॥ श्रीगणेशाय नमः ॥
जन्मेजय ह्मणे मुनिनाथ ॥ सांगावी नष्टचर्यकथा ॥ कैसें जाहलें विराटपर्व ॥ तृप्ती नाहीं ऐकतां ॥१॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ भारता ऐकें कथाप्रश्न ॥ नासती ब्रह्महत्यादि दोष ॥ प्रसन्न होय नारायणा ॥२॥
पांडव काम्यकवनीं असतां ॥ जाहलीं द्दादशवर्षें पूर्णता ॥ आलें नष्टचर्य ह्मणोनी ॥ येणें जाहलें अनंता ॥३॥
जाहलीं क्षेमालिंगनें परस्परें ॥ देव पूजिला नानोपचारें ॥ तंव पांडवांप्रति वचन ॥ बोलिलें श्रीसर्वेश्वरें ॥४॥
श्रीकृष्ण ह्मणे युधिष्ठिरा ॥ पूर्ण जाहलीं वर्षें बारा ॥ आतां अद्दश्य राहणें ॥ वर्ष येक अवधारा ॥५॥
जरी ठाउकें पडे कवणास ॥ तरी पुनरपी वर्षें द्वादश ॥ वनवास लागे भोगावा ॥ ऐसी द्युतींची भाष ॥६॥
धर्म ह्मणे जी श्रीपती ॥ तुवां वांचविलें बहुतां रीतीं ॥ आतां नष्टचर्य कोठें क्रमूं ॥ हें सांगावें आह्मांप्रती ॥७॥
देव ह्मणे धर्मासी ॥ तुह्मीं जावें विराटनगरासी ॥ येरु ह्मणे चक्रधरा ॥ तो ओळखतसे आह्मासी ॥८॥
यावरी ह्मणे कृष्णनाथ ॥ तुह्मां मार्गीं भेटेल वैवस्वत ॥ तो रूपें पालटील तुमचीं ॥ मस्तकीं ठेवोनियां हात ॥९॥
नावें टेवील पालटोनी ॥ मग जावें वैराटभुवनीं ॥ आंळवावें गुप्तभाषा ॥ मग देव निघाला तेथुनी ॥१०॥
येरीं ऋषींश्वरां राहविलें ॥ शिरसाष्टांग नमन केलें ॥ आपण द्रौपदीसहित ॥ वैराटमार्गी लागले ॥११॥
देश विदेश सांडिलें ॥ दक्षिणदिशेसी चालिले ॥ उतरलें तपतीतटीं ॥ तंव देवें यमा चेष्टविलें ॥१२॥
तो तापीये तीरीं आला ॥ तेथें पांडवां देखता जाहला ॥ येरीं घातलीं दंडवतें ॥ तेणें अंतक गहिंवरला ॥१३॥
धर्में वनींचें कष्ट कथिलें ॥ ते ऐकोनि यम बोले ॥ मागा कांहीं वरदान ॥ तंव युधिष्ठिरें विनविलें ॥१४॥
ह्मणे आमुचीं रूपें पालटावी ॥ कवणाही ओळखी न पडावी ॥ जंव पुरे नष्टचर्य ॥ तंव इतुकें देयीं स्वभावीं ॥१५॥
देव ह्मणे प्रसन्न जाहलों मी ॥ परि काय मागीतलें तुह्मीं ॥ धर्म ह्मणे हेंचि पुरे ॥ इतुकेंचि द्यावें स्वामी ॥१६॥
आणि पालटावीं नावें ॥ केवीं परस्परीं पाचारावें ॥ येरें हात ठेवितां शिरीं ॥ रूपें पालटलीं स्वभावें ॥१७॥
धर्मासि नांव कंकभट ॥ भीम तो वल्लव सुभट ॥ अर्जुना ठेविलें नांव ॥ बृहन्नळा बृहन्नट ॥१८॥
नकुळासि नांव विजयवंत ॥ सहदेवो तो जयंत ॥ वल्लव सूपकार पांडवांचा ॥ कंकभट पुरोहित ॥१९॥
बृहन्नळा नृत्यकारी ॥ जयंत पांडवांचा खिल्लारी ॥ विजय नामें सहाणी ॥ अश्वहृदयीं शालिहोत्री ॥२०॥
द्रौपदीये नांव सैरंघ्री ॥ सदा पांचाळीतें श्रृंगारीं ॥ हीं नावें ठेवोनि यमधर्म ॥ अदृश्य जाहला तापितीरीं ॥२१॥
मग पांडाव आनंदें निघाले ॥ वैराटनगरीं पातले ॥ जावोनियां सभेमाजी ॥ वैराटासी भेटले ॥२२॥
रावो ह्मणे कोठोनि आले ॥ तंव कंकभटे ह्मणीतलें ॥ कीं हस्तनापुरींचे राजे ॥ पांडव असती आयकिले ॥२३॥
तें राज्य कौरवीं घेतलें ॥ पांडवां इंद्रप्रस्थ दीघलें ॥ तेंही कपटद्युत खेळोनी ॥ दुर्योधनें घेतलें ॥२४॥
आणिक पण केला अवधारा ॥ वनवास करावा वर्षें बारा ॥ तेरावें नष्टचर्य वोडविलें ॥ तेहीं हारी आली युधिष्ठिरा ॥२५॥
द्रौपदी सभेसि आणिली ॥ तयेचीं वस्त्रें हरिलीं ॥ तियेनें चिंतितां नारायण ॥ देवें वस्त्रें पुरविलीं ॥२६॥
शेवटीं पीतांबर नेसविला ॥ तो भीष्मद्रोणें देखिला ॥ तेव्हां कोपोनि दोघांजणीं ॥ दुर्योधन वारिला ॥२७॥
मग द्रोपदी सोडली ॥ तंव ते गांधारा बोलिली ॥ तुवां कपटद्यूत खेळोनियां ॥ धर्मा हारी आणिली ॥२८॥
दुर्योधन ह्मणे तियेसी ॥ तरी ये पां खेळ मजसी ॥ येरी ओडवोनि आपणासहित ॥ सोडविलें पांडवांसी ॥२९॥
तंव शकुनियें वारिलें ॥ फांसे हिरोनि घेतले ॥ मी न खेळें ह्मणें दुर्योधन ॥ जरी वनवासा वहिले ॥३०॥
येर निघाले तत्क्षणीं ॥ द्रौंपदीसहित काम्यकवनीं ॥ आह्मीं साहीजणे निघालों सवें ॥ त्यांचे नित्यसेवक ह्मणोनी ॥३१॥
मी कंकभट पुरोहित ॥ हा बल्लव अन्न रांधित ॥ बृहन्नळा बृहन्नट ॥ संगीतसाहित्यें रिझवित ॥३२॥
आणि हा जयंत खिल्लारी ॥ सुचिळ दुग्धादि करी ॥ हा विजयो नामें सहाणी ॥ सैरंघ्रीं पांचाळीसि श्रृंगारी ॥३३॥
ऐसीं आलों असतां वनीं ॥ दुर्योधनें पाठविला दुर्वासमुनी ॥ तया साठखंडींचें भोजन ॥ तेंहीं दीधलें चक्रपाणीं ॥३४॥
उपरीं हराया द्रौपदीतें ॥ पाठविलें जयद्रथातें ॥ तेणें रथीं वाहोनि पांचाळी ॥ चारीक्षोणी दळ सांगातें ॥३५॥
तैं भीमार्जुन धाविन्नले ॥ सैन्य अवघेंचि मारिलें ॥ सोडवोनि पांचाळीसी ॥ जयद्रथा विटंबिलें ॥३६॥
तेणें द्वेषें दुर्योधन आला ॥ तो चित्रांगदें धरोनि नेला ॥ मग पार्थें करोनि धांवणें ॥ गांधारराजा सोडविला ॥३७॥
ऐसें द्दादशवरुर्षेवरी ॥ पांडव कष्टले वनांतरीं ॥ तंव आलें नष्टचर्य ॥ मग आह्मांसि ह्मणती उत्तरीं ॥३८॥
आह्मी अदृश्य असों साही ॥ दृष्ट कवणा न हों कहीं ॥ तुह्मीं न यावें आह्मांसवें ॥ जावें वैराटपुरीं लवलाहीं ॥३९॥
आमुचा सकळही वृत्तांत ॥ विराटासि करावा श्रुत ॥ अवघी पुरलिया नष्टचर्याची ॥ भेटाया येऊं त्वरित ॥४०॥
ऐसा ऐकोनि वृत्तांत ॥ विराट संतोषला बहुत ॥ ह्मणे पांडवाचेनि बळें ॥ मी येथ असें राज्य करित ॥४१॥
त्यांहीं तुह्मासिं पाठविलें ॥ आजि भाग्य माझें उदेलें ॥ माझे व्यापार चालवा तुह्मी ॥ जेवीं पांडवाचे चालविले ॥४२॥
मग बैसवोनि आसनावरी ॥ कंक पूजिलो षोडशोपचारीं ॥ राखिला आपणेया जवळी ॥ देत पुरोहितत्व निरंतरीं ॥४३॥
येरां चौघाचे व्यापार सांगीतले देवोनि अलंकार ॥ सैरंघ्रीं सुदेष्णे निरविली ॥ देत कुशलत्वें श्रृंगार ॥४४॥
कीं हें द्रौपदीची सेवा करी ॥ इये मानावी बरवियापरी ॥ ऐसे राहिले गुप्त देखा ॥ राया मच्छाचिये नगरीं ॥४५॥
मंदीर देलें साहीजणासी ॥ तेथोनि ओळंगती रायासी ॥ तंव कोणे एके अवसरीं ॥ येक उठीन्नली विवशी ॥४६॥
सुदेष्णेराज्ञीचा बंधु ॥ कीचक नामें महा जोधु ॥ नवनागसहस्त्रबळी ॥ तैसेचि तयाचे शतबंधु ॥४७॥
कीचक ज्येष्ठ सुदेष्णेचा ॥ राजगृहीं आवार त्याचा ॥ तो सहजें बैसलासे बाहेरी ॥ जाणों पुतळा मदनाचा ॥४८॥
तेणें सैरंध्री येतां देखिली ॥ येरी देखतांचि मुरडली ॥ परि कीचकाची कामदृष्टी ॥ जाणों भेदनियां गेली ॥४९॥
कींचकें अभिलाष धरिला ॥ मदनें अधिकाधिक जाकळिला ॥ मग मनींचा कामभावो ॥ जावोनि बहिणीसि कथिल ॥५०॥
ह्मणे हे कोण येतसे मंदिरीं ॥ येरी ह्मणे द्रौपदीची सैरंध्री ॥ तंव तो ह्मणे वो भगिनीये ॥ इयें मज भेदिलें कामशरीं ॥५१॥
तरी हे अनुसर देईल मज ॥ ऐसें करीं वो काज ॥ ह्मणोनि चरणीं लागला ॥ ह्मणे पुरवीं मदनाचें भोज ॥५२॥
ऐकोनि सुदोष्णें ह्मणितलें ॥ निश्चयें करीन गा बोलिलें ॥ मग पाठवोनि परिचारिका ॥ सैरंध्रीसि बोलविलें ॥५३॥
कीचक गेला उठोनी ॥ मग ते बोलाविली कामिनी ॥ ह्मणे गे देशोदेशीं हिंडतेसी ॥ कैसी भ्रतारावांचोनी ॥५४॥
संभोगेंविण वृथा संसार ॥ तरी तुज मेळवूं भ्रतार ॥ सौदर्याचा पुतळा ॥ कींचक माझा सहोदर ॥५५॥
अष्टही भोग भोगिसी ॥ पांचशतें तुझियां दासी ॥ होसील राज्याची स्वामिणी ॥ तंव येरी ह्मणे तियेसी ॥५६॥
कीं तूं हिताची स्वामिणी ॥ बरवें बोलिलीसि भामिनी ॥ परि पांच गंधर्वपति माझे ॥ अदृश्य विचरती गगनीं ॥५७॥
ते महाबळी क्षात्रवृत्ती ॥ त्याहीं मारिलें न जाणें किती ॥ हें ऐकें खेवीं सुदेष्णे ॥ कीचकातें मारोनि जाती ॥५८॥
ऐसें न बोलें आजिहुनी ॥ येरी उगीच खोंचली मनीं ॥ मग निघाली सैरंघ्री देखा ॥ तिये श्रृंगार देवोनी ॥५९॥
तंव कींचकें येवोनि पुसिलें ॥ येरीनें सर्व वृत्त कथिलें ॥ मग हांसोनि ह्मणे भागिनीये ॥ वृथा आह्मां भिवविलें ॥६०॥
मजसीं रणीं मेळवी हात ॥ ऐसा नाहीं सृष्टिआंत ॥ हे सैरंध्रीयें रळी केली ॥ मग चालिला विचारित ॥६१॥
ह्मणे जाणवेल अवघें आतां ॥ कवण बळिया तिये रक्षिता ॥ आतां बलात्कारें भोगीन ॥ तया गंधर्वाची कांता ॥६२॥
ह्मणोनि बैसला चित्रशाळेंत ॥ येरा दिवशींच निवांत ॥ येतां देखिली सैरंघ्री ॥ मग पदरा घातला हात ॥६३॥
येरीनें मध्येंचि सांडिला चिरोनी ॥ निघाली आक्रंदत तत्क्षणीं ॥ पातली सभे माझरी ॥ मत्स्य बैसलासे सिंहासनीं ॥६४॥
जवळी कंकभट असे ॥ तंव रावो तियेसि पुसे ॥ येरीनें सांगतां वृत्तांत ॥ अवघे दाटले आवेशें ॥६५॥
आपण पांडवांचे विश्वासी ॥ ह्मणोनि त्याहीं पाठविलें यांसी ॥ इये दुःख देतां वदन ॥ कैसें दावावें जनासी ॥६६॥
राव ह्मणे अहो बाइये ॥ जाई स्वमंदिरीं सैरंध्रीये ॥ आह्मीं शिकवितों तयासी ॥ तो तुझिये वाटे न जाये ॥६७॥
ऐसें मनोहर केलें ॥ मग सभेतें विसर्जिलें ॥ येरींनें नाट्यशाळे जाउनी ॥ आक्रोशें रुदन मांडिलें ॥६८॥
ह्मणे मरमररे धनुर्धरा ॥ तंव येरू ह्मणे न करीं त्वरा ॥ प्रकट होतां नये आपणा ॥ परि पुसता युधिष्ठिरा ॥६९॥
तो ह्मणेल तेंचि करूं ॥ परि द्रौपदीये नये धीरू ॥ गेली आक्रंदत भानवसां ॥ तंव पुसतसे वृकोदरू ॥७०॥
येरीनें कथिली व्यवस्था ॥ तिये तो जाहला बुझाविता ॥ तुज जेणें लाविला हात ॥ तया वधीन न करीं चिंता ॥७१॥
तुवां अनुसर द्यावा तयासी ॥ ह्मणावें अदृष्य येईन तुजपाशी ॥ नेम करी नाट्यशाळे ॥ मग मी मारीन निश्वयेंसीं ॥७२॥
प्रकट करितां नये मार ॥ ह्मणोनि गुप्त करूं संहार ॥ येरी संतोषीनि निघाली ॥ द्यावया सुदेष्णे श्रृंगार ॥७३॥
तंव कीचक चित्रशाळेसी ॥ बैसला असे आवेशीं ॥ येरीनें देखोनि हास्य केलें ॥ मग बोलिली तयासि ॥७४॥
ह्मणे परस्त्रियेसि अवधारी ॥ संग नघडे बलात्कारीं ॥ परि तुमचें आर्त पूर्ण करूं ॥ नाट्यशाळेसि अंधारी ॥७५॥
ऐसें सांगोनि निघाली ॥ श्रुंगार देवोनि भीमापें गेलीं ॥ ह्मणे अनुसर दीधला तया ॥ मग सर्वस्थिती सांगीतली ॥७६॥
असो येरीकडे कीचक ॥ सांगे सुदेष्णेसि हरिख ॥ आजि आद्यापि अस्तमाना ॥ कां पां नववोचि अर्क ॥७७॥
करुनि मर्दना मादनें ॥ केलीं परिमळ चर्चनें ॥ जवादी भरोनि श्रवणीं ॥ लेइला नानाभूषणें ॥७८॥
दिवस जातां अस्तमाना ॥ त्वरें केली आरोगणा ॥ उचट चित्ता बहुत जाहला ॥ गेला नाट्यशाळे तत्क्षणा ॥७९॥
बृहन्नटासि गर्वें ह्मणे ॥ आजि तुह्मीं अन्यत्र जाणें ॥ आह्मां येथें करणें निद्रा ॥ येरु निघाला तत्क्षणें ॥८०॥
लागोनि सेवकांच्या श्रवणीं ॥ मंचक घालविला आणोनी ॥ हडपी विस्तारी परिमळविडे ॥ मग सेवकां दिली पाठवणी ॥८१॥
रात्र जाहली येक प्रहर ॥ ह्मणे कां पां लाविला उशीर ॥ कवण जाणे येईल कीं नये ॥ मदनें व्यापिलासे थोर ॥८२॥
मनीं लागली चुटपुटी ॥ वेळोवेळां बैसी उठी ॥ आंगणीं जावोनि डावा उजवा ॥ मार्ग निहाळीत दृष्टीं ॥८३॥
त्रिखंडें बैसलीं माथां ॥ बरळ बोले भ्रमचित्ता ॥ तंव भीम नटोनि स्रीवेषें ॥ आला सैरंघ्रीस्वरूपता ॥८४॥
निघाला धर्मासि पुसोनी ॥ काळरूपी अर्धरजनी ॥ गेला नाट्यशाळेप्रती ॥ तंव तें जाणवलें चक्रपाणी ॥८५॥
ह्माणोनि प्रेरिली मोहनशक्ती ॥ नगर व्यापिलें सुषुप्तीं ॥ विराटपुरीं ॥ कवण काहीं ॥ नायकेसें करीं श्रीपती ॥८६॥
भीम प्रवेशतां शाळेंत ॥ मंचक देखिला अवस्थाभूत ॥ हें कीचका जाणवतां ॥ सांवरोनि पुसे वृत्तांत ॥८७॥
ह्मणे सैरंघ्री भलें केलें ॥ ऐके परि भीम न बोले ॥ मग ह्मणे कां पां रुसलीस ॥ ह्मणोनि पालवीं धरियेलें ॥८८॥
ओढोनि आणिली आपणाजवळी ॥ ह्मणे न बोलसी कां मांडिली रळी ॥ मग हात घालितां उरावरी ॥ निबर लागला करकमळीं ॥८९॥
ह्मणे उरीं काठिण्य थोर ॥ तरी हा निश्चये होय नर ॥ तंव राहें राहें ह्मणें भीम ॥ भ्रलारे कुकर्मिया चोर ॥९०॥
अरे परावियाची नारी ॥ जेव्हां तुं धरिलीस पदरीं ॥ तेव्हांचि तुं मरणा योग्य ॥ ह्मणोनि धरिला झडकरी ॥९१॥
तंव कीचक ह्मणे रे वीरा ॥ तूं असोनि रणशुरा ॥ मज अवचितें धरिलें केशीं ॥ तरी सोडोनि राहें सामोरा ॥९२॥
येरें करींचा सोडोनि दिला ॥ मग शाळेबाहेर आणिला ॥ मी गंधर्व ह्मणोनि सारिलें नांव ॥ आणि मल्लयुद्धा प्रवर्तला ॥९३॥
नानाविंदानें कळाकुसरी ॥ दोघे भिडती मुष्टिकोंपरीं ॥ दोघे नवनागसहस्त्रबळ ॥ घाई कांपली धरित्री ॥९४॥
घरोघरींच्या उतरडिया ॥ गडबडोनि पडलिया ॥ ऐकतां बोलती निद्रिस्थ जन ॥ परि न पाहवे उठोनियां ॥९५॥
ह्मणती काय अवचितें गडबडलें ॥ कोठें कांहीं तरी वर्तलें ॥ उपरिया माड्या मंदिरें ॥ हालती डोलती ऐसें जाहलें ॥९६॥
संग्रामाचा निर्घात होत ॥ न्याहो उठती आकाशांत ॥ असो हे सांगतां झुंजवार्ता विस्तार पावेल ग्रंथ ॥९७॥
असो कीचकें तया वेळा ॥ भीम आणिला भूमितळा ॥ मुष्टिघात हाणाया योजी ॥ तंव भीमें केली कळा ॥९८॥
तळवां हाणितला तळोनी ॥ चांचरी पाडिला उलंडोनी ॥ उभा ठेला भीमसेन ॥ माराया राहिला संसरोनी ॥९९॥
कीचक मागुता मुष्टिघातें ॥ हृदयीं हाणिला वायुसुतें ॥ पासोळिया चूर्ण जाहल्या ॥ मुखीं सांडी अशुद्धातें ॥१००॥
तैसाचि मागुता जंव हाणे ॥ तंव येरू गेला प्राणें ॥ निश्चेत पडिला भूमीवरी ॥ जाणों गिरिकुट प्रमाणे ॥१॥
भीमें चरणीं घरोनि उचलिला ॥ नगराबाहेर घेवोनि गेला ॥ मग गरगरां फिरवुनी ॥ भूमीवरी आपटिला ॥२॥
गडगडलें भुमंडळ ॥ अष्टदिशांसी खळबळ ॥ असो कीचका वधूनि भीम ॥ आला स्वमंदिरीं तत्काळ ॥३॥
मग द्रौपदीय ह्मणे ॥ वधिलें कीचका कारणें ॥ येरी ह्मणे उगले असा ॥ कोणीं मारिला कोण जाणें ॥४॥
यावरी भीम भानवसां गेला ॥ तंव नगरजन सावध जाहला ॥ शक्ति आकर्षी चक्रपाणी ॥ एकीं वृत्तांत एका पुसिला ॥५॥
ह्मणती गडबडाट नगरीं ॥ येवढा झाला कवणेपरी ॥ एकीं जाणविलें विराटा ॥ येरू दळवैय्यातें पाचारी ॥६॥
ह्मणे हे शीघ्र करा निर्गती ॥ येरु निघाला त्वरितगती ॥ दिवेयाचेनि उजेडं ॥ गेले नाट्यशाळेप्रती ॥७॥
तेथें चहुंकडे पाहती ॥ तंव रुधिर वमलें पाहती ॥ मग पहात गेले बाहेरी ॥ नगरा पूर्वदिशेप्रती ॥८॥
तेथें प्रेत पडिलें देखिलें ॥ धांवोनि रायासि जाणविलें ॥ जी कवणें वधिला कीचक ॥ ऐकोनि अवघे चाकाटले ॥९॥
नगरीं जाहला कोल्हाळ ॥ सुदेष्णा विराट भूपाळ ॥ बुडालीं करुणासमुद्रीं ॥ दुःखें फुटों पाहे भूगोळ ॥ ११०॥
कंकभट धांवत आला ॥ ह्मणे कोणी रे मारिला ॥ तंव सुदेष्णा ह्मणे क्रोधें ॥ प्रसाद सैरंध्रीचा झाला ॥११॥
मग सांगे पूर्ववृत्तांत ॥ लोक आयकती समस्त ॥ ह्मणती पुसावी सैरंध्रीये ॥ कवणें केला हा घात ॥१२॥
तंव सेवक धाविन्नले ॥ दिवटे येकशत चालिले ॥ गिंवसोनि आणिले सैरंघ्रीं ॥ बल्लवें सवेंचि बिजें केलें ॥१३॥
तयेसि राव पुसे वृत्तांत ॥ कीं हा कोणीं केला अनर्थ येरी सांगे मूळापासोनी ॥ कीं जैं पालवीं घातला हात ॥१४॥
तेव्हांचि गंधवीं देखिलें ॥ आणि म्यां तुह्मां सांगीतलें ॥ परि वाराचिना ययासी ॥ तेणें मागुतें मज आळविलें ॥१५॥
म्या नाटकशाळे दीधली खुण ॥ परि गंधर्व आले पांचजण ॥ ते वधूनि गेले ययासी ॥ म्यां केली आपुली सोडवण ॥१६॥
ऐसा द्रौपदी कथी वृत्तांत ॥ तंव उगवला दिननाथ ॥ ह्मणती कीचकाचे बंधु ॥ इये निमित्तें हा झाला घात ॥१७॥
आतां हिचाचि घेऊं प्राण ॥ पाहूं बळिया राखेल कवण ॥ मग धरोनि पदरेंसीं ॥ चालिले स्मशानीं घेवोन ॥१८॥
येक ह्मणती सरणावरी ॥ सती दवडूं हे सैरंघ्री ॥ एक शत बंधु कीचकाचे ॥ तेही कीचकनामें दुराचारी ॥१९॥
तंव सुदेष्णेसि ह्मणे सैरंध्री ॥ तूं आपुले बंधुवां निवारीं ॥ नातरी जे परी झाली कीचका ॥ तेचि यां होईल निर्धारीं ॥१२०॥
अहो जन हो सांगतें तुह्मं ॥ येथोनि बोल नाहीं आह्मां ॥ आतां गंधर्व येवोनि येथें ॥ कीचकां वंधितील अधमां ॥२१॥
जे अभिलाषिती परनारी ॥ कीं गांजितां भलतियापरी ॥ ते नाश पावती पापात्मे ॥ तयां ठाव नेदी धरित्री ॥२२॥
ते संग्रामीं जय नपवती ॥ असंस्थात निरय भोगिती ॥ परि येरीं चालविली बळें ॥ कोणी ह्मणितलें नायकिती ॥२३॥
नगरवासी सकळ लोक ॥ पाहों चालिलें कौतुक ॥ तंव अशरीरिणी जाहली वाचा ॥ ते ऐकती सकळिक ॥२४॥
इये सैरंध्री सवें जाती ॥ ते गंधर्वीं मारिजेती ॥ हें ऐकतां मुरडले लोक ॥ येरीं चालविली सैरंध्रीं सती ॥२५॥
विराट जाहला भयभीत ॥ युधिष्ठिर चिंताग्रस्त ॥ मग खुणाविलें वृकोदरा ॥ येरू निघाला त्वरित ॥२६॥
जंव द्रौपदीये बांधीत होते ॥ तंव वृक्ष उन्माळिला वायुसुतें ॥ मग धांवोनि सत्राणें ॥ झोडीत सुटला कीचकांतें ॥२७॥
थोर आकांत वर्तला ॥ हांणती गंधर्व आलारे आला ॥ येरें सोडवोनि द्रौपदीतें ॥ सकळांचा निःपात केला ॥२८॥
पावकें प्रज्वाळिला दहनीं ॥ अवघे घातले उचलोनी ॥ अनामिकें होतीं तेथें ॥ तीं सोडिलीं जिव्हा पिळोनी ॥२९॥
तीं सांगों आलीं धांवतें ॥ खुणा दाविती वैराटातें ॥ जिव्हा पिळिन्नल्या ह्मणती ॥ तें न कळेचि कवणातें ॥१३०॥
तंव बल्लव तेथ आला ॥ तो समस्तां सांगता जाला ॥ कीं गंधर्वे मारिले कीचक ॥ नगरीं कोल्हाळ वर्तला ॥३१॥
कीचक गंधर्वे मारिले ॥ ऐसें सकळजन बोले ॥ असो मग भीमें स्वमंदिरीं ॥ द्रौपदीलागीं पोंचविलें ॥३२॥
भारता हें गुप्तचरित्र ॥ वर्तलें वैराटीं विचित्र ॥ तें आश्चर्य देशोदेशीं ॥ विदित जाहलें सर्वत्र ॥३३॥
तंव हस्तनापुरीं गांधाराप्रती ॥ बोले शकुनिया दुष्टमती ॥ कीं नष्टचर्य संपलिया ॥ पांडव आपुले राज्य घेती ॥३४॥
ते जरी पडतील ठाउके ॥ तरी बारावरुषें आणिकें ॥ वनवास भोगणें पाडवां ॥ ऐसा धर्म गुंतला भाके ॥३५॥
हें ऐकोनि दुर्योधन ह्मणे ॥ हेर शोधार्थ पाठविणें ॥ मग दूत बोलावोनि ॥ घाडिले शुद्धीकारणें ॥३६॥
नवखंड पृथ्वीआंत ॥ देशोदेशीं फिरती दूत ॥ एक आले दक्षिणदेशीं ॥ खुणा पाहतातीं गुप्त ॥३७॥
जेथ असती पंडुकुमर ॥ तेथें सदाफळ तरुवर ॥ नवनागसहस्त्रबळी ॥ भीमाचा दिसे पुरुषाचार ॥३८॥
तीं वैराटाच्या नगरीं ॥ चिन्हें ओळखिलीं हेरीं ॥ वधिले कीचक महाबळी ॥ आणि फळभार तरुवरीं ॥३९॥
दूत पुसती जनांसी ॥ लोक गुप्त सांगती तयांसी ॥ कीं गंधर्वी सैरंध्रीकारणें ॥ वधिलें सर्वअ कीचकांसी ॥१४०॥
सैरंध्री सर्वें पांचजण ॥ असती पांडवसेवक ह्मणोन ॥ तयांचे नामव्यापार ॥ दूतां सांगितले संपूर्ण ॥४१॥
तें ऐकोनिया हेर ॥ हस्तनापुरा गेले शीघ्र ॥ सांगीतलें दुर्योधना ॥ आदिअवसान समग्र ॥४२॥
जीजी वैराटीं पांचजण असती ॥ सवें सैरंघ्री नामें युवती ॥ तिये निमित्तें मेले कीचक ॥ परि पाहतां कवणा नोळखती ॥४३॥
सैरंघ्रीचे गंधर्व भ्रतार ॥ ह्मणती पांडवांचे किंकर ॥ तेथ वृक्ष असती सदाफळ ॥ सांगितला नामव्यापार ॥४४॥
यावरी बोले दुर्योधन ॥ काहीं भासतें अनुमान ॥ तरी जीमूत पाठवितां तेथें ॥ येईल ठाउकें करोन ॥४५॥
तें मानलें समस्तासी ॥ मग बाहिलें जीमूतीसी ॥ येरू येवोनि शीघ्र सभें ॥ जोहारिलें रायासी ॥४६॥
तया ह्मणितलें दुर्योधनें ॥ तुह्मीं विराटनगरीं जाणें ॥ पांडव घालोनि तोडरीं ॥ ब्रीदावळी दाखविणें ॥४७॥
तेथ जरी असेल भीम ॥ तरी तेणेंसीं कीजे संग्राम ॥ कीर ह्मणावें अडलिया ॥ मी हरीन तुमचा श्रम ॥४८॥
कीं भीमाअंगीं थोर बळ ॥ तया आह्मीं न पुरों सकळ ॥ यास्तव ठायीं घालावें पांडवां ॥ थोर असे अग्रफळ ॥४९॥
प्रकट जालिया मागुते ॥ वनवास भोगितील निरुतें ॥ हे कार्यसिद्धी करीं जा गा ॥ मग वस्त्रालंकार दिले त्यातें ॥१५०॥
सवें दहासहस्त्र जेठी ॥ शीघ्र निघाला वैराटीं ॥ तोडरीं घालोनि पांडवां ॥ पुतळे ब्रीदावळी मोठी ॥५१॥
जावोनि भेटले वैराटासी ॥ येरें पुसिलें बाहुलीं कायसीं ॥ तंव तो ह्मणे हे पांडव ॥ घातले असती तोडरासी ॥५२॥
उगाचि राहिला वैराट ॥ परि बोलिला कंकभट ॥ अरे जोंवरी न देखा पांडवा ॥ तोंचि करणें गजबजाट ॥५३॥
पांडव नष्टनर्यें असती ॥ ह्मणोनि संधी पाहिली निरुती ॥ पाठीं अभिमान मिरवणें ॥ हे अधमता निंद्यवृत्ती ॥५४॥
जरी असता वृकोदर ॥ तरी तोडिता तोडर ॥ तंव जीमूत ह्मणे भटो ॥ तुह्मां कां सुटला चुरचुर ॥५५॥
वैराट ह्मणे जीमूतातें ॥ आजि कीचक नाहीं येथें ॥ येरव्हीं इतुकें बोलणें नलगे ॥ केविं येणें तुह्मां होतें ॥५६॥
तंव कंक ह्मणे मत्स्यासी ॥ येथें बोलावा बल्लवासी ॥ तोचि तोडील तोडर ॥ मग रायें धाडिलें दूतांसी ॥५७॥
तो महानसीं जावोनी ॥ ह्मणे बल्लवालागोनी ॥ कीं जीमूतमल्ल आला असे ॥ चला बाहिलें रायानीं ॥५८॥
पांडव घातले तोडरीं ॥ ते सोडवावे समरीं ॥ येरें बोलाविले भानंवसी ॥ मुसळलाटणियांचे करीं ॥५९॥
पाटे वरवंटे आणि जांतीं ॥ पळ्या काथवटी सुपें हातीं ॥ ऐसीं हतियारें पर्जित ॥ सर्व आले सभेप्रती ॥१६०॥
मत्स्यरावो जोहारिला ॥ तंव विराट बोलिला ॥ कीं बल्लवा सोडवीं पांडवां ॥ जीमूत ब्रीदें असे आला ॥६१॥
बल्लव ह्मणे रायासी ॥ आह्मी रांधूं कांडूं महानसीं ॥ कणीक कुटावी शिळेवरी ॥ ते केवीं झुंजों मल्लासीं ॥६२॥
परि धर्में तों डींचियें घाशीं ॥ सदा पोशिलें आह्मासीं ॥ येणें तो घातला तोडरीं ॥ तरी सोडवीन सायासीं ॥६३॥
मग धांवला वृकोदर ॥ ह्मणे रे सांडीं बडिवार ॥ मी धर्माचा भानवंसी ॥ ह्मणोनि तोडितों तोडर ॥६४॥
जीमूत ह्मणे आवेशीं ॥ कांरे वायां कुरकुरसी ॥ जाई भानवसीं पळोनियां ॥ तूं माझिया बळा न पुरसी ॥६५॥
बल्लव ह्मणे रे जीमुती ॥ तुं व्यर्थ बडबडसी किती ॥ संग्राम करितां आपसयां ॥ जाणवेल तुझी शक्ती ॥६६॥
येरू ह्मणे साहें साहें ॥ मल्लयुद्धीं उभा राहें ॥ कळाविकळा संग्राम करीं ॥ प्रतिज्ञा बोल लवलाहें ॥६७॥
यावरी भीमसेन ह्मणे ॥ मीरे कळाविकळा नेणें ॥ कुटीन कणकेचिये परि ॥ मग नेटला ससरणे ॥६८॥
करीं धरोनि आसुडिला ॥ येरु चांचरी जातां राहिला ॥ चिकोटी पडली मनगटीं ॥ सरसटां हात ओढिला ॥६९॥
तडवां तडवीम भीडती ॥ मुष्टिघातें हाणिताती ॥ केशकवळीं कोपरघाई ॥ धडकीं थरारिली क्षिती ॥१७०॥
वर्मी हाणिती परस्परें ॥ श्र्वासोश्वास टाकिती वक्रें ॥ दोघे नवनागसहस्त्रबळी ॥ युद्ध जाहलें अतिनिकुरें ॥७१॥
तंव जीमुत ह्मणे बल्लवा ॥। नावेक घेवों गा विसावा ॥ येरू ह्मणे नकळे मज ॥ तिसावा कीं चाळीसावा ॥७२॥
आह्मां येक घाई मुसळांची ॥ कांडितां गति नाहीं विसाव्याची ॥ ह्माणोनि हाणिला पापराशी ॥ तंव गती खुंटली तयाची ॥७३॥
मागुतीही जीमुतीसी ॥ बल्लव हाणी आडकुशीं ॥ ह्माणे पैज सिद्धी नेवों आतां ॥ आपटेनियां भूमीसी ॥७४॥
ह्मणोनि चरणासी धरिला ॥ वेगें गरगरां फिरविला ॥ मग येरां मल्लांप्रती ॥ वृकोदर बोलिला ॥७५॥
अरे हा आपटीन भूमीवरी ॥ तरी तुमची होईल चुरी ॥ परते सरा नाबेक ॥ येर पळाले झडकरी ॥७६॥
येक विनविती बल्लवा ॥ जी हा जीमूत जिवें राखावा ॥ कीरं ह्मणतसों आह्मी ॥ येरू फिरवी लवलवां ॥७७॥
मग वाजेचि भूमीवरी ॥ जीमूता ठेवी झडकरी ॥ तंव निघोनि गेला प्राण ॥ निश्चेतन देखिला समग्रीं ॥७८॥
सकळीं हालवोनि पाहिला ॥ तंव तो गतप्राण जाला ॥ कोल्हाळ केला येरमल्लीं ॥ भीम विजय्रातें पावला ॥७९॥
जीमुत वधिला देखोनी ॥ येर मल्ल गेले तेथुनी ॥ मग बल्लव मत्स्यरायें ॥ सन्मानिला आलिंगोनी ॥१८०॥
दीधले वस्त्रालंकार ॥ ह्मणे लाज राखिली थोर ॥ बाप माझ्या रे बल्लवा ॥ नकळे तुझा बळपार ॥८१॥
ऐसा जीमूत मल्ल वधिला ॥ नगरीं आनंद जाहला ॥ भेटलें चौघेही बंधु ॥ द्रौपदी ओंवाळी ते वेळां ॥८२॥
नगरीं गुढियां तोरणें ॥ जाहलीं मंगळ वाधावणें ॥ यानंतरें अपूर्व कथा ॥ आइकावी सावधानें ॥८३॥
आतां उत्तरे आणि दक्षिणे ॥ गांधार वळवील गोधनें ॥ ते विराटपर्वींची कथा ॥ कविमधुकरा असे कथणें ॥८४॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरू ॥ दशमाऽध्यायीं कथियेला ॥ पांडवगुप्तप्रचारू ॥१८५॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥