भाग २ - लीळा ३२१ ते ३३०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३२१ : ग्रहस्थधर्म नीरूपण
ते गेले : तव आवघे बल्हेग्रामीचे माहाजन : माहालक्ष्मीचा देउळीं बैसले असति : तवं त्यातें गोसावीया पासौनि येतां देखीलें : आणि उपाधीयांतें पूसीलें : ‘गोसावीयांसि कैसा अवस्वरू असे’ : ‘ना : गोसावी आसनीं बैसले असति’ : ‘उठा या जावों : गोसावीयांतें कांहीं पुसों’ : ह्मणौनि गोसावीयापासि अवघे आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयां जवळि बैसले असति : मग गोसावीयांतें पूसीलें : ‘जी जी : गोसावीं आह्मासि संन्यासधर्म निरूपावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘संन्यासधर्मी तुम्हां काइ प्रयोजन : जेहुनि असा : तेथीचें कांही पुसा’ : मग गोसावी ग्रहस्थधर्म नीरूपींलें : त्या उपरि तेंही ह्मणीतलें : ‘जी जी : ग्रहस्थधर्म जरि ऐसे : तरि संन्यासधर्म ते कैसे असति : हें सावेयां अवघड जी : याची आह्मी सोए नेणों’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बापेया एसणालीं फळें एणेंचि पाविजति’ मग तेहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग निगालें : तवं जाणो उपाध्ये : बळ्हेग्रामींहुनि गोसावीयांपासि येत असति : तवं महाजन वाटवाटे बोलत तोखत जात असति : उपाध्ये भेटले : ‘जाणो जाणो : श्रीचांगदेवो राउळ गोसावी साक्षात वंकनाथु’ : ॥ एकीं ह्मणीतलें : ‘हें सत्ये : मां : श्रीचांगदेवो राउळ गोसावी काइ : तें तुं जाणसि’ : ऐसें ते तोखों लागलें : ते उपाधी गोसावीयांपुढे सांघीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तें तयांचें पर कीं गा’ : ॥

लीळा ३२२ : अगल गव्हाणीं प्रातपूजा
तेथ गोसावीयांसि वस्ती जाली : मग गोसावी थोरें प्रभाते बीजें केलें : ब्रह्मनाथाचां देउळीं : चौकीं आसन : गुळळा : चरण क्षाळण : पूजा : आरोगणा : गुळळा : वीडा : मग तेथौनि वींझुगेया बीजें केलें ॥

लीळा ३२३ वींझूगा आदीतीं अवस्थान : वोटा करणें
विंझुगा आदीत्याचां देउळीं चौकीं उभे राहीले : बाइसीं आसन घातलें : मग ह्मणीतलें : ‘बाबा : एथ आसन : बैसीजे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ वोटा होइल : तेव्हाळिं बैसीजेल’ : गोसावी उभेचि राहीले : बाइसीं ह्मणीतलें : ‘बाबाचें काइ : केव्हळि वोटा कीजैल : तो वोला वोटा तेयावरि कैसें बैसीजैल’ : गोसावी उगेचि होते : मग भक्तजनीं ह्मणीतलें : ‘गोसावीयांसि वोटा करावेयाची प्रवृति असे : चाला गा : चाला गा’ : ह्मणौनि उठावले : पात्रवर्‍ही पाणि आणिति : मातीचा पल्हो केला : तिं थराचा उंच वोटा केला : वरि कोरडी माती घातली : तेयावरि आसन रचीलें : मग बाइसी ह्मणीतलें : ‘बाबा कैसेया बैसीजैल’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ऐसें बैसीजैल’ : मग गोसावी आसनीं उपविष्ट जाले : तेया वोटेयावरि अवस्थान दीसवीस : २० : पंधरा : ॥

लीळा ३२४ : अवधुता (भेटी)
एकुदीसीं : वीळीचीया पाहारा एका : आदीत्याचेया देउळा मागें माहालक्षमीये येतां सांदी : अवधुत : भांगी भाजिति होते : तथा ब्रह्मप्रकाशीका : तेथ गोसावी बीजें केलें : एकू घाणा भाजुनि चुरूनि ठेवीला असे : एकू घाणा भाजिति असति : एकू हीरवा असे : तेथ उभे राहीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ गा : ब्रह्मप्रकाशीका भाजी’ : मग उकड आसन : श्रीकरीं चिमूटि घेउनि तळहातिं घातली : मग करांगुळियेचेनि नखें मूखीं झाडिली : सरिसे इंद्रोबा होते : गोसावी इंद्रभटा नखें प्रसादु दीधला : आणि तेयां स्तीति जाली : मग बाइसीं तेला धाडीलें : तेला आणीलें : तैसेंचि बैसले : मग स्तीति जाली :॥

लीळा ३२५ : इंद्रभटा स्तीति
तिन दी स्तीति होती : गोसावीयांसि आरोगणा होए : आणि पात्र तेया एउतें लोटीति : मग ह्मणति : ‘बाइ : पुडीरा करा’ : मग बाइसें आणिक वाढीति : मग जेवीति : ऐसे स्तितिमंत होउनि : गोसावीया जवळि : तिन दी बैसले होते : मग तिसरा दीसीं नावेक स्तीति भंगली : तथा पातळ जाली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया : बाइसीं ह्मणीयें दीधलें : तें केलें : तथा : तुम्हीं’ : ॥ ‘जी जी : तरि काइ जी : हें नव्हे : आतांचि करूनि आलां’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तेया बोला तिन दी भरले’ : ह्मणौनि आंगुळिया दाखवीले : मग गोसावी तेयांचे देव श्रीकरीं घेउनि ह्मणीतलें : ‘तुमचे देव तीन दी स्नानें असति : एथौनि कव्हणा एका दीजतु’ : ‘ना : जी : आणिकां दीयावे : ते मजचि देयावे जी’ : मग तेयांची स्तिति भंगली : ॥

लीळा ३२६ : ब्राह्मणा स्तीति
एकुदीसीं गोसावीयांसि वोटेयावरि आसन : नवगांवीचा ब्राह्मणु : सवळेचिया पाहरां एका : देवतेसि आला : दारापासीं आला : आणि गोसावीया अवलोकीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ भटो : देवतेपासि आलेति’ : ‘जी जी’ : तैसीचि तेया स्तीति जाली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागला : नावेक बैसले होते : मग निगाले : ॥

लीळा  ३२७ : तथा कुमारी भोजनीं स्तीति
ते घरासी गेले : मग तेयां स्नान न करवे : दे पुजा न करवे : कर्मकांडीचि न करवे : षडुकर्म जें जीयें वेळेचें जें करणें : तें ते विसरति : आणि पोळति : घरीचां ह्मणति : ‘यांसि पीसें लागले’ : ‘ऐसें मज काइ जालें’ : मग ते आपुलीया सोइरीयां इष्टांमित्रांपुढें सांघों लागले : तेहीं ह्मणीतलें : ‘तू काइ वींछूगेयासि : तेया पुरुषासि गेला होतासि’ : ‘ना हो’ : ‘हें तेयाचि गोसावीयां पासौनि जाले : आतां जाए : तेयांतेचि वीनवी : मग तेयाचेनिचि जाइल’ : मग ते गोसावीयां जवळि येत असति : सवळेचिया पाहारा एका गोसावीयांसि वोटेयावरि आसन : गोसावी ब्राह्मणु एतु देखीला : आणि हास्य केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ ब्राह्मणाची स्तिति माघौति घालुं येति असे’ : तैसेचि ते आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : पूढां बैसले : मग वीनवीलें : ‘जी जी : मग : गोसावीयां पासौनि जाले असे : तें माझें जावें जी : (तथा) फीटावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘जाले असे : तें कांहीं उपद्रो करीत असे’ : ‘ना जी’ : ‘ते कां फेडावें’ : ‘ना जी : हें माझें जावें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें होए : पर जावों नए : (तथा) एथौनि देवों ये : परि घेवों नैए’ : ‘नाही : फिटावें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भटो हो प्रार्थ्ये कीं’ : ‘जी जी : एणें असुक कांहीं नाहीं : सूखचि होत असे : परि माझे खडुकर्म राहात असे : तरि फेडावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथचेया ती जी मुखरीं सूआ : मग धाडीजैल’ : तीहीं सूदले : इतुलेनि तेयांची स्तीति भंगली ॥

लीळा ३२८ सन्येधी सर्पा देहावसान
एकुदीसी : गोसावीयांसि वोटेयावरि आसन : भक्तजन अवघे बैसले असति : तवं सर्पू एकू : गोसावीयांचेया दरिसनासि आला : भक्तजन परते सरले : एतुलेनि गोसावीयांजवळि सर्पू आला : ते तिवेळीं वरतीया फडै करूनि गोसावीयांतें नमस्कारिलें : मग फुटि वळिली : आणि तेणें तैसेंचि देह ठेवीलें : (तथा) धाडीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाहीर घाला गा : (तथा) यातें बाहीर घाला गा’ : भक्तजनीं ह्मणीतलें : ‘जी जी : मौळळा असें : खाइल जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘खाय तें याचिये ठांइचें गेलें’ : मग तेंही काठीए करूनि कूपावरि घातला : ब्राह्मणाचीया बाइला दोघी देवतेसि आलिया होतीया : तेंहीं सर्पांतें रिगतां देखीलें होतें : आणि सांडिता देखीलें : तवं एरीं ह्मणीतलें : ‘पा हे असे तरि साच : (तथा) उदीयांचि असैल तरि साच’ : यरी दी : माघौतीं देवतेसि आलीं : तवं सर्पू तैसाचि कुपावरि असे : मग तेंहीं ह्मणीतलें : ‘हें लाघवही नव्हे : मरिमेखळहीं नव्हे : हें साच’ : मग भितरीं दरिसना आलियां : आणि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मरिमेखळा’ : मग तेयांसि वीस्मो जाला : आह्मी पैर्‍हां बोलीलों तें येहीं जाणितलें : ॥

लीळा ३२९ : अनुचर प्रशोधनीं पींगळे प्रशंसा
एकुदीसीं : गोसावीयांसि मध्याने एकी रात्रीं : उपहुड : गोसावी बाहीरि बीजें केलें : तवं अवधुत बाहिरि कव्हणे एके स्थानीं निजैले असति : ते आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयां सरीसें निगाले : मग गोसावी तेथौनि वनदेवा बीजें केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘अवधुता एथ कोण असे’ : अवधुतीं ह्मणीतलें : ‘ब्राह्मण ब्राह्मण असति जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बोलावा’ : अवधुत गेले : तेयांतें बोलाउनि घेउनि आले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मार्तंडा एथौनि येतुलेयां वेळा तुमतें ह्मणियां धाडीजाल : तरि तुह्मीं जाल’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘इतुलेया वेळा कोणा ठाया जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नव्हे’ : मग इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इंद्रेया इतुलेया वेळा : एथौनि ह्मणियां धाडीजाल तरि जाल’ : तेहीं ह्मणीतलें : ‘गोसावी धाडीती तरि जाइन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा नव्हे’ : मग अडापासि बीजें केलें : तेथ दोनि निंब होते : तेथ उभे जाले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ कोण गा जागलिये असति’ : तवं तेथ पींगळे होते : ते गिजिबीजल : एरा निंबा वरौनि एरा निंबावरि गेले : मागौतें तैसेचि यरा निंबावरी आले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुह्मांपासि पींगळे चांग : एथीचिय प्रवृत्ति विखो जाले’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथौनि यतुलीया वेळां : जया स्थाना धाडिजेति : तेया स्थाना जातेति तरि आश्र्चर्ये देखतेति : कांहीं एक चमतिकारू देखतेति’ : मग देउळा बीजें केलें : ॥

लीळा ३३० : मार्तंडा पंचाळेश्वरा प्रश्न
मार्तंडीं ऐसें ह्मणीतलें : ‘जें मज गोसावीयां पासौनि कांहींचि नाहीं : मिरीता’ : ॥ बाइसेहीं ऐसेंचि ह्मणति : एकुदीस गोसावी मार्तंडातें ह्मणीतलें : ‘मार्तंडा : पंचाळेश्र्वरा जा : मौन्य भिक्षा करा : गंगातटीं भोजन करा : पंचाळेश्वरीं निद्रा करा : त्री रात असा : मग एथीचेया दर्शना या’ : (शोधु) ‘ऐसें पांच दीस मौन्य’ : ॥ ‘हो कां जी’ : मग दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग पंचाळेश्र्वरासि निगाले : तेथ तिन पाहार विजन करीति : तिसरां पाहारीं भिक्षा करीति : गंगे भोजन करीति : पंचाळेश्र्वराचां देउळीं निद्रा करीति : पहीलां दीं देउळे बैसलें असति : तवं दोघी स्त्रीया : खळीचें साउलें : खळिचीया चोळीया : हातीं रत्‍नाचे दीप : सोनियांचे परियळ ओवाळुं येति : ऐसीया आलिया : दारापुढें उभीया ठाकलीयां : एकी ह्मणे : ‘चाल वो भितरि जावों’ : एकि ह्मणे : ‘थोरे राउळीचे असति : जावों नये’ : ऐसीया नावेक होतीया : मग निगालिया : दुसरां दीसिं मागुतें तैसेंचि केलें : मग मार्तंडीं ह्मणीतलें : ‘एथ कव्हणि ठाइं याल : कालि तरि कालि आलियांत : आजि तरि आजि आलियात : तुह्मीं कवणीं : एथौनि जाल कीं न वचा’ : आणि तीया अदृष्ट जालीया : तीं बाहीरि ऐउनि पाहाति : तवं देखति ना : आणि भियाले : उदीयांचि निगाले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : मग गोसावीयां पुढें अवघेचि वृत्तांत सांघीतलें : मग पुसीलें : ‘हां जी : तरि तीया कोणी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें ‘तिया देवता : गा : तुमचिए वोळगे एति : (शोधु) वाल्हदाया ॥ तिया ब्रह्मांडाचिया देवता गा : (शोधु) अष्टमाहासीवी : तुह्मीं ह्मणां आह्मीं रिते’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP