भाग २ - लीळा ३११ ते ३२०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३११ : चाटेया अव्हाणीं आगाधत्व निरूपण
एकुदीसीं गोसावी वीहरणा बीजें केलें : वीहीरूनि येतां सत्यादेवीचेया देउळा बीजें केलें : सारिसे उपाध्ये असति : गोसावी : दोन्ही दारवंठा धरूनि अवलोकीलें : तवं भीतरि चाटे होते : तेंहीं ह्मणीतलें : ‘चांगदेवो राउळो या : चांगदेवो राउळो या’ : मग उपाधीं ह्मणीतलें : ‘हें काइ जी : गोसावीयांतें तिरस्कारूनि बोलाविलें’ : त्या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें काइ नेणों : एक तुह्मांसीचि कीं’ : या उपरि : खडेया खूबटेयाचा दृष्टांत निरूपिला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘कव्हणी एकू उदकाचे’ : ॥

लीळा ३२१ : दोनि उतरौनि पंचाळेश्र्वरीं अवस्थान
मग तेथौनि गोसावी बीजें केलें : पीवळदरडी वरिलीकडे : वोतपासि : गोसावी दोनिसि बैसले : बाइसें मुख्यकरूनि आवघीं भक्तजनें बैसलीं : गोसावी गंगा उतरले (धानाइसाचियां वासना) : कडां नावेक आसन : मग श्री दत्तात्रय प्रभुचीए गुंफेपासि बीजें केलें : तेथ उभे राहीले : मग ह्मणीतलें : ‘श्री दत्तात्रयप्रभु गुंफास्थान : हें गा’ : मग गोसावी तिर अवलोकिलें : (शोधु) ‘ऐसें श्रीदत्तात्रय प्रभुची गुंफा’ ह्मणौनि श्रीकरें दाखवीलें : मग पंचाळेश्र्वरा बीजें केलें : पंचाळेश्र्वरीं अवस्थान : दिस सातपांच कां सात : ॥

लीळा ३१३ : अभीयोगें ब्राह्मणू रक्षणें
गोसावी वीहरणा बीजें केलें : थडीयाचिया पींपळातळिं उभे असति : अनंतदेवो ब्राह्मणू : ते आपेगांवीचे : तेयांसि पुश्र्चळीकेचा अव्हळाओ आला : तथा अभियोगु : तेयातें मारावीया पाठीं लागले असति : अनंतदेवो ब्राह्मणु पुरांतु घालुनि : गोसावीयां पासि (आले) : इतुलेनि त्याची रोखवूधि गेली : तेणें गोसावीयांतें देखिलें : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : ‘शरण आला जी’ : गोसावीयांसि गूंफा करावेयाची प्रवृत्ति : गोसावी तेयांतें पूसीलें : ‘तुमचेनि कूदळी पाउडें जोडे’ : तेहीं ह्मणीतलें : ‘जोडे : परि मज अव्हळाओ आला जी : ते मातें मारावेया पाठीं लागलें : गोसावीयां कडे आलां : मग  राखीलें’ : सर्वज्ञ ह्मणीतलें : ‘जा : तुमचें कोणी कांहीं न करी हो’ : तथा ‘ते मारिति ना : न मारिति’ : मग ते मागौतें गावां गेले : तवं एरांची वोखटी बूधि निवर्तली : तेयातें तेंहीं क्षेमावलीलें : मग ते घरां गेले : माता ह्मणीतलें : ‘तुं कांरे बा आलासि : तुतें मारावेया धावीनलें’ : तीहीं ह्मणीतलें : ‘भियो नको : माझे तें कोण्ही कांही न करिति’ : मग तेंहीं कूदळीं पाउडें गोसावीयांपासि आणिलें : ॥ मग त्याचीया माता विनवीलें : गोसावीयांची पुरता उपाहारू आणिला : (हे रामेश्र्वरबास) ॥

लीळा ३१४ गुंफा करवणें
गोसावीयांसि गुंफा करावेयाची प्रवृत्ति : गोसावी पींपळाचेया पुर्वीला पालेवेयांपासि उभे राहीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ गुंफा करा गा’ : भक्तजनां गुंफा करितां बाइसीं वीनवीलें : ‘बाबा : बापूडीं बटिकूरूयें काइसेया सिनवीजतें असति : बाबासि काइ एथ असावें ठाकलें असे’ : यावरि गोसावी तेलिकरांची गोष्टि सांघीतली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तै एथ तैसी प्रवृत्ति : घेया बापेया : वेगु करा’ : मग बाइसीं गुंफा करविली : मग गांवांतुनि डेरा आणिला : पाणि ठेविले : गोसावीयांसी गुंफे मर्दना जाली : माजणें जालें : गोसावीयांचीया मादनेयाचें उदक गंगेसि मीनले : तीय संगमीं भक्तजनीं स्नाने केलीं : मग गोसावीयांसि पुजावसर : आरोगण : पहुड : उपहुड : मग भक्तजन भिक्षेसि पाठवीले : गोसावी तेथचि अवधुताचेया खांदावरि आरोहण केलें : गोसावी भोजनतेयासि बीजें केलें : ॥

लीळा ३१५ : विश्र्वनाथदेवा धातुर्वादु प्रश्नु
एकुदीसीं : गोसावीयांसि यक्षीणीचिय देउळीं आसन : विश्र्वनाथ ते नाथपंथी माहात्मे : गंगेकडूनि गावांकडे जात होते : तेंही गोसावीयांतें देखीले : आणि आले : पासि बैसले : तेहीं गोसावीयातें पूसीलें : ‘आपण पिवळी दांडी करूं जाणिजे’ : गोसावी श्रीमुगुटें : निराकरीलें : ते नावेक होते : मग निगाले : मग नाथोबायें पूसीलें : ‘जी जी : पीवळी दांडी ह्मणीजे काइ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तांबेयाचें सोने कीजे’ : ‘जी जी : तरि पांढरी दांडी ह्मणीजे काइ’ : ‘कथीलाचें रूपें’ : ‘हां जी : सोनें केलेयां होए’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘होए : हा पैलु शेणाचा पो आणा आरूता : तुह्मां करूनि दीजैल’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पोरें हो : मग हे तुह्मां नाही’ : नाथोबायें ह्मणीतलें : ‘आम्हां चाड नाहीं जी’ : ॥

लीळा ३१६ निंबातळि द्रव्यकथन
एकुदीसीं गोसावीयांसि पुढील पारावरि आसन असे : भवते भक्तजन बैसले असति : गोसावी जवळिचीया कोनटेयाकडे दाखवीलें : ‘एथें एका रायाचें नवघट द्रव्यां असति : चोंडा रायाची वरि बैसली : तें यें एथचि पुरिली’ : ॥

लीळा ३१७ : जोमाइसां भेटि
जोमाइसाची माता वैजाइसें : तेंही दादोसातें ह्मणीतलें : ‘रामा : ये जोमाइचीं लेंकरूवें जीति ना : तरि तुझेंनि कांही होए : तरि कांहीं करि कां’ : दादोसीं ह्मणीतलें : ‘माझेनि होए ऐसेंही आति : नव्हे ऐसेंही आति : आमचेया गोसावीयांचेया दरिसना जाल आणि होइल’ : ॥ मग तीये गोसावीयाचेया दरिसना पंचाळेश्र्वरासि आलीं : गोसावीयांसि उदीयाचां वेळीं उतरिला सेहाडेयाकडे आसन : गोसावीयां पुढे सगडी असे : ॥ तथा अग्निष्टीका : ॥ तिये आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : नारीयळ दरिसनां केलें : बैसलीं : गोसावी नारीयळ श्रीकरी घेतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें काइ : बाइ’ : ‘जी जी : फळएक’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ बाइ लेंकरूवें श्रमलीति’ : ‘हो जी’ : मग वेसाइसें सांघों लागलीं : ‘‘ जी जी : मीयां रामातें ह्मणीतलें’ : ऐसें आवघेचि सांघीतलें : ‘गोसावीयाचेया दरिसना जा : मग होइल’ : ऐसें ह्मणीतलें ’’ : गोसावी उगेयांचि आइकीलें : मग तेंहीं गोंसावीयांतें उपाहारालागि वीनविले : गोसावी वीनती स्वीकरीली : उपाहारू आणिला : गोसावीयांसि आरोगणा दीधली : गुळळा : वीडा : मडकीं  वोपीतां गोसावी बाइसातें ह्मणीतलें : ‘बाइ : नाव नाव अवघां ठाइं राखा’ : मग बाइसीं कणु कणु अवघां मडकां राखीलें : मग तें अन्न तें जेवीली : मग तेयांसि तिघे लेंकरूवें जालीं : तीये जीयालीं : एक परशराबासाचे पीते : तेया नांव खेइदे पंडित : एक चुलते : एकी आत ॥

लीळा ३१८ : अवधुत स्कंद आरोहणीं गंगा उतरणें
वीळीचां वेळीं : गोसावी तेथौनि बीजें केलें : अवधुताचेया खांदावरि आरोहण करूनि भोजनतां नावेक आसन : भक्तजनें भिक्षा करूनि आलीं : गोसावीयांसि आरोगण : भिक्षान्नाची : भक्तजनें जेवीलीं : मग धुळिरा शमे तवं गोसावी तेथ राहीले : ॥

लीळा ३१९ : शुक्र दरिसन
तवं शूक्र नीगाला : उपाधी पुसीलें : ‘हां जी : हें कोण नक्षेत्र’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा शूक्र’ : बाइसीं म्हणीतलें : ‘बाबा : हें कैसेंनि जाणिजें : बाबा : गगनिं कैसेनि जाणिजे’ : ‘‘बाइ : जोतीक शास्त्रातवं : हा ठावोवेर्‍ही जाणिजे : गर्गाचार्ये आपुलिया पुत्रांकरवि एक जन्म वर्तवीलें : (शोधु) वार्तिक देहीं : गर्गाचार्यें मागिल जन्म वर्तवीलें : तेणें सात जन्मे वर्तीलीं : सातवें जन्म कुष्टीयाचें देखीलें : आणि मूर्छा एउनि पडीला : गर्गाचार्ये ह्मणीतलें : ‘हें काइ’ : ‘ना : मीयां सात जन्में वर्तीलीं : सातवें कुष्टीयाचें देखीलें : बाइ : समाधीमध्ये सात देहें वीसर्जीली : जगीचां ब्रह्मवीदु : पहीलीं आंगुळी यासी पवीजे : नक्षेत्र होउनि ठेला’’ : ॥

लीळा ३२० : उपाध्या उपाहारू
बल्हेग्रामीं गुंफे वस्ति ॥ मग धुळिरा शमलेया उपरांतील बल्हेग्राम गुंफे बीजें केलें : वस्ति जाली : गोसावीयांसि उदयाचा पुजावस्वर : गोसावी आंगणीं उभे ठाकौनि : आंगीटोपरें लेत असति : उपाहारू केला : तथा : जेउं सूदले : तैं : ‘आमचा उपाहारू नव्हेचि : तरि आतां एकू दीसू सुवा’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘नागदेवोभटातें म्हणा’ : मग नागदेवो उपाधीयातें ह्मणीतलें : तेहीं ह्मणीतलें : ‘जानो कां न ह्मणे’ : ॥ ते ह्मणति : ‘हा कां न ह्मणे’ : ऐसें एरे एर्‍हा : गोसावीयाचेया दरिसनां आले : ते उदीयांचि : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : नागदेवो : उपाध्यासि : गोसावीयाते विनववेना : स्वरभंग जाला : मग उपाध्याची वास पाहीली : मग उपाधीं विनवीलें : ‘जी जी : नागदेवो : उपाधीये : गोसावीयांतें उपाहारालागि विनवावेयां आले असति : (तथा) राहावावेया आले असति : अजिचा दीसू राहावें जी’ : मग गोसावी तयांची वास पाहीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसें हां भटो’ : ‘हो जी : गोसावी आजीचा दीसू राहावें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हे निगाले : न ऱ्हाए : हीरणपूरी ऐसा ना’ : तैसेचि गोसावी बीजें केलें : नावेक पीवळदरडीसि आसन : मग तैंसेंचि गोवर्धनाची चौकीं आसन : मग ते उपाहारू घेउनि आले : मग गोसावीयांसि बाहिर देउळाचा दक्षिण कोनि आसन : चरण क्षाळण जाले : मग गोसावीयांसि चौकीं पूजावस्वर : ताट केलें : मग गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : मग नागदेवो उपाध्ये भोजने घेउनि गेले : (शोधु) ‘बटीका तुह्मी राहा : तुह्मी राहा : तुह्मी एथचे की’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP