नक्षत्रस्वामी - अध्याय पहिला

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीसिद्धराजाय नमः । श्रीनक्षत्रस्वामी महाराजाय नमः । मातृपितृभ्योनमः । कुलदेवताभ्योनमः । ग्रामदेवताभ्योनमः । वास्तूदेवताभ्योनमः । सर्वेभ्योदेवेभ्योनमः । सर्वेभ्योब्राम्हणेभ्योनमः ।

कमलेशा ! तू ठेवावा वरदहस्त मस्तकी माझ्या ।

मी लघुकवि आहे साह्यार्थ धाव बा माझ्या ॥१॥

जो हात जोडतो त्यासी अभय देतसे सिद्ध ।

गाइन मी गुण भक्ताचे , जो राही प्रभूपदी सिद्ध ॥२॥

भाऊ पणजे माझे आणि पितामह रामचंद्र जे धीट ।

अण्णाजी पुत्र तयांचे , त्यांना काव्यसुधेचा कधी नसे वीट ॥३॥

अग्रज माझे जे रामचंद्र गेले , त्यांचा प्रभूपदी वास ।

त्या सर्वांचे आशिश प्रार्थन , वांछी सरस काव्य करण्यास ॥४॥

निजमातेचे सखुताईचे धरूनी मस्तकी चरण ।

नक्षत्रस्वामीचे काव्यगायनी चढो मला स्फुरण ॥५॥

देवघर्‍यांचे गृहांत झाला ज्या साधुचा खरा वास ।

त्याची सेवा नित्य करोनि वसंत तोषवी त्यास ॥६॥

मागे झाले , असति आता , कुळी होतील जे पुढे लोक ।

त्या सर्वांनी स्मरले , स्मरण करावे नित्य स्वामीचे एक ॥७॥

नक्षत्रकथासुधामृती भक्त रस घे , बहु तोषवीन काव्याने ।

नक्षत्रकथासुधामृतीप्रिय भक्त बहु तोषवीन काव्याने ॥८॥

गाईन मी गुण योग्याचे , व्हावे प्रसन्न जन सारे ।

द्या आशिश मजला तुम्ही वडील जन सारे ॥९॥

व्हा सावध श्रोते हो अद्‌भूत ऐका कथा ही प्रेमाने ।

प्रेमाने लिहिली ही काव्यकथा स्फुरवी बिडेश प्रेमाने ॥१०॥

ही आर्त कथा आहे एका दीन विप्र अबलेची ।

जाज्वल्य विलक्षण आणि अनन्य भक्तीची ॥११॥

कपित्थपुरीचा देव पुरातन हरीनारायण अवतारी ।

जो जे वांछी ते तो देई भवसागरही पार करी ॥१२॥

त्या विश्वासे आली वनिता कमलेशाची करी सेवा ।

अभागिनी मी विप्रकुलीची पुत्र मला तू दे देवा ॥१३॥

वंदुनि श्री सिद्धराज । माता पिता अग्रज । मायभवानी आणि स्कंधराज । श्रोते सावध ॥१४॥

आर्या

होती साध्वी मानात धरुनि इच्छा मुलाची बरी ।

नव्हता लौकीक मार्ग काही उरला वैधव्य होते शिरी ॥१॥

कैसा होईल प्राप्त पुत्र मजला ? का श्रीहरि कोपला ।

काही मार्ग नसे , मनात झुरते , सन्मार्ग ना सोडला ॥२॥

पूर्वी मकरध्वज जन्मला , प्रसवली कर्णास कुंति जशी ।

तैसी मंत्रबळे कुशी उजवू दे , कमलेश प्रार्थि सति ॥३॥

होता केवळ एक ध्यास अवघा की पुत्र व्हावा मला ।

जावो प्राण सुखे प्रभुवरा मी पाहता त्या मुला ॥४॥

देई पुत्र असा मला मुनिवरा स्द्धर्मि जो होईल ।

ज्ञानी , पावन मातृभक्त म्हणूनि जो भूषवी हे कुल ॥५॥

शुचिमूर्ति , पावन साध्वी ब्राम्हमुहुर्ति उठून बहुसाल ।

आळवी प्रेमे कमलेशाला पाळी नेम हा बहु साल ॥६॥

घाली प्रदक्षिणा प्रभुला , पुत्रार्थ नित्य साकडे घाली ।

घाली फुले सदोदित ताजी त्या चंद्रमौलीच्या भाली ॥७॥

त्वा सागर करुणेचा , देवा दीनेस तूच तारावे ।

ऐसे पदोपदी विनवे ‘सिद्धा विघ्नास तूच वारावे ’ ॥८॥

माध्यान्ही घेऊनि तीर्थप्रसादा , अपूर्न धूपदीपाते ।

भिक्षा आणूनि घाली गाईस धान्य ते पुरते ॥९॥

उरले कण जर पडले काही गोमयातुनि द्वारी ।

तेव्ह्डेच ते अन्न भक्षुनि क्षुधा आपुली वारी ॥१०॥

बारा साल असे अपार करुनि कष्टास ती माऊली ।

झाली पात्र कृपेस प्रभूच्य इच्छित ते पावली ॥११॥

करता ऊग्र तपे प्रसन्न प्रभुला दाही दिशा दाटल्या ।

आले जागृत सिद्धराज प्रभू ते स्वप्नी , प्रभा फाकल्या ॥१२॥

घेई लोळण सिद्धराज चरणी आनंदली पाहून ।

आदिमाधव बाळकृष्ण वदले ‘घेई वरा मागून ’ ॥१३॥

‘ व्हावा पुत्र मला , दुजे मज नको आहे सुखी मी हरि ’ ।

‘ जा तू होशील माय पावन , तुला होईल गे संतती ’ ॥१४॥

आहे वृक्ष विशाल शमीचा जो देवालयी शोभत ।

त्याचे सनिद्ध जाऊनि स्थिर राहा , नक्षत्र जे पावत ॥१५॥

भक्षि तऊ तव ओंजळी झडकरी येताच ते तेवत ।

नव्हते केवळ सान शब्द प्रभुचे झेपावले अमृत ॥१६॥

करता तसेच स्मरुनि मनांत प्रभुला , शब्दाप्रमाणे तिने ।

आले उजळित व्योममार्ग अवघा नक्षत्र ते सानुले ॥१७॥

केले भक्षण ते त्वरीत स्मरुनि श्रीसिद्धराजा मनी ।

राही गर्भ तियेस , अंश प्रभुचा येईल हो या जनी ॥१८॥

जेथे कोमल शांत पुष्प फुलते देते सुगंधा स्वर ।

तेथे कंटक सान थोर छळती , पर्णांतरी जे स्थिर ॥१९॥

होता गर्भवती सतीस छळती ग्रामस्थ नाना परी ।

म्हणती भ्रष्टविले कुलास आपुल्या , मेली तरी ही बरी ॥२०॥

‘ कृत्ते , कुलटे , दृष्टे का लोटिले कुळास नरकात ? ।

जा तू काळे कर गे , राहू नकोस ग्रामात ॥२१॥

भूदेव आम्ही , द्विजश्रेष्ठ , पुण्य पौरजन सर्व ।

वर्तन धर्मप्रयाण ठेवूनि , सार्थ वाहतो गर्व ’ ॥२२॥

व्रणात पशुला जसे टोचती पुन्हा पुन्हा काक ।

तसेच ताडुनि , देती दुषण सर्व ग्रामीचे लोक ॥२३॥

भरले दुराभिमानाने , वृथाच छळति दीन आर्त अबलेला ।

जैसे व्याघ्रे मारावे हरिणशावका , पडे घाला ॥२४॥

कुणि पावे संतोषा पीडून दीन आर्त दुबळ्यांना ।

कुणि पावे संतोषा भजुनि त्या संतवृंद देवांना ॥२५॥

खळ , मधांध , लोभी , नीच , पापी असेच जन सारे ।

ऐसे कधी न घडते , असती बहुधा तिथेच साधू रे ॥२६॥

त्या साधूंच्या सहवासे कंठी दिवस दृष्ट भीषण ते ।

परिपाळी उदरी निजतनया , स्मरूनि सिद्धराजाते ॥२७॥

दुष्कृते जंव वाढति , मुनिजना , साधूस होती अरी ।

स्थापाया प्रभुधर्म हा महितळी , अवतार घे श्रीहरि ॥२८॥

भरता मास नऊ , बहु घडले शकून महिवरती ।

पक्षी सुस्वर होउन गाती , प्रमोदिली धरती ॥२९॥

मंगल काळी , मंगल समयी , मंगल मातेच्या उदरी ।

झाला जन्म प्रभूचा , देवदत्त हा मनुज जरी ॥३०॥

कमलेशा ! त्वा बालक विप्राचे रक्षावे , नसे दुजा वाली ।

तू मायबाप , बंधू , प्रिय मित्र , सोयरा अशा काली ॥३१॥

आदिमाधवा बाळ तुझे हे , दुरितांचे तुम्ही करा हरण ।

सिद्धेशा , जगदीशा , परपदयाळा तुझे धरीन चरण ॥३२॥

दीनानाथा , देवा , दाखव दयितेला दयाच दे दान ।

सांकल्ये सांभाळावे सर्वसमर्था , सुता स्वये सान ॥३३॥

सांभाळ राया नाही मी समर्थ रक्षाया ।

रक्षा , या बालकास , देवा करुणा करोनि तारा या ॥३४॥

ऐसे पदोपदी स्मरुनि , जाई पुन्हा पुन्हा शरण ।

प्रेमे बालमुखाला धरुनि वदे , हा करील दैन्यहरण ॥३५॥

सरके पुढे , रांगे , चोखी बोटे , जणू खातसे खवा मिष्ठ ।

उल्हासे मनी पाहून लीला , चुंबी पुनःपुन्हा ओष्ठ ॥३६॥

धावे , दौडे दुडदुड , काढी नवे नवे उद्गार ।

मातृहृदय ते जाणील यांतील मर्म काय ते थोर ॥३७॥

दारिद्र्याचे पाश घोरतर कधी अनावर क्रोध करी ।

मारी चापट्या , पाहून खोड्या , फिरुनि पुत्रा हृदयी धरी ॥३८॥

सरली सातही वर्षे अशीच , हो दीक्षेस योग्यसा काळ ।

चिंते व्रतबंध करुनि धांडावा गुरुग्रहास हा बाळ ॥३९॥

ऐसा विचार करुनि माता जायी , जोडी हात विप्रास ।

‘ द्विज हो मुंज करावी , न्यावा बालक गृहांत पढ्ण्यास ॥४०॥

ते ऐकताच वचन मातेचे , द्विजश्रेष्ठ सर्व गडबडले ।

बडबडले कटुशब्दे बहु , परी मनात हडबडले ॥४१॥

निर्णय काय करावा ? शोधावा काय शास्त्री आधार ? ।

पतिहीना , विधवेच्या तनयाला , होईल काय संस्कार ? ॥४२॥

चाळून पोथ्या , धुंडून शास्त्रे , ग्रंथ पढुनिया थोर ।

केला निश्चय त्यांनी ‘नाही ’ असाच मग घोर ॥४३॥

निःशब्द झाली माता मनात बहु हळहळली ।

शास्त्रे विन्मुख होता मग ती प्रभुकडे वळली ॥४४॥

‘ देवा , दयाधना , सिद्धेशा बा तूच दाखवी मार्ग ।

विप्राचे बालक आहे , त्याचा रूढी आडवी मार्ग ॥४५॥

काय करावे ? देवा का संकटे पुन्हापुन्हा येती ? ।

येती कौरवकटके जेवी पार्थसुताला रणात जी वधती ॥४६॥

ब्रीद तुझे सिद्धेशा राखावे निजभक्त संकटी चूर ।

मग का न पळविसी देवा ही संकटे तरी दूर ? ॥४७॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । प्रथमोध्याय हा ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP