापिला भक्तिपंथ ॥ परि एक सांडोनि सिद्धांत ॥ बोलिला तो ॥८८॥

ऐसियासि कोण समर्थ ॥ भक्तीसि मिळे सिद्धांतमत ॥ हें रचिलें गा विपरित ॥ सांगें मज ॥८९॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ हा वैष्णवधर्मीचा प्रश्न ॥ तो भक्तिवांचोनि नारायण ॥ न पाविजे आणिकें ॥२९०॥

जैशा एका पुरुषासि दोनी दारा ॥ एकी सुंदरा परि गर्वपरा ॥ दुजी प्रेमें पजे भ्रतारा ॥ वल्लभपणें ॥९१॥

तरी तो कृष्णार्जुनाचा संवाद ॥ अनारिसा गीताबोध ॥ जेणें ज्ञानेंविण परमानंद ॥ पाविजे ना ॥९२॥

भक्तीज्ञानाचें उभय साधन ॥ जैं तत्वज्ञानें होय परिपूर्ण ॥ तैं सहजें वैकुंठभुवन ॥ पाविजे प्राणी ॥९३॥

जो आत्मरुपीं सावधान ॥ तत्त्वज्ञानें असे परिपूर्ण ॥ तयासि न बाधे इंद्रियगुण ॥ कवणे काळीं ॥९४॥

जया ज्ञानीं नाहीं अधिकार ॥ तेणें आचरावा भक्तिप्रकार ॥ नवविधाभक्तिनें ईश्वर ॥ संतोष पावे ॥९५॥

मग तेणें आभारलेपणें ॥ वैराग्याचेनि अनुसंधानें ॥ ज्ञान देवोनि तोडी बंधनें ॥ सेवकांची ॥९६॥

आधीं आचरावा कर्ममार्ग ॥ तेणें होईल भक्तियोग ॥ मग घडेल ज्ञानप्रसंग ॥ निर्वाणमोक्ष ॥९७॥

स्नान दान पूजनार्थ ॥ गाई विप्र महाव्रत ॥ मंत्रानुष्ठान आगमोक्त ॥ आणि यज्ञकर्म ॥९८॥

हरिहरनामाच्या युक्ती ॥ वेदमंत्रें द्विज स्थापिती ॥ कीं विष्णु आहे सर्वांभुतीं ॥ ह्नणोनियां ॥९९॥

तया भक्तीचें मुख्यप्रमाण ॥ जें वैराग्यज्ञानांचे साधन ॥ ह्नणोनि स्थापिती वैष्णवजन ॥ नारदादिक ॥३००॥

आतां असो हें अनुसंधान ॥ गोकुळीं असतां रामकृष्ण ॥ गाई गोपी समाधानें ॥ वर्तती सुखें ॥१॥

जें विधीचें जन्मस्थान ॥ नवरसांचें पूर्ण विधान ॥ त्यावांचोनि सदैव कोण ॥ आणिक नसे ॥२॥

ज्याचा भवरुप खेळ वर्तत ॥ योगिये परम सिद्धि पावत ॥ जो तापत्रय निवारित ॥ सकळजनांचें ॥३॥

जैं देव रासक्रीडा खेळला ॥ तैं मुहूर्तें काळिया जिंकिला ॥ आपण विजयी जाहला तैं भासला सत्य तो ॥४॥

मातेसि श्रीमुख दाविलें ॥ तैं ब्रह्मांड असे व्यापिलें ॥ विश्वरुप प्रगट केलें ॥ भयानक ॥५॥

दैत्यांचा करीत संहार ॥ तैं होतसे बीभत्स वीर ॥ शांतपणें वर्ते निरंतर ॥ गौळिपोरांत ॥६॥

ऐसा नवरस नाटकें ॥ देव खेळे जनमुखें ॥ निजस्वरुपें ब्रह्मादिकें ॥ नेणती ज्याचीं ॥७॥

निर्गुण कां जाहला सगुण ॥ निराकारा मनोहर ॥ अद्वैत अनंत अपार ॥ नवल देखा ॥९॥

जो असे भूतग्रामीं सकळीं ॥ तो खेळे एके गोकुळीं ॥ जयांचे ब्रह्मा नाभिकमळीं ॥ तो देवकीचा सुत ॥३१०॥

जो सूक्ष्म होवोनि होय थोर ॥ अंतरीं असोनि सकळांसि परा ॥ अकर्ता करी सृष्टिसंहार ॥ ते अघटित लीला ॥११॥

ऐशा विरुद्धधर्माची कृती ॥ ते ऐकें ईश्वराची प्रकृती ॥ जे वेदशास्त्रें वाखाणिती ॥ जाणती भक्त ॥१२॥

हें न जाणें तो येर मार्ग ॥ या परता नाहीं अध्यात्मयोग ॥ ह्नणोनि करावा अंतीं प्रसंग ॥ येचिविषयीं ॥१३॥

दशमस्कंधीं श्रीभागवतीं ॥ शुकदेवें महाभती ॥ उपदेशिली तुझिया पित्याप्रती ॥ राया जन्मेजया ॥१४॥

आतां असो हा विस्तारु ॥ बोलणें आहे कल्पतरु ॥ कीं ग्रंथा होईल पसरु ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ कृष्णचरित्रप्रकारु ॥ तृतीयोध्यायीं कथियेला ॥३१६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP