१६०१
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर० )
अरे मन पावन देव घरीं । अनहित न करीं ॥ध्रु०॥
नित्यानित्य विवेक करावा । बहु जन उद्धरीं ॥१॥
आत्मा कोण अनात्मा कैसा । पर पार उतरीं ॥२॥
दास म्हणे तुझा तूंचि सखा रे । हित तुझें तूं करीं ॥३॥

१६०२
( राग-केदार; ताल-त्निताल; चाल-कोण मी मज० )
मन गे निश्चळीं चंचळ जालें । संकल्पेंचि विराट वाढलें ॥ध्रु०॥
निश्चळ गगनीं आमाळ आलें । आलें सवेंचि उडालें ॥१॥
निद्रिस्तानें स्वप्र देखिलें । जागें होतां माइक जालें ॥२॥
बाजीगरी वोडंबरी । दास म्हणे तैसी परी ॥३॥

१६०३
( राग-रामकली; ताल-धुमाळी. )
मज मीपणाचे नाहीं । सुख दुःख कैचें काईं । शुद्ध स्वरूपचि पाहीं । सदोदित ॥ध्रु०॥
मीपण नव जातां माझें । वंदितां हि दुःख वोझें । मीपण गेलिया सहजें । नेदितां सुखें ॥१॥
देहसंगें दिसे । परि दग्ध जालें असे । जैसें बीज अग्निलेशें । नसोनि असे ॥२॥
रामीरामदासीं देहीं । देहुबुद्धि ते हि नाहीं । विदेह बुद्धि पाहीं । उरली नसे ॥३॥

१६०४
( राग-केदार; ताल-त्निताला. )
कोण मी मज कळतचि नाहीं ॥ सारासार विचारूनि पाहीं ॥ध्रु०॥
नर म्हणों तरि नारिचि भासे ॥ नारि म्हणों  तरि समूळ विनासे ॥१॥
दास  म्हणों तरि राम चि आहे ॥ राम म्हणों तरि नाम न साहे ॥२॥

१६०५
(राग-देसकार; ताल-धुमाळी.  )
जाण बापा जाण बापा जाण बापा अनुभव सोपा ॥ध्रु०॥
डोळ्यांत भरलें देखणियां चोरलें । वायूंत थारलें उडेचिना ॥१॥
नमाचिसारिखें नम नव्हे पारिखें । इंद्रियें हरिखें वेडावलीं ॥२॥
जाणण्यांत आगळें जाणीवे वेगळें । स्वरूप सगळें रामदासीं ॥३॥

१६०६
( राग-केदार; ताल-त्निताल; चाल-कोण मी० )
धन्य जगदीश एकला । व्याप उदंडचि करित गेला ॥ध्रु०॥
अंडज जातीं जिनस किती । रंगरूप किती एक गुणाला ॥१॥
जारज काया कोण गणाया । मेद अनेक्चि नाहीं मंगला ॥२॥
स्वेदज जळचर कोण जाणे पार । जेथें तेथें सावधचि जाला ॥३॥
उद्भिज लेखा उदंड चि देखा । दासा म्हणे पुरोनि उरला ॥४॥

१६०७
( राग, ताल व चाल-वरील. )
एकला जगदांतरा जाला। कोणिच नाहीं तयाला ॥ध्रु०॥
चारी खाणी चारी वाणी । हालवि बोलवि चालवी त्याला ॥१॥
एक घरी एक त्यागित आहे । आपणा आपण भोगित आहे ॥२॥
दास म्हणे बहुविंध तमासा । पाहेल तो मग होईल तैसा ॥३॥

१६०८
( राग, ताल व चाल-वरील )
निर्गुण रूपीं मिळाला । जन पावन जाला ॥ध्रु०॥
बहुत वेळे आला गेला । सज्जनसंगें निवाला ॥१॥
आत्मशास्त्रगुरुप्रत्यय पाहातां । अंतरीं निश्चय आला ॥२॥
दास म्हणे मन आत्मनिवेदनें । उन्मनीं बोधें बुडाला ॥३॥

१६०९
( राग-शंकराभरण; ताल-धुमाळी)
काय पाहों मी आतां । रूप न दिसे पाहतां । खूप न ये सांगतां रे रामा ॥ध्रु०॥
द्दश्य पाह्तां डोळां । वाटतो सोह्ळा । त्याहूनि तूं निराळा रे रामा ॥१॥
ज्ञान हातासी आलें । त्याचें विज्ञान जालें । तेंहि नाहीं राहिलें रे रामा ॥२॥
देह लटिका जाला । अनुमव कोणा आला । भेटी देईं मजला रे रामा ॥३॥
तुज पाहों जावें । आपणां मुकावें । तेथें काय पहावें रे रामा ॥४॥
दासें घेतली आळी । पावावें ये काळीं । सगुणरूपें सांमाळीं रे रामा ॥५॥

१६१०
( राग-असावरी; ताल-दीपचंदी. )
प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट न्रिरंजन आहे । आगम निगम संतसमागम सद्‌‍गुरुवचनें पाहें ॥ध्रु०॥
आत्माविचारें शास्त्रविचारें गुरुविचारें बोध । मीपण तूंपण शोधून पाहतां आपण शोध ॥१॥
जडासी चंचळ चालविताहे चंचळ स्थिर न राहे । प्रचित आहे शोधूनि पाहे निश्चळ होऊन राहे ॥२॥
भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवण मनन साधा । दास म्हणे निजगुज  साधतां होत नसे भवबाधा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP