॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनि ह्मणे भीष्मादिकीं बोजा ॥ धिक्कारोनि सूर्यात्मजा ॥ मग कित्येक सैन्येंसीं ॥ दूरी पळविला राजा ॥१॥
सामे भीष्मद्रोण राहिले ॥ वामांगीं कृपाचार्या घातलें ॥ उजवीकडे अश्वत्थामा ॥ सातक्षोणी संसारले ॥२॥
तंव पार्थें संधान केलें ॥ तीन बाण प्रेरिले ॥ कॄपाचार्य भीष्म द्रोण ॥ बाणद्वारें वंदिले ॥३॥
गहिंवरलें तिघेजण ॥ बाण आलिंगिले उचलोन ॥ मग गांभीर्यें धनुर्धरें ॥ केलें सैन्यनिरीक्षण ॥४॥
परि तेथें गांधार न दिसे ॥ तो गाई घेवोनि पळत असे ॥ रज उघळले देखोनी ॥ रथ प्रेरिला आवेशें ॥५॥
हें कृपाचार्यें देखिलें ॥ ह्मणे पार्थें गांधारा गांठिलें ॥ मग रथेंसिं येवोनि दुर्योधना ॥ आपण पाठीसि घातलें ॥६॥
आणि दळभारें तत्क्षणीं ॥ गांधार घेतला मेळवोनी ॥ थाट दृढ बांधिला तेथें ॥ अवधीं एकवट करोनी ॥७॥
यावरी शंख स्फुरिला पार्थें ॥ भुभुःकार केला हनुमंतें ॥ तेणें गडबडोनि ब्रह्मांड ॥ कंप सुटला सैन्यातें ॥८॥
नादें गोधनें हुरळलीं ॥ नगरनाळेया पाठारीं गेलीं ॥ भयभीत कौरववांहिनी ॥ कैसी झुंजारी प्रवर्तली ॥९॥
तंव ते संधीं उत्तर पुसे ॥ हे म्यां वीर ओळखावे कैसे ॥ पार्थ ह्मणे गा हा कर्ण ॥ तेजोमय रथ दिसे ॥१०॥
पैल कनकवर्ण ध्वज ॥ तो भीष्म शंतनुआत्मज ॥ पैल ध्वज मर्गजाचा ॥ तो दुर्योधन कौरवाराज ॥११॥
पैल ध्वज सोमकांताचा ॥ तो रथ जाण गुरुद्रोणाचा ॥ आणि रत्नें खणोखणीं ॥ तो रथ असे शकुनीचा ॥१२॥
यापरि समस्त खुणीं लक्षण ॥ केलें उत्तरासि श्रवण ॥ मग सवेंचि कौरवावरी ॥ सोडिले असंख्य मार्गण ॥१३॥
पार्थाचा युद्धचमत्कार ॥ देखती द्रोण गंगाकुमर ॥ महायोद्धेही समरंगणी ॥ अर्जूने केले जर्जर ॥१४॥
मग पाहिले दिवस मोजून ॥ तंव चांद्रमानें जाहले पूर्ण ॥ ह्मणती पांडव पंडित खरे ॥ सोमवंशीचे नंदन ॥१५॥
यावरी संग्राम जाहला थोरू ॥ शस्त्रास्त्रेसीं भयंकरू ॥ तो सकळही सांगतां ॥ विस्तरेल कथाकल्पतरू ॥१६॥
असो पराक्रम करोनि पार्थ ॥ तत्काळ रथेंसी जाहला गुप्त ॥ तो रथ काढोनि हनुमंतें ॥ एकांतीं नेला दूरस्थ ॥१७॥
अवघेही वीर पाहती ॥ परि पार्थरथ न देखती ॥ एक ह्मणती गगनीं गेला ॥ कीं अदृश्य जाहला विद्यागती ॥१८॥
तंव भुभुःकारतां हनुमंत ॥ दूरी देखिला पार्थरथ ॥ मग मोहनास्त्र धनुर्धरें ॥ अनिवार प्रेरिलें क्षणांत ॥१९॥
ते प्रकाशोनि मोहनी ॥ सैन्य निद्रिस्थ केलें रणीं ॥ शस्त्रें गळोनि हातींचीं ॥ पडले उलंडोनि मेदिनीं ॥२०॥
अश्वगजरथ पायद ॥ निद्राव्याप्त चतुर्विध ॥ एक आलस्यें अंगमोडे देती ॥ तटस्थ पाहती परि न उठती जोघ ॥२१॥
ऐसी परी करोनि अर्जुनें ॥ ह्मणितलें उत्तरकारणें ॥ कीं उत्तरेलागीं द्यावया ॥ वस्त्रालंकार घेवोनि येणें ॥२२॥
निघतां तुज दिला शकुन ॥ तो कैसा गेलासि विसरोन ॥ येरू निघाला तत्क्षणीं ॥ रथाखालीं उतरोन ॥२३॥
अर्जुन ह्मणे गा उत्तरा ॥ वांचोनि कृपाचार्य गंगाकुमरां ॥ द्रोणा आणि अश्वत्यामेया ॥ येरां नग्न करीं समग्रां ॥२४॥
उत्तरें शीघ्र गमन केलें ॥ वस्त्रालंकार हरियेले ॥ दुर्योधनप्रमुख ॥ अकराक्षोणी नागविले ॥२५॥
मग अर्जुन तेथ गेला ॥ भीष्म द्रोणां नमिता जाहला ॥ वंदूनि द्रौणी कॄपाचार्य ॥ चौघांप्रती बोलिला ॥२६॥
तुह्मां वडिलांतें पुसावें ॥ आज्ञा द्याल तेघवां जावें ॥ परि हें द्रौपदीवस्त्राहरण ॥ आजि उसणें जाहलें स्वभावें ॥२७॥
तंव भीष्मादि चौघे ह्मणती ॥ तुमचा श्रीकृष्ण सारथी ॥ तेणें रक्षिलें बहुतांपरी ॥ जाहली कौरवां फळप्राप्ती ॥२८॥
जो जें शुभ अशुभ आचरी ॥ तो तें पावे हातावरी ॥ यांहीं वस्त्राहरण केलें ॥ ह्मणोनि नागविलें समरीं ॥२९॥
निर्लज्जत्वें जरी जिणें ॥ तरी त्याहुनि चांग मरणे ॥ बरवी केली विटंबना ॥ आतां तुवां स्वस्थानीं जाणें ॥३०॥
पार्थ ह्मणे चौघांप्रती ॥ राज्य घेतलें कापट्यरीतीं ॥ तें उसणें आहे घ्यावयाचें ॥ ह्मणोनि जीवें रखिलें यांप्रती ॥३१॥
मग शंख स्फुरितां देवदत्त ॥ भुभुःकारला हनुमंत ॥ नागवोनि सातक्षोणी ॥ विजयी जाहला वीर पार्थ ॥३२॥
रथ प्रेरूनि धनुर्धन ॥ विराटनगरीं चालिला शीघ्र । उत्तर जाहला हर्षयुक्त ॥ घेवोनि वस्त्रालंकार ॥३३॥
इकडे सुशर्मापराभूत ॥ तैसाचि चहूं क्षोणींसहित ॥ पातला दुर्योधनाजवळी ॥ तंव देखिला अनर्थ ॥३४॥
पार्थें आकर्षिली मोहनी ॥ जागृत जाहल्या सातक्षोणी ॥ नग्न देखतां अवघेयां ॥ गजबजिले लाजोनी ॥३५॥
कोणी कोणासि न बोले ॥ अवघे तटस्थ जाहले ॥ तंव आला सुशर्मा ॥ तयेंही तद्दत देखिलें ॥३६॥
चौघें वांचोनि अकराक्षोणी ॥ नग्न उघडे फिरती रणीं ॥ पाहती सकळ चिरगुटें ॥ कौपीन कराया लागुनी ॥३७॥
तिये दळीं भणंगें भिल्लें ॥ होतीं कौलिकादि कुश्र्चिळें ॥ तयांचीं वस्त्रें फाडोनियां ॥ अवघीं लंगोटे लाविले ॥३८॥
तंव भीष्में आपुलें वस्त्र ॥ गांधार दीधलें अर्धचीर ॥ तें नेसला दुर्योधन ॥ परि येर उघडे समग्र ॥३९॥
जे गती जाहली गांधारासी ॥ तेचि गती सातक्षोणीसी ॥ कोणी कोणा न हांसती ॥ अपमान जाहला समस्तांसी ॥४०॥
मग सुशर्मा बोलिला ॥ जीजी मत्स्य म्यां ध्वजीं बांधिला ॥ गोधनें हरूनि येत होतों ॥ तंव बल्लव वेगें धांवला ॥४१॥
हाक देवोनि लागला पाठी ॥ चातुरंग झोडिलें नेहटीं ॥ मज रथ सांडोनि पळतां ॥ थोर जाहली हिंपुटी ॥४२॥
तेणें धांवोनि धरिलें मातें ॥ सोडविलें वैराटातें ॥ हस्ती घोडे लुटिले रथ ॥ मग जीवें सोडिलें मातें ॥४३॥
मत्स्यें स्तविलें बल्लवातें ॥ तो बोलों नेदी तयातें ॥ ह्यणे दुर्योधनादि नाहीं मारिले ॥ वृथा वानितोसि मातें ॥४४॥
बल्लव नाम तयासी ॥ तेणें सोडिलें आह्मासी ॥ ह्मणें हीं बापुडीं बाहूलीं ॥ काय मारावें ययांसी ॥४५॥
तंव बोलिला द्रोणगुरू ॥ तो जाणावा वृकोदरू ॥ पैल जातसे हा अर्जुन ॥ जेणें जिंकिला कौरवभारू ॥४६॥
असो लाज सांडोनि समस्तीं ॥ लागले हस्तनापुरपंथीं ॥ थोर जाहला अनर्थ ॥ ऐसें परस्पर बोलती ॥४७॥
संग्रामी हारवी भलता ॥ याची नव्हें नवलता ॥ परि उघडें नागवें केलें ॥ आजिंची थोर अवस्था ॥४८॥
यावरी ह्मणे गुरुदोणा ॥ धन्य सत्वधीर अर्जून ॥ जरी येकयेका संहारिता ॥ तरी तया वारिता कोण ॥४९॥
या शकुनियासारिखा असता ॥ तरी जीवें न राखिता ॥ येणेंचि कुबुद्धी सांगोनी ॥ फजीत केलें कौरवनाथा ॥५०॥
जरी यांहीं इतुकें केलें ॥ तरी पांडव पापासि भ्याले ॥ गंधर्वी नेला दुर्योधन ॥ तैं धर्मानुजें सोडविलें ॥५१॥
थोर कष्टले वनवासीं ॥ परि ते न टळती सत्वासी ॥ ह्मणोनि तयांचा सारथी ॥ निरंतर हृषीकेशी ॥५२॥
जेजे कपट आचरती ॥ त्यांचा भार होतसे क्षिती ॥ सातक्षोणी नग्न केले ॥ हे पापाची फळप्राप्ती ॥५३॥
आजि एकल्यानें नागविलें ॥ परि येणें काय सरलें ॥ पांडव जाहलें प्रकट ॥ आतां केवीं राहती उगले ॥५४॥
ऐकोनि येईल श्रीपती ॥ द्रुपदादि राजे मिळती ॥ मग येवोनि सैन्यभारें ॥ आपुलें राज्य मागती ॥५५॥
आतां हेर पाठविजे ॥ आवघी व्यवस्था आणविजे ॥ यापरि गांधाराप्रती ॥ द्रोणें सांगितलें ओजें ॥५६॥
परि द्रोणाचेनि बोलें ॥ तया द्दिगुण दुःख जाहलें ॥ मग इंद्रप्रस्था जावोनी ॥ सकळ सैन्य सिद्ध केलें ॥५७॥
वस्त्रालंकार देवोनि समग्रां ॥ वीर पाठविले हस्तनापुरा आपण लज्जित होवोनी ॥ राहिला तेथेंचि अवधारा ॥५८॥
तें श्रुत जाहलें धृतराष्ट्रासी ॥ मग पाठवोनि विदुरासी ॥ गांधार आणविला हस्तानापुरीं ॥ पिता शिकवी पुत्रासी ॥५९॥
ह्मणें जें होणार तें जाहलें ॥ परि आतां ऐकें ह्मणितलें ॥ भले असती भीमार्जुन ॥ त्यांहीं समस्तां रक्षिलें ॥६०॥
आतां विदुरासि पाठवावें ॥ पांडवां येथें आणवावें ॥ तयां इंद्रपरस्थ देवोनी ॥ आपणाजवळी रक्षावें ॥६१॥
तुह्मी न करावें तें केलें ॥ त्यांहीं उणें बहुत साहिलें ॥ वहिले बुझावा पांडवां ॥ करा आमुचें ह्मणितलें ॥६२॥
दुर्योधना ह्मणे गांधारी ॥ अद्यापि तरी शिकविलें करीं ॥ बापा गोत्रकलह वोखटा ॥ जाइल एखादिये थरीं ॥६३॥
भीष्मद्रोणही बोलिले ॥ ऐका वडिलांचें ह्मणितलें ॥ न लागा शकुनियाचे बुद्धी ॥ पांडवीं जीवें रक्षिलें ॥६४॥
परि तें लागलें विषवत उत्तर ॥ भेदिलें गांधाराचें जिव्हार ॥ क्रोधें ह्मणे चिंता नाहीं ॥ सिद्धीसि नेईन अनुपकार ॥६५॥
ऐसें ह्मणोनि कोपें उठिला ॥ स्वमंदिरी प्रवेशला ॥ अन्नोदक नावडे चिंतीं ॥ चिंताभूत जाहला ॥६६॥
इतुकें हस्तनापुरीं वर्तलें ॥ तंव येरीकडे काय जाहलें ॥ कौरवांसी जिंकोनियां ॥ पांडव विजयी जाहले ॥६७॥
विराट नगरीं प्रवेशला ॥ महोत्साह थोर जाहला ॥ सन्मानोनि बल्लवातें ॥ गोत्रकुटुंबा भेटला ॥६८॥
परि न देखे उत्तरासी ॥ ह्मणोनि पुसिलें सेवंकासी ॥ कां पां न भेटे कुमार आजी ॥ तंव ते सांगतां रायासी ॥६९॥
कीं उत्तरेचीं वळिलीं गोधनें ॥ ह्मणोनि उत्तरे केलें धांवणें ॥ हें ऐकतां मत्स्यरावो ॥ निघाला जावया तत्क्षणें ॥७०॥
ह्मणे उत्तर तान्हुलें बाळक ॥ सवें कोणी नाहीं आणिक ॥ तुह्मीं जावों दीधला कैसा ॥ चला तिकडे सकळिक ॥७१॥
तंव कंक ह्मणे करीं चिंता ॥ सवें बृहन्नळा सारथीं असतां ॥ भय नाहीं उत्तरासी ॥ होईल गोधनें सोडविता ॥७२॥
परि राव नायके ह्मणितलें ॥ शीघ्र निघाला सैन्यमेळें ॥ तंव येवोनि सांगती गौळी ॥ उत्तरें जिंकिलें जिंकिलें ॥७३॥
कौरव नग्न करोनि लुटिले ॥ गोधनांतें सोडविलें ॥ राव पुसे वेळोवेळां ॥ उत्तरें एकलेनि जिंकिलें ॥७४॥
मग माघारला हर्षित ॥ प्रवेशला नगराआंत ॥ सिंहासनीं बैसोनियां ॥ वानी पुत्राचा पुरुषार्थ ॥७५॥
जवळी बाहुनि कंकभट ॥ तयासि सांगे वैराट ॥ समरीं जिंकिला दुर्योधन ॥ पाहें ममपुत्राचा लाट ॥७६॥
कंकभटें तैं जाणोनि कारण ॥ बोलिला विराटासि वचन ॥ जैसा जिंकिला आपण सुशर्मा ॥ तैसेंचि उत्तराचें जैतपण ॥७७॥
ऐसा मर्मभेद ऐकोनी ॥ मत्स्य क्रोधें खवळला मनीं ॥ ह्मणें चाटाई मांडिली ब्राह्मणें ॥ पाहें नेत्र उघडोनी ॥७८॥
आवेशें कंपायमान जाहला ॥ पुढें सारीचा पट देखिला ॥ हात घालोनि घेतले फांसे ॥ तेणें चौरंग त्राहाटिला ॥७९॥
फांसा उसळोनि नेहटीं ॥ बैसला कंकाचे ललाटी ॥ तेणें सुटली रक्तधारा ॥ सैरंघ्री देखे बरवंटी ॥८०॥
मग तियें कचोंळें उचलिलें ॥ धर्माचें अशुद्ध पडतां झेलिलें ॥ तंव वैराट ह्मणे चोज ॥ केवढे देखा मांडलें ॥८१॥
वैराट सैरंघ्रीसि ह्मणे ॥ अशुद्ध वीरच्यावरीच धरणें ॥ कीं भूमीं पडों नये रक्त ॥ वोखटें राष्ट्रा कारणें ॥८२॥
तंव सैरंघ्री देत उत्तर ॥ भूपती कीं विप्र पवित्र ॥ अशुद्ध न पडावे भूमीवरी ॥ द्विजवेष धर्म साचार ॥८३॥
इतुका वृत्तांत वर्तला ॥ तंव पार्थ नगरीं आला ॥ शंख स्फुरिला देवदत्त ॥ आणि हनुमंत भुभुःकारला ॥८४॥
सकळीं देखिला धनुर्धर ॥ महाप्रौढीं पार्थवीर ॥ उत्तर जालासे सारथी ॥ ध्वजस्तंभीं वानरवर ॥८५॥
अवघी पुरतां नष्टचर्याची ॥ रूपें पालटलीं पांडवांचीं ॥ जाहली सौभाग्यसुंदरा ॥ पांचाळकन्या सैरंघ्रीची ॥८६॥
विराट खिसावला मनीं ॥ लागला धर्माचिये चरणी ॥ घांवोनि आलिंगिलें पार्था ॥ लोक करिती ओंवाळणी ॥८७॥
नकुळ सहदेव भीमसेन ॥ रायें अलिंगिले धांवोन ॥ चरणीं लागोनि द्रौपदीच्या ॥ मग आलिंगिला नंदन ॥८८॥
यावरी सकळ क्षेमवार्ता ॥ उत्तर जाहला सांगता ॥ ते ऐकोनि सकळ जनीं ॥ ओंवाळिलें पंडुसुतां ॥८९॥
मंगलध्वनी लागले ॥ नगर विराटें श्रृंगारिलें ॥ करोनि मंगळ वाघावणीं ॥ पार्थीं नगरीं मिरविलें ॥९०॥
मग सभामंडपांत ॥ प्रवेशले आनंदभरित ॥ घनदाट भरली सभा ॥ धर्मे आलिंगिला पार्थ ॥९१॥
पांचही बंधु पाचाळी ॥ भेटलीं प्रेमाच्या कल्लोळीं ॥ तंव दिवस मावळोनी ॥ लागली दीपकप्रभावळी ॥९२॥
कळापात्रें भाट ब्राह्मण ॥ मिळाले नानविध गुणिजन ॥ कळाकुशळता जाणोनि ॥ रायें दीधलें इच्छादान ॥९३॥
विराट गेला मंदिरांत ॥ करीत राणीसीं येकांत ॥ ह्मणे सिंहासनीं धर्मराजा ॥ बैसवूं उत्साहें सहित ॥९४॥
मागां संवत्सरअर्जित ॥ अपराथ घडले समस्त ॥ ते क्षमा करितां युधिष्ठिरें ॥ बरवें मानील कृष्णनाथ ॥९५॥
तंव सुदेष्णा राज्ञी ह्मणे ॥ आजी महोत्साह करणें ॥ षोडशोपचारें करूनी ॥ बरवें युधिष्ठिरा मानवणें ॥९६॥
मग सकळ कुंटुबेसहित ॥ राव आला सभेआंत ॥ सकळ उपचार आणीले ॥ मंगळतुरीं गर्जत ॥९७॥
पांडवां दंडवतें करोनी ॥ राव करीतसे विनवणी ॥ जीजी अपराध क्षमा कीजे ॥ मी दासानुदास ह्मणोनी ॥९८॥
तंव मत्स्यासिह्मणे युधिष्ठिर ॥ तुमचा थोर आह्मां उपकार ॥ क्रमिलें नष्टचर्य तुमचेनी ॥ मग आलिंगिल नृपवर ॥९९॥
यावरी मत्स्यरायें प्राथोंनी ॥ धर्मे बैसविला सिंहासनीं ॥ शुद्धदशमी आश्विनमास ॥ मुहूर्त साधिला ब्राह्मणीं ॥१००॥
टिळा सारिला मंत्रोज्चारें ॥ अभिषेक केला शुद्धनीरें ॥ मग गर्जती वेदघोष ॥ श्रृंगारिले अलंकारें ॥१॥
वस्त्रें भूषणें पांडवांसी ॥ विराटें दिधलीं आदरेंसीं ॥ वाहोनि द्रौपदीय अलंकार ॥ संतोषविलें सकळांसी ॥२॥
मग राव आणि राणी ॥ उत्तर उत्तराची बहिणी ॥ दंडवतें घालिताती ॥ सकळही आनंदोनी ॥३॥
तैं द्रौपदीचिये चरणा ॥ लागली भावें सुदेष्णा ॥ ह्मणे अपराध क्षमा करीं वो ॥ येरीनें दीधलें आलिंगना ॥४॥
मग पांचशतें दासी ॥ दीधल्या द्रौपदीसेवेसी ॥ आणि आपुलें मंदिर ॥ रायें वोपिलें पांडवांसी ॥५॥
सकळां टिळेविडे जाहलें ॥ यावरी सभेतें विसर्जिलें ॥ क्रमिली तीनप्रहार रात्रीं ॥ ऐसें चरित्र वर्तलें ॥६॥
तये आनंदाचे सोहळे ॥ वर्णितां ग्रंथ कदा नाकळे ॥ असो स्वधर्में पूर्ववत ॥ पांडव वैराटी राहिले ॥७॥
नष्टचर्य सरोनि गेलें ॥ भाषावचन साच केलें ॥ सत्व रक्षिलें पांडवां ॥ स्वर्गीं देव आंनले ॥८॥
सुरदुंदुभी वाजताती ॥ पुष्पवृष्ठी करी सुरपती ॥ हे विराटपर्वीची कथा ॥ देवां सांगे बृहस्पती ॥९॥
आतां वैराटीं येईल श्रीपती ॥ आणि समस्त राजे मिळती ॥ मग द्दारकेहूनियां ॥ सुभेद्रेतें आणिती ॥११०॥
उत्तरा अभुमान्यातें देउनी ॥ विवाहो करितील हर्षोनी ॥ ते उद्योगपर्वींची कथा ॥ सांगिजेल संकलोनी ॥११॥
झाडकवी मुद्रा पाडोनी ॥ आरण्य विराट पर्वें दोनी ॥ कथिलीं महाराष्ट्राभावा ॥ सारासार उद्धरोनी ॥१२॥
हे भारती पांडवकथा ॥ ब्रह्माहत्या नाशी ऐकतां ॥ ह्मणोनि ह्मणे कविमधुकर ॥ अग्र परियेसावें श्रोतां ॥१३॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरू ॥ द्वादशाऽध्यायीं कथियेला ॥ पांडवप्रकटताप्रकारू ॥११४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥