भाग २ - लीळा २८१ ते २९०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २८१ : साडेगावीं मैराळीं वस्ती : गौराइसां भेटि
गोसावी साउगावांसि बीजें केलें : मैराळदेवीं डावेयाकडे रिगतां पटिसाळेवरि आसन : जाडिचा कानवडा बांधला : उमाइसें आबैसां सांघों गेलीं : गौराइसें पींपळ सींपो आली होतीं : तथा अग्रो उदकासि आलीं होतीं : तवं जाडिचा कानवडा देखीला : तींहीं ह्मणीतलें : ‘गोसावीयांचेया सारीखी जाडि : तरि काइ बीजें केलें असैल’ : ऐसें ह्मणौनि आलीं : गोसावीयांतें देखीलें : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : मग गोसावी पूसीलें : ‘इंद्रा गावीं असे ना’ : ‘नसति जी’ : तैसीचि तीए बीढारासि आलीं : आबैसा पूढें सांघीतलें : तथा उमाइसां पूढें सांघीतलें : त्ये गोसावीयांचेया दर्शनासि आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : लांखाइसां खेवांखेवी जालीं : त्ये वृत्ति सोयरीं : मग आबैसीं पूसीलें : ‘लाखाइसें : तुह्मी केधवां आलीति’ : तीहीं ह्मणीतलें : ‘आजि आलों’ : मग आबैसें गोसावीयां जवळि बैसलीं : गोसावीयांतें उपाहारा लागि विनवीलें : गोसावी वीनवणि स्वीकरीली : मग तीये लाखाइसांतें बीढारा घेउनि गेलीं : न्हाणिलीं : जेवण केलें : ॥

लीळा २८२ : राणाइसा स्वातंत्रीय नीरूपण
मग राणाइसें भुकैलीं जालीं : उठीति बैसति : सीदोरीची वास पाहाति : आणि लाखाइसांची वास पाहाति : आणि गोसावीयांचेया श्रीमूखाची वास पाहाति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : जेवानां कां’ : ‘वर्तस्त असे जी : सीदोरी एकत्र असे : लाखाइसें एति : मग जेउ वाढीति’ : सर्वज्ञें म्हणीतलें : ‘बाइ : स्वातंत्रीय हे मुक्ति तथा मोक्ष’ ॥ मग लाखाइसें आलीं : तथा दीस माळवतां आलीं : मग तीहीं पूसीलें : ‘राणाइ जेवीलींसि’ : ‘नां : तुह्मांवीण कैसी जेवीन’ : मग तेहीं सीदोरी सोडिली : आंबिलभातु घालु आदरिला : गोसावी पुसीलें : ‘बाइ : हे काइ जी’ : ‘हा दहीभातु’ : ‘हे काइ जी’ : ‘हा आंबिलाभातु’ : एकें ह्मणति : वरण भातु : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा भातु वाढा’ : त्यावरि बाइसें लाखाइसांसि कोपलीं : ‘आपण तेथे जेवीली : इसीं आंबिलभातु वाढीत असे : नको वाढूं : हे बाबाचिए पांती जेवील’ : मग तेंही दहीभातु वाढीला : त्ये जेवीली : मग विळिचां आबैसाचां उपाहारू आला : गोसावीयांसि भितरि दक्षीणीकडे पुजा जाली : आरोगण : तेथेचि रात्रीं वसति जाली : ॥

लीळा २८३ दोणि उतरौनि
गोसावीयांसि उदयाचां पुजावस्वर जाला : गोसावी गंगेचिय थडीयें बीजें केलें : डोणि पासि आले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘डोणि कां सूआना’ : तेहीं ह्मणीतलें : ‘ना जी : आह्मां आवलुं नैए’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें आवलुं लागैल’ : ॥ मग तेंहीं डोणि घातली : गोसावी फुटेयाची तळशूधि केली : गोसावी दोनिवरि उभे राहीले : बाइसें : लाखाइसें बैसली : तवं नावे कडौनि पूरती गेली : मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसें बैसवीलीं : मग श्रीकरीं आवला घेउनि डोणि आवलिली : ते उजुचि नेली : मग तेयांसि वीस्मयो जाला : ‘हे काइ जी : ऐसी दोनि कव्हणी आवलुं नेणे जी : कैसी उजुचि नेली’ : मग तेहीं आवला नेला : दोनि कडे लाविलि : मग गोसावी उतरले : तव दोनि नावेक परती गेली : मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसांतें उतरिलें : तवं बाइसें कोपलीं : ‘हें काइ वो जालें ये रांडेसि : मगा तरि मगा : बाबाचा श्रीकरू धरूनि चढली : आतां तरि आतां : बाबाचा श्रीकर धरूनि उतरली : बाबाचा श्रीकरू दुखवेना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : यांसि काइसेया कोपतें असा : हें यासिचि करूं आवडत असे’ : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : पुरापासीं सेत : तेथ कांटीय तळिं आसन : ॥

लीळा २८४ : अवधूता भेटि : स्तीति
पापवीनाशनीं अवस्थान : ॥ मग तैसेंचि गोसावी पापविनाशना बीजें केलें : दीस तीनि अवस्थान : अवधूतु घागरीसीं उदका निगाला : दारवठां पींपळातळि गोसावीयांसि दर्शन जालें : गोसावीया पासौनि त्यासि स्तीति जाली : भंगली : मग गोसावीयांचेया श्रीचरणा लागले : मग दास्य करूं लागले : ॥

लीळा २८५ : चोर कूमतिहरण
रात्री चोर येत होते : तो भगतीजनीं गजबू आइकौनि गोसावीयां पूढें सांघीतलें : तथा बाइसीं : ॥ : ‘जी जी : चोर यताति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : भिया नां’ : गोसावी बाहीरी बीजें केलें : पींपळाचेया पारावरि : गोसावी उभे राहीले : आणि गोसावी खांकरिले : तीहीं ह्मणीतलें : ‘एथ माणूसाचां चाहाळु असे’ : तैसेंचि ते चोर गंगेचीया थडीया थडीयाचि गेले : ॥

लीळा २८६ : भाइदेव वीनती
भ्रींगीचे सासूरे भाइदेव ते उदीयांचि गोसावीयांचेया दर्शना आले : तेहीं पुसीलें : ‘जी जी : एथें रात्री माणूसें आलीं होतीं : कांहीं उपद्रो न करीतिचि’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘न करीतिचि’ : ‘जी जी : गावां बीजें करावें’ : मग तेंही गोसावीयांतें वीनवीलें : ‘जी जी : गोसावीं एथ नसावें : हे चोराचे खागें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें ‘नसीजे : तैसें एथ काइ असे’ : ना जी : एथ गोसावी नसावें : मिरेगावीं नागनाथाचें देउळ असे : तेथें बीजें करावें’ : गोसावी विनति स्विकरिली : ॥

लीळा २८७ : राणाइ भेटि : ॥ : पाठवणी
एकूदी : गोसावी राणाइसातें पुसीलें : ‘बाइ : तुह्मी काइ करा’ : ‘जी जी : धान्य मागों : कांतों : बाप सेतडीया मागे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ धान्य कां मागा’ : ‘ना जी : वरो लागि’ : ‘कांता का’ : ‘ना जी : तेलमिठ होए’ ‘बाइ कांता ना : भिक्षा कीजे : भिक्षा निकी’ : ‘वस्त्रे कापड होए जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पृथ्वी एसणें रवण : भलते चीरकुटी दे’ : मग गोसावी झोळीय गांठी घातलीया : त्यांचां हातीं दीधली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मंडळिका : यातें आपणेयां सांघातें भीक्षे नेया’ : मग मिरीय गव्हाणीं दोघे भिक्षेसि गेलीं : मग त्यासि भिक्षेसि लाडु : पोळि : धीडरी : भाकर : दीवसीं : वरण : भात : खीरी : शाकवतीया एसें आवघें आलें : भिक्षा करूनि आलीं : गोसावीयां पुढे झोळी दृष्टपूत केली : गोसावी श्रीकरू खालि घालुनि ऐंसी उचलिली : मग अवलोकिली : ‘बाइ : इतुकीं अन्ने काइ एकी घरां असति : पा पां : ना ना : पक्कान्नें : भिक्षा राज्य बाइ’ : मग वाटी दीधली : जेउं रीगालें : जेविलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : आपुला भातु : आपुला हातु : आपुलें ठेवीजे : आपुलें जेवीजे’ : ॥

लीळा २८८ : पुरीं वैजो वाळुकदर्शन
गोसावी पुरासि बीजें केलें : एकें ह्मणति : पुरीं : टेकावरि आसन होतें : (शोधु) गव्हाणीं नृत्य कोणीं आसन : ॥ वैजोबा आले : श्रीचरणा लागले : दोनि वाळुकें दर्शना केली : ॥ मिरेगावीं नागनाथीं वस्ति : ॥ मग गोसावी वीळिचां वेळीं मिरेगावांसि बीजें केलें : नागनाथीं वस्ति जाली : ॥ संगमेश्र्वरीं अवस्थान : ॥ : गोसावीयासि उदयाचां पूजावस्वर जाला : मग गोसावी तेथौनि बीजें केले : संगमेश्र्वरीं त्रीरात्र अवस्थान : मलिनाथाचिये देउळीए पुजा : आरोगण होए : (शोधु) संगमेश्र्वरीं आसन : पूर्वामूख : ॥

लीळा २८९ : क्षुद्रानदी सेतु
बाइसें नांदोरासि भीक्षे जाति : क्षुद्रा नदीसी चिखलु होता : तेणें बाइसें माखति : मग गोसावीयांसि उदयाचा पुजावस्वर जालेया नंतरें क्षुद्रानदीसि बीजें केलें : सरिसे अवधुत असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ सेतु बांधावा’ : मग गोसावी पाटाउपागेची उभी धाटी केली : ते पागभूमिका काळी : धारी : लोहवी : तथा मेघवर्णी : पाग मुगुटीं : तळपाची तळसूति केली : मग उभे राहुनि अवधुता करवि सांडोवा बांधवीत असति : साडेगांउनि काळदासभट उपाहारू घेउनि आले : मग त्यातें देखीलें : मग ह्मणीतलें : ‘आतां येथें अभ्यागतें आलीं : पुरों दीया व्यापारू : आतां माहात्मेयां होआवे लागेल’ : गोसावी वस्त्रापासीं बीजें केलें : गोसावी बाहीरवासू वेढीला : फुटा पांगुरले : भोजनतेयाकडे बीजें केलें : पुढें काळदासभट : मागें गौराइसाचिये डोइये आंबांचेया वडेयाचें मडकें : गोसावीयांतें देखीलें : आणि श्रीमूर्ति पाहातें एतें असति : वरौतीया दृष्टी : दुचीती जाली : आणि अडखूळलीं : आंबाचें मडकें फुटलें : तैसेचि वडे भरूनि घेउनि आलीं : गोसावी कपाटासि बीजें केलें : आसन : त्यें आलीं : श्रीचरणा लागली : मग गोसावीयांसि पुजावस्वर जाला : बाइसीं ताट केलें : भक्तजना ठाये केले : गोसावी पुसीलें : ‘हें काइ’ : तीं ह्मणीतलें : ‘जी जी : आंबाचें मडकें : गौराइ अडखळलीं : तें फुटलें : सावडीले वडे ते गोसावीयांसि कैसे वाढूं जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आणा’ : मग तीहीं गोसावीयाचां ताटीं वडा वोळगवीला : गोसावी प्रसादु केला : अवघेयाचां ठाइं वाढला : मग गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : पहुड : उपहुड : वीळवेर्‍ही होते : मग सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘आतां एथ अभ्यागतें आली : हें तवं अरण्य : आतां ग्रामामध्ये जाइजे’ : तैसेंचि गोसावी नांदोरा बीजे केलें : ॥

लीळा २९० : तीरीं श्रीकृष्णु
मग अवघीं भक्तजनें गोसावी उजूयां वाटां पाठवीली : गोसावी उपाधीयांचेयां खांदावरि श्रीकरू घालुनि गंगेचेनि तिरें बीजें केलें : गोसावीयांचीए श्रीमूर्तिची साइली उदकामाजि पडलीं : तेणें तळिचीं जळचरें त्यें वरि आलीं : गोसावीयांची श्रीमूर्ति पाहातें असति : मग गोसावी उपाध्यातें ह्मणीतलें : ‘श्रीकृष्ण चक्रवर्ति येमुनेचिया थडीया बीजे करीती : पाताळगतें जळचरें तेहीं तळ घेतला असे : तें श्रीमूर्ति अवलोकावेया वरौतीं येति : ऐसे गा ते वेधाचार्ये’ : तीहीं ह्मणीतलें : ‘जी जी’ : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP