ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग ७
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
आत्मैक्य मात्र कळतां विदचिद्विवेकीं
तूं आणि आपण नभिन्न म्हणूनि एकीं
तूझा अनादर तिहीं धरिलाच जैसा
हाही तसाच पडला मज मोह फांसा ॥१८१॥
भावें अशा कमळ - संभव बोलताहे
कीं ऐक्य सत्य परि तुल्यपणा नसाहे
एकत्व आणि स्वमहत्त्व लघुत्व कैसें
साधा म्हणाल तरि साधिल तोचि ऐसें ॥१८२॥
आत्मत्व - भेद नदिसे मज तूज कांहीं
ऐसें तथापि महदंतर साम्य नाहीं
दावाग्निमाजि जसि एक शिखा स्वरुपीं
मी तूझिया हरि तसा महदंत रुपीं ॥१८३॥
अनेका घटीं एक आकाश जैसा
अनेका शरीरी हरी बिंब तैस
घटाच्या जळीं भिन्न आकाश नाना
तरी भिन्नता त्या नभाला असेना ॥१८४॥
न जीवेश्वरां भेद ऐसा तथापी
अनंतत्व बिंबत्व विष्णु - स्वरुपीं
तयाचे कृपेनें जयीं ऐक्य होतें
अनंतत्व त्याचें तयीं यास येतें ॥१८५॥
नाहीं तरी बिंब अनंत साचा
हा एकदेशी प्रतिबिंब त्याचा
ब्रम्हा म्हणे यास्तव विष्णु - धामीं
अग्नीमध्यें जेविं शिग्या तसामीं ॥१८६॥
तद्दिष्णो परमंपदं म्हणुनियां श्रुत्यर्थही पाहतां
जे कां पाहति संतबिंब पदतें श्री विष्णुचे तत्त्वतां
ब्रम्हादि प्रतिबिंब बिंब नव्हती बिबैक्यता पावती
बिंबैक्यें महदंतर श्रुतिमुखें ब्रम्हा वदे वेरिती ॥१८७॥
येणें करुनि सकळात्मक तूं मुरारी
आत्मा स्वदेह मयमात्रचि मी शरीरी
यालागिं तूज मज अंतर फार देवा
इत्यादि भाव विधि दाखवि वासुदेवा ॥१८८॥
जैसाच उत्तम अनंतगुणें उपाधी
तैसें स्वरुपहि अनंत म्हणूनि साधी
दोंही परी विधि अनंत - गुणें उपामी
सामर्थ्य काय मज तेथ अनंत - धार्मी ॥१८९॥
अंगी करुनि अपराध निवेदियेला
आतां क्षमा करिं म्हणेल पुढें हरीला
येथूनियां चरण एक समाप्त झाला
श्रीकृष्ण - ब्रम्ह - चरणींच समर्पियेला ॥१९०॥
श्रीभद्भागवतीं विचित्र दशम स्कंधी विरंबि - स्तुती
तीची वामत हे त्रिविक्रमपणें व्याख्या करी श्रीपती
टीका या करितांचि हे त्रिचरणी लोकप्रयीं संचरे
येथें या चरणीं मुकुंद - चरणी सप्रेम जो तो तरे ॥१९१॥
नव श्लोकी लोकीं विधि - जनक - अंकी जसि रमा
असी टीका जेकां मिरवित असे विष्णुमहिमा
समर्पू श्रीकृष्णा विषय - बहुतृष्णा त्यजुनियां
पहावी हे संतीं निजरति अनंतीं धरुनियां ॥१९२॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP