श्रीगणेशाय नमः
वैशंपायन ह्नणती भारता ॥ पुरुरव्याच्या त्रय पुत्रांची कथा ॥ तुज निवेदिली नृपथाथा ॥ आतां चतुर्थाची परिसिजे ॥१॥
मग तो विष्णुचा कुमर ॥ जया नाम बोलिजे एकवीर ॥ तो सर्वविद्या धनुर्धंर ॥ जाहला पूर्ण ॥२॥
तंव स्वर्गीं विष्णूचे भुवनी ॥ लक्ष्मीसि कथी नारदमुनी ॥ कीं एकवीर नांदतो मेदिनी ॥ कांति भूमीसी ॥३॥
मग लक्ष्मी ह्नणे हो जगजेठी ॥ मज पुत्रेंसी करावी भेटी ॥ एकवेळ पाहेन दृष्टीं ॥ एकवीरासी ॥ ॥४॥
तो जाणोनियां प्रश्न ॥ काशीसि आला नारायण ॥ दृष्टीं पाहिला नंदन ॥ एकवीर तो ॥५॥
विष्णु ह्नणे गा अवधारीं ॥ एकवीरां तुं महा क्षेत्री ॥ तरी महींद्र दैत्या संहारीं ॥ महादृष्ट तो ॥६॥
इंद्राचिया अष्टकुमरी ॥ चोरोनि राहिला सरोवरीं ॥ हा वधीं पां देवांरी ॥ बाळका तूं ॥७॥
मग तो राव सोमवंशी ॥ देवसरोवरा आला कटकेंसीं ॥ तंव रुदन करितां डोळसी ॥ देखिली जयंती ॥८॥
ती येकी सरोवराचे पाळीं ॥ येरी लपाल्या असती जळीं ॥ तं व ऐकोनियां चावळीं ॥ आला तेथें महींद्र ॥९॥
सूकरांचा वेष धरोनी ॥ हिंडत होता काननीं ॥ तंव पालटुनियां तत्क्षणीं ॥ जाहला ब्राह्मण ॥१०॥
रोखें चालिला एकवीर ॥ दोघां संग्राम जाहला थोर ॥ रणीं हाणिला दैत्य महींद्र ॥ येकवीरें ॥११॥
मग त्या इंद्रचिया कुमरी ॥ एकवीरें सोडविल्या सरोवरी ॥ त्या कोणकोण तरी अवधारीं ॥ जन्मेजया तूं ॥१२॥
जयंती मालती कमोदिका ॥ सुशीला भानुमती उन्नतिका ॥ पुष्पावती आणि चंद्रिका ॥ ऐशा आठ ॥१३॥
असो वधिला जाणोनि महींद्र ॥ मग तेथें आला सुरेंद्र ॥ तंव उभा देखे शारंगधर ॥ पुत्राजवळीं ॥१४॥
मग देवासि ह्नणे सुरेंद्र ॥ हा स्वर्गा नेऊं एकवीर ॥ तंव कन्या ह्नणती गळसर ॥ बांधिला आह्मीं ॥१५॥
मग कन्या पाठवोनि काशीपुरा ॥ आणि स्वर्गा नेलें एकवीरा ॥ लक्ष्मीसि भेटवोनि माघारा ॥ आणिला काशीसी ॥१६॥
तो एकवीर रावो देखा ॥ आनंदें बत्तीस सहस्त्र वर्षा ॥ राज्य करोनि ब्रह्मरेखा ॥ सांडिला देह ॥१७॥
भारता राव तो एकवीर ॥ महिकावतीचा नरेंद्र ॥ तया जाहला एक पुत्र ॥ कृतवीर्य नामें ॥१८॥
त्या कृतवीर्याचा कुमर ॥ जो कार्तवीर्य महाधीर ॥ तोचि सहस्त्रार्जुन साचार ॥ विकटबाहो ॥१९॥
त्यातें विनविलें प्रधानी ॥ कीं तुह्मांसि टिळा करुं सुदिनीं ॥ तो ह्नणे विनकरें सिंहासनीं ॥ न बैसें मी ॥२०॥
राज्यांती नरक भोगणें ॥ हे प्रत्यक्ष बोलती पुराणें ॥ तरी दुःखमूळ तें राज्य करणें ॥ आवंतूं कैसें ॥२१॥
सहज पारधीचें जडे कीजेति बहुता ॥ येकी आंगें एक त्यजितां ॥ तोचि नरक ॥२३॥
ऐसे नानाविचार वचनीं ॥ आणिलें प्रधानांच्या अंतःकरणीं ॥ ह्नणे हस्तेंविन सिंहासनीं ॥ बैसों कैसा ॥२४॥
तरी मी पाहेन एखादा समर्थ ॥ योगी संन्यासी अवधूत ॥ मग त्याचिंये वचनें निवांत ॥ बैसेन राज्यीं ॥२५॥
तंव तयासि सांगे प्रधानसुत ॥ एक ऐकिली असे मात ॥ कीं सिंहाद्रिपर्वती त्रिमूर्ति दत्त ॥ महामुनी तो ॥२६॥
मग तो रंकावतीचा सुत ॥ धांडोळी सिंहाद्रि पर्वत ॥ तंव देखिला श्रीगुरुदत्त ॥ महासिद्ध तो ॥२७॥
तो जाणोनियां गुरुद्त्त ॥ विकट ह्नणे मी शरणागत ॥ मग दास होवोनि निश्वित ॥ राहिला सेवे ॥२८॥
तंव कोणे एके सुदिनीं ॥ दत्त ह्नणेरे विकटपाणी ॥ मज स्त्रान करावया उन्ह पाणीं ॥ आणि वहिलें ॥२९॥
अर्जुन विचारी निजमनीं ॥ कीं उदक न्यावें कैसें विना पाणी ॥ मग पात्र धरोनियां दशनीं ॥ आणिलें तेथेम ॥३०॥
ढेणें पोळलें वक्षस्थळ ॥ तंव दत्त ह्नणे जाहलें सफळ ॥ सहस्त्र होत कां करकमळ ॥ अर्जुना तुज ॥३१॥
जैं दृष्टीं पाहे अर्जुनु ॥ तंव भुजांहीं व्यापिली तनु ॥ जाणोम उगवले सहस्त्रभानु ॥ त्याचिये परी ॥३२॥
मग वर बोलिला श्रीदत्त ॥ कीं तुझा देव मानितील पुरुषार्थ ॥ परि एका ब्राह्मणाविणें अजित ॥ सकळांसि तूं ॥३३॥
तुझें केलिया नामस्मरण ॥ तयासि मार्गी होय निर्विघ्न ॥ आणि कार्यासि पावती जन ॥ तवस्मरणें ॥ ॥३४॥
मग त्या नमोनि ॠषीधरा ॥ सहस्त्रार्जुन आला नगरा ॥ पुढें आराधिता जाहला शंकरा ॥ नानापरी ॥ ॥३५॥
तेणें प्रसन्न करोनि त्र्यंबका ॥ स्वयें लाधला अमृतकूपिका ॥ मग त्या प्राशोनि पीयूषा ॥ आला महिकावतीसी ॥३६॥
अनंतर तो कृतवीर्यनंदन ॥ राज्यीं बैसला सहस्त्रार्जुन ॥ पृथ्वीवरी अरिमर्दन ॥ महाबाहो तो ॥३७॥
जेणेम आंगीचिये प्रौढी ॥ रेवा बांधिली भुजदंडी ॥ रावणा घालोनि बांदवडी ॥ मग दीधला ब्रहयासी ॥ ॥३८॥
तया पारधी हिंडतां वनीं ॥ भोजन दीधलें रेणुनंदिनी ॥ परि धेनुनिमित्त जप्तदग्नी ॥ वधिला अर्जुनें ॥ ॥३९॥
तंव धांवण्या पावला भृगुसुत ॥ परशुराम वीर धूमकेत ॥ जेणें वधिला नृपनाथ ॥ सहस्त्रार्जुन हा ॥४०॥
हे समूळ भृगुकथा ॥ द्वितीयस्तबकीं आहे भारता ॥ ते सांगतां पुनरागता ॥ वाढेल ग्रंथ ॥४१॥
तंव ह्नणे जन्मेजयो ॥ हा सोमवंशी पवित्र रावो ॥ तेणें विप्र वधिला हा जयो ॥ मिरवों नये ॥४२॥
आणि उदरीं जाहला विकटबाहो ॥ हें व्हावया काय अपावो ॥ या कथेचा गर्भभावो ॥ सांगिजे मज ॥४३॥
मग ह्नणे तो मुनीश्वर ॥ कीं शिखी दैत्याचा कुमर ॥ मधु नामें महा असुर ॥ विख्यात जो ॥४४॥
तो पूर्वी बृहस्पतीचा नंदन ॥ महादुष्ट असे कृतघ्न ॥ बाळपणीं शापदान ॥ पावला असे ॥४५॥
नानापुष्पीं शैलजा ॥ नित्य पूजी वृषभध्वजा ॥ ऐसिया एक सहस्त्र पूजा ॥ मोडिल्या तेणें ॥४६॥
मग तया शापिलें गौरीं ॥ कीं तूं हस्तेविण उपजसी उदरीं ॥ आणि मग तो देव श्रीहरी ॥ वधील तुज ॥४७॥
तें ऐकोनि ह्नणे गिरिजा ॥ कीं रुद्रवरदें पावलासि भुजा ॥ परि त्याही कापील वोजा ॥ नारायण ॥ ॥४९॥
भारता तो शिखीचा कुमर ॥ मधुनामें महाअसुर ॥ त्याचा देवें केला संहार ॥ मधुसूदनें ॥५०॥
पुढें कोणे येके अवसरीं ॥ कृतवीर्यासी ह्नणे सुंदरी ॥ भोग द्यावा जी कामलहरीं ॥ प्राणेश्वरा ॥५१॥
तंव तियेसि ह्नणे भूपाळ ॥ हा टाळावा सायंकाळ ॥ दैत्यवेळेसि हा बोल ॥ बोलों नये ॥५२॥
परि ते न राहे आकुळी ॥ ऋतु घेतला तिये वेळीं ॥ तंव मधु संचरला ते काळीं ॥ गर्भी तीच्या ॥५३॥
तोचि हा जन्मला मधुदैत्य ॥ महाबीभत्स कररहित ॥ जो सोमवंशी नृपनाथ ॥ सहस्त्रार्जुन ॥५४॥
मग तो निमाल्या भूपती ॥ लोकीं सांडिली महिकावती ॥ तंव चारी स्त्रिया पूर्वस्थिती ॥ होत्या गरोदर ॥५५॥
असो मारिलिया सहस्त्रर्जुन ॥ मग क्षत्रियां वेढिला भृगुनंदन ॥ इकडे स्त्रियांसि घेवोनि प्रधान ॥ गेला बद्रिकाश्रमीं ॥५६॥
पुढें त्या ॠषीचिये मंदिरीं ॥ चारी पुत्र प्रसवल्या सुंदरी ॥ तयांसि कन्याचिये परी ॥ पाळी दालभ्यॠषी ॥५७॥
पहिला पुत्र सुलक्षण ॥ त्यांचे नाम इंद्रसेन ॥ भद्रसेन आणि रुद्रसेन ॥ चवथा धर्मपाळ ॥५८॥
ऐसे जाहले चारी कुमर ॥ महा बळिये धनुर्धर ॥ तंव राम भोंवत पृथ्वीचक्र ॥ आला तेथें ॥५९॥
त्या पुत्रांसी पुसे भृगुसुतु ॥ तंव ऋषि ह्नणे आमुचे नातु ॥ मग जानवीं देवोनि गुप्तु ॥ कथिला मंत्र ॥६०॥
ते जाणोनि द्विजसुत ॥ तेथोनि राम गेला निवांत ॥ पुढें जाहलें हो अद्भुत ॥ सहस्त्रार्जुनाचें ॥६१॥
चंद्रसेन प्रधानाचा सुत ॥ तेणें ते उपदेशिले समस्त ॥ मग प्रवर्तले कार्याप्रत ॥ जन्मेजया गा ॥६२॥
एकदा इंद्रसेन कुमर ॥ मातेसि पुसे समाचार ॥ कीं आमुचा पिता सहस्त्रकर ॥ वधिला कवणें ॥६३॥
ऐकतां गहिंवरलीं वचनें ॥ ह्नणे तो वधिला भृगुनंदनें ॥ तंव पुत्र ह्नणती उसणें ॥ काढूं आह्मीं ॥६४॥
माते प्रसन्न करुनियां भवानी ॥ आणि तोषवूं शूळपाणी ॥ बाण मागोनि निर्वाणीं ॥ हाणों भृगुसुता ॥६५॥
एकदा ते समस्त राजकुमर ॥ पारधी खेळतां मनोहर ॥ दुर्गम वन महाघोर ॥ तेथें पातले स्वइच्छें ॥६६॥
ऐसी खेळतां व्याहाळी ॥ बाण टाकिला क्रीडारोळीं ॥ तो लागला असे तळीं ॥ दुर्गाचिये ॥६७॥
जंव बाण उडवीत सुत ॥ तंव आरसा देखिला देवदत्त ॥ माजी रुप देखिलें अकल्पित ॥ मनइच्छेचें ॥६८॥
शिवें दाहिला जैं त्रिपुर ॥ तैं शिळे मुराला तो असुर ॥ तोचि आरसा ठेविला पवित्र ॥ तेज त्रिपुराचें ॥६९॥
ऐसा देखोनि आरसा ॥ ह्नणती हा उचित नेवूं महेशा ॥ बाण मागोनि सर्वेशा ॥ जिंकावा शत्रु ॥७०॥
मग ते जावोनि कैलासा ॥ शरण गेले उमामहेशा ॥ आणि दर्पण अर्पिला सर्वेशा ॥ अलोलिक पैं ॥७१॥
तेणें संतोष जाहला त्र्यंबका ॥ देवें अवलोकिलें त्यामुखा ॥ मग मनीं विचारिता होय विवेका ॥ द्वीपीं चिया ॥७२॥
ह्नणे हे मागों आले बाण ॥ कीं शिवप्रसादें वधूं भृगुनंदन ॥ तरी तो साक्षात नारायण ॥ फरशधर ॥७३॥
फेडावया पृथ्वीचा भार ॥ तेणें घेतला अवतार ॥ दैत्यांचा केला संहार ॥ आमुचेनि बोलें ॥७४॥
मग शंभु ह्नणे गा गणेशा ॥ हे शैलजे देतील आरसा ॥ तेव्हां त्वां मुखीं राहोनि वाचा ॥ वळवीं तयेची ॥७५॥
मग त्यांसी ह्नणे त्रिलोचन ॥ हा उमेसि भेटवा दर्पण ॥ ते प्रसन्न जाहल्या हेतु पूर्ण ॥ करील तुमचा ॥ ॥७७॥
ऐसा ऐकोनि शिवसंदेशा ॥ भवानीसी अर्पिला आरसा ॥ ते देखोनिया डोळसा ॥ संतोषली अंतरीं ॥ ॥७८॥
जंव उमा पाहे दर्पणु ॥ तंव साक्षात बिंबला असे भानु ॥ मग संतोषोनि सन्मानु ॥ केला त्यांचा ॥७९॥
वेळोवेळां पाहे मुखंमयंका ॥ हातें श्रॄंगारी श्रृंगारतिलका ॥ मग वरदपणें ह्नणे अंबिका ॥ मागा प्रसन्न मी ॥८०॥
तंव त्यांहीं वंदोनि चरण ॥ ह्नणती अंबे जाहलीस प्रसन्न ॥ तरी देई हो वरदान ॥ अखंड सदा ॥८१॥
अंबा ह्नणे तथास्तु ॥ तुमचा पुरेल मनोरथु ॥ ह्नणोनि मस्तकीं ठेविला हस्तु ॥ अंबिकें तया ॥८२॥
आणिक ह्नणे शैलबाळी ॥ मी सर्वदा असेन तुह्मांजवळी ॥ स्मरण केलिया तत्काळीं ॥ पावेन तुह्मां ॥८३॥
तुह्मीं चालवावा कुळधर्म ॥ सहामहिन्यांचा महाधर्म ॥ वेळ पडलिया तुमचा श्रम ॥ हरीन स्वांगें ॥८४॥
तुह्मीं पूजावें पितळ कांसें ॥ रस वोतावे सांडसें ॥ धातुवज्र दमोनि मुसे ॥ आटवावे ॥८५॥
त्यांची करावीं नानापात्रें ॥ तें तुह्मां वणिज फळेल निर्धारें ॥ तुह्मां करभारें सुखसारें ॥ ऐसेन गमे ॥८६॥
तुह्मीं भारें तुळाची तुळा ॥ तेचि तुह्मां फळेल्ल शैलबाळा ॥ आतां नगरा जावोनि शाळा ॥ मांडाव्या तुह्मीं ॥८७॥
मग त्यांहीं वंदोनि भवानी ॥ ह्नणती आह्मी पुत्र तूं जननी ॥ आह्मां रणीं वनीम स्मरणीं ॥ पावावें मातें ॥८८॥
मग ते चारी राजकुमर ॥ नगरा आले वेगवत्तर ॥ मातेसि कथिलें समग्र ॥ प्रसन्नत्व अंधेंचें ॥८९॥
एकवटोनि धातु सकळा ॥ प्रथम मांडिली लोहशाळा ॥ तंव सर्प हाकारोनि शैलबाळा ॥ धाडि तेथें ॥९०॥
मग अग्नि फुंकिती सर्प श्वासें ॥ मुसा धरिती सर्पसांडसें ॥ तंव एक धन जाहले कणसें ॥ महाफणी ते ॥९१॥
सर्पाची जे बांकली फणी ॥ तेचि पिटावया ऐरणी ॥ कातरी केलिया जोडोनी ॥ सर्पाच्याच ॥९२॥
एका सर्पाचें करोनि खोरणें ॥ लोह पिटिती महा त्राणें ॥ मग केलीं हो विखाणें ॥ प्रथम त्यांहीं ॥९३॥
घन सांडस नागफणी ॥ रात हातवडे ऐरणी ॥ कातरी सांडस खोरणीं ॥ केलीं लोहरसाचीं ॥९४॥
लोह पिटिलें सर्पमुखें ॥ गरळें वमिलें कठीण तिखें ॥ ह्नणोनि केला भूतांतकें ॥ रहिवास तेथें ॥९५॥
तें सर्पदाढेंचे तिखें ॥ ह्नणोनि पोगर उठती सर्पविखें ॥ आणि तें जमदग्नी ऐसें मुखें ॥ बोले सदा ॥९६॥
तरवारा जाणों भुजंगी ॥ पुच्छसादृश्य त्या वरांगी ॥ आणि धारा भंगिलिया भंगीं ॥ सर्पजिव्हा त्या ॥९७॥
मग मांडिल्या चारी शाळा ॥ कांसें तांबें आणि पितळा ॥ परि लोह असे आदिमूळा ॥ सकळांचिया ॥९८॥
वंगरसाचिये समरसेम ॥ तांबे आणि पितळ कांसें ॥ मग वर्णावर्णाची बहुवसें ॥ केलीं पात्रें ॥९९॥
तंव कांतीपुरीचा ब्राह्मण ॥ शंकरभठ्ठ महाप्रवीण ॥ तो आला असे यजमान ॥ याचावया तेथें ॥१००॥
तेणें देखिलीं धातुपात्रेम ॥ नाना जातीची विचित्रें ॥ ह्नणे ऐसीं हीं वसुंधरे ॥ न होती कधीं ॥१॥
हे बरवी रचिली हो सृष्टी ॥ येणे चालेल तुमची राहटी ॥ हे भूमी जिंकेल शतकोटी ॥ तुमचेनि सत्य ॥२॥
तरी या समस्तां धातुपात्रां ॥ वेगीं न्यादें कांतीपुरा ॥ त्यांचेनितुकें कनकमोहरा ॥ पावाल तुह्मीं ॥३॥
मग ते चौसष्टी उष्टरां ॥ पात्रें भरोनि गेले कांतीपुरा ॥ पालें देवोनि पसारा ॥ विस्तारिलीं भांडी ॥४॥
तंव चोलराजाची ज्येष्ठ सुता ॥ तियेनें ऐकिली लोकवार्ता ॥ ते पहावया नामें चंद्रगुप्ता ॥ आली तेथें ॥५॥
मुखपाहों लागली डोळसा ॥ हाती घेतला दिव्यआरसा ॥ ह्नणे हा सुखाकारणें राणिवसां ॥ नेऊं आह्मी ॥६॥
तंव इंद्रसेन ह्नणे उत्तर ॥ परी न मानितां चालिली सुंदर ॥ नगरींचे शतसहस्त्र किंकर ॥ खेळती पुढां ॥७॥
कोप आला इंद्रसेना ॥ हातींच्या उधळिलें दर्पणा ॥ तेणें थापा हाणोनि वदना ॥ फोडिलें तीच्या ॥८॥
तंव ते हाहा ह्नणोनि उत्तर ॥ तरवारी पर्जिलें हतियेर ॥ परि येरें ताटाचें करोनि चक्र ॥ सर्व वधिले ॥९॥
येकीं जाणविलें चोलचक्रवतीं ॥ ह्नणती हाट वाहोनि गेले शोणिती ॥ शतसहस्त्र जणांची शांती ॥ केली तिहीं ॥११०॥
मग पदाती अश्व नर हस्ती ॥ पालाणोनि चालिला चक्रवर्ती ॥ ह्नणे बांधारे मागिले हातीं ॥ चौघांजणांसी ॥११॥
ऐकतां वारु पेलिले स्वारीं ॥ तंव ते सरसावले चारी ॥ ह्नणती पाठि देऊं तरी ॥ हारी सोमवंशातें ॥१२॥
हातीं वसविलीं ताट थाळे ॥ तीं चक्रापरी दिसती वर्तुळे ॥ मग राउतांची शिरकमळें ॥ पाडिलीं तिहीं ॥१३॥
रण मांडलें महातुंबळ ॥ सैन्य उठावलें जाणों टोळ ॥ त्यांहीं भोवतें वेढिले बाळ ॥ सहस्त्रार्जुनाचे ॥१४॥
येक वर्षती बाणजाळीं ॥ येक शिळा टाकिती वरी ॥ एक गोळे लावुनि उल्हाटयंत्रीं ॥ विंधिताती ॥ ॥१५॥
तंव कुमरी चिंतिली शैलबाळी ॥ ह्नणती धांवहो महांकाळी ॥ मग आड राहोनि वक्षस्थळीं ॥ झेलिती धाय ॥१६॥
ते जाणोनि शैलबाळा ॥ इंद्रसेनें हातीं वसविली तुळा ॥ फोडीत चालिला कुंभस्थळां ॥ हस्तीचिया ॥ ॥१७॥
इकडे भवानीचे मुखमंत्रें ॥ आपणाचि उचललीं पात्रें ॥ तींचि होवोनि महाचक्रें ॥ मारिती सैन्य ॥१८॥
जैसी भोवती गीधघारें ॥ तैसीं नगरीं फिरती चक्रें ॥ तेम देखोनिया नरेंद्रें ॥ काढीला निघावा ॥१९॥
त्यातें ह्नणे शंकराचारी ॥ हे सोमवंशीचे महाक्षेत्री ॥ हे उतरले होते आवारीं ॥ रात्रीं आमुचे ॥१२०॥
राया हे करविरहित सर्वथा ॥ तरी यांसी मेळविजे स्वार्था ॥ हे तरी समोरी झुंजतां ॥ नागवती तुज ॥२१॥
तंव तें मानवलें चक्रवतीं ॥ मग दूत पाठविले संधिवृत्तीं ॥ कीं राजकन्या आणि कांती ॥ दीधलीं तुह्मां ॥२२॥
तुह्मी सोमवंशी महावीर ॥ तुह्मी कैं पहावें आमुचे घर ॥ परि सहज पाहिला पुरुषाचार ॥ रायें तुमचा ॥२३॥
आतां विरोध सांडुनि सर्वथा ॥ भेटों चलावें कांतिनाथा ॥ मग मानूनि दूतवचनार्था ॥ निघाले चौघे ॥२४॥
येतांचि आलिंगिले भूपती ॥ विडे वस्त्रें वाहिली प्रीतीं ॥ राव ह्नणे नेमव्रतें किती ॥ असती तुह्मां ॥२५॥
येरु ह्नणती दाल्म्यॠषिवचनें ॥ आह्मां असती सहा वचनें ॥ कीं काळें प्रासितांहि वदनें ॥ न बोलावें ॥२६॥
पुत्र दासी जपार्जन ॥ मादणें मैथुन भोजन ॥ ऐसें जाणोनि मौन ॥ न भंगो आह्मीम ॥२७॥
लक्षकोटींचे असो चित्त ॥ ते नदी जावो वाहावत ॥ परि हें मोडुनियां व्रत ॥ न टाकवे आह्मां ॥२८॥
ऐकतां राव जाहला निर्भर ॥ ह्नणे याहीं मारिले कुंजर ॥ तरी आतां हे वधोनि बिढार ॥ लुटूं समस्त ॥२९॥
यांहीं मारिली सर्व सेना ॥ यांसी संदेह कायसा जाणा ॥ तरी यांचिया निवटोनि माना ॥ उत्तीर्ण होणें ॥१३०॥
मग जपासि घातली आसनें ॥ हातावितीचेनि मानें ॥ येरीं घेवोनिया पडदणें ॥ बैसले चौघे ॥३१॥
तंव माहाले घेतले चांपेल ॥ माथां चर्चोनि लावी कळ ॥ मग रायें निवटिलें कंठनाळ ॥ इंद्रसेनाचें ॥ ॥३२॥
शिर तुटोनि पडलें धरणीं ॥ रुंड बैसलेंसे आसनीं ॥ जैसा योगी प्रवेशला भुवनीं ॥ उन्मनीचिया ॥३३॥
असो रुंडें करोनी अंजुळी ॥ शिर घेतलें करकमळीं ॥ मग सत्वर घातलें अंचळीं ॥ भद्रसेनाचिये ॥३४॥
शिरें विकासिलें मुखकमळ ॥ हास्य करोनि बोले मंजुळ ॥ कीं माथां पडलिया महाजाळ ॥ न टळावें सत्वा ॥३५॥
जो कां सोमवंशीचा वीरु ॥ तो या व्रताचा न सांडी धीरु ॥ उपजलियास पीडा संहारु ॥ असे सत्य ॥३६॥
गर्भी मिळे शुक्र शोणित ॥ परी त्याही परतें कर्मार्जित ॥ जें ब्रह्मलेखाचें लिखित ॥ तें टाळील कवण ॥३७॥
बोलतां दशनीच्र झळाळ ॥ जाणोम पक्क दाळिंबीचे हरळ ॥ कीं माणिकमादुसेचें पडळ ॥ उघडे जैसें ॥३८॥
ऐसा शिरांचा अनुवाद ॥ ह्नणे आमुचे हिताचा बोध ॥ ऐकतां रायासि होवोनि आनंद ॥ बोलिला येणें ॥३९॥
मग शिरांचे राहिलें वचन ॥ तंव रायें खुणाविलें जाण ॥ मग कळ लावूनि मान ॥ निवटिली भद्रसेनाची ॥१४०॥
तें भुमीसि पडलें शिर ॥ परि आसनीचें न ढळे शरीर ॥ जाणों योगमार्गें उद्धार ॥ केला साधकें ॥४१॥
मग रुड घेऊनि करें ॥ रुद्रसेना अर्पिलीं दोन शिरें ॥ आणि हास्य करोनि माधुर्यें ॥ बोले भद्राशिर ॥४२॥
ह्नणे गा बंधु रुद्रसेना ॥ सत्व सांडितां पडीजे पतना ॥ तरी मौन सांडोनि प्राणां ॥ न राखीं जनींख ॥४३॥
देह तरी काळाचें भातुकें ॥ वितळोनि जाईल निमिषें एकें ॥ तरि सत्व सांडितां उन्मेखें ॥ पडिजे नरकीम ॥४४॥
सत्वें पाविजे कैवल्यमुक्ती ॥ सत्वें पुराणीं होय कीर्ती ॥ सत्व सांडितां निंदिती ॥ तिन्ही लोक ॥४५॥
ऐसें सांगतां राहिलें गोष्टीं ॥ तंव रायें खुणाविले जेठी ॥ मग शस्त्र घालोनियां कंठीं ॥ वधिला रुद्रसेन ॥४६॥
तें शिर पडतां भूमंडळीं ॥ आपणाचि उसळे उसळीं ॥ जाऊनि पडिले अंजुळे ॥ धर्मपाळाचे ॥४७॥
शिर ह्नणे गा धर्मशाळा ॥ बोल न लावीं सोमकुळा ॥ सत्व पहावया शैलबाळा ॥ आली असे ॥४८॥
आमुचे रिघोनियां अंतरीं ॥ बोलवीतसे उमा गौरी ॥ तरी उदक पडतां शिरीं ॥ न सांडीं सत्व ॥४९॥
तंव शंकरभटाची कन्यका ॥ ते सहज तेथें होती कौतुका ॥ तें सांगावया जनका ॥ गेली वेगें ॥१५०॥
जावोनि पितयाप्रति ह्नणे ॥ आपुले आवारीं होते पाहुणे ॥ ते चोलरायें प्राणें ॥ घेतले सत्य ॥५१॥
त्यांत एक असे उरला ॥ तोही असेल कीं वधिला ॥ तरी ताता चाल पां वहिला ॥ सोडवणेसी ॥५२॥
मग तो घेवोनि उदकपात्र ॥ धांवत गेला वेगवत्तर ॥ तंव तेलें माखावयासि शिर ॥ उठती मल्ल ॥५३॥
मग कुमरें खुणाविला ऊर्ध्वकरीं ॥ तंव भटें पात्र उडविलें करीं ॥ धर्मपाळें आचमन करोनि गौरी ॥ बोभाइली ते ॥५४॥
धांवा पुकारी अंबिके ॥ ह्नणे राख राख वो कालिके ॥ सिंहवांसुरासी जंबुकें ॥ गाजिलें माये ॥५५॥
जय त्रिगुणे तामसे देवी ॥ सात्विके चंडिके शांभवी ॥ जय दुर्गें तूं वैष्णवी ॥ महामाये ॥ ॥५६॥
कमळे भगवती योगीद्रें ॥ महांकाळी महारुद्रे ॥ तूं मोहनी महाभद्रे ॥ आदिअंबे ॥५७॥
श्यामा विशाळा कमळासने ॥ दश पाद त्रिलोचने ॥ महाश्रिये राजमान्ये ॥ जय चंडिके तूं ॥५८॥
गौरी सरस्वती अंबिके ॥ श्वेतानने कुमारिके ॥ इंदिरे कर्कशे वैदिके ॥ महिषमर्दने तूं ॥५९॥
शाकंभरी नीलवणें जय शंखिनी उग्रलोचने ॥ उमा पार्वती हंसासने ॥ कालनाशने तूं ॥१६०॥
ब्राह्मी भारती कालरात्री ॥ महाअवनी अधीश्वरी ॥ जयजय महाखेचरी ॥ धेनुवे तूं ॥६१॥
शैवोक्ता कामदा कुमरी ॥ श्रीरुक्मा तूं माहेश्वरी ॥ जयजय त्रिपुरभयंकरी ॥ महाधेनुवे ॥६२॥
तेजोमंडलचतुर्दशे ॥ जय भ्रामरी अकुशपाशे ॥ महाविद्ये दैत्यनाशे ॥ वेदगर्भे तूं ॥६३॥
तंव ते शंभूची भवानी ॥ पूजा वाहत होती शूळपाणी ॥ तंव धांवा ऐकिला श्रवणीं ॥ धर्मपाळाचा ॥६४॥
तें जाणोनियां कालिका ॥ ह्नणे कोणे गांजिलें बाळका ॥ मग आज्ञा घेवोनि त्र्यंबका ॥ आली कांतिये ॥६५॥
तेज कोदलें राजधानी ॥ जाणों रवि उदेला मेदिनी ॥ श्यामरुपा देखिली भवानी ॥ धर्मपाळें ॥६६॥
अहिहार श्रवणीं कुंडलें ॥ नेत्र सुनीळ रातोत्पलें ॥ माथां मुकुट चरणकमळें ॥ काढीता ब्रीदें ॥६७॥
गदा खेटक त्रिशूळ चक्रें ॥ चतुर्भुज मनोहरें ॥ आयुधें मंडित नीलचीरें ॥ नीलकंचुकी ॥६८॥
दशनीं रत्नांची झळाळ ॥ करचरण जेवि रातोत्पल ॥ ललाटी शोभतसे कीळ ॥ अर्धचंद्राची ॥६९॥
ऐसी पावली रुद्रदारा ॥ पाहे तंव देखे तीन शिरां ॥ मग बोलोनियां परिवारा ॥ हांकिलें अंबें ॥१७०॥
वीरवेताळ शंखिनी ॥ भूतभैरव चौसष्ट योगिनी ॥ छप्पन्न चामुंडा कात्यायनी ॥ आलिया तेथें ॥७१॥
घ्या घ्या ह्नणे आदिशक्ती ॥ तंव गर्जना केली शिवदूर्ती ॥ तेणें धाकें थरारिली कांती ॥ तये वेळीं ॥ ॥७२॥
कोप आला धर्मपाळा ॥ तेणें द्वारीची काढिली अर्गळा ॥ प्रथम मारिलेम महालां ॥ राजवर्गासी ॥७३॥
मग सुटलीं त्रिशूळचक्रें ॥ जाणों प्रळय आला वसुंधरे ॥ चतुरंगसैन्याची शिरें ॥ पाडिलीं भूमीं ॥७४॥
रणीं पाडिले अश्व कुंजर ॥ घाई चाचरती तरवार ॥ कित्येक धांवती वीर ॥ शिरें विणें ॥७५॥
तंव ते धांवती वेताळ ॥ एका कंठीं घालिती त्रिशूळ ॥ अशुद्धें भरोनि कमंडल ॥ लाविती मुखीं ॥७६॥
मग रायाचा मोडला भार ॥ तृणा केवीं आंवरे अंगार ॥ ऐसा चालिला कुमार ॥ धर्मपाळ तो ॥७७॥
लागला ह्नणोनि अडमोडी ॥ घायें पाडितसे मुरकुंडी ॥ ऐसें पाडिले अर्धघडी ॥ महावीर सर्व ॥७८॥
मोड जाहला चक्रवर्ती ॥ मशका केवीं आंवरे हस्ती ॥ येक तृणें धरुनि दांती ॥ भाकिती किवा ॥७९॥
एक उघडे शुद्ध नग्न ॥ लोळी घेवोनि येती शरण ॥ ह्नणती तुझे पुत्र गा प्राण ॥ राखीं आमुचे ॥१८०॥
ऐसें जाहलें महाक्षेत्र ॥ रक्तें दाटलें कांतिपुर ॥ जाणों कुंकुमलेपें डोंगर ॥ ओतिले जैसे ॥ ॥८१॥
मग ह्नणे शंकराचारी ॥ राया तूं गा दुराचारी ॥ अपकीर्ति घेऊनि पदरीं ॥ केला अनर्थ ॥८२॥
हा सोमवंशी महाबळी ॥ याचे पाठीसि महांकाळी ॥ राया दावाग्नीसि टोळीं ॥ पुरिजे काय ॥८३॥
आतां होई शरणागत ॥ तरीच वांचशी निभ्रांत ॥ नाही तरी पुरला अंत ॥ तव वंशाचा ॥८४॥
हे साक्षांत सर्पसुंत ॥ अश्वतेजाचे धगधगीत ॥ हे शिरीं लाविलिया लाथ ॥ विसरती केवीं ॥८५॥
मग तें मानवलें कांतिपती ॥ ह्नणे मी अन्यायी विश्वासघाती ॥ मग तो धरोनियां हातीं ॥ आणिला भटें ॥८६॥
कंठीं घालोनियां वस्त्र ॥ ह्नणे मज घडलें अक्षेत्र ॥ म्यां वधिले सहोदर ॥ धर्मपाळा तुझे ॥८७॥
आतां हाती घेवोनि शस्त्र ॥ माझें कापीं गा शिर ॥ नातरी मस्तकीं ठेवोनि कर ॥ देई नाभिकारु ॥८८॥
ह्नणवोनि चरणीं ठेविला माथा ॥ ह्नणे मी शरणागत सर्वथा ॥ मग अभयंकर जाहला ठेविता ॥ धर्मपाळ तो ॥८९॥
रायें कलत्र सहोदर ॥ चरणावरी घातले समग्र ॥ प्रधान करिती जोहार ॥ धर्मपाळासी ॥१९०॥
मग निवारी रणकाहळा ॥ जैत्य आलें धर्मपाळा ॥ तंव बोलिली शैलबाळा ॥ वचन कांही ॥९१॥
अरे धर्मपाळा पुण्यपुत्र ॥ या कां राखिलें बंधुसंहारा ॥ याच्या कापोनिया शिरा ॥ वोंवाळी तिघांतें ॥ ॥९२॥
तंव येरु ह्नणे अंबिके ॥ वधिल्या परीस राखिलें निकें ॥ शरणागता वो विशेषें ॥ वधूं नये ॥९३॥
संतोषें ह्नणे भद्रकाळी ॥ हे तिघे उठवूं अमृतजळीं ॥ तंव तो ह्नणे चरणाजवळी ॥ राखावे तुवां ॥९४॥
मग धर्मपाळ करी स्तुती ॥ नानावचनीं पुढतपुढ्ती ॥ ह्नणे जयजय हो आदिशक्ती ॥ अंबिके तूं ॥९५॥
जयजय माते कुळस्वामिणी ॥ जयजय माते वरदायिनी ॥ जयजय दुष्टविध्वंसिनी ॥ कालिके तूं ॥९६॥
जयजय हो महाबले ॥ काल कृतांत विक्राळे ॥ जय भक्तजनवत्सले ॥ त्रिपुरसुंदरी ॥९७॥
जयजय हो विश्वशक्ती ॥ आदिमाते वेदमूर्ती ॥ अजरामरे कालरात्री ॥ श्रीमते तूं ॥९८॥
अतुर्बळे जगपालिनी ॥ असुरभयविध्वंसिनी ॥ बुद्धिलक्ष्मी गुणवर्धिनी ॥ तूंचि देवी ॥९९॥
तूंचि क्रिया मेधा धृती ॥ दुष्टबुद्धीसि अत्रगती ॥ दुष्टांसि घालिसी नरकपातीं ॥ तुंचि अंबे ॥२००॥
सर्वदेवांची आदिपीठिका ॥ सर्वभूतीं गुणात्मिका ॥ तुझा पाड हरिहरादिकां ॥ नेणवे अंबे ॥१॥
तुं सर्वआधार अंशभुता ॥ तूं अपरांपर युक्ता ॥ तूंचि सकलव्यापकता ॥ योगमाये ॥२॥
तूं रणयागाचे पद्धतीं ॥ दैत्यांची घेसी आहुती ॥ स्वाहा स्वधाकारें तृप्ती ॥ पावसी देवी ॥३॥
योगियां अभ्यासितां तत्वज्ञानी ॥ ते तूं महामुक्तीकारिणी ॥ मोक्षपदाची निश्रेणी ॥ भक्तवंते तूं ॥४॥
गौर अथवा वर्ण श्याम ॥ अग्नि वेद पराक्रम ॥ हास्य क्रीडा आदिधर्म ॥ तूंचि देवी ॥५॥
वाचा मेधा तृष्णा भगवती ॥ ज्ञान ध्यान दर्शन कीर्ती ॥ सिंहासनीं ब्रह्मशक्ती ॥ तूंचि देवी ॥६॥
हास्यवदने चंद्रानने ॥ गौरी दुर्गे तूं अपर्णे ॥ कनककांती गजगमने ॥ सिंहासने तूं ॥७॥
जे नर तूतें आराधिती ॥ तयांसि धन राज्य संपत्ती ॥ ममभ्रात्यांसि देसी मुक्ती ॥ अंबे तूंच ॥८॥
तुझें जाहलिया स्मरण ॥ तेथें दुःखदरिद्रा नाहीं गमन ॥ आणि करिसी निवारण ॥ वैरियांचे ॥९॥
तूं सर्वदेवांचे तेज ॥ तूंचि त्रिभुवनाचें बीज ॥ तुं आनंदाचें भोज ॥ आदिअंबे ॥२१०॥
ऐसी करोनि स्तुति वचनें ॥ धर्मपाळ गेला लोटांगणे ॥ मग आलिंगिलिला सकरुणें ॥ भवानीयें ॥११॥
हास्य करोनियां श्रीमुखें ॥ ह्नणे शिणलासि रे बंधुदुःखे ॥ मग बैसविला पुत्रवेषें ॥ धर्मपाळ ॥१२॥
देवीनें त्या बंधूंची शिरें ॥ उष्टासहित महागुढारें ॥ तींच ठेविलीं असती त्रिपुरें ॥ स्वचरणाजवळीं ॥१३॥
तया उपदेशी शांभवी ॥ कीं घडोनी माझी मूर्ति नवी ॥ आणि दोनप्रहरीं पूजावी ॥ तुझिये कुळी ॥१४॥
आधी पूजोनि गणपती ॥ हंसवाहिनी माझी मूर्ती ॥ नित्य पूजावी प्रेंमप्रीतीं ॥ कालिका हे ॥१५॥
तुझिया वंशाची जी वल्ली ॥ तेथे मी आपुली करीन साउली ॥ इतुकें कथूनि शैलबाळी ॥ गेली कैलासा ॥१६॥
मग शंकराचार्याचे चरणी ॥ धर्मपाळ गेला लोटांगणीं ॥ ह्नणे मज जातां महारणीं ॥ राखिलें तुवां ॥१७॥
द्विजा तूं माझी कुळध्वजा ॥ तूं सत्य आमुचा आजा ॥ तुझी केलियाविणें पूजा ॥ न करीं कांहीं ॥१८॥
तुझे वंशीचे कुळजात ॥ ते हें चालवितील व्रत ॥ तुझेनि नामें संकल्पित ॥ देती ब्राह्मणा ॥१९॥
मग तीं तिन्हीं कलेवरें ॥ अग्नींत घातली सहोदरें ॥ ऊर्ध्वदेहिकें वेदमंत्रें ॥ करी भटू ॥२२०॥
तंव इतुकिया अवसरीं ॥ रायें श्रॄंगारुनि नगरी ॥ धर्मपाळा अर्पिली कुमरी ॥ चंद्रगुप्ता ते ॥२१॥
इतर शत कुमारिका ॥ त्याही दीधल्या परिचारिका ॥ आणि अर्ध राज्याची पत्रिका ॥ दीधली रायें ॥२२॥
च्यारी दिवस सोहळे ॥ वाजती मृदंग काहाळें ॥ बहुलें बाशिगें धर्मपाळें ॥ जाहली अष्ट न्हाणीं ॥ ॥२३॥
रायें दीधलें आंदण ॥ अनर्घ्य रत्नें आणि कांचनं ॥ नगरीं जाहलें वाधावण ॥ आनंदाचें ॥२४॥
मग पात्रें भरोनि उष्टरा ॥ तयांसि घेऊनि समग्रां ॥ धर्मपाळ आला नगरा ॥ बद्रिकाश्रमीं ॥२५॥
तया बंधूंची ते वार्ता ॥ धर्मपाळ सांगे मातां ॥ मग शोक करोनि समस्तां ॥ दीधलीं वस्त्रें ॥२६॥
तंव ते राणी चंद्रगुप्ता ॥ चरणीं लागली समस्तां ॥ शोक सांडोनियां माता ॥ आलिंगिती प्रेंए ॥२७॥
मग ते ह्नणे चंद्रपुप्ता ॥ कांती जावों जी प्राणनाथा ॥ सकळीं भेटनियां ताता ॥ भोगूं अर्धराज्य ॥२८॥
येरु ह्नणे हे महालाज ॥ कीं सासुर्याचें भोगितां राज्य ॥ तरी पूर्वज हांसतील मज ॥ लघुत्वपणें ॥२९॥
पुढें धर्मपाळा जाहले शतपुत्र ॥ त्याहीं गुरु केले नानाॠषेश्वर ॥ त्यांसी दत्तात्री ऐसें गोत्र ॥ बोलिलेंसे ॥२३०॥
मग त्या धर्मपाळाचे सुत ॥ कांसेकार ॥ जाहले समस्त ॥ त्यांही शिष्य केले बहुत ॥ देशोदेशीं ॥३१॥
रायासि ह्नणे ॠषेश्वर ॥ तुवां पुसिला एकवीर ॥ तरी तयापासाव हा विस्तार ॥ सोमवंशी ॥३२॥
लक्ष्मी अश्विनी विष्णु सर्प ॥ दोघां परस्परें जाहला शाप ॥ हें श्रवणीं ऐकतां कोप ॥ निवारे झणीं ॥३३॥
हे पुराणपुरुषाची कथा ॥ येणें उद्धरे गाता ऐकता ॥ कीं गोदातटीं सहस्त्रशतां ॥ दीधलीं भोजनें ॥ ॥३४॥
जरी वक्र खुजा ऊंस ॥ परि भीतरीं असे रस ॥ तैसा विष्णुश्रियेचा वंश ॥ पवित्र हा गा ॥३५॥
आतां असो हे योग्यता ॥ कालिका माहात्म्य गा भारता ॥ हे पद्मपुराणींची कथा ॥ जाहली पूर्ण ॥३६॥
तंव राव ह्नणे वैशंपायना ॥ हें श्रीकमळ वाहिलें तुझिये चरणा ॥ परि पूर्ती नव्हे जी आपणां ॥ कथाश्रवणें ॥३७॥
तूं चंद्रमंडळींचा कुरंग ॥ किरणां माजी दिव्यविहंग ॥ तुवां काढिला मूळमार्ग ॥ व्योमपंथींचा ॥३८॥
मग पुत्रकलत्रेंसी भारत ॥ मुनीसि जाहला शरणागत ॥ ह्नणे आणिला अकल्पित ॥ कल्पतरु हा ॥३९॥
कमळकळिकेचा तंतु ॥ ऐखादा आकळी बुद्धिमंतु ॥ परि तुझे बुद्धीचा अंतु ॥ नेणवे कवणा ॥२४०॥
मग मुनि ह्नणे गा भूपती ॥ आतां ऐकें फलश्रुती ॥ या श्रवणमात्रें नासती ॥ पातकें महा ॥४१॥
हें समूळ जाहलिया श्रवण ॥ जन्ममरणाचें नपवे लक्षण ॥ वैकुंठीं कीजे भोजन ॥ अमृताचें ॥४२॥
कीं रेतुकुंडीचें जीवन ॥ मानविया प्राप्त होय आपण ॥ तैसें अपार जोडे पुण्य ॥ श्रवणें येणें ॥४३॥
तीर्थी घेई गोरांजन ॥ महाव्रत वसा तप दान ॥ त्याहीपरिस पुण्यपावन ॥ कल्पतरु हा ॥४४॥
जैसी भूमंडळीं द्वारावती ॥ वैकुंठा उपमिजे त्रिजगतीं ॥ तयेसि सुरवर वंदिती ॥ गोविंदवासें ॥४५॥
तैसा हा कथाकल्पतरु ॥ येथें पदप्रसंगी हरिहरु ॥ ग्रहणकाळीं कनकमेरु ॥ न पुरे दाना ॥४६॥
आतां असो हा वाग्विलास ॥ तृतीयस्तबका जाहला कळस ॥ कथाफळांचा अमृतरस ॥ पुरला येथें ॥४७॥
मुनि ह्नणे गा भारता ॥ मज तृप्ती जाहली बोलतां ॥ आतां विनवीतसें कविनाथां ॥ श्रोतयांसी ॥४८॥
हें सर्वपुराणांचें सार ॥ जैसी गूळगर्भींची पंचधार ॥ कीं दधि मंथूनि पवित्र ॥ घृत जैसें ॥४९॥
नातरी नानापुष्पांचा आमोदू ॥ मधुमक्षिका रची मधू ॥ कीं पृथ्वी दमूनियां खेदू ॥ कनक जैसें ॥२५०॥
ऋषिवाक्य मूळपीठिका ॥ तेचि म्यां केली असे टीका ॥ जेवीं अर्ध्य दीजे गंगोदका ॥ गंगोदकांचें ॥५१॥
कीं भूमिगर्भींचें जीवन ॥ अनादिसिंधु पुरातन ॥ परि वापीनिमित्त अभिधान ॥ कर्तयाचें ॥५२॥
कीं विझुणा वारिजे समर्था ॥ तो काय दासें केला स्वतां ॥ परि व्योमपंथीच्या मारुता ॥ उपसिलें तेणें ॥५३॥
कीं काष्ठगर्भींच्या पावका ॥ मंथूनि काढिजे स्वयंपाका ॥ तैसी कथा असे वाक्या ॥ ते बोलवे केवीं ॥५४॥
जेवीं सोजी आणि शर्करा ॥ सुगरिणी पचवी घृतपारा ॥ तो मोदक होय नरेंद्रा ॥ योग्य जैसा ॥५५॥
जरी वर्णिलें व्यासवाल्मिकीं ॥ ते महा कवी त्रैलोक्यीं ॥ परी बीज कथिलें शतश्लोकीं ॥ ब्रहयानें दोघां ॥५६॥
ॠषिवाक्या वेगळें वचन ॥ तें अजाकंठगत जैसे स्तन ॥ कां स्मशानीं सांडिले वसन ॥ अमंगळ जैसें ॥५७॥
ॠषिवाक्याबीज अनुवटीं ॥ उदकीं वृक्ष विस्तारे पोटीं ॥ तैसी केली म्यां चावटी ॥ अनंतप्रसादे ॥ ॥५८॥
तरी हें पूर्वभक्तीचें बळ ॥ कीं निर्धना लक्ष्मी पावे क्वचित्काळ ॥ परी कनक तें केवळ ॥ अनादिसिद्ध ॥ ॥५९॥
कीं दृष्टीं तंव नाहीं प्रमाणीं ॥ परि आथीपणेम भासे कर्णी ॥ अप्रमेय बोलतां वाणी ॥ कवीश्वराची ॥२६०॥
येरव्हीं डाखे सोनया मिळणें ॥ हें कीजे जैसें टंकणें ॥ परि तें सोनें अग्निविणें ॥ केंवि होय ॥६१॥
जरी जाहला विंदाणी ॥ तरी वाळूचीं कीं करी लेणीं ॥ तैसी वस्तुविणें बोहणी ॥ केविं होय ॥६२॥
कीं साखरेचिया प्रतिपाका ॥ भेषज दीजे बाळका ॥ स्वादिष्ट ह्नणूनि कौतुका ॥ ज्ञान नुपजे ॥६३॥
तैसा हा कथाकल्पतरु ॥ नानारसें रुचिकारु ॥ तापत्रयां उद्धरी भास्करु ॥ तमा जेवीं ॥६४॥
हा ग्रंथ कथाकल्पतरु ॥ पुण्यराशी महामेरु ॥ पत्रपल्लवीं हरिहरु ॥ आरुढले पैं ॥६५॥
जेथें ब्रह्मादिक द्विजवर ॥ तेतीसकोटी सुरवर ॥ मूल मध्य आणि शिर ॥ व्यापिलें जिहीं ॥६६॥
हनुमंतादि तेथेम डाहाळिया ॥ शेष वासुकी पाताळीं या ॥ कथाकल्पतरु वेढूनि मुळियां ॥ असती ते ॥६७॥
येथें भक्तिपुष्पांचे परिमळ ॥ प्रल्हाद ध्रुवादि अलिकुळ ॥ आमोदरसाचे कमंडल ॥ भरिती अठ्यायशी ॥६८॥
येथें मुक्तिफळांचे घोंस ॥ शुकसनकादिक सेविती रस ॥ तयां मुक्तिपंथाची आस ॥ दर्शनें पैं ॥६९॥
गणगंधर्वींच्या कोटी ॥ निवती छायेच्या तळवटीं ॥ हा वैकुंठवृक्ष धाडिला सृष्टीं ॥ श्रीनारायणें ॥२७०॥
येर्हवीम मज अविवेका ॥ पर्वत केवीं उचले मशका ॥ कीं सिंधु लंघावया पिपीलिका ॥ कैंची शक्त ॥७१॥
परी हरी जैं प्रेरी तारुं ॥ तैं पिपीलिका लंधी सागरु ॥ मशकें उचलिजे मेरु ॥ कपिशिळीं सेतु जैसा ॥७२॥
हा म्यां रचिला परोपकारा ॥ जैसा चातक इच्छी जलधरा ॥ येरव्हीं त्याच्या दुर्भरा ॥ दुर्भिय काय ॥७३॥
आणि त्या चातकाचे उदरीं ॥ उदक न माय शिंपीभरी ॥ परी परोपकारार्थ निरंतरीं ॥ इच्छी घन ॥७४॥
कीं तुंबीचें वक्र फळ ॥ आपण तरे हें काय नवल ॥ परी बुडतिया तारी कल्होळ ॥ महापूराचे ॥७५॥
या कल्पतरुचें मूळशिर ॥ जे ऐकती नारी नर ॥ त्यांही दीधल्या गौसहस्त्र ॥ ग्रहणकाळीं ॥७६॥
श्रवणें पाविजे इच्छासमृत्धी ॥ गजायुतें लंधिजे उदधी ॥ अनंत सिंहांचिये युद्धीं ॥ पाविजे जय ॥७७॥
ऐसा हा कथाकल्पतरु ॥ पदप्रसंगीं हरिहरु ॥ ह्नणोनि महापुण्याचा आगरु ॥ उपमिजे हा ॥७८॥
जया कृष्णाचेनि स्मरणें ॥ महापुण्य उपमे ठेंगणे ॥ हा कल्पतरु कोंदला कोंदणें ॥ हरिकथेचिया ॥७९॥
जैसी महिमंडळीम द्वारका ॥ ते वैकुंठ उपमे तैकोल्या ॥ तैसा पुण्यतरु पुण्यटीका ॥ गोविंदनामें ॥२८०॥
या कल्पतरुचीं आख्यानें ॥ कल्पूनि ऐकिजे श्रवणें ॥ तरी इच्छा धरितां खेळणें ॥ होय कन्यापुत्र ॥८१॥
नानाद्वीपींच्या अमोलिकां ॥ रत्नां मेळवूनि जडिलें पदका ॥ तैसी कल्पतरुवरी टीका ॥ केली श्रोतयां लागीं ॥८२॥
मार्गीं पेरिजे बीजद्रुम ॥ तो उपकारें होय धर्म ॥ समयीं आपुलाही क्षुधाश्रम ॥ निवारी कीं ॥८३॥
बिंझुणा वारिजे नरेंद्रा ॥ परि आपुलाही निवे उबारा ॥ तैसें तुह्मां सांगतां हरिचरित्रा ॥ निवालों मी ॥८४॥
मज उपसितां शब्दसिंधू ॥ एखादा चुकला असेल बिंदू ॥ तो क्षमा करावा अपराधू ॥ श्रोतीं माझा ॥८५॥
॥ श्लोकः ॥ एकोपिकृष्णस्यकृतप्रणामो दशाश्वमेधावभृथेनतुल्यः ॥ दशाश्वमेधीपुनरेतिजन्म कृष्णप्रणामीनपुनर्भवाय
॥ गोकोटिदानंग्रहणेषुकाश्यां प्रयागगंगायुतकल्पवासः ॥ यज्ञायुतंमेरुसुरर्णदानं गोविंदनामस्मरणेनतुल्यं ॥१॥२॥
आतां असो हा वाग्विलासु ॥ तृतीयस्तबका जाहला कळसु ॥ पुढें चतुर्थस्तबकाचा उद्देशु ॥ ऐका तुह्मी ॥८६॥
कौंडिण्य वसिष्ठ मित्रावरुण ॥ तिन्हीप्रवरें गोत्र कौंडिण्य ॥ प्रथम सांख्य जन्मधारण ॥ अंबॠषीचें ॥८७॥
त्या अंबॠषिषी कांता ॥ कमळजा नामें पतिव्रता ॥ ते प्रसवली विष्णुभक्ता ॥ कृष्णकवीसी ॥८८॥
अरुणा वरुणा गोदावरी ॥ सरस्वती साक्ष सुंदरी ॥ ग्रंथ वाहिला पुष्पपतीं ॥ गोविंदचरणीं ॥८९॥
या कथाकल्पतरुची कथा ॥ आर्तिंक मागे लिखितार्था ॥ तया नेदी तो नरकपाता ॥ पडेल प्राणी ॥२९०॥
कल्पतरुची शब्दरत्नें ॥ चोरुन विघडील कथापानें ॥ तरी काशीविश्वनाथासि तेणें ॥ लाविला चरण ॥९१॥
या कल्पतरुची कथा ॥ हा संपूर्ण ग्रंथ वाचितां ॥ इच्छिली इच्छा पूर्णता ॥ होईल जाणा ॥९२॥
अपुत्रिकांसी होय पुत्रवृद्धी ॥ निर्धनासी धनसमृद्धी ॥ जन्ममरणाची व्याधी ॥ बाधूं न शके ॥९३॥
हा पुण्यपावन कल्पतरु ॥ परप्रसंगी असे हरिहरु ॥ त्यांचिये नामें गुंफिला हारु ॥ श्रोतयांलागीं ॥९४॥
हा कल्पतरु तृतीयस्तबक ॥ पुण्यराशी पुण्यश्लोक ॥ येथें असे वैकुंठनायक ॥ आरुढ सदा ॥९५॥
आतां असो हा वाग्विलास ॥ पुढें बोलणें असे नवरस ॥ तो कल्पतरुचा सौरस ॥ ऐकिजे श्रोतीं ॥९६॥
मुनि ह्नणे गा भारता ॥ मज तृप्ती जाहली बोलतां ॥ कल्पतरुची कथा वर्णिताम ॥ पावलों सुख ॥९७॥
हा ग्रंथ कथाकल्पतरु ॥ पुण्यराशी महामेरु ॥ श्रवणकरितां शांरगधरु ॥ प्रसन्न होय ॥९८॥
हे कल्पतरुची कथा ॥ प्रीति पावो श्रीअनंता ॥ समस्तां जाहला विनविता ॥ कृष्णयाज्ञवल्की ॥९९॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ एकवीरचरित्रप्रकारु ॥ सप्तदशोऽध्यायीं कथियेला ॥३००॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ स्तबकओव्यासंख्या ॥३१९१॥