कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनि ह्नणे राया अवधारीं ॥ कौरव गेलिया हस्तनापुरी ॥ दुर्योधन विचार करी ॥ सभेमाजी ॥१॥

ह्नणे भीष्मद्रोणादिकर्णा ॥ उच्चाट सुटला माझिये मना ॥ मयसभेंत थोर अवज्ञा ॥ जाहली माझी ॥२॥

हासिन्नलीं भीमपांचाळी ॥ ते हदयीं बैसली काजळी ॥ सर्व अंगें तप्त जाहलीं ॥ तेणें दुःखें ॥३॥

मग भीष्मादिक ह्नणती ॥ तुवां खेद न करावा चित्तीं ॥ सहज विनोदाची खंतीं ॥ कायसी राया ॥४॥

द्रौपदी तुमची जेविं सून ॥ बंधु होय भीमसेन ॥ कायसा हंशाचा अपमान ॥ गोत्रद्रोही न होइजे ॥५॥

धृतराष्ट्र गांधारी बोलिलीं ॥ कीं पांडवें लेंकुरें आपुली ॥ कां पां विनोदाची धरिली ॥ खंती पुत्रा ॥६॥

तरी जो करी गोत्रकळी ॥ तया वास नरकस्थळीं ॥ ऐसी शास्त्रपुराणीं बोली ॥ जगप्रसिद्ध ॥७॥

यापरी नानाउपपत्तीं ॥ अवघे सभासद शिकविती ॥ विदुर ह्नणे वृथा चित्तीं ॥ न धरीं खेद ॥८॥

परि तें न मानी दुर्योधन ॥ रागें उठिला तेथून ॥ मंदिराआंत जावोन ॥ पाचारिला शकुनीया ॥९॥

ह्नणे मामा अवधारिजे ॥ ऐसिया अपमाना काय कीजे ॥ तें विचारुनि सांगिजे ॥ मजकारणें ॥१०॥

तंव शकुनीमामा ह्नणे ॥ तयांसि वैर चालविणें ॥ राज्यावेगळें करणें ॥ हिरोनि घेणें अवघेंही ॥ ॥११॥

गांधार ह्नणे हे सत्यवाणी ॥ परि ते झुंजतां नागवती रणीं ॥ तयां साहकारी चक्रपाणी ॥ तों जय देईल सर्वथा ॥१२॥

पाहें पां इंद्रप्रस्थ तें केतुलें ॥ ओसखेडें तया दीधलें ॥ त्यांहीं तें सायासीं बसविलें ॥ जाणों दुसरें हस्तनापुर ॥१३॥

संग्रहीं नसतां द्रव्य कांहीं ॥ राजे जिंकोनि आणिले पाहीं ॥ दिगविजय करुनि त्यांही ॥ केला राजसूययज्ञ ॥१४॥

म्यां द्रव्य वेंचिलें कोट्यानकोटी ॥ परि न पडेचि कांहीं तुटी ॥ थोर करविली लुटालुटी ॥ परि न सरती द्रव्यराशी ॥१५॥

ते कवणेपरी नागविती ॥ हें तंव नकळे माझें चित्तीं ॥ तंव शकुनि ह्नणे पुढती ॥ ऐक राया विचार ॥१६॥

मी कपटद्यूत पूर्ण जाणें ॥ ह्नणोनि तुवां तें मांडणें ॥ तेणें पांडवांसी जिंकणें ॥ बोलवोनि सभेंत ॥१७॥

ऐसा ऐकोनि विचार ॥ आनंदें उल्हासला गांधार ॥ केला मामेया नमस्कार ॥ ह्नणे बापरे शकुनीया ॥१८॥

तुझेनि विचारें सकळही ॥ मज करणीय असे पाहीं ॥ तुझिये आज्ञेवीण काहीं ॥ न स्वीकारीं जीवन ॥१९॥

मग वस्त्रालंकार देवोनी ॥ मामेयाचा हात धरोनी ॥ बाहेर आला तत्क्षणी ॥ उभविली राजसभा ॥२०॥

तैं दुःशासना बोलाविला ॥ तया इंद्रप्रस्थीं पाठविला ॥ तो घेवोनियां आला ॥ पांडवांसी ॥२१॥

प्रेमालिंगनें जाहलीं ॥ धर्मा रहावया मंदिरें दीधलीं ॥ सोयरी धायरीं आणविलीं ॥ पाठवोनि मूळ ॥२२॥

बोलावोनि रायराणे ॥ सभे बैसविले आदरमानें ॥ तयां पूजिलें दुर्योधनें ॥ षोडशोपचारीं ॥२३॥

द्रव्यें वेंचिलीं याचकां ॥ वस्त्रालंकार दीधले देखा ॥ संतोषविलें सकळिकां ॥ नानापदार्थ देवोनी ॥२४॥

टिळेतांबूल जाहले ॥ नानासुगंध चर्चिले ॥ वस्त्रालंकार वाहिले ॥ धर्मादिका ॥२५॥

अमोलिक चीरें भूषणें ॥ द्रौपदीये दिलीं दुर्योधनें ॥ मग पाठविले रायराणे ॥ स्वस्थानासी ॥२६॥

परि धर्मादि पांडवांसी ॥ राहविलें हस्तनापुरासी ॥ मग वेळ क्रमाया सभेसी ॥ मांडिलें द्यूत ॥२७॥

पट मांडिला चित्रवट ॥ वरी सोळासारींचा जूट ॥ खेळ मांडिलासे जवट ॥ धर्मे आणि दुर्योधनें ॥ ॥२८॥

तैं धर्माचिये पाठीसी ॥ पांडव बैसले उल्हासीं ॥ भीष्मद्रोणादि सभेसी ॥ समस्त कौरव ॥२९॥

फांसे दुर्योधनें घेतले ॥ डावा युधिष्ठिरें वोडविलें ॥ ढाळितां खेळीं जिंकिलें ॥ धर्मे सकळांदेखतां ॥३०॥

सारीचें द्यूत खेळतां ॥ धर्मे फळें जिंतिलें तत्वतां ॥ हारी आली कौरवनाथा ॥ तें देखिलें शकुनीयें ॥३१॥

मग फांसे नाडीच्या पदरींहुनी ॥ दीधले दुर्योधना सोडोनी ॥ ह्नणे सारींचें द्यूत खेळोनी ॥ जिकीं धर्मरायासी ॥३२॥

तैं छक चौक पगड बेती ॥ सुधी आवळी हारी जिती ॥ नेम करोनि ओडविती ॥ खेळती प्रीतीं उभयतां ॥३३॥

जैं छकचौक वळले ॥ तैं सुघे आवळे पडियेले ॥ ते दुर्योधनें जिंकिले ॥ भलें साधिलें कपटफांशीं ॥३४॥

जंव धर्मा आवळें ओडवीती ॥ तंव दुर्योधनाची पगडवेती ॥ त्वरा फुराण दाटलें चित्तीं ॥ युधिष्ठिराच्या ॥३५॥

वोडवितां न पाहे मागें पुढें ॥ हरिले रथकुंजर घोडे ॥ शस्त्रें रत्नादि चोखडें ॥ धनकण राज्यपदार्थ ॥३६॥

देखोनि भीमार्जुन खवळले ॥ तंव धर्मे तयांसि वारिलें ॥ माझें वचन पाळा ह्नणितलें ॥ सभेमाजी ॥३७॥

बाप मंत्रत्व शकुनियाचें ॥ द्यूत साधिलें कपटाचें ॥ तंव फांसे घेतले हातींचे ॥ शकुनीयें देखा ॥३८॥

यावरी ह्नणे दुर्योधन ॥ आमुचें जिंकिलें द्यावें आणून ॥ धर्मे पाठविला भीमसेन ॥ इंद्रप्रस्थीं ॥३९॥

आणविले द्रव्यपदार्थ ॥ दुर्योधना दीधले समग्र ॥ तंव भीष्में कथिलें सर्वत्र ॥ धृतराष्ट्रागांधारीसी ॥४०॥

तियें धांवत आलीं अवघीं ॥ शिकविती दुर्योधन लागीं ॥ विदुरें येवोनियां वेगीं ॥ ह्नणितलें गांधारा ॥४१॥

कीं आपुला गोत्रज युधिष्ठिर ॥ तेणेंसि न करावें वैर ॥ फिरावोनि दीजे राज्यभार ॥ जो जिंकिला द्यूतकर्मी ॥४२॥

तुह्मीं जिंकिलें हारविलें पांडवीं ॥ हे गोष्टी विस्तारली सर्वी ॥ आतां फिरावोनि वस्तु द्यावी ॥ हे उदारता दूसरी ॥४३॥

येरु या बोलें तोखला ॥ अवधियांचा शब्द मानिला ॥ मागुता राज्यभार दीधला ॥ युधिष्ठिरासी ॥४४॥

आलिंगोनि मानसन्मानें ॥ बरवें मानिलें दुर्योधनें ॥ जाहलीं वस्त्रालंकारभोजनें ॥ टिळेविडे उपचार ॥४५॥

इंद्रप्रस्थीं पाठविले ॥ पांडव सकुटुंबें गेले ॥ ऐसें पहिले द्यूत वर्तलें ॥ हस्तनापुरीं ॥४६॥

यावरी कितीयेकां दिवशीं ॥ धर्म बैसला असतां सभेसी ॥ भीमादिक चौंपाशीं ॥ वोळंगती ॥४७॥

तंव अर्जुनसुभद्रेचा कुमर ॥ अभिमन्यु महासुंदर ॥ धर्मासि करावया करावया नमस्कार ॥ आला सभेमाजी ॥४८॥

तो उपवरु देखोनी ॥ चिंता वर्तली धर्ममनीं ॥ मग समस्तही मिळोनी ॥ मांडिला विचार ॥४९॥

हे अभिमन्यूची वर्‍हाडिका ॥ सप्तमस्तबकी असे देखा ॥ ह्नणोनि कथिली पृथकभाषा ॥ जन्मेजय गा ॥५०॥

भाट आले तियेची अवसरीं ॥ वानिली बलभद्राची कुमरी ॥ मग सहदेव जावोनि द्वारकापुरीं ॥ मेळविली वर्‍हाडिका ॥५१॥

तेथोनि आला सहदेवो ॥ ह्नणे ठरविला अभिमन्युविवाहो ॥ सोयरा जोडला कृष्णदेवो ॥ संकर्षणयादव ॥५२॥

आनंद जाहला समस्तांसी ॥ श्रृंगारिलें इंद्रप्रस्थासी ॥ तंव कैसी उपनली विवशी ॥ ते अवधारिजो ॥५३॥

विवाह मेळविलीयावरी ॥ धर्म सकळ सामुग्री करी ॥ परि चिंतावोनि अंतरीं ॥ सुटला उचाट ॥५४॥

न रुचती अन्नवस्त्रलेणीं ॥ ह्नणे वैराग्यें फिरावें वनीं ॥ नाहींतरी द्यूत खेळोनी ॥ क्रमावा काळ ॥५५॥

मग भीम धाडिला हस्तनापुरी ॥ दुर्योधन बोंलाविला परिवारीं ॥ आदर करोनि उपचारीं ॥ संतोषले सर्वत्र ॥५६॥

यावरी द्यूतकर्म दुजें मांडिलें ॥ तंव दुर्योधन काय बोले ॥ द्यावें घ्यावें हरिलें जिंतिलें ॥ तरीच खेळणें आपणेय ॥५७॥

धर्मेही तेतुला नेम केला ॥ भाषानिश्वयो जाहला ॥ ह्नणती न टळणें बोलिल्या बोला ॥ उभयांसही ॥५८॥

फांसे धर्मे ढाळिले ॥ फळें दुर्योधनें वोडविलें ॥ तंव युधिष्ठिरें जिंकिलें ॥ हारी आली दुर्योधना ॥५९॥

मग शकुनियें कपट करोनी ॥ फांसे दीधले दुर्योधनालागुनी ॥ ते ढाळितां फिरावोनी ॥ डावो तत्क्षणीं जिंकिला ॥६०॥

ऐसें आपुलें पारिकें आघवें ॥ जिंकिलें दुर्योधनकौरवें ॥ मग धर्मे वोडविलें हांवे ॥ पांचाजणांसी ॥६१॥

येरें तोही जिंकिला डावो ॥ काहींचि न सांभाळी धर्मरावो ॥ मग मांडिला थोर उपावो ॥ वोडविली द्रौपदी ॥६२॥

तेही दुर्योधनें जिंकिली ॥ धर्मे विचारणा केली बारावर्षे वोडविलीं ॥ वनवास देखा ॥६३॥

तोही डावो हारविला ॥ तेव्हां दुर्योधन बोलिला ॥ कीं धर्मा वोडवीं रे वाहिला ॥ नष्टचर्य तेरावें ॥६४॥

येरें नष्टचर्य वोडविलें ॥ तेंही गांधारें जिंकिलें ॥ गुप्त असतां प्रकट जाहलें ॥ तरी बारावरुषें पुनरपी ॥६५॥

पुनरपि धर्में वोडविलें ॥ तेंही दुर्योधनें जिंकिलें ॥ तंव फांसे शकुनीयें घेतले ॥ दुर्योधनाकरींचे ॥६६॥

यावरी दुर्योधन ह्नणे ॥ हाराविलें तें देणें ॥ येरु ह्नणे सुखें घेणें ॥ आह्मां करणें वनवास ॥६७॥

शकुनिया ह्नणे दुर्योधना ॥ भाषे नटळे धर्मराणा ॥ तुवां आरुढोनि सिंहासना ॥ करीं राज्यावेगळा ॥६८॥

मग गजरथ ॥ धनकण नानापदार्थ ॥ वस्त्रालंकार भांडारें समस्त ॥ नगरीं आज्ञा फिरविली ॥७०॥

मग दुःशासन वेगवत्तरीं ॥ पाठविला मंदिराभीतरीं ॥ ह्नणे सभेसि आणीं सुंदरी ॥ द्रुपदात्मजा ॥७१॥

येरें तत्क्षणीं जावोनी ॥ सती आणिली वेणिये धरोनी ॥ उभीं केली मृगनयनी ॥ सभेमाजी ॥७२॥

देखोनि भीमार्जुन खवळले ॥ क्रोधें शस्त्रीं हात वसविले ॥ तंव ते धर्मे निवारिले ॥ ह्नणे भाष रक्षा आमुची ॥७३॥

ऐसी आज्ञा होतां धर्माची ॥ अवघे राहिले उगेची ॥ कोणी काहीं न बोलेची ॥ नीतिमंत ह्नणोनियां ॥७४॥

तंव कर्ण ह्नने द्रौपदीये ॥ बैसें दुर्योधनाचे मांडिये ॥ सकळही कौरवांचीं होयें ॥ गोसाविणी दासी ॥७५॥

येरी ह्नणे भीष्मद्रोणा ॥ मी पर्णिता कुलांगना ॥ असोनि धरितो पापवासना ॥ त्या अधमा कां न निवारा ॥७६॥

परस्त्रियेसि अभिलाषितां ॥ नाश जाहला असे बहुतां ॥ रावणा आणि सुरनाथा ॥ कवणी गती जाहली ॥७७॥

हा कर्ण बोलिला प्रमादा ॥ कीं तूं होई दुर्योधनमुग्धा ॥ तरी मांडिये बैसेल गदा ॥ भीमसेनाची ॥७८॥

ऐसें शापोत्तर ऐकतां कानीं ॥ दुर्योधन खवळला अंतःकरणीं ॥ ह्नणे मारामारारे पापिणी ॥ बोलत असे प्रमादें ॥७९॥

ऊठऊठरे दुःशासना ॥ वस्त्र हिरोनि हे करीं नग्ना ॥ येरु ऊठिला तत्क्षणा ॥ बंधुआज्ञा जाणोनी ॥८०॥

तंव द्रौपदी मनीं भ्याली ॥ मुखश्री दिसे कोमाइली ॥ अंतरामाजी चिंतिती जाहली ॥ गोविंदासी ॥८१॥

इकडे ह्नणती भीष्मद्रोण ॥ कीं हें नकरीं पापाचरण ॥ परि तें नायके दुर्योधन ॥ ईर्षें गांधार चढियेला ॥८२॥

ह्नणे तुह्मी उगेंचि बैसावें ॥ आडतोंडें न शिरावें ॥ उगेंचि कौतुक पहावें ॥ नातरी जावें उठोनी ॥८३॥

तेणें द्रौपदी अत्यंत ॥ मनीं जाहली भयभीत ॥ स्तुती करी आक्रंदत ॥ धांवधांव गोविंदा ॥८४॥

थोराअवघडा संकटीं ॥ धांवपाव गा जगजेठी ॥ दुर्योधनें पापदृष्टी ॥ केली असे ॥८५॥

जयजयाजी चक्रधरा ॥ शरणागता वज्रपंजरा ॥ लज्ज रक्षिता तूंचि दातारा ॥ भक्तजनांची ॥८६॥

ऐशा नानाविलापवचनीं ॥ देवासि स्तवी द्रुपदनंदिनी ॥ तंव अदृश्यरुपें तत्क्षणीं ॥ चक्रपाणी पातला ॥८७॥

दुःशासनें प्रथम आंसुडिलें ॥ भीतरीं देवें दुजे नेसविलें ॥ सभे आश्वर्य थोर वर्तलें ॥ ह्नणती हे असे कपटिनी ॥८८॥

दुर्योधन ह्नणे सोडासोडा ॥ येरु ओढीत झडझडां ॥ परि भक्तवत्सल धडफुडां ॥ करवी परिधानें ॥८९॥

अनंतरंग वस्त्रराशी ॥ जालिया अगणित परियेसीं ॥ धैर्य द्रौपदीच्या मानसीं ॥ सत्य हषीकेशी पावला ॥९०॥

मग निर्वाणी चक्रधर ॥ द्रौपदीसि नेसवी पीतांबर ॥ तैं भीष्मादिकां गदाधर ॥ जाहला दृश्यमान ॥९१॥

ते दुर्योधनासि वारिती ॥ अरे मूर्खा पातला श्रीपती ॥ अद्यापि तरी कांहीं चित्तीं ॥ धरीं आठव ॥९२॥

ऐकोनि गांधार विरमला ॥ मग दुःशासन वारिला ॥ असो अदृश्यरुपें राहिला ॥ श्रीकृष्ण तेथें ॥९३॥

राया अढळभाक धर्माची ॥ धन्य प्रकृती पांडवांची ॥ धन्य द्रौपदी सत्वाची ॥ धन्य तो भक्तवत्सल ॥९४॥

द्रौपदी ह्नणे रे गांधारा ॥ त्वां कपटे जिंकिलें पांडववीरां ॥ भाषे गोंविलें युधिष्ठिरा ॥ नातरी यमपुरा जातासी ॥९५॥

आतां मजसी खेळें खेळ ॥ कळेल तुझा द्यूतढाळ ॥ आह्मां सारथी गोपाळ ॥ तो जय देईल निश्वयें ॥९६॥

येरु ह्नणे पाहूं बरें ॥ ह्नणोनि द्यूत मांडिलें सत्वरें ॥ फांसे ढाळिले गांधारें ॥ तंव डावो सुंदरें जिंकिला ॥९७॥

फांसे घेवोनि स्वकरीं ॥ द्रौपदीचि ओढविली झडकरी ॥ येरीनें जिंकोनि तिये अवसरी ॥ सोडविलें आपणेया ॥९८॥

मग पांडव ओडविले ॥ तेही द्रौपदीयें सोडविले ॥ तेव्हां फांसे हिरोनि घेतले ॥ शकुनीयें देखा ॥९९॥

ह्नणे दुर्योधना उठींउठीं ॥ हे कपटाची महावटी ॥ अंतर्बाह्य असे खोटी ॥ नकळे कृत्रिम इयेचें ॥१००॥

दुर्योधन ह्नणे द्रौपदीसी ॥ आतां मी न खेळें तुजसी ॥ लाज आली आह्मासी ॥ स्त्रियेसवें खेळतां ॥१॥

यावरी धर्मासि गांधार ह्नणे ॥ कीं तुह्मीं बनवासीं जाणें ॥ राज्यादि सकळ आह्मा देणें ॥ हारविलें तें ॥२॥

येरु ह्नणे तथास्तु ॥ आह्मां करणीय वचनार्थु ॥ मग बंधुवर्गासहितु ॥ युधिष्ठिर उठावला ॥३॥

कुंती अभिमन्यु सुभद्रा ॥ पाठविलीं विदुराचे घरा ॥ आणि धाडिलें पांचाळीकुमरां ॥ द्रुपदागृहीं ॥४॥

ऐसी व्यवस्था करोनी ॥ धौम्यगुरुतें बोलावोनी ॥ बंधुपत्नीसहित वनीं ॥ युधिष्ठिर चालिला ॥५॥

अंतरीं स्मरती कृष्णचरणां ॥ ह्नणती पाव गा नारायणा ॥ तुजवांचोनि अनाथजनां ॥ नाहीं रक्षिता त्रिभुवनीं ॥६॥

इकडे सुभद्रा आणि कुंती ॥ जावोनि विदुरगृहाप्रती ॥ सांगीतली सर्व स्थिती ॥ पांडवांची ॥७॥

विदुर तत्क्षणीं निघाला ॥ इंद्रप्रस्थासि पातला ॥ धर्मादिकां भेटोनि वहिला ॥ मग बोलिला भीष्मासी ॥८॥

विदुर ह्नणे भीष्मा परियेसी तुह्मी शिकवोनि दुर्योधनासी ॥ राहविणें पांडवांसी ॥ तुह्मी उभयां पितामह ॥९॥

तैसेंचि द्रोणाचार्य ह्नणे ॥ तुह्मी सांगिजे वडिलपणें ॥ पांडवांसी राहविणें ॥ चुकेल येणें अनर्थ ॥११०॥

यावरी ह्नणे गंगानंदन ॥ यासी शिकवील मधुसूदन ॥ हा नायके राजमदेंकरुन ॥ आणि हेडसावी आह्मासी ॥११॥

मग विदुर भीष्मद्रोण ॥ उठिले सभेआंतून ॥ राजद्वाराबाहेर जावोन ॥ भेटले पांडवांसी ॥१२॥

अवघे गहिंबरें दाटले ॥ अश्रुपात वोसडंले ॥ मग धर्मासी बोलिले ॥ पृथक् पृथक ॥१३॥

ह्नणती जळो आमुचीं जियांळी ॥ जे तुमची विटंबना देखिली ॥ शोकें हदयें फुटलीं ॥ वियोगें तुमच्या ॥१४॥

आह्मी वारिलें दुर्योधनासी ॥ परि तो नायके पापराशी ॥ विस्मित होवोनियां सभेसी ॥ आह्मी उगेचि बैसलों ॥१५॥

द्रौपदीचीं आंसुडलीं चीरें ॥ तैं साह्य केलें चक्रधरें ॥ तो तुह्मां सखा सर्वप्रकारें ॥ जळो जिणें आमुचें ॥१६॥

मग बोले धर्मराजा ॥ ऐकें शंतनुआत्मजा ॥ तूं उभयतां होसी आजा ॥ भावो दुजा नाहीं तुह्मां ॥१७॥

अहो द्रोणाविदुरा आइका ॥ तुह्मी ममत्वें झळबळां देखा ॥ परि बळकट जे कर्मरेखा ॥ ते अवश्य भोगणेंची ॥१८॥

कौरवीं केला अनुपकार ॥ परि मी न सोडीं सत्वसागर ॥ ऐसा शेवटीं निर्धार ॥ देखाल तुह्मी ॥१९॥

तंव ह्नणे वृकोदर ॥ भाके गुंतला युधिष्ठिर ॥ तो टाळूंनये प्रकार ॥ ह्नणोनि उगे राहिलों ॥१२०॥

आतां बोलिलें साच करुं ॥ वनवास नष्टचर्य सारुं ॥ मग वधूनि कौरवभारु ॥ घेऊं राज्य आपुलें ॥२१॥

तैसेंचि अर्जुन बोलिला ॥ नकुळसहदेवो अनुवादला ॥ मग निघाले तये वेळां ॥ भीष्मद्रोणां राहवोनी ॥२२॥

विदुर गुप्तपणें जाहला शिकविता ॥ ह्नणे चित्त द्यावें वचनार्था ॥ झणी न विश्वासिजे आतां ॥ या चांडाळां कौरवांसी ॥२३॥

बारे निघालेति वना ॥ रहावें बरविये सूचना ॥ द्रौपदीची करावी रक्षणा ॥ धर्मवचना पाळावें ॥२४॥

जरी कनिष्ठ होकीं थोर ॥ परि उणें न बोलावें उत्तर ॥ धर्मासि नेदावे अंतर ॥ तुह्मी सकळ सोयरीं ॥२५॥

मग ह्नणे धौम्यऋषीसी ॥ तूं पांडवांचा कुळगुरु होसी ॥ कीं यत्नें पाळावें यांसी ॥ शिकवोनि बुद्धी ॥२६॥

ऐसें विदुरें बोलिलें ॥ तंव पांडवीं नमन केलें ॥ तयासीहीं मुरडविलें ॥ मग निघालीं साहीजणे ॥२७॥

सवें चालिला धौम्यगुरु ॥ सकळविद्यांचा सागरु ॥ आतां असो हा कथाचारु ॥ पांडव चालिले वनासी ॥२८॥

इकडे दुर्योधनें तत्क्षणीं ॥ अवघे राजपदार्थे घेवोनी ॥ गर्जत चालिला निशाणीं ॥ हस्तनापुरीं प्रवेशला ॥२९॥

परि धृतराष्ट्र आणि गांधारी ॥ ऐकतां दुखावलीं अंतरीं ॥ तैसींच नगरीं नरनारी ॥ दुःखें परम विव्हळ ॥१३०॥

दुर्योधनाचे क्रूरपणें ॥ कोणासही न होय बोलणें ॥ राज्य घेतलें कपटपणें ॥ ह्नणोनियां ॥३१॥

असो हस्तनापुरीं पहिलें ॥ द्यूतकर्म खेळीन्नले ॥ तें जिंकोनि मागुतें दीधलें ॥ दुर्योधनें पांडवांसी ॥३२॥

त्यावरी बळभद्राची कन्या ॥ मेळविलीसे अभिमन्या ॥ पुढें उच्चाट सुटला मना ॥ धर्मरायाचे ॥३३॥

ह्नणोनि वेळक्रमणालागीं ॥ दुर्योधन बोलावोनि वेगीं ॥ द्यूत मांडिलें उभयवर्गी ॥ इंद्रप्रस्थीं परियेसा ॥३४॥

इंद्रप्रस्थीं खेळले द्यूत ॥ हें पद्मपुराणींचें मत ॥ आणि हस्तनापुरी खेळले हें उक्त ॥ भारतीचें ॥३५॥

असो पांडव गेलिया वनीं ॥ दुर्योधन विचारी मनीं ॥ मग शकुनिया द्वारके धाडुनी ॥ मागीतली वत्सला ॥३६॥

जंव ते लक्ष्मणा मेळविली ॥ गांधारें वर्‍हाडिका मांडिली ॥ तंव अभिमन्यें जावोनि पर्णिली ॥ घटोत्कचेंसीं ॥३७॥

तो अभिमन्युविवाह समस्त ॥ सप्तमस्तबकीं असे प्राकृत ॥ हे आडकथा निश्वित ॥ सभापर्वींची ॥३८।

येथोनि सभापर्व संपलें ॥ पुढें अरण्यपर्व लागलें ॥ कां जें पांडवीं वन सेविलें ॥ ह्नणोनिया ॥३९॥

हे सभापर्वभारतकथा ॥ नाशी पातकें ब्रह्महत्या ॥ पाविजे भुक्तिमुक्ती पंथा ॥ सिद्ध होती मनोरथ ॥१४०॥

ऐसें बोलतां वैशंपायन ॥ तंव अठरांतील ब्राह्मण ॥ दुसरा उठिला कडकडोन ॥ आश्वर्य रायें देखिलें ॥४१॥

आतां अग्रकथा रायाप्रते ॥ सांगेल मुनी वेदमूर्ती ॥ तेथ अवधान द्यावें श्रोतीं ॥ ह्नणे कविमधुकर ॥४२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ सभापर्वकथनप्रकारु ॥ तृतीयोऽध्यायीं कथियेला ॥१४३॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीजगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ श्रीरस्तु ॥ ॥ ॥ शुभंभवतु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP