कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

जन्मेजय ह्नणे वैशंपायना ॥ नंदीचे पूजिती वृषणा ॥ तो वंद्य जाहला त्रिभुवना ॥ कवणे गुणें ॥१॥

आधीं नमस्कार वृषणी ॥ मग लागिजे नंदीचे चरणीं ॥ नंतर पाहिजे शूळपाणी ॥ कवणे गुणें ॥२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ वैकुंठीं होता नारायण ॥ तंव बोलाविला सुपर्ण ॥ देवें विनोदार्थ ॥३॥

हरि ह्नणे गा सुपर्णा ॥ तूं आद्य वंद्य विष्णुगणां ॥ तरी तुझिये बळाची गणना ॥ सांग मज ॥४॥

तंव देवासि बोले वैनंत ॥ मी त्रिभुवनासी अजित ॥ मज कोपलिया कृतांत ॥ होय पाठिमोरा ॥५॥

सप्त समुद्र क्षणघोटी ॥ अष्टकुळाचळ घालों शकें पोटीं ॥ पृष्टी वाहोनियां सृष्टी ॥ उडों शकें ॥६॥

हे इंद्रादिक सुरगण ॥ मज जैसें कमळवन ॥ राउळें तरी अंगवण ॥ अनुभविलीसे ॥७॥

प्रत्यक्षासी काय प्रमाण ॥ हें सांगतील स्वामी आपण ॥ मग भला भला ह्नणोनि वदन ॥ विकसित हरी ॥८॥

मग देवा ह्नणे खगेंद्रा ॥ तुजसी प्रतिमल्ल नाहीं दुसरा ॥ ह्नणोनि ध्वजस्तंभीरे वीरा ॥ वाहिलें म्यां ॥९॥

आतां येक वहिलें करीं ॥ नंदी असे शिवाचे द्वारीं ॥ जावोनि त्यातें ह्नणें श्रीहरी ॥ बोलावितो तुज ॥१०॥

तुज बोलवी हषीकेशी ॥ हें वारंवार ह्नणावें त्यासी ॥ नयें ह्नणेल तरी बाहूसी ॥ बांधोनि आणावें ॥११॥

मग तो गेला रुद्रनिवासा ॥ कथिला हरीचा संदेशा ॥ ह्नणे चाल गा शिवदासा ॥ हरिभेटीसी ॥१२॥

परि तें नंदी न ऐके श्रवणीं ॥ तो ध्यानस्थ असे शिवचिंतनी ॥ मग हातें लोटोनियां त्राणीं ॥ दीधलीं हाक ॥१३॥

तेणें कोपले शिववाहन ॥ ह्नणे येवढा कैसा रे दुर्जन ॥ शिवध्यानाचें साक्षपण ॥ मोडिलें माझें ॥१४॥

ह्नणोनियां उघडिली दृष्टी ॥ गरुड धरिलासे करसंपुटीं ॥ परि ह्नणे गा चाल वैकुंठीं ॥ हरिसेवेसी ॥१५॥

मग ह्नणे नंदिकेश्वर ॥ हरि कैंचा रे तो ईश्वर ॥ शिवद्रोहिया अपवित्र ॥ वाजटा तूं ॥१६॥

ह्नणोनि हाणितला श्वासघ्राणें ॥ जाणो तरुपत्र नेलें प्रभंजनें ॥ शतयोजनांचेनि प्रमाणे ॥ नेला गरुड ॥१७॥

सवेंचि आकर्षिलें घ्राण ॥ जैसा योगी साधी धूभ्रपान ॥ तैसें केलें अयागमन ॥ गरुडासि पैं ॥१८॥

ऐसा शतसहस्त्रवरी ॥ गरुड जर्जर जाहला गात्रीं ॥ ह्नणे बरवें योजिलें गा श्रीहरी ॥ हें मजलागीं ॥१९॥

घ्राणवाताचिये वळसां ॥ थोर पीडलों गा हषीकेशा ॥ धांवधांव आतां यमपाशां ॥ पडिलों हरी ॥२०॥

नंदीघ्राणाचिये विवरीं ॥ अयागमनें गुंतलों गात्रीं ॥ आत्मा आहे जंव शरीरीं ॥ तंव धांवे वहिला ॥२१॥

ऐसी जाणोनि काकुळती ॥ धांवोनि आला श्रीपती ॥ सवें घेवोनियां सुरपती ॥ देवांसहित ॥२२॥

देखोनि गरुडाची अवस्था ॥ ह्नणे आतां हा जाईल यमपंथा ॥ तरी धरावें गा सुरनाथा ॥ या गरुडासी ॥२३॥

तंव गरुडातें धरी इंद्र ॥ परि नंदीचा नावरे समीर ॥ ह्नणोनि झोंबला शारंगधर ॥ सोडवणेसी ॥२४॥

परि तो नावरे घ्राणवात ॥ जाणों प्रळ्यकाळींचा वृत्तांत ॥ तया वाराणसी समर्थ ॥ नाहीं कोणी ॥२५॥

इंद्र सकल देवां सहित ॥ सर्वगणेंसी अनंत ॥ आणि राखणाइतां समवेत ॥ घातले घ्राणीं ॥२६॥

जंव ते समस्त पडावे घ्राणीं ॥ तंव गरुडा सोडवी वज्रपाणी ॥ मग विस्मित होवोनि चक्रपाणी ॥ बोलिला तो ॥२७॥

तंव गरुडें सोडिली आशा ॥ ह्नणे मेलीं हा भरंवसा ॥ मग देवीं स्मरिलें महेशा ॥ कृपावंतासी ॥२८॥

ह्नणती धांव गा पशुपती ॥ गरुड गांजिला नंदिवातीं ॥ तें जाणोनिया उमापती ॥ पावला तेथें ॥२९॥

मग ह्नणे महारुद्र ॥ यासीच विचारा प्रतीकार ॥ सत्राणें करुनि नंदिकेश्वर ॥ नावरे कवणा ॥३०॥

तंव बोलिला चतुरानन ॥ याचा आकर्षावा वृषण ॥ तेणें दुर्मरणापासोनि सुपर्ण ॥ चुकेल सत्य ॥३१॥

तें मानवलें समस्तां ॥ ह्नणती बरवी विचारिली योग्यता ॥ मग वृषणीं झोंबले गा भारता ॥ समस्त देव ॥३२॥

मग व्याकुळ होवोनि श्रीवत्स ॥ नंदी सांडीत घ्राणश्वास ॥ तेणें गरुडा जाहला अवकाश ॥ पळावयासी ॥३३॥

जाणों सिंहाचे मुखीचा ग्रास ॥ माशिया वारितां सुटे श्वास ॥ तैसा घेवोनि देह अंश ॥ पळे गरुड ॥३४॥

देवी केला जयजयकार ॥ मस्तकीं वंदिला नंदीश्वर ॥ ह्नणती क्षमा करोनि पक्षीद्र ॥ राखिला त्वां ॥३५॥

मग देवी दीधला वर ॥ शिवापूर्वी पूजावा नंदीश्वर ॥ परि तया आधीं नमस्कार ॥ करावा वृषणा ॥३६॥

या वृषणाचेनि प्रसादें ॥ गरुड चुकला वातबाधें ॥ असो वृषण पूजोनि आनंदें ॥ गेले देव ॥३७॥

परि गरुड बोलिला शापवचन ॥ कीं याचे पीडा पावोत वृषण ॥ तेणें दुःखें मदभंजन ॥ होकां याचें ॥३८॥

गरुडा प्रार्थिती देवगण ॥ आह्मां नंदीचें दे वरदान ॥ तरी याचे प्रजांचे वृषण ॥ पावोत पीडा ॥३९॥

गरुडें उःशाप दीधला ॥ मग स्वस्थानीम पातला ॥ देवांसहित इंद्रही गेला ॥ अमरावतीसी ॥४०॥

नंदीनें धरिलें शिवध्यान ॥ ऐसें निवारलें व्यसन ॥ ऋषि सांगे रायालागुन ॥ कथा हे पैंख ॥४१॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ त्वां पुसिली नंदीची कथा ॥ तरी वृषण पूजावयाच्या आर्ता ॥ जाहलें ऐसें ॥४२॥

परि दुजें येथें कारण ॥ गरुडाचें केलें गर्वभंजन ॥ आणि हरीची रीघाली आंगवण ॥ नंदीमाजी ॥४३॥

हे शिवपुराणीची योग्यता ॥ तुज म्यां कथिली गा भारता ॥ तंव रावो ह्नणे अग्रकथा ॥ सांगा मुनी ॥४४॥

मुनि ह्नणे गा अवधारीं ॥ दक्षशिर होमिलें अध्वरीं ॥ देवां दंडोनि नानापरी ॥ गेला वीरभद्र ॥४५॥

दाक्षायणी ते सती कोकिळा ॥ तियेने राहविली मनुबाळा ॥ मग ते सहस्त्रवर्षे वेल्हाळा ॥ होती प्रेत घेऊनी ॥४६॥

ॠषि ह्नणे राया भारता ॥ आतां ऐकें दक्षकथा ॥ समूळ सांगतों तत्वतां ॥ तुजप्रती ॥४७॥

दक्षपत्नी सती प्रसूता ॥ यज्ञभूमीमाजी भारता ॥ हदयी वाहुनियां प्रेता ॥ राहिली तेथें ॥४८॥

इकडे इंद्रादिक दिक्पाळ ॥ गणगंधर्व देव सकळ ॥ ब्रह्यासि सांगती तयेवेळ ॥ वृत्तांत त्याचा ॥४९॥

जीजी देवा चतुरानना ॥ सकळ दाविती घायवणा ॥ दक्ष वघोनियां विटंबणा ॥ केली वीरभद्रें ॥५०॥

होमीं जाळिलें दक्षशिर ॥ थोर विटंबिले सुरवर ॥ तें दुःखाचें ऐकोनि उत्तर ॥ उठिला ब्रह्मा ॥५१॥

मग त्या विरिंची सहित ॥ देव निघाले दुःखित ॥ विष्णूसी सांगावया मात ॥ गेले वैकुंठासी ॥५२॥

विष्णूपासीं सांगती समस्त ॥ थोर जाहलें जी अनुचित ॥ दक्षा वधोनिया शिवदूत ॥ गेले कैलासा ॥५३॥

विध्वंसिलें यागवहन ॥ विटंबिले देव ब्राह्मण ॥ होमी जाळिलें असे वदन ॥ प्रजापतीचें ॥५४॥

आणिक ऐकें ना वचनीं ॥ आपणाचि आली भवानी ॥ दक्षाप्रति दोषोनि निर्वाणीं ॥ त्यजिला प्राण ॥५५॥

ऐकोनी ह्नणे हषीकेशी ॥ दक्षें कां निर्भार्त्सिला महेश ॥ बीजा सारिखा फळरस ॥ पावला तो ॥५६॥

महासती ते दाक्षायणी ॥ अपमान पावली दक्षयज्ञीं ॥ तिये वांचूनि दक्षनंदिनी ॥ येरा प्रभावें हळुवट ॥५७॥

अजे उदरीं उभय स्तन ॥ तैसेचि कंठीं दीर्घ दोन ॥ सारिखे परि वत्सा जीवन ॥ अनारिसें ॥५८॥

मधु आणि क्षतमक्षिका ॥ दोनी दिसती समतुका ॥ परी दुर्गधीकें मधुपाका ॥ रचूं शके येर ॥ ॥५९॥

नातरी घटउत्पत्ती कुलालचक्रीं ॥ तेचि उपमिजेती स्तन नारी ॥ नाम सादृश्य परि विकारीं ॥ अनारिसे दोन ॥६०॥

आपुली न विचारी सबलता ॥ आज्ञा उल्लंधी मदोन्मत्ता ॥ महेशा ऐशा समर्था ॥ पुरों शके केवीं ॥६१॥

तो प्रौढीनें महा समर्थ ॥ वीतरागी इंद्रियजित ॥ त्याचा कदा न कळे अंत ॥ सर्वथा मज ॥६२॥

हे इंद्रादिक सकळ ॥ गणगंधर्व लोकपाळ ॥ हे नेणती मूळडाहाळ ॥ धर्माचे पैं ॥६३॥

जैसा आमिषा लक्षीत मीन ॥ नातरी मैथुनी अनुभवी श्वान ॥ तो सुखाअंतीं अपमान ॥ पावे जैसा ॥६४॥

कीं अज्ञान मायावेखीं ॥ तो शास्त्रज्ञलोकां न लेखी ॥ शेवटी होय महा दुःखी ॥ काळदंडीं जैसा ॥६५॥

तैसें जाहलें दक्षदेवा ॥ तुह्मीं असतां महानुभावा ॥ देह त्यजितां कां शांभवा ॥ न वर्जिली देवी ॥६६॥

कारे निंदिले शिवासी ॥ कांरे शापिले भक्तीसी ॥ कांरे कुडे ऐशिया कर्मासी ॥ केलें तुह्मीं ॥६७॥

जैसें तैसे भोगिले ॥ परि या तुह्मां जिवें सोडिलें ॥ आतां येथें कां विनवूं आले ॥ यामुखें करोनी ॥६८॥

तुह्मां दंडिले वीरभद्रें ॥ तें मज मानवलें निर्धारें ॥ परि तुह्मांसी नंदीश्वरें ॥ राखिलें जित ॥६९॥

कोपला जाणोनि श्रीपती ॥ राहिली वृत्तांत विनंती ॥ मग गेले स्वस्थानाप्रती ॥ सकळहि देव ॥ ॥७०॥

असो राहिलेंख यागहवन ॥ रुद्राचें वर्जिलें भागदान ॥ त्रिलोकींचे भ्यालें यजमान ॥ यागकार्यासी ॥७१॥

भुकें पीडलें देवगण ॥ ब्राह्मण लोक ॠषिजन ॥ होमें वीण उपोषण ॥ जाहलें त्रिलोकीं ॥७२॥

ऐशीं गेलीं वर्षे सहस्त्र ॥ तपीं बैसलासे महारुद्र ॥ तंव इकडे आला ब्रह्मकुमर ॥ त्या सतीपासीं ॥७३॥
उभा राहोनियां नारद ॥ पाहतसे सतीचा विनोद ॥ वरि ऊर्ध्व केलासे कंद ॥ मृत्तिकेचा ॥७४॥

जाहलें मांसाचे समर्पण ॥ परि उरले अस्थिगत प्राण ॥ तेणें करिता ऐकिलें स्मरण ॥ रामनामाचें ॥७५॥

हदयीं कवळोनी दक्षशरीरा ॥ जैसा कनकीं जडिला हिरा ॥ तेथें कोंदण जाहलें तरुवरां ॥ सर्वमूळांचें ॥७६॥

जैसे गारेचे तांदळ ॥ खेळतां रांधीतसे बाळ ॥ तैसी क्रमितसे काळवेळ ॥ कल्पवरी ॥७७॥

आतां शिजेल ह्नणे भात ॥ ह्नणोनि विलोकी पात्रांत ॥ तैसा पाहतसे दक्षनाथ ॥ महासती ते ॥७८॥

देखोनि मुनी कंटाळला ॥ ह्नणे अहो जी जाश्वनीळा ॥ येवढी कां केली अवकळा ॥ प्रसूतीची ॥७९॥

मग तेथोनि गेला नारद ॥ विष्णूसी करी अनुवाद ॥ ह्नणे थोर देखिला विनोद ॥ भूमंडळीचा ॥८०॥

मी गेलों होतों यागस्थाना॥ तेथें देखिली दक्षांगना ॥ अस्थिगत जाहली प्राणां ॥ परि न विसंबे रुंडातें ॥८१॥

मुखीं रामनामोच्चार ॥ वरी मृत्तिकेचा डोंगर ॥ तें देखोनियां गहिंवर ॥ आला मज ॥८२॥

जैसें गांजिता अनाथा ॥ तया नाहीं बंधु सोडविता ॥ तैसें जाहले गा अनंता ॥ प्रसुतीसी ॥८३॥

ते जरी कोपेल महासती ॥ तेधवां कैंचा तूं आणि पशुपती ॥ तरी वेगीं उठवी प्रजापती ॥ यजमानासी ॥८४॥

विष्णू ह्नणे गा ब्रह्मकुमरा ॥ मी आधीन त्या महारुद्रा ॥ मज दीधलें असुरसंहारा ॥ सुदर्शन हें ॥८५॥

लक्ष्मी ऐसें दीधले रत्न ॥ श्याम जाहलों करितां ध्यान ॥ आणि वाहिले म्यां लोचन ॥ नीलकंठासी ॥८६॥

आपण होवोनि तापस ॥ मज दीधला भोगविलास ॥ तो माझेनि कैं दुरावें महेश ॥ नारदा गा ॥८७॥

ऐसें बोलोनि श्रीहरी ॥ नारद निवारिला उत्तरीं ॥ मग तो गेला झडकरीं ॥ ब्रह्मलोकासी ॥८८॥

नारद ह्नणे विरिंचीसी ॥ तुह्मी आणि मिळोनियां हषीकेशी ॥ विनवोनियां शिवासी ॥ उठवूं दक्ष ॥८९॥

दक्षासारिखा पुण्यवंत ॥ यागकरिता महा विख्यात ॥ अजूनि तरी पाहतां अंत ॥ महासतीचा ॥९०॥

तेव्हां किन्नर गण गंधर्व ॥ यक्ष गुह्यक पितर सर्व ॥ पन्नग ॠषि ब्राह्मण देव ॥ मिळाले पैं ॥९१॥

मग ब्रह्मादि लोकपाळ ॥ यम इंद्रादि दिक्पाळ ॥ ते निघते जाहले सकळ ॥ विष्णुभुवनासी ॥९२॥

ऐसे सर्वही निघाले ॥ वेगें विष्णुभुवना पातले तंव विष्णुतें देखिंले ॥ लक्ष्मीसहित ॥९३॥

ब्रह्मा ह्नणे गा श्रीहरी ॥ यागाविणें पीडलों भारी ॥ कामधेनु तुमचे घरीं ॥ भोजनासी ॥९४॥

हे इंद्रादिक दिक्पाळ ॥ गणगंधर्व लोकपाळ ॥ भुकें पीडलें सकळ ॥ यागाविणें ॥९५॥

यजमान पडिला भूमंडळीं ॥ त्यांचा तूं तुकवा सांभाळी ॥ बुजवोनियां चंद्रमौळी ॥ उठवीं दक्ष ॥९६॥

तंव कृपा आली शारंगधरा ॥ सकळां ह्नणे करारे हाकारा ॥ काज असे अवधारा ॥ तरी निघा वहिले ॥९७॥

मग अग्नि वायु इंद्र ॥ रवी निॠती कुबेर ॥ यम वरुण आणि चंद्र ॥ हरि ब्रह्मादि ॥९८॥

गण गंधर्व विद्याधर ॥ यक्ष सिद्ध सनत्कुवार ॥ देव प्रजापती किन्नर ॥ आले समस्त ॥९९॥

ग्रह वेताळ सनातन ॥ किंपुरुष सिंहवदन ॥ पितृगण चारण सनंदन ॥ सनकादि पै ॥१००॥

ऐसे मिळोनियां भूपती ॥ निघोनि आले कैलासाप्रती ॥ जेथें नांदत असे पशुपती ॥ त्रैलोक्यनाथ ॥१॥

पावले मेरुचें अधोपार ॥ तेथें एक सिद्धसरोवर ॥ महा अनुपम्य मनोहर ॥ देखिलें देवीं ॥२॥

तया देखोनि सरोवरा ॥ विस्मयो जाहला शांरगधरा ॥ उदक घ्यावया भीतरीं ॥ निघाला हरी ॥३॥

तंव देखिली एक शिळा ॥ वरी कनकमळांची माळा ॥ ते वैजयंती घातली गळां ॥ नारायणें ॥४॥

पुढील जाणोनि कैची यजमानविनवणी ॥ दुःख होईल शूळपाणी ॥ देखोनि मज ॥५॥

शूळयागीं नासलीं दाक्षायणी ॥ तेथें कैंची यजमानविनवणी ॥ दुःख होईल पाणी ॥ देखोनि मज ॥।६॥

जैसें पोळल्या वरी उन्हवणी ॥ तेथें कैंची बोलवणी ॥ तैसा देखोनि शूळपाणी ॥ कोपेल मज ॥७॥

तुह्मां गरज असे अध्वरा ॥ तरी जावोनि विनवा शंकरा ॥ आतां मी जाईन माघारा ॥ स्वस्थानासी ॥८॥

असो ऐसी ते उद्धरोनि शिळा ॥ मग विष्णु परतला गा भूपाळा ॥ तंव देवांसहित ब्रह्मा निघाला ॥ शिवापाशीं ॥९॥

ते वेगीं जाती सुरवर ॥ तंव पावले अलकापुर ॥ जेथें महादेवाचें भांडार ॥ कुबेर राखी ॥११०॥

ते अलकापूर नगरी ॥ तयेची कवणा वर्णवे कुसरी ॥ कनकरत्नांचीं परोपरी ॥ दामोदरें तेथें ॥११॥

जेथें दिव्यांगना नारी ॥ कनकरत्न शिळा द्वारीं ॥ तेथील उदक नानापरिमळीं ॥ शीतळ वाहे ॥१२॥

नागरीक नर आणि नारी ॥ सिद्ध साधक ब्रह्मचारी ॥ स्त्रानें करुनियां त्रिपुरारी ॥ उपासिती सदा ॥१३॥

तेथें येवोनि सुरवर ॥ हर्षे जाहले निर्भर ॥ स्थान देखोनि मनोहर ॥ उतरिलीं विमानें ॥१४॥

ते नदी अलकेचे मेळीं ॥ देवीं स्त्रान वंदनें सारिलीं ॥ सुशीळ जाहले चंद्रमौळी ॥ दर्शनासी ॥१५॥

मग नगरमुखीं अलोलिका ॥ सिद्धरम्य रुद्रवाटिका ॥ तेथें देवीं देखिलें एका ॥ वटवृक्षासी ॥१६॥

तया नाम सिद्धवट ॥ शतयोजनें उंच दाट ॥ भोंवता छायाघनवट ॥ योजनें ऐशी ॥१७॥

पारंबिया मिरवलीं बाहालीं ॥ तेंचि स्वयंभु मन देजळीं ॥ तेथें देखिला चंद्रमौळी ॥ विरिंचिदेवें ॥१८॥

अंगीं दीप्ती कर्पूरगौर ॥ कीं पौर्णिमेचा पूर्ण चंद्र ॥ भोंवती तारागणें चौफेर ॥ गमले सिद्ध ॥१९॥

तेथें देव जाहले चकोर ॥ घ्यावया रसनेचें क्षीर ॥ परि पडिलें दक्षाचें शिर ॥ जीववावयासी ॥१२०॥

नातरी तो पदकींचा हिरा ॥ मध्यें नायक महारुद्रा ॥ भोंवता सिद्धसाधकांचा फेरा ॥ गमला तैसा ॥२१॥

कीं तो देवसाळीचा वोगर ॥ भोंवता सिद्धशाकांचा पडिभार ॥ मध्यें अनादि तो रुद्र ॥ गमला तेथें ॥२२॥

नातो क्षीरसागरींचा कल्होळ ॥ कीं छाये निवाला शीतळ ॥ तेथें शुकासिद्धां केवळ ॥ गमला रुद्र ॥ ॥२३॥

अथवा तो चंदनतरुवर ॥ त्रिविधतापहर परिकर ॥ सिद्धसर्पी महारुद्र ॥ वेढिला तैसा ॥२४॥

कीं तो कर्पुराचा पर्वत ॥ सिद्धभ्रमरीं असे वेष्टित ॥ तैसा देखिला जगन्नाथ ॥ देवीं सकळीं ॥२५॥

मग उतरले विमानातळीं ॥ नमस्कारिला चंद्रमौळी ॥ तंव ध्यानीं लागली टाळी ॥ महादेवाची ॥२६॥

आंगीं विभूतीची उटी ॥ दर्भासन शोभे तळवटीं ॥ कंठीं रुद्राक्षांची दाटी ॥ हातीं अक्षमाळा ॥२७॥

चंद्ररेखा शोभे ललाटी ॥ जटा पसरोनियां पिंगटी दंड शोभला कटवटीं ॥ व्याघ्रांबरेंसीं ॥२८॥

दशभुज पंचवक्त्र ॥ कंठ सुनीळ त्रिनेय ॥ तो कंदर्पदर्पसंहार ॥ शोभे शंभु ॥२९॥

माथां गंगेचें वाहे पाणी ॥ हदयीं मुंडांचे डोलती मणी ॥ सर्वागीं शोभलीं लेणीं ॥ महासर्पाचीं ॥१३०॥

मुखीं रामनामचिंतन ॥ अंतरी सत्वगुणांचें ध्यान ॥ ह्नणोनि कर्पुरगौर आपण ॥ जाहला रुद्र ॥३१॥

हातीं खड्र् त्रिशूळ फरश ॥ शंख डमरु नागपाश ॥ अक्षमाळा रात्रंदिवस ॥ जपे सदा ॥३२॥

वीरघंटा आणि चक्र ॥ नानाशक्तींचे बीजमंत्र ॥ मस्तकीं गंगात्रिनेत्र ॥ शोभे देवो ॥३३॥

हातीं धनुष्य आणि शर ॥ दहावें घेतलें पाशुपतास्त्र ॥ ऐसिया देखतां सुरवर ॥ संतोषले ॥३४॥

बैसलासे सिद्धासनीं ॥ कटी वेष्टिली नागबंधनीं ॥ राहिला असे उन्मनी ॥ तर्कमुद्रे ॥३५॥

इडे पिंगळेचे पवनां ॥ तयां आकुंचिलें जाणा ॥ नेलें सुषुभ्रेचे भुवना ॥ आंतील जीवनातें ॥३६॥

तेणें भरिली षट्र्चक्रें ॥ सर्पिणी उगवली ऊर्ध्वशिरें ॥ मग पश्विमेचिया मोहरें ॥ सूतिला पाट ॥३७॥

बहात्तर सहस्त्र नदींचे रस ॥ तेणें भिजले स्वर्ग येकवीस ॥ स्पर्श मात्रें बुढाले पन्नास ॥ सोहश्वांसादी ॥३८॥

मग अग्निचक्राचे उपकंठीं ॥ अनुहात सारणीचे पाठी ॥ तेथें न्हाणीतसे धूर्जटी ॥ श्रीअनंतातें ॥३९॥

तेथें ध्येय ध्याता ना घ्यानीं ॥ चंद्र तारा ना दिनमणी ॥ ज्योती न्याहाळितां शूळपाणी ॥ विसरले आपणा ॥१४०॥

तेथें अमृताचें वेगळालें ॥ अंतरीं कामधेनु बोले ॥ तेथें परमानंदसोहळे ॥ रुद्र देवो ॥४१॥

ऐसें निररुप न्याहाळित ॥ देवीं देखिला जगन्नाथ ॥ जो योगियांचा परमार्थ ॥ ईश्वर तो ॥४२॥

भृंगी ऋटी मणिमंत ॥ नंदी आणि कुबेर भक्त ॥ चंडीश वीरभद्र स्तवित ॥ हस्त जोडोनियां ॥४३॥

सनक आणि सनंदन ॥ सनत्कुमार सनातन ॥ ऐसे सेवकीं पंचानन ॥ शोभला तो ॥४४॥

सिद्ध साधक निराशक ॥ कोपी मुनी आणि दंडक ॥ चारीं वीर सिद्ध देख ॥ संतश्रेष्ठ तो ॥४५॥

मननेत्र वाकसिद्ध ॥ अनावर जो जितमद ॥ अनंत औट सिद्ध ॥ ऐसा अनंत देखा ॥४६॥

जे खेचरीमुख मुद्रा ॥ ते विलोकी शून्यतारा ॥ येक न्याहाळिती ईश्वरा ॥ अंतज्योंती ॥४७॥

एक ते नासिकाचे अग्नीं ॥ तर्किती उन्मिळा नेत्रीं ॥ सोममित्रांच्या योगस्मरीं ॥ स्थापिती ज्योतिलींग ॥४८॥

एक उफराटिया दृष्टीं ॥ ज्ञानाची करोनि दिवटी ॥ अंतरीं पाहोनि धूर्जटी ॥ वोंवाळिती शंभू ॥ ॥४९॥

एक अंतरीं निश्वळ ॥ न्याहाळिताती केवळ ॥ तेणें विसरले सकळ ॥ संसारजात ॥१५०॥

एक ऐकतांचि निवाले ॥ तिहीं देहभाव सांडिले ॥ एक अनुभवें पावले ॥ तद्रूपासी ॥५१॥

एवं गुणानुवाद करितां ॥ उपरती होवोनियां चित्ता ॥ निर्वेधतळीं प्रसन्नता ॥ निरंतर ॥५२॥

एक करिती धर्मचर्चा ॥ श्रुति भाष्य तर्क मीमांसा ॥ स्थापिताती परमहंसा ॥ ईश्वरासी ॥५३॥

एक करिती नामस्मरण ॥ शिवशिव नामोच्चारण ॥ एक करिती निवेदन शरीरभक्तीचें ॥५४॥

एक बैसले सिद्धासनीं ॥ एक ते गरुडासनीं ॥ एक ते शोभले सर्पांसनीं ॥ राहिले पैं ॥५५॥

एक बैसले पद्मासनीं ॥ एक ते मरोरासनीं ॥ एक बैसले हंसासनीं ॥ हातांवरी ॥५६॥

एकीं निरोधिलें मारुतां ॥ बुजिले पवन चंद्र सविता ॥ मार्ग पाहती सिद्धांता ॥ सिद्धकांचा ॥५७॥

ऐसी चौर्‍यायशीं आसनें ॥ नाना ध्यान लक्षणें ॥ तीं देखिलीं चतुराननें ॥ आपुले दृष्टीं ॥५८॥

ध्यानीं जाणोनि पशुपती ॥ मग ब्रह्मादि देव स्तविती ॥ जयजयाजी प्रळ्यास्थिती ॥ तूं महारुद्रा ॥५९॥

जो प्रकृतीसी परु ॥ तोचि तूं स्वयें शंकरु ॥ सगुणरुपें ईश्वरु ॥ आद्यमूर्ती ॥१६०॥

जैसा ऊर्णनाभीचा तंतु ॥ पसरी ग्रासी क्षणातु ॥ तैसा तूं गा समर्थु ॥ भूतमात्रीं ॥६१॥

तूं परब्रह्मा निर्गुणाकार ॥ योगियां ध्यान अगोचर ॥ तो परमात्मा ईश्वर ॥ तूंचि देवा ॥६२॥

तुवां स्थापिलें त्रिनयना ॥ समस्त देवां सुरगणा ॥ भरोनियां त्रिभुवना ॥ उरलासि तूं ॥६३॥

तूं सर्वमागींचे कारण ॥ धर्ममोक्षादि चारी गुण ॥ तुज केलिया प्रसन्न ॥ पाविजे सत्य ॥६४॥

द्रव्य दारा आणि भोक्ता ॥ वक्ता आणि शब्द श्रोता ॥ स्वर्ग नरक पुण्य दुरितां ॥ त्वांचि केलें ॥६५॥

स्त्री नपुंसक आणि पुरुषा ॥ सुख संतती दुःख शोका ॥ तैसेंचि जडजीवां अनेकां ॥ त्वांचि केलें ॥६६॥

जयजयाजी कर्पूरगौरा ॥ कृपाळुवा महारुद्रा ॥ तुझी भंगिली योगनिद्रा ॥ महादेवा ॥६७॥

जयजय भोळा चक्रवर्तीं ॥ भक्ती विरोधासी समवृत्ती ॥ हीं तुझीं ब्रीदें पढती ॥ तिहीं लोकीं ॥६८॥

मग नेत्रीं विलोकिलें पशुपती ॥ तंव ब्रह्मा करितसे स्तुती ॥ प्रणम्य केलेंसे समस्तीं ॥ महादेवासी ॥ ॥६९॥

रुद्र ह्नणे गा चतुरानना ॥ तूं मानलासी मममना ॥ नाहीं गेलासि दक्षहवना ॥ जाणिलें म्यां ॥१७०॥

परि तुह्मी देव हो समस्त ॥ मायाविषई जालेति उन्मत ॥ ह्नणोनि लाविली सत्य ॥ शिक्षा सकळां ॥७१॥

तंव ब्रह्मा ह्नणे हो त्रिपुरारी ॥ प्रसूती कष्टली असे भारी ॥ सहस्त्र वर्षे हदयावरी ॥ धरिलें दक्षरुंड ॥७२॥

आणि देवा यागकर्माविण ॥ थोर पीडले देवगण ॥ तरी त्वां करावें कृपादान ॥ सकळिकांसी ॥७३॥

आह्मीं सर्व गा अपराधी ॥ आह्मासि नाहीं सात्विकबुद्धी ॥ ह्नणोनि तुझी मांडिली शुद्धी ॥ सकळीं आह्मीं ॥७४॥

तुझा नेणवे महिमा ॥ तूं सकळां परमात्मा ॥ तुज विसरुनि अन्य धामा ॥ भजती ते येर ॥७५॥

जैसा मायामदमत्तें ॥ तो न लेखी आणिकातें ॥ मग प्राणप्रयाणाचिया घातें ॥ करी धांवाधांवी ॥७६॥

कां तृषें पीडलिया प्राणी ॥ मग तो खणी पोखरणी तैसें जाहलें जी शूळपाणी ॥ देवां सकळां ॥७७॥

तुझें सांडुनियां स्मरण ॥ जे करिती अन्यभजन ॥ ते जीव उन्मत्त होऊन ॥ भोगिती विषय ॥७८॥

जयां आवडी संसाराची ॥ ते गोडी नेणती ब्रह्माची ॥ ह्नणोनि न चुके जन्माची ॥ येरझार ॥७९॥

आतां प्रसन्न होवोनि पंचानना ॥ सृष्टी स्थापावी यागहवना ॥ आणि उठवावें यजमाना ॥ प्रजापतीसी ॥१८०॥

भृगूची लावावी मिशी ॥ पूषा याची द्यावी बत्तिशी ॥ भग्नवीराचे नयनांसी ॥ करावें रक्षण ॥८१॥

ऐकोनि ह्नणे पिनाकपाणी ॥ माझा भाग वर्जिला यज्ञीं ॥ ह्नणोनि जाळिलें अग्नीं ॥ शिर प्रजापतींचें ॥८२॥

तंव ह्नणे चतुर्मुख ॥ जया नाहीं शिवद्वेष ॥ तोचि बोलिजे संत सेवक ॥ येर पशुसमान ॥८३॥

जे अध्वरीं नाहीं तुझा भाग ॥ तो जाणावा कुयाग ॥ कीं हरिदिनीं अन्नभोग ॥ अपवित्र जैसा ॥८४॥

कीं न करितां स्त्रानदान ॥ संध्या आणि तर्पण ॥ तैसेंचि न करितां पूजन ॥ देवद्विजांचे ॥८५॥

अन्नसंस्कार न करितां ॥ कीं भाग नेदी अतीता ॥ न पूजितां मातापिता ॥ तें अपवित्र जैसें ॥८६॥

तुज वडिलपणाचें बीकें ॥ समुद्रमथनीं राहिलें शेष ॥ तें रत्नें वांटोनियां विष ॥ अंगिकारिलेंसी ॥८७॥

तूं जगकत्पिता पशुपती ॥ आधीं देवां करावी तृप्ती ॥ मग आरोगांवें कर्मीतीं ॥ सकळ तुवां ॥८८॥

जैसा वदान्य अन्न संतार्पिता ॥ आधी तृप्ती करी समस्तां ॥ मग भोजन होय गृहस्था ॥ उर्वरिताचें ॥८९॥

तैसें हें समस्त लौकिक ॥ कर्म करोनि उरे शेष ॥ मग तूं पसरोनि रुद्रमुख ॥ ग्रासीं सकळ ॥१९०॥

तरी सोमपानामुखी अनुच्छिष्टा ॥ तुज भाग देऊं गा नीलकंठा ॥ तुजपरिस त्रिभुवनीं मोठा ॥ कवण असे ॥९१॥

तंव कोप सांडोनियां रुद्र ॥ कृपेनें जाहला निर्वेर ॥ मग दीधला अभयंकर ॥ ब्रह्मयासी ॥ ॥९२॥

तेथें समस्त देवगण ॥ शिवासि घालिती लोटांगण ॥ स्वामी चला ह्नणती आपण ॥ यागभूमीसी ॥९३॥

मग तो शिव दूतांसहित ॥ यागा निघाला जगन्नाथ ॥ नंदीवहनीं शोभत ॥ कर्पूरगौर ॥९४॥

जैसा शरत्काळीं चंद्र ॥ कां चादिणां क्षीरसागर ॥ नाना कमळीं मधुकर ॥ तैसा नीलकंठ ॥९५॥

हरिख जाहला सुरवरां ॥ निघाले यागाचे मोहरां ॥ मेघमंडणीं वसुंधरा ॥ उल्हासे जैसी ॥९६॥

कीं शरत्कालाचिये अंतीं ॥ अपार पीक पावे शेती ॥ नातरी नलिनी देखोनि उडुपती ॥ आनंदे जैसी ॥९७॥

तैसें देवां जाहलें समस्तां ॥ फिटली यागहवनव्यथा ॥ जयजयकारें गर्जती भारता ॥ सकळ देव ॥९८॥

लागलें दुंदुभी निशाण ॥ डमरु आणि शंखस्फुरण ॥ आनंदलें त्रिभुवन ॥ नादें तेणें ॥९९॥

वेगें जातसे पंचाननु ॥ जैसी वत्सालागीं कामधेनु ॥ कीं चातकालागीं धनु ॥ वोळे जैला ॥२००॥

कीं जाणोनि अंवसेचा अंधार ॥ पाडीं पावे अमृतकर ॥ तो करावया पाहुणेर ॥ चकोरा जैसा ॥१॥

तैसा प्रसूते प्रजापती ॥ आणि देवां करावया तृप्ती ॥ वेगें पावला पशुपती ॥ यागभूमिके ॥२॥

जेथें क्षिप्रेवृंदेचा संगम ॥ देव शारंगधर उत्तम ॥ देखतां सदाशिव अनुपम्य ॥ संतोषला ॥३॥

तंव देखिलें होमकुंड ॥ जेथें जाळिले दक्षमुंड ॥ मग वीराचें पाहोनि तोंड ॥ हांसे रुद्र ॥४॥

सकळ पाहिलें रणमंडळ ॥ परि न देखे दक्षमरिगळ ॥ ह्नणोनि वृत्तांत पुसती सकळ ॥ नारदासी ॥५॥

मुनी ह्नणे जी त्र्यंबका ॥ पैल उधई वाहिली मृत्तिका ॥ हेचि होय रणभूमिका ॥ दक्षमरणाची ॥६॥

मग धांडोळोनियां सुरवर ॥ भूमी चाळिती चौफेर ॥ तंव देखिलें कलेवर ॥ प्रजापतीचें ॥७॥

कीं तें हरीचे वज्रपंजरें ॥ तेणें राखिलें त्या सुंदरे ॥ मुख लावितील जंतुव्याघ्रें ॥ ह्नणोनियां ॥८॥

जेणें राखिली अग्निमुखीं ॥ तो तियेसि काय उपेक्षी ॥ उदरीं गर्भातें जो पोशी ॥ जननी जैसी ॥९॥

तैसा तो भक्तकाजकैंवारी ॥ मशकादि पासोनि गरवरी ॥ सांभाळी राहोनि क्षीरसागरीं ॥ न घे निद्रा ॥२१०॥

दृष्टीं पाहे महारुद्र तंव उरलासे अस्थिपंजर ॥ हदयीं ठेवोनि भ्रतार ॥ असे प्रसूता ॥११॥

सहस्त्र वर्षे निराहारी ॥ परि राम न विसंबे वक्त्रीं ॥ पदक केलें हदयावरी ॥ दक्षरूंडाचें ॥१२॥

ऐसी देखोनि महासती ॥ कृपेनें दाटला पशुपती ॥ ह्नणे इचे तपाची फळश्रुती ॥ नेणवे मज ॥१३॥

मग घेतली अंधारींची विभूती ॥ तयेचे मुखीं घाली पशुपती ॥ तंव सचेत जाहली प्रसूती ॥ सर्वधातूंसीं ॥१४॥

उघडोनियां पाहे दृष्टीं ॥ तंव देखे ब्रह्मा धूर्जटी ॥ मग सद्रदित होवोनि कंठीं ॥ आले अश्रुपात ॥१५॥

प्रगटला भाव सात्विकु ॥ आंगीं दाटलासे कंपु ॥ स्वेदी लोटले रोमकूपु ॥ रविरश्मी तपे जेवीं ॥१६॥

नेसलीसे दिव्यांबर ॥ जें अविनाश अमळवस्त्र ॥ जयेतें पोशी शारंगधर ॥ गुंफेमाजी ॥१७॥

ब्रह्मा ह्नणे हो प्रसूते ॥ तुवां उद्धरिलें उभयांतें ॥ तुजकारणें जगन्नाथें ॥ बिजें केलें ॥१८॥

माये तुझा हा प्राणपती ॥ यासि उठवील पशुपती ॥ आतां कांहीं न करीं खंती ॥ ईश्वरकरणीची ॥१९॥

तूं सतियां माजी शिरोमणी ॥ आतां ऐकें हो विनवणी ॥ पतीचें रुंड ठेवोनि धरणीं ॥ ऊठ वरती ॥२२०॥

ऐकोनि ब्रहयाचें उत्तर ॥ भूमीं ठेविलें दक्षशरीर ॥ मग जोडोनि उभय कर ॥ नमिलें ब्रह्मरुद्रां ॥२१॥

तंव ह्नणे महारुद्र ॥ मी आतां उठवीन दक्षवीर ॥ परि पडिलासे विचार ॥ याचिये शिराचा ॥२२॥

तरी वेगीं जाई हो रणक्षेत्रा ॥ येखादे पाहें पां शिरा ॥ जेथें युद्ध जाहलें वीरभद्रा ॥ प्रजापतीसी ॥२३॥

तेथोनि आणीं शिरकमळ ॥ अपूर्व पाहोनि निर्मळ ॥ मग हें जीववूं मरिगळ ॥ प्रजापतीचें ॥ ॥२४॥

ऐकतां निघाली सुंदरा ॥ गेली रणभूमिक्षेत्रा ॥ दृष्टीं पाहे परि चौफेरा ॥ न देखे शिर ॥२५॥

तंव माया घातली त्रिपुरारी ॥ रुधिरें माखली धरित्री ॥ ऐसें देखे ते सुंदरी ॥ रणमंडळा ॥२६॥

परि अश्व नर कुंजर ॥ अस्थि पाद ना चरण शिर ॥ पसरलें मात्र देखे रुधिर ॥ रणभूमीसी ॥२७॥

मग हात पिटिले निढळीं ॥ ह्नणे बाप कर्मारे तूं अतुर्बळी ॥ प्रसन्न जाहला चंद्र मौळी ॥ तंव न दिसे शिर ॥२८॥

कीं अठराभार वनस्पती ॥ पत्रीं पुष्पीं दाट लिया वसंती ॥ परी भाग्येंवीण नरपती ॥ प्राप्ती कैची ॥२९॥

रंक पावे रत्ननिधान ॥ तंव कर्मे झांकिले नयन ॥ अंध होवोनियां आपण ॥ उल्लंघी जैसा ॥२३०॥

अदैवा करितां कुळवाडी ॥ पीक पावे अमोडी ॥ शेखीं हिंडतां बारा कावडी ॥ पडे जैसा ॥३१॥

उदिमा करितां आरंभ ॥ वणिजें वाढला दिसे लाभ ॥ तंव घरींचा दवडिला वृषभ ॥ अदैवें जैसा ॥३२॥

अथवा अदैवाचे वावरी ॥ मेघ वोळला दिसे अंबरीं ॥ शेखी हातावितीचे अंतरी ॥ वितुळे जैसा ॥ ॥३३॥

कीं पावावया सुष्टदेहा ॥ कर्म चुकवी गर्भभावा ॥ तैसें जाहलें महादेवा ॥ मज अदैवासी ॥३४॥

ज्याचें दैव होय ठेंगणें ॥ त्याचे हाती देतां रत्नें ॥ तव कर्मे बांधिलीं बंधनें ॥ चोर ह्नणोनि ॥३५॥

ऐसी श्रमोनि जाहली खिन्न ॥ ह्नणे एखादें लाभतें कां वदन ॥ पशु पक्षी अथवा हीन ॥ कीटपतंग ॥३६॥

तेणें उठता प्रजापती ॥ जरी हांसतील देवभूपती ॥ परि भोगितें वसुमती ॥ पतिप्रसादें ॥३७॥

परि ते समर्थ ईश्वरकरणी ॥ वीरभद्रें उठविली अरणी ॥ आणि नंदींने शापिलें वचनीं ॥ न टळे कदा तें ॥३८॥

दुःखे जाहलें दीनवदन ॥ मग पाहिलें यागहवन ॥ तंव देखिलेंसे वदन ॥ बस्तांचें पैं ॥३९॥

घेवोनियां तें बस्तशीर ॥ रुद्राजवळी आली सुंदर ॥ देखोनि हांसतील सुरवर ॥ ह्नणोनियां लपविलेंसे ॥२४०॥

ह्नणे जी विरिंची रुद्रा ॥ रणभूमी पाहिली चौफेरा ॥ परि शिर न देखें दातारा ॥ मानवाचें ॥४१॥

शंभु ह्नणे पशु किंवा नर ॥ जें सांपडेल भूमीं शिर ॥ तें न ह्नणावें सानथोर ॥ प्रसूते तुवां ॥४२॥

मग शंकित होवोनि उत्तरीं ॥ प्रसूती ह्नणे हो त्रिपुरारी ॥ बस्त बधिला होता अध्वरीं ॥ हवनालागीम ॥४३॥

त्याचें आणिलें आहे वदन ॥ तुह्मी हांसाल देखोन ॥ ह्नणोनि केलें आच्छादन ॥ वस्त्रें त्याचें ॥४४॥

गंगोदकें कोंदले उभय तट ॥ परि पक्षियां प्राप्त चंचुपुट ॥ तैसें फळ साधितां अदृष्ट ॥ माणियासी ॥४५॥

मग ह्नणे महारुद्र ॥ बस्त हा यागींचा पवित्र ॥ तया ब्रहयाचा असे वर ॥ नरेंद्र दशेच्या ॥४६॥

अल्पायुष्य अविचार ॥ यागबस्त नृपवर ॥ तो धर्मद्विजांसि करी वैर ॥ पूर्वविरोधें ॥४७॥

तें अद्यापि आहे कारण ॥ येरु ब्रह्मद्वेष करिती जाण ॥ पूर्ववैर मनीं स्मरोन ॥ करिती धर्मद्वेष ॥४८॥

मग कृपेनें रुद्र बोलिले ॥ प्रसूते शिर आणीं वहिलें ॥ त्यासी अपवित्र न बोलें ॥ ऐशा बस्तशिरासी ॥४९॥

मग शीर देतसे प्रसूती ॥ तें दृष्टीं पाहिलें जगन्नाथीं ॥ विभूति सिंचोनि हातीं ॥ आव्हानिला जीव ॥२५०॥

तें ब्रहयाने आपुले हातीं ॥ स्थापिलें दक्षरुंड निगुती ॥ तंव जागा जाहला प्रजापती ॥ इंद्रियां सहित ॥५१॥

परि आच्छादोनि महारुद्रें ॥ झांकोळिलें व्याघ्रांबरे ॥ तंव अष्टधातूंसीं सर्वगात्रें ॥ जाहलीं पूर्ण ॥५२॥

सर्वधातु इंद्रियासीं ॥ सजीवला शरीरेंसीं ॥ जागृतापरी परियेसीं ॥ दक्षरावो ॥ ॥५३॥

नेत्र उघडोनि पाहे दक्ष ॥ तंव रुद्र देखिला सन्मुख ॥ अंगीं प्रगटे सात्विक ॥ भावो त्यासी ॥५४॥

अष्टभाव प्रगटले ॥ सर्व दुर्मद हरपले ॥ गर्व मदमत्सर झडले ॥ दक्षरायाचे ॥५५॥

सद्नद दाटला कंठें ॥ रोमांच ठाकले उफराटे ॥ नेत्रकमळींचे वाटे ॥ सुटलें आनंदजळ ॥५६॥

अंगीं न सांवरे कंप ॥ रुदन सांवरी दक्षनृप ॥ स्वेदीं उचंबळे रोमकूप ॥ सात्विकें तेणें ॥५७॥

मग उभा राहोनि प्रजापती ॥ नमस्कारिला पशुपती ॥ आणि मांडिली असे स्तुती ॥ महादेवाची ॥५८॥

ह्नणे जयजयाजी शंकरा ॥ मी अपराधी जी दातारा ॥ आतां क्षमा करीं महारुद्रा ॥ मज पशुवासी ॥५९॥

जयजयाजी जगदोद्धारा ॥ विश्वव्यापका विश्वेश्वरा ॥ गिरिजानाथा गंगाधरा ॥ शंकरा शशिभूषणा ॥२६०॥

जयजयाजी चंद्रमौळी ॥ मज कृपादृष्टीं न्याहाळी ॥ तूं खेळसी क्रीडारोळीं ॥ पंचानना गा ॥ ॥६१॥

जयजयाची गजाजिना ॥ मुंडमाळा व्याघ्राजिना ॥ विभूतिधारणा भाललोचना ॥ देवाधिदेवा ॥६२॥

तूं अगम्य अपरंपार ॥ अविनाश ब्रह्म ईश्वर ॥ तुझा नकळे हो पार ॥ हरिविरिंचींसी ॥६३॥

तूं प्राणलिंग सर्वांचें ॥ कुळदैवत आमुचें ॥ तुजसी मी बोलिलों वाचे ॥ तें करी क्षमा ॥६४॥

तुह्मासी बोलिलों वोखटें ॥ ह्नणोनि शयन केलें यागपीठें ॥ शिर दीधलें नेहटें ॥ प्रायश्वित्तासी ॥६५॥

माझे अंगींच्या गर्वक्रोधा ॥ बरवें दंडिलें तुवां व्याधा ॥ आतां जाहलो निर्बाधा ॥ औषधें तुझे ॥६६॥

तुझिये क्रोधाचे दृष्टीं ॥ होय त्रिभुवनाची आगिटी ॥ तूं महाकाळाचे कंठीं ॥ घालिसी त्रिशूळ ॥६७॥

तुं परमात्मा ईश्वर ॥ तुझा कवणा न कळे पार ॥ तुझाचि असे आधार ॥ त्रिभुवनासी ॥६८॥

तूं सर्वांचें प्राणलिंग ॥ तुं अविनाश अभंग ॥ या सृष्टिसागराचे तरंग ॥ तुझेचि देवा ॥६९॥

पृथ्वी आप तेज समीर ॥ व्योम तारागणें चंद्र ॥ तुज वांचोनि सान थोर ॥ न दिसे ठावो ॥२७०॥

ह्नणोनि घातलें दंडवत ॥ तूंचि कार्य कारण सत्य ॥ माझें चालवीं यागव्रत ॥ पूर्णाहुतीचें ॥७१॥

देवा मज पावलिया मरणा ॥ मागें जे केली विटंबना ॥ तरी उश्यापावें भृगुभग्ना ॥ आणि पूषासी ॥७२॥

येथें आक्षेपासी कारण ॥ दक्ष पावलिया मरण ॥ तरी तया कैंचें पां ज्ञान ॥ त्या विटंबनेचें ॥७३॥

परि नंदीनें शापिलें देवयागीं ॥ तीं वचनें न जाती वाउगीं ॥ ह्नणोनि जाणितलें आंगीं ॥ दक्षरायें ॥७४॥

तें तयासि होतें ज्ञान ॥ ह्नणोनि आठवलें स्मरण ॥ येरवीं पावलिया मरण ॥ आठवण कैंची ॥७५॥

तंव भृगु आला वेगेंसी ॥ तया लाविली अजाची मिशी ॥ तेणें प्रणाम करोनि शिवासी ॥ ठाकला उभा ॥७६॥

मग बोलाविलें पूषातें ॥ तुवां अश्विनौ देवाचेनि हातें ॥ पीठ भक्षावें विनादांतें ॥ जवतांदुळांचें ॥७७॥

आणि मित्र नामें देवो ॥ त्याचे नेत्र भंगले पहाहो ॥ मग उश्यापी महादेवो ॥ सकळिकांसी ॥७८॥

ते देखोनि विटंबना ॥ हांसे आलें शिवगणां ॥ मग पाचारिलें चतुरानना ॥ महादेवें ॥७९॥

तयातें ह्नणे पशुपती ॥ देवीं विनविलें समस्तीं ॥ ते आतां जाहली निर्गती ॥ शापवचनाची ॥२८०॥

आतां बोलावा ॠषी ब्राह्मण ॥ यागविधि करावा संपूर्ण ॥ ऐकतां निघाले देवगण ॥ रुद्रवचनें ॥८१॥

निघाले देव आणि नारद ॥ सांगती उःशापाचा अनुवाद ॥ तो ऐकता होवोनि सानंद ॥ आले ॠषी ॥८२॥

मग आणावयालागीं यागु ॥ गेले देव आणि भृगु ॥ परि त्यांसी देखतां कुरंगु ॥ पळाला तो ॥८३॥

तो पळतां भरला श्वासा ॥ तंव देवीं आसुडिली त्वचा ॥ परि श्रृंग सांडोनि आकाशा ॥ गेला कुरंग ॥८४॥

त्वचा आणि तैसेंचि श्रृंग ॥ हें सांडुनि पळाला कुरंग ॥ ह्नणोनिया सांडिला लाग ॥ देवीं त्याचा ॥८५॥

तो नक्षत्रीं राहे लपोनी ॥ परि तिन्ही देव मागें अजूनी ॥ असो शिंगें त्वचा आले घेवोनी ॥ दीक्षेलागीं ॥८६॥

ते अद्यापि आहे प्रचीती ॥ नक्षत्रमंडळीं तिन्ही देव दिसती ॥ अजूनि मागें लागले असती ॥ गगनमागें ॥८७॥

असो करावया यागाची स्थापना ॥ ह्नणोनि गृहस्थ करिती यजमाना ॥ मग प्रसूती पाचारिली अंगना ॥ प्रतिष्ठेसी ॥८८॥

कनकरत्नांचिये पाटीं ॥ दक्षासि बैसवी धूर्जटी ॥ वामांगीं प्रिया गोमटी ॥ प्रसूती ते ॥८९॥

दोघां पदरीं बांधोनि गाठी ॥ वोंवाळिला कनकताटीं ॥ अक्षता लाविल्या ललाटीं ॥ विरिचिदेवें ॥ ॥२९०॥

वेदध्वनी केली विप्री ॥ मंत्र ह्नणती उच्चारीं ॥ स्थापना केली ॠषेश्वरीं ॥ बरवे परी ॥९१॥

केला जीर्णाचा उद्धार ॥ तंव देवीं केला जयजयकार ॥ शंख दुंदुभी देवडंबर ॥ लागली वाद्यें ॥९२॥

ढोल निशाणें वाजतीं ॥ मंगळतुरें गर्जती ॥ देवऋषी आनंदती ॥ मनामाजी ॥९३॥

ॠषि ह्नणती वेदमंत्र ॥ दक्षें नमिले विरिंचिहर ॥ थोर आनंदले सुरवर ॥ केली पुष्पवृष्टी ॥९४॥

मंडप घातळे चौफेरी ॥ गण गंधर्व नर किन्नरीं ॥ दिक्पाळ आणि ॠषेश्वरीं ॥ केला विधी ॥९५॥

नाना होमद्रव्यें आणिलीं ॥ पात्रें समिधा मेळविलीं ॥ मग प्रतिष्ठा आरंभिली ॥ यागाची पैं ॥९६॥

आतां दीक्षा घेईल यजमान ॥ तैं याग करितील संपूर्ण ॥ तेथें प्रकटेल सहस्त्रनयन ॥ श्रीअनंत जो ॥९७॥

जयाकारणें नानाव्रत ॥ दान धर्म करिजेत ॥ तो प्रकटेल अनंत ॥ शेषशाई ॥९८॥

पूर्णाहुतीसरिसा ॥ प्रकट होणें हषीकेशा ॥ मग पूर्ण होईल आशा ॥ दक्षाची पैं ॥९९॥

दक्षाचिये प्रेमप्रीतीं ॥ कुंडांतूनि प्रकटेल मूर्त्ती ॥ तयेसि कोटिभानुदीप्ती ॥ उपमा साजे ॥३००॥

ऐसी हे पुण्यपावन कथा ॥ ॠषी सांगेल भारता ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्ण याज्ञवल्की ॥१॥

इति श्री क० ॥ तृती० मनोहरु ॥ दक्षजीवनप्रकारु ॥ चतुर्दशोध्यायीं कथियेला ॥३०२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP