ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग ६
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
तरि रमापतिच्या पद - पंकजीं नभजतीरिक्षती अगुणीं निजीं
अचुक मीपण सत्पथ चूकवी निजविलास अगम्यचि दाखवी ॥१५१॥
आम्हीं स्वये ब्रम्ह म्हणोनि एकीं शब्दात्मबोधें चिदचिद्विवेकीं
जाणोनि अभ्यास किमर्थ आतां ते मानिती शाब्दिक बोध होतो ॥१५२॥
म्हणति विप्र न विप्रपणा स्मरे तरिहि विप्रपणास न अंतरे
जरि सुवाशिणि मी नम्हणे मनीं तरि सुवाशिणि ते मिरवे जनीं ॥१५३॥
अशा स्थूळ द्रिष्टींचिया या कुयुक्ती बहू बोलती मानिती त्यांस मुक्ती
जरी ब्राम्हण ब्राम्हणत्वा स्मरेना तरी श्रूद्र मी हें तयाला स्फुरेना ॥१५४॥
मी सौभाग्यवती असें घडि घडी ते आठवेना जरी
वैधव्य - स्फुरणें न नापित - गृहा क्षौरार्थ जाते तरी
ब्रम्हात्यत्व न आठवी जई तई देहात्मता आयती
ते देहात्मकता धरुनि धरिते संस्कार पूर्वस्थिती ॥१५५॥
दृष्टीविना दीप जसा कळेना बुद्धी विना ब्रम्हहि आकळेना
देहात्मतेची तिस पूर्वखोडी अभ्यास - योगाविण ते नसोडी ॥१५६॥
जाणोनि अभ्यास किमर्थ आतां आम्हांस कां हो सगुणात्म चिंता
जोडे अहंकार तयास पेसा तो विष्णु - भक्तीविण जाय कैसा ॥१५७॥
अभ्यासही करिति एक निज - स्वरुपीं
सोडी तयांसहि न मीपण तें तथापी
आम्ही करुं करितसें दृढ योग ऐसा
चित्तांत भाव उपजे सहसा न कैसा ॥१५८॥
अभ्यास मी करीन आणिक आजि केला
अभ्यासही करुनि मीपण तें तयाला
कोण्हीं मनांत समजोनि अकर्तृता ही
आम्हांस कर्तृपण ते म्हणताति नाहीं ॥१५९॥
ऐसा अहंकृति - विलास मना सुटेना
हे श्रृंखळा हरिकृपेविण तों तुटेना
जो ज्ञान - लाभ हरि - भक्त - जनास वाटे
तेतों कृपा म्हणुनि हेचि मनांत दाटे ॥१६०॥
जो लाभ तो हरिकृपेस्तव हेचि बुद्धी
जो देखतो हरिकृपेस्तव सर्व - सिद्धी
तो विष्णु - भक्तहि कसा कसि सिद्धि त्याची
हे कृष्णपाद - कमळीं वदतो विरंची ॥१६१॥
जें बोलिलों विधि म्हणे अगुणात्म - सिद्धी
जेथें समाधि - सुख आत्म - सुधा - समृद्धी
तेतों कृपा तुझिच केवळ भक्त पाहे
त्याच्या मनीं असि अहंकृति केविं राहे ॥१६२॥
अभ्यासयोग करितां मज या समृद्धी
ऐसें कदापि न मनीं तव - भक्त - बुद्धी
तो तों क्षणक्षणिं तुझेच कृपेस पाहे
त्याचे मनीं मग अहंकृति केविं राहे ॥१६३॥
ज्ञानेकरुनि निरहंकृति चित्त झालें
जें कां अकर्मपणही त्दृदया निघालें
हे सर्वही तवकृपेकरितांचि पाहे
त्याचे मनीं असि अहंकृति केविं राहे ॥१६४॥
श्लोकांत या विधि म्हणे सु - समिक्षमाणा
कीं भाय हा निजमनांतील सुत जाणो
यालागिं येथ सु - समिक्षण रीति कांहीं
जे वर्णिली किमपि मूळ - विरुद्ध नाहीं ॥१६५॥
येथेंचि या उपरि भक्ति विरक्ति त्याची
सर्वज्ञ - पाद - कमळीं विनवी विरंची
कीं पूर्व - कर्म - फळमात्रचि भोगितो तो
वैराग्य याच चरणीं विधि सूचवी तो ॥१६६॥
कीं हो मला सुख असी सकळांस इच्छा
तो मीपणारहित हे न तयास वांच्छा
प्रारब्ध - भोग नसटे म्हणऊनि भोगी
भोगूनितें सुखहि मागुति वीतरागी ॥१६७॥
त्याची वदेल विधि मागुति येथ भक्ती
निःसंशयें जितचि वर्णिल त्यास मुक्ती
कीं तो मनें करुनि वैखरिनें शरीरें
ध्यानीं असोनिहि भजे विविधा प्रकारें ॥१६८॥
त्याचे निमग्न मन निर्गुण - चित्स्वरुपी
कीं तंतु आपण पटीं जड - विश्व - रुपीं
किंवा तुझ्या सगुण सुंदर दिव्य मूर्ती
ध्यातो मुखीं श्रवणलब्ध तुझ्याच कीर्ती ॥१६९॥
तूं विश्वरुप सचराचर देह तूं हें
ध्यानीं स्मरोनि तुज येरिति वंदिताहें
त्या वंदनी चरणिं या धरणीस पाहें
लोळोनि तीवरि समग्र शरीर बाहे ॥१७०॥
ध्यातो मनें तुज मुखें तव कीर्ति गातों
देहें करुनि करि वंदन नृत्यही तो
देहें मनें करुनियां वचनें विरंची
जे सुज्ञ सूचवि तयांप्रति भक्ति त्याची ॥१७१॥
जो भक्ति येरिति करोनि कृपाच पाहे
हे भक्ति मीं करितसें इतुकें नसाहे
आत्मैक्य - भक्ति दृढ आणि उपाधि भेदें
या सेव्य - सेवकपणें भजतो प्रसादें ॥१७२॥
जो भक्ति येरिति करोनि भजे तयाची
श्लोकांत याचि गतिही वदतो विरंची
जो जी असा जितचि मुक्त तया म्हणूनी
ब्रम्हा म्हणेल चवथ्या चरणे करुनी ॥१७३॥
सत्पुत्र जेविं पितृ - भाग्य - विलास भोगी
तो नित्य मुक्त - पदवीस तसा विभागी
प्रारब्ध शेष म्हणऊनि शरीरधारी
ऐसा तथापि तवरुपचि तो मुरारी ॥१७४॥
पित्याची धनें भोगितो पुत्र जैसा
विभागी तुझ्या मुक्तिचा भक्त तैसा
विधाता असें आपुल्या मायबापा
म्हणे वर्णितां तत्कृपेच्या प्रतापा ॥१७५॥
जो आठवा देवकिचा मुरारी
जो आठवा कृष्ण दशावतारी
हा आठवा श्लोक धरुनि चित्तीं
तो आठवा येरिति चित्तवृत्तीं ॥१७६॥
विना भक्ति आत्मज्ञही भ्रष्ट झाले
अहंकार - डोहीं स्वदेहीं बुडाले
असें बोलिला यावरी तो विधाता
म्हणे मीच दृष्टांत येथेंच आतां ॥१७७॥
पाहें हरी विधि म्हणे अपराध माझा
म्या वत्स - वत्सप - परिग्रह सर्व तूझा
नेला मनीं धरुनि केवळ भाव ऐसा
कीं कृष्ण यावरि करील विलास कैसा ॥१७८॥
आधींच कारण चराचर अंतरात्मा
ज्याचा कळे न निगमास अतर्क्य वर्त्मा
तो काय यावरि करील असें पहाय
मी कोण शक्ति मजला किति देवराया ॥१७९॥
या आमुच्या सकळशक्तिहि अंश जीचे
माया अनादि कळती न विलास तीचे
तीचा नियामक तयाबरि म्या स्वमाया
विस्तारिली विभव काय असें पहाया ॥१८०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP