ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग ४
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
परम अमळ ज्याचे अंतरात्मे मुरारी
वदनिंहुनि तयांच्या केवळात्मा विचारी
तदुपरि महिमेतें निर्गुणाच्या तुझ्या तो
हळुहळु समजाया माधवा योग्य होतो ॥९१॥
गुरुमुखें कळल्यावरि आत्मता अगुणिंचा महिमा मग तत्वता
कळतसे कळण्यासहि योग्यता घडतसे म्हणतो विधि अच्युता ॥९२॥
आत्मज्ञता द्विविध यास्तव या विचारें
बुद्धीस श्रुद्धि म्हणऊनिच दोंप्रकारें
शुद्धात्मता गुरुमुखें कळली तथापी
आत्मज्ञ भक्ति करितां मिळतो स्वरुपीं ॥९३॥
जरी हेम तावोनियां ओप देती तयांतीलत्या मिथ धातून जाती
कसीं लावितां दिसे हीन सोनें तसीं शुद्ध चित्तें अहो भक्ति हीनें ॥९४॥
करुनि विहित कर्मे साधिली चित्तश्रुद्धी
श्रवण - मनन मात्रीं योग्यता हेचि सिद्धी
जरि मन विधरेना सेवितां विष्णुलीला
अकळचि महिमा हा गिर्गुणाचा तयाला ॥९५॥
कनक जेरिति घातलिया पुठीं इतर धातु जळे मग शेवटीं
कनक केवळ शुद्ध जसें उरे अमळ चित्त तसें अगुणीं मुरे ॥९६॥
आत्मज्ञ आत्मरतितें भजती हरीला
प्रेमें मनीं द्रवति सेउनि विष्णु - लीला
होईल येरिति जसीजसि सत्व - शुद्धी
तत्त्वींच सत्व मुरतां अगुणात्म - सिद्धी ॥९७॥
जो स्कंध एकादश तेथ देवें हें उद्धवालागुनि वासुदेवें
श्लोक द्वयें वर्णियलें तयाचा भावार्थही वर्णिल कृष्ण - वाचा ॥९८॥
टाकी सुवर्ण मळ बात्द्य हुताशनें तें
तेंही पुठीं द्रवविलें तरि शुद्ध होतें
भावें अशा विविध ताप वदे तयातें
कीं तें पुन्हा द्रवविलें तरि शुद्ध होतें ॥९९॥
ऐशीच शुद्ध जरि कर्म करुनि बुद्धी
आत्मैक्य - भक्ति करितां मग पूर्ण सिद्धी
कर्मेंचि शुद्धि परि आशय त्याच कर्मा
तोही त्यजी श्रवण - कीर्तन - विष्णु - धर्मा ॥१००॥
माझें कथा - श्रवण आणिक नाम वाचे
गातां धुतो जसजसे मळ हो मनाचे
तत्वासहीत सतता अति - सूक्ष्म दृष्टी
पाहे मदात्मक चराचर सर्व सृष्टी ॥१०१॥
तत्व स्वयें स्थिरचरांतहि सिद्ध आहे
जो दृष्टि निर्मळ करील तयास पाहे
चित्तांत जे रज - तमोगुण त्यांस नाशी
माद्भक्ति अंजन मनोमय लोचनासी ॥१०२॥
या कारणें गुरुमुखें समजोनि तत्व
भक्ती करुनि जरि शोधिल शुद्ध सत्व
तो एक निर्गुण - महामहिमेस पावे
पावोनि शुद्धि त्दृदयीं अगुणीं स्थिरावे ॥१०३॥
या कारणें गुरुमुखें म्हणतो विधाता
जाणोनि तत्व मग साधक तो अनंता
होईल योग्य अगुणीं महिमा कळाया
पूर्वोक्त भक्त तव सेवक देवराया ॥१०४॥
ऐसें तथापिहि समाधिविणें कळेना
जो कां अनंत मन - बुद्धिस आकळेना
त्या निर्गुणीं मन तदात्मकतेस पावे
तेव्हां अनंतमय मानस तें ठसावे ॥१०५॥
सिंधूमधें लहरि जेसमयीं निमाली
गंभीरता तिस अलभ्यहि लभ्य झाली
तैसें मुरे मन जई अगुणीं तयाचा
तेव्हां अनंत - महिमा कळलाच साचा ॥१०६॥
कीं त्या अनंत - महिमेंत अनंत हेंही
झालेंचि तन्मय जई न विरुद्ध कांहीं
सिधूंत सैंधव - खडा विघरोनि गेला
त्याला समुद्र म्हणती न किमर्थ बोला ॥१०७॥
कैसें अहो मन तदात्मकतेस पावे
त्याच्या अनंत - महिमेस कसें ठसावें
तें बोलतो कमळसंभव उत्तरार्धी
श्लोकांत या नकरितां बहु शब्द - वृद्धी ॥१०८॥
मन अविक्रिय होउनियां मुरे अगुण होउनियां अगुणी उरे
म्हणुनि यास्तव तो महिमा कळे इतर त्यास कदापि न आकळे ॥१०९॥
विषय तामस राजस इंद्रियें विमळ केवळ सत्त्व मन स्वयें
परि विकार तयास गुणद्वयें अगुणि तें अगुणात्मक निश्चयें ॥११०॥
परि न अच्युत तें मनही स्वयें विषयही जड आणिक इंद्रियें
करि मनास सचेतन आत्मता परि न हें जन जाणति तत्त्वता ॥१११॥
दीप प्रकाशी नयनास जैसा आत्मा प्रकाशी मन - बुद्धि तैसा
दीप - प्रकाशेंचि घटादि दृष्टी दिसे मना येरिति सर्व सृष्टी ॥११२॥
ते दृष्टि दीपासचि पाह ताहे तेव्हां पदार्था परतें नपाहे
ध्यानीं मन स्वात्मसुखें निमालें तैंवि क्रिया टाकुनि तेंचि झालें ॥११३॥
म्हणुनि निर्गुणींच्या महिमा मना कळतसे म्हणतों मधुसूदना
विधि असे वदला परि अंतरीं उपजला मनिं संशय यापरी ॥११४॥
जरि मनें त्यजिल्यावरि विक्रिया अगुणिंचा महिमा कळतो तया
तरि सुषुप्तिमधें न पडे कसा अगुणिच्या महिमेंत मना ठसा ॥११५॥
कमळसंभव मानुनियां असा त्दृदयिं संशय हा हरितो कसा
मन सुषुप्ति - विलक्षणता धरी म्हणुनि वर्णिल तो विधि यावरी ॥११६॥
जरी विक्रियातें सुषुप्तींत सोडी
नजाणे तमोलीन तेथील गोडी
समाधीमधें तें चिदाकाश रुप
मुरे निर्गुणीं स्वाऽनुभूति - स्वरुप ॥११७॥
सुषुप्तीमधें तों तमोलीन - चित्तीं
तसे लेशही स्वात्मतेची प्रतीती
समाधीमधें स्वात्मता - स्फूर्ति जेव्हां
ननिद्रा तसे विक्रिया त्यास तेव्हां ॥११८॥
असी ते अवस्थात्रयातीत तुर्या
विधाता असें बोलतो देववर्था
प्रसंगें तया अद्वितीयाऽनुभूती
वदे ते पाहावी विचारुनि संतीं ॥११९॥
जें कां मन स्वानुभवी स्छिरावे
तें निर्गुणाच्या महिमेस पावे
निजात्मभूतीस्तव शुद्ध तुर्या
जेथें कळे निर्गुण देववर्या ॥१२०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP