कोण्ही जडाजड - विवेक करुनि धाले
ज्ञानाभिमान मनिं मानुनि मूढ झाले
आतां किमर्थ म्हणती सगुणा भजावें
ते ज्ञान - गर्व - निधि हेंचि तयां म्हणावें ॥३१॥
अभ्यासही करिति केवळ निर्गुणाचा
तों तों अधीक मनिं आदर मीपणाचा
अभ्यास मी बहुवरा करणार ऐसा
चित्तांत भाव सहसा उपजे न कैंसा ॥३२॥
आत्मज्ञ होउनिहि जे भजती मुकुंदा
त्याचा सदा श्रवण - कीर्तन - रुप धंदा
आत्मैक्य - भक्ति त्दृदयीं गुण दिव्य कानीं
ते सिद्धि होउनि कदापि न होति मानी ॥३३॥
श्रवण - कीर्तन - भक्ति जसी जसी हरि - कृपा अभिवृद्धि तसी तसी
जसि कृपा उपजे मधुसूदना तसि तसी अगुणीं स्थिरता मना ॥३४॥
जसि जसी स्थिरता हरिची दया तसतसा अवलोकिल तो तया
मनिं तरंग अहंकृतिचा कसा मग उठे जरि निश्चय हा असा ॥३५॥
ज्ञाता स्व - भक्तिंच करी दृढ - बोध - सिद्धी
बोधीं न भक्तिविण निश्चळ होय बुद्धी
याकारणें अजित - भक्ति - महत्त्व आतां
ज्ञानाहुनी अधिक वर्णितसे विधाता ॥३६॥
ज्ञानीं प्रयास मन - सुस्थिरता कराया
आत्मज्ञ मांडिति भवांबुधितें तराया
चित्त - स्थिरत्व करितां श्रमि फार होती
वृत्ती निरोधिति तथापि न त्या रहाती ॥३७॥
ते शुद्ध - निर्गुण - उपासक - कष्ट जेव्हां
ऐसे वृथा अफळ देखति तेचि तेव्हां
ब्रम्हा म्हणे हरि तुझ्या चरणार विंदा
बंदूनि मांडिति तव - श्रवणादि धंदा ॥३८॥
योगी प्रयास न करुनि समस्त - भूतीं
वस्त्रांत तंतु तुज चिंतुनि येचिरीती
साष्टांग ते करिती वंदन विश्वरुपा
लक्षूनियां जड - जगांत हि चित्स्वरुपा ॥३९॥
ज्ञाने प्रयास मुदपास्य नमंत एव
श्लोकांत या चरणिं येरिती हाचि भाव
ज्ञानीं प्रयास न करी सगुणात्मयोगी
ज्ञानें तथापि करि वंदन वीतरागी ॥४०॥
ज्ञानीं प्रयास न करुनिहि बोधरीती
विश्वात्मते करुनि वंदन ते करीती
भेदें करुनि भजणें पश्रु तुल्य ऐसें
स्पष्ट श्रुती वदति जाणति ते न कैसें ॥४१॥
ज्ञानें असे करिति ते प्रणिपात तूतें
तूझे कथामृतचि जीवन त्यांस होतें
लीला तुझ्या श्रवणिं आइकती मुकुंदा
सांडुनि योग - पथ आणिक सर्वधंदा ॥४२॥
जे संत - त्दृत्कमळ - सार - सुधा निघाली
त्यांच्या मुखेंकरुनि कर्ण पुटास आली
बा रे अशी हरि - कृपारव्य - सुधेस प्याले
ज्ञानें श्रमाग्नि विझतां त्दृदयीं निवाले ॥४३॥
तूझ्या कथा त्रिविध ताप हरी हरीती
कष्टाविणें श्रवण - अमृत जें भरीती
स्थानें धरुनि वसती श्रवणार्थ जेथें
कानीं कथा रिघति आपणहूनि तेथें ॥४४॥
एकाग्र - चित्त - तनु निश्चळ मौन वाचे
जे येरिती कवळ घेति कथामृताचे
ब्रम्हा म्हणे अजित तूं तुज जिंकणारे
नाहींत यद्यपि तयां वश तूं मुरारे ॥४५॥
टाकूनियां इतर - साधन - मात्र धंदा
तूझी कथा सतत आइकती मुकुंदा
त्यांचें जिणें सकळ जे भगवत्कथेतें
मानूनि जीवन जिती त्यजिती व्यथेतें ॥४६॥
श्लोकांत या तिसरियांत पदापदाचा
जो वामनानन - पुटीं हरिरुप वाचा
वाक्यार्थ - भाय वदली बरव्या प्रकारें
पाहोत संत हरि - भक्ति - पथें विचारें ॥४७॥
योग - प्रयास - पथ टाकुनियां मुकुंदा
आत्मैक्य - भक्ति करुनी तव - भक्ति - धंदा
आरंभिती श्रवण - वंदनरुप त्यांला
होतोसि तूं वश असें विधि बोलियेला ॥४८॥
यानंतरें बोलतसे विरिंची कीं भक्ति हे टाकुनियां हरीची
ज्ञानार्थ मोठ्या पडती प्रयासीं न कष्ट देती फळ तें तयांसी ॥४९॥
अमृत - पुष्करणी धरणी - वरी सकळ - मंडळ जेथ झरे हरी
असिहि टांकुनि भक्ति तुझी बरी श्रमति ते श्रममात्र तयां उरी ॥५०॥
टाकूनि भक्ति - असि केवळ बोध - सिद्धी
जे भक्ति - गम्य जन इच्छिति ते समाधी
टाकूनियां सकस तंदुळ - गर्भ शाळी
जे स्थूळ फोल कुटिती श्रमती त्रिकाळीं ॥५१॥
अव्यक्त निर्गुणचि भोगुनि यत्न - रत्नें
होऊनि खिन्न शिरिं वंदिति भक्ति यत्नें
श्लोकामधें तिसरिचा विधि भक्ति ऐसें
जें बोलिला विशद वर्णियलेंच तैसें ॥५२॥
आत्मैक्य एक करिती सगुणीं उपेक्षा
जे ज`जान - गर्वित न सेविति अंबुजाक्षा
श्लोकांत येथ चवथ्यांत कुबुद्धि त्यांची
गोपाळ - रुप हरिसीं वदला विरिंची ॥५३॥
आत्मज्ञ हे द्विविध येरिति वर्णियेले
आत्मज्ञ आणि सगुण प्रिय थोर केले
आत्मज्ञता सुगम हे चिदचिद्विवेकीं
केली निरर्थक तथापि अभक्त लोकीं ॥५४॥
आत्मा प्रकाशक जडासि असें कळाया
आयास काय परि जोंवरि देवराया
नारायणा न भजती स्थिति त्यांस नाहीं
हा शब्द बोधचि न सिद्धि तयांत कांहीं ॥५५॥
जे देवतांतर - उपासक मात्र आधीं
सत्संगमें धरियली शुचि - आत्मबोधीं
आत्मा प्रकाशक असें कळलें तथापी
सर्वात्मता न कळली हरिंच्या स्वरुपीं ॥५६॥
ते बोध - यत्नहि करुनि कितेक कष्टी
होऊनियां मग विचारुनि दूर दृष्टी
श्रीविष्णुभक्ति करितां कृतकृत्य झाले
श्लोकांत त्या तिसरि यांत निरुपियेलें ॥५७॥
श्लोकांत जे कथियले विधिनें चतुर्थी
आत्मज्ञ होउनिहि ते पडले अनर्थी
आत्मज्ञ हे द्विविध येरिति वर्णियेले
आत्मज्ञ आणि सगुण प्रिय थोर केले ॥५८॥
आधींच विष्णु - भजनीं न जयां प्रवृत्ती
होऊनि खिन्न मग जे हरिभक्त होती
त्यांलागिं कष्ट बहु फार म्हणे विधाता
वर्णील विष्णु - भजनीं सुगमत्व आतां ॥५९॥
आत्मा न जाणतहि जे भजती मुकुंदा
त्याचा सदा करिति जे श्रवणादि - धंदा
त्यांला गुरु हरिच होउनि अप्रयासें
देईल बोध परिपूर्ण वदेल ऐसें ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP