अध्यात्मपर पदे - भाग १०
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१६४१
( राग-कल्याण; ताल-दादरा )
हरी अनंत लीळा । अमिनव कोण कळा ॥ध्रु०॥
खेचर भूचर सकळ चराचर । हेत बरा निवळा ॥१॥
दास म्हणे तो अंतरवासी । सकळ कळा विकळा ॥२॥
१६४२
( राग-केदारा; ताल-दादर )
शरीरधारक कोण शरीरधारी । कोण शरीर० । सुबुद्धिदुर्बुद्धियोगें तारि तो मारी । योगें० ॥ध्रु०॥
नयनीं नयनमरी जाणत आहे । मरी० । अकळ सृष्टीरचना मौनेंचि पाहे । रचना० ॥१॥
श्रवणीं ऐकतो सांगे सकळां भेद । सांगे० । वास घेतो खातो जातो मोठा चपळ । तो मोठा० ॥२॥
स्थूळ देह परी काया बापुडे । परी० । दास म्हणे तयावीण होईल वेडें । वीण० ॥३॥
१६४३
( राग-सोहनी; ताल-धुमाळी )
सर्वां अंतरीं आत्माराम विश्रामधाम । मध्यें आडवा आला भ्रम देह्संभ्रम ॥ध्रु०॥
यम नियम दम । नित्य प्राणायाम ॥१॥
आगमनिगम । संतसमागम ॥२॥
ठायीं पडेना वर्म । उमें राहिलें कर्म ॥३॥
सदा नित्य नेम । वाची सहस्त्रनाम ॥४॥
दास म्हणे राम । आहे पूर्ण काम ॥५॥
१६४४
( राग-कानड; ताल-त्निताल )
चंचळ चाळकू चमके । वेग बहू धमके ॥ध्रु०॥
करीत जातो गुप्तचि होतो । अनुमाना नये तो ॥१॥
उदंड केलें विवरेना । धारणा धरेना ॥२॥
कर्तृत्व येना विवरेना । दास म्हणे समजेना ॥३॥
१६४५
( चाल-सद्ग्रुरु सेवी० )
चंचळ चपळ रे तो प्राणनाथ जातांज न लगे वेळ रे ॥ध्रु०॥
बोलवी चालवीतो तो प्राणनाथ नयन हालवीतो ॥१॥
देखत चाखतसे तो प्राणनाथ बोलत ऐकतसे ॥२॥
बहुत सांगतसे तो प्राणनाथ देत मागतसे ॥३॥
सुखदुःख भोगितो तो प्राणनाथ आनंदतो सीणतो ॥४॥
सकळ कळा तो गे तो प्राणनाथ निजतत्त्व तोचि तो ॥५॥
पाहतां जवळी तो प्राणनाथ कल्पना कवळीतो ॥६॥
बहु शरीरें चालवी तो प्राणनाथ सकळ सृष्टी हालवी ॥७॥
स्वर्गमृत्यूपाताळीं तो प्राणनाथ खेळतो तिहीं ताळीं ॥८॥
नर अमर पन्नग तो प्राणनाथ खेळवी सकळ जग ॥९॥
अखंड जवळी असे तो प्राणनाथ त्यासी तोचि तिलसे ॥१०॥
स्वामी सेवक वर्तवी तो प्राणनाथ दाखवतिसे कवी ॥११॥
१६४६
( राग-बिहाग; ताल-धुमाळी )
जाणतो देव सकळ जाणतो देव । सर्वां पाळी सांभाळी करूनि उपाव ॥ध्रु०॥
देखोनि ऐके कितेक ऐकोन देखे । नाना सुखदुःख मनें करूनि वोळखे ॥१॥
जाणतो तो देव त्यासी चोरितां नये । देवासि अनन्य राहे हाचि उपाय ॥२॥
भक्त समजला देव आपुला केला । सर्वांघटीं एक आत्मज्ञानें वोळखिला ॥३॥
धन्य तो जनु निरंजन वोळखे । सर्वहि धारणा माईक सांडुनि राखे ॥४॥
१६४७
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-कारण पाहिजे )
जेणें हें निर्मिलें सर्व । सकळ भावभाव । निर्मिलें निश्चळ । देव जाणा रे ॥ध्रु०॥
अनंत ब्रह्मांडमाळा । अकळ जयाची लीळा । दुरी ना जवळा । देव जाणा रे ॥१॥
काळा ना पिवळा । देव निळा ना धवळा । कल्पनां वेगळा । सत्य जाणा रे ॥२॥
म्हणे रामी रामदास । धरूनियां विश्वास । ठायीं पाडीं सावकाश । देव रे ॥३॥
१६४८
( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-निर्गुण रूपीं० )
देव निर्मळ निर्मळ । देव निर्गुणा निश्चळ ॥ध्रु०॥
मायामळ पळपळ चळताहे । देव विमळ पाहे ॥१॥
दास निजध्यासमेवा । संतसज्जानाचा ठेवा ॥२॥
१६४९
( राग-काफी; ताल-धुमाळी )
पाहें आत्म्यारामेंविण जीतसे कोण । करा बरेंसें विवरण कोण कारण ॥ध्रु०॥
तिहीं लोकींचे पाहे । जीव पाळिताहे ॥१॥
जेथें तेथें रे मना । आहे उपासना ॥२॥
दास म्हणे राम । नसतां विराम ॥३॥
१६५०
( राग-भूप; ताल-धुमाळी. )
तें वसतें जगदांतरीं । तें जाणजाणों विवरीं ॥ध्रु०॥
पैल चंचळ म्हणूं एक आहे । तें उदंड देह धरिताहे । तें आपणासि आपण पाहे रे रे रे रे । त्यासी तुळणा दुसरी न साहे ॥१॥
तें बहुतचि चपळ । तें सांपडेना एक पळ । त्याच्या ठायीं बहु चळवळ रे रे० । तेणें व्यापिलें भूमंडळ रे ॥२॥
तें आपणासी आपण मारी । तें आपणासी आपण वारी । तें आपणासी आपण हारी रे रे० । तें आपणासी आपण तारी रे ॥३॥
त्यावेगळें त्यासी राहवेना । त्यावेगळें त्यासी पाहवेना । त्यावेगळें त्यासी साहवेना रे रे० । दास म्हणे तें एक नाना रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP