कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

पार्थासि घेवोनि सुरवर ॥ धर्माजवळी आले शीघ्र ॥ भेटी जाहलीं महोत्साह ॥ समारंभ केला थोर ॥१॥

आगतस्वागत जाहलें ॥ देव आश्वासोनि स्वर्गी गेले ॥ हें ऐकोनि काम्यकवनीं ॥ श्रीकृष्णें बिजें केलें ॥२॥

अवघियांसी भेटला ॥ पार्थ हदयीं आलिंगिला ॥ मग भोजन द्रौपदीसी ॥ प्रेमें मागों लागला ॥३॥

परि राजोपयोग्य कांहीं ॥ गुंफेमाजी पदार्थ नाहीं ॥ गहिंवरोनि विनवी कृष्णा ॥ तंव देवें दीधला मंत्र पाहीं ॥४॥

तो अनुष्ठितां आला दिनमणी ॥ ह्नणे वो मागें जें अभीष्ट मनीं ॥ येरी ह्नणे देई देवा ॥ जेणें अन्न पाविजे वनीं ॥५॥

सूर्ये थाळीचा मंत्र दिला ॥ विधि सांगोनि स्वर्गी गेला ॥ तें अनुष्ठान करितां द्रौपदी ॥ पदार्थ विस्तार जाहला ॥६॥

पांचाळी श्रीकृष्णासि ह्नणे ॥ आतां आरोगणा करणें ॥ आणि भीमा पाठवोनी ॥ ऋषि आणविले तत्क्षणें ॥७॥

साठीसहस्त्र मिळाले ॥ स्त्रानें सारोनि पंक्तीं बैसले ॥ मध्यें बैसोनि गोविंदें ॥ षडरसपदार्थ सेविले ॥८॥

भोजन जाहलें सहपंक्तीं ॥ ऋषि आश्वर्य करिती चित्तीं ॥ ह्नणती धन्य हे पांडव ॥ जयां गोविंद सारथी ॥९॥

असो कर्पूरविडे देउनी ॥ ऋषी पाठविले निजस्थानीं ॥ मग कृष्ण ह्नणे द्रौपदीये ॥ करीं आरोगणा बहिणी ॥१०॥

हे कृष्णाज्ञा मानोनी ॥ मंत्र विसर्जिला आरोगोनी ॥ थाळी पालथी घातली ॥ मग स्तविला चक्रपाणी ॥११॥

श्रीकृष्ण ह्नणे द्रौपदीसी ॥ जंव तूं भोजन न करिसी ॥ तंव थाली प्रसवेल जाण ॥ षडरसान्नांचिया राशी ॥१२॥

येरी ह्नणे तूं आत्मसखा ॥ संकटीं रक्षिलें अनेकां ॥ परि वनवास पावलों ॥ हे उणी आमुची कर्मरेखा ॥१३॥

कृष्ण ह्नणे चिंत्ता न करा ॥ वरुषें भरलिया तेरा ॥ मग तुमचें सकळ साह्य ॥ करीन वधोनि गांधारां ॥१४॥

यावरी ह्नणे पांडवांसी ॥ न विसंबावें द्रौपदीसी ॥ मी अवघडीं रक्षीन ऐसें ॥ सांगोनि गेला द्वारकेसी ॥१५॥

ऐसी ते द्रुपदनंदिनी ॥ पतिव्रताशिरोमणी ॥ सत्व राखिलें धर्माचें ॥ जियेचा सारथी चक्रपाणी ॥१६॥

सवें साठीसहस्त्रऋषी ॥ वनीं धर्म नांदे बांधवेंसीं ॥ अन्नदनव्रतनेम ॥ चालवीत अहर्निशीं ॥१७॥

सदाफळ जाहले तरुवर ॥ उदकें पूर्ण सरोवर । निर्वैर विचरती सर्व प्राणी ॥ धर्मा ओळंगती सुरवर ॥१८॥

जैं पांडव वनीं प्रवेशले ॥ तैहोनि चोर पळाले ॥ ते जावोनि सांगती दुर्योधना ॥ जेंजें वनीं वर्तलें ॥१९॥

थाळियेची सर्व स्थिती ॥ गुप्तहेरीं देखिली होती ॥ तेही जावोनि हस्तनापुरीं ॥ सांगती दुर्योधनाप्रती ॥२०॥

जीजी थाळी दीधली दिनमणीं ॥ ते अन्नें प्रसवे नित्यानी ॥ सदाफळ वृक्ष जाहले ॥ निर्वैर पशुपक्षी प्राणी ॥२१॥

ऐसी ऐकोनि व्यवस्था ॥ दुर्योधना वर्तली चिंता ॥ बोलावोनि कौरवां ॥ मग जाहला पुसता ॥२२॥

आपण राज्य घेतलें हिरोनी ॥ पांडवांसी पाठविलें वनीं ॥ परि तेथेंही भोग भोगिती ॥ बरवें न वाटे माझे मनीं ॥२३॥

वनवास तयासचि ह्नणावें ॥ कीं सर्वार्थी दुःख भोगावें ॥ त्यांहीं मांडिलें अन्नदान ॥ सांगा ऐसिया काय करावें ॥२४॥

तंव बोलिले द्रोणगुरु ॥ तुह्मी जरी पुसाल विचारु ॥ तरी तुमचेनि काहीं नोहे ॥ त्यांसी सारथी शारंगधरु ॥२५॥

भीष्म ह्नणे दुर्योधना ॥ तुह्मीं द्रौपदीये केली विटंबना ॥ तेव्हां वस्त्रें पुरविलीं ॥ ऐसा कृष्णसारथी भक्तजनां ॥२६॥

तयांसि तुह्मीं नागविलें ॥ वनवासी पाठविलें ॥ तेथें घातलें अन्नछत्र ॥ हें सामर्थ्य कोणी दीधलें ॥२७॥

तुह्मीं निर्वाण बहुत केलें ॥ तितुकेंही पांडवी साहिलें ॥ ऐकें शकुनिय दुःशासना ॥ शिकवा दुर्योधना वहिलें ॥२८॥

तुह्मी मूळींचे अहितकारक ॥ त्यांहीं साहिलें सकळिक ॥ धन्य जननी तयांची ॥ तैसे भले नाहींत आणिक ॥२९॥

ऐसें ऐकोनि बोलणें ॥ दुःख मानिलें दुर्योधनें ॥ उठोनि गेला मंदिरांत ॥ एकांत मांडिला साभिमानें ॥३०॥

शकुनिया ह्नणे एक विचारु ॥ घाला घालोनि पांडव मारुं ॥ तंव कर्ण ह्नणे सर परता ॥ हा नपुंसकाचा बडिवारु ॥३१॥

जे शुद्ध पवित्र उभयवंशीं ॥ ते अन्याय नाचरती वैरियांसी ॥ तुह्मी तरी महाक्षेत्री ॥ हें विदित असे सर्वासी ॥३२॥

तयांसि रक्षिता श्रीहरी ॥ ह्नणोनि राहिले वनांतरी ॥ कदा न गवसती आपणां ॥ सुदर्शन घरटी करी ॥३३॥

मंत्र येक असे थोर ॥ सत्वें टाळावा युधिष्ठिर ॥ तेणें तो करील आत्मघात ॥ मग येरां सहजचि संहार ॥३४॥

शकुनी ह्नणे भलाभला ॥ मंत्र बरवा सांगीतला ॥ आतां तेंचि करावें ॥ उपावो मज आठवला ॥३५॥

थाळी तंवचि प्रसवे अन्न ॥ जंव पांचाळी न करी भोजन ॥ ते जेविल्या वरी प्रसवेना ॥ ऐसें ऐकिलें वचन ॥३६॥

जेवितां ठावी कीजे पांचाळी ॥ उपरी भोजन मागावे तत्काळीं ॥ सत्व हरेल सहजेंची ॥ कीं अन्न न प्रसवे थाळी ॥३७॥

परि तेथें पाठवावा कवण ॥ तंव बोलिला दुःशासन ॥ कीं धाडावा ऋषि दुर्वासा ॥ तो आहारभक्षक पूर्ण ॥३८॥

सवें दहासहस्त्र ऋषिगण ॥ साठीखंडींचें पाहिजे अन्न ॥ कार्य साधेल तयाचेनीं ॥ ऐसें बोलिल दुर्जन ॥३९॥

हर्ष वाटला दुर्योधना ॥ ह्नणे पालाणारे सैन्या ॥ भीष्मद्रोणां न सांगावें ॥ जावों ऋषीच्या दर्शना ॥४०॥

मग निघाले झडकरी ॥ गेले यमुनेचिये तीरीं ॥ तेथें देखतां दुर्वासा ॥ लोटले चरणांवरी ॥४१॥

ऋषीनें उठविला गांधार ॥ येरु जाहला विनीतकंधर ॥ ह्नणे येवोनि हस्तनावती ॥ मज करावा उपकार ॥४२॥

तें दुर्वासा मानवलें ॥ मग सुखासनीं वाहिलें ॥ उत्साहो करोनि थोर ॥ नगरीं गांधारें आणिलें ॥४३॥

रत्नखचित सिंहासनीं ॥ उपचारें बैसवोनि मुनी ॥ केली षोडशोपचारें पूजा ॥ लागली भानुमती चरणीं ॥४४॥

अवघीं दंडवतें करिती ॥ ऋषि आशीर्वादें बोलती ॥ मागमाग दुर्योधना ॥ मी प्रसन्न तुजप्रती ॥४५॥

तंव ह्नणे गांधार ॥ येक मागतसें वर ॥ काम्यकवनीं जावोनि आपण ॥ सत्वें टाळावा युधिष्ठिर ॥ ॥४६॥

द्रौपदी जेविली पाहिजे ॥ मग धर्मासी भोजन मागिजे ॥ थाळी न प्रसवे अन्न ॥ सत्व टळेल मग सहजें ॥ ॥४७॥

ऐसें ऐकोनि बोलणें ॥ दुर्वास मुनी तथास्तु ह्नणे ॥ आतां काम्यकवनीं जावोनी ॥ धर्मासी सत्वें टाळणें ॥ ॥४८॥

परि येक असे विचार ॥ तयाचा सारथी शारंगधर ॥ तो अन्न पुरवील निश्वयें ॥ वृथा करणें बडिवार ॥४९॥

ऐसें बोलिले परि निघाले ॥ काम्यकवनीं प्रवेशले ॥ तंव भोजन सारुनि धर्मादिक ॥ धर्मशाळे असती बैसले ॥५०॥

आणि भोजन करोनि पांचाळी ॥ पालथी घातली असे थाळी ॥ तंव दुर्वसमुनीचे बडवे ॥ येवोनि सांगती धर्माजवळी ॥५१॥

येथें आलासे दुर्वास देवो ॥ ऐकोनि चालिला धर्मरावो ॥ सन्मान ऋषी आणिले गुंफे ॥ थोर केला महोत्साहो ॥५२॥

तंव धर्मासि ह्नणती ऋषी ॥ भोजन देईं गा आह्मासी ॥ ठाकोनि आलों तुजजवळी ॥ अवघे आहों उपवासी ॥५३॥

ऐसी ऐकोनियां वाणी ॥ धर्म चिंतावला मनीं ॥ ह्नणे धांव गा चक्रधरा ॥ आजी जाहली सत्वहानी ॥५४॥

चिंताग्रस्त चौघेजण ॥ धर्म सांडूं पाहे प्रमाण ॥ तंव तेथें तत्क्षणीं ॥ आली द्रौपदी आपण ॥५५॥

ऋषीसि करोनि दंडवतें ॥ मग ह्नणितलें धर्मातें ॥ यांसी पाठविजे स्त्रानालागीं ॥ देवों भोजन निरुतें ॥५६॥

श्रीरंग असतां शिरावरी ॥ कायसी चिंता संसारीं ॥ मी भोजन देईन यांसी ॥ धर्मा आपणेया सांवरीं ॥५७॥

यापरी ऐकोनि उत्तर ॥ स्त्राना पाठविले ऋषीश्वर ॥ ते गेले शीघ्र देखा ॥ पातले नदीचें पुण्यतीर ॥५८॥

द्रौपदी ह्नणे भीमार्जुनासी ॥ तुह्मी रक्षावें धर्मासी ॥ तंव मी प्रार्थोनि थाळियेतें ॥ अन्नें निपजवितें ऋषींसी ॥५९॥

मग प्रवेशली भीतरीं ॥ बैसली गुंफे पश्विमद्वारीं ॥ करुणालापीं देखा ॥ सतीनें स्तविला मुरारी ॥६०॥

जयजयाजी मेघश्यामा ॥ अवघडसमयीं रक्षावें धर्मा ॥ तुझाचि असे आधारु ॥ वचन पाळीं आत्मयारामा ॥६१॥

असतां तुजसारखा सारथी ॥ चिंता न करावी कवणे अर्थी ॥ आतां न लावीं उशीर ॥ जयजयाजी लक्ष्मीपती ॥६२॥

तवबोलाचा विश्वास मनीं ॥ ह्नणोनि राहविले मुनी ॥ भोजन करोनि धुतली थाळी ॥ आतां काय वाढूं त्यां लागुनी ॥६३॥

साठी खंडियांचीं अन्नें ॥ पाहिजेत ऋषींकारणें ॥ सत्व गेलिया जगन्नाथ ॥ युधिष्ठिर जाईल प्राणें ॥६४॥

मग कैंचे पांडवपांचाळी ॥ कैंचे निजभक्त वनमाळी ॥ अवघीं त्यजितां प्राणांतें ॥ निंद्य होईल भूतळीं ॥६५॥

पुरोनि वैरियांचे मनोरथ ॥ कौरव होतील हर्षित ॥ सत्व गेलिया गोविंदा ॥ होऊं निरयीं पतित ॥६६॥

धांव गोविंदा गोपाळा ॥ चुकवीं आजिंची अवकळा ॥ भलतिया तरी प्रकारें ॥ अन्न देयीं ऋषिकुळा ॥६७॥

देवा अवघी तुझीच करणी ॥ तुवांचि अपाय योजिले वनीं ॥ आपुली कराया प्रसिद्धी ॥ तूंचि रक्षिता निदानीं ॥६८॥

इकडे द्वारकेसि रुक्मिणी ॥ ताट विस्तारी भोजनीं ॥ तंव धांवा ऐकोनी द्रौपदीचा ॥ बोलते जाहले चक्रपाणी ॥६९॥

ह्नणे अवघड पडलें पांडवां ॥ द्रौपदी पुकारिते धांवा ॥ आतां मी न करीं भोजन ॥ ह्नणोनि उठिला लवलवां ॥७०॥

अदृश्य होवोनि तेथोनी ॥ प्रकट जाहला गुंफास्थानीं ॥ तंव धांवोनि द्रौपदीयें ॥ आलिंगिला चक्रपाणी ॥७१॥

येरु ह्नणे द्रौपदीसी ॥ कां गा बोलाविलें मजसी ॥ येरी ह्नणे ऐकें सखया ॥ दुर्वास आला भोजनासी ॥७२॥

थाली धुवोनि घातली पालथी ॥ आतां अन्न कैंचें जी श्रीपती ॥ संधी पाहोनि आले ऋषी ॥ ऐसिया काय करुं वित्पती ॥७३॥

सत्वभंग होतांचि क्षणीं ॥ धर्म प्राण त्यजील लाजोनी ॥ यास्तव म्यां संस्थापिलें ॥ देईन भोजन ह्नणोनी ॥७४॥

ते ऋषी पाठवोनि स्त्रानासी ॥ मी चिंतित बैसलें तुजसी ॥ आतां स्त्रान करोनि येतील ॥ तरी काय करुं हषीकेशी ॥७५॥

देव ह्नणे हो सुंदरी ॥ हें होईल भलतियापरी ॥ परि रुक्मिणीनें वाढिलें ताट ॥ तैं सांडोनि आलों झडकरी ॥७६॥

तरि मज आधीं घालीं भोजन ॥ मग मी वारीन हें व्यसन ॥ तंव काळवंडोनि ह्नणे येरी ॥ हें जाहलें आनेंआन ॥७७॥

एक ऋषीचें सांकडें ॥ दुजें कृष्णाचें कुवाडें ॥ थाळी धोवोनि ठेविली ॥ कैसें निस्तरेल येवढें ॥ ॥७८॥

तंव कृष्ण ह्नणे द्रौपदीये ॥ कांहीं थाळिये आंत पाहें ॥ येरी ह्नणे कां झकविशी ॥ ते धोवोनि ठेविली आहे ॥७९॥

यावरी ह्नणितलें अनंतें ॥ परि पाहें तेथें ॥ कांहीं राहिलें असेल ॥ तेंचि समर्पावें मातें ॥८०॥

येरी लवलाहें आंत गेली ॥ तंव देवें माव रचिली ॥ देखिला भाजीचा देंठ ॥ जंव ते उलथोनि पाहिली ॥८१॥

ह्नणे देठेंविण न देखें दुसरें ॥ तंव हात ओडविला चक्रधरें ॥ अर्पण असो जगन्नाथा ॥ ऐसें ह्नणे प्रेमादरें ॥८२॥

तृप्ती जाहली दीधला ढेंकर ॥ मग अदृश्य जाहला शार्ङ्गधर ॥ विस्मित होवोनि द्रौपदी ॥ करी भोंवता निहार ॥८३॥

ह्नणे आतांचि होता काय जाहला ॥ किंवा म्यां स्वप्न देखिला ॥ निश्वळ राहिली ध्यानीं ॥ येरु ऋषिजवळी पातला ॥८४॥

तेथें मावरचना रचिली ॥ पांचही पांडव पांचाळी ॥ करुनि षडरसान्नें चतुर्विध ॥ ऋषिपंक्ती बैसविली ॥८५॥

द्रौपदी देत विस्तारोनी ॥ भीम वाढीत नेवोनी ॥ अर्जुन वाढी घृतातें ॥ नकुळ भरोनी दे पाणी ॥८६॥

भोजनें करिताति ऋषी ॥ धर्म प्रार्थना करी संतोषीं ॥ टिळेविडे करितसे ॥ सहदेवो परियेसीं ॥८७॥

झालीं भोजनें परि कुसरी ॥ अन्नराशी पडल्या भारी ॥ साळी डाळी शर्करादिक ॥ वाढिलें घृत अखंडधारी ॥८८॥

तृप्ती जाहली ऋषीश्वरां ॥ आकंठ प्रमाण अवधारा ॥ मग गुरळे करोनि उष्णोदकें ॥ जाले टिळेविडे समग्रां ॥८९॥

शीतळ छाया नदीतटीं ॥ ऋषी लोळती वाळुवंटी ॥ येकासि जाहलीं अजीर्णे ॥ पडताति बेटोबेटीं ॥९०॥

ऐसें ऋषिभोज्यचरित्र ॥ देवें रचिलें मायासूत्र ॥ तें लीलालाधव द्रौपदीयें ॥ ध्यानीं देखिलें सर्वत्र ॥९१॥

मग आनंदें गजबजिली ॥ उठोनि धर्माजवळी आली ॥ ह्नणे बोलावा ऋषीश्वरां ॥ भीतरीं अन्नें निपजलीं ॥९२॥

येरें पाठविलें भीमासी ॥ बोलवाया ऋषीश्वरांसी ॥ तंव ते संतृप्त होवोनियां ॥ पडले असती नदीसी ॥९३॥

अन्नें वानिती परस्परें ॥ रसाळें आणि रुचिकरें ॥ ह्नणती सत्व राहिलें धर्माचें वृथा कष्टविलें गांधारें ॥९४॥

या द्रौपदीचिये हातीं ॥ असे अमृताची निष्पत्ती ॥ उदरें जाहलीं अन्नजड ॥ मार्गी चालण्या कैंची शक्ती ॥९५॥

एक उदकें शोषिती ॥ येक आंगोळ्या मुखीं घालिती ॥ एका जाहली विषूचिका ॥ उदरें धमधमा वाजती ॥९६॥

तंव भीमसेन ह्नणे ऋषींसी ॥ चलाचलाजी भोजनासी ॥ अतिकाळ असे जाहला ॥ थोर कष्टलेति वनवासीं ॥९७॥

ऐकोनि ह्नणे दुर्वासा ॥ बरवा केलाति रे वळसा ॥ पोटभरी केली येथें ॥ आतां गुंफेसि नेसी कैसा ॥९८॥

तुमचें तरी नसरे अन्न ॥ परि जावों पाहती आमुचे प्राण ॥ सत्व न सांडा अद्यापी ॥ जळो तुमचा दुर्योधन ॥९९॥

आजि क्षुधा आजन्माची ॥ सर्वस्वें हरली आमुची ॥ आतां न येऊं मागुते ॥ अवधी पुरली भोजनाची ॥१००॥

तुमचें अन्न जड बळिष्ठ ॥ धमधमा वाजतसे पोट ॥ आतां न जेववे तुमचे घरीं ॥ कवणें भोगावे हे कष्ट ॥१॥

भीम ह्नणे जी अवधारा ॥ तुह्मी भलतें कुडें करा ॥ परि नेलियाविण न राहें ॥ हा माझा बोल खरा ॥२॥

ऋषी ह्नणती वृकोदरासी ॥ आग्रहें शाप देवों तुजसी ॥ उगाचि जाई येथोनी ॥ सांगें वृत्तांत धर्मासी ॥३॥

आतांचि तुवां वाढिलें ॥ धर्मे सकळां जेवविलें ॥ तरी काय प्राण घ्यावया ॥ मागुते चाळे मांडिले ॥४॥

सांगीतलें तें उगेंचि ऐक ॥ नातरी रडत जाशील देख ॥ मग धर्माजवळी जावोनि भीम ॥ वृत्तांत सांगे सकळिक ॥५॥

धर्मासि आश्वर्य वर्तलें ॥ मग द्रौपदीसह पाहों आले ॥ तंव गडबडां लोळती ऋषी ॥ विंदान कृष्णाचें कळलें ॥६॥

धर्म ह्नणे हो स्वामी ॥ चलावें जी भोवना तुह्मीं ॥ तंव ते ह्नणती पुरे आतां ॥ थोर कष्टी जाहलों आह्मी ॥७॥

अरे धर्मा तूं ऐसा कैसा ॥ जेवविलें आपुले इत्सां ॥ आतां ह्नणसी गुंफे चला ॥ तरी हा कां मांडिला वळसा ॥८॥

आतां आह्मां अनुज्ञा दीजे ॥ तुह्मीं गुंफेसि जाईजे ॥ कधींही न येऊं येथें ॥ बरवें जेवविलें वोजें ॥९॥

अरे अर्जुना सांगों काई ॥ अखंडघृत त्वां वाढिले पाहीं ॥ अद्यापि कां नससी उगा ॥ कृपा कीजे लागतों पायीं ॥११०॥

नकुळें पाणी वोळंगविलें ॥ सहदेवें टिळेविडे केले ॥ पोटभरी जेवउनी ॥ मागुते छंद कां मांडिले ॥११॥

आतां उगेचि जा गुंफेसी ॥ बोल न ठेवावा आह्मासी ॥ ऐसें ऐकोनि साहीजणीं ॥ नमस्कारिलें ऋषींसी ॥१२॥

दुर्वासमुख्यां पामकिलें ॥ ते हस्तनापुराप्रति गेले ॥ पांडव प्रवेशले गुंफेसी ॥ आश्वर्य कृष्णाचें मानिलें ॥१३॥

धर्म ह्नणे द्रौपदीसी ॥ कैसा पावला हषीकेशी ॥ येरीनें भाजीदेंटापासुनी ॥ चरित्र कथिलें उल्हासीं ॥१४॥

धर्म ह्नणे प्रिये तुजसी ॥ सदा सन्निध हषीकेशी ॥ ऐसा जाहला भरंवसा ॥ आतां विघ्न कैसें आह्मासी ॥१५॥

परि आमुची हे अवदशा ॥ कां न पुससी सर्वेशा ॥ येरी ह्नणे प्राणनाथा ॥ हें पुसणें नलगे जगदीशा ॥१६॥

त्वां द्यूत खेळोनि हारविलें ॥ आपणा आपण गोंविलें ॥ येथें बोल नाहीं कवणासी ॥ हें समस्तां मानलें ॥१७॥

असो आनंदाच्या उल्हासीं ॥ पांडव नांदती वनासी ॥ अवघड निवारी देवो ॥ ह्नणोनि चिंता नाहीं मानसीं ॥१८॥

आतां असो हे भरोवरी ॥ तंव येरीकडे ऋषीश्वरीं ॥ जाणविलें दुर्योधना ॥ जावोनि हस्तनापुरीं ॥१९॥

समूळ भोजनवृत्तांत ॥ समस्तांसी केला श्रुत ॥ ह्नणती जाहलीं अजीर्णे ॥ होऊंपाहे प्राणांत ॥१२०॥

ऐसा वृत्तांत सांगोनी ॥ ऋषि निघाले तेथोनी ॥ येरीकडे दुर्योधन ॥ चिंताग्रस्त जाहला मनीं ॥२१॥

तंव ह्नणे परीक्षितिनंदन ॥ दुर्वासमुनी तपोधन ॥ असोनि कराया धर्मछळ ॥ कां प्रवर्तला आपण ॥२२॥

मुनि ह्नणे ऐकें भारता ॥ दुष्टाचें अन्न सेविलें असतां ॥ ऐसीच बुद्धी होतसे ॥ संदेह नाहीं सर्वथा ॥२३॥

परमतपिया दुर्वासऋषी ॥ परि संगतीस्तव जाहला दोषी ॥ ह्नणोनि साधुपीडेचें पातक ॥ नाहीं वाटले मानसीं ॥२४॥

असो शकुनी जयद्रथ दुःशासन ॥ विचारिती एकांतीं जावोन ॥ तेथें बुद्धि सांगतां शकुनिया ॥ संतोषेल दुर्योधन ॥२५॥

तें पुढें कीजेल कथन ॥ परि हें जाहलें थाळीप्रकरण ॥ अरण्यपर्वीची कथा ॥ झाडकवी प्रयोजन ॥२६॥

जन्मेजय रायाप्रती ॥ सांगे मुनी वेदमूर्ती ॥ ह्नणे कविमधुकर ॥ ते कथा ऐकावी पुढती ॥२७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ सप्तमोऽध्यायींकथियेला ॥ दुर्वासयात्राप्रकारु ॥१२८॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP