नक्षत्रस्वामी - अध्याय पाचवा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


कर्दम आणि देवहुती । यांनी इच्छिता संतती ।

शेषशायी म्हणे प्रीति । मज जन्म द्यावा ॥१॥

सांख्ययोगाचे तत्वज्ञान । विश्वोत्पत्तीचे सकळ ज्ञान ।

नष्ट कराया अज्ञान इहलोकीचे ॥२॥

मज वाटे अवतार घ्यावा । तुम्ही मजला जन्म द्यावा ।

कपिल नामे ख्यात व्हावा । पुत्र कर्दमाचा ॥३॥

ममत्व आणि अहंकार । हे दोन अभिमान थोर ।

कामक्रोधादि विकार घोर । प्रसवती ॥४॥

या विकारां त्यागता । अंतःकराणाची शुद्धता ।

सुखदुःख विरहित होता । मन शांत होते ॥५॥

ज्ञान वैराग्य आणि भक्ति । यांची होऊन प्राप्ति ।

भगवंताची निष्काम भक्ति । करता येते ॥६॥

हाच योगाचा अभ्यास । आत्मस्वरूपदर्शनाची कास ।

धरता ब्रम्हप्राप्तीची आस । मोक्षद्वार उघडते ॥७॥

जेवी जठराग्नी अन्न पचवितो । भक्षिले ते नष्ट करितो ।

तेवी निष्कामभक्तिने नाश होतो । उपाधींचा ॥८॥

या भक्तयोग विचारे । ईश्वरचरणाचे आश्रये ।

निर्भय स्थळ जे स्वभावे । मन स्थिर होते ॥९॥

अंतिम कल्याणाचा मार्ग हा । भक्तांस सहजी प्राप्त व्हावा ।

भक्तियोगे स्थिर व्हावा । प्राणिमात्र ॥१०॥

कपिल श्रीविष्णूचा अवतार । देवहुतीचा पुत्र थोर ।

मोक्षप्राप्तीचा आधार । कैवल्य केवळ ॥११॥

ज्ञान -वैराग्ययुक्त भक्ति । मातेसी निरोपिली प्रीति ।

सांख्य योगाची व्याप्ति । मातेस कथिली ॥१२॥

तपाचरण करावया । समाधीसुखाचे आश्रया ।

निवांत , शांत स्थळा या । कपित्थपुरी पातले ॥१३॥

पाताळी जागा निवांत । शेषभये सारे शांत ।

स्वये शेषशायी कमलाकांत । तपाचरणा बैसले ॥१४॥

हरिश्चंद्राचे पुण्यवंशी । सगरनामे श्रेष्ठ अंशी ।

भूपति प्रबळ पुण्यराशी । धर्मात्मा सत्वशीळ ॥१५॥

त्याने पृथ्वी केली पादाक्रांत । भूपति जिंकोनी ख्यात ।

मेदिनी केली सुशांत । अश्वमेध कराया ॥१६॥

सगराने अश्वमेध मांडला । शामकर्ण वारू सोडला ।

पुत्रांचा दळमार दिला । रक्षावया ॥१७॥

सगराचे साठ सहस्त्र कुमर । बलदंड योद्धे वीर धीर ।

इंद्रही कापला थरथर । म्हणे नको युद्ध ॥१८॥

इंद्र अंतरी घाबरला । बळे बृहस्पतीकडे धावला ।

म्हज़्णे माझा घात झाला । गेले आता इंद्रपद ॥१९॥

देवगुरू करी विचार । सगरपुत्रांचा प्रतिकार ।

हे अशक्यच कर्म घोर । नसे उपाय ॥२०॥

अजिंक्य हे सगरकुमर । कमलाकांताचे अवतार ।

डळमळती मेरुमांदार । ऐसे युद्धकुशल ॥२१॥

गुरू म्हणे बा सहस्त्रनयना ! । कपटनीति आणा मना ।

युक्त नव्हे जरी सज्जना । प्राण रक्षावे ॥२२॥

न्यावा शामकर्ण पाताळभुवनी । जेथे ध्यानस्थ कपिलमुनी ।

वारू बांधावा त्या काननी । टाळण्या अरिष्ट ॥२३॥

मग अश्व नेला पाताळविवरी । कपिलमुनीच्या शेजारी ।

सहस्त्रनयन करी चोरी । वारू बांधविला ॥२४॥

सगरदळी कल्लोळ उडाला । प्रळयीचा रूद्र खवळला ।

कुणी ऐसा घात केला ? । त्याचे चूर्ण करू ॥२५॥

स्वर्गीचा तुरुंग कोठे गेला ? । कसा कोठे गुप्त झाला ? ।

सगरपुत्रांचा प्राण झाला । कासावीस ॥२६॥

इंद्र गेला घाबरून । स्वये सारे केले कथन ।

विनवी शक्र हात जोडून । क्षमा करा ॥२७॥

गुरू -इंद्राची ऐकोन विनवणी ।सगरपुत्र भले गुणी ।

म्हणती ‘अभय तुला वज्रपाणी ’ । अश्व आणू ॥२८॥

पाताळी जावया सत्वर । मार्ग शोधती सगरवीर ।

अंगुष्ठस्पर्शे यमुनेचे तीर । जैसे दुभंगले ॥२९॥

ऐसा मार्ग मिळावा म्हणती । रथचक्रांचा धडधडाट करती ।

विदीर्ण झाली बहु क्षिती । दुभंगली ॥३०॥

सगरांनी केले विवर । शेषमस्तकावर ।

पाताळी उत्तरले अधीर । वारू शोधावया ॥३१॥

सगरांनी मांडला आकांत । शेष झाला चिंताक्रांत ।

पृथ्वीचा पाहती अंत । सगरपुत्र बलदंड ॥३२॥

पाताळी सगरपुत्र प्रवेशिले । जेथे शामकर्णास बांधले ।

कपिलमुनि ध्यानस्थ बसले । तेथे पातले ॥३३॥

तपाचरणी रत महामुनि । समाधिस्थ योगी तपोवनी ।

परमोक्षाते लक्षुनि । बसलेले ॥३४॥

सगरांचा क्रोधाग्नि पेटला । प्रलय वडवानल चेतला ।

दोष देती कपिलाला । धिक्कारती उदंड ॥३५॥

‘ वाटे घेवोनिया गदा । करावा मस्तकाचा चेंदा ।

तुझ्या कदंधाचा बुंधा । छेदावा ’ ॥३६॥

ऐसे ताडिता बहुत । कपिलमुनींच्या नेत्रांत ।

प्रळयाग्नि उठला अनंत । स्फुरला अंगार ॥३७॥

कपिलमुनींच्या क्रोधानळे । भस्म झाली सगरकुळे ।

वीर प्रतापी सैन्यदळे । नष्ट झाली ॥३८॥

त्या सगरकुळीचा अंशुमान । करी सहस्त्र वर्षे तपःसाधन ।

कपित्थनगरी योगसाधन । पूर्वजांकारणे ॥३९॥

त्याच कुळीचा भगिरथ राजा । मुक्त करण्या पूर्वजा ।

प्रयत्नवादाची ध्वजा । मिरवतसे ॥४०॥

सदेह स्वर्गासी गेला । चंद्रमौली प्रसन्न झाला ।

गंगेस घेउन आला ।भूमिवरी ॥४१॥

गंगा पाताळी भोगावती । सगरकुलाची उद्धारकर्ती ।

ऐसी विशेष पावली ख्याती । भीष्ममाता ॥४२॥

तो हा कपिलमुनी प्रसिद्ध । सिद्धराज बिराडसिद्ध ।

भ्क्तां तारावया सिद्ध । करूणाकर ॥४३॥

आदिमानव कृपावंत । बसला गाभारी निवांत ।

वसेल पुढेही कल्पांत । दीनवत्सल योगिराव ॥४४॥

त्याच्या कृपेचा महापूर । सुखे कोंदला अपार ।

नक्षत्रस्वामींचा आधार । प्रभू सिद्धराज ॥४५॥

इथे महापूजेचा बडिवार । प्रभावळीचा दळमार ।

नाना आभूषणांचा भार । प्रसंगी विशेष ॥४६॥

अभिषेकाची संततधार । पंचामृताचे स्नान थोर ।

सुगंधी पुष्पे आणि हार । नानाविध ॥४७॥

गळा रुद्राक्षांच्या माळा । चंदनाचे गंध भाळा ।

मस्तकी रत्नांच्या कळा । मुगुट शोभे ॥४८॥

वरी शेष काढी फणा । नीलकंठाच्या रक्षणा ।

भक्तांच्या जपतो प्राणा । शेषशायी ॥४९॥

बिल्वपत्रे , तुलसीवले । केवडा आणि तांबडी फुले ।

शिवालयी अग्राह्य भली । तरी वाहतात ॥५०॥

कपिलमुनी विष्णू -अवतार । सिद्धराज मुनि थोर ।

एकत्र नांदती हरिहर । कपित्थनगरी ॥५१॥

चाफा , मोगरा , शेवंती । गुलाब , जाईजुई , मालती ।

कण्हेर , कर्दली , कोरांटी । नाना फुले ॥५२॥

दवणा , मरवा आणि शमि । कृष्णकमळे भली नामी ।

तगर , दुर्वा , धत्तुर कामी । येथे वाहा ॥५३॥

प्राजक्त , बकुळ फुलांचे हार । अनंत , निशिगंध गुच्छभार ।

गोकर्ण जास्वंद , कमळे अपार । वहावी इथे ॥५४॥

शाळुंकेवरी चांदीचे मुखवटे । विशाल भाली भस्मपुटे ।

उन्मिलित नेत्र मोठे । मस्तकी मुगुट ॥५५॥

ऐसाहा कमलाकांत । प्रसन्न मूर्ति प्रशांत ।

पुढे तेवते समयी शांत । प्रकाश गूढ ॥५६॥

प्रलयकाळीचा महांकाळ । सवें विराजे नक्षत्रमाळ ।

रजत पादुका सर्वकाळ । पूजनीय ॥५७॥

येथे श्रीविठ्ठलाची मूर्ति । सिद्धराजाची ऐकून कीर्ति ।

नामदेवाने अपुल्या हाती । अर्पिली ॥५८॥

सिद्धराज परम जागृत । पाहो जाता येते प्रचित ।

जाज्वल्य आमुचे कुळदैवत । वंदनीय ॥५९॥

राउळाचे शुभ्र शिखर । बांधिले सुडौल सुंदर ।

त्यावरी कळस डौलदार । सुवर्णाचा ॥६०॥

दंडकारण्य भले घनदाट । सूर्यकिरणा नाही वाट ।

दक्षिण -उत्तर वाहे पाट । कपित्थनगरी ॥६१॥

कुलवंत , बुद्धिवंत नांदती । गायीगुरे डोले शेती ।

नरनारी सुखे असती । कवठ्यांत ॥६२॥

पुनश्च हरि ॐ म्हणोनी । मातापुत्र ये परतोनी ।

नरदेहाचे सार्थक करोनी । मुक्त होण्या ॥६३॥

आमच्या कुळीचा मूळपुरुष । ‘स्वामीराव ’ बिडेशाचा शिष्य ।

विद्यादान करी विशेष । देवघरी ॥६४॥

बुद्धिमंत अणि शुचिश्मंत । साधक आणि कृपावंत ।

भला ब्राम्हण बलवंत । स्वामीराव ॥६५॥

त्याचा करोनि आश्रय । भक्ति , ज्ञान , योग विषय ।

समाधिसुख निरामय । अभ्यासावे ॥६६॥

नाना शास्त्रे , नाना पुराणे । तर्के , दृष्टांत , व्याकरणे ।

रामायण महाभारताची रणे । अभ्यासावी ॥६७॥

निःश्रेयस आणी अभ्युदय । शास्त्रे वेदांताचा विषय ।

श्रुति , उपनिषदांचा आशय । अभ्यासावा ॥६८॥

द्वैत , अद्वैत म्हणजे काय ? । आत्मा ,परमात्मा म्हणजे काय ? ।

निराकार साकार म्हणजे काय ? । अभ्यासावे ॥६९॥

प्रकृती -पुरूषाची लक्षणे । मूळमायेची लक्षणे ।

सिद्धयोगाची लक्षणे । अभ्यासावी ॥७०॥

नक्षत्रस्वामी बालयोगी । तपःसाधनेसी लागी ।

कुशाग्र बुद्धि स्मरण वेगी । सिद्ध कृपा करी ॥७१॥

ब्राम्हमुहूर्ती नित्य उठे । स्मरे कुलदेवतादि श्रीपाठे ।

ध्यानधारणा चिंतन मोठे । करितसे ॥७२॥

प्रातःकाळी स्नानसंध्या । पूजाअर्चा साधनसाध्या ।

शास्त्र , संथा नाना विद्या । चर्चा करी ॥७३॥

काही करूनिया आहार । बिडेशसेवा करी प्रहर ।

सायोज्य मुक्तिचा विचार । काही करी ॥७४॥

वेदविद्या व्यासंग करी । उपनिषदांची कास धरी ।

व्यवहारच्या गोष्टी करी । काही एक ॥७५॥

पुढे ॐ भवती भिक्षांदेही । ब्राम्हण घरे जाऊन बाही ।

भिक्षा मिळेल तीही वाही । सिद्धचरणी ॥७६॥

काही मातेसाठी ठेवी अन्न । स्वामीरावाचे घरी प्रसन्न ।

भिक्षांदेहीचेसेवी अन्न । अमृतमय ॥७७॥

स्वामीराव आणि बालयोगी । मिताहार सेवून वेगी ।

कसे वर्तावे सूज्ञे जगी । विचार करती ॥७८॥

स्वामीराव प्रपंची चतुर । मेळविली माणसे अपार ।

सुशब्दे राखावे अंतर । जाणोन असती ॥७९॥

उत्तरकाळी दोनप्रहरी । नेमस्त येती नरनारी ।

त्यांच्या शंकाकुशंका वारी । स्वामीराव -योगी ॥८०॥

प्रसंग विशेषी संभाषण । शास्त्रचर्चा कथापुराण ।

शिवलीलामृताचे श्रवण । करवी जना ॥८१॥

श्रद्धायुक्त अंतःकरण । चुकवे जन्म आणि मरण ।

सत्य योगियाची आण ।बरे वार्ता ॥८२॥

अश्रद्धा मानवाचे कुलक्षण । नरदेहासी मोठे दुषण ।

ऐसियासी न करा भाषण । फळ कुंभिपाक ॥८३॥

सवे घेऊन जाऊ प्रजा । दिडेश आमुचा राजा ।

उभारूनी धर्मध्वजा । मोक्ष पावू ॥८४॥

अपेक्षा काही करू नका । उपेक्षेने खचू नका ।

धैर्य धीर सांडू नका । काही केल्या ॥८५॥

पिता पुत्र मामा चुलता । सखा सोयरा बंधू माता ।

पत्नी बहिणी आणि दुहिता । कुल गोत्रज ॥८६॥

यांचा भरवसाकरू नका । निःसंगपणे राहू नका ।

शरीर माझे म्हणू नका । तेही जाते ॥८७॥

अन्याय स्वये करू नका । कोणी करता साहू नका ।

प्रतिकाराविण सोडू नका । उद्धट उदंड ॥८८॥

हरिभजनाविण राहू नका । संतसंगती सोडू नका ।

उदिग्न चित्ते राहू नका । सर्वकाळ ॥८९॥

भाळी भस्म गळी रुद्राक्ष । निर्मळ वस्त्रे सदादक्ष ।

अंतकाळी एकच लक्ष । मुखी सिद्धराज राहो ॥९०॥

तेणे भवसागरी तराल । स्वधर्मी सुखे नांदाल ।

जन्ममरणाच्या दाढा कराल । चुकतील पूर्ण ॥९१॥

ऐसी साधी शिकवण । नक्षत्रस्वामी देती जाण ।

विवेक धरा जावो प्राण । सावध रहा ॥९२॥

सायंकाली देवदर्शन । मातेसवे प्रदोष पूजन ।

आरती , मंत्रपुष्पादि भजन । नित्य करती ॥९३॥

पूर्वरात्री मनन चिंतन । उत्तररात्री करी शयन ।

आमुच्या घरी पावन । वास करी ॥९४॥

ऐसा काळ चालला । ईशचिंतनी योगी रमला ।

माता म्हणे पुरे झाला । संसार अनित्य ॥९५॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । पंचमोध्याय हा ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP