श्रीगणेशाय नमः
मुनीसि पुसे जन्मेजयो ॥ सांगा जी पुढील अन्वयो ॥ कसा जाहला गर्भभावो ॥ दक्षकथेचा ॥१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ सती बैसली रुंड घेऊन ॥ आणि सर्वजनेंसी प्रधान ॥ गेला स्वस्थाना ॥२॥
इकडे नंदी आणि वीरभद्र ॥ शिवासि करिती नमस्कार ॥ सर्व सांगितला समाचार ॥ दक्षयागाचा ॥३॥
ऐकतां संतापला नीलकंठ ॥ नंदीवरी जाहला उपविष्ट ॥ मग सेविला सिद्धवट ॥ अलकापुरींचा ॥४॥
तेथें बैसला समाधी ॥ भंवती योगियांची मांदी ॥ इंद्रियांपरी तपोनिधी ॥ आत्मया जैसे ॥५॥
तंव जन्मेजयो ह्नणे ॠषीप्रती ॥ कांहीं आठवलें गा चित्तीं ॥ तरी या नंदिकेश्वराची उत्पत्ती ॥ सांगा मज ॥६॥
हा कैसा जोडला त्रिनयना ॥ कोणा जिंकिलें आंगवणां ॥ तें सांगा हो वैशंपायना ॥ सविस्तर मज ॥७॥
ॠषि ह्नणे गा भारता ॥ दक्षकथा पांगुळेल आतां ॥ परि व्यास बोलिला वक्ता ॥ तें सांगों तुज ॥८॥
राया ऐक गा भारता ॥ देवांसि बोलिला वेदवक्ता ॥ हे भविष्योत्तरींची कथा ॥ ऐकावी त्वां ॥९॥
कोणी एक शिखीनामें महामुनी ॥ तो गेला इंद्रभुवनी ॥ तेथें सुरेश्वर सिंहासनी ॥ बैसलासे ॥१०॥
पत्नी पुत्रेंसी सहपरिवारीं ॥ मध्यें नाचती नृत्याकारी ॥ तंव मुनि पातला ते अवसरीं ॥ आशिर्वादासी ॥११॥
परि त्या राज्यमदें उन्मतें ॥ बैसा ह्नणितलें नाहीं ॠषीतें ॥ आशिर्वादही सुरनाथें अव्हेरिला त्याचा ॥१२॥
तेणें दुःखी होवोनि ॠषेश्वर ॥ मागुता मुरडला वेगवत्तर ॥ ह्नणे आतां रचीन इंद्र ॥ दुसरा सत्य ॥१३॥
देहींचा सांडवीन अभिमान ॥ प्रसन्न करीन चतुरानन ॥ इंद्रासि जिंकी ऐसा नंदन ॥ मागेन तया ॥१४॥
ह्नणोनि मांडिलें तपानुष्ठान ॥ पंचाग्नि आणि धूस्त्रपान ॥ सहस्त्रवर्षे अनशन ॥ आणि ब्रह्मचर्य ॥ ॥१५॥
मनीं इच्छी ऐसा कुमर ॥ जो सिंहासनींचा उठवील इंद्र ॥ ऐशा परी ॠषेश्वर ॥ आराधी ब्रह्मा ॥१६॥
तंव काहींका दिवशीं ॥ ब्रह्मा आला ॠषीपाशीं ॥ ह्नणे माग गा सर्वाशीं ॥ जाहलों प्रसन्न ॥१७॥
ॠषी ह्नणे ब्रह्मयाप्रती ॥ इंद्रा फेडून घेईल अमरावती ॥ ऐसा पुत्र गा प्रजापती ॥ देई मज ॥१८॥
ऐकोनि ह्नणे विरिंचिनाथ ॥ तुझा पुरेल मनोरथ ॥ परी एक गा वृत्तांत ॥ ऐक माझा ॥१९॥
चौदामनूंचें प्रमाण ॥ इंद्रा अमरावतीचें सिंहासन ॥ तें सरलिया पूर्वपुण्य ॥ न पडे तळीं तो ॥२०॥
परि हाचि बोलगा साचार ॥ तवपुत्र करुं दुजा इंद्र ॥ जो सकळगुणांही सुरेश्वर ॥ जिंकोंशके ॥२१॥
मग मस्तकीं ठेवोनि हस्त ॥ शिखां मंत्रीं विरिचिनाथ ॥ ह्नणे या शिखागर्भी सुत ॥ होईल तुज ॥२२॥
तो जिंकील त्रिभुवन ॥ सुरपती आणि नारायण ॥ आणि प्रवेशेल भुवन ॥ चतुर्दश पैं ॥२३॥
अर्ध शक्ती मागितली अरुणा ॥ तितुकीच घेतली कृशाना ॥ स्तुति करोनियां पवनां ॥ घेतली अर्ध ॥२४॥
ऐशा प्राथोनि त्रयमूर्ती ॥ विरिंचीनें रचिली शक्ती ॥ तो पुत्र गा महादीप्ती ॥ रचिला देवें ॥२५॥
जंव ॠषी सोडी शिखाग्रंथी ॥ तंव पडिला महादीप्ती ॥ तो वत्सरुपें गा मूर्ती ॥ गवेंद्र नंदी ॥२६॥
अग्निदेवाचें परिधान ॥ तें पीतांबर आणिलें वसन ॥ आपणा केलें भूषण ॥ त्या ॠषिकुमरें ॥२७॥
माथां मिरवे पीतांबर ॥ रक्तनेत्र रक्तवक्त्र ॥ मेघवर्ण जगतधर ॥ कटी कनकवर्ण ॥२८॥
तो जाणोनियां कुमर ॥ ब्रह्मा आला वेगवत्तर ॥ तेणें नाम ठेविलें नंदिकेश्वर ॥ ॠषिवत्सासी ॥२९॥
तंव ह्नणे जन्मेजयो ॥ या नामाचा गर्भभावो ॥ नंदिकेश्वराचा काय अन्वयो ॥ तें सांगा मज ॥३०॥
मग ह्नणे वैशंपायनु ॥ नकारें बोलिजे पै विष्णु ॥ दकारें बोलिजे कृशानु ॥ वरुण ककारें ॥ ॥३१॥
ऐसी त्रयदेवांची मूर्ती ॥ ह्नणवोनि नंदिकेश्वर बोलती ॥ मग ब्रह्मा गेला गा भूपती ॥ निजभुवनासी ॥ ॥३२॥
इकडे पित्यासि विनवी नंदिकेश्वर ॥ ताता मज देई पवित्र आहार ॥ तंव ॠषींने दाविला क्षीरसागर ॥ तें ऐकिलें विष्णुदूतीं ॥३३॥
तया सहस्त्रकोटी राखण ॥ हाहा ह्नणोनि पावले गण ॥ परि त्यांसी पिटोनि प्राशन ॥ करी क्षीराचें ॥३४॥
तो घेत दुग्धाचा गुरळा ॥ तेणें नंदी जाहला ढवळां ॥ जैशी पालटे स्फटिकशिळा ॥ रंगसंगें ॥ ॥३५॥
मग तयातें सांगती हरिगण ॥ हें महाविष्णूचें भुवन ॥ तूं वळंधोनिया मरण ॥ कां घेऊं पाहसी ॥३६॥
जरी श्रुत होईल हषीकेशा ॥ तरी तुज पडेल यमफांसा ॥ जाई जाई रे स्वदेशा ॥ बाळका तूं ॥३७॥
ऐसी गणें सांगतां गोष्टी ॥ तंव दूत धरिला वीरगुंठी ॥ तो भवंडोनियां वैकुंठीं ॥ टाकिला रोषें ॥३८॥
तया जंव पाहे अनंत ॥ तंव तो क्षीरसागरींचा दूत ॥ मग येरें कथिला वृत्तांत ॥ वत्सराजाचा ॥३९॥
तो ऐकोनियां विनोद ॥ अवघे जाहले सन्नद्ध ॥ वेगीं पावला गोविंद ॥ क्षीरार्णवासी ॥४०॥
तो जाणोनि दुर्जन ॥ कोपें खवळला नारायण ॥ सहस्त्रकरीं घेतले बाण ॥ मारावयासी ॥४१॥
मग विंधिला महानेटीं ॥ बाणामागें बाण सुटी ॥ तंव नंदी ह्नणे मेघवृष्टी ॥ अवकाळीं कैची ॥४२॥
ऐसा हाणोनि नानाशस्त्रीं ॥ बाण सोडिले तगावरी ॥ परि त्या तृणमात्रां शरीरीं ॥ नमानी वत्स ॥४३॥
जैसा शिळे आदळतां कर ॥ मग तो आपणाचि करी अव्हेर ॥ कां रविरश्मींसि अंधकार ॥ नातळे जैसा ॥४४॥
मग कोप येवोनि ॠषिवत्सा ॥ घ्राणें सोडिलें दीर्घ श्वासा ॥ त्या वातघातें हषीकेशा ७ वैकुंठी नेलें ॥ ॥४५॥
सवेंचि आकर्षिलें मुखघ्राण ॥ जैसा योगी सेवी धूस्त्रपान ॥ तंव विष्णु आला आकर्षून ॥ घ्राणामाजी ॥ ॥४६॥
जैसें बाळक चाळवी चक्रझोला ॥ तैं सांडी आकर्षी वेळोवेळा ॥ तैसेम आंदोळिलें गोपाळा ॥ बहुसाल तेणें ॥४७॥
नातरी पुत्रा घालोनि हिंदोळां ॥ माता प्रिय दे जैशी बाळा ॥ तैसें आंदोळिलें गोपाळा ॥ नंदिकेश्वरें ॥ ॥४८॥
जैसी उठतां वाहुटळी ॥ तरुपत्र चढे अंतराळीं ॥ मग वोहट जालिया भूमंडळीं ॥ आदळे जैसें ॥ ॥४९॥
आणि ऊर्ध्व करुनियां वदन ॥ नंदी हास्यें विकाशी दशन ॥ विष्णु जातसे आपण ॥ न्याहाळी तया ॥५०॥
तें अद्यापि आहे लक्षण ॥ कीं दुखविलें हरीचेम मन ॥ ह्नणोनि होतसे ऊर्ध्ववदन ॥ तयेजाती ॥५१॥
परि वेगें करुनि नारायण ॥ गदेनें हाणी ऊर्ध्वदशन ॥ तेंही अद्यापि आहे चिन्ह ॥ नंदीश्वरासी ॥५२॥
तंव जाहलें महाचोजं ॥ घायें कांपले नंदीचे द्विज ॥ तेणें सांडिलें रत्नबीज ॥ सागरामाजी ॥५३॥
मुखापासोनि सुरतरुं ॥ हदयस्थानीं अमृतकरुं ॥ नेत्रांपासाव पवित्रु ॥ कौस्तुभ तो ॥५५॥
वामकरींहूनि दुर्दशा ॥ धन्वंतरी घ्राणश्वासा ॥ श्रृंगां पासाव धनुष्या ॥ प्रसवला बीज ॥५६॥
जिव्हेपासाव अमृत ॥ लिंगी कामधेनु सत्य ॥ स्वेदापासाव उन्मत ॥ मदिरा जाण ॥५७॥
फेणापासाव हळाहळ ॥ वामचरणीं अप्सराकुळ ॥ ऐसें रत्नबीज सकळ ॥ सांडिले तेणें ॥५८॥
मग तेम रत्नबीज सकळ ॥ सागरीं राहिलें चिरकाळ ॥ यानंतरें मंथूनि सिंधुजळ ॥ काढिलें देवीं दैत्यीं ॥५९॥
रावो ह्नणे वैशंपायना ॥ नंदी प्रसवला दिव्यरत्नां ॥ हें ग्रामजनांचिया मना ॥ न वाटे सत्य ॥६०॥
मुनी ह्नणे गा भूपती ॥ महाप्रळयाचे अंतीं ॥ सकळ रत्नें देव ठेविती ॥ वरुणाजवळी ॥६१॥
तरी आतां नंदिकेश्वर ॥ हा वरुणाचाचि अवतार ॥ ह्नणोनि रत्नबीजांचा आकार ॥ फुटला यासी ॥६२॥
आणि दशनीचें जें शोणित ॥ त्यापासाव नाना मच्छकच्छजात ॥ जलजंतुआदि समस्त ॥ जाहले सागरीं ॥६३॥
जीवनीं विराले दशन ॥ त्यांपासाव शंखवर्ण ॥ हें भविष्योत्तरींचें ज्ञान ॥ कथिलें तुज ॥६४॥
आतां असो हे उत्पत्ती ॥ मूर्छा भंगलिया नंदीप्रती ॥ मागुती युद्ध मांडिलें गा भूपती ॥ दारुण पैं ॥६५॥
दोघे आले कासकवळी ॥ एकएकाहूनि बळी ॥ ऐसा खेटिला वनमाळी ॥ दिवस साठी ॥६६॥
रोषें चालिला ॠषिनंदन ॥ थडकें हाणितला नारायण ॥ हदय चेपोनि दक्षिणचरण ॥ ठेविला वरी ॥६७॥
ऐसा पाडिला गोपाळ ॥ तेणें दूतां सुटला पळ ॥ सागरा जाहला आदळ ॥ तये वेळीम ॥६८॥
तयासि कांही न चाले युक्ती ॥ तंव बुद्धी आठवली श्रीपती ॥ ह्नणे मागरे बळाधिपती ॥ जाहलों प्रसन्न ॥६९॥
तूं कोण कोठील नरेंद्र ॥ तो ह्नणे मी शिखिॠषीचा कुमर ॥ मग विष्णु करी नमस्कार ॥ नंदिकेश्वरासी ॥७०॥
मग संग्रामा जाहली शांती ॥ दोघे वोहटल्या गती ॥ आणि मांडिली स्तुती ॥ एकमेकांची ॥७१॥
नंदी ह्नणे गा आपण ॥ हरि तूं जाहलासी प्रसन्न ॥ तरी माझें करीं गा पालन ॥ गोविंदा तूं ॥७२॥
ऐकोनि ह्नणे शारंगधर ॥ हा बोल द्वापारीं करीन साचार ॥ तूं गोवर्धन आद्यअवतार ॥ तो पूजीन मी ॥७३॥
तेव्हां करीन तुझें पालन ॥ परि आतां शिणलों करीन शयन ॥ आणिक विनवितों वचन ॥ तें ऐकें माझें ॥७४॥
तुझिये चरणीचें लांछन ॥ हें मी हदयीं मिरवीन भूषण ॥ वैरियां जिंकावया दारुण ॥ जोडले मज हें ॥७५॥
तूं तरी शिखिमुनीचा कुमर ॥ तुवां काय पाहणें हा सागर ॥ परि मज करावया उपकार ॥ आलासि येथें ॥७६॥
तुझिये मुखीचे दशन ॥ हे शंख होतील सुलक्षण ॥ तरी त्यांचे उदकें मी स्त्रान ॥ करीन सर्वदा ॥७७॥
तुझेनि भावें त्या शंखपात्रा ॥ आधी पूजा वाहीन गा गवेंद्रा ॥ आणि भूषणपंक्तियां श्रृंगारा ॥ करीन त्यांची ॥७८॥
ह्नणोनि घातलें दंडवत ॥ तूं वत्स माझें दैवत ॥ क्षमा करीं गा अनुचित ॥ घडलें मज ॥७९॥
हें ऐकोनि हरीचें वचन ॥ नाम ठेविलें श्रीवत्सलांछन ॥ तंव नंदी ह्नणे माग जाहलों प्रसन्न ॥ गोविंदा तुज ॥८०॥
ऐकतां हर्ष जाहला शारंगधरा ॥ ह्नणे प्रसन्न जाहलासि गा गवेंद्रा ॥ तरी पीतांबर दे ॠषिकुमरा ॥ मस्तकींचा मज ॥८१॥
मग तेम पीतांबर वसन ॥ जें अग्नीचें निजवेष्टण ॥ तें नंदीनें केलें समर्पण ॥ गोविंदासी ॥८२॥
आणिक ह्नणे हरि तुज ॥ माझे मुखीचे पाडिले द्विज ॥ हे दाखवूं काय लाज ॥ शिखीमुनीसी ॥८३॥
ऐकोनि ह्नणे श्रीपती ॥ जितुके ग्रासूनि उगाळिती ॥ त्यांचे ऊर्ध्वदशन मुष्टिघातीं ॥ पाडीन मी ॥८४॥
तंव रावो ह्नणे वैशंपायना ॥ म्यां ऐकिलें श्रीवत्सलांछना ॥ त्रिविधप्रकारें त्रिविध पुराणां ॥ बोलिलें असे ॥८५॥
आणि जैं वधिला शंखासुर ॥ तो शंख पावला श्रीविष्णुवर ॥ हा ऐकिला विचार ॥ बहुतामुखीं ॥८६॥
मुनि ह्नणे गा अवधारीं ॥ दैत्यें हरिल्या श्रुंती चारी ॥ तैं तो शंखाचे कोठारीं ॥ लपाला होता ॥८७॥
तें तया जाहलें वज्रकवच ॥ ह्नणोनि मीनें केलें झुंज ॥ मग तेंचि नाम जाहलें सहज ॥ शंखासुरासी ॥८८॥
आणिक दुसरें अवधारी ॥ श्रीवत्सलांछन निर्धारी ॥ श्री जन्मली ज्याचे वक्त्रीं ॥ तेंची नाम तयासी ॥८९॥
ह्नणोनि बोलिजे तो श्रीवत्स ॥ तया पासोनि श्रीचा बीजांश ॥ आणि श्रीवत्स बोलिजे हषीकेश ॥ गुण उभयत्वें ॥ ॥९०॥
जैसी शूळाची लागतां अणी ॥ अणिमांडव्य बोलिजे पुराणी ॥ तैसा श्रीवत्स येणें गुणीं ॥ नंदीस्तव तो ॥ ॥९१॥
हें भविष्योत्तरीं वर्णन ॥ श्रीभागवतीं ॥ भृगूचा चरण ॥ विष्णुपुराणी अभिधान ॥ श्रीवत्सलांछन तया ॥ ॥९२॥
आतां असो हे संजोगणी ॥ हरी श्रीवत्सलांछन आलिंगुनी ॥ मग देवें नाम ठेविलें वर्णी ॥ नंदी ऐसें ॥ ॥९३॥
देवें नाम ठेविलें नंदी ॥ कीं यासी योद्धा नाहीम युद्धीं ॥ मग त्यजूनि क्षीराब्धी ॥ निघाला येरु ॥९४॥
येवोनि पितया केला नमस्कार ॥ कथिला विष्णूचा समाचार ॥ मग आलिंगिला कुमर ॥ आनंदेंसीं ॥९५॥
नंदी ह्नणे ताता अवधारीं ॥ म्यां दुग्ध घेतलें धायवरी ॥ परि आतां पाहिजे पोटभरी ॥ तृणपल्लव ॥९६॥
तेव्हां तयासि सांगे मुनी ॥ तूं जाय गा अमरभुवनीम ॥ इंद्रा जिंकोनी श्रृंगारवनीं ॥ चरावें तुवाम ॥९७॥
तैं नमक्सारोनि पुढती ॥ नंदी निघे शीघ्रगती ॥ वेगें पावला अमरावती ॥ ॠषिपुत्र तो ॥९८॥
उभा राहोनि उपकंठीं ॥ सकल वन देखिलें दृष्टीं ॥ मग पोंवळी पाडोनि शिंगटीं ॥ प्रवेशला माजी ॥९९॥
पैसाव जाहला वनांत ॥ मग सर्व वृक्षांसि भक्षित ॥ जें जें तया आड पडत ॥ तें तें करी भस्म पै ॥१००॥
जाई जुई मालती केळें ॥ दवणे मोगर्या सकळेम ॥ द्राक्षें डाळिंबे नाना परिमळें ॥ भक्षिलीं तेणें ॥१॥
तैं शिखिॠषीचा कुमर ॥ सहजें अग्नीचा अवतार ॥ तो तृप्त व्हावयासी विचार ॥ आथीच ना ॥२॥
ऐसिया नाना पुष्पजाती ॥ तरु भक्षितां पडिले क्षितीं ॥ तंव ऐकिला राखणाइतीं ॥ गजरु त्याचा ॥३॥
ह्नणोनि आले लवडसवडी ॥ वोढाळ हाणावया घेती धोंडी ॥ ऐसे वरुषले शतकोडी ॥ वत्सावरी ॥४॥
हाणिती लक्षसंख्या आवेशें ॥ परि पर्वत लोटे कैसा कापुसें ॥ मग ते फुंकोनि निमिषें ॥ उडविले सर्व ॥५॥
त्याहीं इंद्रा जाणविली मात ॥ एक आलासे महादैत्य ॥ तो वृषभरुपें भक्षित ॥ श्रृंगारवाटिका ॥६॥
आह्मीं हाकिला नानापरी ॥ परि तो न ढळे प्रमाणभरी ॥ मग फुंकोनियां वक्त्रीं ॥ टाकिलें येथें ॥७॥
ऐकतां इंद्रें केला हाकार ॥ गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ वाद्यें लावोनि देवेंद्र ॥ आला तेथें ॥८॥
इंद्रे देखोनि नंदिकेश्वरा ॥ ह्नणे धरारे या तस्करा ॥ देवद्रुमांच्या संहारा ॥ केलें येणें ॥९॥
ह्नणोनि हाणिती पाषाण ॥ खद त्रिशूळ मुद्रल बाण ॥ जाणो पूजिती सुरगण ॥ या नंदिकेश्वरासी ॥११०॥
जैसा कृमि सिंधुकल्लोळें ॥ कीं रवि लोपे अभ्रमंडळें ॥ तैसा नंदी लोपिला ते वेळे ॥ इंद्रसैन्याने ॥११॥
नाना शस्त्रास्त्रांचे पूर ॥ सोडोनि केला अंधकार ॥ तें दृष्टीनें नंदिकेश्वर ॥ पाहतसे ॥१२॥
मग कोपला ॠषिनंदन ॥ जाणो खोपेचा पंचानन ॥ तैसा उठिला नंदन ॥ शिखिॠषीचा ॥१३॥
एक ते घ्राणींचिये श्वासा ॥ उडोनि गेले दाही दिशा ॥ एक मुखाचिया आवेशां ॥ जाहले दुखंड ॥१४॥
एकां वाहोनियां शिंगटीं ॥ वेगें टाकिलें गिरिकूटीं ॥ थडकोनियां तळवटीं ॥ मर्दिले येकां ॥१५॥
एकां बांधोनियां पुच्छें ॥ भवंडिलें दाहीदिशे ॥ एकां मुखें करोनि डसे ॥ ॠषिपुत्र तो ॥१६॥
एक घायाळ दुःखें हुंबती ॥ एकाचीं निघालीं आंतीं ॥ एक पिष्टचि जाहले घातीं ॥ थडकेचिया ॥१७॥
मग ते सकळही सुरवर ॥ गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ रणीं सांडोनि हतियार ॥ पळाले समस्त ॥१८॥
ऐसें भंगलें देवसैन्य ॥ पळाले ते रानोरान ॥ मग कोपला भगनंयन ॥ तये वेळीं ॥१९॥
इंद्र चालिला आवेशें आपण ॥ नंदी विंधिला निर्वाण ॥ धनुष्या लावोनियां बाण ॥ अंगशक्ती ॥ ॥१२०॥
ऐसा विंधिला शस्त्रबळें ॥ तीं जाणों शंभूवरी कमळें ॥ मग चालिला समफळें ॥ नंदिकेश्वर तो ॥२१॥
तेणें घ्राणश्वासें धुंधुवातें ॥ बाण नेले गगनपंथें ॥ मग विस्मयो करोनि सुरनाथें ॥ घातले वज्र ॥२२॥
जाणों पडिला महा पर्वत ॥ तैसा आदळला वज्रघात ॥ तेणें नंदी जाहला मूर्छित ॥ तये वेळीं ॥२३॥
ऐसिया तेणें वज्रघातें ॥ अशुद्ध वमिलें ॠषिसुतें ॥ मूर्छे पडिलासे निश्वितें ॥ नंदिकेश्वरु तो ॥२४॥
रणीं लोटिलें शोणित ॥ तेणें पूर्वदिशे जाहलें लोहित ॥ हे भविष्योत्तरींची मात ॥ ऐक राया ॥२५॥
तें नंदीचें शोणित ॥ गगनीं जाहलें पतित ॥ त्याचे साजिवले जित ॥ इंद्रगोप हे ॥२६॥
इंद्रा आणि गोपती ॥ ययांपासाव पडिले क्षितीं ॥ ह्नणोनि नाम जाहलें गा भूपती ॥ इंद्रगोप ऐसें ॥२७॥
तें पूर्वदिशे शोणिती ॥ जैं वर्षाव होय प्राप्त ॥ तैं तें येतसे वाहत ॥ भूमंडळासी ॥ ॥२८॥
मग मूर्छा भंगूनि श्रीवत्स ॥ अठ्ठाहास्य केलें हव्यासें ॥ इंद्रासि वेढूनियां पुच्छें ॥ धरिला तेणें ॥२९॥
ऐसा धरोनि पुसाटी ॥ इंद्र टाकिला कैलासपुटीं ॥ जेथें होता धुर्जेटी ॥ सभास्थानीं ॥१३०॥
ऐसा आदळला सुरनाथ ॥ जाणों समयीं पावला मृत्यु ॥ मग वारा घालोनि सचेत ॥ केला रुद्रें ॥३१॥
इकडे नंदी गेला इंद्रभुवना ॥ फांफरें हाणितलें सिंहासना ॥ रत्नें टाकिली गा नृपनंदना ॥ अष्टदिशांसी ॥३२॥
त्यां पासाव जाहली रत्नखाणी ॥ हें भविष्योत्तरपुराणीं ॥ विरोचनास्तव हे वाणी ॥ भारतींची ॥३३॥
मग नंदीभद्र अमरावती ॥ हे सत्य जाहली ब्रह्मभारती ॥ इकडे इंद्रातें पुसे पशुपती ॥ वृत्तांत सर्व ॥३४॥
येरु ह्नणे वत्साचा धरुनि आकार ॥ नेणों कोण असे महावीर ॥ तेणें पळविला परिवार ॥ अमरावतीचा ॥३५॥
सकळही दिव्य तरुवर ॥ ते भक्षूनि केले जर्जर ॥ आणि झुंजता निःशस्त्र ॥ केलें मज ॥३६॥
मग वेष्टूनियां पुसाटीं ॥ येथें टाकिलें गा धूर्जटी ॥ ऐसी ऐकोनियां गोष्टी ॥ कोपला रुद्र ॥३७॥
तेणें शंखाचें करोनि स्फुरण ॥ हाकारिले शिवगण ॥ सवें चालिला आपण ॥ महादेव तो ॥३८॥
संगेंख भूतभैरव सकळ ॥ आणि शिवगणांचें दळ ॥ असंख्य भार तुंबळ ॥ चालिले रुद्राचे ॥३९॥
वेगें पावला अमरावती ॥ तंव नंदीनें देखिला पशुपती ॥ जैसा चंद्र उदेला पक्षांतीं ॥ पूर्णिमेचा ॥१४०॥
तैं धाविन्नले शिवगण ॥ हांहां ह्नणोनि घालिती पाषाण ॥ एक शितीं लावोनि बाण ॥ विंधिताती ॥४१॥
एक त्रिशूळ कांती मुद्रल ॥ रोषें हाणिती सकळ ॥ जाणों सुटले तृणटोळ ॥ पर्वतीं जैसे ॥४२॥
मग आवसोनि श्रीवत्सें ॥ गर्जना केली महाश्वासें ॥ शस्त्रें वारोनि दीर्घपुच्छें ॥ चालिला तो ॥४३॥
जाणों पर्वतासि फुटले चरण ॥ तैसें मर्दित चालिला सैन्य ॥ एक पळाले जीव घेऊन ॥ शिवाआड ॥४४॥
येक मर्दिले चरणीं ॥ एक पुच्छीं बांधोनी ॥ एकां श्रृंग हदयीं टोंचोनी ॥ मारिले एक ॥४५॥
ऐसा जाणोनि नाशु ॥ रुद्र ह्नणे हा धरुं पशु ॥ कैसा उन्मत महा बीभत्सु ॥ रणदक्ष पैं ॥४६॥
मग वाहोनि धनुष्यें ॥ नंदी विंधिला महेशें ॥ तैं नंदी वारीतसे श्वासें ॥ वीरच्या वरी ॥ ॥४७॥
परि घेवोनि निजशस्त्रा ॥ शिवें टाकिलें त्रिशूळचक्रा ॥ तंव येरें विकासूनि वक्त्रा ॥ गिळिलीं दोन्हीं ॥ ॥४८॥
आणि वाहूनि भृकुटी ॥ त्राणें धडकिला धूर्जटी ॥ श्रृंगे रोवोनियां कंठीं ॥ टाकिला योजन एक ॥४९॥
कंठीं रुपला श्रृंगदेंठ ॥ तेणें वर्ण जाहला पिंगट ॥ आणि जाहलें नीलकंठ ॥ नाम शिवाचें ॥१५०॥
तरि नीळ बोलिजे बाळवत्स ॥ हा श्रुतिशास्त्रीं सौरस ॥ नीळें हाणिला ह्नणोनि महेश ॥ जाला नीलकंठ ॥५१॥
भागवतीं नीळकंठ हळाहळें ॥ पद्मपुराणीं इंद्रकरवालें ॥ भविष्योत्तरीं श्रृंगफळें ॥ श्रीवत्साचे ॥५२॥
हें सकळही असे सत्य ॥ परि कल्पररत्वें होय युक्त ॥ देहधारी कर्मभूत ॥ आत्मा जैसा ॥५३॥
मग कोपला महारुद्रा ॥ शस्त्रीं जाहला अनादर ॥ ह्नणोनि उघडिला त्रिनेत्र ॥ तये वेळीं ॥५४॥
भेणें पळाला सुरेश्वर ॥ परि नंदी अग्नीचा अवतार ॥ तें जाणोनियां अंगार ॥ न करीच कांहीं ॥५५॥
मग घातलें पवनास्त्र ॥ तेणें उडाले तरुवर ॥ परि नंदी नढले पदमात्र ॥ वायुरुप तो ॥५६॥
मागुती घातलें पर्जन्यास्त्र ॥ परि नंदी वरुणांचे शरीर ॥ ह्नणोनि विखारासी विखार ॥ डंखी केवीं ॥५७॥
तये वेळी तो जाश्वनीळ ॥ रणीं राहिला ठेला निश्वळ ॥ ह्नणे मजसारिखा महा काळ ॥ जिंकिला येणें ॥५८॥
ऐसी करितां विचारणा ॥ तंव नंदी ह्नणे त्रिनयना ॥ शस्त्रें देईन तरी अंगवणा ॥ झुंजें मागुता ॥५९॥
त्रिशूळ आणि सुनाभचक्र ॥ नंदीनें उगाळिलें समग्र ॥ ह्नणें हें पर्जी गा हत्यार ॥ नीलकंठा ॥ ॥१६०॥
तंव जन्मेजय ह्नणे गा मुनी ॥ सुदर्शन ऐकिले श्रवणी ॥ परि सुनाभचक्राची करणी ॥ सांगिजे मज ॥६१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ जन्मेजया तूं विचक्षण ॥ रविरश्मीचें प्रमाण ॥ वेंचिलें तुवां ॥६२॥
तरी वधाया वृत्रासुरांचे शिर ॥ तैं दधीचिअस्थीचें केलें वज्र ॥ तयाची काढावया धार ॥ धरिलें सूर्यचक्रीं ॥६३॥
तेतीस कोटी सुरवर चक्रीं लावितेजाहले वज्र ॥ ठिणग्या उसळती तो चूर ॥ येकवटिला देवीं ॥६४॥
त्याचेम केलें सुनाभचक्र ॥ सहस्त्र पांकोळ्या भयंकर ॥ मग तेणें छेदिलें शिर ॥ वृत्रासुरांचें ॥६५॥
कांहीं चूर पडिला धरणीं ॥ त्या वैरागरी जाहल्या हिरेखाणी ॥ हे भविष्योत्तरींची वाणी ॥ कथिली तुज ॥६६॥
मग देवांही मिळोनि समग्र ॥ शिवासि अर्पिलें तें चक्र ॥ सुनाभ नामें सहस्त्रपत्र ॥ अरिमर्दन जें ॥६७॥
सर्वदेवांचें तेज सुदर्शन ॥ तें जालंधराचें शिरमर्दन ॥ वज्राचें स्फुलिंग चूर्ण ॥ तें सुनाभ चक्र ॥६८॥
आणिक एक हरिवंशीं ॥ सूर्यतेज न सांवरे संज्ञेसी ॥ ह्नाणोनि नेलें वज्रासी ॥ सूर्यचक्र ॥६९॥
तेणें कापिलें सूर्यचक्र ॥ मग तेज जाहलें स्थिर ॥ परि त्याचा मेळवोनि चूर ॥ केलें सुदर्शन ॥१७०॥
आतां असो हे आडकथा ॥ रणीं ठक पडिलें जगन्नाथा ॥ शस्त्रें दीधलीं गा भारता ॥ नंदीकेश्वरें ॥७१॥
मग रुद्र ह्नणे गा गोपती ॥ शस्त्रें दीधलीं त्वां मागुती ॥ आतां झुंजिजे पुढती ॥ तरी नेदीं यशा ॥७२॥
तरी तूं ऐसा महापवित्र ॥ तुझें नाम बसवेश्वर ॥ तुझिये बळाचा पार ॥ नेणवे आह्मां ॥७३॥
आतां माग गा प्रसन्न ॥ जाहलां देखोनि तुझे गुण ॥ तंव येरु ह्नणे जी परिपूर्ण ॥ आहे मातें ॥७४॥
सरितेनें काय द्यावें सागरा ॥ कीं खद्योतें द्यावें दिन करा ॥ चातकें तरी प्रसन्न जलधरा ॥ काय व्हावें ॥७५॥
नंदी ह्नणे गा जगन्नाथा ॥ तूंचि मागें मजसी सर्वथा ॥ तुजसारिखा मागता ॥ न मिळे कधीं ॥७६॥
मग तयासि ह्नणे त्रिनयन ॥ तुं दाता मीच कृपण ॥ तरी भाक देवोनियां पण ॥ करीं सत्य ॥७७॥
नंदीनें दीधलें भाकदान ॥ शिव ह्नणे होई माझें वहन ॥ तुझेनिबळें हें त्रिभुवन ॥ जिंकीन मी ॥७८॥
मग नंदी ह्नणे तथास्तु ॥ मीं होतों कीं सहज अनाथु ॥ आतां तूं स्वामी मी भृत्यु ॥ असें देवा ॥७९॥
चरण पूजोनि निढळीं ॥ ह्नणे जयजयाजी चंद्रमौळी ॥ माझें मागणें कीं तुज जवळी ॥ असेन सदा ॥१८०॥
तंव रुद्र ह्नणे रे वत्सराजा ॥ मज आधीं तूं पावसी पूजा ॥ हें टाळील तो शत्रु माझा ॥ सत्य जाण ॥८१॥
मी आरुढेन तुजवरी ॥ परि तूं ध्वजस्तंभी माझे शिरीं ॥ दृष्टीवेगळा क्षणभरी ॥ न करी सत्य ॥८२॥
तुवां शस्त्रें सामाविली उदरीं ॥ देवद्रुम भक्षिले वक्री ॥ तरी तें पुरीष मी वंदीन शिरीं ॥ विभूतिवेषें ॥८३॥
आतां असो हे पुढती ॥ पुष्पें वर्षला सुरपती ॥ देवी नाम ठेविलें पशुपती ॥ महादेवासी ॥८४॥
मग आरुढोनियां वत्सा ॥ श्रीरुद्र गेला कैलासा ॥ नंदीनें पाठविला संदेशा ॥ शिखि पितयासी ॥८५॥
इंद्रा फेडुणि घेतली अमरावती ॥ सर्व भक्षिली वनस्पती ॥ देवां जिंकोनियां पशुपती ॥ त्रासिला रणीं ॥८६॥
मग शंभूचिये सेवेसी ॥ आह्मीं लागलों गा परियेसीं ॥ ऐसा संदेशा शिखिॠषीसी ॥ पाठविला तेणें ॥८७॥
ऐकतां संतोषला थोर ॥ सुख मानी ॠषेश्वर ॥ पुढें ऐकें गा सादर ॥ जन्मेजया ॥८८॥
ॠषि ह्नणे राया भारता ॥ हे भविष्योत्तरींची कथा ॥ नंदी जोडला जगन्नाथा ॥ ऐसियापरी ॥८९॥
हें नंदीरुद्रांचे आख्यान ॥ जया होय श्रवण पठण ॥ तयासि द्वादशलिंगाचें दर्शन ॥ घडेल सत्य ॥१९०॥
श्रीवत्साची जीर्ण कथा ॥ जे ऐकती गा भारता ॥ ते धनपुत्रेंसीं आरोग्यता ॥ पावती प्राणी ॥९१॥
नंदी आणि शूळपाणी ॥ हें नाम वाचेनें घेई प्राणी ॥ तो न पडे नीचयोनीं ॥ लिंगपुराणमतें ॥९२॥
आतां असो हे नंदीची कथा ॥ दक्ष तरी उठेल आतां ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९३॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ नंदीश्वरआख्यानप्रकारु ॥ त्रयोदशोऽध्यायीं सांगितला ॥१९४॥
॥ श्रीसांबासदाशिवार्पणमस्तु ॥
॥ शुभंवतु ॥