नक्षत्रस्वामी - अध्याय सहावा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


कपित्थनगरीचे ग्रामस्थ । काही खळ दुर्जन अस्वस्थ ।

करू पाहती स्वप्न उध्वस्थ । मातेचे ॥१॥

सर्वकाळ करती कुचेष्ठा । अरे हिला कसली प्रतिष्ठा ? ।

हिने भक्षावे काष्ठा । पुत्रासह ॥२॥

गावचा पाटील कुमति । सज्जनांची सोडॊन प्रीति ।

मायलेकासी छळे अति । मदांध पापी ॥३॥

त्याने उत्छाद मांडला । नको नको जीव झाला ।

माता पुसतसे पुत्राला । काही मार्ग शोधा ॥४॥

माता जरी चिंताक्रांत । तरी पुत्र अंतरी निवांत ।

म्हणे बिडेश करील हे शांत । वादळ क्षुद्र ॥५॥

जो जो जैसा वर्ततो । तो तो तैसा फळ पावतो ।

आपण उगे कष्टी होतो । प्रारब्ध गुणे ॥६॥

हरिश्चंद्र राजा प्रबळ । विश्वामित्रे मांडिला छ्ळ ।

प्रारब्धाचा सारा खेळ । अदृष्ट सारे ॥७॥

माते नको विकल होऊ । कळिकाळास भेदून जाऊ ।

उपाय ऐसा शोधून पाहू । बळ शक्तीचे ॥८॥

कवठे आदिमानवाचे पीठ । भक्त रक्षणाचे ब्रीद उत्कट ।

रक्षण अपुले करील नीट । नीलकंठ ॥९॥

सिद्धसाक्षात्काराची प्रचिती । म्हणून झालो पुत्र प्रीति ।

जीवनहेतूची परिणति । सफळ झाली ॥१०॥

आले भगवंताचे मुळ । जगणे -मरणे सारे खूळ ।

आभ्यास सारा समूळ । देह कसला ? ॥११॥

कोण कोणासीछळतो ? । कोण कोणासी पाळतो ? ।

विश्वंभर ते सारे करतो । भास सारा ॥१२॥

मी , माझे , अहंकार सारा । प्रबोध थोडा चित्ती धरा ।

परतू आता अपुल्या घरा । जे शाश्वत ॥१३॥

असा थोडा काळ लोटला । देवासी कौल लावला ।

मार्ग समाधिचा मुक्त झाला । संजिवन ॥१४॥

षोळश सिद्धांचा मेरूमणि । आदिमाधव चक्रपाणी ।

धीरगंभीर वदे वाणी ।दृष्टांत देई ॥१५॥

" प्रिय भक्ता नक्षत्रस्वामी ! । तुझ्या भक्तीने संतुष्ट मी ।

आता यावे परमधामी । मातेसवे ॥१६॥

सवे घ्यावे गायवासरू । पूर्वजन्मीचे सहचरू ।

नंदिनी आणि कल्पतरू । स्वर्गलोकीचे " ॥१७॥

‘ संजीवन समाधि बिकट । देवालयी आम्हा निकट ।

वैकुंठ -कैलासाची वाट । सुखे क्रमावी ॥१८॥

कथिता स्वमुखे दृष्टांत । स्वामीराव हो चिंताक्रांत ।

म्लानवदन झाले कांत । आकांत झाला ॥१९॥

‘ स्वामी हे काय करता ? । आम्हा सोडून कुठे जाता ? ।

तुम्ही आमचे मातापिता । सर्व काही ॥२०॥

मी वडील वृद्ध जरी । आपण थोर अधिकारी ।

वास्तव्य केले माझे घरी । इश्वराची कृपा ॥२१॥

आपण ऐसे जाऊ नये । केविलवाणे करू नये ।

आम्हा वक्र पाहो नये । काही केल्या ॥२२॥

तुकोपंत माझा पुत्र । सत्यभामा माझे कलत्र ।

सज्जनांचे उडेल छत्र । आपण जात ॥२३॥

ग्रह आमचे का फिरले ? । आमचे पुण्य संपले ? ।

का कलिचे फावले ? । पुण्यक्षेत्री ॥२४॥

माध्यान्ही जान्हवी येती । तिची कुठली का गति ? ।

का हरिहराची क्षीण शक्ति । झाली आता ? ॥२५॥

कपित्थनगरीचा योगीराव । अनंत ज्याचा प्रभाव ।

सोडोनि स्वतःचा स्वभाव । क्षोभला कैसा ? ॥२६॥

नरदेहधारी सुरवर । कैवल्यसुखाचे माहेर ।

नक्षत्रस्वामी माझे शीर । नतमस्तक ॥२७॥

पुढे उपाय खुंटला । आधार माझा तुटला ।

जलनिधीचा बांध फुटला । अश्रुरूपे ॥२८॥

असा आकांत मांडला । स्वामीराव उरी फुटला ।

विनवी माता -पुत्राला । जाऊ नये ॥२९॥

परी स्वामी स्वस्थ स्थिर । माता त्याहूनि गंभीर ।

इहलोकीचे जिणे विखार । त्यागू आता ॥३०॥

म्हणे स्वामीराव -सत्यभामे । तुमच्या पुण्यपराक्रमे ।

झाली उघडी कैवल्यधामे । चिरस्थाई ॥३१॥

आपण ज्ञानी तपोवृद्ध । होऊ नये शोकबद्ध ।

प्रपंच परमार्थाचे युद्ध । भले जाणता ॥३२॥

या युद्धी जो कामी आला । त्याचा गर्भवास संपला ।

उरला त्याने भोगला । अंती स्वर्गवास ॥३३॥

आपण ऐसे शिकवले । तेच कारण आता झाले ।

मना आपुल्या क्षोभविले । काय गुणे ? ॥३४॥

तुमच्या घरी अमुचा वास । वाटला देवासही हव्यास ।

घडो राऊळी सहवास । पुढे निरंतर ॥३५॥

ही सारी दैवयोजना । विधीने आणली मना ।

इच्छा त्याची मोडवेना । कळिकाळासहि ॥३६॥

गांगेयासारखा पुण्यसीळ । युद्धिष्ठरादि धर्मसीळ ।

कर्णासारखे दानशीळ । गेले मृत्युपंथी ॥३७॥

भीम , अर्जुन सव्यासाची । ऋषी पुण्यात्मा दधिची ।

रंभा उर्वशी आणि शचि । गेले मृत्युपंथी ॥३८॥

शोधोन पाहता विवेक । संत सत्पुरुषादि अनेक ।

संपता त्याचे अन्नोदक । पुढे गेले ॥३९॥

आता आम्हा जाणे आले । नरदेही भोग भोगले ।

अदृष्टाचे देणे दिले । गेले पाहिजे " ॥४०॥

असे सारेनिरोपिले । स्वामीरावासी शांत केले ।

मातेसह राऊळी गेले । निभ्रांत ॥४१॥

वार्ता सर्वत्र पसरली । भक्तमंडळी धावोन आली ।

स्वामीदर्शना रीघ लागली । देवघरी ॥४२॥

स्वामींचा निश्चय खंबीर । जैसा विचार तैसा आचार ।

ऐसी ही विभूती थोर । अगम्य आम्हा ॥४३॥

मग ग्रामीचे लोक थोर । बैसले करण्या विचार ।

समाधी सोहळ्याचा भार । शिरी घेतला ॥४४॥

संसारा नाना प्रलोभने । नाना आशा गुंतली मने ।

नवस बोलती , देती दाने । पुढे इच्छिती ॥४५॥

आपुली दुःखे स्वामीपुढे । कोणी सांगे , कोणी रडे ।

कोणी घालती साकडे । योगियास ॥४६॥

स्वामी माझा आजार दारूण । बहुत गांजलो जावो प्राण ।

श्रुति , स्मृति , पुराण । ऐकता ऐकता ॥४७॥

स्वामी मी दरिद्री ब्राम्हण । कृपा लक्ष्मीची व्हावी जाण ।

सात पिढ्यांचे कल्याण । करावे प्रभू ॥४८॥

स्वामी मज नाही शेतीवाडी । विस्कटलेली माझी घडी ।

घालोन द्यावी तांतडी । अभाग्यासी ॥४९॥

स्वामी मी सहा मुलींची आई । कैशा उजवू असे घाई ।

मिळोत मजला जावई । धनाढ्य , गुणवंत ॥५०॥

स्वामी मी अष्ट पुत्रांची माता । मूर्ख पोरे , दृष्ट त्यांचा पिता ।

प्राण जातो संसार करता । सोडवी मजला ॥५१॥

असे नाना भोगाचे पवाडे । नाना चिंता नाना खोडे ।

योगियास घालती साकडे । नाना लोक ॥५२॥

स्वामी धीरगंभीर होती । सुखदुःखे श्रवण करती ।

भजा श्रीसिद्धराजाप्रति । असे निरवती ॥५३॥

आपण जे जे इच्छिता । ते ते देणे ईश्वरसता ।

तुम्हाकारणे विनविन आता । श्रीसिद्धराजा ॥५४॥

स्वामीराव आणि ग्रामस्थ । अंतरी अत्यंत अस्वस्थ ।

वियोगविचारे उध्वस्थ । झाली मने ॥५५॥

परी व्यवहार असे अटळ । संजिवन समाधीचा काळ ।

निकट आला विक्राळ । थांबेल कैसा ॥५६॥

बहुत करता विचार । योग्य मिती साधार ।

शोध घेतला शास्त्राधार । अत्यादरे ॥५७॥

वर्षाऋतु , श्रावणमास । शुद्ध पक्ष दशमीस ।

प्रशस्त संजिवन समाधीस । प्रातःकाल ॥५८॥

बिराडसिद्धाचे राऊळास । श्रीसन्मुख दक्षिणेस ।

जागा समाधि घेण्यास । निर्धारिली ॥५९॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । षष्ठाध्याय हा ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP