अध्यात्मपर पदे - भाग ११
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१६५१
( राग-खमाज; ताल-धुमाळी. )
जवळी परि तें भासेना । भासे परि तें दिसेना ॥ध्रु०॥
चंचळ रूप तें देवाचें । नेणें माणुस तें कांचें ॥१॥
साधुमुखें जाणावें । अंतर्खुणे बाणावें ॥२॥
उमजेना समजेना । विवेकेंविण भिजेना ॥३॥
अंतरलें अंतरलें । अंतरलें जगदांतरलें ॥४॥
उमगा रे उमगा रे । उमगेना तरी सिमगा ॥५॥
वोळखा रे वोळखा रे । वोळखा रे कोण पारखा रे ॥६॥
आठवेना विसरेना । दास म्हणे हा जिनसाना ॥७॥
१६५२
( राग-केदार; ताल-धुमाळी. )
मानवी जन्म निरर्थकु । जाल सार्थकु । भजनेंचि जयाच्या ॥ अखंड चुकत वाकत । बुद्धि फांकत । गाऊं कीर्ति तयाच्या ॥ध्रु०॥
सेवक मारुतीसारिखा । वाटतो सखा । संकटीं पावताहे ॥ बज्रशरीर चिंरजीवी । जन्म मानवी । तया सोडविताहे ॥१॥
मार्तंडकुळविभूषणा । भक्तभूषणा । करूणाकर देवा । अनंत जन्मींचें सुकृत । जालेम संचित। मज घडली सेवा ॥२॥
दास म्हणे जगन्नायका । सुखदायका ॥ शरणांगत तूझा । जो जो मनींचा मनोरथु । अंतर्हेतु । पुरविला माझा ॥३॥
१६५३
( राग-प्रभात; ताल-धुमाळी. )
माझे मनींचे मनोरथ पुरले वो साजणी । घननीळतनु चापपाणी देखोनी ॥ध्रु०॥
सपनीं देखिलें तें साचचि जालें । अंतरीं बिंबलें ध्यान राघवाचें ॥१॥
कल्पिलें फळासि आलें । चिंतिलें तैसेंचि जालें । तेणें गुणें निवालें मन माझें ॥२॥
सगुणें निर्गुण केलें । निजरूप लाधलें । रामदास म्हणे मलें नरदेह ॥३॥
१६५४
( राग-जयजयवंती; ताल-दादरा. )
धन्य कृतकृत्य जालों । घेतां विचार निवालों । रघुवीरें सोडवीलों । आपुल्या ब्रीदासाठीं ॥धु०॥
श्रवणमनन केलें । नवविधा समजलें । आत्मनिवेदन जालें । अंतर निवालें गेलें ॥१॥
प्रचितीचें समाधान । पिंडब्रह्मांड शोधन । निरंजनीं निरंजन । चंचळ गेलें विरोन ॥२॥
फिटला रे संदेहो । जावो अथवा देह राहो । दास म्हणे कल्याण हो । रघुनायका देवा ॥३॥
१६५५
( राग-कानडा; ताल-दादरा. )
सकळ कळलें कळलें । भाग्य सकळ फळलें ॥ध्रु०॥
नेमक बोलणें नेमक चालणें । नेमक प्रत्यय आला ॥१॥
समजलें तें बोलतां नये । बोलतां अनंत येना ॥२॥
दास म्हणे मौन्यें अंतर जाणा । निःशब्द अंतरखूणा ॥३॥
१६५६
( राग-पहाडी; ताल-धुमाळी. )
संसारीं संतोष वाटला । देव भेटला । मोठा आनंदु जाला ॥ सुखसागर उचंबळे । जळतुंबळे । दुःखसिंधु निमाला ॥ध्रु०॥
सेवकासी ज्ञान दीधलें । काम साधलें । देवदर्शन जालें ॥ आत्मशास्त्रगुरुप्रत्ययें। शुद्ध निश्चयें । ऐसें प्रत्यया आलें ॥१॥
देवचि सकळ चालवी । देह हालवी । अखंडिताची भेटी ॥ उत्तम सांचला संयोग । नाहीं वियोग । अवघ्या जन्मासेवटीं ॥२॥
दास म्हणे दास्य फळलें । सर्व कळलें । ज्ञानें सार्थक जालें ॥ सार्थकचि जन्म जाला । मानवी मला । परलोकासी नेला ॥३॥
१६५७
( राग-केदार; ताल-दादरा. )
जालें साधन देव भेटला रे । देव० । संसारींचा अवघा धोका तुटला रे ॥ध्रु०॥
जनम सार्थक जन्म सार्थक । जन्म० । रामभजनें प्राप्त जाला विवेक ॥१॥
साधला रे काळ साधला रे । धन्य विवेक देव मुख्य शोधला रे ॥२॥
धन्य हा देव धन्य हा देव रे । दास म्हणे याचें लाघव रे ॥३॥
१६५८
( राग-काफी; ताल-दीपचंदी. )
अंतरीं अंतरवळखी अघटित घडली । अंतरीं अंतरी शोधीतां तिहीं लोकीं जडली ॥ध्रु०॥
चुकत चुकत चुकलें मज मीच मुकलें । पाहतां पाहतां वेधीं राहतां ज्याचें त्यास तुकलें ॥१॥
वेधत वेधत वेधलें बीज शोधिलें गुज लाहत गेलें । नवल नवल जालें जालें पाहालें कांहीं एक फळलें ॥२॥
चंचळ चंचळ अंतरीं जगदांतरीं एक रूप जाहाली । निरखितां निरखितां निरखिलें सुख चाखिलें स्थिति मोठी जाली ॥३॥
दास म्हणे काय सांगणें किती बोलणे लय लाऊन गेला । रामरूप पुण्यपावन जिवींचें जीवन जन्म सार्थक केला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP