श्रीगणेशाय नमः
रायासि ह्नणती वैशंपायन ॥ रुक्मिणीचा निश्विय जाणून ॥ वेगें पावला नारायण ॥ कौंडण्यपुरासी ॥१॥
इकडे उगवला दिनमणी ॥ नित्यनेम सारिला सकळजनीं ॥ राव उग्रसेन सिंहासनीं ॥ परिवारेंसीं बैसला ॥२॥
तंव पितया कराया नमस्कार ॥ सभे आला बळिभद्र वीर ॥ तेथें न देखे शारंगधर ॥ ह्नणोनि प्रतिहारा विचारिलें ॥३॥
ऐकतां बोलिला समस्त ॥ ह्नणे नकळे काय आहे गुप्त ॥ वाचिलें एक पत्र लिखित ॥ मग त्वरित निघाले हरी ॥४॥
नेणों कैंचा आला द्विजवर ॥ तया करुनि पाहुणेर ॥ मग एकांतीं करोनी विचार ॥ वेगें रहंवर संजोगिला ॥५॥
परी अनुमानें जाणवे वृत्त ॥ कौंडण्यपुराची असावी मात ॥ तेचिमार्गे नेई रथ ॥ ऐसें देवें ह्नणितलें ॥६॥
तंव बोलिला सहस्त्रशिरी ॥ भीमकरायाची जे कुमरी ॥ ती अनुपम्य रुपें उपवरी ॥ मागें नागरीं सांगितलें ॥७॥
भीमकें लिहिलें असेल मूळ ॥ स्वयंवरा आले असती भूपाळ ॥ परी कृष्णाविणें तें विकळ ॥ तरी आपण जाइंजे ॥८॥
आला असेल जरासंधु ॥ ज्याचे भयें सेविला सिंधु ॥ तेथें केवीं धाडवें गोविदूं ॥ निराधार एकटा ॥९॥
तें जाणोनिया सैंवर ॥ ह्नणोनि निघाला वेगवत्तर ॥ श्रीकृष्ण असतां कीं सुंदर ॥ न वरी नवरी आणिकासी ॥१०॥
आतां तेथें होईल तुंबळ ॥ कृष्ण एकला ते सकळ ॥ सवें असतां स्त्री अबळ ॥ काज अमंगळ होईल ॥११॥
तंव ह्नणितलें गदसात्विकीं ॥ जैसी सती मेळविजे पावकीं ॥ मग उरले ते पाहोनि कौतुकीं ॥ करिती वार्ता ॥१२॥
तैसें नको गा बळिभद्रा ॥ वेगां चालें कौंडण्यपुरा ॥ आतां पडों न द्यावें अंतरा ॥ करावा लाग ॥१३॥
तें मानवलें बळिभद्रा ॥ मग सैन्या केला हाकारा ॥ अश्व सारथी आणि कुंजरां ॥ सज्जविलेंसे ॥१४॥
बोलावोनियां अश्वशाणी ॥ ह्नणती घोडे निवडीं गा येक्षणीं ॥ जे पळामाजी मेदिनी ॥ करिती भ्रमण ॥१५॥
आह्मांसि कौंडण्यपुराप्रती ॥ असे जाणें शीघ्रगती ॥ तरी आणावे अश्वयाती ॥ नानाद्वीपींचे ॥१६॥
नानारंगांचे सुजाती ॥ महावेंगाढें शीघ्रगती ॥ छपन्नकोटी एकजाती ॥ जैसे समुद्रमंथनीचे ॥१७॥
बोर खौबर आणि निळे ॥ पुष्करद्वीपींचे कातळे ॥ शुद्ध शामकर्ण धवले ॥ कुशद्वीपींचे ॥१८॥
कुमाइत कल्याणगांगे ॥ शाल्मलद्वीपींचे सांरगे ॥ चितळमुखे बहुरंगे ॥ क्रौचद्वीपीचे ॥१९॥
श्रीखंडे पंचकल्याण ॥ पुष्करद्वीपीचे शशिवर्ण ॥ मोरंगे करडे हरिण ॥ शाकद्वीपीचे ॥२०॥
केहाडे पीत मुंगसे ॥ व्याघ्रवर्णाचे तरिसे ॥ ऐसे सप्तवर्ण अनारिसे ॥ वर्णवर्णी ॥२१॥
सप्तरंग आणि हिंसाळे ॥ लोहितवर्णाचे निळे ॥ हे जंबुद्वीपीचे वेगळे ॥ विस्तारिले पैं ॥२२॥
एक क्षीरसागरीं धूतले ॥ एक हरितवर्ण हरिले ॥ माणकीं रंगोनियां काढिले ॥ वोजा जैसे ।२३॥
ते महावेगाचे आगळे ॥ वायुहूनि असती वहिले ॥ जिंकिताती दोहीं दळें ॥ दोंचिपाई ॥ ॥२४॥
त्यांचे वेगीं दृष्टी नातळे ॥ जैसे धनुष्यबाण पिसारिले ॥ जंत्रगोठणीं घातले ॥ भूमिपोटीं ॥२५॥
एकसारिखे उडती मेदिनी ॥ जाणों नक्षत्रें तुटोनि गगनीं ॥ ठिणगिया उसळती चरणीं ॥ न दिसे नभ ॥२६॥
जयां चरणशब्दांची बाधा ॥ पवन मनेंसि करिती स्पर्धा ॥ तयां जिंकिता सकळ वसुधा ॥ नलगे वेळ ॥२७॥
एक निघाले महाफेरी ॥ जाणों घटचक्राची बोहरी ॥ नाचताती नृत्यकारीं ॥ मंगळें एक ॥२८॥
एक झाडिती पछाडा ॥ करणी करितां वितंडा ॥ बापु ह्नणतां लाविती तोंडा ॥ भूमीसि पैं ॥२९॥
ते रणभूमीचे सौरे ॥ परिमुखींचे महाधीरे ॥ अर्ध तुटलियाही शरीरें ॥ नव्हती मागें ॥३०॥
एक वाहोनियां कुरळें ॥ बळें फोडिती सप्तपाताळें ॥ एक जावोनि पाहती अंतराळें ॥ सूर्यमंडळासी ॥ ॥३१॥
एक सहज रणीं मिरवलें ॥ कडिया रवती खळाळें ॥ मार्ग शिंपिताती लाळें ॥ मुखेंचेनी ॥३२॥
एक शोभले पैं चामरीं ॥ एक नानाविध पाखरीं ॥ एक मोहाळिये वक्त्रीं ॥ चरणी तोडर ॥३३॥
कंठ काळा सामवे मुष्टी ॥ लघुदीर्घ रंजले पृष्टीं ॥ उर खुर आणि नेत्रवाटीं ॥ थोरावलेम ॥३४॥
पिंडीं पासोडी वोतिले ॥ जाणों जेठिया सांवळे ॥ कीं चित्रकारें रेखिले ॥ नानापरींचे ॥३५॥
पंचवक्क देवमुनी ॥ स्वर्णपाउलें उभयचरणीं ॥ टिळे शोभले वदनीं ॥ नानापरींचे ॥३६॥
कर्णपुच्छांचे थोकडे ॥ खाणपाणींचें वेगाढे ॥ ऐसे आणिले दिव्य घोडे ॥ यदुरायाचे ॥३७॥
तंव पावले महाकुंजर ॥ जाणों वोडवले डोंगर ॥ एकलक्ष ऐशी सहस्त्र ॥ मदोन्मत्त ॥३८॥
कीं ते मेघ उतरले क्षितीं ॥ विजू पताका झळकती ॥ सहज गर्जनेनें वर्षती ॥ धारा मदांचिया ॥३९॥
जाणों ते महापर्वत ॥ ढाला द्रुम हेलावत ॥ श्रृंखळा खळखळा वाजत ॥ दोहीं चरणी ॥४०॥
कीं ते कृष्णपक्षींची रजनी ॥ चंद्रशोभा उदेली दशनीं ॥ घागरमाळांचे मणी ॥ तारागणें कीं ॥४१॥
कीं पाहती शेषाचें सामर्थ्य ॥ ह्नणोनि नाग नाम यथार्थ ॥ भूमीं रोविताती दंत ॥ तेणे गुणें ॥४२॥
एकीं वाहोनियां वदन ॥ शूंडादंडें कवळिती गगन ॥ रोवों पाहताती दशन ॥ चंद्रमंडळीं ॥४३॥
येथें श्रोतयाचा साक्षेप ॥ चंद्रा गजवदनाचा शाप ॥ तो जाणोनियां पूर्वकोप ॥ कोपती भद्रजाती ॥४४॥
नातरी आणिक संमत ॥ स्वर्गी ऐरावत आहे चौदंत ॥ तया ऊर्ध्व करोनियां हात ॥ बोलाविताती ॥४५॥
पृष्ठी मिरवली गुढारीं ॥ दंतीं खोंविल्या कळाविया सुरी ॥ नाडे खिळावे लंगरीं ॥ शोभताती ॥४६॥
एका अंदुक शोभे सांखळा ॥ एक बळिया मदखळाळा ॥ घंटाचामरें घागरमाळा ॥ घवघविताती ॥४७॥
एक पृष्ठीं पाखरले ॥ शूंडां सरळियां मिरवले ॥ स्तंभ झेलित चालिले ॥ राजबिदीसी ॥४८॥
वरी आरुढले महावंत ॥ नानाअंकुशां पेलित ॥ महावेगाढे अंकुशें वारित ॥ दोहींबाहीं ॥४९॥
मदें पिकलीं कुंभस्थळें ॥ झडपा घालिती अलिकुळें ॥ घंटा जाणों कनककमळें ॥ गमलीं मज ॥५०॥
ऐसे आले भद्रजाती ॥ नमस्कारिला रेवतीपती ॥ मुखें लावोनियां क्षिती ॥ करिती गर्जना ॥ ॥५१॥
बळदेवा बोलिले महावीर ॥ आपणां जाणें जी अति शीघ्र ॥ तरी रणीं घेऊनियां कुंजर ॥ निघा वहिले ॥ ॥५२॥
मग निशाणा दीधला घावो ॥ तेणें दुमदुमिला ब्रह्मकटाहो ॥ भारीं चालिला बळदेवो ॥ यादवेंसीं ॥५३॥
तयापुढारां अति निकट ॥ चालती पायांचे सुभट ॥ धनुर्धर महा उद्भट ॥ कोइतेकरु ॥५४॥
ढालाऊ आणि वोडणेकर ॥ करीं कांतिया त्रिशृळधर ॥ करकांडिया आणि परशुधर ॥ कोंडकोंडाचे ॥५५॥
नेजे लहुडी मुद्रल ॥ एका हातीं घनसांबळ ॥ येका खड्राचेनि खळ ॥ खांडेकर ॥५६॥
ऐसे अश्व रथ कुंजर ॥ सेनापती गद बळभद्र ॥ लागवेगें पावले नगर ॥ भीमकाचें ॥५७॥
तंव उतरलासे शारंगपाणी ॥ जैसा योगी इंद्रियें त्यजोनि ॥ राहिलासे स्थितीं उन्मनी ॥ येकलाची ॥५८॥
भेटोनिया परस्परां ॥ कृष्णासि पुसती उत्तरा ॥ कीं आह्मां नेणतां स्वयंवरा ॥ आलेति कैसे ॥५९॥
कवण भेटीची तुह्मां आर्त ॥ मागें सांडोनियां अश्वरथ ॥ उतावेळ जाहलें चित्त ॥ हें विपरित न कळेची ॥६०॥
तूं ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ध्यानीं न सांपडसी मुनीश्वरां ॥ तो तूं आजी शारंगधरा ॥ उतावेळ भीमकीसी ॥६१॥
ऐसा करिती स्तुतिविनोद ॥ तेणें संतोषला गोविंद ॥ मग कथिला प्रबोध ॥ स्वयंवराचा ॥६२॥
असो आतां हा दळभार ॥ रुक्मिणीनें धाडिला द्विजवर ॥ तयासि लागला उशीर ॥ तेणें सचिंत जाहली ॥६३॥
सखिये बोलावूनि येकांतेंसी ॥ सांगोम आदरिलें तयेसी ॥ कीं सुदेवा धाडिलें द्वारकेसी ॥ तो अद्यापि न ये कां ॥६४॥
सलज्ज आणि सारंगनयनी ॥ परम सुंदर ते विरहिणी ॥ सखिये प्रती रुक्मिणी ॥ बोलिली गुज ॥ ॥६५॥
ह्नणे तूं माझी प्राणवशी ॥ एक सांगेन तें परियेसी ॥ त्वां हा अनुवाद आणिकेशी ॥ करुं नये ॥६६॥
तरी कृष्णाकडे माझें मन ॥ वेधिलें असे अत्यंत जाण ॥ लटिकें बोलेन तरी आण ॥ भीमकाची ॥६७॥
ह्नणोनि पत्रिका लिहिली त्यासी ॥ परियेसीं गा हषीकेशी ॥ मी जीवेंभावें तुजसी ॥ अनुसरलेंसे ॥६८॥
जें आपुलें ह्नणविसी वेल्हाळा ॥ तें तूं न देसी कळिकाळां ॥ हीं दुर्घट ब्रीदें गोपाळा ॥ साजती तुज ॥६९॥
आतां जनक आणि जननी ॥ माझें गणगोत्र मिळोनी ॥ सकळीं मंडपातें घालोनी ॥ आयती केली ॥७०॥
त्यांहीं पाहिलासे वर ॥ तो तरी माझा सहोदर ॥ देवा तूंचि माझा भ्रतार ॥ विश्वमोहना ॥७१॥
सखये ऐशा लिहोनि पत्रिके ॥ विप्र पाठविला द्वारके ॥ नवस केला आहे अंबिके ॥ मनोभावें ॥७२॥
तेणें कारणें हें लाहे ॥ चरण निढळीं ठेवूनि बाहें ॥ क्षणोक्षणीं मी वाट पाहें ॥ गोविंदाची ॥७३॥
आतां कैसें करुं काय ॥ कवणा विचारुं उपाय ॥ विप्र अजूनि कां नये ॥ वेळ बहुत लाविला ॥७४॥
गोविंदें मन उदास केलें ॥ मज दासीस कां अव्हेरिलें ॥ मन निष्ठुर केविं जाहलें ॥ हरी नये कां हरावया ॥७५॥
सखये आतां एक उपावो ॥ जरी नये कृष्णदेवो ॥ तरी योगमार्गें ठावो ॥ पावेन त्याचा ॥७६॥
सहज मांडलासे प्रसंग ॥ घडला सुक्षणेचा संग ॥ तरी षट्चक्रांवरी मार्ग ॥ करोनि जाईन पश्विमे ॥ ॥७७॥
तेथें परिसें ऊर्ध्वगती ॥ दिसतसे सुषुम्रा गोमती ॥ जेथें अमृतबिंदु स्रवती ॥ दूरविकर्णे ॥७८॥
तयेचें परतीर निर्मळ ॥ जें मुक्तिद्वार असे केवळ ॥ तें मी संपादीन सकळ ॥ योगमार्गें ॥७९॥
तंव तयेचा लवला वामनेत्र ॥ वामजंघा वामकर ॥ तेणें नावेक आला धीर ॥ मग द्विजवर देखिला ॥८०॥
देखोनि आनंद उचंबळला ॥ वाटे देवाचि प्रकटला ॥ कीं गरुडावरुनि प्रत्यक्ष आला ॥ नारायण जैसा ॥८१॥
मग धांवोनि लागली चरणीं ॥ येर वाहिले दोनी पाणी ॥ ह्नणे तुज वराया शारंगपाणी ॥ येवोनि उपवनीं राहिला ॥८२॥
एकतां संतोषोनि स्वमनीं ॥ सावध जाहली रुक्मिणी ॥ ह्नणे आजी प्रत्यक्ष नयनीं ॥ देखिलें देवा ॥८३॥
मासोपवास चांद्रायणें ॥ कृष्णप्रतिष्ठेचेनि वासनें ॥ म्यां केली महा व्रतदानें ॥ शिवार्पण ॥८४॥
विप्रां दीधली धेनुआगारें ॥ आणि पर्णिलीं वधुवरें ॥ अश्व रथ दासी मंदिरें ॥ तें पुण्य ठाकलें कीं ॥८५॥
मग तया दीधलें उचित ॥ नाना वस्त्रें रत्नादि अमित ॥ ह्नणे तुझेनि सफळ जीवित ॥ श्रीगुरुराया ॥८६॥
जन्मजन्मांतरी बहुतीं ॥ घडली असेल गुरुभक्ती ॥ त्यासीच भेटेल श्रीपती ॥ प्रत्यक्ष डोळा ॥८७॥
जैसी मेघोदयीं धरणी ॥ कीं चंद्रोदयीं कमळिणी ॥ नातरी निमालिया रजनी ॥ सारस जैसें ॥८८॥
तैसी त्रिविध तापांची खुण ॥ ते जाणती अनुभवी जन ॥ जे असतीलसे परिपूर्ण ॥ आत्मज्ञानीं ॥८९॥
ऐकोनि बोलिला सुदेवो ॥ धन्य भीमकी तुझा भावो ॥ तुज अनुसरला देवो ॥ द्वारकेचा ॥९०॥
तुझी तया बहु आस्था ॥ ह्नणोनि आला यथार्था ॥ मज दीधद्लें आदरा उचिता ॥ तया गणिता न करवे ॥९१॥
तुझिये प्रेमसंगतीं ॥ मज जोडला श्रीपती ॥ जो समर्थ त्रिजगतीं ॥ तेणे मजसी पूजिलें ॥९२॥
तूं वोळखीं पां निश्विती ॥ झणी होऊ नको दुश्विती ॥ जो अलक्ष्य कमळापती ॥ तो त्वां आता चिंतावा ॥९३॥
जो उपेंद्र देवकीसुत ॥ तो प्रणमावा मनांत ॥ नमन करितां निश्वित ॥ सर्व दुःखे जो हरी ॥९४॥
भीमकी वोळखीं वो चित्तीं ॥ कंठीं कौस्तुभ वैजयंती ॥ शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ मेघकांती सुहास्य ॥९५॥
कमळनयन निमासुर ॥ पीतवसन पाई तोडर ॥ जो हिरण्यगर्भ केवळ ॥ तो श्रीवर ओळखे ॥९६॥
ऐसी देवोनियां खुण ॥ सुदेवो गेला आपण ॥ रुक्मिणीनें धरिलें ध्यान ॥ गुरुवचनेंसीं ॥९७॥
तंव येरीकडे होतसे सोहळा ॥ सेंवती रुखवत शिशुपाळा ॥ देवकस्थापन होतिये वेळां ॥ श्रीकृष्ण आला ऐकिलें ॥९८॥
तया भीमक येवोनि सामोरा ॥ मधुपर्क केला शारंगधरा ॥ वस्त्रें देवोनि समग्रां ॥ हरी बिढारा आणिला ॥९९॥
तंव लोक पाहोनि गोपाळा ॥ ह्नणती यायोग्य भीमकबाळा ॥ वायां दीधली शिशुपाळा ॥ कां शैलबाळा विसरली ॥१००॥
हा सुरेख सुंदर सांवळा ॥ केवळ इंद्रनीळाची मरिगळां ॥ कुरवंडीजे शिशुपाळा ॥ या भूपाळा वरुनी ॥१॥
परी कृष्णा नाहीं रुखवत ॥ जाणों स्वयंवर होतसे गुप्त ॥ हें भागवतींचे व्यासमत ॥ तें विपरीत न करवे ॥२॥
आतां शिशुपाळ होईल वर ॥ ह्नणोनि कुमारीयें रचिला मंत्र ॥ मज्जनें करोनियां शृंगार ॥ रुक्मया सहोदर विनविला ॥३॥
ह्नणे मी पूजों जाईन कुळांबिका ॥ लग्न लागेल सातां घटिकां ॥ मग नवस राहील देखा ॥ ऐसें भीमका पुसतसे ॥४॥
मग निघाली चरणचाली ॥ दुरडी भरिली नारिकेलीं ॥ सूत मागधादि वेताळीं ॥ राजबाळीं वानिली ॥५॥
सवें सखिया सहस्त्रमिता ॥ वदनीं गाती मंगळगीतां ॥ छत्रचामरीं मिरवे माथा ॥ गायकां उचितें तोषविलें ॥६॥
तैं बैसोनि शिबिकायानीं ॥ अंबिके आली रुक्मिणी ॥ हें हरिवंशींचे नाहीं कथनीं ॥ परि व्यासमुनी बोलिले ॥७॥
लागलें दुंदुंभीनिशाण ॥ मृदंग काहळा वंशविराण ॥ तंव सकळरायांचें सैन्य ॥ पातले गहन तेघवां ॥८॥
राजा दमघोष चैद्यनाथ ॥ वक्रदंत आणि विदूरथ ॥ पौंड्रक वासुदेव समर्थ ॥ द्रोणशिष्य येकलव्य ॥९॥
शाल्व आणि महामद ॥ साभिमानी जरासंघ ॥ तेवीसक्षोणी कटकबंध ॥ जेणें हरी पळविला ॥११०॥
कलिंगराजा महावीर ॥ त्याचे अमित दळभार ॥ तंव बळदेवा सांगे शारंगधर ॥ कीं तुह्मी दळ संजोगावें ॥११॥
मग गोविंदें प्रेरिला रथ ॥ अंबिकायात्रेचा संकेत ॥ खोलिवा पाहोनि राहे निवांत ॥ जैसा घ्यानस्थ मृगपती ॥१२॥
तंव अंबिके आली नोवरी ॥ पूजा घेवोनि गेली भीतरीं ॥ सवें सुवासिनी द्विजनारी ॥ गिरिजा वेगें पूजिती ॥१३॥
पूजा बांधोनि नानारत्नी ॥ हदयीं चिंतितसे रुक्मिणी ॥ ह्नणे माते कृपाळे भवानी ॥ देई भर्ता श्रीकृष्ण ॥१४॥
हाच देई गे मजला वर ॥ मस्तकीं ठेवीं अभयंकर ॥ तवप्रसादें धन्य संसार ॥ शारंगधर जोडेल ॥१५॥
अहो माये जी अंबिके ॥ शांभवे घुरंघर तारके ॥ मज कृष्णाविणें आणिकें ॥ चाड नाहीं ॥१६॥
ऐशी करितां विनवणी ॥ प्रसन्न जाहली भवानी ॥ ह्नणे चिंतिले पावसी रुक्मिणी ॥ ऐशा संकेतें जाणविलें ॥१७॥
तंव ढळली उजवी माळा ॥ तो प्रसाद झेलीत बाळा ॥ मग सुवासिनी ह्नणती सकळा ॥ वर इच्छिला पावसी गे ॥१८॥
मग उभी राहिली देवद्वारीं ॥ सकळ राय पाहती नोवरी ॥ मौनमुखीं जाहले ब्रह्मचारी ॥ हरि चौफेरी पाहतसे ॥१९॥
येरीनें देखिला गरुडध्वजु ॥ पीतांबरवसन चतुर्भुज ॥ कंठीं कौस्तुभमणी विराजु ॥ तो यदुराजु वोळखिला ॥१२०॥
रायां पडली दृष्टभुली ॥ जैसीं चित्रीचीं बाहुलीं ॥ अवघीं तटस्थ राहिलीं ॥ तंव श्रीहरी पातला ॥२१॥
पंचप्राणांची करोनि आरती ॥ जीवें भीमकी वोंवाळी श्रीपती ॥ माळ घेवोनि उभय हस्ती ॥ कृष्णाप्रती वाहिली ॥२२॥
अष्टगंध पुष्पें मालती ॥ भीमकीये कल्पिलें श्रीपती ॥ जगजीवना कमळापती ॥ जयजय लक्ष्मीविलासा ॥२३॥
माळ घालोनि कृष्णाचे गळां ॥ वोंवाळोनि घनसांवळा ॥ ह्नणे कृष्णासि भीमकबाळा ॥ देवा लळा पुरविलासी ॥२४॥
मग ते आनंदे कामिनी ॥ मेघमंडळीं जैसी सौदामिनी ॥ नातरी शीतकरें पद्मिणी ॥ तैसी रुक्मिणी तयेवेळीं ॥२५॥
मनीं शंकलीं भीमकनंदिनी ॥ तंव रथ आला घडघडोनी ॥ जैसा सुपर्ण इंद्रभुवनीं ॥ करी झडपणी अमृताची ॥२६॥
दोनी मिळालिया पातोपातीं ॥ बरी वेळ जाणोनि मुहूर्ती ॥ तेचि वेळे घेवोनि युवती ॥ वेगां श्रीपती जातसे ॥२७॥
जैसा भ्रमर घरी तृणयूका ॥ तैसी रथीं वाहिली भीमका ॥ कीं कनक पाविजे डांका ॥ अग्निसंयोगें ॥२८॥
नातरी लोह चढे चुंबका ॥ तैसी कृष्णासि जडली भीमका ॥ उपमाजाणों पंचमुखा ॥ राया जंबुकां देखतां ॥२९॥
सुमुहूर्ती सर्वमंगळा ॥ रुक्मिणीसि भेटली राउळा ॥ कृष्णकंठीं घालितां माळा ॥ जाहलीं सुफळा भीमकी ॥१३०॥
तंव जाहला हाहाःकार ॥ कीं नवरी घेवोनि गेला तस्कर ॥ वेगां लोटला सैन्यभार ॥ पाहूनि बळिभद्र उठावला ॥३१॥
धांवले चैद्य मागधभार ॥ त्यांत जरासंघ महाक्रूर ॥ हाणीत उठिले यादववीर ॥ मांडिलेम घनचक्र येकसरें ॥३२॥
तंव कृष्णाचा धाकुटा बंधु ॥ जो महावीर बोलिजे गदु ॥ तेणें ताडिला जरासंधु ॥ घार्ये रणमदू विसरला ॥३३॥
तंव ह्नणे परिक्षितीसुत ॥ बाळलीला बोलता अनंत ॥ तो द्वादशवर्षी आंत ॥ श्रीकृष्ण गृहस्थ पैं जाहला ॥३४॥
इतुकियामाजी बंधुधारें ॥ कैसीं वसुदेवां जाहलीं कुमरें ॥ त्यांहीं रणयुद्ध शौर्ये ॥ जरासंधासी पुरें केलें ॥३५॥
मग मुनि ह्नणे गा नरेंद्रा ॥ वसुदेवासी राणिया अठरा ॥ तो गद बोलिजे बंधुधारा ॥ सापत्न कृष्णाचा ॥३६॥
असो उठावला दंतवक्रु ॥ तेणे सात्यकी बाहिला शत्रू ॥ बाणधारीं केला जर्जरु ॥ आणि दळभारु आटिला ॥३७॥
तंव उठावला विदूरथ ॥ बाणधारीं असे वर्षत ॥ तो बळदेवें केला मूर्छित ॥ मग चैद्यनाथ उठावला ॥३८॥
युद्ध मांडिलें महातुंबळ ॥ जाणों मिळाले मंदराचळ ॥ रजें झांकलें रविमंडळ ॥ अशुद्ध खळाळ वाहावले ॥३९॥
दोनी सैन्यें मिळतां रणीं ॥ येकमेकां जाहली झोटधरणीं ॥ दुंदुभी वाजती निशाणी ॥ नाद गगनीं न समाये ॥१४०॥
मध्यें अश्वगजांचे हुंकार ॥ करिती धनुष्यांचे झणत्कार ॥ रणीं नोळखती आपपर ॥ उसणे घाई हाणिती ॥४१॥
कृष्णें नेली भीमकनंदीनी ॥ बळदेवें केली वीरां निवारणी ॥ बाप झुंजार शिरोमणी ॥ सैन्य रांडोळी करीतसे ॥४२॥
रणीं लोटला जैसा व्याघ्र ॥ जाणों अरिजंबुक निर्धार ॥ यादवीं निवटितां दळभार ॥ सुटला पळ परसैन्या ॥४३॥
तंव उठावला कलिंगवीर ॥ जो गर्वाचा मत्तकुंजर ॥ तेणें हाकारोनि बळिभद्र ॥ ह्नणे सोडी नांगर हातीचा ॥४४॥
मग कोपला रेवतीपती ॥ कलिंग हाणिला मुसळघातीं ॥ भूमी पडलिया रथ सारथी ॥ येरु दैवगतीं वांचला ॥४५॥
पुढें राम निघाला चरणचाली ॥ तंव भेटला एकलव्य कोळी ॥ मनीं ह्नणे आतां नवांचे मुसळीं ॥ ह्नणोनि पळे एकसरां ॥४६॥
ऐसे कोपले यादववीर ॥ त्यांहीं शत्रुसैन्य केलें जर्जर ॥ रुधिरें राय फुलले समग्र ॥ जैसे तरुवर वसंती ॥४७॥
परी अलोट खवळला बळिभद्र ॥ नांगर घालोनि ओढी वीर ॥ मुसळघातें करी चूर ॥ शतांचींशतें एकदां ॥४८॥
ऐसा जाणोनि आश्वर्यार्थ ॥ पळताजाहला चैद्यनाथ ॥ तंव धांवला भीमकसुत ॥ तेणें गोपिनाथ आटोपिला ॥४९॥
भीमक बोले नको गा झूंज ॥ परि रुक्मया बोले पैज ॥ कीं कृष्ण न धरीन तरी लाज ॥ नगरामाजी नाहीं येणें ॥१५०॥
ऐसें बोलोनि रथा दिधला वेग ॥ जैसा अग्नीवरी पतंग ॥ कीं सिंहापुढें मातंग ॥ दावी बळ स्वभुजांचें ॥५१॥
वेगां पावला रथ हांकित ॥ तंव एकला जातसे गोपिनाथ ॥ जैसा सांडोनियां अवधूत ॥ प्रपंचातें ॥५२॥
तो जाणोनियां पाठिलाग ॥ उभा ठाकला श्रीरंग ॥ कमळावरी लोटे मातंग ॥ तैसा रथ लोटिला ॥५३॥
रुक्मया ह्नणे रे जंबुका ॥ चोरोनि नेतोसि कन्यका ॥ मग बाण लावोनि कार्मुका ॥ गोपिनाथा ॥ विंधिलें ॥५४॥
तंव रुक्मिणीसि लागली खंती ॥ एक सहोदर दुसरा पती ॥ ह्नणे मी वैरीण उभयांप्रती ॥ घांव पशुपती येवेळां ॥ ॥५५॥
कृष्णें केलेंसे संधान ॥ निवारिला बाणें बाण ॥ हातीचें धनुष्य केलें खंडण ॥ येरें आणिक घेतलें ॥५६॥
ऐसी तोडिली पांच धनुष्ये ॥ वारु पाडिले यदुकुळटिळकें ॥ मग रुक्मया उरतोनि भूमिके ॥ थोरतबकें धाविन्नला ॥ ॥५७॥
खड्र हाणाया उचली हात ॥ भूमी तंव उतरला गोपिनाथ ॥ मोहन घालोनि धरिला जित ॥ स्तंभीं त्वरित बांधिला ॥५८॥
गळां घालोनि धनुष्यपाशा ॥ मग वोढिला पशु तैसा ॥ सत्वरें आणिला भीमकी सरिसा ॥ रुक्मया तो ॥५९॥
सोडोनियां मोकळे केशीं ॥ बांधिला तो ध्वजस्तंभासीं ॥ रुक्मिणी पाहत असे ऐसी ॥ विटंबना बंधूची ॥१६०॥
मग मांडिला मेहुणचार ॥ बाण काढिला जैसा क्षुर ॥ खांड मुंडण केलें अर्ध ॥ तंव बळिभद्र पावला ॥६१॥
भीमकीये आलें हास्यरुदन ॥ तेणें बळदेवा जाहलें ज्ञान ॥ मग संबोखोनि भीमकीचें मन ॥ बंधुबंधन सोडविलें ॥६२॥
ह्नणे तूं हो करीं विचार ॥ रुक्मया कवणाचा सहोदर ॥ भीमक पिता हा लोकाचार ॥ वाढविलासे ॥६३॥
तूं अससी आदिशक्ती ॥ कृष्ण तरी ब्रह्मविद्येची मूर्ती ॥ तुझेनि गुणीं लाहोनि प्रीती ॥ सविकार जाहला ॥६४॥
तोचि हा जाण परमपुरुष ॥ अवतरलासे मनुष्यवेष ॥ मी तुमचा सेवक शेष ॥ विचारीं पां ॥ ॥६५॥
करोनियां मोहबंधन ॥ आतां कां शिणसी आपण ॥ जैसे हे लोक अज्ञान ॥ मायाबंधन पावले ॥६६॥
आतां चिंतूं नको कांहीं ॥ पुढील कार्या चित्त देई ॥ लागावें श्रीकृष्णाचे पायीं ॥ तेणें श्रम तुटेल ॥६७॥
ऐसा ऐकतां प्रबोध ॥ रुक्मिणी जाहली सावध ॥ मग कृष्णासि करी अनुवाद ॥ बळदेवो पैं ॥६८॥
ह्नणे हा थोर पापबुद्धी ॥ परी जाहला सोयरासंबंधी ॥ आतां न लावावा जी विरोधीं ॥ सोडी तुं या रुक्मया ॥६९॥
मग रुक्मया सोडिला जित ॥ माथा झाडोनि जाय रडत ॥ तंव भेटला चैद्यनाथ ॥ तया वृत्त सांगितले ॥ ॥१७०॥
शिशूपाळ बोले आपण ॥ थोर जाहलें मानखंडण ॥ तरी आतां काय जीवोन ॥ असे काज ॥७१॥
मरणापरीस अवदशा ओजी ॥ कृष्णें भगिनी जिंकिली तुझी ॥ आणि विटंबणा जाहली काजीं ॥ आमुचे योगें ॥ ॥७२॥
आतां क्षत्रियांमाजी नाहीं जिणें ॥ येवढें लाहोनियां उणें ॥ यापरीस बरवें मरणें ॥ हें जिणें जी वोखटें ॥७३॥
मग भेटला जरासंध ॥ तो ह्नने कां मानिसी खेड ॥ मनीं धरीं युद्ध प्रबोध ॥ रणसंबंध ऐसाची ॥७४॥
जंब काळ असे अनुकूळ ॥ तंव उद्यम फळे सकळ ॥ परि तो जाहलिया प्रतिकूळ ॥ मग विफळ सर्वही ॥७५॥
देखोनियां आपुली हारी ॥ वृत्ती धरावी माघारी ॥ ऐसिया संसाराची परी ॥ आहे जाण ॥७६॥
जैं आमुचें होते बळ ॥ तैं कृष्णासि पळविलें सत्रावेळ ॥ आजी घेवोनि गेला सकळ ॥ यश रायांचे ॥७७॥
याचा नाहीं अंतरीं क्षोभ ॥ हानी मृत्यू सारिखा लाब ॥ ऐसा जाणोनि आरंभ ॥ करणे लाग्के ॥७८॥
ऐशापरी सांगोनि उपपत्ती ॥ प्रबोधित जरासंघ नृपती ॥ मग राजे आग्रहा टाकिती ॥ आपुलाले ॥७९॥
परि रुक्मया राहिला बाहेरी ॥ प्रवेश न करी नगराभीतरीं ॥ लाज जाहली असे थोरी ॥ रायांमाजी ॥१८०॥
येरीकडे कृष्णनाथ ॥ रणीं जाहला यशवंत ॥ तया परिवार भेटला समस्त ॥ कृष्णदेवा ॥८१॥
मग पाहोनि मुहूर्तमान ॥ मूळमाधवीं लागलें लग्न ॥ वसुदेव देवकी येऊन ॥ थोर शोभन मांडिलें ॥८२॥
सरस्वती सागराचे तीरीं ॥ मंडप घातले विस्तारीं ॥ जाणों दुजी द्वारकापुरी ॥ ध्वजामखरीं शोभली ॥८३॥
मृदंग मंगल महाभेरी ॥ उटणें होतसे श्रीहरी ॥ वाशिंग माथां सवें नोवरी ॥ बोहल्यावरी बैसले ॥८४॥
कृष्णासि ह्नणे बळिभद्र ॥ कीं भीमकासी करावा नमस्कार ॥ तंव रुक्मिणी ह्नणे जी स्थिर ॥ हा आचार आमुचा ॥८५॥
माथा विंचरोनि दीधली गांठी ॥ डावेकंकणा केली बळकटी ॥ सुमनें केली अंगी उटी ॥ ते बरवंटी कृष्णासी ॥८६॥
परी तेथें आला नाहीं भीमक ॥ हा भागवतीं केला उल्लेख ॥ कीं ज्येष्ठसुतासि होईल विशेख ॥ तो लौकिक राखिला ॥८७॥
असो सोहला जाहला समस्त ॥ मग द्वारके निघाली वरात ॥ भाट बंदीजन वाखणित ॥ यशार्जित श्रीकृष्णाचें ॥८८॥
नगरनागरिकीं समस्ती ॥ वेगें श्रृंगारिली द्वारावती ॥ जैशी अनुपम्य अमरावती ॥ परि इये प्राप्ती वेगळी ॥८९॥
उभविलीं गुढिया तोरणें ॥ घरोघरीं वाधावणें ॥ नानारत्नांची भूषणें ॥ अक्षयवाणें सुवासिनी ॥१९०॥
भंवते सारणीचे पाट ॥ वायुसूत्रें चालती राहाट ॥ बकुळ चांफे वृक्ष दाट ॥ शुक सुभट बोलती ॥९१॥
श्रृंगारिले हांट चौबारे ॥ उभविलीं गुढिया मखरें ॥ नानापरींची पालवछत्रें ॥ वेगां मंदिरीं उभविलीं ॥९२॥
सातांखणांची दामोदरें ॥ येकें त्रिगुणेंशी उंचतरें ॥ जैशी मेरुची शिखरें ॥ ध्वज पताका शोभती ॥ ॥९३॥
नीळ स्फटिकांचिया भिंती ॥ मध्यें रत्नचिया निगुती ॥ बैसके चौकडे शोभती ॥ बरवीं दिसती वृंदावनें ॥९४॥
स्तंभ सोमकांताचे निर्मळ ॥ वरी मांदुसा इंद्रनीळ ॥ पाचुभूमिका जैसें जळ ॥ स्तंभ केवळ हिरेयांचे ॥९५॥
बरवीं माणिकांचीं उथाळीं ॥ दांडे पोंवळ्यांच्या वेली ॥ हिरेरंगणी विचित्र केली ॥ पाचु शुद्ध गोमेद ॥९६॥
तयावरी कनकाची फळी ॥ तेणें भूमिका जाहली निळी ॥ जडलीं नवरत्नें त्या तळीं ॥ घोंसप्रवाळीं मुक्तांच्या ॥९७॥
त्यावरी कनकाचे कलश ॥ वोप जाणों विजुप्रकाश ॥ कीं उदेले सहस्त्रांश ॥ रात्रंदिवस पारुषले ॥९८॥
बाणली हेमाची चौपासी ॥ वोतिवें जडलीं स्वयंभें जैसीं ॥ गवाक्ष काश्मीरेम समरसीं ॥ रत्नप्रभेसीं तुरंविलें ॥९९॥
बरवीं सोमकांतकपाटें ॥ पोवळीं इंद्रनीळांची वाहुटें ॥ खिळी कनकाचिया नेटें ॥ मध्यें सुभटे नवरत्नें ॥२००॥
पुतळ्या डोळसा पद्मिणी ॥ षोडशर्षाच्या सुवासिनी ॥ गवाक्षआडवाटां करुनी ॥ कौतुकगती दाविती ॥१॥
एकी वीणा घेवोनि हातीं ॥ स्वरमुर्छना भेद दाबिती ॥ ग्रामत्रय अलंकारप्रवृत्ती ॥ मग आळविती यदुराय ॥२॥
वोडव तांडव संपूर्ण ॥ स्थाई मंद्र आरोहण ॥ शुद्धमार्गे देशी गुण ॥ भाष विवर्ण दाविती ॥३॥
एक मयूर तांडवगती ॥ फेरींफारीं पदा हुंबरती ॥ शुकसारिका वानिती ॥ पदगुणकीतीं कृष्णाची ॥४॥
एकी देती अंगमोडा ॥ वोढिती यौवनाचा मेंढा ॥ कामिकां विंधिती होडां ॥ नयनबाणेंकरोनी ॥५॥
त्या श्रृंगार सुमनवनिता ॥ कीं कनकरत्नाचिया लता वळसा होतसे मारुता ॥ तया वनितां देखोनि ॥६॥
एकीं झांकिले केश कुरळे ॥ बिंदी विखुरलीसे बकुळें ॥ पद्मिभीचेनि अंगमेळें ॥ जाहलीं पांगुळें भ्रमरें तीं ॥७॥
वैष्णवीं मांडिलीं कीर्तनें ॥ ठाईठाई गीत पेखणें ॥ दोहीं बाहीं नानाकेणे ॥ हाट संपूर्ण भरियेले ॥८॥
देउळाबाहेर धूप धूपिती ॥ मंगळतुरें शंख गर्जती ॥ चहूंवेदांच्या सरस्वती ॥ द्विज पढतीं वृंदावनीं ॥९॥
एक सर्वशक्ती संपूर्ण ॥ विधिविचारीं महा प्रवीण ॥ तयां त्रिकाळ असे ज्ञान ॥ सर्वक्रतूंचें ॥२१०॥
सुरंगी मार्गबिदीचे हुंडे ॥ चंदनचर्चित कुंकुमसडे ॥ सुपक सुमनपानांचे विडे ॥ ठायींठायीं ठेविले ॥११॥
राया ऐसी ते द्वारावती ॥ केंवीं वर्णवे मज मंदमती ॥ वैकुंठ उतरलेम प्रत्यक्ष क्षितीं ॥ ते त्रिजगतीं दुर्लभ ॥ ॥१२॥
आतां असो हा विस्तारु ॥ बोलतां न सरे श्रृंगारु ॥ ग्रंथ नावरे कल्पतरु ॥ जैसा अंकुर अभ्रींचा ॥१३॥
ऊर्णनाभीचा दृष्टांतु ॥ तैसा निघतसे ज्ञानतंतू ॥ किती बोलावा धर्मार्थू ॥ जैसा अनंतू व्यवहारा ॥१४॥
आतां असो हा विस्तार ॥ वराते जाहला उशीर ॥ द्वारका ठेली जाणों मयूर ॥ कृष्णजळधर पहावया ॥१५॥
मग निघाली वरात ॥ देव जाहले आनंदभरित ॥ कीं मदन होईल अपत्य ॥ या दोघांचे ॥१६॥
वोहरें बैसविलीं कुंजरीं ॥ देव वर्षले पुष्पसंभारीं ॥ धवळारीं मंगळें गाती नारी ॥ आला मंदिरीं गोविंद ॥१७॥
धेंडें नाचविले उभयतीं ॥ यादव टाकिती पुष्पें उचितीं ॥ अभर केलीं मागतीं ॥ मग लोकांते बोळविलें ॥१८॥
हातीं धरोनि सूनकुमरा ॥ देवकी प्रवेशली मंदिरा ॥ आरती केली वधुवरां ॥ कुमरकुमरी नांदा ह्नणे ॥१९॥
ऐसें हें रुक्मिणीसैंवर ॥ जे ऐकती कृष्णचरित्र ॥ तयां लाभे स्त्रानसहस्त्र ॥ गोमतीसागरसंगमींचें ॥२२०॥
ज्याचेनि पवित्र द्वारावती ॥ तो केविं वर्णावा वाचाशक्ती ॥ द्वारका ह्नणतां नासती ॥ महापातकें ॥२१॥
हें ऐंकता कृष्णचरित्र ॥ अपुत्रिकां लाभती पुत्र ॥ दाराधनवासना सर्वत्र ॥ पावती पैं ॥२२॥
हे श्रीभागवतींची कथा ॥ तेचि वैशंपायन सांगे भारता ॥ ती म्यां कथियेली प्राकृता ॥ व्यासवचनें ॥२३॥
आतां सत्यभामा जांबुवंती ॥ कैशा पर्णील श्रीपती ॥ तें ऐकावें संतश्रोतीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ रुक्मिणीस्वयंवरविस्तारु ॥ नवमोऽध्यायीं सांगितला ॥२२५॥
श्रीरुक्मिणीरमणार्पणमस्तु ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥