श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ तुमचेनि जाहला पापक्षयो ॥ तरी करोनि कृपालाहो ॥ सांगा पुढील चरित्र ॥१॥
मांगा आदिपर्व संपूर्ण ॥ ऐकिलें तुमचे कृपेंकरुन ॥ आतां ब्रह्महत्यापापक्षालन ॥ सांगा सभापर्व ॥२॥
यावरी सभापर्वमुख्यता ॥ वैशंपायन जाहला सांगता ॥ जें जन्मेजयो परिसतां ॥ जाहला दोषमुक्त ॥३॥
तेंचि महाराष्ट्रभाषोक्त ॥ सांगिजेल संकलित ॥ स्वर्गारोहणपरियंत ॥ अनुक्रमेंसीं ॥४॥
चित्त द्यावें श्रोताजनीं ॥ कथा भवतापनिवारिणी ॥ पदप्रसंगीं चक्रपाणी ॥ साह्यकर्ता ॥५॥
भा ह्नणिजे भगवत्कांती ॥ तेथ रत ह्नणिजे जया प्रीती ॥ तो पावे परमगती ॥ कथा भारती परिसतां ॥६॥
ऐका पांडव इंद्रप्रस्थीं ॥ सपरिवारें राज्य करिती ॥ प्रजा नीतिमार्गे पाळिती ॥ सदा भोगिती अष्टभोग ॥७॥
नगरीं अपार नांदणुक ॥ सुखोल्हासें वर्तती लोक ॥ धर्मा राज्य होतांचि सकळिक ॥ अलंकारिलें सुदैवें ॥८॥
पुत्रकलत्र सपरिवारें ॥ राज्य कीजे युधिष्ठिरें ॥ तंव बिजें केलें सर्वेश्वरें ॥ द्वारकेहूनियां ॥९॥
तया पांडव साउमे गेले ॥ प्रेमें श्रीकृष्णें आलिंगिले ॥ मग नगरामाजी आले ॥ भेटले समस्तांसी ॥१०॥
अनुच्छिष्ट षोडशोपचारीं ॥ पांडवीं पूजिला श्रीहरी ॥ मखरें तोरणें उभविलीं नगरीं ॥ वाद्यगजरें ॥११॥
सकळ सभेमाजी बैसले ॥ तंव श्रीकृष्ण काय बोले ॥ कीं धर्मा अवधारीं वहिलें ॥ वचन माझें ॥१२॥
तुह्मीं राजसूययज्ञ करावा ॥ जिंकोनियां भूपाळां सर्वा ॥ पंडु पायरीहूनि काढावा ॥ बैसवावा इंद्रपदी ॥१३॥
पंडूनें नव्याण्णव यज्ञ केले ॥ ह्नणोनि पायरीसि घातलें ॥ आतां तुह्मांसि राज्य आलें ॥ तरी काढावा तेथुनी ॥१४॥
तुह्मी राजसूय करितां यज्ञ ॥ तेणें शतयाग होतील पूर्ण ॥ मग पंडूसि इंद्रपद गहन ॥ होईल प्राप्त ॥ ॥१५॥
पुत्र उपजोनि संसारीं ॥ जो पूर्वजांसी न उद्धरी ॥ तो पचिजेल अंधोरी ॥ अनंतकाळ ॥१६॥
ह्नणोनि हें अगत्य करणीय ॥ ऐसें ह्नणे यादवराय ॥ ऐकोनि चिंतातुर होय ॥ मन धर्माचें ॥१७॥
मग देवो गेलिया द्वारकेसी ॥ त्यावरी कितीयेकं दिवशीं ॥ धर्म विचारी बंधुवर्गासीं ॥ कीं करुं निश्वयें राजसूय ॥१८॥
तेणें उद्धरेल पंडुपिता ॥ ऐसेंचि कृष्ण जाहला सांगता ॥ तरी मूळ पाठवा अनंता ॥ करुं तयाचें भाषित ॥१९॥
मग सहदेवो धाडिला ॥ तो जावोनि कृष्णा भेटला ॥ जीजी नमस्कार सांगीतला ॥ धर्मादिकांहीं ॥२०॥
राजसूययज्ञ करावा ॥ ऐसा हेतु जाहला पांडवां ॥ तरी तुह्मी चालिजे देवा ॥ सकुटुंब यादवेंसी ॥२१॥
मग छप्पन्नकोटी यादवकुळ ॥ पुत्रपौत्र दारादि सकळ ॥ सकुटुंबेंसीं उतावीळ ॥ निघाला गोपाळ जावया ॥२२॥
तंव तेतुलेचि अवसरीं ॥ येक ब्राह्मण आला झडकरी ॥ तो भेटला श्रीहरी ॥ दूतपणेंसी ॥२३॥
जीजी भूपाळ लक्षकोडी ॥ जरासंधें घातले बांदवडी ॥ त्यांहीं विनंती केली अवघडीं ॥ आह्मां सोडवीं गोविंदा ॥२४॥
तंव उद्धवासि ह्नणे कृष्ण ॥ सहजेंचि धर्मे मांडिला यज्ञ ॥ तरी मनोरथ होईल पूर्ण ॥ राजेयांचा ॥२५॥
मग आज्ञा दीधली दूतासी ॥ कीं अल्पकाळें सोडवूं तुह्मासी ॥ चिंता न करावी मानसीं ॥ भूपाळ हो समस्त ॥२६॥
तें दूतें कथिलें रायासी ॥ इकडे कृष्ण निघाला इंद्रप्रस्थासी ॥ जावोनि भेटला समस्तांसी ॥ सहकुटुंब ॥२७॥
नगराबाहेर दुंसे देवोन ॥ उतरले यादव पाळेगण ॥ नगरीं सकुटुंब आपण ॥ श्रीकृष्णनाथ ॥२८॥
असो सभेमाजी बैसोनी ॥ धर्मासी ह्नणे चक्रपाणी ॥ द्रव्य आणावें राजे जिंकोनी ॥ करुनि दिग्विजय ॥२९॥
दक्षिणे धाडिला भीमसेन ॥ पूर्वे नकुळ उत्तरे अर्जुन ॥ सहदेवो ज्योतिषी पूर्ण ॥ पाठविला पश्विमे ॥३०॥
चौघीं चारी दिशा जिंकोनी ॥ संपत्ती आणिली लुटोनी ॥ द्रव्य धन कण चिंतामणी ॥ अश्व रथ गज पदार्थ ॥३१॥
येका जरासंधावांचोनी ॥ राजे आणिले जिंकोनी ॥ मग भीमार्जुन चक्रपाणी ॥ चालिले जरासंघाकडे ॥३२॥
भीमें तयाचा केला वध ॥ हा चतुर्थस्तबकीं अनुवाद ॥ असो सकलसंपत्तीसह गोविंद ॥ आला इंद्रप्रस्थीं ॥३३॥
धर्मादिकां जाहली भेटी ॥ आनंदें दाटली अवघी सृष्टी ॥ राजे मीनले कोट्यानकोटी ॥ ऋषी याचकें नानापात्रें ॥३४॥
परि ते द्रव्यगणती पाहतां ॥ धर्मे देखिली अपूर्णता ॥ ह्नणे हे पिशुनाहीं देखतां ॥ झणी होय अपकीर्ती ॥३५॥
कृष्णासि ह्नणे युधिष्ठिरु ॥ जीजी राजसूय कैसा करुं ॥ लोकापवाद जाहला थोरु ॥ न पुरती द्रव्यपदार्थ ॥३६॥
तंव श्रीकृष्ण जाहला बोलता ॥ कीं तुह्मां मज ऐसा सारथी असतां ॥ वृथा कायसी धरितां चिंता ॥ जें सांगेन तें करावें ॥३७॥
मग धर्मे केलें दंडवत ॥ ह्नणे तं आमुचें परम दैवत ॥ साक्षांत अनाथाचा नाथ ॥ भक्तजनां सारथी ॥३८॥
यावरी सांगे सर्वेश्वर ॥ धर्मा ऐकें येक विचार ॥ मरुवंत राजा धनुर्धर ॥ होता त्रेतायुगीं ॥३९॥
तेणें शंभर यज्ञ केले ॥ अपरिमित द्रव्य वेंचिलें ॥ ब्राह्मण वाहतां भागले ॥ तैसीच याचकें ॥४०॥
शेवटी वाहतां कष्टी जाहले ॥ मग भूमिये निक्षेपिलें ॥ येक सांडोनियां गेले ॥ द्रव्यराशी ॥४१॥
त्यांहीं सांडिलें वासनेपासोनी ॥ त्यावरी युग गेलें पालटोनी ॥ तें यज्ञावशेष धरणी ॥ माजी असे ॥४२॥
हें मज ज्ञानदृष्टी भासलें ॥ ह्नणोनि युधिष्ठिरा तुज दाविलें ॥ मग तें खाणोनियां काढिलें ॥ पांडववीरीं ॥४३॥
जाहल्या द्रव्याचिया राशी ॥ गणित नाहीं तयांसी ॥ यावरी ह्नणे हषीकेशी ॥ आतां यज्ञ मांडिजे ॥४४॥
मग दुर्योधनादि कौरव ॥ सखे सोयरे जे सर्व ॥ आणिले करोनि आदरभाव ॥ इंद्रप्रस्थीं ॥४५॥
धर्मरायासि ह्नणे कृष्ण ॥ आपणा येकचि असे पिशुन ॥ कौरवराजा दुर्योधन ॥ सहसा करील अपकीर्ती ॥४६॥
तरी हाचि करुं द्रव्याधिकारी ॥ येणेंचि वांटावें स्वकरीं ॥ बरवें वोखटें दिसेल तरी ॥ याच्याचि माथां ॥४७॥
तें मानवलें धर्मासी ॥ मग बोलावोनि दुर्योधनासी ॥ द्रव्याधिकार दीधला त्यासी ॥ खर्चावया मानेल तैसें ॥४८॥
येथ कारण असे ऐका ॥ तें कृष्णें कथिलें पांडवनायका ॥ केला द्रव्याधिकारी देखा ॥ दुर्योधन ॥४९॥
याचिये हातीं मत्स्यलांछित ॥ द्रव्यनिधी असे नांदत ॥ तेणें द्रव्य विस्तारोनि बहुत ॥ पुरोंचि लागे ॥५०॥
ह्नणोनि तोचि द्रव्याधिकारी ॥ वेंचक केला सर्वोपरी ॥ सहदेव टिळेविडे करी ॥ भीम परिमळ चर्चित ॥५१॥
अर्जुनें हातधुणें घालावें ॥ ऐसे व्यापार कथिले देवें ॥ मग आरंभिला सद्भावें ॥ यज्ञ देखा ॥५२॥
व्यासादिकीं मुनीश्वरीं ॥ द्रव्यें होमिलीं स्वाहाकारीं ॥ पंडूसि व्हावया सुरनगरी ॥ भावो अंतरीं धरोनियां ॥५३॥
होमद्रव्यें नानापदार्थ ॥ मुसळधारीं पूर्णाहुती घृत ॥ यज्ञ केला समाप्त ॥ मग मांडिलें विधान ॥५४॥
घनदाट दाटली सभा अती ॥ ऋषि आणि रायपंक्ती ॥ अनुक्रमें यथास्थिती ॥ पात्रें असती नानाविध ॥५५॥
युधिष्ठिर कर जोडोनि ह्नणे ॥ अग्रपूजा कवणासि देणें ॥ तें सांगावें सद्वचनें ॥ सेवकासी ॥५६॥
अवघे ह्नणती धर्मराजा ॥ व्यासासि देणें अग्रपूजा ॥ यावरी सत्यवतीआत्मजा ॥ युधिष्ठिर विनवीतसे ॥५७॥
व्यास ह्नणती धर्मासी ॥ त्वां पूजावें शुकदेवासी ॥ तो ब्रह्मचारी तापसी ॥ मान्य आह्मां सकळिकां ॥५८॥
ऐसें ऐकोनि शुकाप्रती ॥ धर्म करीतसे विनंती ॥ तंव ते ह्नणती कांरे भ्रांती ॥ पडली तुह्मां ॥५९॥
देवांधिदेवो महाराजा ॥ तया वांचोनि गरुडध्वजा ॥ देवों पाहतां अग्रपूजा ॥ भलत्यासीच ॥६०॥
ऐसें शुकयोगी बोलिला ॥ तो बोल सकळां मानवला ॥ मग धर्मे बसविला ॥ पूजेलागीं श्रीकृष्ण ॥६१॥
हें शुकदेवाचें उक्त ॥ पद्मपुराणीचें संमत ॥ परि सहदेवो बोलिला प्रस्तुत ॥ हें असे भारतीं ॥६२॥
असो रत्नखचित सिंहासनीं ॥ पूजे बैसविला चक्रपाणी ॥ तंव सक्रोध जाहला देखोनी ॥ शिशुपाळ तेथ ॥६३॥
ह्नणे वांचोनि ऋषिकुळा ॥ सांडोनि समस्त भूपाळां ॥ पूजों आदरिला गोवळा ॥ ऐसे मूर्ख हे पांडव ॥६४॥
असो धर्मे उजळोनि आरती ॥ ताट वोंवाळिलें रत्नज्योतीं ॥ तंव बोलिला श्रीपती ॥ घेघे पूजा शिशुपाळा ॥६५॥
यावरी ताटाखालोनि चक्र ॥ देवें सोडिलें वेगवक्र ॥ तेणें छेदोनि शिशुपाळशिर ॥ पाडिलें धरणीये ॥६६॥
त्याची आत्मज्योती निघाली ॥ ते कृष्णमुखीं प्रवेशली ॥ सायुज्यता मुक्ती जाहली ॥ सकळांदेखतां ॥६७॥
सुरवरीं पुष्पवृष्टी केली ॥ आनंदें वाद्यें लागलीं ॥ मग अनुक्रमें पूजा जाहली ॥ ऋषीश्वरांची ॥६८॥
तैसेचि पृथ्वीचे भूपाळ ॥ सानथोरादि सकळ ॥ आणि पूजिलें यादवकुळ ॥ षोडशोपचारीं ॥६९॥
सुवर्ण रत्नें अलंकार ॥ धान्य पदार्थ अपरंपार ॥ देवोनि सकळ केले अभर ॥ दुर्योधनें ॥७०॥
द्रव्य नेतां विप्र शीणले ॥ येक सांडोनियां गेले ॥ येक भारें कुंथत चालिले ॥ ऋषिब्राह्मण ॥७१॥
नानाविध याचक्रें ॥ भाट कळापात्रें अनेकें ॥ अभर केलीं द्रव्यकनकें ॥ दुर्योधनानें ॥७२॥
बापबापरे उदारींव ॥ धन्य असती पांडव ॥ अपरिमित वांटिलें द्रव्य ॥ सफळ संसार ययांचा ॥७३॥
ऐसी अग्रपूजा जाहली ॥ दानमानें संभाविली ॥ सभा आनंदें दाटली ॥ सहस्त्रमुख न वर्णवे ॥७४॥
मग षडरसान्नें सिद्ध केलीं ॥ समस्तां भोजनें दीधलीं ॥ वस्त्रें आभरणें वाहिलीं ॥ अनुक्रमें सकळांसी ॥७५॥
ऋषि ब्राह्मण राय राणे ॥ अवघे पामकिले सन्मानें ॥ दुर्योधन राखिला पंडुनंदनें ॥ कौरवांसहित ॥७६॥
पुढें कितियेकां दिवशीं ॥ पामकणी केली दुर्योधनासी ॥ तेथ कथा वर्तली कैसी ॥ तें अवधारिजो ॥७७॥
खांडववन जाळिलें पार्थे ॥ तैं मयसभा दीधली दैत्यें ॥ चतुर्थस्तबकीं तिये कथेतें ॥ सांगीतलें असे ॥७८॥
अठरासहस्त्र राक्षस ॥ मयासुराचे होते दास ॥ ते उचलिती बहुवस ॥ तिये सभेतें ॥७९॥
अदृश्यरुपें निरंतरीं ॥ सभा राखिती गगनांतरीं ॥ विमानवत सविस्तारीं ॥ नगरप्राय ॥८०॥
ते अर्जुनासि समर्पिली ॥ तंव राक्षसी दृष्ट केली ॥ क्षणामाजी उभविली ॥ नगरामध्यें ॥८१॥
जळीं स्थळ स्थळीं जळ ॥ कळाकुसरी अति बहुळ ॥ ते मावसभा केवळ ॥ नकळे ब्रह्मादिकां ॥८२॥
बैसका केल्यातये माझारी ॥ तेथें कौरवांच्या नारी ॥ आणिल्या मुख्य गांधारी ॥ भानुमती आदिकरोनी ॥८३॥
अदृष्ट पट आड बांधोनी ॥ तेथें बैसविल्या नितबिनी ॥ कुंती द्रौपदी मुख्य करोनी ॥ बैसलिया आल्हादें ॥८४॥
परिमळविडे वोळंगविती ॥ हास्यविनोद दाविती ॥ परस्परें वानिताती ॥ सुखोल्हासें ॥८५॥
असो बाह्यपटशाळेवरी ॥ बैसका केल्या नानाकुसरी ॥ तेथ उपविष्ट हारोहारीं ॥ धर्मादि पांडव ॥८६॥
भीष्मद्रोणकर्णादिक ॥ कौरवदुर्योधन मुख्य ॥ बोलाविले सकळिक ॥ वस्त्रालंकार द्यावया ॥८७॥
गांधार सभेमाजी आला ॥ रचना देखोनि चाकाटला ॥ मग थोर असे भ्रमला ॥ मनामाजी ॥८८॥
तंव पुढें स्थळीं जळ ॥ हें देखिलें अक्षोभ्य निर्मळ ॥ मनीं ह्नणे वस्त्रें सकळ ॥ झणीं भिजतील येथें ॥८९॥
ह्नणोनि धोत्र वरती करोनी ॥ वस्त्रें धरिलीं आवरोनी ॥ पावो घाली जेवीं जीवनीं ॥ तंव धरणी समस्तळ ॥९०॥
तें द्रौपदीयें देखिलें ॥ गदगदा विनोदें हास्य केलें ॥ ह्नणे भावोजी भले वांचले ॥ पाहें भानुमतीये ॥९१॥
तें दुर्योधनें आइकोनी ॥ खेद धरिला अंतःकरणीं ॥ ह्नणे हांसली मजलागोनी ॥ पंचभ्रतारी हे ॥९२॥
मग पुढारें गमन केलें ॥ तंव जळीं स्थळ देखिलें ॥ तेथें पाऊल जंव ठेविलें ॥ तंव निसरोनि पडियेला ॥९३॥
कंठावेरीं बुडिन्नला ॥ अवघा उदकें आप्लवला ॥ तंव भीमसेन हांसला ॥ ह्नणे सांभाळीं दुर्योधना ॥९४॥
मग वृकोदरें धांवोनी ॥ बाहेर काढिला ओढोनी ॥ तोंही खेद धरिला मनीं ॥ दुर्योधनें ॥ ॥९५॥
ह्नणे कैसा अपमान जाहला ॥ हा भीम माझा अमुला ॥ सभेमाजी हासिन्नला ॥ केव्हां होईन उत्तीर्ण याचें ॥९६॥
मग तयासी आणोनी ॥ वस्त्रें सोडविली फेडोनी ॥ धर्म दिव्यांबरें देवोनी ॥ करविलीं परिधान ॥९७॥
सकळही आसनीं बैसले ॥ दिव्यउपचार वाहिले ॥ टिळेविडे सन्मानें जाहले ॥ पूजिले भीष्मादिक ॥९८॥
मग जाहली पाठवणी ॥ कौरव निघाले तेथोनी ॥ सहकुटुंबें तत्क्षणीं ॥ गेले हस्तनापुरा ॥९९॥
ऐसा राजसूययज्ञ जाहला ॥ तेणें त्रिलोक आनंदला ॥ श्रीकृष्ण सकुटुंबें गेला ॥ द्वारकाभुवनीं ॥१००॥
हे राजसूययज्ञकथा ॥ चतुर्थस्तबकीं असे तत्वता ॥ परि काहीं अपूर्वता ॥ ह्नणोनि कथिली पुनरपी ॥१॥
शिशुपाळजरासंधोत्पत्ती ॥ तेही कथिली असे भारतीं ॥ ते अभेदपणें पुनरावृत्तीं ॥ सांडिली येथें ॥२॥
असो मावसभा विसर्जोनी ॥ पांडव आनंदले मनीं ॥ परि द्वेष धरिला अंतःकरणीं ॥ दुर्योधनें ॥३॥
यानंतरें अपूर्वकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ राजसूययज्ञप्रकारु ॥ द्वितीयाऽध्यायीं कथियेला ॥५॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥