ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग १
वामन.पंडित,vaman.pandit,ब्रम्हस्तुति,brahmastuti
ज्याणें मुक्ति अधासुरासि दिधली वत्सां मुलां जीवनें
ज्याणें देउनिया सरोवर - तटीं आरंभिलीं भोजनें
जो कां वत्सप - वत्सरुप विधिनें सर्वास नेल्यावरी
झाला अब्द भरी नमूं स्छिर चरी तो चित्स्वरुपी हरी ॥१॥
ज्याणें दाउनियं अतर्क्य - महिमा ब्रम्हा मनीं मोहिला
तो आच्छादूनि नंद - नंदन वनीं जो एकला राहिला
तेव्हां सावध होउनी नमुनियां ब्रम्हा करी जे स्तुती
त्या ब्रम्ह - स्तुतिची करी हरिच तो टीका स्वयें श्रीपती ॥२॥
जो कां एक अनेकरुप दिसतो तो वामनाच्या मुखें
टीका या स्तुतिची करुनि करितो श्रोत्यां जनाला सुखें
ब्रम्हा नेत्र - जळें पदाब्ज युगुळें न्हाणूनियां जेथुनी
श्रीभद्भागवतीं करी स्तुति तिची टिका पहा तेथुनी ॥३॥
ब्रम्हयानें हरिरुप दृष्टि सहजें तेव्हां वनी देखिलें
श्री - गोपाळपणांत बाळपणिचें प्रेमें मनीं रेखिलें
आधीं वेष तसाच वर्णुनि तया वंदूनियां त्यावरी
त्याची निर्गुणता तथा सगुणता वर्णील ते वैखरी ॥४॥
जो एक स्तुति योग्य तूं विधि म्हणे नंदात्मजा त्या तुतें
मी वंदीन जया स्वरुप बरवें अत्यंत हें साजतें
मेघ श्याम शरीर - बीज झळके त्यामाजि पीतांबरीं
गुंजांचे अवतंस मोर - मुगुटीं शोभे मुखश्री बरी ॥५॥
जेव्हां मारुनियां अघासुर वनीं आरंभिलीं भोजनें
तेव्हां वेष जसा तसाच विधिला येथें जगज्जीवनें
दृष्टीं दाखविला चतुर्मुख तया वर्णील रुपा बरें
या श्लोकांतचि उत्तरार्ध रचितां ऐसीं पहा अक्षरें ॥६॥
कंठीं श्रीवन - माळिका करतळीं दध्यो - दनाचा बरा
शोभे ग्रास - विलास वेणु जठरी पीतांबरीं साजिरा
श्रृंगी आणिक वेत्रही धरियला कांखेस डावेकडे
जेवी सव्य - करीं हरी मृदुपरीं त्याच्या विधाता पडे ॥७॥
एवं कृष्ण असे सुवेध - विधिनें गोपाळ - वेषें असा
माथां बंदुनि वर्णिला स्व - नयनीं तत्काळ भासे जसा
आम्हा या तनुचा अतर्क्य महिमा हा वर्णवेना कधीं
तेव्हां वर्णिल कोण आणिक असें बोलेल आतां विधी ॥८॥
ऐसा गोवळ - वेष केवळ जसा पद्मोद्भवें देखिला
तैसा वर्णुनि शंकला हरि अहो गौळीच म्यां लेखिला
जो या देवपणीं अतर्क्य महिमा जो तर्कवेना कधीं
तेव्हां वर्णवतो अतींद्रिय कसा बोलेल ऐसें विधी ॥९॥
जें तूझें अवतार - रुप दिसतें दृष्टीस सर्वा जनां
हेंही केवळ पांच - भौतिक नव्हे देवा जगज्जीवना
जें माझ्याच अनुग्रहार्थ रचिलें ऐकोनि मत्प्रार्थना
याचाही महिमा कधीं नगवसे कोणाचियाही मना ॥१०॥
जें दृष्टीस दिसे मना न गवसे याचा जयीं नाकळे
कोण्हाला महिमा अतींद्रियपणीं माहात्म्य कैसें कळे
आनंदात्मक पाणि पाद न जया जें शुद्ध मायामय
ब्रम्हात्मानुभवैक मात्र अवघें होऊनि जें अद्वय ॥११॥
ज्या देवासि अपाणिपाद म्हणती वेदस्मृती तत्वता
तों तो होउनियां अहो सगुणही त्याला निराकारता
कर्णावांचुनि ऐकतो श्रुति म्हणे नेत्रांविणें पाहतो
तेव्हां निर्गुण - धर्महीन न घडे मायामय स्वामि तो ॥१२॥
जें ब्रम्ह तें धर्मविहीन आहे न आइके आणिक तें न पाहे
साक्षित्वही निर्गुणता न साहे प्रकाशवी दीप उगाच राहे ॥१३॥
दीप - प्रकाशें तरि नेत्र पाहे नेत्रांविणें दीप उगाच आहे
मायेंविणें ब्रम्ह न धर्म साहे श्रुतींत येथें सगुणात्मता हे ॥१४॥
साक्षात् सुखानुभव रुप तुझें तयाचा
कैंचा कळेल महिमा म्हणऊनि वाचा
श्लोकांत यांत वदली कमळासनाची
तेही अहो सगुणताचि जनार्दनाची ॥१५॥
ब्रम्ह तों सुखचि केवळ आहे तें निजात्म - सुख ईश्वर पाहे
त्यासही न कर पाद तथापी भक्त वत्सल रमापति - रुपीं ॥१६॥
नयन हेंचि अतींद्रिय दोंपरी सगुण एकचि वर्णियला हरी
प्रकटरुप महत्वहि नाकळे तरि अतींद्रिय - भाग्य कसें कळे ॥१७॥
भाव हाचि महिमेंत न कांहीं तारतम्य उभयत्रहि नाहीं
न्यून पूर्ण महिमा न हरीचा रुप - भेद - महिमा सम साचा ॥१८॥
आत्मत्व भक्ति सहजें प्रियता विधाता
श्लोकांत या तिसरियाच वदेल आतां
पूर्वी अतर्क्य महिमा वदला विरिंची
यालागिं येविषइं शंकित - बुद्धि त्याची ॥१९॥
न महिमा हरिचा जरि आकळे तरि निजानुभवत्व कसें कळे
न कळतां भयबंध तुटे कसा म्हणुनि संशय उद्भवला असा ॥२०॥
तरि समुद्र - तरंग जळीं मुरे मग दुजेपण त्यांत कधीं नुरे
मन मुरे स्वचिदात्मपणीं जरी कळणियांत तयांत नुरे उरी ॥२१॥
परि अनुभव ऐसा साधकां होय तेव्हां
जरि भजन - विशेषें तत्कृपा होय जेव्हां
भजन सफळ तेव्हां भक्ति जेव्हां ठसाचे
सकळहि कळणें तें भक्ति मागेंचि धांवे ॥२२॥
असे वत्स जेथें जसी गाय धांवे तसा बोध ही भक्ति तेथें ठसावे
परी प्रीति जे ईश्वरीं आत्मभावें तिये प्रीतिला भक्ति ऐसें म्हणावें ॥२३॥
कळे आत्मता बोध झालाचि त्याला पुढें भक्तिनें साध्य तों केवि बोला
असे बोलती दांभिक ज्ञानभानी कुतर्काश्रयें शब्द बोधभिमानी ॥२४॥
जड निषेधुनि शुद्ध चिदात्मता गुरु मुखें कळली जरि तत्वतां
मन मुरोनि अशेषपणें उरे तरिच सिद्ध न जेथ दुजें स्फुरे ॥२५॥
यालागिं जीवेश्वर - ऐक्य जेव्हां कळे निजात्मा कळलाचि तेव्हां
आत्मप्रियत्वें गुरु - देव - भक्ती करील तेव्हांच समाधि - मुक्ती ॥२६॥
श्रुती यस्य देवे परा भक्ति ऐसी पहा बोलती याच अर्थास कैसी
गुरु होय दावी चिदात्मत्व जेव्हां तयाची करावी अहो भक्ति तेव्हां ॥२७॥
जसी कां देवाची करि परम भक्ती प्रियपणें
गुरुची ही तैसी करि जरि मनें ऐक्य - निपुणें
गुरुनें जे त्याला अनुभवरहस्यार्थ कथिले
प्रकाशूनी प्राप्ती स्छिति परम देती मग भले ॥२८॥
श्रुतीचा असा अर्थ यालागिं जेव्हां करी भक्ति आत्मज्ञ तो सिद्ध तेव्हां
गुरुच्या मुखें जें कळे शब्द - बोधें तयाची स्थिती स्वात्मता - भक्ति वेधें ॥२९॥
याकारणें तत्वमसीतिवाक्यें जीवेश - वाच्यांश - निषेध - ऐक्यें
आत्म - प्रियत्वें गुरु - देव - भक्ती करी मुरे चित्त तईच मुक्ती ॥३०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP