॥श्रीगणेशाय नम: ॥ ॥
श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीइष्ठदेवताकुलदेवताम्यो नम: ॥
श्र्लोक:॥ यं ब्रह्म: वेदांतविदो वदंति परं प्रधान पुरुषं तथान्ये ॥ विश्र्वोद्भवं कारणमीश्र्वरं वा तस्मै नमो विघ्नविनाशनाय ॥ १ ॥
वसुदेवसुत देवं कंसचाणूरमर्दनं ॥ देवकीपरमानंदं कॄष्ण वंदे जगद्रुरुं ॥ २ ॥
टीका ॥
ओं नमो जी नारायणा ॥ तूं त्रिजगतीं परिपूर्णा ॥ शुध्द बुद्ध सत्वगुणा ॥ तूंचि देवा ॥ १ ॥
तूं कार्य कारण कर्ता ॥ तूं भोग्य भोजन भोक्ता ॥ सगुणनिर्गुण उभयतां ॥ तूंचि देवा ॥ २ ॥
तूं सच्चिदानंदवन ॥ प्रळ्यकाळीचें जीवन ॥ त्रिगुणगुणांमाजी कांचन ॥ नारसिंहा ॥ ३ ॥
जथजयाजी परमपुरुषा ॥ महाभागा परमहंसा ॥ ह्नदयकमळीं बीजांशा ॥ तूंचि रामा ॥ ४ ॥
जय जय तूं अक्षरा ॥ तूं अव्यक्त आदिअंकुरा ॥ तूं परात्पर गाभारा ॥ ज्योतिलिंगा ॥ ५ ॥
तूं शब्द ना स्पर्श ॥ तूं स्थूळ ना सूक्ष्मांश ॥ तूंचि गंध ना पूर्णरस ॥ परमहंसा ॥ ६ ॥
जयजयाजी जगदाभासा ॥ जयजय ओंकारप्रकाशा ॥ जयजयाजी ब्रह्मांडाधीशा ॥ अनंता तूं ॥ ७ ॥
तूं पर आणि परमानंद ॥ तूं परमात्मा विश्र्वकंद ॥ तूं निवेंद्य अभेय ॥ निरंतर ॥ ८ ॥
तूं प्रळयाचा अंत आदी ॥ तूं सर्व देवांमाजी उदधी ॥ सर्वरचनेसि उपाधी ॥ तूंचि देवा ॥ ९ ॥
तूं सर्वज्ञानांचा विधी ॥ सर्वाचिये मूळी आदी ॥ तूं सर्वज्ञ त्वंपदबुद्धी ॥ जय नारसिंहा ॥ १० ॥
तूं व्यापूनियां चराचरीं ॥ तूं अलिप्त भूतमात्रीं ॥ जेदिं पाद्मिनीपत्र जळीं ॥ अलिप्तपणें ॥ ११ ॥
तूं जीवनाचें जीवन ॥ तूं ज्ञाननेत्रांचें अंजन ॥ आणि मोक्षपदाचें भुवन ॥ तूंचि हरी ॥ १२ ॥
तूं मनमोक्षाचें सुमन ॥ तूं तत्त्वमस्यादि साधन ॥ तूं वेदगभीचें अंजन ॥ नारायणा ॥ १३ ॥
जयजयाजी भक्तवत्सला ॥ कॄपावंता महाशीळा ॥ धर्मश्रुति प्रतिपाळा ॥ गोविंदा तूं ॥ १४ ॥
आता असो हें स्तुतिवचन ॥ मापें मोजावें किती गगन ॥ श्रुतीनें केलें असे मौन ॥ वर्णितां तुज ॥ १५ ॥
स्वर्ग पाताळ आणि मॄत्यु ॥ हे ज्याचेनि आघारें तंतु ॥ ह्नणोनि ब्रह्मा जाहला अशक्तु ॥ वानितां तुज ॥ १६ ॥
जरी बोबडें बोले बालक ॥ परि माता मानी तें कौतुक ॥ कीं लिंगपूजा करावया रंक ॥ आपुले शक्ती सरसावलें ॥ १७ ॥
तरि तूंचि मातापिता ॥ तूं ब्रह्मकुळदेवता ॥ तूं गणाधीश श्रोता वक्ता ॥ गुरु तूंचि देवा ॥ १८ ॥
तुझें केलिया स्तवन ॥ तेणें सकल कार्यकारण ॥ जैसें तरुमूळीचें जीवन ॥ पोखी पल्ल वां ॥ १९ ॥
आतां हेचि असे विनवणी ॥ कीं तूं सर्वज्ञ चिंतामणी ॥ तरी प्रवेशोनि अंतःकरणीं ॥ बोलवीं मज ॥ २० ॥
जैसा बाण मेळवी लक्षकारु ॥ कीं वर्म दाखवी धूर्त हे तरु ॥ तैसा बोलवीं कल्पतरु ॥ ग्रंथराज हा ॥ २१ ॥
कीं अंधा वागवी डोळस ॥ सूत्रघोंटियाचा सौरस ॥ तैसा बोलवीं नवरस ॥ ग्रंथकथेसी ॥ २२ ॥
मागें जाहला स्तबकदुसरा ॥ आतां आरंभिला तिसरा ॥ तो पूर्ण करीं गा दातारा ॥ कॄपानिधी ॥ २३ ॥
मग तेणें कॄपावंते ॥ बीज उपदेशिलें निद्राअवस्थें ॥ कीं ग्रंथ करीं नानामतें ॥ कथाकल्पतरु हा ॥ २४ ॥
तो भावें नमिला गणेश ॥ आणि नमिला गणेश ॥ आणि नमिलें कुलदेवतेस ॥ तैसाचि नमिला गुरुव्यास ॥ आणि वाल्मीक तो ॥ २५ ॥
आतां नमूं संतश्रोतां ॥ मूढ अथवा दिव्यज्ञातां ॥ परि हरिकथेची अवस्था ॥ अहर्निशीं जयां ॥ २६ ॥
जैसी तॄणअळिके धरी भ्रमरी ॥ ते तिये न विसंबे क्षणभरी ॥ तैसा हरिकथेचे अवसरीं ॥ दुर्लक्ष श्रोता ॥ २७ ॥
आतां असो हे विज्ञापना ॥ मयोरा दाविजे केविं पेखणा ॥ ह्मणोनि पूर्वभाग्यें सुमना ॥ होवोनि ठाकें ॥ २८ ॥
आतां अवधान घ्यावें श्रोतां ॥ श्रवणीं घ्यावी हरिकथा ॥ जे तरी भवभयाची व्यथा ॥ टाळूं शके ॥ २९ ॥
जैसी नारसांची पक्कान्नें ॥ स्वादविस्तारीं तैसें बोलणें ॥ कीं कर्ता घडी कंकणें ॥ सदैवासी ॥ ३० ॥
तैसा हा कथाकल्पतरु ॥ श्रोतयां केला सिद्ध आहारु ॥ कीं वाक्पुष्पांचा मनोहर हारु ॥ घातला कंठीं ॥ ३१ ॥
अठरा पुराणांचें संमत ॥ जें व्यासवचनें असे सत्य ॥ तें श्रोतयांचे श्रवणीम अमॄत ॥ घालूं आतां ॥ ३२ ॥
तरी या पुराणाचें प्रमाण ॥ कोणाचें कितुकें असे जाण ॥ तें ऐका सावधान ॥ एकचित्तें ॥ ३३
श्र्लोक:
॥ ब्राह्मं पाद्मं वैष्णवं च शैवं लैगं सगारुडं ॥ नारदीयं भागवतमाग्नेय स्कंदसंज्ञितं ॥ १ ॥
भविष्यं ब्रह्मवैवर्त मार्कंडेयं सवामनं ॥ वाराहं- ॥ मात्स्यं कौंर्म च ब्रह्मांडाख्यमिति त्रिषट्र ॥ २ ॥
टीका ॥
माकैड आणि मत्स्यपुराण ॥ गरुड नारद स्कंद वचन ॥ आणि महाॠषि बोधन ॥ भविष्योत्तर तें ॥ ३४ ॥
ब्रह्मांड आणि ब्रह्मपुराण ॥ ब्रह्मवैवर्त सत्रावें जाण ॥ आणि अठरावें सुतक्षण ॥ श्रीभागवत ॥ ३५ ॥
तरी या पुराणांचे प्रमाण ॥ कवणाचें असे किती जाण ॥ तैं ऐकावें सावधान ॥ एकचितें ॥ ३६ ॥
ब्रह्मपुराण सहस्त्र दहा ॥ पद्मपुराण बोलिजे महा ॥ पंचावन सहस्त्र पहा ॥ गणना त्याची ॥ ३७ ॥
विष्णुपुराण सहस्त्र तेविस ॥ शिवपुराण सहस्त्र चोविस ॥ नारद सहस्त्र पांचवीस ॥ भागवत अष्टादश पैं ॥ ३८ ॥
मार्कंडेय पंचदशसहस्त्र शतें चारी ॥ तितुकेंचि अग्नि अवधारीं ॥ चोवीससहस्त्र पांचशतें वरी ॥ भविष्योत्तरपुराण ॥ ॥ ३९ ॥
ब्रह्मवैवर्त सहस्त्र अठरा ॥ लिंगपुराण सहस्त्र अकरा ॥ चोवीससहस्त्र अवधारा ॥ वाराहपुराण ॥ ४० ॥
एकशत सहस्त्र येक्यायशी ॥ स्कंदपुराण परियेसीं ॥ सहस्त्र दहा वामन पुराणासी ॥ बोलिजे संख्या ॥ ४१ ॥
कूर्मपुराण सहस्त्र सतरा ॥ मत्स्यपुराण अवधारा ॥ चौदासहस्त्र विचारा ॥ संख्या त्याची ॥ ४२ ॥
द्वादशसहस्त्र ब्रह्मांडपुराण ॥ गरुड एकोणीस सहस्त्र जाण ॥ एवं संख्या परिपूर्ण ॥ बोलिली असे ॥ ४३ ॥
चारलक्ष सोळासहस्त्र ॥ शतेंचारी प्रमाण विचित्र ॥ त्याचें काढोनियां सार । रचिला कल्पतरु हा ॥ ४४ ॥
श्र्लोक:
सर्गश्र्व प्रतिसर्गश्र्व वंशो मन्वंतराणि च ॥ वंशानुचरितं चैव पुराण पंचलक्षणं ॥ १ ॥
टीका ॥
तरी सर्गाचें सांगो लक्षण ॥ जें अव्यक्तीं जाहले बीज निर्माण ॥ पंचभूतांपासुनि जाण ॥ वंशोत्पत्ती ॥ ४६ ॥
मन्वंतरें बोलिजेती ॥ ब्रह्मयापासूनि उत्पत्ती ॥ स्वायंभुवादि सांगती ॥ चौदा मनु ॥ ४७ ॥
आणि सोमसूर्यापासुन ॥ वंश जाहले निर्माण ॥ तें चौथें असे लक्षण ॥ पुराणाचें ॥ ४८ ॥
आणि तीं रायांचीं चरित्रें ॥ जीं ऐकतां महाविचित्रें ॥ पावन करिती श्रवणमात्रें ॥ लोकांलागीं ॥ ४९ ॥
ऐसीं हीं पांच लक्षणें ॥ यावेगळीं उपलक्षणें ॥ आणिकही आहे बोलणें ॥ श्रीभागवतीचें ॥ ५० ॥
नानाअवतारीं प्रतिपाळणा ॥ आणि सर्वजीवां वॄत्तिनिर्माणा ॥ प्रलयकाळीं संहारणा । तिसरा गुण तो ॥ ५१ ॥
आणि मी जीव ऐसा हेतु ॥ हा चौथा गा पदार्थु ॥ परा अपरा न्याय निर्धारितु ॥ तो गुण पांचवा पैं ॥ ५२ ॥
ऐसें पुराण दशलक्षण ॥ याचें संकलित केलें कथन ॥ तुह्नीं घ्यावे जी अवधान ॥ साधुजन हो ॥ ५३ ॥
परिसा सर्वाचें सार ॥ जैसी गुडगभी साखर ॥ कीं पयगभींचें साचार ॥ घॄत जैसें ॥ ५४ ॥
किंवा पुष्पगभींचा आमोदु ॥ मधुमक्षिका रची मधु ॥ कीं पॄथ्वीमथोनियां खेदु ॥ कनक जैसें ॥ ५५ ॥
आतां असो हे वर्णना ॥ आरसा कां पाहिजे कंकणा ॥ ह्नणोनि प्रत्यक्षप्रमाणा ॥ काय करणें ॥ ५६ ॥
जन्मेजय राव भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोहींची सुखसंगती ॥ घडली येक ॥ ॥ ५७ ॥
या दोहींचा संवादु ॥ हरिकथेचा रससिंधु ॥ तो विस्तारीला आमोदु ॥ श्रोतयांसी ॥ ५८ ॥
कल्पतरुचा द्वितीयस्तबक ॥ तो पूर्ण जाहला पूर्वील विवेक ॥ आतां तॄतीयाचा उन्मेख ॥ बोलवील देवो ॥ ५९ ॥
जये कथेचें करितां श्रवण ॥ अघें नासती दारुण ॥ कीं गजयूथावरी पंचानन ॥ उडी जैसी ॥ ६० ॥
सकळसारां माजी सार ॥ श्रीरामाचें जें चरित्र ॥ तें श्रोतीं ऐकावें पवित्र ॥ ह्नणे कॄष्णयाज्ञवल्की ॥ ६१ ॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तॄतीयस्तबक मनोहरु ॥ अष्टादशपुराणविस्तारु ॥ प्रथ्मो॓ऽघ्यायीं सांगीतला ॥ ६२ ॥