श्रीगणेशाय नमः
रायासि ह्नणे वैशंपायन ॥ बरवा केलासि गा प्रश्न ॥ जेवीं करपंटशतें कृशानं ॥ विकसिजे जैसा ॥१॥
कीं पंचधाराचिये कणिके ॥ गिंवसोनि काढिजे पिपीलिकें ॥ कां लोहचूर्ण तरी चुंबकें ॥ मेळविजे जैसें ॥२॥
तरी हे पद्मपुराणींची कथा ॥ कालिकामाहात्मीं भारता ॥ ते ऐकें आतां प्रेमभरिता ॥ जन्मेजया तूं ॥३॥
कोणे एके अवसरीं ॥ देवीं मंथन केलें सागरीं ॥ रत्ने काढिलीं ते कुसरी ॥ असो आतां ॥४॥
ऐसा मंथितां उदधी ॥ निघाल्या अष्टोत्तरशत व्याधी ॥ त्यांही नमस्कारिलें विधि ॥ विरिंचि देवासी ॥५॥
ह्नणती आह्मां द्यावें स्थानक ॥ येरु ह्नणे जेथें दोष पातक ॥ तेथें रहावें अवश्यक ॥ सत्य जाणा ॥६॥
जेथें दुःखदरिद्र दारुण ॥ तेथें महा पातकांचें कारण ॥ यास्त्व होतसे संचरण ॥ महाव्याधींसी ॥७॥
सांडिता आपुला आचार ॥ मग अधर्माचा होय संचार ॥ तेथें व्याधींचा प्रकार ॥ होय बहुत ॥८॥
पुत्र उल्लंधी पितृवचना ॥ शिष्य करी गुरुअवज्ञा ॥ स्त्री न मानी भ्रतारवचना ॥ हें कारण पापाचें ॥९॥
परद्रव्य आणि परदारा ॥ परनिंदा ते महाघोरा ॥ येणेंसि होती समोरा ॥ महाव्याधी ॥१०॥
ऐसिया पातकांचा ठावो ॥ तेथें रहावें ह्नणे ब्रह्मदेवो ॥ परि असेल जेथें भक्तिभावो ॥ तें स्थान वर्जावें ॥ ॥१२॥
असो मागुता मंथिला उदधी ॥ तंव निघाल्या सप्तोत्तरशत ओषधी ॥ तिहीं नमस्कारिला विधी ॥ ब्रह्मदेवो ॥१३॥
परि त्या महादीप्तिवंता ॥ जाणो सप्तॠषींच्या कांता ॥ तिहीं नमिला जगत्पिता ॥ बिरिंची तो ॥१४॥
ह्नणती आह्मीं रहावें कवणक्षेत्री ॥ तंव येरु ह्नणे हेमगिरी ॥ तुह्मा कारणें जळधारीं ॥ वर्षतील मेघ ॥१५॥
आतां असो हें समुद्रमथन ॥ श्रीहरीनें वधिले दैत्य दारुण ॥ तो शीण जाणोनि शयन ॥ केलें क्षीरसागरीम ॥१६॥
शेष सर्पाचे अंथरुणीं ॥ शयन केलें शारंगपाणी ॥ तेथें सेवा करितसे चरणीं ॥ इंदिरा ते ॥१७॥
मग विष्णु ह्नणे लक्ष्मीप्रती ॥ मी विश्रांती करीन सुशुप्तीं ॥ तंववरी सुदर्शन घेवोनि हातीं ॥ बैसावें त्वां ॥१८॥
नानारुपें धरुनि कपट ॥ दैत्य येताती महानष्ट ॥ ते चक्रें हाणोनि भुजा कंठ ॥ छेदावे तुवां ॥१९॥
असो औषधींचा ऐकोनि विनोद ॥ तेथें आले स्ववैंद्य ॥ अश्वरुपें महा प्रबुद्ध ॥ पंखांसहित ॥२०॥
तें जाणोनि हरीचे भुवन ॥ ह्नणोती तेणें केलें गमन ॥ तंव कमळजें टाकूनि सुदर्शन ॥ वधिला तो ॥२१॥
मग तेणें महागजरीं ॥ उच्चार केला हरिहरी ॥ तंव जागावला दैत्यारी ॥ नारायण ॥२२॥
विष्णु ह्नणे हा माझा भक्त ॥ न विचारितां केला घात ॥ केवढा केलासि अनर्थ ॥ दुराचारिणी त्वां ॥२३॥
मी भक्तांचा आभारी ॥ मी भक्ताचे बाह्य अंतरी ॥ मी भक्तांचे महाद्वारीम ॥ कांठीकर ॥२४॥
वैकुंठ अथवा अमरपुर ॥ क्षीरसागरासारिखे सहस्त्र ॥ परि हें भक्ताहोनि थोर ॥ न वाटे मज ॥ ॥२५॥
मन बुद्धी शरीर संपत्ती ॥ त्यांहीं मज अर्पिली भक्ती ॥ मंजकारणें संसारप्रीती ॥ सांडिली ज्याहीं ॥२६॥
ह्नणोनि कटकटा करी गोविंद ॥ कैसा वधिला अश्विनीवैद्य ॥ जाई हो न दावीं मुख निंद्य ॥ पापिणी मज ॥२७॥
तुह्मी स्त्रिया नष्ट निर्लज्ज्या ॥ अमंगळ असत्या सहजा ॥ अधीरा आणि आत्मकाजा ॥ सादर पैं ॥२८॥
ऐसें स्त्रियांचे निंद्य जिणें ॥ पतीसि वंचोनि आन करणें ॥ मांव करोनि नाडणें ॥ प्राणेश्वरासी ॥२९॥
आपुली जेव्हां पडेल चाड ॥ तेव्हां बरवें बोले गोड ॥ निघे मुखा आडआड ॥ न बोलताची ॥३०॥
आपुलिये चाडे कारणें ॥ साहे भ्रताराचें बोलणें ॥ परि अंतीं निंदा करणें ॥ जनामाजी ॥३१॥
अखंड पोटीं वसे वैर ॥ बोलविलिया बोले निष्ठुर ॥ मनीं वस्से निरंतर ॥ आपुलें काज ॥३२॥
स्त्रियेसि दीजे थोरपण ॥ तें जैसें श्वानासि सिंहासन ॥ ऐसें तयांचे महिमान ॥ भोगणेम लागे ॥३३॥
मूर्खपणें वदे वाचा ॥ शब्द न मानी भ्रताराचा ॥ आणि त्याच्या गोत्रजांचा ॥ करी द्वेष ॥३४॥
आपुले बंधु आणि सोयरीं ॥ तीं घरासि येती निरंतरी ॥ तयांसि पक्कन्न पाहुणेर करी ॥ न पुसतां पैं ॥३५॥
ऐसी स्त्रियांची कपटजाती ॥ यांसी विश्वासे जो पती ॥ त्याचिये संसाराची गती ॥ बरवी नव्हे ॥३६॥
हा दृष्टांत असे वेव्हारीं ॥ तोचि बोलिला श्रीहरी ॥ परि हे इंदिरेचे जिव्हारी ॥ खोंचले बोल ॥३७॥
तेणें कोमाईली नायका ॥ जाणों रविकरें पद्मकळिका ॥ कां पौर्णिमे अंतीं मयंका ॥ कळाहरण ॥३८॥
मग भयभीत वचनीं ॥ इंदिरें विनविला शेषशयनी ॥ ह्नणे हा म्यां वधिला प्राणी ॥ तुमचेनि बोलें ॥३९॥
हा अश्वरुपी पंखांसहित ॥ मी काय जाणों तुमचा भक्त ॥ दैत्य जाणोनि चक्रघात ॥ केला यासी ॥४०॥
असो तया अमृत शिंपोनी ॥ देवें उठविला तत्क्षणीं ॥ मग नमस्कारोनि चरणीं ॥ लागला अश्विनौ देवो ॥४१॥
तंव इकडे तेचि अवसरीं ॥ लक्ष्मी कोमाइली वक्त्रीं ॥ तें जाणवलें असे अंतरी ॥ उच्चैःश्रव्यासी ॥४२॥
तेणें नावेक जाहला स्थिरु ॥ आपण उच्चैःश्रवा वारु ॥ तें जाणोनि प्रतोदंप्रहारु ॥ केला अरुणें ॥४३॥
तंव तो श्वेतवर्ण चंद्रकिळा ॥ महासुकुमार बाळलीळा ॥ घाव फुटोनियां आगळा ॥ सांडलें शोणित ॥४४॥
तेणें दुखावला अभ्यंतरीं ॥ हिंसु केला महा गजरीं ॥ तें जाणवलें सहोदरी ॥ सिंधु तनयेसी ॥४५॥
तेणें लक्ष्मीच्या नेत्रकमळीं ॥ अश्रुपात आले डळमळी ॥ जाणों मेघ वोळला अंतराळीं ॥ स्वातीजळेंसी ॥४६॥
तो जाणोनि गुप्तार्थ ॥ सिंधुजेसि ह्नणे अनंत ॥ कीं माझा वधिला जेव्हां भक्त ॥ तेव्हां न करिसी शोक पैं ॥४७॥
आतां जाणोनि परपुरुष ॥ तुवां मांडिला असे शोक ॥ ऐसें साक्ष धरुनियां शेष ॥ बोले हरी ॥४८॥
आह्मांसि नाहीं प्रेमचित्त ॥ परपुरुषीं जाहलीसि रत ॥ तूं चंचल ह्नणोनि समस्त ॥ बोलती देव ॥४९॥
तूं न ह्नणसी सान थोर ॥ राव रंक बंधु देवर ॥ उंच नीच यातिपर ॥ नोळखिसी तूं ॥५०॥
जो करितसी वशीकरण ॥ त्यांचे तूं न सोडिशी अंगण ॥ येका नाडोनि दुजा जन ॥ भोगिसी तूं ॥५१॥
ऐसी तूं महा पुंश्वली ॥ आतां काय स्फुंदसी वाउळी ॥ आह्मांसी तरी तृणाबदली ॥ लेखिसी तूं ॥५२॥
मग शाप बोले श्रीपती ॥ तुवां उच्चैःश्रवा चिंतिला चित्तीं ॥ तरी अश्विनी होसील हे भारती ॥ सत्य माझी ॥५३॥
जे तुवां कल्पिली मूढमती ॥ तरी तैशीच तुज होवोगती ॥ बारावर्षौचिये अंतीं ॥ मुकसी शापा ॥५४॥
मग ते साशंकित उत्तरीं ॥ लक्ष्मी ह्नणे जी श्रीहरी ॥ यज्ञकुंडींचा अग्नी धवलारीं ॥ लागला कैसा ॥५५॥
तूं सात्विक सहस्त्र गुण ॥ काली हाणितला ब्राह्मणें चरण ॥ तें दुःख विसरोनि मिरवण ॥ केली तुवां ॥५६॥
आणि विरोचनाचे मंदिरीं ॥ तूं जाहलासि स्वयें नारी ॥ तें विसरोनि बळीचे द्वारीं ॥ असती उभा ॥५७॥
परी हें आपुलेंचि उणें ॥ तरी तुह्मां कायजी दूषणें ॥ चातकीं केवीं रुसणें ॥ घनावरी ॥५८॥
चातकें रुसिजे हिमकराला ॥ सारसीं रुसिजे अस्ताचळाला ॥ तैसें तुज रुसणें गोपाळा ॥ घडलें आजी ॥५९॥
आमुचें स्त्रीरुप शरीर ॥ तें पति आधीन साचार ॥ परी अपराधें वीण दुस्तर ॥ शापिलें मज ॥६०॥
कां अपराधें वीण युवती ॥ जरी शेजे अव्हेरी पती ॥ तरी ते भ्रूण हत्या निश्विती ॥ बैसली माथां ॥६१॥
अपराधें वीण पतिव्रते ॥ शिक्षा करिती लोकवार्तें ॥ ते सहस्त्रघातातें हस्तें ॥ लिंपती जाण ॥६२॥
देवा तुह्मां काय दूषण ॥ हा संसर्गाचा लागला गुण ॥ सर्पावरी करितां शयन ॥ जाहला पालट ॥६३॥
ह्नणोनि मुखीं निघालें दुश्वित ॥ सर्पाची ते गरळ सत्य ॥ येरव्हीं शाप अमंगळ व्यर्थ ॥ बोलतेति ना ॥६४॥
तंव हरी ह्नणे वो मुग्धे ॥ म्यां तुज शापिंले विनापराधें ॥ तरी दोष दंडाचिये बाधे ॥ शापीं मज ॥६५॥
मग लक्ष्मी बोले शापदान ॥ शयनासारिखें जाहलें मन ॥ तरी तुह्मीं सर्प होऊनि वन ॥ सेवावें देवा ॥६६॥
आणि ह्नणे जी कमळनयना ॥ म्यां झेलिलें शापदान ॥ परी तुह्माविण गिरिवना ॥ न वचें गा ॥६७॥
जैसीं प्राण कीं प्रकृती ॥ नातरी शिव आणि शक्ती ॥ तैंसी तुज मज विभक्ती ॥ न घडो देवा ॥६८॥
कां भानुबिंब असे अंबरीं ॥ आणि कमळिणी सरोवरी ॥ दूरी असतां परि अभ्यंतरीं ॥ न विसंबे त्या ॥६९॥
कां पक्षिणीये पावल्या निशी ॥ पतियोगें जेवीं सरसी ॥ समागम नसे परि मानसीं ॥ न विसंबे त्या ॥७०॥
अळिकेतें टोंची भ्रमरी ॥ परी वेदना परस्परीं ॥ तैसा तूं मजसी श्रीहरी ॥ विसंबो नको ॥७१॥
ऐसें बोलोनियां तत्क्षणीं ॥ लक्ष्मी जाहली अश्विनी ॥ विष्णु जाहला महाफणी ॥ श्रीहरी तो ॥७२॥
मग ते दिव्यरुपा अश्विनी ॥ प्रवेशलीसे कलिं गवनीं ॥ पंपासरोवरींचें पाणी ॥ सेवी सर्वदां ॥७३॥
इकडे विष्णु होवोनि फणिवर ॥ पाताळा गेला वेगवत्तर ॥ तो वासुकीनें जाणोनि श्रीवर ॥ नमिला प्रेमें ॥७४॥
वासुकी ह्नणे जी दातारा ॥ आह्मां सांभाळी सर्वेश्वरा ॥ कृपा करोनि शारंगधरा ॥ राहें येथें ॥७५॥
तंव तयातें ह्नणे श्रीहरी ॥ मज शाप दीधला सुंदरीं तरी मी राहेन मलयाद्रीवरी ॥ वर्षे बारा ॥७६॥
तो मलय नामें पर्वत ॥ सेविता जाहला श्रीअनंत ॥ जंव शापाचा पुरला अंत तंव आला कलिंगवना ॥७७॥
अकरा वर्षे तीन मास ॥ इतुके तेथें क्रमिले दिवस ॥ वल्मीक एक जाणोनि उद्स ॥ राहिला त्यामाजी ॥७८॥
असो आला जाणोनि वनमाळी ॥ वसंते श्रृंगारिली वनस्थळी ॥ तरुवर दाटले अकाळीं ॥ फळीं पुष्पीं ॥७९॥
आंबे जांबुळी रायकेळी ॥ फणस नारिंगी पोफळी ॥ चांफे दाळिंबी रायआंवळी ॥ दाटले मोहर ॥८०॥
जाई जुई नागचांफे ॥ द्राक्षी निंबोणी दवणें रोंपे ॥ रायबकुळ सुगंधपुष्पें ॥ झळकताती ॥८१॥
वरी भ्रमरांचे झुंकार ॥ आणि मयुरांचे उद्नार ॥ कोकीला गाती सुस्वर ॥ पंचमातें ॥८२॥
शुक साळ्या सारसें ॥ सरोवरीं पोंहती राजहंसें ॥ कनककमळें बहुवसें ॥ दाटलीं भ्रमरीं ॥८३॥
भ्रमरीं कोंदले कलिंगवन ॥ तें इंदिरेनें जाणितले चिन्ह ॥ कीं विष्णु येवोनि अवसान ॥ जाहलें शापाचें ॥८४॥
तंव ते लक्ष्मी गा नरेंद्रा ॥ उदकार्थ आली सरोवरा ॥ तेथें वारुळ देखे सुंदरा ॥ सन्मुख दृष्टीं ॥८५॥
मग त्या खुंदळिलें चरणीं ॥ तेणेम कंप जाहला धरणी ॥ तंव पृष्ठी उपटूनियां फणी ॥ आला बाहेरी ॥८६॥
अश्विनी सहज असे ॠतुवंती ॥ ते हिंसूनि आली पुढती ॥ तंव दृष्टीं देखिली युवती ॥ फणिवरें त्या ॥८७॥
ऐसी ते देखोनि अश्विनी ॥ कामातुर जाहलीं दोन्ही ॥ तेणें ऊर्ध्वरेत लोटलें धरणीं ॥ फणिवराचें ॥८८॥
तें फणिवराचें शुक्र ॥ भूमीसि पडतां नेत्रनीर ॥ जिव्हेनें चाटिलें समग्र ॥ त्या अश्विनीनें ॥८९॥
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ॥ तैं दोघें मिळाली संगमीं ॥ तोचि दिवस मास लक्षणीं ॥ राहिला गर्भ ॥ ॥९०॥
देवीं केली पुष्पवृष्टी ॥ जे विष्णुस्त्रियेसि जाहली भेटी ॥ वाद्यें लागलीं वैकुंठें ॥ तये वेळीं ॥९१॥
मग वरदान बोले श्रीपती ॥ कीं हरिलेखी हे मासतिथी ॥ ह्नणोनि नागाची करोनि मूर्ती ॥ पूजावी सकळीं ॥९२॥
ऐसें चिंतोनियां मानसीं ॥ पूजावीं वारुळ हो कां तुळसी ॥ कमलजे भेटला हषीकेशी ॥ नागरुपें ॥९३॥
दीप पाजळोनी आरती ॥ जे मनोधर्मे वोंवाळिती ॥ त्यांचे अखिल मनोरथ पुरती ॥ नाहीं सर्पभय ॥९४॥
ऐसी नवमासवरी वनीं ॥ तेथेंचि राहिली होतीं दोन्ही ॥ मग पूर्ण जाहलिया सुदिनीं ॥ प्रसवली ते ॥९५॥
श्रावणशुद्ध पंचमी ॥ पुत्र प्रसवली पराक्रमी ॥ मंगल वाद्यें लागली व्योमीं ॥ तये वेळीं ॥९६॥
शापमुक्त जाहलीं दोघेंजणें ॥ सर्परुप सांडिले नारायणें ॥ मग तें गुंडुनियां तृणें ॥ दाटिले वारुळ ॥९७॥
ते लक्ष्मी सिंधुसुता ॥ अश्वरुप टाकोनि भारता ॥ दिव्यरुपें श्रीअनंता ॥ भेटलीसे ॥९८॥
मग त्या वारुळासि वर ॥ लक्ष्मी बोलिली साचार ॥ कीं तुज पूजील तो निर्धार ॥ न पावे पीडा ॥९९॥
नागाची करुनि आकृती ॥ कुळधर्मे पूजावें समस्तीं ॥ श्रावणशुद्ध पंचमी प्रती ॥ आराधिजे तया ॥१००॥
तंव आनंदले सुरगण ॥ पुष्पें वर्षले जैसे घन ॥ करावया आले दर्शन ॥ त्या वल्मिकासी ॥१॥
कामधेनु स्त्रवली क्षीरं ॥ ब्रहयानें सूदलें कंठसूत्र ॥ समस्तीं केला नमस्कार ॥ त्या वल्मिकासी ॥२॥
हरीसि ह्नणे सिंधुनंदिनी ॥ हें बालक घालाजी विमानीं ॥ तंव देव ह्नणे विष्णुभुवनीं ॥ नेऊंनये हें ॥३॥
हा मृत्युलोकींचा उपार्जित ॥ यासी कैंचा ऊर्ध्वपंथ ॥ हा येथेंचि ठेवीं अहिसुत ॥ सरोवरा माजी ॥४॥
मग उजवा धरुनि त्याचा कर ॥ बाहूसि लिहित शारंगधर ॥ कीं याचें नांव एकवीर ॥ ठेविलेंसे म्यां ॥५॥
गुंडाळोनियां कमळदळां ॥ सरोवरपाळीं ठेविलें बाळा ॥ वरी रचिलें मधुमोहळा ॥ लक्ष्मीयें तेथें ॥६॥
आतां असो हा एकवीर ॥ देवीं केला जयजयकार ॥ आणि विमानीं बैसोनि श्रीवर ॥ गेला वैकुंठा ॥७॥
तंव काशीपुरीचा नरेंद्र ॥ सोमवंशी महापवित्र ॥ तो पुरुरवा चिंतातुर ॥ पुत्राविणें राया ॥८॥
तो कोणे एके अवसरीं ॥ व्याहाळीं निघाला दळभारीं ॥ तंव स्त्री ह्नणे जी मज रात्रीं ॥ जाहलें स्वप्न ॥९॥
तुह्मासि खेळतां पारधी ॥ पुत्र लाधला महानिधी ॥ तरी ते पहावया स्वप्नसिद्धी ॥ येईन सरिशी ॥११०॥
असो निघाला सोमवंशी ॥ पारधी खेळतां सैन्येशी ॥ तृर्षे पीडलिया उदकासी ॥ आला सरोवराचे ॥११॥
उतरला वारु खालता ॥ तंव पाळीं देखिलें हरिसुता ॥ मग उचलोनि प्रेमभरिता ॥ दीधला राणिये ॥१२॥
जंव बाहूसि पाहे नरेंद्र ॥ तंव नांव लिहिलेंसे एकवीर ॥ मग हर्षे होऊनि निर्भर ॥ आला नगरा ॥१३॥
उभविलीं गुढिया तोरणें ॥ घरोघरीं वाधावणें ॥ महोत्त्साहें करुनि दानें ॥ दीधली विप्रां ॥१४॥
या पुत्राचेनि पद्महस्तें ॥ तीन पुत्र जाहले रायातें ॥ त्यांची नावें अनुक्रमपंथें ॥ सांगों तुज ॥१५॥
तंव जन्मेजय पुसे ॠषीप्रती ॥ कीं या पुरुरव्याची कैसी उत्पत्ती ॥ आणि यापासाव संतती ॥ विस्तारली कैशी ॥१६॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया बरवा केलासि प्रश्न ॥ तरी विष्णुपासाव नंदन ॥ विरिंचिदेवो ॥१७॥
त्या विरिंचीच्या दक्षपुत्रां ॥ तूं ऐकें गा नरेंद्रा ॥ कोणकोण ऐशिया विचारा ॥ आणों तुज ॥१८॥
अत्रि दक्ष आणि पुलस्ती ॥ कश्यप नारद अंगिरापती ॥ भृगु पुलह ॠतु सुमती ॥ वसिष्ठादि ॥१९॥
अत्रीचे नेत्रीं जाहला चंद्र ॥ चंद्रापासाव बुधकुमर ॥ परि तो गुरुदेवाचा निर्धार ॥ क्षेत्रजात ॥१२०॥
बुधापासाव पुरुरवा ॥ तो सोमवंशींचा निघावा ॥ त्यासी चार पुत्र गा नृदेवा ॥ जाहले राया ॥२१॥
प्रथम पुत्र जाणिजे वेनु ॥ दुजा बोलिजे दक्षकर्णु ॥ तिसरा रुरुशी चौथा नंदनु ॥ एकवीर तो ॥२२॥
या चहूं पुत्रांची संतती ॥ ते तूं ऐकें गा भूपती ॥ श्रवणमात्रें नासती ॥ सकळ दोष ॥२३॥
साखरेचिये परिपाका ॥ भेषज देइजे बाळका ॥ तैसी श्रृंगारेंवीण कामिकां ॥ हरिकथा न रुचे ॥२४॥
नातरी नाशावया दुष्कृता ॥ आशेनें लोभिया जाय तीर्था ॥ तैसी श्रृंगारी परि पावन हरिकथा ॥ अभक्तांसही ॥२५॥
जैसें क्षीरगर्भीं नवनीत ॥ कां तृणाउदरीं अमृत ॥ तैसा आहे कृष्णनाथ ॥ वंशावळीसि या ॥२६॥
एक श्रीकृष्ण दुसरा धर्म ॥ या वंशी घेतला विश्राम ॥ तो ऐकें गा अनुक्रम ॥ जन्मेजया तूं ॥२७॥
असो पुरुरव्याचा ज्येष्ठ नंदन ॥ ज्या नाम बोलिजे वेन ॥ त्याचा प्रपौत्र तरी जाण ॥ नहुषराव ॥२८॥
नहुषापासाव संतती ॥ सोमवंशी गा नरपती ॥ पुत्र जाहले विख्यातकीर्ती ॥ साहीजण ॥२९॥
तयां माजी ययातिरावो ॥ जो कां देवयानीचा नाही ॥ तयापासाव महाबाहो ॥ उपजला यदु ॥१३०॥
यदु पासाव एकरथी ॥ एकरथीचा भीमरथी ॥ भीमरथीची संतती ॥ देवदत्त ॥३१॥
देवदत्ताचा शूरसेन ॥ त्यापासाव वसुदेव जाण ॥ तया वसुदेवाचा नंदन ॥ श्रीकृष्णरावो ॥३२॥
तया श्रीकृष्णाचे कुमर ॥ एकलक्ष साठी सहस्त्र ॥ त्यांत प्रद्युम्न महावीर ॥ सांबादिक ॥३३॥
त्या कृष्णाचें लीलाचरित्र ॥ सांगतां असे बहु विचित्र ॥ जें वर्णितां सहस्त्रवक्त्र ॥ शिणला असे ॥ ॥३४॥
त्याचा महिमा वर्णिता ॥ तुटे भवभयाची व्यथा ॥ आणि मुक्ति सायुज्यता पाविजे पैं ॥३५॥
त्या कृष्णाचीं अंतःपुरें ॥ आठ आगळीं सोळासहस्त्रें ॥ राणी एकीप्रती दहाकुमरें ॥ कन्या एकें मंडित ॥३६॥
त्यांत कृष्णाचा ज्येष्ठ कुमर ॥ मदन नामें महावीर ॥ मदनाचा अनिरुद्ध साचार ॥ अनर्घ्यशील ॥३७॥
त्या अनिरुद्धाचा पुत्र ॥ वज्र नामें महा वीर ॥ तो पार्थें केला नृपवर ॥ मथुरे प्रती ॥३८॥
जैं यादवां जाहला संहार ॥ तें पार्थें पळविला वज्र ॥ हा जाहला गा विस्तार ॥ यादवकुळाचा ॥३९॥
आतां असो हा कृष्णविस्तार ॥ पुरुरव्याचा दुसरा कुमर ॥ तयाचा ऐक गा विस्तार ॥ जन्मेजया तूं ॥१४०॥
जो नावें बोलिजे दक्षकनु ॥ त्याचा सूर्यवंश महातनु ॥ सूर्यवंशाचा सुलक्षणु ॥ मनुराव तो ॥४१॥
मनुरावाचा जाणिजे येळ ॥ येळाचा आहुती धर्मशीळ ॥ आहुतीचा कुळबाळ ॥ नहुष जो पैं ॥४२॥
नहुषाचा जाहला ययाती ॥ ययातीचा पुरुशती ॥ पुरुशतीचा जन्मेजय भूपती ॥ पूर्वापर जो ॥४३॥
त्या जन्मेजयाचा श्वेती ॥ श्वेतीचा सर्वभौम संतती ॥ सर्वभौमाचा दुर्मती ॥ महाभीम ॥४४॥
महाभीमाचा अतिआयो ॥ अतिआयाचा अक्रोश रावो ॥ अक्रोधाचा महाबाहो ॥ रुचिक वीर जो ॥४५॥
पुढें रुचिकाचा मतिनार ॥ तयाचा असे दुष्यंत कुमर ॥ दुष्यंतापासाव धर्मधीर ॥ भरत तो ॥४६॥
भरताचा जाहला अभिमानु ॥ अभिमानूचा सहस्त्रतनु ॥ सहस्त्रतनूचा नंदनु ॥ हस्तिराव जो ॥४७॥
त्या रायें रचिलें नगर ॥ ह्नणोनि तें हस्तनापुर ॥ त्यापासाव बडिवार ॥ अजामेळ रावो ॥४८॥
अजामेळाचा श्रावणु ॥ त्याचा सौभाग्यनंदनु ॥ तयाचा असे पवित्रतनु ॥ परिक्षीती जो ॥४९॥
परिक्षितीचा भीममंत्र ॥ त्याचा परदीप धनुर्धर ॥ परदीपाचा असे कुमर ॥ शंतनू तो ॥१५०॥
शंतनूचा विचित्रवीर्य ॥ त्याचा क्षेत्रजात धृतराष्ट ॥ हा व्यासापासाव विस्तार ॥ विदुर आणि पंडु ॥५१॥
दुर्योधनादि एक शत कुमर ॥ ते धृतराष्टचे महावीर ॥ जे युद्धीं आटले समग्र ॥ कुरुक्षेत्रीं ॥५२॥
आतां पंडुचे जाण कुमर ॥ धर्म भीम सहोदर ॥ आणि अर्जुन महावीर ॥ नंकुळ सहदेव पैं ॥५३॥
पुढे अर्जुनाचा अभिमन्य ॥ जेणें चक्रविभूमाजी त्याजिला प्राण ॥ त्यापासाव जाहला नंदन ॥ परिक्षिती जो ॥५४॥
तो परमवैष्णव भक्त ॥ जो महाकळिकाळां अजित ॥ त्याचा धर्मशीळ विख्यात ॥ जन्मेजया तूं ॥५५॥
आतां असो हा दक्षकन्यु ॥ सांगेन तिसर्या पुत्रा चा प्रश्रु ॥ तो पुरुरव्याचा नंदनू ॥ ऐकें राया ॥५६॥
तो धर्मधीर महाशूर ॥ रुरुशी नामें गुणसागर ॥ मग तयासी जाहला कुमर ॥ जयंत नामें ॥ ॥५७॥
जयंताचा देवश्रम संतती ॥ देवश्रमाचा शिभ्री चक्रवतीं ॥ तो वैकुंठा गेला धर्ममूर्ती ॥ कुटुंबजनेंशीं ॥५८॥
तो पुत्रपौत्रीं असे पवित्र ॥ राया स्वर्गा गेला नरेंद्र ॥ ह्नणोनि राहिला विस्तार ॥ पुढती त्याचा ॥५९॥
एकवीरा दीधलीमहिकावती ॥ रुरुपुत्रासीं विष्णुकांती ॥ यदूसि दीधली मथुराकांती ॥ इंद्रप्रहस्तीं दक्षकन्यु ॥१६०॥
ऐसी पुत्रां केली वांटणी ॥ पुरुरवा असे पाटणीं ॥ आतां एकवीराची गुणवाणी ॥ ऐकें राया ॥६१॥
तंव जन्मेजया ह्नणे ॠषीप्रती ॥ कैसा वैकुंठा गेला चक्रवती ॥ कोणेंपुण्यें नेली संतती ॥ तें सांगा मज ॥६२॥
मुनि ह्नणे राया अवधारीं ॥ तो महाराज पवित्र शिभ्री ॥ शतयज्ञ कांतिपुरीं ॥ मांडिले तेणें ॥६३॥
जेणे जें मागावें यज्ञकाळीं ॥ तें ना ह्नणतां वाचा विटाळी ॥ ऐशा संकल्पें उदकांजुळी ॥ घातली रायें ॥६४॥
मग बोलाविले ॠषेश्वर ॥ महाजन थोरथोर ॥ नगर श्रॄंगारुनि अंबर ॥ मांडिला याग ॥६५॥
वामदेव शातातप ॥ सुयज्ञ वसिष्ठ कश्यप ॥ कौंडण्य कर्व गौररुप ॥ नासिकेत पाराशर ॥६६॥
बकदाल्भ्य भृगु शतानंद ॥ सुमंत संभारी वेदविद ॥ गर्ग मार्कैडेय नारद ॥ कौशिक जैमिनी ॥६७॥
देती अवदानें आहुती ॥ इच्छादान होत सर्वाभूतीं ॥ तंव नारद निघाला शीघ्रगती ॥ अमरावतीसी ॥६८॥
इंद्रें नमिला नारदमुनी ॥ ह्नणे तुह्मीं हिंडतां त्रिभुवनीं ॥ काय अपूर्व देखिलें भुवनी ॥ तें सांगिजे मज ॥६९॥
नारद ह्नणे हो सुरपती ॥ कांतीसि राजा शिभ्री चक्रवर्ती ॥ तेणें नव्याण्णव याग कीर्ती ॥ केले पूर्ण ॥१७०॥
देती अवदानें आहुती ॥ इच्छादान दे सर्वाभूतीं ॥ ऐसी त्रिलोकीं तयाची कीर्ती ॥ अमरनाथा ॥ ॥७१॥
आतां शतयागांची प्रवृत्ती ॥ पूर्ण न होतां विचारी युक्ती ॥ नातरी घेईल अमरावती ॥ शिभ्रिराय ॥७२॥
सुरपति ह्नणे देवरावो ॥ ऐसियासी काय उपावो ॥ तो सांगिजे गर्भभावो ॥ नारदा तुह्मीं ॥७३॥
मुनि ह्नणे गा सुरनाथा ॥ तुवां व्हावें जी कपोता ॥ आणि अग्नि ससाणा हिंडतां ॥ झडपावें तुज ॥७४॥
तुवां जावें रायाजवळी ॥ शरणागत ह्नणावें यज्ञकाळीं ॥ परि अग्नीनें मागावें चावळी ॥ तुजचि लागीं ॥७५॥
यागकाळीं जें मागे मागता ॥ तें नेदीं ह्नणतां मुके सुकृता ॥ आणि दीधल्या शरणागता ॥ पडेल पतनीं ॥७६॥
ऐकोनियां ऐसा विचार ॥ कपोता जाहला सुरेश्वर ॥ आणि ससाणा होवोनि अंगार ॥ आले भूमंखळा ॥७७॥
वेगीं पावले नगर कांती ॥ कोपतां बैसला रायाचे हातीं ॥ ह्नणे राखराख गा भूपती ॥ आलों शरण ॥७८॥
विस्मय जाहला नृपनंदना ॥ सवेंचि आला तो ससाणा ॥ तंव लोक ह्नणती हाणाहाणा ॥ पापिष्ठ हा ॥७९॥
मग अंतरीं राहोनि रायासी ॥ ससाणा ह्नणे मी उपवासी ॥ तीन दिवसांतीं प्रयासीं ॥ पावलों या कपोतातें ॥१८०॥
यागकाळी जें मागे मागता ॥ तें नेदी तरी मुके सुकृता ॥ आतां माझें मजचि अर्पिता ॥ साकडें काय ॥८१॥
कपोता ह्नणे नरेंद्रा ॥ धेनुवे केवीं दीजे व्याघ्रा ॥ तीतें सोडवितां प्राणिमात्रां ॥ नलगे दोष ॥८२॥
आणि विशेषें मी शरणागत ॥ मज धेनुवे पातला हा कृतांत ॥ ऐसोनि देशील तरी सुकृता अंत ॥ जाहला तुझिये ॥८३॥
मग रायासि ह्नणे ससाणा ॥ याचा बोल नायकें कर्णा ॥ धेनूसि वंचूनियां तृणा ॥ वांचविजे केवीं ॥८४॥
ह्नणे मी सर्वदा मांसाहारी ॥ हा विधिनिषेध तुमचे शरीरीं ॥ इतुकें बोलोनि भूकलहरीं ॥ पडिला विकळ ॥८५॥
वेळोवेळीं विकसी चंचुपुट ॥ गरगरां भोवंडी नेत्रवट ॥ पक्ष फडकवी बोले अस्पष्ट ॥ ऐकिलें रायें ॥८६॥
ह्नणे काय जाहला अनर्थ ॥ जवळी राव आला धांवत ॥ वारा घालोनि केला सचेत ॥ पक्षिया तो ॥८७॥
मग रायातें ह्नणे ससाणा ॥ वायां घालितोसि हा विंझुणा ॥ आहारेंविण तरी प्राणां ॥ उरी कैंची ॥८८॥
आहारेंवीण जे राहती ॥ ते लटिकेंचि बोल गा भूपती ॥ प्राणेविण शक्तिप्रकृती ॥ वांचे कैसी ॥८९॥
भूक नलगे तैंच मंत्र ॥ भूक नलगे तैंचि पुत्र ॥ भूक नलगे तैं शत्रुमित्र ॥ वोळखों ये ॥१९०॥
तंव रावो ह्नणे हें साच परिस ॥ याचेनि तुकें देतो मांस ॥ तरी आतां उठीं हे माझी भाष ॥ सत्य जाण ॥ ॥९१॥
ऐसा रायें करितां निर्धार ॥ ऐकोनि उठिला तो द्विजवर ॥ मग सेवकसि ह्नणें नरेंद्र ॥ आणा विक्रीत मांस ॥ ॥९२॥
तंव पक्षी ह्नणे अजा अमंगळ ॥ जगीं विटाळलें कुश्वळ ॥ तरी मज पाहिजे तात्काल ॥ मांस नराचें ॥९३॥
तेणें रावो गेला विकळी ॥ ह्नणे कवणा वधूं यज्ञकाळीं ॥ तंव प्रधान ह्नणे शूळीं ॥ असती चोर ॥९४॥
यापरी ऐकोनियां विचार ॥ रायासि ह्नणे द्विजवर ॥ हा प्रधान नव्हे साचार ॥ तुझा शत्रु ॥९५॥
यागकाळीं द्यावेम अनुच्छिष्ट ॥ चोर हा जीर्णकाळींचा नष्ट ॥ तरी सुलक्षणाचें होय सुष्ठ ॥ मांस आह्मां ॥९६॥
हें न ह्नणसी गा नृपनाथा ॥ तरी सत्व घेऊन जाईन आतां ॥ जरी राखणें असेल सुकृता ॥ तरी देई आहार ॥९७॥
तुझी तरी असे पूर्वील बोली कीं इच्छादान देणेम यागकाळी ॥ हें चुकेल तरी विटाळिली ॥ जिव्हा साच ॥९८॥
राव मनीं करी विचार ॥ ह्नणे बत्तीसलक्षणी कैंचा नर ॥ तरी आतां आपणाचि धरोनि धीर ॥ देऊं मांस ॥९९॥
तंव लोक करिती कटकटा ॥ कीं क्षीर घोंटिता रुतला कांटा ॥ आतां कपोता देऊनि नष्टा ॥ पाठवीं या ससाण्यासी ॥२००॥
रावो ह्नणे ऐका समस्त ॥ जिणें मरणें तरी निश्वित ॥ आतां सत्व टाकितां लिखित ॥ वाढेल काय ॥१॥
हें देह काळाचें भातुकें ॥ वित्त जाईल निमिषें एकें ॥ सत्व टळलिया पूर्वज देखें ॥ पडतील पतनीं ॥२॥
सत्त्वें वाढें धर्मकीर्ती ॥ सत्वें पाविजे ऊर्ध्वगती ॥ सत्व सांडिलिया कल्पांतीं ॥ न सरे शीण ॥३॥
राव ह्नणे धर्मसेन सुता ॥ तुळे लांबवीं न लावीं कथा ॥ असो पारडां घालोनि कपोता ॥ घेतले शस्त्र ॥४॥
तो पूर्वीच असे नेमस्थ ॥ मध्यस्थानीं इंद्रियजित ॥ द्वादशटिळे माळा शोभत ॥ तुळसी पुष्पांचिया ॥५॥
मग रायें ह्नणोनि श्रीनरहरी ॥ जानूसि घातली वज्रसुरी ॥ मांस का पोनियां भरी ॥ पारडें दुजें ॥६॥
तंव कपोता याची न भरे तुळा ॥ दुजें पारडें जाय अंतराळा ॥ रावो घाली मांस गोळा ॥ अंगींचा तेथें ॥७॥
ऐसे हस्तपादादि समस्त ॥ मांस घातलेंसे बहुत ॥ परी तुळा न ये विपरीत ॥ अधिकाधिकें ॥८॥
मग रावो मनीं विचारी आतां मांस न देखो शरीरीम ॥ ह्नणोनि पोटीं घालावया सुरी ॥ उचलिली रायें ॥९॥
तंव ससाणा ह्नणे गा भूपती ॥ हें जंठर भरलें मूत्रमळजंतीं ॥ तरी जठरमांस हें कल्पांतीं ॥ न खाववे आह्मां ॥२१०॥
मग अवस्थें वळली बोबडी ॥ हातापायांची वळली गुंडी ॥ रायाची पडली मुरकुंडी ॥ धरणी वरी ॥११॥
उचंबळला दुःखसागरु ॥ आंदोळलें कांति नगरु ॥ दुर्वाते मोडला मध्यमेरु ॥ शिभ्री चक्रवतीं ॥१२॥
ललाटें पिटिती समग्र ॥ ह्नणती कैसें जाहलें क्षेत्र ॥ आजी अल्पासाठीं शरीर ॥ वेंचिलें रायें ॥१३॥
एक ह्नणतीं एकांतें ॥ आह्मीं किती वधिलीं कपोतें ॥ होडा जिंको शस्त्रघातें ॥ नानापशूसी ॥१४॥
एकीं अंग टाकिलें धरणीं ॥ एकीं वर्जिले अन्नपाणी ॥ बाळकांसी न लाविती स्तनीं ॥ दुःखें तेणें ॥१५॥
आतां असो हा गहिंवरु ॥ किती उपसावा दुःखसागरु ॥ पाल्हाळ सांडोनि आवरु ॥ घेऊं कथेचा ॥१६॥
इकडे सावध होवोनि नृपवर ॥ ह्नणे मी भाकेसि नव्हें साचार ॥ पूर्ण न देववे मांसआहार ॥ या पक्षियासी ॥१७॥
तंव सत्यबती ह्नणे आपण ॥ माझेनि मांसें कराजी पूर्ण ॥ तुह्मी वांचलेति तरी स्त्रीजन ॥ होतील तुह्मां ॥१८॥
परि ससाणा ह्नणे गा भूपती ॥ सदा अशौच्या ह्या युवती ॥ तें अमंगळ मांस कल्पांतीं ॥ न भक्षों आह्मीं ॥१९॥
तंव धर्मसेन ह्नणेजी ताता ॥ माझेनि मांसे पुरवीं कपोता ॥ तूं वांचलासि तरी कन्या सुतां ॥ प्रसवसी राया ॥२२०॥
ससाणा ह्नणे हा कुश्वित ॥ व्रतबंधावीण शूद्रवत ॥ आणि परपीडेनें सुकृत ॥ घेतोसी राया ॥२१॥
वहनीं बैसोनि जाय तीर्था ॥ तो पावेना उत्तम सुकृता ॥ कीं दुजया वधोनि अतीतां ॥ भोजन दीजे जैसे पां ॥२२॥
परोपकारें धडे धर्म ॥ परपीडेनें होतसे अधर्म ॥ कीं आत्मलाभाहूनि उदीम ॥ सफळ नाहीं ॥२३॥
मग रायासि ह्नणे ससाणा ॥ मांस नाहीं तरी सोडीन प्राणां ॥ ह्नणोनि नव्याण्णव यागांचिया पुण्या ॥ राखें राया ॥२४॥
रायें नेत्र भरले जळीं ॥ ह्नणे मी सत्वधीर भूमंडळीं ॥ तरी शस्त्र घालोनि कंठनाळीं ॥ पुरवीन पण ॥२५॥
जैसें तेज गेलिया नेत्रकमळ ॥ कीं ज्योतीविण मुक्ताफळ ॥ तैसें सत्व गेलिया शिरकमळ ॥ काय काज ॥२६॥
कीं प्रार्णेवीण शरीर ॥ नातरी भ्रतारें वीण सुंदर ॥ तेसे सत्वेंवीण नारीनर ॥ अशोभ्य सदा ॥२७॥
ह्नणोनि बैसला लवडसवडी ॥ पुत्र प्रधानीं धरिला दंडीं ॥ ह्नणे शिर घालोनि पारडीं ॥ राखीन सत्व ॥२८॥
तंव नारद गेला विष्णुभुवना ॥ कथिली रायाची विवंचना ॥ ह्नणें इंद्रें आजि भक्तजनां ॥ आणिला क्षय ॥२९॥
वेगें चलावें गा श्रीपती ॥ जंव आहे शिभ्री चक्रवर्ती ॥ शस्त्र घेतलें आहे हातीं ॥ शिर छेदावया ॥२३०॥
मग बैसोनि गरुडासनीं ॥ विष्णु आला भक्तभुवनीं ॥ साठीं सहस्त्र घंटा विमानीं ॥ दूतांसहित ॥३१॥
तेहतीसकोटी सुरवर ॥ विमानीं दाठलेंसे अंबर ॥ गण गंधर्व यक्ष किंनर ॥ पाहती कौतुकें ॥३२॥
रायें प्रधाना निरोपिली सत्यवती ॥ ह्नणे आन न धरावें चित्तीं ॥ पुत्रप्रधानेंसी राज्यस्थिती ॥ चालवीं निकी ॥३३॥
तैसेंचि प्रधान आणि प्रजा ॥ धर्मसेनासि निरवी राजा ॥ ह्नणे आह्मी तंव गरुडध्वजा ॥ जाऊं वोळंगें ॥३४॥
मागें समस्तीं द्यावें चित्त ॥ द्र्व्य अर्जावें धर्मार्जित ॥ परि सत्व न सांडावें निश्वित ॥ पडलियाकांहीं ॥३५॥
वेदधर्माची करावी चिंता ॥ वैरियां न जावें शरणागता ॥ आणि विन्मुख न व्हावें अतीता ॥ सर्वथा तुह्मीं ॥३६॥
हदई न विसरावा नारायण ॥ जेणें रचिला असे हा प्राण ॥ जरी आमुचा होसी कुळनंदन ॥ तरी न सांडावें व्रत ॥३७॥
मग नरहरिनामें बाहूनि थोर ॥ रायें उचलिलें महाशस्त्र ॥ पारडीं पाडावया शिर ॥ अनुमानिलें ॥३८॥
वामकरें धरोनि कुरळीं ॥ शस्त्र घाली कंठनाळीं ॥ कापावें तंव वनमाळी ॥ धरित हातें ॥३९॥
तेणें पारडां सांडलें शोणित ॥ मग तो तुका आला कपोत ॥ तंव भला ह्नणोनि समस्त ॥ गर्जिन्नले देव ॥२४०॥
जंव दृष्टीं पाहे नरेंद्र ॥ तंव एक अग्नी एक इंद्र ॥ आणि हातें धरुनि श्रीवर ॥ उभा असे ॥४१॥
देवीं केली पुष्पवृष्टी ॥ वाद्यें वाजों लागलीं वैकुंठी ॥ रुप भासलें दिव्यदृष्टीं ॥ रायाचे पैं ॥४२॥
शंख चक्र गदा कमळ ॥ गळां कौस्तुभ वैजयंती माळ ॥ पीतांबर हदयी तेजाळ ॥ श्रीवत्स चिन्ह ॥४३॥
तनु अति सुरेख सुनीळ ॥ करचरण जाणों रातोत्पळ ॥ रत्नकीळ मुकुटीं झळाळ ॥ कोटिदिनेशांचा ॥४४॥
ऐसी देखोनि दिव्यमूर्ती ॥ सात्विकें दाटला भूपती ॥ मग शरण होवोनियां स्तुती ॥ मांडिली रायें ॥४५॥
ह्नणे जयजयाजी भक्तवत्सला ॥ कृपानिधी परमशीळा ॥ जयजयाजी ब्रह्मांडगोळा ॥ अंकुरलासि तूं ॥४६॥
जयजयाहो शांरगधरा ॥ जयजया तूं अपरंपारा ॥ जय भक्तजनवज्रपंजरा ॥ नृसिंहा तूं ॥४७॥
जयजयाजी ज्योतिलिंगा ॥ परम पूज्या महाभागा ॥ जय यज्ञकमळभृंगा ॥ वराहरुपा ॥४८॥
जय मत्स्यकूर्म अवतारा वराह नृसिंह उपेंद्रा ॥ फरशधरा रामचंद्रा ॥ साक्षात्कारिया ॥ ॥४९॥
कृष्ण अवतार घेवोनि गोकुळा ॥ तैं दैत्य मर्दिले गोपाळा ॥ मग बौद्धरुप गा कृपाळा ॥ धरिलें तुवां ॥ ॥२५०॥
पृथ्वीसि होय पातकभार ॥ हितां धर्मकर्माचा विचार ॥ तैं तूं करिशी संहार ॥ कलंकिरुपें ॥५१॥
ऐसे अवतार युगानुयुगीं ॥ घेसी धर्मस्थापनेलागीं ॥ तो तूं आजि तनुत्यागीं भेटलासि मज ॥५२॥
ह्नणोनि घातलें दंडवत ॥ आजि सुफळ जाहलें जीवित ॥ कीं सहस्त्रयागांचे दैवत ॥ भेटलासि तूं ॥५३॥
मग मांडोनि कनकपाट ॥ राव राणी बैसवी वैकुंठ ॥ लक्ष्मीयें भरिला शेंसपाट ॥ दोघांजणासी ॥५४॥
कनकताटीं दीपारती ॥ लक्ष्मीयें वोंवाळिला चक्रवतीं ॥ तंव हरी ह्नणे गा पुण्यकीर्तीं ॥ बैसावें विमानीं ॥५५॥
देवी पाहिला तुझा अंत ॥ परि तुं सत्वाचा निजभक्त ॥ आतां राहें गा निवांत ॥ वैकुंठासी ॥५६॥
रावो ह्नणे जी अनंता ॥ मज नेसी हे काय अपूर्वता ॥ तरी कृपा करावी अनाथनाथा ॥ कांतिजनांसी ॥५७॥
यांसी कैंची कर्मउजरी ॥ कीं तूतें पाविजेती श्रीहरी ॥ कोटि कर्वत भेदिता शिरीं ॥ परि न घडे ऐसें ॥५८॥
मग ह्नणे श्रीअनंत ॥ या जडजीवां कैंचा ऊर्ध्वपंथ ॥ हे योगी नव्हती गृहस्थ ॥ पुनरपि जेव्हां ॥५९॥
तंव रावो बोले मंजुळ ॥ देवा तुंबीचे वक्रफळ ॥ तें आपण तरोनि तारी वेल्हाळ ॥ आणिकासी ॥२६०॥
तैसे तुझे भक्तीचे गौरवां ॥ हे पुरजन न्यावे जी देव देवा ॥ हा ठेवा तुवां वाढवावा ॥ भूमंडळीं माझा ॥६१॥
जैसा उदय पावलिया दिनकर ॥ तेणें चोरांचा फिटे थार ॥ तैसा तूं प्रसन्न जालिया अव्हेर ॥ न करीं जनांचा ॥६२॥
कीं कनकाचे करुनियां टांक ॥ संगें पूजा पावे लाख ॥ तैसे माझिये संसर्गें लोक ॥ पावावे तुज ॥६३॥
ऐसें रायाचें ऐकोनि उत्तर ॥ तेंख अनंतें मानोनि परिकर ॥ गणांसि ह्नणे नगर समग्र ॥ घाला विमानीं ॥६४॥
मग समस्त गोत्र कुमर ॥ व्याही जामात अन्यत्र ॥ दास पाहुणे आणि इतर ॥ घातले विमानीं ॥६५॥
पशु पक्षी स्वामीं किंकर ॥ कनिष्ठ उत्तम पापाचार ॥ ऐसें घातलें कांतिनगर ॥ विमानामाजी ॥६६॥
लागलिया निशाणभेरी ॥ विमानघंटाचिये गजरीं ॥ मग आरुढलें श्रीहरी ॥ गरुडासनीं ॥६७॥
मग जयजयकारें गर्जोनि वाणी ॥ विमानें चालविलीं विष्णुगणीं ॥ शिभ्री नेला वैकुंठभुवनीं ॥ गोविंद देवें ॥६८॥
जैसी एक चंदनवनस्पती ॥ सौगंधित करिते सर्वाप्रती ॥ तैसें केलें शिभ्रि नृपतीं ॥ कांतिनगर ॥६९॥
मुनि ह्नणे गा राया भारता ॥ देव भक्ताधीन सर्वथा ॥ वत्सोत्सुका जैसी माता ॥ विचरे वनीं ॥२७०॥
पाहें अंबॠषीचिये अवस्थां ॥ तैं गर्भवास घेतले माथां ॥ आणि राखिता जाहला आकांत ॥ हिरण्यकश्यपसुतासी ॥७१॥
तो देव उत्तरेचिया उदरीं ॥ मळमूत्राचे मंदिरीं ॥ नवमास राहिला श्रीहरी ॥ भक्तिलागीं ॥७२॥
तैसाचि शिभ्रीचिया आर्तीं । वैकुंठा नेली नगरी कांती ॥ हें अपूर्व नव्हे गा भूपती ॥ जन्मेजयराया ॥७३॥
ऐसा पवित्र हा सोमवंश ॥ जैसा पंचप्रकारीं ऊंस ॥ कीं सुगंधा जेवी पोतास ॥ पवित्र जैसा ॥७४॥
सर्व देवांसि कमळापती ॥ घेऊनि गेला शिभ्रिचक्रवतीं ॥ ह्नणोनि नगरा विष्णुकांती ॥ ठेविलें नाम ॥७५॥
हें शिभ्रीचक्रवतींचें आख्यान ॥ जया होय श्रवण पठण ॥ तया त्रिवेणीचें माघस्त्रान ॥ घडलें सत्य ॥७६॥
हे स्कंदपुराणींची कथा ॥ तुज म्यां कथिली गा भारता ॥ काहीं भागवताच्या अनुमता ॥ व्यासवचनें ॥ ॥७७॥
आतां पुरुरव्याचा पुत्र ॥ चौथा बोलिजे एकवीर ॥ त्याचा सांगों वंशविस्तार ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥ ॥७८॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ शिभ्रीआख्यान विस्तारु ॥ षोडशोऽध्यायीं सांगितला ॥२७९॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥