ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग ५
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
सुषुप्तिनें स्वानुभवें न जेव्हां कीं स्वप्न कीं जागृति होय तेव्हां
स्वप्नामधें अणिक जागरींहीं उणें नसे स्वानुभवास कांही ॥१२१॥
या पूर्व पक्षास हरुप पहातां तुर्याच ते स्थापितसे विधाता
कीं निर्गुणी चित्त अरुप होतें अरुप त्याचा महिमा पहातें ॥१२२॥
स्वप्नीं निजानुभव आणिक जो प्रबोधीं
देहादिरुप न तसा वदवे समाधीं
येथें निजानुभव केवळ जेथ कांहीं
देहादि सर्वहि चराचररुप नाहीं ॥१२३॥
स्वप्नीं निजानुभव आणिक जो प्रबोधीं
नाहीं म्हणोनिच विलक्षणता समाधी
हे स्वप्न - जागृति - सुषुप्तिहुनी निराळी
तुर्या अरुप मन जेथ समाधि काळीं ॥१२४॥
अविक्रियात् स्वानुभवादरुप तो
श्लोकाचिया या चरणीं विराजतो
तुर्येमधें ब्रम्हचि होय जेधवां
जाणे मन ब्रम्ह - महत्त्व तेधवां ॥१२५॥
असा निर्गुणानंद तुर्येत योगी
अवस्थात्रयातीत होऊनि भोगी
असें बोलतां येस्थळीं भेदवादी
न हें मानिती अज्ञ जेकां अनादी ॥१२६॥
अवस्थान्नयातीत होवोनि लक्षी तरी भिन्न तो बोलती पूर्व पक्षी
न तुर्येत या भिन्न तो ध्यान कर्ता निवारील धाता असी भेदवार्ता ॥१२७॥
अनन्य बोध्यात्मतया नचान्यथा
अशा चतुर्था चरणांत सर्वथा
न भेद येथे म्हणऊनियां विधी
वदेल अद्वैत - सुधा महासुधी ॥१२८॥
कळावया योग्य दुजें न जाणें
तदात्मकत्वेंच तयास जाणें
अनन्यबोधेंचि तयास पाहा
सामर्थ्य बोले विधि अर्थ तो हा ॥१२९॥
ज्याच्या अन्यपणें करुनि नघडे जाणावया योग्यता
शास्त्रीं त्यास अनन्य - बोध म्हणती तेव्हां कसा तत्त्वता
जाणावा तरि आत्मते करुनियां जाणावया योग्यता
यालागिं स्व - चिदात्मतें करुनियां जाणेल तो जाणता ॥१३०॥
ऐक्येंचि हो वैष्णव तो तयाला
जाणोनि ऐसा कतकृत्य झाला
जाणें तया द्वैतपणें न कोणीं
वाणी सही हे वदतेच वाणी ॥१३१॥
द्वैतेंचि जे भजति त्यांस न बोध - सिद्धी
त्यांच्या श्रुती वदति कीं पशुतुल्य बुद्धी
मी अन्य दैवतहि अन्य म्हणोनि देही
सेवी तया श्रुति म्हणें नकळेचि कांहीं ॥१३२॥
ज्ञानानिमित्त भजनी जन अज्ञ देवा
तेव्हां घडे कसि तयासहि ऐक्य - सेवा
भेदें भजेल मग त्यास अभेद - सिद्धी
हा पूर्वपक्ष करितो निगनार्थ - सिद्धी ॥१३३॥
अद्वैत हें निगम - सिद्ध खरें तथापी
नाहीं मला अनुभव स्व - सुख - स्वरुपीं
तो ईश्वरा मज घडो म्हणऊनि देवा
जिज्ञासु सेविल तयास फळेल सेवा ॥१३४॥
जे सर्वथा म्हणति अद्वयता घडेना
भेदाविणें इतर गोष्टिच आवडेना
जीवेश - भेद दृढ साधुनि वासुदेवा
जे सेविती पश्रुसमान तदीय - सेवा ॥१३५॥
ज्ञानाविणे अकळ अद्वय तत्त्व जेव्हां
ज्ञानार्थ जे भजति ऐक्य कळे न तेव्हां
त्याला असें म्हणतसे श्रुति हें घडेना
निदेस पात्र कुमताविण सांपडेना ॥१३६॥
जेकां धरुनि दृढ भेद - मताऽभिमाना
अद्वैत तत्त्व म्हणती सहसा घडेना
मानूनि भेद जन जे भजतीं मुकुंदा
त्यांचीच हे वदतसे श्रुति येथ निंदा ॥१३७॥
श्रुत्यर्थ्य हा मनिं धरुनि वदे विरंची
कीं अन्यथा भजति त्यांसहि सिद्धि कैंची
याकारणें त्यजुनि भेद निजात्म - भक्ती
जेका जगीं करिति पावति तेचि मुक्ती ॥१३८॥
आत्मज्ञता गुरुकृपेस्तव होय ज्याला
योगीं कळे अगुणिंचा महिमा तयाला
चैतन्य - सागरिं मुरे लहरी गुणाची
तैं प्राप्ति येथ वदला विधि निर्गुणाची ॥१३९॥
गुरुवर अगुणात्मा बोधिती यासि जैसे
सगुण अगुण ऐसा सांगती तेचि तैसे
तरि मग महिमेंते त्याचिया कां नपाहे
म्हणउनि विधि शंका येथ हे वारिता हे ॥१४०॥
जरि सगुण गुणातें देखती संत संख्या
तरि मग उपदेशीं बोधिती शिष्य - मुख्या
म्हणुनि गुरुमुखेंही बोलवेना न जेव्हां
अकळचि महिमा ह सिद्ध हे गोष्टि तेव्हां ॥१४१॥
यालागिं हा भाव धरुनि आतां
अगण्यता विष्णु - गुणासि धाता
श्लोकामध्यें या स्फुट वर्णिताहे
अजन्म जो अंत गुणीं न पाहे ॥१४२॥
होती हितालागिं चराचराच्या
कीं मूर्ति तूझ्या जगदीश्वराच्या
अनंत - कल्याण - गुणें शरीरें
म्हणे गुणात्मा तुज या विचारें ॥१४३॥
तूंजो असा त्या तुझिया गुणाला मो जावया नील - सरोज - नीला
होती जगी शक्त असे न कोणी अनंत तुझे गुण चक्र पाणी ॥१४४॥
काळें करुनि धरणी - रज मोजणारे
होतील मोजितिल ही हिसबिंदु सारे
होती समर्थ गणना किरणीं कराया
तूझे न मोजवति सद्गुण देवराया ॥१४५॥
वेदश्रुती वदति येरिति विष्णुसूक्तीं
विष्णोर्नुकं म्हणुनि हे श्रुतिचीच उक्ती
संतांसही सगुणिंचा महिमा कळेना
शिष्योपदेशविषयीं रसना वळेना ॥१४६॥
जाणोनियाचि करितां अगुणास योगी
ऐक्यें करुनि भजती सगुणाचलागीं
आत्मैक्य - भक्ति करितांचि जनार्दनाची
आनंद - सागरिं मुरे लहरी मनाची ॥१४७॥
सगुण अगुण दोनीं विष्णुरुपें अनंतें
कवण निपुण ऐसा कीं निरुपी तयांतें
परि अगुण चिदात्मा चित्त चिद्रूप होतां
जितचि अजित - भक्तां मुक्ति हो भाग्यवंतां ॥१४८॥
अगुणमात्र उपास्य हरी जयां सगुण भक्तिविणे नफळे तयां
म्हणुनि येरिति भारतिचा पती विशद बोलियला स्व - पित्याप्रती ॥१४९॥
अगुणमात्र - उपासक साधनें ऋषिकुळीं करितील तपोधनें
तरिहि कां मन निर्गुण केवळीं नवि घरे म्हणती जरि येस्थळीं ॥१५०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP