लीळा १९९ : पद्मनाभि चणकयाचनीं उपाहारू
सेंदुरणीं गोपाळीं अवस्थान : सेंदुरणीं पूर्वामुख गोपाळाचें देऊळः तेथ अवस्थान दीस १० : 12 : ॥ एकुदीसीं गोसावी वीहरणा बीजें केले : मग बीढारा बीजें करीतां मार्गी पद्मनाभिदेवातें ह्मणीतलें : ‘ पद्मनाभि जा : चणा मागा ’ : ‘ जी जी ’ ह्मणौनि नीगाले : सेतकरीया पासि गेले : तेयांते ह्मणीतलें : ‘ आह्मांसि काइ चणा दीया ’ : निका संभावनीक देखौनि तेणें ह्मणीतलें : ‘ लागे तो घेया जा ’ : गेले : चणा वोलीं घालौनि घेउनि आणिला : रगडवीला : उपणवीला : सर्वज्ञें ह्मणीतलें : तुह्मी एथ आपुलेनि हाते धीडरीं करा ’ : ( शोधु ) ‘ धीडरीं रांधावी ’ : मग तेहीं तैसेंचि केलें : मग तेंही डाळि दळुनि भीजत घातली : वाटित होते : तें देमाइसीं देखीलें : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ दे : मी करीन ’: मग देमाइसीं धीडरीं केलीं : थोडे ऐसें चणे वीकीले : तांदुळ घेतले : तुप घेतले : उपाहारू निफजवीला : मग गोसावीयांसि पुजा केली : आरोगण : गोसावीयांसि सहपंक्ति भोजनें जाली : गोसावीयांसि गुळळा : वीडा : ॥
लीळा २०० : तथा पाठवणी
माता गौराइसें पद्मनाभिदेवातें नेयावेया आली : दांडीये बैसोनि : गोसावीयांसी दर्शन केलें : परि काइ दर्शन केलें तें नेणीजें : आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा उपाहारू केला : मग वीनवीलें : ‘ जी जी : रेमनायक सरलें : जोगनाएकासि कुळवाडी सांवरेना : तरि गोसावी पद्मनाभीतें पाठवावें ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ तुमचा पद्मनाभि : हा एथ असावा : ऐसी काइ एथ चाड पली असे ’ : ‘ ना जी : गोसावीयां पासि असे : ह्मणौनि : आणि काइ ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ जाए गा ’ : पद्मनाभिदेवीं ह्मणीतलें : ‘ ये मातें कैसी नेती : ऐसं याचें बळ पाहों पां ’ : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘ आतां तवं जाए पां ’ : मग निगाले : ॥
लीळा २०१ : उपाध्या वीष्णुभटां भेटि
उपाधीं विष्णुभटीं एरंडवलीकडे आइकीलें : मग वीष्णुभट उपाध्ये पर्वालागि टाकौनि येत असति : सेंदुरणासि आले : विष्णुभट बीढारासि गेले : उपाधिये हाटवटींये कणीक घेवों गेले : तवं तेणें ह्मणीतलें : ‘ तुह्मीं काइ गोसावीयांचे ’ : तेहीं ह्मणीतलें : ‘ कोण ’ : ना एथ गोसावी एक गोपाळचेया देउळा आले असति ’ : एकी बीढारीं आइकीलें : एकी हाटवटीं आइकीलें : तैसेंचि ते गोसावीयांचेया दरिसना निगाले : बिढारीं निरोपु ठेवीला : ‘ आमचे कोण्ही येती : तरि गोसावीयाचेया दरिसना गेले ऐसें सांघावें ’ : तैसेचि तेहीं निगाले : दोघां दारवठां भेटि जाली : सांघातें गोसावीयांचेया दरिसनासि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : ॥
लीळा २०२ : तथा प्रसनाएक उपाध्ये रिधपुरा पाठवणें
एकुदीसीं गोसावी श्रीप्रभुची महीमा निरोपीत होतें : परसनाएकासि ऐसें उपनलें : जें श्रीप्रभुचेया दरीसनासि जावों : उपाध्ये आणि परसनाएक बाहीरि निगाले : प्रसनाएकें ह्मणीतलें : ‘ जानो : मीं श्रीप्रभुचेया दरिसनासि जाइन : तरि तुं एसी : जावों : तुज श्रीप्रभूचें दर्शन नाहीं ’ : तेहीं ह्मणीतलें : ‘ गोसावीयांतें पुसां : गोसावी पाठवीति तरि जाइन ’: मग दोघे गोसावीयांचेंया दरिसनासि आलें : मग गोसावीयांसि प्रसनायेकीं पुसिलें : ‘‘ जी जी : मीयां जानोतें ऐसें ह्मणीतलें : ‘ मीं श्रीप्रभूचेयां दरिसना जाइन : तरि तुं एसी : जावों ’ जानो ऐसें म्हणें : ‘ गोसावीयांतें पुसा : गोसावी पाठवीति तरि मी एइन ’’ सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ ऐसे हो : बटिका ’ : ‘ हो जी ’ : तुह्मीं परमेश्र्वरपुरा जाल आणि एथौनि वारिजैल : परमेश्र्वरपुरा जावों ह्मणें : तेणे मार्गे निगे : एक एक पाउल घाली : तेयाचें केसणें गोमटें : तुह्मीं तेथें जाल : आणि एथौनि वारिजैल ’ : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ बटीका ’ : तुमतें परमेश्र्वरपुरां जाणें काइ ’ : तेहीं ह्मणीतलें : ‘ जी जी : गोसावीयांचा ठाइ पर्व करूनि मग जाउनि ’ : गोसावीयांचा ठाइं पर्व केलें : उपाधीं गोसावीयांतें पुसीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ऐसेयांचि निगावें : पेणोवेणां जावें : उपेणें न करावें : श्रीप्रभूचें दर्शन घेयांवें : समोर न बैसावें : वाडवेळु श्रीचरणावारि माथा ठेउनि नमस्कारू न करावा : देवतेसि निरोधु होए : मग तेहीं दोघीं पैऱ्हां विचारीलें : प्रसनायक म्हणति : ‘ लोणारावरौनि जावों : वर्जेंचें स्नान होईल : सारंगधराचें दर्शन होइल : मग श्रीप्रभुचेया दर्शना जावें ’ : उपाध्ये म्हणति : ‘ उजुचि चांगदेवेंहुनि श्रीप्रभुचेया दर्शना जावों ’ : ऐसे दोघै विचारीत गोसावीयांपासि आले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ तरि सांघातियां सवादु असे म्हणा ’ : उपाधी गोसावीयां पुढें सांघीतलें : मागील आवघेंचि : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ वर्जेचें स्नान : सारंगधराचें दर्शन : नेणोंकोण आलें : कीर्तितें करूनि गेलें : आतां तेथ काइ असेः मग निगाले : चांगदेवासि गेले : तवं तेथ संन्यासियांसि परीक्षा निमंत्रण आंबेभोजन मांडले असे : यऱ्हायऱ्हासि निमंत्रण दीधलें : जेवीले : जेउं सरलें : आणि उदीयां आखत लाविलीं : आणि उपाध्ये ह्मणों लागलें : ‘‘ हें काइ : प्रसनाएको : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ पेणोवेणां जावें : उपेणें न करावें ’ : तरि तुह्मी राहात असा ’’ : प्रसनाएकीं ह्मणीतलें : ‘ राहे : आंबेयाची सराय तवं घेवों : मग श्रीप्रभुचें दर्शन तें काइ केंही जात असे ’ : मग तोहीं दीस राहीले : जेवण जालें : आणि येरी दीसीचें माघौतें निमंत्रण दीधलें : उपाधी ह्मणीतलें : ‘ तुह्मी राहाल तरि राहा : मि जाइन ’ : प्रसनाएक राहीले : उपाध्ये निगाले : ते अळजपुरासि आले : दामाचे पांच आंबे घेतले : देहें श्रीप्रभुचेया दर्शनासि आलें : श्रीप्रभु टीकोउपाध्याचिए वोसरीय वरि आसन : उपाध्ये आले : श्रीप्रभु पुढां आंबे ठेवीले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : श्रीप्रभुपुढें उभे होते : श्रीप्रभु करीं आंबे घेति : आणि मध्येंचि आरोगण : ‘ आंबा गोड आहे ह्मणे : खावा ह्मणे ’ : आडवा आंबा आरोगण : ऐसे पांच आंबे कणु कणु चाखीले : ‘ मेला जाए : घे ना ह्मणे : आरे घे घे ह्मणें ’ : ह्मणौनि श्रीचरणें तेयाकडे लोटिले : उपाधीं ते आंबे घेतले : मग वीळीचां वेळीं : उपाध्ये माघौतें दर्शना आले : ‘ मेला जाए : ऐसा एइल : खाइल ह्मणे : न खाय ह्मणे : आरे साळे जाए : साळे ’ : ते उपाध्यासि उमटेंचि ना : तवं सर्पू आला : तेयांतें देखौनि वासरूं बूजालें : ‘ मेला जाये : परि खायेचि ना म्हणे : आतां एइल : तो खाइल म्हणे : साळे जाए ना म्हणे ’ : तवं टिकोपाध्याचियां कन्या ह्मणीतलें : ‘ भटो : गोसावी तुमतें साळेसिं पाठवीत असति ’ : मग उपाध्ये साळेसि गेले : त्री रात्र होते : मग दंडवत घालौनि निघाले : ॥
लीळा २०३ लखुमबाइसा देमाइसा भेटि
देमाइसें : लखुबाइसें : गोसावीयाचेया दरिसनां येतें होती : गोसावी कोण ठाइं राज्य करीत असति ऐसें नेणति : सेंदुरणांसि आलीं : पैले थडीए भिक्षा केली : नदी जेवीली : एरी थडीएचिये आळीए निद्रा करूं आलीं गोसावीयांसि वीळीचां पुजा अवस्वरू जाला : व्याळी जाली : बाइसीं फोडी वोळगवीलीया : वीडीया करूनि देते असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘‘ मार्तंडा या आरूतें : ऐसे ऐसे जा : ‘ दुध जोडे : दुध वो ’ : ऐसें फोकरा ’’ ‘ जी जी ’ : ह्मणौनि निगाले : मग ह्मणों लागले : ‘ गोसावीयांसि तरि व्याळी जालीं : आतां दुध काइसेया लागि ’ : ऐसे वीचारित गेले : ‘ कवडां दुध जोडे वो ’ : ह्मणौनि फोकरूं लागले : तवं देमाइसीं ह्मणीतलें : ‘ लखुबाई : मार्तंडाचेया ऐसा शब्द ’ : ह्मणौनि साउमीं गेलीं : ‘ हें कोण : मार्कंडा ’ : ‘ ना वो : हें कोण : देमाइसे ’ : ‘ ना वो : चाला चाला : तुमतें गोसावी बोलाउं पाठविलें असे : ऐसे गा आमचे गोसावी : आपूलें ईश्र्वर्यें जाणों नेदीति ’ : ऐसें ह्मणौनि येर्हें येर्हें गोसावीयांचेयां दरिसनां आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : गोसावीयांपूढें अवघें सांधों लागलीं : ‘ जी जी : आह्मीं पैलाडिलें थडीए भिक्षा केली : नदी जेवीलों : ऐलाडिलें थडीए नीद्रा करावेया आलों : तवं मार्तंडु आला : भेटला : आलों ’ : ऐसें आवघें सांघीतलें : ॥
लीळा २०४ प्रथम वसति : लखुबाइसां भेटि
गोसावी लखूबाइसें देमाइसें गावां पाठवीली : मागीली कडौनि त्याचि गावा गोसावी बीजें केलें : एका वृक्षाखालि आसन : लखुबाइसीं गोसावीयांतें देखिलें : ‘ देमाइं देमाइं : गोसावी बीजें केलें : चाल : जावों गोसावीयाचेयां दरिसनां ’ : ‘ आइ मीं न ए : तुं जाए : जाइजैल आणि बाइसें वीसारूंचि लागति ’ : लखुबाइसीं ह्मणीतलें : ‘ तुळीं न याः तरि न या : मी जाइन ’ : तें गोसावीयापासि आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : बैसली : आणि बाइसे वीसारूंचि लागली : आणि तीये तैसाचि नीगालीं : देमाइसा पुढें सांधों लागलीं : ‘ तुवां ह्मणीतलें तेंचि जालें : गेलीं आणि बाइसें वीसारूंचि लागलीं : तुह्मीं न याचि तें बरवें केलें ’ : मग बाइसाचि दृष्टि चुकुनि : गोसावी तेयाचेया बीढारा बीजें केलें : गोसावीयांसि आसन घातलें : आसनीं उपविष्ट जाले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयांजवळिं बैसलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती : तुम्हीं एथीचेया दर्शना न याचि तें काइ ’ : ‘ जी बाइसा हातीं एवों नैए ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती : वोढाळा गोरूवाची परि तुह्मां होआवी : माळीयावरि जो असे तो थै थै म्हणें : तवं तें एकू घासूं घे : तो तवं फळे की : तैसें होआवें देमती ’ : मग गोसावी तयांतें बीढारा घेउनि आले : मग बाइसीं ह्मणीतलें : ‘ बाबा : यें यांसि राहों दीधलें : आतां कांही ह्मणोंचि नए ’ : ह्मणौनि स्नेहचि करिती : ॥ पाचोरां वसति : चांगदेवो पुरीए अवस्थान : ॥
लीळा २०५ : चींचखेडकर रामदेवाचा अवसरू आइकणें
मग गोसावी चांगदेवासि बीजें केलें : चांगदेवीं जगती आंतु मठीं अवस्थान दीस सात : कीं : पांच : ॥ चींचखेडकर रामदेव : एकुदीसीं गोसावी उदयाचा पूजावसर जालेयानंतरे वीहरणा बीजें केलें : स्याळीएचें आंगी टोपरें लेउनि : चांगदेवाचिए दक्षीणीली दारवठां पूर्वीलें सोंडीवरि दक्षीणामुखु गोसावी उभे असति : कवडिंब रामदेव गंगेकडौनि हाटवटीयेहुनि गावांतु येत असति : तंव गोसावीयांतें सोंडीयेवरि उभेयां देखीलें : धावत पुढें आलें : हातीं चित्रीव काठी होती : ते गोसावीयांचा श्रीकरी वोळगवीली : दंडवते घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावी ते काठी श्रीकरीं घेउनि त्रीभंगी ठाण मांडौनि उभे असति : तेहीं जति केली : ‘‘ शंकचक्र सांडौनि हातीं डांग घेतली : हातियेरू गोवळेया ’’ हे जति वोळगवीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ आतां पुरे ’ : वारिले : मग गोसावी पुडवाटुवा झाडौनि तांबूळ दीधलें : पीवळी आंगी टोपरें : गळदंडा दीधला : तें टोपरें डोइए घालुनि नावेक नाचीनलें : मग गोसावी तेयासि पाठवणी दीधली : ते निगाले : मग बाइसीं पुसीले : ‘ बाबा : हा कवणु ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ रामदेवो कवडींबू ’ : ‘ बाबा : भगतु कैसा निका ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ हा आणिका भक्तासारिखा कोरडा नव्हे ’: मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥
लीळा २०६ : तापीं तटीं मार्तंडा देवतादर्शन
एकुदीसीं गोसावी वीळीचां वेळीं वीहरणा बीजें केलें : गोसावीयां जवळि बाइसें मार्तंड बैसलीं असति : मार्तंडा स्तीति जाली : पुढां देखों लागले : गोसावी पाणीयां आंतु बीजे केलें : हातीं मार्तंडातें धरीलें : दोनि देवता साउमीया आलीया : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीयां : सोनीयाचा मांचा पासौडिला : तेथ आसन : सोनियाचें परियेळ : रत्नाचे दीप : दोघी स्त्री : गोसावीया वोवाळणि केली : माथाचां केशीं श्रीचरण झाडीले : ऐसें मार्तंड देखीलें : मग बाइसां पुढें सांधीतलें : बाइसीं ह्मणीतलें : ‘ बाबा : मार्तंडु काइ ह्मणतु असे ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ बाइ : यातेंचि पुसा ’ : ‘ बाबा आपण कें गेलीयां होतीयां ’ : ‘ बाइ हें कें गेलें होतें : हें ऐथेंचि होतें नव्हे ’ : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘ बाइ : यासि ऐसी बुधि ’ : ‘ गोपाळबा : गोसावी साचचि उदकांत बीजे केलें ’ : बाइसीं देखीलें तो आभासु पालुखा केला : ह्मणौनि गोसावी मढासि बीजें केलें : ॥
लीळा २०७ : मार्गी व्याघु्र पाठीं येणें
गोसावी चांगदेवीहुनि सांवळदेवाकडे बीजें करितां व्याघ्रें गोसावीयांतें देखीलें : आणि स्तीति जाली : आणि साउमा आला : बाइसीं ह्मणीतलें : ‘ बाबा बाबा : वाघू ’ : ह्मणौनि भीयालीं : तथा ‘ जी जी : वाघू आला ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ भीयाना ’ : पाठी पाठी आला : गावां एकाचां आखरीं : सर्वज्ञें ह्मणीतलें ‘ महात्मां : आतां राहीजो ’ : ( शोधु ) ‘ लोकु देखैल : आतां राहीजो माहात्मा ’ : बाइसीं ह्मणीतलें : ‘ बाबा : हा कोण्हाचें कांहीं न करी : तरि एवों कां दीजेना ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : बाइ : हा आता कोण्हांसि उपद्रो न करी : यासि लोकू उपद्रो करील : तों निगाला : ॥
लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी
गोसावी एरी दीसीं सावळदेवा बीजें करीती : ऐसें आधीलें दीसीं बाइसीं मार्तंडातें ह्मणीतलें : ‘‘ मार्तंडा तुं सावळदेवासि जाए : दाया पुढें सांघावें : ‘ बाबा एत असति : अवघी आइति करावी : आणि घोडेनिसीं बाबासि साउमेया यावें ’’ मार्तंड सावळदेवासि गेले : तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले : मार्गी भेट जाली : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांतें वीनवीलें : ‘ घोडेयावरि बैसावे जी ’ : वीनती स्वीकरिली : घोडेयावरि आरोहरण केलें : पुढें भक्तिजन चालति : गोसावीयांचे घोडें वारिकें : गोसावी मागील वास पाहीली : तवं मागीली कडे देमाइसें एतें असति : ते गोसावीयां टाकौनि आली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती या : घोडेया बैसा ’ : ह्मणौनि पासाडाचा अनुकारू दाखवीला : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ हो कां : जी : तथा जालें नव्हें जी ’ : ह्मणौनि पासाडावरि हातु ठेविला : यावरि गोसावी कुबजका भवनीं बीजें केलें : ते गोष्टि सांघीतली : ‘ तैसे तुह्मीं केलें देमती : तुम्हीं एथीचे प्रवृत्ति वीखो जालीति ’ : ॥
लीळा २०९ : सावळदेवीं अवस्थान
( शोधू ) सावळदेवा दारवंठे दोनि : पूर्वामूखु : मग गोसावी सावळदेवा बीजें केलें : सावळदेवा दक्षीणे : भीतरीलीकडे जगतीसीं पूर्वपश्र्चिमी पटिसाळ होती : पश्र्चीमीले सीरां एका खणाची गुंफा पूर्वाभिमुखु : तेथ अवस्थान : ( शोधु ) देउळा पोळि बाहीरि : उत्तरे ग्रह : वाव्ये दाएनाएकाचा आवारू : तेथ गोसावी प्रतदीनीं पूजा : आरोगण : तथा मादनें होए : आंबेयातळीं वीहरण : ( शोधु ) गावां अग्ने बदरिखा एकू आंबा : सावळदेवीं वीरहण : प्रत्तदीनीं दाएनाएकाचें ताट ए : एकुदीसीं दाएनाएकीं गोसावीयांसि वस्त्रपुजा केली : वालसेंग वसति : तेथौनि वालसेंगे : गावां नृत्ये ह्माळसेचें देउळ : पूर्वामूखु : तेथे वसति जाली : तैसेंचि गोसावी बीजें केलें : ( शोधु ) वालसेंगे अग्ने तपोवन : ॥
लीळा २१० : तपोवनीं साइदेवां भेटि
तपोवनासि बीजें केलें : देउळांत बीजें केलें : अडवांगी देउळीए बीजें केलें : सीधनाथाचें रचमचेचें देउळ : ह्मणौनि तेथ आसन : तवं साइदेवो दांडीए बैसोनि देउळा आले : चौकीं आपुलीं वस्त्रें ठेविलीं : कुपीनु केला : धागीर घेउनि पाणी वाहीलें : सडा घातला : देवतासि अस्तर्पण केलें : पुजा केली : मग प्रदक्षीणा करावेया आला : तवं गोसावीयांते देखलें : दंडवत घातलें : श्रीचरणा लागले : भेटि जाली : मग गोसावीयांते विनविले : वीनवणि स्विकरीली : गोसावीयांसि आंगणि दांडिएवरि आसन केलें : ते वोडण खांडे घेउनि पुढां खोलति निमाले : मग घोडेयावरि बैसवीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ तुह्मी घोडेयावरि बसा ’ : तेंही ह्मणीतलें : ‘ जी जी : मीं गोसावीयांपुढें चालैन ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ तरि हें उतरैल ’ : मग ते घोडेयावरि बैसले : ॥