कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

॥ वैशंपायना पुसे भूपती ॥ कृष्णें कैसी पर्णिली जांबुवती ॥ हें सांगावें वेदमूर्ती ॥ वैशंपायना ॥१॥

मग ह्नणती मुनेश्वर ॥ जांबुवंत ब्रह्मयाचा अवतार ॥ तयासाम्य नाहीं झुंजार ॥ भूमंडळीं ॥२॥

रामें वधिलिया लंकापती ॥ अयोध्ये आणिली सीतासती ॥ मग बोलाविले सेनापती ॥ दानमानें ॥३॥

रामें होवोनि सुप्रसन्न ॥ तृप्त केले वानरगण ॥ ह्नणे मागा इच्छादान ॥ आणिक कांहीं ॥४॥

तेव्हां बोलिला जांबुवंत ॥ श्रीरामा तूं महासमर्थ ॥ परि माझा न पुरेचि मनोरथ ॥ रणमंडळींचा ॥५॥

माझेनि बळाचा महावीर ॥ मज द्यावा जी झुंजार जो साहे मुष्टिमार ॥ माझिये करांचा ॥६॥

देवा तुझे दुर्लभ चरण ॥ मज त्वां द्यावें जी दर्शन ॥ हेंचि मागतों वरदान ॥ तुजपाशीं गा ॥७॥

ऐकोनि बोले रघुनाथ ॥ तुझा पुरेल मनोरथ ॥ हा बोल होईल रे सत्य ॥ द्वापारामाजी ॥ ॥८॥

बलसागर तो जांबुवंत ॥ तेणें नमस्कारिला रघुनाथ ॥ मग निघोनि गेला त्वरित ॥ स्वस्थानातें ॥९॥

ऐसा असतां वनांतरीं ॥ तंव कृष्ण अवतरला द्वापारीं ॥ इकडे त्यासी जाहली कुमरी ॥ जांबुवती नामें ॥१०॥

ते महासुंदरी सुजाण ॥ जें सौभाग्याचें जन्मभुवन ॥ गुणसमुद्रलावण्य रत्न ॥ जांबुवती ॥११॥

आतां असो हा पुढार ॥ द्वारके असतां शांरगधर ॥ तंव जाहला चमत्कार ॥ नगरामाजी ॥१२॥

सत्राजित नामें यादव परिकर ॥ तेणें तप केलें एकसंवत्सर ॥ नानातपांहीं दिनकर ॥ संतोषविला ॥१३॥

ऐसा प्रसन्न जाहला तरणी ॥ तेणें दीधला स्यमंतक मणी ॥ तो एक भार नित्यनित्यानी ॥ प्रसवे कनक ॥१४॥

मग त्या मणीचिये शक्तीं ॥ महादानें देत स्वहस्तीं ॥ ऐसी त्याची जाहली ख्याती ॥ नगरामाजी ॥१५॥

परि त्यासी ह्नणे श्रीकृष्णराणा ॥ हा मणी दे पां उग्रसेना ॥ रायावांचोनि ग्रामजनां ॥ न साहे रत्न ॥१६॥

जरी दुर्बळा सांपडे परिस ॥ तो जाणावा त्याचा जीवनाश ॥ जैसा कदलीगर्भ येतां पोटास ॥ होय संहार ॥१७॥

सर्पमाथांचा प्रकाशमणी ॥ तो जगा न लाहे अंतःकरणी ॥ आणि मृग जातसे मरणीं ॥ कस्तूरीस्तव ॥१८॥

आणिक समुद्राचे पोटीं ॥ मुक्ताफळ असे शुक्तीसंपुटीं ॥ ते शुक्तिका करोनि हिंपुटी ॥ नेती एक ॥१९॥

ह्नणोनि सत्राजिता हा महामणी ॥ न साहवे गा तुझिये भुवनीं ॥ त्याचिये निमित्त निर्वाणीं ॥ पावसी मृत्यू ॥२०॥

ऐसा ह्नणतसे नित्यानी ॥ तें जनीं ऐकिलें कणोंपकर्णी ॥ कीं कृष्ण मागतसे मणी ॥ सत्राजिताचा ॥२१॥

तंव त्यांचा धाकुटा सहोदरं ॥ प्रसेन नामें महावीर ॥ तो कंठीं बांधितसे पवित्र ॥ स्यमंतकमणी ॥२२॥

मग कोणे एके काळवेळी ॥ प्रसेन गेलासे व्याहाळीं ॥ मागें सैन्यासि पडली भुली ॥ मार्गास्तव ॥२३॥

तेणें श्रांतला तो कुमरु ॥ मग स्थिर करोनियां वारु ॥ अस्त पावलिया दिनकरु ॥ निजेला तो ॥२४॥

तंव तेथें आला वनकेसरी ॥ ह्नणे सूर्य कैंचा पां रात्रीं ॥ ह्नणोनियां पाहूं आला झडकरी ॥ कुमारापाशीं ॥ ॥२५॥

तेणें प्रसेन देखिला निद्रिस्थ ॥ कंठीं मणीं असे झळकत ॥ मग मारिला अश्वासहित ॥ हस्तचपेटें ॥२६॥

तेथें ते सांडिले दोनी ॥ करीं घेवोनि स्यमंतकमणी ॥ सिंह आला निजभुवनीं ॥ आपुलिया ॥२७॥

तंव घ्यावया कंदमूळ चारा ॥ जांबुवंत निघाला बाहेरा ॥ दीप्ति देखतां दोघां वीरां ॥ जाहलें युद्ध ॥२८॥

मग तेणें जांबुवंतें ॥ सिंह मारिला मुष्टिघातें ॥ मणी घेवोनियां सांगातें ॥ गेला विवरीं ॥२९॥

भारता मग तो महामणी ॥ बांधिला कन्येचे पाळणीं ॥ जाणों उतरला मेदिनी ॥ सूर्यदेवो ॥३०॥

आतां इकडे मागील कथा ॥ प्रसेन वनीं राहिला होता ॥ तयाची दूतमुखें आली वार्ता ॥ कीं कुमर वनीं न सांपडे ॥३१॥

ऐसा जाणोनि समाचार ॥ द्वारके जाहला हाहाःकार ॥ ह्नणती कृष्णें मारिला निर्धार ॥ प्रसेन वीतो ॥३२॥

सकळां सांगे सत्राजिता ॥ मणी कृष्ण होता अभिलाषित ॥ ह्नणोनि वनी मारिला गुप्त ॥ प्रसेनबंधू ॥३३॥

कर्णोपकर्णी ऐकतां गोविंद ॥ ह्नणे अवघड हा लोकापवाद ॥ आतां कोण करील अनुवाद ॥ परिहाराचा ॥३४॥

मग विचारिलें अंतर्ज्ञानीं ॥ तंव जाणितलें शारंगपाणीं ॥ ह्नणोनि निघाला तत्क्षणीं ॥ धांवण्यासी ॥३५॥

सवें घेवोनि परिवार ॥ वनीं हिंडे शांरगधर ॥ तंव देखिला प्रसेनकुमर ॥ प्रेतरुप ॥ ॥३६॥

आणि पडिला देखोनि तुरंग ॥ मनीं विस्मय करी श्रीरंग ॥ इतुक्यांत देखिला मार्ग ॥ महासिंहाचा ॥ ॥३७॥

तेणें मार्गे निघाला श्रीकृष्ण ॥ तंव मारिला देखे पंचानन ॥ परि जाहला खेदक्षीण ॥ मणिविणें पैं ॥३८॥

ह्नणोनि चौफेरीं विलोकिलें ॥ तंव देखिलीं रिसाची पाउलें ॥ मग प्रवेश केला गोपाळें ॥ विवरामाजी ॥३९॥

सैन्या ठेवोनियां द्वारी ॥ आंत प्रवेशला मुरारी ॥ तंव देखिला भीतरीं ॥ स्यमंतकमणी ॥४०॥

दुरोनि पाहे कृष्णनाथ ॥ तंव पहुडलासे जांबुवंत ॥ वाचे असे उच्चारित ॥ रामनाम ॥ ॥४१॥

तेणें संतोषला श्रीहरी ॥ उभा राहिला गृहद्वारीं ॥ जैसा बळीचिये घरीं ॥ त्रिविक्रम कीं ॥ ॥४२॥

जंव घ्यावया गेला मुरारी ॥ तंव बोभाइंली अंतुरी ॥ ऐकतां बाहेर आला झडकरी ॥ रीसरावो ॥४३॥

रोषें कृष्ण ह्नणे तयासी ॥ मणी घेवोनि कांरे आलासी ॥ जीवों न देसी श्वापदांसी ॥ वनींचिया ॥४४॥

आतां निघेंरें विवरा बाहेरी ॥ ह्नणोनि पाचारी मुरारी ॥ तंव येरुसि रोमरंध्रीं थरारी ॥ नाटोपली ॥४५॥

दोघां जाहली हातोफळी ॥ येक येकापरीस बळी ॥ हाणिताती वक्षस्थळीं ॥ मुष्टिघातें ॥४६॥

ऐसें जाहलें दोनी वीरां ॥ तंव लोटले दिवसबारा ॥ ह्नणोनि लोक निघाले मोहरां ॥ द्वारकेचे ॥४७॥

इकडे येकमेकां हाणिती शिळीं ॥ मग आले केशकवळी ॥ रीस आणिला पायांतळी ॥ गोपिनाथें ॥४८॥

तो ब्रहयाचा अवतार ॥ जो चालवी त्रिभुवनींचा भार ॥ तेणेंगुणें पडिला विचार ॥ जांबुवंतासी ॥४९॥

मग चिंती जांबुवंत ॥ झणीं होईल हा रघुनाथ ॥ नातरी येवढा कैंचा पुरुषार्थ ॥ आणिका वीरा ॥५०॥

ऐसा करितां विचार ॥ रामरुप जाहला शारंगधर ॥ तंव चरणीं केला नमस्कार ॥ जांबुवंतें ॥५१॥

मग मांडिली महास्तुती ॥ जयजयाजी मंगळमूर्त्ती ॥ माझिये मनींची आतीं ॥ पुरविली तुवां ॥५२॥

जयजय हो श्रीरामचंद्रा ॥ भक्तजनां अभयंकरा ॥ शरणागतां वज्रपंजरा ॥ राघवा तूं ॥५३॥

जय जानकीप्राणनाथा ॥ पावलासि पुर्वसंकेता ॥ तरी कृपा करावी अनाथा ॥ सेवकासी ॥५४॥

माझी कन्या जांबुवती ॥ तुजी सेवा करील श्रीपती ॥ आणि मारिलें मुष्टिघातीं ॥ तें करीं क्षमा ॥५५॥

राया मग ते जांबुवती ॥ पित्यानें आणीली आरुती ॥ अर्पितसे देवाप्रती ॥ रीसरावो ॥५६॥

ऐसें लाविलें गंधर्वलग्न ॥ मणी दीधलासे आंदण ॥ मग तेथूनि निघाला श्रीकृष्ण ॥ द्वारकेसी ॥५७॥

ऐसे दिवस अठ्ठाविस ॥ झूंजले श्रीकृष्ण आणि रीस ॥ परि यादव गेले द्वारकेस ॥ दिवसां बारां ॥५८॥

ते सांगती मात बळिभद्रा ॥ कीं कृष्ण निघाले येका विवरा ॥ वाट पाहोनि दिवस बारा ॥ निघालों आह्मीं ॥५९॥

सर्व सांगीतला वृत्तांत ॥ सिंह कुमराचा यथार्थ ॥ रिसाचा देखोनियां पंथ ॥ प्रवेशला विवरीं ॥६०॥

तें विवर नव्हे जी राक्षस ॥ तेणें गिळिला हषीकेश ॥ आमुचाही करिता ग्रास ॥ परि निघालों आह्मीं ॥६१॥

मग नगरीं जाहला हाहाःकार ॥ ह्नणती अनर्थ वर्तला थोर ॥ मणिरुपें महारुद्र ॥ क्षोभला कीं ॥६२॥

उचंबळला दुःखसागरु ॥ आदोळलें द्वारकातारुं ॥ शीड गेलें शारंगधरु ॥ दुःखतातें करोनी ॥६३॥

मग वसुदेव उग्रसेन ॥ देवकी आणि रेवतीरमण ॥ पहावया आलीं शकुन ॥ अंबालयीं ॥६४॥

भद्रा पूजिली नानारत्नी ॥ पुष्प वाहोनि चिंतिली मनीं ॥ स्तुति करोनि नानावचनीं ॥ कर जोडोनि प्रार्थिलें ॥६५॥

तूं महामाया खेचरी ॥ त्रिभुवन असे तवउदरीं ॥ तरी सांगें वो मुरारी ॥ कवणे परी असेल ॥६६॥

ऐसा करितां स्तुतिवाद ॥ तंव गगनीं उठिला शब्द ॥ कीं सुखें येतसे गोविंद ॥ तुह्मीं खेद न धरावा ॥६७॥

कुशल आहे हो मुरारी ॥ येकी आणितसे सुंदरी ॥ वेगीं श्रृंगारावी नगरी ॥ यादवांची ॥६८॥

ऐसी ऐकिली गगनवार्ता ॥ तंव कृष्ण देखिला अवचिता ॥ सवें मिरविली वनिता ॥ जांबुवती ॥६९॥

एकें दीधलीं आलिंगनें ॥ येकें घातली लोटांगणें ॥ नगरीं जाहलें वाधावणें ॥ आनंदाचें ॥७०॥

असो कृष्णें समस्तां देखतां ॥ मणी देवोनि सत्राजिता ॥ मग कथिली सकळ वार्ता ॥ वर्‍हाडिकेची ॥७१॥

ह्नणे मजवरी लोकापवाद ॥ कीं मणी घेवोनि गेला गोविंद ॥ आणि प्रसेन मारिला हा शब्द ॥ जनमुखींचा ॥७२॥

तरी ओखंटी लोकवार्ता ॥ अवघड असे तर्क कविता ॥ ह्नणोनि राहटावें लागें जाणत्या ॥ बरवेपरी ॥७३॥

ऐसें बोलिला अनंत ॥ तेणें लाजिला सत्राजित ॥ ह्नणे आतां कीजे अपघात ॥ जीवितासी ॥७४॥

अहो ऐसा मी अनाचारी ॥ माझेनि दुःख पावला मुरारी ॥ तयाचेनि बळें नगरीं ॥ वसों आह्मीं ॥७५॥

असो इतुकें वर्तलें बाहेरी ॥ मग श्रृंगारिली द्वारकापुरी ॥ रथीं मिरवला श्रीहरी ॥ नोवरीसहित ॥७६॥

ऐसें जांबुवतीचें लग्न ॥ राया जाहलें सुखशोभन ॥ विचित्रपरींचें रचोनि भुवन ॥ तये दीधलें ॥७७॥

यावरी तो सत्राजित ॥ उद्धवासी करी येकांत ॥ ह्नणे कन्या माझी गोपिनाथ ॥ वरील ऐसें करावें ॥७८॥

तेणें जाणविलें अनंता ॥ तें मानवलें त्याचिये चित्ता ॥ मग निश्वयाच्या मुहूर्ता ॥ प्रवर्तले उभय ॥७९॥

केली लग्नाची आयती ॥ सकळ बोलाविले भूपती ॥ तो भाळला श्रीपती ॥ सत्यभामेसी ॥८०॥

जाहलें फळदान शोभन ॥ मधुपर्क अर्ध्य पूजन ॥ मंगळस्वर करिती ब्राह्मण ॥ लग्न सुमुहूतीं ॥८१॥

चारी दिवस सुखसोहळा ॥ अभर केलें याचककुळा ॥ संतोषविलें यादवां सकळां ॥ आणि देवकी वसुदेवो ॥८२॥

पांचव्यादिनीं काढिली वरात ॥ आंदण दीधलें अमित ॥ दासदासी अश्वगजरथ ॥ आणि बहुत भांडारें ॥८३॥

ऐसी सत्यभामा सुंदरी ॥ संभ्रमें दीधली मुरारी ॥ आणि दक्षिणा दीधली वरी ॥ स्यमंतकमणी ॥८४॥

कृष्णासि करोनि नमस्कार ॥ ह्नणे मी अपराधी किंकर ॥ तेणें तोषला यादवकुळदिनकर ॥ सत्राजितासी ॥८५॥

मग बोलिलें नारायणें ॥ जें दीधलें तें मागुती घेणें ॥ हे भलें नव्हे जी करणें ॥ आह्मालागीं ॥८६॥

मणी राखावा आपणापाशीं ॥ तेणें संतोष आमुचे मानसीं ॥ जें गोमटें स्वभक्तासी ॥ तें आह्मासी आवडे ॥८७॥

मणी दीधला सत्राजिता ॥ परि तो तेणेंचि मुकला जीविता ॥ जैसी कर्दळी पावे व्यथा ॥ फळसाधनें ॥८८॥

ऐशा सत्यभामा जांबुवती ॥ यापरी वरिल्या श्रीपतीं ॥ तंव बोलिला भूपती ॥ जनमेजयो ॥८९॥

मुनीसि ह्नणे भारत ॥ कोणीं मारिला सत्राजित ॥ तो सांगा जी वृत्तांत ॥ सकळ मज ॥९०॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ हस्तनापुरींहूनि आला जन ॥ तेणें सांगितला प्रश्न ॥ पांडवांचा ॥९१॥

ह्नणे जी पंडूचे कुमर ॥ लाक्षागृहीं जाळिळे समग्र ॥ पुरोचनें केला अविचार ॥ कपटभावें ॥९२॥

मग ज्ञानीं पाहिलें श्रीकृष्णें ॥ तंव तीं आहेत साहीजणें ॥ परि निघाला तत्क्षणें ॥ लोकाचारा ॥९३॥

रथ निघाला झडकरी ॥ वेगां पावला हस्तनापुरी ॥ दुर्योधना भेटोनि मुरारी ॥ ह्नणे केलें कटकटा ॥९४॥

इकडे द्वारके जाहला चमत्कार ॥ कृतवर्म्यासि ह्नणे अक्रूर ॥ आपुला साक्षात् शत्रु साचार ॥ सत्राजित हा ॥९५॥

याची कन्या सत्यभामा ॥ हे देऊं केली होती आह्मां ॥ आतां दीधली पुरुषोत्तम ॥ भ्यालेपणें ॥९६॥

तरी यांचें करावें हनन ॥ आणि घ्यावें हें मणिरत्न ॥ मग सुखें करुं भोजन ॥ पुण्यक्षेत्रीं ॥९७॥

ऐसा सांगतां गुप्त भावो ॥ तेथें आला शतधन्वरावो ॥ तयासि सांगितला अभिप्रावो ॥ अवघा त्याचा ॥९८॥

तंव ह्नणे शतधन्वा ॥ तरी आतांचि हा वधावा ॥ मग कृष्ण आलिया गांवा ॥ न चले कांहीं ॥९९॥

ऐसा करोनियां विचार ॥ आले कृतवर्मा अक्रूर ॥ शतधन्व्यानें केला पशुमार ॥ सत्राजिताचा ॥१००॥

रिघोनियां मंदिरांत ॥ निद्रिस्थ असतां सत्राजित ॥ खड्र काढोनियां घात ॥ केला तयाचा ॥१॥

घेवोनि कंठींचा मणी ॥ पळोनि गेला तेथोनी ॥ तंव सत्राजिताचे भुवनीं ॥ फुटली हाक ॥२॥

तैं सत्यभामे जाहलें श्रुत ॥ मग रुदनें जाहली मूर्छित ॥ शोक आदरिला बहुत ॥ तो असो आतां ॥३॥

सत्यभामा बैसोनि रथीं ॥ वेगें आली हस्तनावतीं ॥ तंव भेटला श्रीपती ॥ मार्गी तये ॥४॥

सत्यभामा करी रुदन ॥ सेवकीं सांगितलें कथन ॥ तेणें गोविंदाचें मन ॥ पावलें द्रव ॥५॥

तो यादवकुलभूषण ॥ राखे सत्यभामेचें मन ॥ सासरा ह्नणजे गुरुस्थान ॥ ह्नणोनियां ॥६॥

तया नाहीं पुत्रसंतती ॥ सत्यभामा करी ऊर्ध्वगती ॥ ह्नणोनि निघाला श्रीपती ॥ धांडोळणासी ॥७॥

असो कृष्ण आलिया गांवा ॥ मग भ्याला तो शतधन्वा ॥ वेगां पावला गुप्तभावा ॥ कृतवर्म्यासि ॥८॥

ह्नणे यादवपती या पुढां ॥ मज धीर नव्हे गा येवढा ॥ तरी तुझा दे कां घोडा ॥ पळावयासी ॥ ॥९॥

मग पालाणोनि वारु ॥ शतधन्वा निघे वेगवत्तरु ॥ शतयोजनें गेला निर्धारू ॥ पळामाजी ॥११०॥

तें जाणवलें गोपिनाथा ॥ कीं शतधन्व्यानें मारिलें सत्राजिता ॥ मग सत्वर बैसले रथा ॥ रामासहित ॥११॥

इकडे जनकाचे मैथुळी ॥ घोडा जावोनि वेळोवेळीं ॥ श्रमोनि पडिला भूमंडळीं ॥ वारु तयाचा ॥१२॥

तंव कृष्ण आला पाठोपाठी ॥ घोडा पडिला देखे दृष्टीं ॥ आणि पुढें तळपतसे हिंपुटी ॥ शतधन्वा भयें ॥१३॥

मग रथीं ठेवोनि बळिभद्र ॥ वेगें धांवला शारंगधर ॥ चक्रें कापिला तस्कर ॥ शतधन्वा तो ॥१४॥

तया घांडोळी चक्रपाणी ॥ परि न देखे स्यमंतकमणी ॥ ह्नणोनि चिंतावला मनीं ॥ गोपिनाथ ॥१५॥

ह्नणे हा मारिला म्यां वृथा ॥ मणी गेला आणिकाचे हाता ॥ मागुती चढिला महारथा ॥ यदुनंदन ॥१६॥

तंव ह्नणे रेवतीपंती ॥ कीं शतधन्वा पाहिला त्वां क्षितीं ॥ तरी मणी द्यावा माझे हाती ॥ पहावयासी ॥१७॥

ऐकोनि ह्नणे श्रीपती ॥ म्यां मारिला जी व्यर्थ निश्विती ॥ परि मणी गेला हातीं ॥ आणिकाचे ॥१८॥

साशंक राम विचारीं मनीं ॥ कीं हा कपटी चक्रपाणी ॥ निश्वयें मजवांचोनि मणी ॥ राखिला येणें ॥१९॥

तेणें दुखवला बळिभद्र ॥ मग सांडिला शारंगधर ॥ तेथोनि आला वेगवत्तर ॥ मिथुळेप्रती एकटा ॥१२०॥

तेथें जनकरायापाशीं ॥ सात वर्षें राहिला सायासीं ॥ गदायुद्ध साधिलें अहनिशीं ॥ अप्रतीम ॥२१॥

तंव तेथे आला दुर्योधन ॥ तो बळदेवापाशीं शिके जाण ॥ परि इकडे आला श्रीकृष्ण ॥ द्वारकेसी ॥२२॥

येवोनि सर्व समाचार ॥ सत्यभामेसि सांगे श्रीवर ॥ परि तीतें न वाटे साचार ॥ बोल कृष्णाचा ॥२३॥

असो ठाई पाडाया मणिवर ॥ सहजें शंकला अक्रूर ॥ ह्नणोनि कृतवर्मयासह शीघ्र ॥ गेला काशिपुरा ॥२४॥

तया अक्रुराची जननी ॥ तयेचें नाम गांदिनी ॥ ते काशीश्वराची नंदिनीं ॥ ह्नणोनियां ॥२५॥

तेथें जावोनि अक्रूर ॥ नित्य वेंची कनकभार ॥ तो जाहला पैं विस्तार । देशांतरीं ॥२६॥

तेथें जाणोनि मणिप्रभावा ॥ आनंद उपजला सर्वजीवां ॥ व्याधीं चिंता ज्वरादि निघावा ॥ तेथोनि जाहला ॥२८॥

ऐसें ऐकिलें संकर्षणें ॥ काशीस एकबार सोनें ॥ कोणी देतसे महादानें ॥ विप्रवर्गासी ॥२९॥

ह्नणोनि तेथें आला बळिभद्र ॥ पाहे तंव तो असे अक्रूर ॥ मग करितसे विचार ॥ स्यमंतकाचा ॥१३०॥

ह्नणे यापाशीं असतां मणी ॥ म्यां दुखविला शारंगपाणी ॥ हे निंद्य जाहली करणी ॥ ज्येष्ठपणाची ॥ ॥३१॥

तें ऐकिलें हषीकेशीं ॥ की दोघे आहेत काशीसी ॥ नित्य सुवर्णभार विप्रांसी ॥ देती कनक ॥३२॥

कृष्णें जाणितला अक्रूर ॥ परि ह्नणे येवढा आणिक थोर ॥ जो नित्यनित्य वेंची भार ॥ सुवर्णाचा ॥३३॥

मग अक्रूरा धाडिलें लिखित ॥ ह्नणे दादा कृतवर्म्यासहित ॥ तुह्मीं द्वारकें यावें त्वरित ॥ वडिलभावें ॥३४॥

असो आले तिघेजण ॥ बळदेवें दीधलें आलिंगन ॥ येर भावें धरिती चरण ॥ गोविंदाचे ॥३५॥

तंव अक्रूर करी स्तुती ॥ कीं हे तुझी लीला श्रीपती ॥ स्थिती संहार आणि उत्पत्ती ॥ तुजआधीन ॥३६॥

तरी देवा तो सत्राजित ॥ म्यां वधिला नाहीं सत्य ॥ तूंचि अससी अंतर्गत ॥ सर्वाभूतीं ॥३७॥

ह्नणोनि लागला कृष्णचरणी ॥ पुढां ठेविला स्यमंतकमणी ॥ मग तो दावितसे चक्रपाणी ॥ समस्तांसी ॥३८॥

कृष्ण सांगे यादवस्तोमा ॥ कीं बळदेव आणि सत्यभामा ॥ याणीं सांडिलें होतेम आह्मां ॥ मण्यासाठीं ॥३९॥

देवें मग तो मणी मागुता ॥ अक्रुरा दीधला उचिता ॥ तें मानवलें समस्तां ॥ कृष्णचरण ॥१४०॥

भारता ऐसा त्रिजगभूपाळ ॥ परि त्यावरी आला आळ ॥ ह्नणोनि हा प्रपंच सबळ ॥ जन्मेजया गा ॥४१॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ येवढा कृष्ण महाबाहो ॥ परि आळ यावया उपावो ॥ काय जाहला ॥४२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ शिवसभे नाचतां गजवदन ॥ तेथें आला अत्रिनंदन ॥ सभेमाजी ॥ ॥४३॥

तंव घेतां नृत्यभोंवरी ॥ तेथे गणेश गेला चांचरी ॥ ह्नणोनि तया हांसला वक्रीं ॥ निशानाथ ॥४४॥

गणेशें शापिलें तया चंद्रा ॥ कीं तुझें मुख जे पाहती अपवित्रा ॥ ते पातकी अवधारा ॥ सदा होती ॥४५॥

तेणें योगें निशानाथ ॥ उदयो न पावे यथार्थ ॥ अंधकार पडला समस्त ॥ जगामाजी ॥४६॥

मग देवी मिळोनि समस्तीं ॥ विनविला तो गणाधिपती ॥ कीं या वांचोनि वनस्पती ॥ जाती लया ॥४७॥

वनस्पतिद्रव्यें होमिती ब्राह्मण ॥ तेणें सबळ देवगण ॥ आणि वनस्पती तरी चंद्रेंविण ॥ न जीवती गा ॥४८॥

तरी हा जाहलिया अपवित्र ॥ मग खूंटला प्राणिव्यवहार ॥ तंव देवांप्रती फरशधर ॥ बोलिला कांहीं ॥४९॥

ह्नणे ऐकावें समस्तीं ॥ भाद्रपद शुद्ध चतुर्थी ॥ ते दिनीं जे चंद्रासि पाहती ॥ ते पावती आळ ॥१५०॥

तरी तो कोणे एके अवसरीं ॥ कृष्णें चंद्र देखिला गोक्षुरीं ॥ त्या निमित्त श्रीमुरारी ॥ पावला आळ ॥५१॥

हें स्यमंतकमणीचें आख्यान ॥ जे करिती श्रवणपठण ॥ त्यांचे नासती दारुण ॥ महादोष ॥५२॥

आणि नासेल आळशाप ॥ हरेल चित्ताचा शोकताप ॥ हा ऐकतां नामघोष ॥ कृष्णकथेचा ॥५३॥

यानंतरें गा भारता ॥ कृष्ण गेला इंद्रप्रस्था ॥ तेथें पर्णिली एकी वनिता ॥ कालिंदी ते ॥ ॥५४॥

हे भागवतींची कथा ॥ वैशंपायन सांगे भारता ॥ ते म्यां कथिली प्राकृता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ स्यमंतकआख्यानविस्तारु ॥ दशमोऽध्यायीं सांगितला ॥१५६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP