श्रीगणेशाय नमः
मुनीसि पुसे राजा भारत ॥ पुढें कैसा जाहला वृत्तांत ॥ तो सांगा जी मूळार्थ ॥ रामकथेचा ॥१॥
मग वैशंपायन बोलिला ॥ राया ऐसी उद्धरली अहिल्या ॥ पुढती विश्वामित्र चालिला ॥ मागें रामसौमित्र ॥२॥
जंव निघाला गाधिनंदन ॥ तंव रामें केला सहज प्रश्न ॥ कीं हें घोरवन व्हावयासे कारण ॥ काय जाहलें ॥३॥
मग ह्नणे विश्वामित्र ॥ देवीं मथिला जै सागर ॥ तेव्हां दैत्या जिंकोनि सुरेश्वर ॥ जाहला यशवंत ॥४॥
ऐसें जाणोनियां दिती ॥ कश्यपासि करी विनंती ॥ कीं दैत्या हारविलें ह्नणोनि खंती ॥ लागली मज ॥५॥
आतां द्यावा जी ऐसा कुमर ॥ जो समरीं जिंकील सुरेश्वर ॥ ॠषि ह्नणे तरी निर्धार ॥ पावसी अबळे ॥६॥
मग दितीसि जाहलें गर्भधारण ॥ परि उत्तरे शिर दक्षिणे चरण ॥ आणि ऊर्ध्व करोनियां वदन ॥ निजेली ते ॥७॥
तें इंद्रा जाणवलें ज्ञान ॥ कीं मज जिंकावया केला प्रयत्न ॥ तरी या गर्भीचें करुं खंडण ॥ ऐसा केला निश्वय ॥८॥
मग योनिरंध्रें धृताकार ॥ गर्भी प्रवेशोनि सुरेश्वर ॥ वज्रें छेदिला भयंकर ॥ गर्भ तीचा ॥९॥
वज्रे भाग केले सात ॥ तंव तें बोभाइलें अपत्य ॥ तेणें जाहली जागृत ॥ दक्षनंदिनी ॥१०॥
तयेनें देखिला सुरेश्वर ॥ शाप द्यावा तंव बोले उत्तर ॥ कीं तुज म्यां केला उपकार ॥ दैत्यमाते ॥११॥
छेदितां बोलिलों मारुत ॥ वज्रघातें केले सात ॥ तरी याचेम नांव वो मारुत ॥ ठेविलें म्यां ॥१२॥
यासि तिहीं लोकीं गमन ॥ वेगें आथिजे जाणों पवन ॥ महाबळिया नंदन ॥ होईल तुझा ॥१३॥
ऐसे केले सप्त सप्त ॥ ह्नणे रुदन न करीं वो व्यर्थ ॥ तेंचे गुणनाम जाहलें मारुत ॥ इंद्रवचनें ॥१४॥
हा होईल देशाधिपती ॥ ऐसी प्रबोधिली दिती ॥ मग तो गेला सुरपती ॥ अमरभुवना ॥१५॥
ह्नणोनि सित्धाश्रमीं हें घोरवन ॥ हें रामायणीं सत्य वचन ॥ कीं इंद्रे करोनि घोराचरण ॥ कापिला गर्भ ॥१६॥
यानंतरें गा अवधारीं ॥ राम पावले मिथिलानगरीं ॥ जेथें जनक असे महाक्षेत्री ॥ विदेही तो ॥१७॥
तेणें जाणोनि विश्वामित्रु ॥ साउमा आला नरेंद्रु ॥ संगें घेऊनियां कुलगुरु ॥ शतानंद ॥१८॥
मग जाहली नमनभेटी ॥ अनुक्रमें यथापद्धती ॥ शतानंद सांगे कीर्ती ॥ विश्वामित्राची ॥१९॥
अगा जनका भूपती ॥ हा विश्वामित्र दुजा गभस्ती ॥ त्रिभुवनीं न माय कीर्ती ॥ या गाधिसुताची ॥२०॥
तंव जनक ह्नणे तयाप्रती ॥ याची कैसी असे जी कीर्ती ॥ मग सांगता जाहला रायाप्रती ॥ शतानंद तो ॥२१॥
त्रिशंकु राजा सूर्यवंशी ॥ तेणें याग मांडिला नैमिषारण्यासी ॥ मग विनवूं लागला पुत्रांसी वसिष्ठाचिया ॥२२॥
ह्नणे एक करा जी हवन ॥ येणेंचि शरीरें पावे स्वर्गभुवन ॥ तंव ते ह्नणती राया अज्ञान ॥ बोलिलें तुवां ॥२३॥
राया हा तुझा विफळ प्रयत्न ॥ कीं सूर्य उगवे पश्विमेसि जाण ॥ तरीच सदेह पावसी भुवन ॥ स्वर्गलोकीं ॥२४॥
मग कोपोनि ह्नणे त्रिशंकु ॥ तुह्मी हा नेणा यागविवेकु ॥ आतां आणीन मी आणिकु ॥ आचार्य पैं ॥ ॥२५॥
तंव ते कोपोनि ह्नणे ॠषिपुत्र ॥ तत्काळ वदले शापउत्तर ॥ तुझें हो कां रे शरीर ॥ चांडाळाचें ॥२६॥
ऐसें बोलतां अळुमाळ ॥ त्रिशंकु जाहला चांडाळ ॥ ह्नणोनि याग राहिला विकळ ॥ तेणेगुणें ॥२७॥
मग तो राव गाधिनंदना ॥ शरण आला त्रिशंकुराणा ॥ सांगितली विवंचना ॥ आपुले मनींची ॥२८॥
तंव ह्नणे हा ॠषि कौशिक ॥ तुज करीन मी निर्दोष ॥ येणेंचि देहें स्वर्गलोक ॥ दावीन तुज ॥२९॥
मग येणें विश्वामित्रें ॥ याग मांडिला बीजमंत्रें ॥ कीं त्रिशंकु जावा शरीरें ॥ येणेंचे स्वर्गी ॥३०॥
असो देतां पूर्णाहुती ॥ तेणे संतोषला गार्हपती ॥ त्रिशंकु नेला मंत्रशक्तीं ॥ स्वर्गभुवना ॥३१॥
तंव धाविन्नले सुरगण ॥ कीं त्रिशंकुसि आहे दूषण ॥ गुरुशापाचे लांछन ॥ अपवित्र जें ॥३२॥
ह्नणोनि लोटिला ऊर्ध्वचरणीं ॥ कीं आरुती नाहीं स्वर्गभुवनी ॥ तूं जाई जाई रे मेदिनीं ॥ त्रिशंकु राया ॥३३॥
ऐसें जाहलिया भूपती ॥ तेणें बोभाइला काकुळती ॥ ह्नणे धांवधांव गा पुण्यकीर्ती ॥ विश्वामित्रा ॥३४॥
तें जाणोनियां कौशिकु ॥ जाणों कोपला त्रिपुरांतकु ॥ मग मंत्रोनियां त्रिशंकु ॥ राहविला अंतराळीं ॥३५॥
तयासि ह्नणे विश्वामित्रु ॥ त्रिशंको राहें अभयंकरु ॥ तुज म्यां केला रे धुरु ॥ दक्षिणदिशेचा ॥३६॥
जंरवरी उत्तरेचा असे धुरु ॥ नक्षत्रें आणि रविचंद्रु ॥ तोंवरी रहावें स्थिरु ॥ त्रिशंको तुवां ॥३७॥
आतां दुसरे करुं देवगणा ॥ पशु मानव मंत्रेकरुन ॥ आणि नक्षत्रें निर्माण ॥ करुं सृष्टी दूसरी ॥३८॥
ऐसें बोलोनियां वचन ॥ ह्नणोनि संकल्पा घेतलें जीवन ॥ तें जाणोनियां देवगण ॥ आले समस्त ॥३९॥
देव ह्नणती गा गाधिसुता ॥ या न करावें विपरिता ॥ त्रिशंकुसि आह्मीच आतां ॥ नेतों स्वर्गभुवनी ॥४०॥
मग तो वाहेनि विमानी ॥ त्रिशंकु नेला देवगणीं ॥ ऐसी ख्याती त्रिभुवनीं ॥ विश्वामित्राची ॥४१॥
आणिक ऐका दुजी ख्याती ॥ शतानंद सांगे जनकाप्रती ॥ अंबरीष रावो पुण्यकीर्ती ॥ सूर्यवंशी जो ॥४२॥
तेणें प्रार्थिला वसिष्ठसुत मुनी ॥ कीं पुत्र नाहीं आपुले भुवनीं ॥ तरी पुत्र होतील कवणेगुणी ॥ सांगा मज ॥४३॥
मग बोले वसिष्ठसुत ॥ राया ऐक गा गुप्तार्थ ॥ नरयाग करिसी तरी सत्य ॥ होतील पुत्र ॥४४॥
ऐसी ऐकोनि कृतार्थना ॥ राव ह्नणे गा पुरोहिता ॥ सहस्त्र गाई सालंकृता ॥ देवोनि आणी नरासी ॥४५॥
मग त्याचिया वचनावरी ॥ पृथ्वी धांडोळिली हेरी ॥ तंव कैकयदेशीं दुराचारी ॥ भेटला एक ॥ ॥४६॥
त्याचे नांव अजीगर्त ॥ तो वेदविद परि दैवहत ॥ तया ब्राह्मणा भेटला दूत ॥ अंबरीषाचा ॥४७॥
दूर्ती जाणविला वृत्तांत ॥ सहस्त्रगाईचा मिळेल अर्थ ॥ तरी दे गा पुत्र विकत ॥ यागहवनासी ॥४८॥
तो ह्नणे आह्मां पुत्र तिन्ही ॥ परि हें पुसावे ब्राह्मणीलागुनी ॥ तिचे आलिया अंतःकरणी ॥ देवों एखादा ॥४९॥
मग तो आला अजीगर्त ॥ स्त्रियेसि सांगे वृत्तात ॥ ह्नणे एक विकोनियां सुत ॥ घेऊं धेनु सहस्त्र ॥५०॥
तेणें लेइसील लेणी लुगडी जिव्हे चाखले अन्नाची गोडी ॥ एक पुत्र तरी महागाढीं ॥ पाडिला मानूं ॥५१॥
असो वांचलों जरी दंपत्ये ॥ तरी उदंड होतील अपत्यें ॥ आतां एक विकोनियां बहुतें ॥ वांचो आपण ॥५२॥
तंव तयाप्रती ह्नणे कांता ॥ लहान पुत्र मी नेदीं सर्वथा ॥ वडील तो आवडे अजीगर्ता ॥ ह्नणोनि दीधला मध्यस्थ ॥५३॥
त्या पुत्रांचे नाम शुनःशेष ॥ तो देणेसि केला संकल्प ॥ मग बोलावों गेला कुंवरप ॥ राजजनांसी ॥५४॥
रायें द्विजासि दीधलें वित्त ॥ सहस्त्रगाईचें संकल्पित ॥ मग पुत्रासि घेवोनि दूत ॥ निघाले रायाचे ॥५५॥
ऐसा नष्ट तो अजीगर्त ॥ महापापिया सारस्वत ॥ पुत्र विकोनियां अर्थ ॥ जोडिला तेणें ॥५६॥
कीं सर्पे मुखीं घालिजे भेका ॥ भेक भक्षीतसे मक्षिका ॥ तैसा तो विकोनि बाळका ॥ वाचों पाहे ॥५७॥
देह तरी हें काळाचें खाजें ॥ परि उन्मतें ह्नणिजे माझें ॥ मांस भक्षितां काय गजें ॥ होइजे केसरीं ॥५८॥
सांडोनिया सत्वधीर ॥ कवण जाहला असे अमर ॥ रायारकाचा जाहला संव्हार ॥ पृथ्वीवरी ॥५९॥
राया मग तो देहावसानीं ॥ धरोनि नेला यमगणीं ॥ नानाप्रकारीं केली जाचणी ॥ न सांगवे ते ॥६०॥
असो राजदूर्ती शुनःशेपपुत्र ॥ अयोध्ये आणिला वेगवत्तर ॥ रायें पाहिला द्विजकुमर ॥ विक्रित तो ॥६१॥
अंगीं चंदनाची देवोनि उंटी ॥ पुष्पमाळा घातल्या कंठीं ॥ स्तंभासि बांधिला वेदपाठीं ॥ ॠषिजनीं तो ॥६२॥
कुमरें तें जाणोनि मरण ॥ विश्वामित्राचें केलें स्मरण ॥ ह्नणे धांव पाव गा मी दीन ॥ राखीं मज ॥६३॥
तें ऐकोनियां कौशिक ॥ यागा आला पुण्यश्लोक ॥ तंव बांधिला देखे बाळक ॥ यज्ञस्तंभी ॥६४॥
कंठीं घालावी शस्त्रपाती ॥ तों विश्वामित्रें पाचारिले दिस्पती ॥ ह्नणे हा द्यावा जी आहुती ॥ तुमची मज ॥६५॥
तुह्मीं ह्नणावें जाहलों तृप्त ॥ रायासि द्यावें नरयागसुकृत ॥ जरी न ह्नणाल तरी समस्त ॥ शापीन आतां ॥६६॥
धाकें ह्नणती सुरवर ॥ तृप्त जाहलों आह्मी समग्र ॥ सुकृत जोडलें रायासि पवित्र ॥ नरयागाचें ॥६७॥
आतां याचें सोडी गा कंठसूत्र ॥ तुज सी होतील दोन पुत्र ॥ ऐसें ह्नणोनि सुर समग्र ॥ गेले स्वस्थाना ॥६८॥
राया ऐसा करोनिया कोप ॥ जेणें सोडविला शुनःशेप ॥ तो हा पुरुष दिव्यप्रताप ॥ विश्वामित्र ॥६९॥
आतां तिसरी ऐकावी भूपती ॥ या कौशिकमुनीची ख्याती ॥ रंभा धाडिता जाला सुरपती ॥ छळावयासी ॥७०॥
तें जाणवलें विश्वामित्रा ॥ येणें शापिली ते सुंदरा ॥ कीं दहासहस्त्र संवत्सरां ॥ होसील शिळा ॥७१॥
जै या वाटेने येती ॠषिकुळ ॥ त्यांचे लागती चरणमळ ॥ तै तूं उद्धरसील कुटिळ ॥ रंभे जाण ॥७२॥
ऐसी ॠषिवाणीं ते जाहली शिळा ॥ तेणें तप सरलें अळुमाळा ॥ मागुती करावया भांडवला ॥ बैसला तपीं ॥७३॥
लोहांचे करोनि गोखुर ॥ शिरीं रोंवोनि त्यजिला आहार ॥ ऐसा होता एक संवत्सर ॥ ऊर्ध्वचरणीं ॥७४॥
मग उष्ण शीत धूस्त्रपान ॥ पंचाग्नि आणि मेघसाधन ॥ निराहार मुखीं मौन ॥ वर्ष्रे सहस्त्र ॥७५॥
पुढती बैसला पद्मासनीं ॥ टिळा लावोनि निर्वार्णी ॥ पवन कोंडी हा महामुनी ॥ सांडावया देह ॥७६॥
ऐसा करितां तपश्रम ॥ तेणें मस्तकी निघाला धूम ॥ यास्तव थरारिला काळकाम ॥ आणि देव समस्त ॥७७॥
डोलो लागलें गिरिवर ॥ आंदोळले सप्त सागर ॥ पृथ्वी सोडों पाहती कुंजर ॥ पाताळासी ॥७८॥
तापें तापलें त्रिभुवन ॥ जाणो सृष्टीचें जाहले अवसान ॥ ह्नणोनि शरण आले सुरगण ॥ कौशिकासी ॥ ॥७९॥
मग इंद्रादिक समस्त ॥ नानास्तुतीनी स्तवित ॥ ह्नणती तप करावें शांत ॥ कौशिका त्वां ॥८०॥
तंव बोलिला हटें सुभट ॥ जरी ब्रह्मॠषी ऐसें बोलेल वसिष्ठ ॥ तरीच तपासि करीन वोहट ॥ सत्य जाणा ॥८१॥
ह्नणोनि समस्त सुरगणी ॥ वसिष्ठ विनविला वचनीं ॥ कीं ब्रह्मॠषी ह्नणावें आजिपासोनी ॥ विश्वामित्रासी ॥८२॥
याकारणें ह्नणे वसिष्ठ ॥ कौशिका तूं ब्रह्मॠषी श्रेष्ठ ॥ मग तपाचा केला वोहट ॥ गाधिनंदनें ॥८३॥
ऐसा असे हा वदमूर्ती ॥ शतानंद सांगे जनकाप्रती ॥ यासी देखता जाहली निर्गती ॥ महापापांची ॥८४॥
मग तया गाधिसुता ॥ जनकें नमिला त्वरितां ॥ गौरवें पूजिला विशेषता ॥ नानापरी ॥८५॥
राव ह्नणे गा कौशिका ॥ आजि मी मुकलों सर्वपातकां ॥ धन्य नगर हें पुण्यपुरुषा ॥ आलेति येथें ॥८६॥
आतां सांगा मजलागुनी ॥ हे पुत्र कोणाचे दोनी ॥ यांसी घडिता काय भवानी ॥ निश्वळ होती ॥८७॥
धन्य धन्य ते जननी ॥ ऐसी रत्ने प्रसवली दोन्ही ॥ धन्य पिता ज्याचे भुवनीं ॥ ऐसे पुत्र जन्मले ॥८८॥
दिसती अत्यंत सुलक्षण ॥ जाणों कंदर्पाचे निजभुवन ॥ ऐसियां दीजे कन्यारत्न ॥ तरीच धन्य पूर्वज ॥ ८९॥
परी दुष्ट केला असे पण ॥ कीं त्र्यंबकाचा वाहिल जो गुण ॥ त्यासीच देणें कन्यारत्न ॥ सीताकुमरी ॥९०॥
जरी वजोनि धनुष्यपण ॥ ऐसाच पूजावा रघुनंदन ॥ तरी हें करितां राजेजन ॥ हांसतील मज ॥९१॥
परि हे कवणाचे कवण ॥ हें मज करावेम संपूर्ण ज्ञान ॥ आणि येथें यावया कारण ॥ काय जाहलें ॥९२॥
मग ह्नणे गाधिसुत ॥ सूर्यवंशी राजा दशरथ ॥ त्याचा पुत्र हा रघुनाथ ॥ आणि दुजा लक्ष्मण ॥९३॥
तंव उभा राहोनि विदेही ॥ राम आलंगिला दोहीं बाहीं ॥ पूजा करोनियां देहीं ॥ केलें गंधार्पण ॥९४॥
मग ह्नणे विश्वामित्रमुनी ॥ तुझें धनुष्य पहावया नयनीं ॥ उत्कंठित होवोनि अंतःकर्णी ॥ आला रामचंद्र ॥९५॥
जनक वृत्तांत सांगे वचनीं ॥ कीं दक्ष वधिला वीरभद्रें यज्ञी ॥ तेव्हां वाहिलें होतेपिनाकपाणीं ॥ त्र्यंबक हें ॥९६॥
निमी आमुचा पूर्वज जाणा ॥ तेणें आराधिला शिवराणा ॥ त्याचे जाणोनि सेवादाना ॥ शिवे त्र्यंबक दीधलें ॥९७॥
यांसि वोढो न शकती रावो ॥ थोरथोर महाबाहो ॥ येका वाचोनि महादेवो ॥ येरां अगम्य हें ॥९८॥
ह्नणोनि पडिलेंसे मादुसे ॥ पूजा होतसे बारामासें ॥ नवशतें जुंपोनि महिषे ॥ आणिजे सभेतें ॥९९॥
ऐसें कार्मुक महाघोर ॥ देवां मानवां अगोचर ॥ परि नवल जाहलें चरित्र ॥ तेम सांगतों ऐका ॥१००॥
कोणे एके अवसरी ॥ पूजेसि आणिलें मंदिरीं ॥ तंव वारु करोनि सीता कुमरी ॥ निघाली हिंडावया ॥१॥
ऐसा देखोनि चमत्कार ॥ म्यां अंतरी केला विचार ॥ कीम जो हेम वाहील धनुष्य नर ॥ तोचि वरील सीतेसी ॥२॥
धनुष्याचा करोनि वारु ॥ सीता खेळे जैसा दर्भदोरु ॥ हा जगचावट परि विचारु ॥ नव्हे वाल्मिकाचा ॥३॥
असो ऐसें तें धनु दुस्तर ॥ हे तरी लहान दिसती कुमर ॥ राजे गेले थोरथोर ॥ पाहोनि यासी ॥४॥
तंव राम ह्नणे जी कौशिका ॥ ऐसिया धनुष्याच्या अवलोका ॥ तरी विनवोनि राया जनका ॥ आणावें सभेसी ॥५॥
जनकें ऐकोनि सुलक्षण ॥ रामरायाचें उत्कंठा वचन ॥ मग पाठवोनि प्रधान ॥ आणिलें धनुष्य ॥६॥
देखोनि धनुष्याची थोरी ॥ अभिमान सांडिला येर वीरीं ॥ ह्नणती हें वंदोनियां शिरीं ॥ चला वहिले ॥७॥
अहो हें त्र्यंबकाचे धनु ॥ याचा कोण चढवील गुणु ॥ येक रुद्र कीं महाविष्णु ॥ वांचोनियां ॥८॥
ऐसें बोलोनि समस्त ॥ राजे जाहले तटस्थ ॥ जैसें चित्रीचें दिसे लिखित ॥ चातुरंग सैन्य ॥९॥
गवाक्षद्वारें राजकांता ॥ आणि पाहात असे सीता ॥ ह्नणे झणी हा होय जनिता ॥ मन्मथाचा ॥११०॥
ऐसी कैंची दैवरेखा ॥ म्यां वरिजे या रघुटिळका ॥ ऐसें काय केलें त्वां त्र्यंबका ॥ धनुष्य ठेवोनी ॥११॥
पण नव्हे हा माझा शत्रु ॥ जैसा निधीसी फणिवरु ॥ ऐसा सीता करी विचारु ॥ मनामाजी ॥१२॥
अहो माये त्र्यंबके गौरी ॥ आणि कृपाळुवा तूं त्रिपुरारी ॥ धनुष्य वाहतां रामकरीं ॥ रिघावें तुम्ही ॥१३॥
ऐसी करीतसे कल्पना ॥ जैसी मयूरी इच्छी घना ॥ तंव कौशिक ह्नणे रघुनंदना ॥ पहावें धनुष्य ॥१४॥
मग उठिला तो काकपक्ष ॥ जो गाधिनंदनाचा शिष्य ॥ पृथ्वी उचली त्यासी मंचक ॥ काय भारी ॥१५॥
जया रामाचिये थोरवटा ॥ उपमेसि नाहीं सपुष्टा ॥ पदत्रयें येकें महीमठा ॥ त्रैलोक्य हें ॥१६॥
तेथें कायसें हें काबिट ॥ जीर्णकाळाचें बहु जुनाट ॥ कथा वाढवूं कां पोंचट ॥ जन्मेजया ॥ ॥१७॥
मग नमुनियां श्रीगुरु ॥ सांउमा चालिला रामचंद्रु ॥ धनुष्या लावोनि वामकरु ॥ उभारिलें तें ॥ १८॥
मध्यें लावोनियां चरणु ॥ नमस्कारिलें तेम धनु ॥ मग त्याचा वाहिला गुणु ॥ दक्षिणहस्तें ॥१९॥
नाभीं धरोनि समपाडीं ॥ वोढी भरोनिया कानाडी ॥ तंव भंगले आडमोडी ॥ त्र्यंबकचाप ॥१२०॥
तेणें जाहली महा गर्जना ॥ नाद न समाये त्रिभुवना ॥ तें श्रुत जाहलें नंदना ॥ जमदग्नीचिया ॥२१॥
काय खचला महामेरु ॥ किंवा गर्जला दिशा कुंजरु ॥ कां धडाडिला दिनकरु ॥ प्रळ्यकाळींचा ॥२२॥
ह्नणे केली पृथ्वी निक्षेत्री ॥ मागुती उपजला कोण क्षेत्री ॥ ज्याचेनि बळें धरित्री ॥ थरारिली हे ॥२३॥
ऐसें बोलोनि भृगुनंदन ॥ साउमा निघाला तेथुन ॥ मग भेटला रघुनंदन ॥ तें पुढें ऐकें भारता ॥२४॥
इकडे संतोषोनि जनक ॥ हदयीं आलिंगिला रघुकुळाटिळक ॥ पूजा वाहोनि केला मधुपर्क ॥ रामलक्ष्मणांसी ॥२५॥
तंव वाद्यें लागलीं गगनीं ॥ आनंदला वज्रपाणी ॥ वर्षाव केला दिव्य सुमनीं ॥ मिथुळेवरी ॥२६॥
नलिनी उगवला देखोनि सविता ॥ कां वसंत देखोनि पुष्पलता ॥ तैसी आनंदली दुहिता ॥ विदेहाची ॥२७॥
हस्तिणी पेलित जनकबाळा ॥ हातीं घेवोनि सुमनमाळा ॥ उल्हासें घातली श्रीरामगळां ॥ सर्वभूपाळा देखतां ॥२८॥
तंव लागलीं निशाणभेरी ॥ रायें श्रृंगारिली नगरी ॥ बोलावों पाठविलें चौफेरी ॥ मांडलिकांसी ॥२९॥
मग शतानंद नामें कुळगुरु ॥ तेणें आणविला जनकसहोदरु ॥ आणि दशरथा आणावया हेरु ॥ पाठविले अयोध्येसी ॥१३०॥
कुंकुमें रेखिलें पत्र धवल ॥ दशरथासि धाडिलें मूळ ॥ कीं कुटूंबेंसी उतावेळ ॥ यावें लग्ना ॥३१॥
परि रावणा देखतां पणु ॥ रामें वाहिलें त्र्यंबकधनु ॥ हा बाळकांडी नाहीं प्रश्रु ॥ वाल्मिकाचा ॥ ॥३२॥
जरी मांडिता सीतासैवंर ॥ तरी दशरथा धाडिता मूळपत्र ॥ ॠषी आणिले थोर थोर ॥ यागकार्यासी सत्य हें ॥ ॥३३॥
तरी जाणोनि शापशिळे ॥ आणि जिंकावया जनकबाळे ॥ ह्नाणोनि राम आणिला मिथुळे ॥ गाधितनयेंक ॥ ॥३४॥
आतां असो हे संजोगणी ॥ जिव्हा न पुरे रामवर्णनीं ॥ म्यां कथिली असे वाणी ॥ वाल्मिकाची ॥३५॥
तंव तिघी स्त्रियांसहित ॥ मिथुळे आला राव दशरथ ॥ समागमें दोनी सुत ॥ शत्रुघ्रभरत ॥३६॥
तेथें पृथ्वीचे नृपवर ॥ मिथुळे आले समग्र ॥ शाण्णवकुळींचे थोर थोर ॥ वऱहाडिकेसी ॥३७॥
साडे गौड मलबार ॥ गांधार आणि वेगाळ ॥ कलिंग कांभोज कुंतल ॥ आणि हिमाचळींचे ॥३८॥
अंग वंग चीन भाट ॥ माळवि कन्होज मराठ ॥ तैलंगण गंगातट ॥ आणि विकट पैं ॥३९॥
येका वांचोनि लंकापती ॥ येर आले देव नाग भूपती ॥ पहावया यशकीर्ती ॥ रामचंद्राची ॥१४०॥
देवां मानवांचे सैवंरीं ॥ तेथें राक्षस नाहीं निर्धारी ॥ अग्नि उदकाची मैत्री ॥ नपडे जैसी ॥४१॥
आतां असो हें विपरित ॥ सकळांसि मूळ संस्कृत ॥ हें बालकांडी नाहीं भाषित ॥ वाल्मिकीचें ॥४२॥
मग जनका आणि दशरथा ॥ भेटी जाहली उभयतां ॥ सन्मानोनि राया समस्तां ॥ दीधले जानिवसे ॥४३॥
तंव पावले ॠषेश्वर ॥ महाविद्यांचे पुरंदर ॥ वसिष्ठादि अठ्यायशी सहस्त्र ॥ आले मिथुळे ॥४४॥
कश्यप आणि कात्यायन ॥ वसिष्ठमुनी महा प्रवीण ॥ वामदेवो तपसंपन्न ॥ मार्केडेयादि ॥४५॥
ऐसे ॠषि आले समस्त ॥ जे विद्येचे पूर्णभरित ॥ तंव सैन्यभार आले तेथ ॥ दशरथाचे ॥४६॥
लक्ष्मण आणि रघुनाथा ॥ शत्रुघ्र आणि भरता ॥ कैकेयी सुमित्रा कौसल्या माता ॥ भेटली सकळ ॥४७॥
तंव तो दशरथनृपनाथ ॥ तेणें नमिला गाधिसुत ॥ ह्नणे तुमचे प्रसादे मनोरथ ॥ जाहले पूर्ण ॥४८॥
जनकासारिखा सोइरा ॥ मज जोडला गा द्विजवरा ॥ विद्या दीधली तुह्मीं कुमरां ॥ रामलक्ष्मणांसी ॥४९॥
ऐसें बोले जो दशरथ ॥ तंव बोलिला गाधिसुत ॥ राया तूं अजुनि भ्रमित ॥ नेणसी राम हा ॥१५०॥
हा पूर्ण अवतार हरी ॥ राक्षसवधार्थ जाहला अवतारी ॥ पदस्पर्शे शिळा उद्धरी ॥ अहिल्या ते ॥५१॥
ऐसा करुनि एकांत ॥ सभे बैसला दशरथ ॥ रामलग्नाचा धरुनि अर्थ ॥ पुसे वसिष्ठासी ॥५२॥
मग पूर्वाफल्गुनी नक्षत्रीं ॥ लग्न आरंभिले द्विजवरीं ॥ दोहाचि वंश ते अवसरीं ॥ पुसते जाहले ॥५३॥
सूर्यवंशाचा आचारु ॥ वसिष्ठ सांगे कुळगुरु ॥ तो ऐकावा आतां पवित्रु ॥ भारता तुवां ॥५४॥
प्रथमारंभी अव्यक्त ॥ महामाया संकल्पित ॥ त्यांचे बोलिजे अपत्य ॥ ब्रह्मदेवो ॥५५॥
हें वाल्मिकाचें भाषित ॥ कवणें करावें विपरित ॥ मग त्या ब्रह्यासि जाहले सत्य ॥ मरीच्यादिक ॥५६॥
मरीचीपासाद कश्यप सम्यक ॥ त्या कश्यपाचा पुत्र अर्क ॥ अर्काचा पुण्यश्लोक ॥ वैवस्वतमनु ॥५७॥
मनूपासाव प्रजापती ॥ त्याची इक्ष्वाकुसंतती ॥ तो स्थापिला भूपती ॥ अयोध्येसी ॥५८॥
त्या इक्ष्वाकुचा कुक्षिरावो ॥ श्रीमानू जाहला महाबाहो ॥ त्याचा विकुक्षी वीररावो ॥ पुण्यशीळ ॥ ॥५९॥
त्या विकुक्षीचा बाण ॥ बाणाचा पुत्र अनरण्य ॥ त्याचा पृथु त्याचा नंदन ॥ त्रिशंकु जो ॥१६०॥
त्रिशंकुचा धुंधुमारी ॥ त्याचा यौवनाश्व क्षेत्री ॥ त्याचा माघाता अवधारी ॥ पृथ्वीपती ॥१६१॥
मांघात्याचा सुसंधि देवो ॥ त्यासी दोनी जाहले महाबाहो ॥ ध्रुवसंधि वीररावो ॥ आणि दुसरा प्रसेनजित ॥६२॥
ध्रुवसंधीचा पुत्र भरत ॥ त्या भरताचा असित ॥ त्यासी हेमगिरिसि जाहला मृत्यु ॥ खेळता पारधी ॥६३॥
त्यासी दोनी असती सुंदरा ॥ परि पुत्र नाहीं त्यांचे उदरा ॥ तंव भेटी जाहली ॠषेश्वरा ॥ च्यवनभार्गवासी ॥६४॥
ॠषिप्रति विनविती सुंदरा ॥ कीं मृत्यु जाहला प्राणेश्वरा ॥ आतां पुत्राविण पितरां ॥ नमिळे तोय ॥६५॥
तरी द्यावा पुत्र प्रसाद ॥ जेणें पति पावे स्वर्गी आनंद ॥ मग तो बोलिला वरद ॥ च्यवनॠषी ॥६६॥
तुह्मा दोघींपासाव पुत्र ॥ पुरुषेंविण होईल निर्धार ॥ तोचि त्यांसी जाहला सगर ॥ महाराजा ॥६७॥
त्या सगराचा असमंजस ॥ त्याचा अंशुमान राजस ॥ त्या अंशुमानाचा परिस ॥ दिलीप जो ॥६८॥
दिलीपाचा भगीरथ ॥ भगीरथाचा काकुत्स्थ ॥ त्या काकुत्स्थाचा विख्यात ॥ रघुचक्रवर्ती ॥६९॥
त्या रघुचा पुत्र प्रवृद्ध ॥ प्रवृद्धाचा पुत्र पुरुषाद ॥ तोचि बोलिजे कल्मषपाद ॥ महाराजा ॥१७०॥
कल्मषपादांचा शंखण ॥ शंखणाचा सुदर्शन ॥ सुदर्शनाचा अग्निवर्ण ॥ त्याचा शीघ्रगाख्य ॥७१॥
शीघ्रगाचा मरु सुत ॥ मरुचा प्रशुश्रुक विख्यात ॥ त्याचा पुत्र अरिदर्पजित ॥ अंबरीष तो ॥७२॥
अंबरिषाचे तीन सुत ॥ भट नहुष महा विख्यात ॥ आणि नाभाग नामें सत्य ॥ तिसता पुत्र ॥७३॥
त्या नाभागाचा पुत्र अज ॥ अजाचा दशरथ आत्मज ॥ दशरथाचा रामराज ॥ विख्यातकीर्ती ॥७४॥
आणि भरत लक्ष्मण ॥ चौथा पुत्र शत्रुघ्र ॥ हा सूर्यवंश कथिला संपूर्ण ॥ वसिष्ठदेवें ॥७५॥
तो ऐकोनि वंशविचार ॥ जनक मानवला असे थोर ॥ ह्नणे माझें भाग्य अपार ॥ राम जामात जोडला ॥७६॥
मग जनकरायाचा वंश ॥ सांगता जाहला शतानंद ॥ देवता पूजोनियां कलश ॥ बोलता जाहला ॥७७॥
प्रजापतीपासाव भूरिष ॥ त्याचा श्वेतकर्मा पुण्यश्लोक ॥ त्यापासाव जाहला बाळक ॥ नेमिरावो ॥७८॥
नेमीचा मिथि सम्यक ॥ मिथीचा पुत्र प्रथमजनक ॥ त्याचा उदावसु पुत्रक ॥ त्याचा नंदिवर्धन तो ॥७९॥
त्याचा पुत्र नामें सुकेतु ॥ सुकेताचा देवरात ॥ देवराताचा बृहद्रथ ॥ महावीर त्यापुढें ॥१८०॥
महावीराचा पुत्र सुधृती ॥ त्याचा धृष्टकेतु पुण्यकीर्ती ॥ पुढे हर्यश्व संतती ॥ मरु पुत्र तयाचा ॥८१॥
मरुचा प्रतींधक सुत ॥ त्याचा जाणिते कीतिरथ ॥ त्यांचा देवमीढ सत्य ॥ देवमीढाचा विबुध पैं ॥८२॥
विबुधापासाव महीध्रक ॥ पुढे कीर्तीरात त्याचा महारोमा देख ॥ महारोमाचा स्वर्णरोमा सम्यक ॥ रहस्वरोमा तत्सुत ॥८३॥
त्याचे दोन असती कुमर ॥ महाशीळ उदार धीर ॥ विदेहीजनक आणि पर ॥ कुशध्वज दूसरा ॥८४॥
ऐसी जनकाची वंशकीर्ती ॥ सांगे संतान वेदमूर्ती ॥ ती ऐकोनि दशरथ नृपती ॥ संतोषला मनांत ॥ ॥८५॥
मग श्रृंगारोनि रघुपती ॥ मंडपा आणिला पुरोहिती ॥ आणि श्रृंगारुनि सीतासती ॥ आणिली गौरीहरासी ॥८६॥
पूर्वाफल्गुनिका नक्षत्रीं ॥ रवि अस्ताचळ अवसरीं ॥ पठ्ठ धरोनियां ॠषेश्वरीं ॥ लाविलें लग्न ॥८७॥
गगनीं लागलें निशाण ॥ आनंदे नाचती देवगण ॥ पुष्पें वर्षले सुरगण ॥ वधुवरांवरी ॥८८॥
परि तें नक्षत्र पूर्वाफलगुनी ॥ सीतेने शापिलें वचनीं ॥ कीं दुःखी जाहली पुरुषपत्नी ॥ ह्नणोनियां ॥८९॥
अद्यापवरी तें पूर्वाफलगुनी ॥ नक्षत्र न घेती विवाहालागुनी ॥ सीतेनें शापिले ह्नणवोनी ॥ जन्मेजया ॥१९०॥
असो मग बहुलें बाशिगें उटणें ॥ चारी दिवस वाधावणें ॥ दोघां करिती अक्षयवाणें ॥ सुवासिनी समस्त ॥९१॥
वरात आणि आठनाहणें ॥ कनक वस्त्रें नाना भूषणें ॥ गज अश्व दासी आंदणें ॥ दीघलीं असंख्य ॥९२॥
मांडव्या नामें दुसरी ॥ जनकरायाची होती कुमरी ॥ ते दीधली सुंदरी ॥ भरतासी पैं ॥९३॥
उन्मिळा नामें जे तीसरी ॥ कुशर्ध्वजाची असे कुमरी ॥ ते दीधली नोवरी ॥ लक्ष्मणासी ॥९४॥
कुशध्वजाची दुजी कुमरी ॥ श्रुतकीर्ती नामें नोवरी ॥ ते दीधली अवधारीं ॥ शत्रुघ्रासी ॥९५॥
ऐसीं सुमुहूर्ते सुदिनीं ॥ लग्नें लाविली मुनिजनीं ॥ विवाह जाहला ऐसी वाणी ॥ वाल्मिकाची ॥९६॥
मग अहेरें साळंकृत ॥ रायें बोळविले समस्त ॥ अयोध्येसी निघाली वरात ॥ चौघां बंधुवरांसी ॥९७॥
वधुवरें शोभलीं कैसीं ॥ जाणों लावण्य गुणराशी ॥ वाद्यें लागली आकाशीं ॥ इंद्रादिकांचीं ॥९८॥
वोहरें निघाली राजबिदी ॥ द्विज पढती वेदशब्दीं ॥ पंवाडे वानिती बंदी ॥ सूर्यवंशाचे ॥९९॥
चहूंदिशां चारी पुत्ररथ ॥ मध्यें शोभे राव दशरथ ॥ जैसा चहुं वेदी मूर्तीमंत ॥ ब्रह्मा शोभे ॥२००॥
चहुं रथी चारी शक्ती ॥ त्यांमाजी सीता वेदश्रुती ॥ आत्माराम तो दाशरथी ॥ सगुणरुपें ॥१॥
कीं ते चारी पुरुषांर्थ ॥ दशरथा साधिले मूर्तिमंत ॥ अनंतजन्मीचें पुण्य अर्जित ॥ फळलें सत्य ॥२॥
कीं दशरथ हा क्षीरसागर ॥ हदयीं धरिला शारंगधर ॥ चक्र शंख हे अवतार ॥ भरत शत्रुघ्र ॥ ॥३॥
लक्ष्मण शेषरुप सत्य ॥ सीता लक्ष्मी मूर्तिमंत ॥ तें क्षीरसागरीचें निश्वित ॥ शक्तित्रय ॥४॥
असो ऐसी निघाली वरात ॥ श्रीगिरिछत्रें शोभत ॥ पुढें चालती मदोन्मत ॥ भद्रंजाती ॥५॥
तेथेइ वाजंत्रांच्या गजरीं ॥ थरारिली मिथुळा नगरी ॥ राव चालिले सैन्यभारीं ॥ बोळावीत ॥६॥
मागें चालती त्रय माता ॥ आणि करवली ते शांता ॥ दृष्टीं देखोनि रघुनाथा ॥ चाले विश्व ॥७॥
ऐसे आले नगरप्रदेशीं ॥ सवें जनक परिवारेंसी ॥ आणि वसिष्ठादिक ॠषि ॥ आले सर्व ॥८॥
मग तो गाधिकुमरु ॥ रामें पूजिला परमगुरु ॥ यावरी गेला विश्वामित्रु ॥ हिमाचळासी ॥ ॥९॥
जनक ह्नणे रामाप्रती ॥ माझी कन्या हे सीतासती ॥ पविव्रता महाख्याती ॥ सत्य असे जी ॥२१०॥
जैसीं शिव आणि शक्ती ॥ कीं आत्मा आणि प्रकृती ॥ तैसी सीता रघुपती ॥ सत्य जाणा ॥११॥
मग निरवूनि दशरथा ॥ कौशल्ये आदि समस्तां ॥ नमस्कारोनि मागुता ॥ परतला विदेह ॥१२॥
इकडे अयोध्येचिया पंथा ॥ मार्गी चालतां दशरथा ॥ चमत्कार जाहला गा भारता ॥ तो ऐकावा जी ॥१३॥
भृगुवंशी महावीर ॥ परशुराम सहावा अवतार ॥ तेणें ऐकिला टणत्कार ॥ त्र्यंबकधनुष्याचा ॥१४॥
ह्नणे काय जाहला अवतार ॥ येवढा कैंचा महावीर ॥ जो त्र्यंबकासी भरी शर ॥ कानाडी पूर्ण ॥१५॥
मनीं विचारी भृगुपती ॥ ह्नणे येवढी जयाची शक्ती ॥ तयाची पाहों अवतारमूर्ती ॥ आतांचि पैं ॥१६॥
आतां माझी हे सर्वशक्ती ॥ त्यासी देवोनि घ्यावी शांती ॥ ह्नणोनि पाहों आला रामाप्रती ॥ परशुराम ॥१७॥
तंव देखिला रघुवीर ॥ ह्नणे काय हा जाहला अवतार ॥ येणें ऐकविला टणत्कार ॥ धनुष्याचा कीं ॥१८॥
इकडे त्या दशरथा भूपती ॥ सर्पे खंडिली दिसे वसुमंती ॥ वायस गेले वामहस्तीं ॥ करकरीत ॥१९॥
उजवें मोहरें हरिण ॥ पक्षी बोभाती अवलक्षण ॥ तेणें चिंतावलें मन ॥ दशरथाचें ॥२२०॥
ह्नणोनि वसिष्ठाप्रती वचन ॥ दशरथ पुसे आपण ॥ स्वामी होताति अपशकुन ॥ कवणे गुणें ॥२१॥
मग बोले वसिष्ठमुनी ॥ काहीं विघ्र उद्भवेल वनीं ॥ तुह्मीं थांबा मी पाहोनी ॥ सांगतों सर्व ॥२२॥
तंव देखिला तेजःपुंज ॥ जाणों दुजा कश्यपात्मज ॥ वसिष्ठ पाहे तंव द्विजराज ॥ पशुराम ॥२३॥
हातीं फरश दिव्य धनुष्य ॥ महाजटिल तापस ॥ ऐसा देखिला परमहंस ॥ भार्गव तो ॥२४॥
मग वसिष्ठ करी स्तुती ॥ जयजयाजी भृगुपती ॥ दैत्य निर्दाळिले इंद्रियजितीं ॥ तुवांचि रामा ॥२५॥
जयजय हो फरशधरा ॥ पितृभक्ता महा उदारा ॥ शरणागतां करुणाकरा ॥ भार्गवा तूं ॥२६॥
तंव ह्नणे भृगुपती ॥ हा कोण गा वेदमूर्ती ॥ येरु ह्नणे हा दाशरथी ॥ रामचंद्र ॥२७॥
येणें सीता नामें सती ॥ पर्णिली हेलामात्रें उचितीं ॥ त्र्यंबक भंगोनियां ख्याती ॥ केली देवा ॥२८॥
मग तो ह्नणे भृगुपती ॥ हें म्यां ऐकिलें लोकवार्ती ॥ ह्नणोनि पहावया रघुपती ॥ आलों असें मी ॥२९॥
तरीं हें माझें वैष्णव धनुष्य ॥ ब्रह्यानें घडिलें सम्यक ॥ त्रिपुरवधावयासी देख ॥ दीधलें महादेवा ॥२३०॥
तें धनुष्य पशुपती ॥ वाहिंले होतें आपुलें हातीं ॥ तें मज दीधलें भक्तीं ॥ महदेवें ॥३१॥
त्या धनुष्याचेनि बळें ॥ सहस्त्रंभुजासी मांडिलें समफळें ॥ हदय भेदोनि करकमळें ॥ पाडिलीं त्याचीं ॥३२॥
क्षत्री नामें अजिक पुरुष ॥ जो बहुतांचा करी नाश ॥ त्याचा छेदिला म्यां वंश ॥ याचि धनुष्यें ॥३३॥
हें जरी वाहील रामचंद्र ॥ तरी मी देईन निर्धार ॥ आणि द्वंद्वयुद्धाचा मंत्र ॥ सांगेन यासी ॥ ॥३४॥
जरी न वाहे धनुष्यगुण ॥ तरी मी जाऊं नेदीं हाचि पण ॥ मग धनुष्या लावोनि गुण ॥ करीन युद्ध ॥३५॥
भंगोनि त्र्यंबकधनुष्या ॥ कैसा जाईल अयोध्यादेशा ॥ तें श्रुत जाहलें महापुरुषा ॥ रामचंद्रासी ॥३६॥
तें ऐकोनियां दाशरथी ॥ ह्नणे भार्गवा तूं वेदमुर्ती ॥ तुजसी झुंजता यशकीर्ती ॥ न वाढे माझी ॥३७॥
जैसे मज वसिष्ठ त्रिश्वामित्रु ॥ तैसाचि तूं परमगुरु ॥ आतां निरोप देशील तो विचारु ॥ करणें मज ॥३८॥
तंव परशुराम जाहला बोलता ॥ रामा हें न घडे सर्वथा ॥ धनुष्य वाहिल्यावीण आतां ॥ जाऊं नेदीं ॥३९॥
मग कोपोनि सीतापती ॥ वैष्णवधनुष्य घेतलें हातीं ॥ गुण लावोनियां शितीं ॥ चढविला बाण ॥२४०॥
तंव बोले भृगुसुत ॥ रामा तूं गा महासमर्थ ॥ आजि म्यां पाहिला अंत ॥ देवा तुझा ॥४१॥
रामा तूं परम रणधीर ॥ निश्वयें सातवा अवतार ॥ मज हूनियां उदार ॥ तरी देई जीवदान ॥४२॥
मग ह्नणे रघुनाथ ॥ माझा वाण नव्हे व्यर्थ ॥ आतां खंडिन स्वर्गपंथ ॥ भार्गवा तुझा ॥४३॥
तत्काळ विंधिलें स्वर्ग भुवन ॥ यमासि धाडिली बाणाची खुण ॥ तेणें खुंटलें अयागमन भार्गवाचें ॥४४॥
मग संतोषला भृगुपती ॥ ह्नणे रामा तूं अवतारमूर्ती ॥ तुझी पहावया प्रचीती ॥ आलों येथें ॥ ॥४५॥
तूं सच्चिदानंदघन ॥ बाह्याभ्यंतरीं परिपूर्ण ॥ तुझें जाहलिया दर्शन ॥ निवालों मी ॥४६॥
भार्गवें आलिंगितां रघुपती ॥ मुखींहूनि निघाली तेजदीप्ती ॥ ते प्राशितसे सीतापती ॥ मुखीं आपुले ॥४७॥
दीपें दीप ॥ तेथें खुंटला भेदसंकल्प ॥ दोघे जाहले एकरुप ॥ राम भार्गव ॥४८॥
मग आपुली तेजशक्ती ॥ आणि धनुष्य दीधलें रघुपती प्रती ॥ प्रदक्षिणोनि वेदमूर्तीं ॥ निघता जाहला ॥४९॥
ऐसा तो राम दाशरथी ॥ जेणें चिरायु केला भृगुपती ॥ मग भार्गव गेला त्वरितगती ॥ महेंद्राचळासी ॥२५०॥
तंव अंतरीं येवोनि सुरगण ॥ आनंदें वाहती निशाण ॥ पुष्पसंभारवर्षण ॥ करिती रामावरी ॥५१॥
राम ह्नणे जी वसिष्ठा ॥ सैन्य न न्यावें आहाटा ॥ भार्गव गेला गिरिकूटा ॥ महेद्राचळासी ॥५२॥
तें ऐकोनि अजसुतें ॥ राम आलिंगिला दशरथें ॥ मस्तक अवघ्राणोनि हातें ॥ चालिले सकळ ॥५३॥
जंव पातले शरयूतीरीं ॥ तंव जनीं श्रृंगारिली नगरी ॥ वसंता देखोनि वनश्री ॥ आनंदे जैसी ॥५४॥
पतीसि देखतां कांता ॥ कीं सिंधुदर्शनें सरिता ॥ तैसी देखोनि रघुनाथा ॥ आनंदली अयोध्या ॥५५॥
समीप पावलीं वधुवरें ॥ मस्तकीं शोभतीं मेघडंबरे ॥ जैसी गगनीं नक्षत्रें ॥ शोभताती ॥५६॥
मखरें गुढिया तोरणें ॥ घरोघरीं वाधावणें ॥ ठाईठाई कथा कीर्तनें ॥ राघवाचीं ॥५७॥
भेटीलागीं महाजन ॥ साउमे आले लक्षप्रमाण ॥ मंत्र ह्नणती विप्रजन ॥ चहुंवेदींचे ॥५८॥
जयजयशब्दाचा उच्चार ॥ सकल जनासी आनंदगजर ॥ बंदीजन गुणविस्तार ॥ पढती पुढें ॥५९॥
सप्तखणांचे दामोदरीम ॥ गवाक्षीहोनि सुंदरी ॥ कौतुक पाहती नेत्री ॥ राघवाचें ॥२६०॥
लागल्या निशाण भेरी ॥ मृदंग काहळा रणमोहरी ॥ पादाती अश्व रथ कुंजरी ॥ दाटलें नगर ॥६१॥
वोहरें बैसवोनि कुंजरी ॥ धरिली छत्र चामरें शिरीं ॥ अक्षय वायनें सकल नारी ॥ वधुवरां देताती ॥६२॥
रामा पुढें सीतासती ॥ जैसी कनकासवें रत्न्दीप्ती ॥ कीं पौर्णिमेसी चंद्रकांती ॥ उल्हासयुक्त ॥६३॥
आतां असो हा वाग्विलास ॥ येक लक्ष्मी येक परमपुरुष ॥ तेथें उपमा बोलावयास ॥ न मिळे कोठें ॥६४॥
गगना न घालावे गवसणी ॥ कीं हेमाद्री नाणवे अंगणीं ॥ तैसी रामगुणवर्णनीं वाणी ॥ अशक्त माझी ॥६५॥
कैकन्या कौसल्या सुमित्रा ॥ नारी जहिल्या निर्भरा ॥ कुरवंडी करोनि वधुवरां ॥ प्रवेशती मंदिरीं ॥६६॥
लेणीं लुगडी दशरथें ॥ देवोनि अभर केलें जनातें ॥ अहेर देवोनि स्वहस्तें ॥ पाठविले प्रधानां ॥६७॥
मग तीं वोहरे चारी ॥ प्रवेशलीं राजमंदिरीं ॥ ते स्थानींची स्थिती सामुग्री ॥ बोलवे कवणा ॥६८॥
चौं पुरुषार्थी नारायण ॥ अवतरला जी संपूर्ण ॥ तेथें स्वयें लक्ष्मी आपण ॥ असे सहज ॥६९॥
ऐसियापरी रामसीता ॥ सुखें मंदिरी असतां ॥ कैसें वर्तलें गा भारता ॥ ऐंके पुढें ॥२७०॥
केकयदेशींचा राजा ॥ भरताचा जो मातृआजा ॥ तेणें भरत नेला प्रीतिकाजा ॥ भेटावयासी ॥७१॥
मग देवपितरांचे कृत्य ॥ आणि राजकारण समस्त ॥ निरविता जाहला दशरथ ॥ रामाप्रती ॥७२॥
ऐसा जाणोनि रामचंद्र ॥ अंतरी आनंदलें सुरवर ॥ कीं हा वधील दशशीर ॥ ह्नणोनियां ॥७३॥
भारता तो रामराणा ॥ नुल्लंधी पितृवचना ॥ आणि सीतेच्या गुणलक्षणां ॥ पार नाहीं ॥७४॥
ऐसीं राम आणि सीता ॥ क्षणही परतीं नव्हती सर्वथा ॥ तंव विघ्र उद्भवलें भारता ॥ तें असो आतां ॥७५॥
वैशंपायन ह्नणे नृपनाथा ॥ तुवां पुसिली रामकथा ॥ तरी वाल्मिकवाणी प्राकृता ॥ निवेदिली हे ॥७६॥
हे बाळकांडींची कथा ॥ जे ऐकती गा भारता ॥ ते यमपुरीचे पंथा ॥ न घालिती चरण ॥७७॥
हें रामायणचरित्र ॥ जो ऐके परम पवित्र ॥ तेणें दीधलें गौसहस्त्र ॥ ग्रहणकाळीं ॥७८॥
अपुत्रिकांसी होतील पुत्र ॥ विघ्रव्यथा हरेल समग्र ॥ हें ऐकतां पवित्र चरित्र ॥ रामायणींचें ॥ ॥७९॥
आतां असो बाळकांडकथा ॥ पुढें देइजे राज्य भरता ॥ तें ऐकांवें सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥ ॥२८०॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ रामायणकथाविस्तारु ॥ सप्तमोऽध्यायीं सांगितला ॥२८१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥