कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ श्रीवत्स लाधला वासुदेवो ॥ त्या कथेचा अभिप्रावो ॥ सांगा मज ॥१॥

मुनि ह्नणे गा अवधारीं ॥ एकदा त्रिहोटदेशाभीतरीं ॥ सरस्वतीनदीचे तीरीं ॥ मिळाले सकळ ॠषीश्वर ॥ ॥२॥

तंव सारस्वत नामें ब्राह्मण ॥ तेणें मांडिला प्रीतिप्रश्न ॥ कीं तिहीं देवांमाजी सात्विकगुण ॥ कवणाठाई ॥ ॥३॥

एक ह्नणती नंदीवाहन ॥ दुजा स्थापी नारायण ॥ एक वानिती चतुरानन ॥ सात्विक गुणें ॥४॥

एकमेकां करिती गोष्टी ॥ ऐसियाची पाहों कसंवटी ॥ कीं चरण हाणितां भृकुटी ॥ न वाहे जो ॥५॥

मग तो ब्रह्मयाचा नंदन भृगुनामें तपस्वी ब्राह्मण ॥ तो पाठविला सात्विकगुण ॥ पहावया पैं ॥६॥

प्रथम गेला ब्रह्मस्थानीं ॥ ब्रहयासि हाणावया चरणीं ॥ तंव भृगु दवडिला ब्रह्मगणीं ॥ मारोनियां ॥७॥

मग तो गेला कैलासा ॥ चरणीं हाणावया महेशा ॥ तेथेंही केला कासाविसा ॥ भूतभैरवी ॥८॥

ह्नणोनि गेला क्षीरसागरीं ॥ जेथें निद्रिस्थ असे श्रीहरी ॥ तेथें आला ब्रह्मचारी ॥ वेगवत्तर ॥९॥

तंव द्वारीं होती किंकरें ॥ तीं आड न रिघती त्वरें ॥ वोळखोनियां ब्रह्म पवित्रें ॥ वंदिलें तिहीं ॥१०॥

मग प्रवेशला मंदिरीं ॥ तंव निद्रिस्थ असे श्रीहरी ॥ आणि उत्तरभागीं सुंदरी ॥ कमळजा ते ॥११॥

तळवां ठेवोनियां कमळद्रळ ॥ वरी हरीचें चरपायुगुळ ॥ कमळीं धरोनियां कमळ ॥ संवाहनीतसे ॥१२॥

तयेसि ह्नणे ॠषीश्वर ॥ जागा करीं वो तुझा भ्रतार ॥ तंव ऋषीसि नमस्कार ॥ केला तयेनें ॥१३॥

ह्नणे विष्णु असे हो निद्रिस्थ ॥ आणि आमुचा तूं अतीत ॥ परि निद्राभंगीं असे शस्त्रघात ॥ तुमचेनि मतें ॥१४॥

तंव तेणें भृगुब्राह्मणें ॥ पीतांबर आसुडिला त्राणें ॥ विष्णु हाणितलासे चरणें ॥ हदयावरी ॥१५॥

तेणें चेतला नारायण ॥ दृष्टीं पाहे तंव तो ब्राह्मण ॥ मग उठोनियां सवें चरण ॥ धरी देवो ॥१६॥

हरि ह्नणे गा द्विजवरा ॥ कैसा पावलासि उपकारा ॥ हदय किटलें होते असुरा ॥ मर्दितां माझें ॥१७॥

लक्ष्मीनें चरणीं लाविलें कमळ ॥ त्वां लाविलें पदयुगुळ ॥ परी हदयींचे महाजाळ ॥ विझाले येणें ॥१८॥

तुझेनि गा चरणकमळें ॥ हदयश्रमजाळ निवालें ॥ तरी हें ब्रह्मपद जपमाळे ॥ असावें हदयीं ॥१९॥

मग तो पूजिला ब्राह्मण ॥ ह्नणे तुमचा शिणलासे चरण ॥ माझें हदयरुप पाषाण ॥ लागलें तया ॥२०॥

तुझे पदीचें प्रतिबिंब ॥ हें मज लक्ष्मीपरीस दुर्लभ ॥ ह्नणोनि गुणनाम जाहलें सुलभ ॥ श्रीवत्सलांछन ऐसें ॥२१॥

तरी हें ऐसें गा भारता ॥ श्रीवत्सलांछन लाधलें अनंता ॥ हे श्रीभागवतींची कथा ॥ व्यासवचनें ॥२२॥

परि अनारिसें ब्रह्मपुराणीं ॥ कीं विष्णु होता जळशयनी ॥ तैं वर्जिलीसे शुभकरणी ॥ चतुर्मासींची ॥२३॥

तंव श्रीवत्स नामें ब्राह्मण ॥ जो श्राद्धदेवाचा नंदन ॥ तो स्त्रीविणें असे आपण ॥ जाण राया ॥२४॥

एकदा तो ह्नणे स्वपितरां ॥ मज मेळविजे पैं दारा ॥ तंव ॠषी ह्नणे गा पुत्रा ॥ असे अवरोधू ॥२५॥

हे क्रमिलिया चतुर्मासी ॥ जागृत होईल हषीकेशी ॥ मग तुझे मंगळकार्यासी ॥ होईल रिघाव ॥२६॥

परि तया न धरवे धीर ॥ ह्नणे केव्हां जागेल श्रीधर ॥ ह्नणोनि निघाला वेगवत्तर ॥ जळशयनाजवळी ॥२७॥

तंव विष्णु देखे निद्रिस्थ ॥ मग हदयीं हाणितला चरणघात ॥ तेणें जाहला जागृत ॥ नारायण ॥२८॥

तेचि करुनियां प्रतिपत्तीं ॥ विप्रपद जाहलें गुणकीर्ती ॥ आतां असो हे युक्ती ॥ श्रीवत्सलांछनाची ॥२९॥

तंव रावो ह्नणे गा मुनीश्वरा ॥ तूं ज्ञानबुद्धीचा गाभारा ॥ सर्वप्रश्नांचे प्रत्योत्तरां ॥ निवविलें मज ॥३०॥

परी एक असे जी विचित्र ॥ स्वगुण सांडोनियां हरिहर ॥ वर्णप्रकृतीचे व्यभिचार ॥ जाहले कां ॥३१॥

रुद्र तमोगुण असावा सावळा ॥ आणि विष्णु शुद्ध श्वेतधवला ॥ परि उभयांची प्रकृतिकळा ॥ अनारिसी कां हो ॥३२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ रुद्राअंगीं तमोगुण ॥ त्याचेनि ध्यानें नारायण ॥ जाहला नीळ ॥३३॥

आणि शुद्धसत्व शारंगधर ॥ तया चिंतितसे महारुद्र ॥ ह्नणोनि जाहला कर्पूरगौर ॥ नीळकंठ तो ॥३४॥

मागुती ह्नणे नृपनाथ ॥ हा निवडिला जी गुप्तार्थ ॥ परी उभयांमाजी समर्थ ॥ कवण योजिजे ॥३५॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ हा करुंनये गा प्रश्न ॥ सर्वाभूतीं काय प्राण ॥ भिन्न असे पां ॥३६॥

उभयनेत्रांचे अवलोकनें ॥ कीं शब्द ऐकावया श्रवणें ॥ तेथें परापर लक्षणें ॥ कैशियापरी ॥३७॥

जैशी हरिचरणींची सरिता ॥ ते विशेषें जाहली गा त्रिपथा ॥ तरी गंगोदकाची भिन्नता ॥ बोलवे काई ॥३८॥

सुमनचंदनाची युक्ती ॥ कां कनकरत्नांची दीप्ती ॥ अथवा रविरश्मीची विभक्ती ॥ करावी कवणें ॥३९॥

जो एका स्थापूनि एका निंदी ॥ तो अत्यंत होय अपराधी ॥ जैसा गळखडाचिये भेदीं ॥ नशके मीन आपण ॥ ॥४०॥

शैव आणि दुजे तत्त्ववादी ॥ ते परस्परें गा मंदबुद्धी ॥ दोहींचेही अपराधी ॥ सत्य राया ॥४१॥

जे हरिहरांसि करिती भेद ॥ त्यांसि कोटी कपिलांचा घडे वध ॥ कीं मात्रागमनाचा बाध ॥ घडे तयांसी ॥ ॥४२॥

जैसें स्त्रीनें वधितां भ्रतारा ॥ तरी ते स्वयेंचि मुके सर्वश्रृंगारा ॥ तैसा भेद ह्नणतां हरिहरां ॥ पडे पतनी ॥४३॥

नैवेद्य निर्माल्य पूजा पत्री ॥ जे थोजिली असे ऋषीश्वरीं ॥ ते उल्लंधितां नित्यसहस्त्रीं ॥ पडे प्राणी ॥४४॥

आतां असो हे हरिश्वर ॥ जैसें मुखकमळींचे नेत्र ॥ कीं सोहंहंस प्राणेश्वर ॥ मुखनासिकेचे ॥४५॥

हे भविष्योत्तरीची कथा ॥ तुज श्रुत केली गा भारथा ॥ परी आराध्य इष्ट देवता ॥ पूजाची तुवां ॥४६॥

तंव ह्नणे नृपनाथ ॥ बळदेवाचा कैसा पुरुषार्थ ॥ तो मज करावा जी श्रुत ॥ मुनीश्वरा हो ॥४७॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ द्वारके असतां शारंगधर ॥ तंव गेला असे बळिभद्र ॥ गोकुळाप्रती ॥४८॥

तो भेटला यशोदेनंदा ॥ आणि सकळही गोपिवृंदा ॥ मग यमुने आला विनोदा ॥ जळक्रिडेसी ॥४९॥

घेवोनियां रस वारुणी ॥ आणि पुर्वप्रीतीच्या कामिनी ॥ तंव वोढोनि निघालें पाणी ॥ यमुनानदीचें ॥५०॥

ह्नणोनि कोपला बळिभद्र ॥ नदीतळीं घातला नांगर ॥ गोकुळी आणिला प्रत्यक्षाकार ॥ बोध नदीचा ॥५१॥

तंव ते विनवी यमुनासुंदरा ॥ जयजयाजी अष्टमावतारा ॥ जयजयाजी रोहिणीकुमरा ॥ संकर्षणा तूं ॥५२॥

वेगा सोडीं गा वीरा हलधरा ॥ झणी नेसी कां मोहरा ॥ मी जातसें गंगातीरा ॥ पूर्वदिशेसी ॥५३॥

मग तो काढिला नांगर ॥ परि अद्यापि वळलासे कोंपर ॥ आतां आणिकही पुरुषाचार ॥ सांगों तुज ॥५४॥

सुग्रीववानराचा प्रधाम ॥ द्विविद नामें ष्लवंगम ॥ तया असे गा पराक्रम ॥ दहासहस्त्र कुंजराचा ॥५५॥

कृष्णें वधिला भौमासुर ॥ परि हा त्या दैत्याचा मित्र ॥ तो महामारी पेटला वानर ॥ सोरटदेशासी ॥५६॥

तंव कोणे एके ऋतु आहारा ॥ बळराम घेतसे मंदिरा ॥ तो घट हाणोनियां पाथरां ॥ फोडिला तेणें ॥५७॥

मग दोघां मांडली झुंझारी ॥ बळदेव हाणितला उरावरी ॥ अशुद्ध सांडिले मुखरंध्री ॥ अपार तेव्हां ॥५८॥

येरें वानर हाणितला मुसळें ॥ जाणों वज्र गिरीचरी पडिलें ॥ घायें तयाचे शिर घातलें ॥ उदरामाजी ॥५९॥

ऐसा तो द्विविद झुंजार ॥ बळदेवें मारिला महाक्रूर ॥ तो रामावतारींचा वानर ॥ महायोद्धा ॥६०॥

मग नैमिषारण्याभीतरीं ॥ शतयाग मांडिले ॠषेश्वरीं ॥ तेथें बळदेव आला सत्वरीं ॥ यात्रेलागीं ॥६१॥

तंव तो रोमहर्षण ॠषेश्वर ॥ जो तया सूताचा पितर ॥ तो व्यासासनीं पवित्र ॥ बैसलासे ॥६२॥

तो पंडित महावक्ता ॥ तेथें बळदेव आला अवचिता ॥ सर्वी मानिला तत्वतां ॥ परि नुठेचि पुराणिक ॥६३॥

पुराणिकें सांडितां आसना ॥ तरी आयुष्य सरे यजमाना ॥ तें जाणोनि देवकीनंदना ॥ नमानीच तो ॥६४॥

तेणें रागावला संकर्षण ॥ मग दर्भाचा करोनि हल जाण ॥ तेणें हाणिता पंचप्राण ॥ सांडी पुराणिक ॥६५॥

ऐसें जाहलें अनायासीं ॥ ब्रह्महत्या घडली तामसी ॥ मग ऋषीती शापिली द्वादशी ॥ पुराणासि पैं ॥६६॥

रामासि ह्नणती ॠषीश्वर ॥ त्वां केलें गा अपवित्र ॥ तरी ब्रह्महत्येनें निःक्षेत्र ॥ होईल वंश तुझा ॥६७॥

तेव्हां ह्नणे रेवतीपती ॥ मी जाहलों ब्रह्मघाती ॥ तरी या पातकाचीं निर्गती ॥ सांगा मज ॥६८॥

मग ह्नणे पाराशर ॥ इन्वलदानबाचा कुमर ॥ बाष्कळ नामें महावीर ॥ असुरजाती ॥६९॥

तो येतसे पर्वणीप्रती ॥ होमा करीतसे विपत्ती ॥ मूत्रविष्ठेने गा रेवतीपती ॥ अग्नि विझवी कुंडींचा ॥७०॥

तो त्वां वधावा देवगती ॥ तेणे शांत होईल गार्हपती ॥ मग देवगणाची तृप्ती ॥ होईल तेणें ॥७१॥

ऐसा केलिया आचार ॥ तरी तूं होसील गा पवित्र ॥ मग राहविला बळिभद्र ॥ दशरात्री तेथें ॥७२॥

राहोनियां काळवेळीं ॥ बाष्कळ हाणितला मुसळी ॥ भूमीं पाडिला अंतराळीं ॥ जातजातां ॥७३॥

मागुती ह्नणे जन्मेजयो ॥ एक असे जी संदेहो ॥ कीं रामें यात्रेसि जावया उपावो ॥ काय जाहला ॥७४॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया तूं महाविचक्षण ॥ तरी सकळ पुसीचा प्रश्न ॥ सांगों तुज ॥७५॥

कौरवपांडवां जाहला पण ॥ कीं करुं संग्राम दारुण ॥ ह्नणोनि पांडवां दीधला कृष्ण ॥ आणि बळदेवो कौरवांसी ॥७६॥

मनीं विचारी दुर्योधन ॥ की महाबळी रेवतीरमण ॥ आणि आपुला गुरुजन ॥ गदासाधनाचा ॥७७॥

ह्नणोनि आपण घेतला बळिभद्र ॥ पांडवां दीधला श्रीवर ॥ ऐसा करोनियां निर्धार ॥ योजिलें युद्ध ॥७८॥

बळराम करी विचार ॥ कीं आपणा श्रीकृष्ण फळिकार ॥ तरी युद्ध करितां निर्धार ॥ नाहीं जयो पैं ॥७९॥

ऐसियासी कीजे कालवंचना ॥ बुद्धीने निवारुं महाविघ्रा ॥ यात्रे मिषें हरावें लांछना ॥ अपेशाच्या ॥८०॥

मग राम ह्नणे गा दुर्योधना ॥ मज जाणें असे तीर्थभ्रमणा ॥ परि अठरावे दिवशीं कुरुनंदना ॥ येईन सत्य ॥८१॥

असो गेलिया संकर्षणा ॥ कृष्ण ह्नणे गा अर्जुना ॥ राम येई तंव वधीं सैन्या ॥ कौरवांचे ॥८२॥

ह्नणोनि ऐसें गा नरेंद्रा ॥ रामें केली तीर्थयात्रा ॥ आतां चित्त देई पुढारां ॥ अग्रकथेचे ॥८३॥

तीर्थे क्रमोनि बळिभद्र ॥ प्रभासा आला वेगवत्तर ॥ तंव ऐकिला समाचार ॥ कौरवपांडवांचा ॥८४॥

कीं सर्व आटली असे सेना ॥ युद्ध मांडिलें भीम दुर्योधना ॥ मग शीघ्र वोळंगोनि वाहना ॥ आला कुरुक्षेत्रासी ॥८५॥

तंव पांडवांच्या तीन क्षोणी ॥ राहोनि कौरव आटले रणीं ॥ परि दुर्योधन पडला मेदिनीं ॥ गदाघातें ॥८६॥

मग कृपाचार्य आणि बळिभद्र ॥ तिजा अश्वत्थामा द्रोणपुत्र ॥ तयां देखतां धरिला धीर ॥ कौरवरायें ॥८७॥

तयासि पूर्वीचा असे वर ॥ कीं दुःखसुखाचा होईल संकर ॥ तैं प्राण सांडील कलिअवतार ॥ दुर्योधन हा ॥८८॥

दुर्योधन ह्नणे जी संकर्षणा ॥ रणीं आटली आमुची सेना ॥ आतां पंडूचिया नंदना ॥ जाहलें राज्य ॥८९॥

मग बोलिले तिघेजण ॥ पांचही वधूनि पंडुनंदन ॥ आणि संहारोनि सकळ सैन्य ॥ तुज असतां दाखवूं ॥९०॥

ऐसा देखोनियां धीर वेगें निघाला बळिभद्र ॥ करावया पांडवसंहार ॥ जसा रुद्र कल्पांती ॥९१॥

आला जाणोनि बळिभद्र ॥ पांडवांसि पळवी श्रीवर ॥ कीं करावया देवा नमस्कार ॥ गेला रात्रिमाझारी ॥९२॥

भोंवती करोनि गडपौळी ॥ मध्यें पुत्रासि ठेवी पांचाळी ॥ परी तीनक्षोणी महाबळी ॥ असती राखण ॥९३॥

तयां जाणोनियां सुषुप्तीं ॥ तंव पावला रेवतीपती ॥ सवें कृपाचार्य आणि बाळघाती ॥ अश्वत्थामा ॥९४॥

दोघे प्रवेशले आवारीं ॥ बळदेव राहिला असे द्वारीं ॥ मग मांडिली पशुमारी ॥ तीनक्षोणींची ॥९५॥

जे पळत येती द्वारा ॥ ते बळदेव घाली माघारां ॥ जाणों पेटले महामारा ॥ यमदूत जैसे ॥९६॥

ऐसी जों नसरे रजनी ॥ तों वधिल्या तीनक्षोणी ॥ आणि पांडवांच्या उपलक्षणीं ॥ वधिले पांचाळीपुत्र ॥९७॥

आतां असो हे भारती ॥ हे कथा कथणें आहे पुढती ॥ राया सांगीतले संकलितीं ॥ चरित्र बळदेवाचे ॥९८॥

आणि दुर्योधनाची कुमरी ॥ ते सांबें धरिली स्वयंवरीं ॥ तैं उच्चाटिली हस्तनापुरी ॥ हलधर देवें ॥९९॥

तें अद्यापि असे वक्र ॥ गंगातटीं हस्तनापुर ॥ आणिक ऐकें गा चरित्र ॥ बळदेवाचें ॥१००॥

रुक्मया मारिला बळिभद्रें ॥ तें ऐकें गा सविस्तरें ॥ जैसें क्षीरासि मर्दिता शंकरें ॥ विषचि ठेलें ॥१॥

तंव राजा ह्नणे भारत ॥ हा अपूर्व जी काय दृष्टांत ॥ कीं विंझूणा वारितां केवीं मारुत ॥ माजी अग्नी प्रवेशला ॥२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ कृष्णें विटंबिला भीमकनंदन ॥ यास्तव तेणें धरिला साभिमान ॥ न रिघे नगरीं ॥३॥

भीमकीसी जाहले पुत्रपौत्र ॥ परी भेटला नाहीं सहोदर ॥ तंव नातें दुणावी परस्पर ॥ श्रीकृष्णदेवो ॥४॥

भीमकीची कन्या चारुमती ॥ ते दीधली सुमनकीर्तिप्रती ॥ तो होत असे बंधुगोती ॥ रुक्मयाचा ॥५॥

आणि रुक्मयाची कुमरी ॥ रोचना नामें रुपें गौरी ॥ ते मेळविलीसे नोवरी ॥ अनिरुद्धासी ॥६॥

सकळ घेवोनि अंतःपुरां ॥ सवें कुमरी आणि कुमरां ॥ कॄष्ण आला कौंडण्यपुरा ॥ वर्‍हाडिकेसी ॥७॥

सुमुहूर्ती लागलें लग्न ॥ तीन दिवस जाहले पूर्ण ॥ परि अवचित एक विघ्र ॥ उदेलें मंडपीं ॥८॥

बळभद्र होता जानवसां ॥ तेथें रुक्मियानें धाडिला संदेशा ॥ कीं वेळ क्रमावया हषीकेशा ॥ पाठविजे बळदेवो ॥९॥

सहजें क्रमावया दिवसा ॥ खेळावया सारिफांसा ॥ मग व्याहिपणाचेनि आशां ॥ श्रीकृष्णें पाठविला तो ॥११०॥

परि कलिंगादि राजे समस्त ॥ त्यांहीं मांडिलें एकमत ॥ कीं कपटफंशांहीं जिंकिजे जैत ॥ सकळ आपण ॥११॥

येरव्हीं समरंगणी भिडतां ॥ बळदेव नागवे आह्मां समस्तां ॥ तरी ऐसी करोनियां वार्ता ॥ मांडिला पट ॥१२॥

तंव ते सहजें कपटफांसे ॥ बळदेव वोडवी हरीचेनि आवेशें ॥ सर्व हारविलें परी संतोषें ॥ न पडे डावो ॥१३॥

ऐसें जाणोनियां हासती ॥ ह्नणती हारविलें गा यादवपती ॥ तें ऐकोनि उपजे खंतीं ॥ बळदेवातें ॥१४॥

तंव बोलिला सारथी ॥ कीं आपुले फांसे व्याजी हातीं ॥ ते फांसे ढाळितां जिती ॥ आली यादवासी ॥१५॥

उत्कर्षे देखिलें यादवकुमरें ॥ परि वोढोनियां फांसे करें ॥ राव ह्नणती भीमककुमरें ॥ जिंकिला डाव ॥१६॥

तो एकला ते सकळ ॥ हांसोनि बोलती बरळ ॥ तंव वाचा जाहली मंजुळ ॥ अंतराळीं ॥१७॥

तुह्मी सकळ रे अनृत ॥ बळदेवें जिंकिला डाव सत्य ॥ मग कलिंगाचे उडविले दांत ॥ कपटफांसे ढाळितां ॥१८॥

अनुपम कोपला रेवतीपती ॥ सारिपात घेतला हातीं ॥ रुक्मया हाणिला निर्घाती ॥ मस्तकावरी ॥१९॥

जाणों वाजले गिरिकूट तैसें वाजिन्नलें उद्भट ॥ मस्तक जाहलें शतकुट ॥ रुक्मयाचें ॥१२०॥

तंव जाहला हाहाःकार ॥ मग खांदी घेतले मुसळ नागर ॥ पुढें करोनियां कन्यावर ॥ आला बळदेवो ॥२१॥

इकडे करावयालागीं उटणीं ॥ सवें सोळासहस्त्र सुवासिनी ॥ घेवोनि येतहोती रुक्मिणी ॥ बंधुमंडपासी ॥२२॥

जंव ऐसें जाहलें विचित्र ॥ तंव सोहळे राहिले समग्र ॥ मग निघाले यादवकुमर ॥ द्वारकेसी ॥२३॥

जरी भीमकींचें राखिजे चित्त ॥ तरी बळदेवो दूषिजे हें अनुचित्त ॥ ह्नणोनि कृष्ण गेला न पुसत ॥ रैवताचळासी ॥२४॥

आतां असो हा बळिभद्र ॥ सकळ दाविला विचार पृथ्वी उचली तया दर्दुर ॥ दडपी कैसा ॥२५॥

हा आठवा अवतार ॥ जयदेवमताचा विचार ॥ तथें प्रथम पदीं हलधर ॥ बोलिला असे ॥२६॥

आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ बळदेवआख्यानविस्तारु ॥ पंचदशोऽध्यायीं सांगितला ॥१२८॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP