|
स्त्री. एक बारीक कीटक ; पिपीलिका ; गोड पदार्थ फार आवडणारा एक लहान प्राणी . गुरुचरणीं पार्थ जडे जैसी मधुशर्करारसीं मुंगी । - मोकर्ण ४३ . ५० . मुंग्यांचे प्रकार :- काडमुंगी , गांडमोडी , घाणेरी , ढुंगणमोडी , दांत्या , धांवरी , ( वळविंच ( ज ), हुरण , हुळहुळी , पिसोळी . इ० . - राको ७३ . एखादा झणझणीत पदार्थ खाल्यामुळें जिभेमध्यें होणारी रवरव . चेतना ; चेव ; एखादी गोष्ट करण्याविषयीं एकदम उत्पन्न झालेली उत्सुकता ; तीव्र इच्छा . ( क्रि० येणें ; आणणें ). पुरुषांच्या ठिकाणीं उत्पन्न होणारा कामविकाराचा प्रक्षोभ . ( क्रि० येणें ) मग मुंगी येउनी लुंगी कासोटी । सोडूनि धावती तयांचे पाठी । - नव २५ . ५८ . शरीरास आलेली बधिरता . ( क्रि० येणें ). [ दे . मुअंगी ] म्ह० मुंगीला मुताचा पूर . मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत . ( वाप्र . ) मुंग्या येणें , चढणें - वातविकारामुळें शरीरावयव जड होऊन त्यास बधिरता येणें . रुधिराभिसरण रुद्ध झाल्यामुळें येणारी बधिरता . मुंगीच्या पावलानें - क्रिवि . मुंगीच्या गतीनें ; अगदीं हळू हळू . मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या , घोड्याच्या पायांनीं जाणें - सावकाश येणें आणि त्वरेनें निघून जाणें ( संपत्ति , वैभव वगैरे संबंधीं योजतात ).
|