श्रीगणेशाय नम:
चिंतामणीची जाहलिया भेटी ॥ मनोरथांसी न पडे तुटी ॥ इच्छिले अर्थ ते गारगोटी ॥ पुरवूं शके ॥१॥
वैशंपायनासि ह्नणे नृपती ॥ तैसा तूं गा वेदमूर्ती ॥ तुझिये वचनें श्रवणतृप्ती ॥ जाहली मज ॥२॥
तरी पुसणें महामुनी ॥ एक असे जी अंतःकरणीं ॥ कीं हे यमुना मृत्युभुवनीं ॥ आली कैसी ॥३॥
मुनि ह्नणे गा भूपती ॥ त्वंचु नामें प्रजापती ॥ त्याची कन्या रुपवती ॥ संज्ञा नामें ॥४॥
ते दीधलीसे दिनकरा ॥ कश्यपाचिया कुमरा ॥ ते प्रसवली कन्या पुत्रां ॥ राया ऐक ॥५॥
प्रथम जाहला भूतांतंक ॥ जो दक्षिणदिशेचा नायक ॥ शनैश्वर जाहला आणिक ॥ दुजा पुत्र तयेसी ॥६॥
आणि कन्या जाहली यमुना ॥ ऐसीं तिघें प्रसवली अंगना ॥ अस्ताचळीं गा नृपनंदना ॥ जन्म तिघांसी ॥७॥
मग कवणे एके अवसरीं ॥ सूर्यकांता मनीं विचारी ॥ कीं मज न साहे शरीरीं ॥ तेज सूर्याचें ॥८॥
ऐसें विचारोनियां मना ॥ छायेची केली अंगना ॥ तिचे नांव ठेविले सुवर्णा ॥ ऐसें राया ॥९॥
तयेसि निरविला घरचार ॥ कीं तुवां सूर्य पूजावा भ्रतार ॥ परि माझा गुप्तविचार ॥ न सांगावा ॥१०॥
ह्नणे माझिये स्वरुपता ॥ तुवां भोगावा सविता ॥ वेळ पडलिया आकांता ॥ सांगावे नांव ॥११॥
ऐसें ह्नणोनियां ते सुंदरी ॥ गेली पितयाचे मंदिरी ॥ तपसाधना शरीरीं ॥ करावया ॥१२॥
तंव रावो ह्नणे हो कुमरी ॥ तूं तप साधीं वनांतरीं ॥ असतां आमुचे मंदिरीं ॥ कोपेल सविता ॥१३॥
मग ते होवोनियां अश्विनी ॥ तप साधी महावनी ॥ सीतउष्ण साहे पाणी ॥ भोजनाविणें ॥१४॥
आतां असो हे पुढ्ती ॥ सुवर्णा प्रसवली संतती ॥ सूर्यसंगे गा भूपती ॥ तें ऐकें आतां ॥१५॥
तिये जाहला सावर्णिमनु ॥ आणि व्यतीपात दारुणु ॥ भद्रा वैधृती लहानु ॥ कलीक अर्धयाम तो ॥१६॥
असो सुवर्णा घर चालवितां ॥ परि कांही भ्रांती नेणे सविता ॥ तो ह्नणे माझीच कांता ॥ संज्ञा होय हे ॥१७॥
तंव कोणे एके वेळीं ॥ शनी भुकेला प्रातःकाळीं ॥ तो ह्नणे भोजन दे तात्काळीं ॥ माते मज ॥ ॥१८॥
ते ह्नणे राहें राहें स्थीर ॥ जंव देवा दावूं उपहार ॥ तंव शनी चालिला फांफर ॥ मारावयासी ॥१९॥
सुवर्णेनें शापिला शनी ॥ कीं तुझे चरण भंगोत रे निर्वाणीं ॥ जे तूं नोळखसी जननी ॥ ह्नणोनियां ॥२०॥
तो शाप जाणोनि दारुण ॥ शनी सूर्यातें सांगे वचन ॥ कीं तुझें होवो पदभंजन ॥ ऐसें मज शापिलें ॥२१॥
सूर्य विचारी निजमनीं ॥ जे बाळातें न शापी जननी ॥ जैसा स्वामीसि न घाली रणीं ॥ शुद्धवारु ॥२२॥
मग ज्ञानीं विचारी सविता ॥ तंव ते संज्ञा नव्हे कांता ॥ ह्नणोनि क्रोधें जाहला बोलता ॥ तयेप्रती ॥२३॥
तूं कोण कोणाची सत्य ॥ हें मज सांग वो गुप्त ॥ येरी बोले भयभीत ॥ अर्काप्रती ॥२४॥
ह्नणे मी संज्ञेची रचिली ॥ परि तयेचे अंगीची साउली ॥ ते मज निरवूनियां गेली ॥ तपाप्रती ॥२५॥
हा मजसी नाहीं दोष ॥ मी तिघाचि असें अंश ॥ मग बोलिला दिनेश ॥ शनीप्रती ॥२६॥
पुत्रा हे तवमातेसमान सत्य ॥ इचा शाप नव्हे असत्य ॥ तरी तुझा पावो किंचित ॥ होईल वक्र ॥२७॥
जंव तो ज्ञानी पाहे सविता ॥ तंव वडवा जाहली असे कांता ॥ ह्नणोनि सूर्य जाहला गा भारता ॥ अश्वरुप ॥२८॥
मग तो प्रवेशे तपोवनीं ॥ तें जाणोनियां कामिनी ॥ अवघ्राण केलें मुखवदनीं ॥ दोघी जणीं ॥२९॥
ते सहज होती ॠतुवंती ॥ घ्राणद्वारें जाहली गर्भसंभूती ॥ तोचि उपजला गा भूपती ॥ अश्विनौदेव ॥ ॥३०॥
तो वैद्य जाहला अमरभुवनीं ॥ तंव दुजा प्रसवली अश्विनी ॥ जो वैवस्वतमनु मेदिनीं ॥ पढ्ती पुराणें ॥ ॥३१॥
मग ते अश्विनी पुढे पळतां ॥ पृथ्वीमाजी फिरविला सविता ॥ दोनी गेलीं गा भारता ॥ उदयाचळासी ॥ ॥३२॥
तेथें होती यमुना बाळा ॥ ते लोटली अमित कल्लोळां ॥ कीं माता आली आपुले स्थळा ॥ ह्नणोनियां ॥ ॥३३॥
ऐसी हे महासरिता ॥ अस्ताचळीं उगम गा भारता ॥ हे प्रयागमाहात्मींची कथा ॥ पद्मपुराणीं ॥३४॥
हे पाताळकूर्मपृष्ठवाहिनी ॥ आणि पृथ्वीगभीचें पाणी ॥ अष्टदिशातें व्यापोनि ॥ असे सरिता ॥३५॥
पश्र्विमेच्या सागरा ॥ भिवोनि आली ते सुंदरा ॥ तें श्रुत जाहलें गिरिवरा ॥ कलिंदासी ॥३६॥
कलिदें स्थापिली पळमात्र ॥ तंव गिरिउदरीं पडिलें छिद्र ॥ ह्नणोनि नांव पावली पवित्र ॥ कलिंदतनया ॥३७॥
तो कलिंदपर्वत जैसें काजळ ॥ त्यासी भेदोनि आली चंचळ ॥ ह्नणोनि उदक असे सुनीळ ॥ सूर्यतनयेचें ॥३८॥
मग पूर्वदिशेचिया मोहरां ॥ पुढें भेदोनि सप्तसागरां ॥ यमुना गेली गिरिवरा ॥ उदयाचळासी ॥३९॥
परि उदयाचळीं न थारे सरिता ॥ मग चिंतातुर जाहला सविता ॥ ह्नणोनि नेली व्योमपंथा ॥ सूर्यदेवें ॥४०॥
ते व्योमपंथी गगनीं ॥ यमुना केली पश्र्विमवाहिनी ॥ रेखा दिसताति नयनीं ॥ गगनीं जीच्या ॥४१॥
ऐसी ते गंगा कालिंदी ॥ दुसऱया कृष्णा गंगा गोदावरी ॥ परि त्यांहोनि पूर्वापारीं ॥ यमुना नदी हे ॥४२॥
ॠषि ह्नणे गा भूपाळा ॥ व्योममार्गे अस्ताचळा ॥ यमुना जात जळयंत्रलीला ॥ भ्रमणजाळे परी ॥४३॥
तंव ह्नणे जन्मेजय राणा ॥ हें सत्य न वाटे माझिये मना ॥ कीं प्रयागापुढें तंव यमुना ॥ न देखों नयनीं ॥४४॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया बरवा केलासि प्रश्न ॥ जेणें सुखी होय मन ॥ श्रोतयाचें ॥४५॥
तरी भगीरथ नामें भूपती ॥ तेणें प्रयागा आणिली भागीरथी ॥ त्या गंगेने देखिली धुंधुवातीं ॥ पढें यमुना ॥४६॥
मग ते दशाश्वमेघयज्ञीं ॥ गंगा जाउंपाहे पाताळभुवनीं ॥ कीं जियेपुढें मी मेदिनी ॥ खद्योतवत ॥४७॥
ह्नणोनि समस्त सुरवरीं ॥ नानापरि स्तविली कालिंदी ॥ कीं आणिली असे परोपकारीं ॥ भगीरथ रायें ॥ ॥४८॥
यमुना ह्नणे अवधारीं ॥ तूं पवित्र सचराचरीं ॥ तरी गंगे शतयोजनें तुझे उदरीं ॥ राहेन जाण ॥४९॥
माये शतयोजनें भूमिका ॥ तूं माझी वो अंबिका ॥ परि सागरीं मिळावया उदका ॥ होईन वेगळी ॥५०॥
ऐसें जाणोनि गा भुमिका ॥ दक्षिणे मुहुरली भागीरथी ॥ यमुना निघाली निवांर्ती ॥ उदरामाजी तियेचे ॥५१॥
यापरी दोनी पुण्यसरिता ॥ मुनी ह्नणे गा भारता ॥ शतयोजनें जाऊनि विभक्ता ॥ जालिया दोनी ॥५२॥
मग ते सहस्त्रमुखें त्रिपंथा ॥ सागरा मिळाली नृपनाथा ॥ आणि यमुना गेली पर्वता ॥ उदयाचळासी ॥५३॥
जैसा करें मर्दिजे रससुतु ॥ तो रुद्र करी सप्तधातु ॥ चरणीं ठेविजे अकल्पितु ॥ रुद्रवीर्य तें ॥५४॥
ह्नणोनि तैसी कलिंदज्या ॥ रविदेवाची आत्मजा ॥ अस्ताचळाच्या गा सहजा ॥ उपजली हे ॥५५॥
तंव रावो ह्नणे वैशंपायना ॥ समुद्रीं मिश्रित होतां जीवना ॥ तेथें वेगळी जातां यमुना ॥ न देखों नयनीं ॥५६॥
मग मुनी ह्नणे गा भारता ॥ परमाणु नित्य धरीं असतां ॥ परि रविरश्मींविण सर्वथा ॥ न दिसे नयनीं ॥५७॥
नातरी ब्रह्मगिरीच्या पाठारीं ॥ कनकखाणी आहेत पुराणांतरी ॥ परि दिव्यचक्षूंविण चर्मनेत्रीं ॥ न देखों कोणी ॥५८॥
कीं क्षीर मिळालिया नीरीं ॥ तें निवडिजे द्विजवंरी ॥ तैसेंचि नेइजे रविकरीं ॥ उदक यमुनेचें ॥५९॥
आतां असो गा भारता ॥ त्वां पुसिली यमुनेची कथा ॥ तरि हे प्रयागमाहात्मींची वार्ता ॥ पद्मपुराणों ॥६०॥
परि ज्योतिषरत्नमाळा ॥ तेथें अनारिसें गा भूपाळा ॥ ते भद्रा उपजली डोळां ॥ रुद्रदेवाच्या ॥६१॥
तरी देवदैत्यांचे समरीं ॥ क्रोंध आलासे त्रिपुरारी ॥ ते हे जन्मली नेत्रीं ॥ दैत्यवधार्थ ॥६२॥
मग जन्मेजय ह्नणे सर्वज्ञा ॥ आतां असो हे विधंचना ॥ अंजनाचिया दिव्यलोचना ॥ वैशंपायना तूं ॥६३॥
प्रसंगी वोडवली हे सरिता ॥ जैशा पत्रशाखा रुचीनें जेवितां ॥ तरि आतां सांगे पुढील कथा ॥ श्रीरामाची ॥६४॥
मुनि ह्नणे गा भारता ॥ वाल्मिकाचिया अनुमता ॥ विश्वामित्र जाहला सांगता ॥ रामाप्रती ॥६५॥
राम आणि गाधीकुमर ॥ सिद्धाश्रम पावले पवित्र ॥ तंव जाहला चमत्कार ॥ अलोकिक ॥६६॥
पतीचिया शापवचना ॥ शिळा जाहली होती अंगना ॥ ते चरणस्पर्शे अर्धक्षणा ॥ उद्धरिली रामें ॥६७॥
तंव ह्नणे जन्मेजयो ॥ शिळा जाहलिया कवण उपावो ॥ ते कोणाची कोण नांहो ॥ कां कोपला तिसी ॥६८॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ सिद्धाश्रम महापावन ॥ तेथें होता तो ब्राह्मण ॥ गौतम ॠषी ॥६९॥
हेमगिरीचे प्रदेशीं ॥ तेथें असे तो तापसी ॥ तंव ब्रह्मा आला तयापासी ॥ कन्या घेवोनि ॥७०॥
अहिल्या घेवोनि हातीं ॥ ब्रह्मा आला गौतमा प्रती ॥ ह्नणे माझी कन्या हे वेदभूर्ती ॥ पाळावी त्वां ॥७१॥
हे बाळक लडिवाळिता ॥ परि साभाळावी उचिता ॥ प्रौढ जाहलिया स्वचिता ॥ आणोन द्यावी ॥७२॥
ऐसा करोनि प्रीतिप्रश्न ॥ ठेवोनि गेला चतुरान ॥ मग पाळिता जाला ब्राह्मण ॥ गौतम ॠषी ॥७३॥
ऐसें करितां पाळिग्रहण ॥ तंव तिये पावलें तारुण्य ॥ मग अहिल्या घेवोनि आपण ॥ आला गौतम तो ॥७४॥
ब्रह्यासि ह्नणे अवधारीं ॥ हे तारुण्यें दाटली गात्रीं ॥ आतां सांभाळा जी कुमरी ॥ अहिल्या तुमची ॥७५॥
ऐकोनि ब्रह्मा जाहला विस्मित ॥ ह्नणे भला गा तूं इंद्रियजित ॥ अहिल्या देखोनि भ्रमित ॥ नव्हे कवण ॥७६॥
तूं महातापस गौतमा ॥ जे हे अभिलाषिली नाहीं रामा ॥ तरी तुजसी द्यावया उपमा ॥ नाहीं दुजी ॥७७॥
असो ऐसी ते अहिल्या कुमरी ॥ रुपगुणीं सम गौरी ॥ ते ऐकिली सुरवरीं ॥ इंद्रदिकीं ॥७८॥
मग देवांसहित सुरपती ॥ सकल गणांसी दिक्पती ॥ अहिल्या ऐकोनि रुपवंती ॥ आले समस्त ॥७९॥
आरुढोनि आपुलाले वहनीं ॥ चंद्र सूर्य आदि करोनी ॥ देव पातले ब्रह्मभुवनीं ॥ कन्ये लागीं ॥८०॥
मग विरिचि ह्नणे सकळां ॥ जो वेगां फिरुनि येईल महिमंडळा ॥ त्यासीच घालील सुमनमाळा ॥ अहिल्या हे ॥ ॥८१॥
ऐसें ऐकोनि भाषित ॥ इंद्र रावो देवांसहित ॥ पृथ्वी फिरावया समस्त ॥ चालिले वेगीं ॥८२॥
गौतमही चालिला ब्राह्मणु ॥ तंव पुढें देखे कामधेनु ॥ उभयखुरीं प्रसवतां अर्धक्षुण ॥ राहिला तेथें ॥८३॥
तिये तीन केल्या प्रदक्षिणा ॥ मग आला ब्रह्मभुवना ॥ तरी ऐसि याची विवंचना ॥ ऐका आतां ॥८४॥
सव्यापसव्य प्रदक्षिणा ॥ तीन कराव्या असतां द्विवदना ॥ तेणें शत पूजा चढती त्रिनयना ॥ नंदिकेश्वरासी ।८५॥
तें लिंगाचें येक पूजन ॥ पृथ्वी प्रदक्षिणेसमान ॥ असो ऐसें करोनि आचरण ॥ आला गौतम तो ॥८६॥
मुनि आला प्रदक्षिणा करोनी ॥ तें ब्रहयानें जाणितलें मनीं ॥ कीं यासी पुण्य घडलें मेदिनी ॥ प्रदक्षिणेचें ॥८७॥
ह्नणोनि ते अहिल्या कुमरी ॥ गौतमा दीधली वेदमंत्रीं ॥ आणि शेंस भरोनि सावित्री ॥ लागली चरणीं ॥८८॥
मग दुजे दिनीं सुरेश्वरु ॥ पॄथ्वी फिरोनी आला कन्या वरुं ॥ तंव अहिल्या वरोनि द्विजवरु ॥ बैसलासे ॥८९॥
ब्रह्मयासि ह्नणे सुरेश्वर ॥ तुवां गौतम विचारिला वर ॥ तरी आह्मासि कां वेव्हार ॥ चालविलासी ॥९०॥
तूं तरी आपुले सामर्थ्यपणा ॥ दृष्टी नाणिसी देवग्णां ॥ आह्मा करविली प्रदक्षिणा ॥ वायां विरिंची ॥९१॥
तंव ब्रह्मा बोले देवांसी ॥ तुह्मीच विचारा मानसीं ॥ माझी वाणी असत्यासी ॥ न वदे कधीं ॥९२॥
गौतमासि घडली प्रदक्षिणा ॥ ह्नणवुनि कन्या दीधली ब्राह्मणा ॥ नातरी तुह्मां सांडोनि सुरगणां ॥ कां देतों मानवासी ॥९३॥
इंद्र कटकंटा करी विवेका ॥ ह्नणे रत्न जोडलें भिक्षुका ॥ परी मी करोनि व्यभिचारिका ॥ छळीन इयेसी ॥९४॥
ऐसें ह्नणोनि सुरनाथ ॥ स्वस्थानीं गेला देवांसहित ॥ गौतम होवोनि राहिला गृहस्थ ॥ सिद्धाश्रमासी ॥९५॥
पुढें कोणेएके अवसरीं ॥ अहिल्या ठेवोनियां मंदिरीं ॥ गौतम गेला वनांतरीं ॥ समिधांलागीं ॥९६॥
ऐसें जाणोनि वज्रपाणी ॥ आला अहिल्येच्या भुवनीं ॥ रुप धरिलें पालटोनी ॥ गौतमांचें ॥९७॥
जंव हातीं घेवोनि जलपात्र ॥ बाहेर आली ते सुंदर ॥ तंव येरु ह्नणे कंदर्पे थोर ॥ व्यापिले मज ॥९८॥
ऐसें ह्नाणोनि धरिली हातीं ॥ ह्नणे चाल पां वहिली दे रती ॥ येरी ह्नणे असतां गर्भस्ती ॥ हें बोलिलें नाहीं ॥९९॥
तुह्मीं सज्ञान सदाचार ॥ जाणतसां सतीचे विचार ॥ तरी दिवसा हें कामक्षेत्र ॥ मथों नये ॥१००॥
तियेप्रति बोलिला कुटिळ ॥ कीं गृहीं लागलिया महाज्वाळ ॥ तेथें भद्रा टाळी तंव काळ ॥ नेईल जाण ॥१॥
प्रिये तुझिये विरहानळें ॥ देह व्यापिला कामज्वाळें ॥ विधी राखसील तरी अबळे ॥ न उरे उरी ॥२॥
ऐसी नाना प्रयत्नोत्तरीं ॥ वश करोनि अहिल्या सुंदरी ॥ मग इंद्रे भोगिली यापरी ॥ अहिल्या ते ॥३॥
असो सरलिया रतिविलास ॥ तंव आला गौतम तापस ॥ तेणें श्रृंगार देखिला बीभत्स ॥ अहिल्येचा ॥४॥
आणि आपुलीये आकृती ॥ गौतमें वोळखिला सुरपती ॥ ह्नणे माझेनि वेर्षे युवती ॥ भोगिली तुवां ॥५॥
ह्नणोनि बोलिला शापवचन ॥ कीं तूं कामें नोळखसी ब्रह्मभुवन ॥ परी तुझे झडोतरे वृषण ॥ कामलंपटा ॥६॥
ऐसा तूं पापिष्ठ कुटिळ ॥ तरी होसील रे निर्फळ ॥ तंव भूमीसि पडिला वृषणगोळ ॥ सुरेश्वरांचा ॥७॥
मग शापिली ब्रह्मबाळा ॥ कीं सहस्त्रवर्षे होसी शिळा ॥ जे माझेनि वेर्षे इंद्र भोगिला ॥ तरी देतों उःशाप ॥८॥
जै उपजेल राम दाशरथी ॥ त्याचिये चरणांचे संगती ॥ तै उद्धरसी हे भारती ॥ सत्य माझी ॥९॥
ऐसें ऐकोनि ते अबला ॥ सिद्धाश्रमीं जाहली शिळा ॥ तै पासूनि घोरवन गा भूपाळा ॥ जाहलें नांव ॥१०॥
हें वाल्मिकवचन रामायणीं ॥ परि अनारिसें ब्रह्मपुराणीं ॥ कीं अहिल्या शापिली मुनी ॥ ब्रह्मगिरिप्रदेशीं ॥११॥
राया मग तो अमरनाथ ॥ देवासि सांगे वृत्तांत ॥ कीं निर्फळ जाहलों गा दुःखित ॥ गौतमशापें ॥१२॥
ह्नणोनि समस्त देवगण ॥ गौतमासि विनविती वचन ॥ कीं शापाचें करोनि भंजन ॥ करावा सुफळ हा ॥१३॥
गौतम ह्नणे देवांप्रती ॥ मेषवृषण लावितां सुरपती ॥ सफळ होईल हे भारती ॥ सत्य माझी ॥ ॥१४॥
मग अग्नी ब्राह्मण सुरगण ॥ मेषांचे आणोनि वृषण ॥ लाविती तेणें विटंबन ॥ सुरपतीचें लोपलें ॥१५॥
ह्नणोनि त्या भावें इंद्राप्रती ॥ मेषवॄषण ऐसें बोलती ॥ हे रामायणींची भारती ॥ वाल्मीकॠषीची ॥१६॥
ते अद्यापि आहे प्रतीती ॥ मेषवृषणाची आहुती ॥ यागीं देताति इंद्राप्रती ॥ येणेंचि गुणें ॥१७॥
परी अनारिसें ब्रह्मपुराणीं ॥ व्यासदेवाची गुणवाणी ॥ कीं गौतमें देखिला वज्रपाणी ॥ बिडालरुपें ॥१८॥
मग तो शापिला दुराचारी ॥ कीं सहस्त्र भगें होती शरीरीं ॥ तंव विटंबला क्षणमात्रीं ॥ ॠषिवचनें तो ॥१९॥
मग तो इंद्र आपुले अर्जिता ॥ देवांसि सांगे समस्तां ॥ ह्नणे सर्वागी उठिले उपस्था ॥ गौतमशापें ॥१२०॥
तरी तुह्मासि आलों शरण ॥ हें निवारा जी विटंबन ॥ तंव देव विनविते जाहले वचन ॥ गौतमासी ॥२१॥
प्राथोंनि ह्नणे देवगुरु ॥ देवांचा राजा हा इंद्रु ॥ तरी याचीं भगें टाळोनि पवित्रु ॥ करीं गौतमा ॥२२॥
तंव ह्नणे गौतममुनी ॥ शाप तरी न टळे ब्रह्मवाणी ॥ आतां होकां भगनयनी ॥ सुरेश्वर हा ॥२३॥
भगें असतील संजीवन ॥ परि तीं शुष्कट होतील जाण ॥ जैसे मयुराचे नयन ॥ दिसती सर्वागीं ॥२४॥
तैसें होईल सुरनाथा ॥ लांछन राहील सर्वथा ॥ परि भगांपासोनि न होय व्यथा ॥ शरीरासी ॥२५॥
आणि पातकांचे लांछन ॥ त्यासी नित्य होईल स्मरण ॥ कीं ब्रह्मशापें दारुण ॥ घडलें मज ॥२६॥
ऐसा उःशाप पावुनी ॥ इंद्र गेलासे स्वस्थानीं ॥ मग तो सिद्धाश्रमभुवनीं ॥ राहिला गौतम ॥२७॥
पुढें सहस्त्रवर्षाचे अंती ॥ राम उपजला दाशरथी ॥ मिथुले जातहोता सांगाती ॥ विश्वामित्राचे पैं ॥२८॥
तंव देखिली महाशिळा ॥ तेणें विश्वामित्र संतोषला ॥ ह्नणे चरण लावीं गा दयाळा ॥ या शिळेसी ॥२९॥
ह्नणोनि त्या गुरुवचनावरी ॥ रामें चरण लाविला निर्धारी ॥ तंव दिव्यरुप ते सुंदरी ॥ जाहली अहिल्या ॥१३०॥
परि श्रीरामाच्या चरणीं ॥ लागों भ्याली ते कामिनी ॥ कीं आला असेल रुप पालटोनी । आणिक कोण्ही ॥३१॥
विश्वामित्र ह्नणे तयेप्रती ॥ माते हा श्रीराम दाशरथी ॥ तुझे शापाची करावया निर्गती ॥ आला येथें ॥३२॥
हा दीनानाथ जगदोद्धारण ॥ हा पतितांसी करी पावन ॥ हा अरिगजपंचानन ॥ श्रीरामचंद्र ॥३३॥
तंव गौतमासी जाहलें ज्ञान ॥ कीं शापाचें पावलें अवसान ॥ मग हिमगिरीहूनि आपण ॥ आला सिद्धाश्रमासी ॥३४॥
तेणें देखिला विश्वामित्र ॥ लक्ष्मणासहित श्रीरामचंद्र ॥ अनुक्रमें जाहला नमस्कार ॥ येकमेकांसी ॥३५॥
मग ते विश्वामित्रें धरोनि करीं ॥ घातली गौतमाचे चरणावरी ॥ कीं हे सांभाळी आपुलि सुंदरी ॥ अहिल्या पत्नी ॥३६॥
सहस्त्रवर्षा जाहली भेटी ॥ तेणें आनंदली गोरटी ॥ देवी केली पुष्पवृष्टी ॥ सिद्धाश्रमासी ॥३७॥
स्वर्गी लागले दुंदुभीनिशाण ॥ आनंदे नाचती सुरगणा ॥ रामाचे वानिती चरण ॥ तिहीं लोकीं ॥३८॥
ऐसी हे पवित्र रामकथा ॥ आणि अहिल्या पतिव्रता ॥ भारता हें आख्यान ऐकतां ॥ उद्धरती प्राणी ॥३९॥
आतां असो हे अहिल्या सती ॥ तेथोनि निघाले ॠषिरघुपती ॥ पुढें ऐकावी रामकीर्ती ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४०॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ अहिल्योद्धारप्रकारु ॥ षष्ठोध्यायीं कथियेला ॥१४१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥