अध्यात्मपर पदे - भाग ३
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१५७१
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर० )
वळी मन रामपदा निवळी ॥ध्रु०॥
तीक्षण तर्क तनु अति चंचळ । अंतराळ कवळी ॥१॥
दास म्हणे हरिदास हटेला । रामपदाजवळी ॥२॥
१५७२
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )
परेची पश्यंति ध्वनी मध्यमा नाद । नादाचे जाले शब्द शब्दाचे मेद ॥१॥
गगनीं भरला पवन जाहलें तान । तानीं गुंतलें मन मनीं मोहन ॥२॥
मनाची होते उन्मनी विवेकें जनीं । जनीं पुसावें सज्जनीं तत्त्वनिरसनीं ॥३॥
संसारीं व्हावें उदास सज्जनीं वास । वासें विवेकें अभ्यास सांगतो दास ॥४॥
१५७३
नादामध्यें शब्द शब्दामध्यें नादा । भेदामध्यें अभेद सकळ कळे ॥१॥
निश्चळीं चंचळ चंचळीं निश्चळ । निश्चळ निवळ रे सकळ कळे ॥२॥
कितेक तें येतें कितेक तें जातें । सर्वहि तें जातें सकळ कळे ॥३॥
कितेक बोलावें कितेक चालावें । जाणावें बोलावें तें सकळ कळे ॥४॥
दास म्हणे तन तनामध्यें मन । मनें निवेदन रे सकळ कळे ॥५॥
१५७४
( राग-काफी; ताल-दीपचंदी. )
गलथा उलथा विचारें । पावन सारासारें ॥ध्रु०॥
मिथ्या सांडुनि सत्य घरावें । महावाक्य विवरावें ॥१॥
आत्मानात्मविवेक करावा । सज्जनसंग घरावा ॥२॥
श्रवणमनन आत्मनिवेदन । भक्तिनिरंजन भावन ॥३॥
१४७५
( राग-बिलावल; ताल-दादरा )
जगज्जीवन जगदांतरीं । जग चालविताहे । सूक्ष्म स्थूळ कळीवरें । सकळांतरें पाहे ॥ध्रु०॥
ज्ञानकळा ते जीवनकळा । सकळा प्रचित पाळी ॥ देखत ऐकत बोलतें । श्रवणेंचि निवळी ॥१॥
दास म्हणे स्मरण घरा । स्मरणेंचि उद्धरा । चंचळ सांडुनि निश्चळीं । द्दढ निश्चयें करा ॥२॥
१५७६
( राग-जैमिनीकल्याण; ताल-धुमाळी. )
निश्चय पळोनि गेला । निश्चाळीं राहिला ॥ध्रु०॥
शास्त्रें पुराणें बहुतचि देव तेथें निश्चय नाना । कोण थोर कोण लहान म्हणावें कांहींच अनुमानेना ॥१॥
बहुत निश्चय होतो तया अनुमानें म्हणिजे । अनुमानला एक निश्चय तया नेमकचि जाणिजे ॥२॥
दास म्हणे हा द्दश्य-गळंगा प्रत्ययज्ञानें जाणावा । निश्चळ निश्चयें होतां संशय बोध लुटावा ॥३॥
१५७७
( राग-मांड; ताल-धुमाळी )
म्हणोनि विवेक पाहिजे । निश्चळ राहिजे ॥ध्रु०॥
अचंचळ चंचळ एकचि जालें द्दढ भासलें लोकीं । सूक्ष्म द्दष्टीं प्रत्ययद्वारें जाणितलें विवेकीं ॥१॥
क्षीर नीरा दोनि एकचि जालें राजहंस निवडिती । हट्टें ह्ट्टें कलकलाटें वायस काय करिती ॥२॥
उत्तम दीक्षा थोर परीक्षा जाणती प्रत्ययज्ञानी । दास म्हणे सारासारविचार धन्य ते प्रत्ययज्ञानी ॥३॥
१५७८
( चाल-डफगाण्याची )
देव निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ । ब्रह्म अचळ अढळ । जैसें तैसें ॥१॥
ब्रह्म अनंत अपार । तयासी नाहीं पारावार । दिसतो मायेचा विस्तार । विस्तारला ॥२॥
क्षीर नीर निवडिती । कळा राजहंस जाणती । सार असार निवडिती । साधुजन ॥३॥
सार असार निवडावें । आपण कोणसें पहावें । मग अखंडित रहावें । समाधानी ॥४॥
झाडा पाहतां तत्वांचा । आपण नाहीं सत्य वाचा । विचार घेतां या जीवाचा । ठाव नाहीं ॥५॥
होतां ओळखी देवासी । ठाव नाहीं या जीवासी । जीवां शिवां सदाशिवासी । ऐक्य जालें ॥६॥
ऐक्य जालें खडाखडी । ह्रें तों प्रचीत रोकडी । फिटली संसारसांकडी । विचारितां ॥७॥
विचार पाह्तां सुटला । सर्व संशय तुटला । प्राणी निर्धारितां जाला । मोक्षपद ॥८॥
मोक्षपद हें आरतें । ऐसें कळलें पुरतें । तत्त्व सांडितां उरतें । बीजरूपें ॥९॥
निजरूप तें आपण । ऐसी अनुमवाची खूण । गैब जाला परिपूर्ण । जैसा तैसा ॥१०॥
नवल ऐका रे श्रोते हो । देहीं असोनी विदेहो । ऐसा विचार पहा हो । रोकडाचि ॥११॥
रोकडा लाम होतो खरा । तुम्ही चतुर विचारा । न कळे तरी गुरू करा । लाववेगें ॥१२॥
लागवेगें घडिघडी । काळ जातो रे तांतडी । वेगीं घरा रे आवडी । निर्गुणाची ॥१३॥
निर्गुणाची नेणे सोय । त्याचा जन्म व्यर्थ जाय। वेगीं करावा उपाय । परलोकाचा ॥१४॥
वेगीं साधावा परलोक । तेंचि जन्माचें सार्थक । ऐका ऐका रे विवेक । महंताचा ॥१५॥
१५७९
( राग-केदार; ताल-धुमाळी; चाल-जालें सार्थक० )
ब्रह्मज्ञान काय होय बावळ्याला बावळ्याला । पिकले आंबे काय होय कावळ्याला ॥ध्रु०॥
नेलें पाटाव मर्कटाचे गांवीं । त्याचे गांवीं । त्याला न कळे फाडून द्यावीं ॥१॥
तोंड रोग्याचेम अति ओंगळवाणें । कडु लागाती जेवितां मिष्टांन्नें ॥२॥
दास म्हणे कुबुद्धि पोटांता पोटांत । वरिवरि दांमिक दावीत ॥३॥
१५८०
ऐसें पहावें ऐसें पहावें । शोधित जावें मूळा । समजत उमजत सकळ कळत । जडाहूनि वेगळा ॥ध्रु०॥
नदीचा उगम बहुत पुढें । सूक्ष्म निरोपम रूंदी । उगम पाहतां कांहींच नाहीं । तैसींच सकळ सिद्धि ॥१॥
भुजंग मासा मोठा तमासा । तैसाचि पक्षी मोठा । ज्याचें बीज चंचळरूपी । शरीर पर्वतलाटा ॥२॥
ब्रह्मांड मोठें बीज धाकुटें । सूक्ष्म ते मूळमाया । संकल्पारूपी चळण स्वरूपीं । तेथें नाहीं काया ॥३॥
दास म्हणे हें ऐसेंचि आहे । प्रत्ययें शोधनि पाहें । समजत उमजत सकळ तुळणा । त्यासी न साहे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP