कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे राजा भारत ॥ आतां अरण्यपर्वीचा वृत्तांत ॥ वैशंपायना करा जी श्रुत ॥ मजलागोनी ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया तूं गा विचक्षण ॥ ऐकें पूर्वजांचें कथन ॥ अरण्यपर्वीचें ॥२॥

पांडवी राज्य हारविलें ॥ मग दुर्योधनें ह्नणितलें ॥ भाक सिद्धीसि नेई धर्मा ॥ जावें वनवासीं वहिलें ॥३॥

तें वचन ऐकोनी ॥ पांचही निघाले वनीं ॥ स्त्रिया पाठविल्या माहेरीं ॥ आपुलाल्या पांचांजणीं ॥४॥

कुंती सुभद्रा अभिमन्य ॥ यांसी विदुरगृहीं ठेवोन ॥ सवें धौम्यपुरोहित ॥ चालिले द्रौपदीसि घेवोन ॥५॥

पांच बंधु द्रौपदीसहित ॥ आणि धौम्यऋषी बुद्धिमंत ॥ वनवासीं सातजणें ॥ निघालीं श्रीकृष्णा चिंतित ॥६॥

आंगीं विभूतीचीं उधळणें ॥ खांद्यावरी कडासनें ॥ पांडव जाहले दिगंबर ॥ केलीं वल्कलें परिधानें ॥७॥

अतिसुकुमारी द्रौपदी ॥ भीमसेनें घेतली खांदीं ॥ चालिलीं वनवासाप्रती ॥ सत्व अवलंबूनि सुबुद्धीं ॥८॥

आबालवृद्ध नागरिक ॥ अष्टादशजाती सकळिक ॥ बोळवित निघाले पांडवां ॥ अपार वर्तलें दुःख ॥९॥

करुणालाप आळविती ॥ येक चरणावरी लोळती ॥ ह्नणती धर्मा तुजवांचोनी ॥ आमुची कवणी होईल गती ॥१०॥

धर्म होवोनि कृपाळ ॥ ह्नणे नकरा रे कोल्हाळ ॥ येईन तेरा वरुषें क्रमोनी ॥ करीन तुमचा प्रतिपाळ ॥११॥

ऐसें संबोखोनि समस्तां ॥ विप्रां आणि नगरस्थां ॥ येरीं द्रव्यें आणोनि अपारें ॥ वोळंगविलीं पंडुसुता ॥१२॥

तीं द्रव्यें घेवोनि भीमसेनें ॥ वनीं चाललीं सातीजणें ॥ वैशंपायन ह्नणे राया ॥ परिसावें सावधानें ॥१३॥

पांडव वनवास उद्देशोनी ॥ जान्हवीतीरा पासोनी ॥ कुरुक्षेत्रा जाते जाहले ॥ राहिले काम्यकवनीं ॥१४॥

तंव विदुर तेथ आला ॥ धर्म बंधूंसहित देखिला ॥ तया देखोनियां धर्म ॥ भीमसेनासि बोलिला ॥१५॥

काय शकुनियें विदुरासी ॥ पाठविलें आपणापाशीं ॥ कपटफाशीं करोनियां ॥ जिंकावया शरीराशीं ॥१६॥

ऐसें पांडव भय मानोनी ॥ पुसती विदुरासि भेटोनी ॥ तुह्मी आलेति कवणे कार्या ॥ येरु बोलिला वचनीं ॥१७॥

कीं तुह्मी आलेति वनांतरीं ॥ तेणें धृतराष्ट्र प्रज्वळिला भारी ॥ मज बोलिला पांडवांसी ॥ आणीं मुरडोनि झडकरी ॥१८॥

मग म्यां तयासि बोलिलें ॥ तुह्मीं पांडवां दुखविलें ॥ आतां ते सर्वथा न येती येथें ॥ येरें क्रोधें मज ह्नणितलें ॥१९॥

आमुचें ह्नणितलें न करिसी ॥ तरी तूंही जाई वनासी ॥ तें ऐकोनि तुह्मांजवळी ॥ आलों शिकवावयासी ॥२०॥

तुह्मीं सत्व न सांडावें ॥ क्षमा धरोनि वनीं असावें ॥ मग सत्याकडे सर्वही ॥ साह्य होतील जाणावें ॥२१॥

ऐसें विदुर बोलिला ॥ इकडे धृतराष्ट्र परितापला ॥ सभाद्वारीं सर्वा देखतां ॥ मूर्छागत पडिन्नला ॥२२॥

सभाजनीं बैसविला ॥ येरु संजयासि बोलिला ॥ कीं धर्म परायण विदुरबंधु ॥ म्यां क्रोधें वनीं पाठविला ॥२३॥

तरी त्वां शीघ्र जावोनी ॥ विदुर आणावा समजावोनी ॥ येरु बैसोनि रथावरीं ॥ प्रवेशला काम्यकवनीं ॥२४॥

तो विदुरापांडवांसी भेटला ॥ येरीं उपचारीं पूजिला ॥ मग घृतराष्ट्राचा वृत्तांत ॥ संजयें विदुरासि श्रुत केला ॥२५॥

यावरी पांडवांची आज्ञा घेउनी ॥ विदुर हस्तनापुरी जावोनी ॥ भेटला धृतराष्ट्रासी ॥ येरु संतोषला निजमनीं ॥२६॥

विदुर ह्नणे अगा राया ॥ तुझी आज्ञा जाणोनियां ॥ शीघ्र आलों पांडवांसी ॥ पृथकपणें निरवोनियां ॥२७॥

परि भारता तियेक्षणीं ॥ विदुर आला वनींहुनी ॥ हें जाणोनि दुर्योधन ॥ अहंतापला मनीं ॥२८॥

शकुनिया कर्ण दुःशासन ॥ तयांसि ह्नणे दुर्योधन ॥ विदुर विचार करी रायासी ॥ पांडव आणावे ह्नणोन ॥२९॥

काहीं बुद्धि सांगा मातें ॥ जरी पांडव येतील येथें ॥ तरी विषशस्त्राग्निउपायें ॥ करीन आत्मघातातें ॥ ॥३०॥

यावरी शकुनिया ह्नणे ॥ इतुकें नलगे गा करणें ॥ सत्यप्रतिज्ञावंत पांडव ॥ सर्वथा न येती जाणणें ॥३१॥

समय पुरलिया वांचोनी ॥ न येती धृतराष्ट्राचे वचनीं ॥ ऐसेही येतील जरी ॥ तरी करीन काहीं करणी ॥३२॥

तंव दुःशासन कर्ण ह्नणती ॥ राया न करीं काहीं खंती ॥ नेऊं मनोरथ सिद्धीस तुझा ॥ करोनि मामेयाची युक्ती ॥३३॥

तंव ह्नणे गांधारावो ॥ ऐका माझा अभिप्रावो ॥ शस्त्रें घेवोनि आपण ॥ करुं पांडवां अपावो ॥३४॥

तेणें पावाल राज्या निष्कंटका ॥ तें मानवलें सकळिकां ॥ ह्नणती हेंचि करणें निर्धारें ॥ मग शस्त्रें वांटिलीं देखा ॥३५॥

तें व्यासें जाणोनि ज्ञानीं ॥ बोलिले धृतराष्ट्राप्रति येउनी ॥ ऐकें राया मत्प्रयुक्त ॥ कौरवपांडवहितालागोनी ॥३६॥

हा दुर्योधन पांडवांसी ॥ मारूं ह्नणतो निश्वयेंसीं ॥ तरी अनर्थ होईल ॥ ह्नणोनि वारावें ययासी ॥३७॥

विदुर भीष्म कृप द्रोण ॥ तूं तैसाचि मीही जाण ॥ शिकवूं बरवियापरी ॥ दुर्योधनासि आपण ॥३८॥

कलहो साधुस्वजनेंसीं ॥ बरवा नव्हे निश्वयेंसीं ॥ तरी दुर्योधन जावोनि वनीं ॥ साम करो पांडवांसी ॥३९॥

धृतराष्ट्र ह्नणे गा महर्षी ॥ हें द्यूत रुचलें नाहीं आह्मासी ॥ परि पुत्रस्नेंहें काहीं ॥ न बोलवेचि गांधारासी ॥४०॥

यावरी व्यास बोलिले उत्तर ॥ हें मी जाणतसें समग्र ॥ पुत्र होवोनि सृष्टीमध्यें ॥ अपूर्वता नाहीं थोर ॥४१॥

ऐकें एतदर्थी बोध ॥ इंद्रासुरभीचा संवाद ॥ कवणी येके समयीं सुरभी ॥ करी रुदन खेद ॥४२॥

माझा पुत्र दुर्बळ ॥ तया ओढवत नाहीं हल ॥ ह्नणोनि कृषीवल मारितती ॥ तेणें माझे प्राण व्याकुळ ॥४४॥

यावरी ह्नणे सुरपती ॥ तुज सहस्त्र पुत्र आहेती ॥ येरी ह्नणे सर्वाठायीं ॥ समानचि स्नेहप्रीती ॥४५॥

ऐसें वाक्य ऐकोनी ॥ वृष्टी करितसे वज्रपाणी ॥ सोडवितां बलीवर्द ॥ सुरभी आनंदली मनीं ॥४६॥

धृतराष्ट्रा तुझा तैसा स्नेहु ॥ पुत्रांवरी असे बहु ॥ परि विरोध चुकवाया ॥ करावा काहीं उपाव ॥४७॥

ते पांचपुत्र पंडूचे ॥ आणि शतपुत्र तूमचे ॥ मिळोनि रहावें अवधीं ॥ द्वेष सांडोनि मनींचे ॥ ॥४८॥

धृतराष्ट्र ह्नणे हो ऋषी ॥ जैसें तूं बोलिलासी ॥ तैसेंचि भीष्मादिक बोलिले ॥ तें मी जाणें परियेसीं ॥ ॥४९॥

आतां या दुरात्म्या दुर्योधनातें ॥ तुवां शिकवावें निरुतें ॥ व्यास ह्नणे मैत्रेय ऋषी येतो ॥ पांडवां पासोनि येथें ॥५०॥

तो शिकवील दुर्योधनासी ॥ तेंचि करावें निश्वयेंसीं ॥ ऐसें ह्नणोनि तत्क्षणीं ॥ अदृश्य जाहले व्यासऋषी ॥५१॥

तंव मैत्रेय तेथ आला ॥ तो धृतराष्ट्रें भावें पूजिला ॥ मग पुत्रांसमवेत देखा ॥ वृत्तांत पुसता जाहला ॥ ॥५२॥

तुह्मी पांडवां पासोनि आलेती ॥ तरी सांगा कीं सुखी आहेती ॥ तंव मैत्रेय ह्नणे राया ॥ मी तीर्थयात्रे भ्रमलों क्षिती ॥५३॥

काम्यकवनीं बिजें केलें ॥ तेथें जटाधारी पांडव देखिले ॥ तुझे पुत्रें कपटद्यूतें ॥ तयां अत्यंत कष्टविलें ॥५४॥

ऐसें आयकिलें आह्मीं ॥ तरी इतुके असतां तुह्मी ॥ हें घडलेंचि ना पाहिजे ॥ विरुद्ध परस्पर कुकमीं ॥५५॥

यावरी मधुरवाक्यें करोनी ॥ बोलिला दुर्योधनासि मुनी ॥ तुझें हित सांगेन ॥ तें गांधारा धरीं मनीं ॥५६॥

महाप्रतापी पंडुपुत्र ॥ सत्यव्रती बळ अपार ॥ किर्मीर हिडिंब बक ॥ ऐसिय राक्षसां मारणार ॥५७॥

तरी तूं तयांसि साम करीं ॥ वृथा अभिमान हा न धरीं ॥ येरु ऊर्ध्व मांडी करोनी ॥ आंगुठां लिही धरत्री ॥५८॥

हास्य करोनि खालतें पाहे ॥ हें विचित्र देखिलें मैत्रेयें ॥ मग कोपोनि होणारासारिखें ॥ गांधारा शापिलें ऋषिरायें ॥५९॥

ह्नणे रे ऊर्ध्व मांडी करोनी ॥ आंगुठां रेखितोसि धरणी ॥ तरी संग्रामीं भीमसेन ॥ मांडी भेदील गदेंकरोनी ॥६०॥

ऐसें ऐकोनि धृतराष्ट्र ॥ ऋषीसि प्रार्थी अपार ॥ येरु ह्नणे ऐकें राया ॥ उःशापाचा प्रकार ॥६१॥

साम करील दुर्योधन ॥ पांडवांजवळी जावोन ॥ तरी चुकेल अवघें वोखटें ॥ नातरी नटळे शापदान ॥६२॥

यानंतरें तो मुनिराय ॥ निघोनि गेला मैत्रेय ॥ शाप जाहला दुर्योधनासी ॥ तेणें धृतराष्ट्र दुःखी होय ॥६३॥

वैशंपायन ह्नणती जन्मेजया ॥ ऐकें अग्रकथा चित्त देवोनियां ॥ पांडव वनीं असतां ॥ यादव गेले सांभाळावया ॥६४॥

अंधक पांचाळ धृष्टकेत ॥ कैकेय्यादि राजे समस्त ॥ कृष्णादि सकळ कौरवांसी ॥ निंदिती नानापरि बहुत ॥६५॥

श्रीकृष्णें ह्नणे गा युधिष्ठिरा ॥ वधोनि दुर्योधनादि गांधारां ॥ राज्य देईन तुह्मासी ॥ ऐसें क्रोधें संबोखी समग्रां ॥६६॥

तें ऐकोनियां पार्थु ॥ कृष्णाप्रति काय ह्नणतु ॥ तूं गा साक्षांत परब्रह्म ॥ अवतरलासि भक्तहेतु ॥६७॥

तूं करिसी तें नव्हे काय ॥ दैत्य वधिले नानाउपायें ॥ कुंडले दीधलीं इंद्रासी ॥ भौम वधोनि दैत्यराव ॥६८॥

इंद्र स्थापिला अमरावती ॥ तूतें ब्रह्मादिक स्तविती ॥ नानारुपें धरोनियां ॥ सनाथ केली वसुमंती ॥६९॥

शिशुपाळ शैब्यात्मज शतधन्वा ॥ रुक्मिया इंद्रद्युम्नादि शाल्वां ॥ भोज गोपती तालकेतु ॥ ऐसिया वीरां मारिलें सर्वी ॥७०॥

क्रोधाक्रोधमनीं धरिसी ॥ ते सर्वथा सिद्धीसि नेसी ॥ उत्पत्तीस्थिती प्रळयावतार ॥ प्रवृत्तिवशें करितोसी ॥७१॥

तुवां बाळपणापासोनी ॥ जीजीं चरित्रें केलीं मेदिनीं ॥ तीं वर्णिताती तिहीं लोकीं ॥ भक्त देव पन्नग मुनी ॥७२॥

यापरि अर्जुनें वानिला ॥ तंव श्रीकृष्ण बोलता जाहला ॥ तूं माझा मी तुझा आत्मा ॥ अन्यथा नाहीं यया बोला ॥७३॥

तुझा द्वेष्टा तो माझा वैरी ॥ तवानुकारी तो ममानुकारी ॥ तुजमज अंतर नाहीं ॥ प्रसिद्ध नरनारायण सर्वत्रीं ॥७४॥

वैशंपायन ह्नणती गा भूपती ॥ हें कृष्ण बोलिला पार्थाप्रती ॥ तंव घृष्टद्युम्नादि रायां देखतां ॥ द्रौपदी कृष्णासि झाली बोलत ॥७५॥

तूं परब्रह्म परात्पर ॥ विराट हिरण्यगर्भ अक्षर ॥ अंतर्बाह्य व्यापक ॥ तुजपासोनि चराचर ॥७६॥

तूं मातापिता सुहज्जन ॥ प्रियबंधु जगज्जी वन ॥ ह्नणोनि तुजप्रती देवा ॥ निवेदितें दुःखशिण ॥७७॥

कौरवीं मज येकवस्त्रेंसी ॥ बोढोनि नेलें सभेसी ॥ वैरी हासिन्नले समग्र ॥ परि मी असें तुझी दासी ॥७८॥

असतां पांडव यादव पांचाळ ॥ मज जाहलें क्लेशबहुळें ॥ तरी धिक् असो सृष्टिआंत ॥ भीमार्जुनाचें बळ ॥७९।

नीतिवाक्यें अशक्तेंही नरें ॥ भार्या रक्षावी सर्वप्रकारें ॥ भार्या रक्षिली असतां ॥ प्रजा रक्षिल्या निर्धारें ॥८०॥

प्रजा रक्षिलिया असतां ॥ आत्मा रक्षिलाचि निरुता ॥ आत्मा जन्मे तियेच्या ठाई ॥ ह्नणोनि जाया बोलिजे कांता ॥८१॥

पांडवांपासोनि कुमर ॥ पांच जाहले मज सुंदर ॥ त्यांच्य रक्षणानिमित्तें तरी ॥ मज रक्षावें निर्धार ॥८२॥

प्रतिविंध्य युधिष्ठिराचा ॥ श्रुतसोम तो भीमाचा ॥ उपजला माझिये कुशी ॥ श्रुतकीर्ति अर्जुनाचा ॥८३॥

शतानीक नकुळनंदन ॥ सहदेवाचा श्रुतसेन ॥ ऐसे महारथी पांच वीर ॥ जाहले पांचांपासोन ॥८४॥

हा भीम अमर बळिवंत ॥ जयाचा विषेंही नव्हे निःपात ॥ लाक्षागृहीं वाचविलें ॥ केला हिडिंबाचा घात ॥८५॥

घटोत्कच जाहला हेडंबीसी ॥ पुढां वधिलें बकासुरासी ॥ मग मी जाहलियें प्राप्त ॥ पराक्रम केला कापडीवेषीं ॥८६॥

या पांडवांचे संगमेळीं ॥ पडलियें दुःखाचे कल्लोळीं ॥ मग गहिंवरोनि रुदन करी ॥ दीर्घघाय मोकलिली ॥८७॥

पति पुत्र बंधु सोयरे कोणी ॥ मज नाहींत अनाथेलागुनी ॥ कर्णोक्ताचे दुःख हरि ॥ ऐसा उपावो नाहीं मेदिनीं ॥८८॥

तंव कृष्ण ह्नणे द्रौपदीये ॥ तूं रुदन न करीम माये ॥ त्या कौरवांचिया कांता ॥ ऐशाच रडतील पाहें ॥८९॥

स्वर्ग पडेल सुकेल समुद्र ॥ कर्पूरें शीतळ होय अंगार ॥ परि मद्वचन अन्यथा नव्हे ॥ तुज जाणवेल निर्धार ॥९०॥

मग धृष्टद्युम्न ह्नणे द्रौपदीतें ॥ मी आणि शिखंडी द्रोणभीष्मातें ॥ भीम दुर्योधना कर्णा पार्थ ॥ वधूं जाण वो निरुतें ॥९१॥

निश्वयें इंद्रादिकां देवां ॥ आह्मी अवध्य जाण सर्वी ॥ कौरवें कायसीं बापुडीं ॥ हा कृतनिश्वयो जाणावा ॥९२॥

श्रीकृष्ण ह्नणे द्रौपदीये ॥ जैं द्यूत मांडिलें धर्मरायें ॥ तैं कार्यासि गेलों होतों ॥ नव्हतों द्वारावतीये ॥९३॥

नातरी कौरवी न बोलावितां ॥ मी येवोनि वारितों द्यूता ॥ भीष्मद्रोणां बैसवुनी ॥ होतों बरवें शिकवित ॥९४॥

पूर्वीलकाळीं राया नळा ॥ द्यूतकर्मेचि विनाश जाहला ॥ आतां कष्टलेति तुह्मी ॥ मज ऐकोनि खेद जाहला ॥९५॥

तंव धर्म ह्नणे कृष्णासी ॥ देवा तूं कोठें गेला होतासी ॥ श्रीकृष्ण ह्नने अवधारीं ॥ मी सांगतों तुजसी ॥९६॥

शिशुपाळ वधिला राजसूययज्ञीं ॥ शाल्व आला तें ऐकोनी ॥ द्वारका वेढिली दळभारीं ॥ वनें मोडिलीं प्रजा मारोनी ॥९७॥

तयासि संग्राम करुनि समरीं ॥ म्यां पाडिला सिंधुतीरीं ॥ यालागीं आलों नाहीं ॥ नव्हतों द्वारकेमाझारी ॥९८॥

शाल्वें वेढिली द्वारावती ॥ तैं मी गेलों होतों तपाप्रती ॥ पुत्रफळ साधावया ॥ प्रसन केला पशुपती ॥९९॥

तेथें नारदें सांगीतलें ॥ मग म्यां जावोनि शत्रु वधिले ॥ ऐसें पुराणांतर मत ॥ कृष्णें धर्मासि सांगीतलें ॥१००॥

परि हें न मिळे भारतीं ॥ कृष्णासि जाहली पुत्रसंतती ॥ त्या उपरी बहुतां दिशीं ॥ केली शाल्वरायाची शांती ॥१॥

आतां धर्म कथा पुसेल ॥ मग श्रीकृष्ण सांगेल ॥ ते ऐकावी अपूर्वता ॥ मधुकरकवी कथील ॥२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ चतुर्थोऽध्यायीं कथियेला ॥ पांडववनवासप्रकारु ॥१०३॥ ॥ श्रीसांबासदाशिवार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP