भाग २ - लीळा ३५१ ते ३५८

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३५१ : भटां : महदाइसा : देवां भेटि
एकुदीस : गोसावीयांसि दुपाहारीची आरोगणा : गुळळा : बाइसी फोडी वोळगवीलीया : गोसावीयांसि बाहीरी पटिसाळे आसन : बाइसें वीडीया करूनि देत असति : तवं परमेश्र्वरपूरीचीं कापडीयें : देव : भट : महदाइसें आलीं : गोसावी देखीलीं : आणि टाळी वाउनि ह्मणीतलें : ‘हें काइ परमेश्र्वरपूरीचीं कापडीयें आलीं : मां’ : तैसेंचि गोसावी आंगणा बीजें केलें : मग आवघेयां क्षेमालींगन दीधलें : तेंहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : आवघीं गोसावीयां जवळि बैसलीं : गोसावी अनुकरूनि ह्मणीतलें : ‘श्रीप्रभु निकेयापरी राज्य करीत असति’ : ‘जी जी : नीकेयापरि राज्य करीत असति’ : मग पोटळिया प्रसादाचिया : लाडुवांचीया आणिलीया होतीया : त्या वोळगवीलीया : श्रीकरीं : गोसावी श्रीकरीं घेउनि नमस्करिलिया : मग सोडूनि प्रसाद केला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘या लाडुवां पाकु पुरला : यां न पुरेचि’ : ‘हो जी : ऐसेंचि तेंहीं जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पोरे हो तेथौनि’ : ॥

लीळा ३५२ : महदाइसां श्रीप्रभुलीळाकथनीं देवां कोपणें
मग महादाइसें उदीयांचि गोसावीयां जवळि बैसलीं असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ तेथे गेलींति : मग गाइ करा’ : मग महदाइसीं सांघों आदरिलें : ‘‘जी जी : तेथ गेलें : एकुदीस नगरा मध्यें गोसावी खेळावेया बीजें करित असति : तवं मीयां वीनवीलें : ‘जी जी : आजी गोसावी खेळों बीजें केलें : कां : करावें : मिं गोसावीयां ढीढरें वोळगवीन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मेलि जाए : ढीडरें देइल ह्मणे’ : ह्मणौनि गोसावी हरिखु स्विकरूनि आसनीं उपवीष्ट जाले : मियां ढीडरें केलें : वाटीय तुप वोळगवीलें : गोसावीयाचां श्रीकरीं ढिडरें वोळगविलें : गोसावी ऐसें अवलोकीलें : ‘आवो मेली जाए : हा आहीता ह्मणे : ढीडरें नव्हे ह्मणे : आवो ढीडरें दे ह्मणे’ : ह्मणौनि गोसावी खालि घातले : ‘जी जी’ : मियां ढीडरें घेतलें : मागौतें श्रीकरीं वोळगवीलें : मीयां ह्मणीतलें : ‘जी जी : आमुतें गंगातीरीं ढीडरें ह्मणीजे तुमतें वराडीं आहीता : ऐसें ह्मणीतलें कीं : हें ढीडरेंचि जी’ : ह्मणौनि मागौतें श्रीकरीं वोळगविलें : गोसावी ऐसें अवलोकीलें : ‘आवो मेली जाए : ढीडरें नव्हे : हा आहीता ह्मणें : आवो ढीडरे देइं : दे’ : ह्मणौनि मागौतें खालि घातलें : तेव्हळि मीं भीयालीयें : फुलसोजी होती : ते दुधांतु कालवीली : आंतु साकर घातली : तुपाचा बोळा दिधला : वरि शंका आकृति घातलें : वरि यळा मीरीयाची पूडी घातली : मग गोसावीयांचां श्रीकरीं वोळगवीलें : गोसावी श्रीकरीं घेउनि ऐसें अवलोकीलें : मग ह्मणीतलें : ‘ऐया : आतां माझा होए : ढीडरें दीधलें ह्मणे’ : मग गोसावी आरोगणा केली’’ : या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तेव्हां श्रीप्रभुची प्रवृत्ति भंगली होती : मां तें तुह्मां कैसेनि स्फुरले’ : ‘‘एकुदीस गोसावीयां लागि अमृतफळें केलीं : गोसावीयांसि
रूचलीं : ते स्याळे दीस : तेंहीं वस्त्रें सिंवालीं होतीं : गोसावीयांसि उष्णाची प्रवृत्ति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मेलि जाए : तावी ह्मणे : (शोधु) अमृतफळें तावी : ॥ तावी तावी तावी : काहा भितासि’ : ‘जी जी’ : गेलीयें : तो पापड उन करूनि वोळगवीला : माधुतें सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मेलि जाए : तावि ह्मणे’ : ‘जी जी’ : मीं गेलीयें : वाटीएचें तुप उन करूनि ठेवीलें : माघौतें सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मेलि जाए : तावि ह्मणें : तावी ना ह्मणे’ : तें मीं भियालीये : तवं सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आप काह्या काह्या भिइ : तावि ह्मणे’ : ह्मणौनि श्रीकरें अमृतफळ घेउनि फोडुन दाखवीलें : ‘जी जी’ : मग मीयां वेळणींयांसि इंगळ घातले : वस्त्रीं घालौनि अमृतफळें उन्ह केलीं : मग ताटीं वोळगवीलें : मग गोसावी आरोगणा केली : जी’’ : ॥ ‘‘जी जी : बहुत दीस मादणें नाहीं : जी जी : गोसावीयांचा श्रीमुगुट फरसैला होता : जी जी : मि गेलीयें : ते गोसावीयांचा श्रीमुगुटीं : न पुसत तेल वोळगवीलें : आणि गोसावी कोपू स्वीकरीला : अधरू कांपीनला : ‘हें काइ माहादीफेंदी : दांडेवरि सीस लावावें ह्मणे : वोणा घालावें ह्मणे’ : तैसेचि गोसावी बीजें केलें : सरिसी मिंही गेलीयें : मग नागदेयातें ह्मणीतलें : ‘चुलीचा उबाळा आखुडी हो’ : तवं दादोस दारवठां उभे केले : ‘रूपै रूपै : वोखटें करीत असा वो : जेणें जेणें नरका जा का : तेंचि करितें असा’ : मियां ह्मणीतलें : ‘दादो : तुह्मी उगेचि असा : फाटकां पावो नको’ : तैसेंचि गोसावी टोंकणेयचेया आवारा बीजें केलें : वोसरीयवरि आसन : गोसावीयांचेया भाळ प्रदेशावरि जें तेल ये : तें गोसावी दारवंठीएवरि पुसीति : मियां ह्मणीतलें : ‘जी जी : मीं पूसूं’ : ‘आवो मेली जाए : उगी उगी ह्मणे’ : गोसावी कोपु स्वीकरिलाचि होता : मग प्रसन्नदृष्टी अवलोकीलें : मग मीयां श्रीमुगुटांवरि हात ठेवीला : आणि गोसावीयांसि समस्तळ आसन : तेयांते जाडि मागीतली : गोसावीयांसि आसन : तेथे तेंहीं डेरा भरूनि पाणियां ठेविला : भटांतें ह्मणीतलें : ‘नागदेया चुली उबाळा सूं जाये’ : मगां मियां गोसावीयांचां श्रीमुगुटीं तेल वोळगवीलें : वीरूगुंठीं घातली : मग : जी जी : गोसावीयाचे श्रीचरण उटीले : मग जी जी : एकेकु श्रीचरणु दोनि दोनि वेळ देति : एकू एकू श्रीचरणु दो दो वेळ देति’’ आणि महादाइसां दुख उपनलें : सांघति तवं तवं दुख करीति : ॥ या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ऐसें दुख करीतें असा : तरि काइसेया आलिंति’ : ‘जी जी : मीं काइ एत होतीए : मातें दादोसीं आणीलें : ऐसांहीं नये : मग नागदेयाकरवि ह्मणविलें’ : मग गोसावी दादोसाची वास पाहीली : ‘हा माहात्मेहो’ : दादोसीं ह्मणीतले : ‘मा : तेथ असौनि काइ धड करीतें होतीं (तथा) गोमटें : प्रवृती भंगीती : श्रीप्रभुची : देहाची लक्ष दाहा कीडिया मुंगीया मारिति : भितरि निद्रा करीति’ : या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाई : भितरि कां निजा’ : महदाइसें भियालीं : गोसावी वारिलें होतें : उगीचि राहिलीं : मग गोसावीचि ह्मणीतले : ‘कांहीं कारण असे’ : ‘‘जी जी : गोसावीयांसि उदरव्यथेचि प्रवृति : गोसावी दोन्ही श्रीकरीं जोतीकडे दाखवीति : मग दोंदावरि ठेवीति : मग मीयां सगडी ठेवीली : हात शेकीले : मग गोसावीयाचीया दोंदावरि : ठेवीले : गोसावी ‘हा ये’: ह्मणौनि स्वीकरिति : गोसावीयांसि उदकाची प्रवृति : तरि उदक वोळवावी : उघडी श्रीमूर्ति ठाके : तरि पांगुरवी ’’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘सेवका अवीधि नाहीं’ : ॥ या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तेथ उदरव्येथा काइसी पां’ : ह्मणौनि चिंता स्वीकरीली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तेथीचें सकळें तें तेथीचेयाचि प्रवृति’; ॥ सर्वज्ञें म्हणीतलें : ‘बाइ : कीडिया मुंगीया कां मारा’ : ‘जी जी : कीडिया मुंगीया काइसेया मारिन : गोसावी तेया वाटा बीजें करिती : ते गोसावीयां श्रीचरणीं खडे गोटे रूपती : ह्मणौनि बिदी गोदरीया झाडीं : सडा घालीं : चौक रंगमाळीका भरी’ : तवं दादोसीं ह्मणीतलें : ‘काइ : तेउतें बीजें करीत असति : गोसावी अनौतेंचि बीजें करिती : यांचिया रंगमाळिका तीया अनौतियाचि’ : ‘‘ना जी तें : एकुदीस गोसावी सांदीहुनि बीजें केलें : मग मीयां येरी दीसीं सांदीं लीगटौनि सडा घातला : गोसावी बीजें केलें : सरिसा नागदेवो होता : गोसावी आणिकीकडे बीजें केलें : आवांकीत होते : तवं भटाची मागील वास पाहीली : आणि भेटीं ह्मणीतलें : ‘जी जी : ऐसे आमुचे गोसावी सूख देति’ : आणि गोसावी हास्ये करूनि बीजें केलें : यापरि कव्हणीं एकू केशवनायकाचिये घरीचा पर्‍हींवा उसूपे : तेया वाटा बीजें करिति : ह्मणौनि श्रीप्रभु येतु अथवा नैयतु : तीहीं कीं श्रीप्रभु सेवा केली होए : (सर्वज्ञें ह्मणीतलें) ‘‘श्रीप्रभुची सेवा प्राणियांसि करूं आवडे : श्रीप्रभु चरणु देति : स्विकरीति : मां प्राणीया ऐसा धर्मापासौनि काढीजे’’ : ॥

लीळा ३५३ : उमाइ बीढारा पाठवणें
गोसावीयांसि वीळचाचां पुजावस्वर जाला : मग दादोस : भट : महादइसें : निद्रास्थानां निगालीं : तथा : यरी गुंफेसि आलीं : संगमेश्वरीं उमाइसें बाहीरि भितरि रिगों लागलीं : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : उमाइसातें : ‘बाइ : तुह्मीं जा : कळपीची गाए : एरी कळपीं मिळे’ : मग तीए बीढारासि गेलीं : ॥

लीळा ३५४ मार्गी देवता अनुवर्जनि
मग वीळीचां वेळीं : गोसावी आइत करवीली : बाइसीं आइति केली : गोसावीं आवघें भक्तजनें पुढें चालवीलीं : महदाइसें मागें आइत करीतें होतीं : मग पुढां गोसावी : मागें महदाइसें : ऐसीं निगाली : मार्गी महदाइसातें सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मागौतें नको पाहो : चाला’ : महादाइसीं ह्मणीतलें : ‘गोसावी मातें कां पां वारीलें’ : ह्मणौनि मागिल वास पाहीली : तवं मागीला कडे : तथा : मागां : होळीएसणा गगनचुंबित तेजपुंजी देखीला : तथा प्रकाशू : गोसावीयांतें पूसीलें : ‘जी जी : मियां मागील वास पाहीली : तवं तेजपुंज देखीला : तें काइ जी’ : या उपरि : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ते तेथीची देवता : तुमतें अनुवर्जित एति होती : माघौतें न पाहातींति तरि गावोंवरि एती’ : ॥

लीळा ३५५ : संगमेश्वरीं लुडिक्रीडा
मग संगमेश्वरा बीजें केलें : चौकीचिया दाराचिया आड दांडीपासि राणा भेटला : तेणें गोसावीयांसि माहुळींग वोळगवीलें : चौकीं आसन : एकें ह्मणति : मग राणेन वोळगवीलें : गोसावी माहुळिंग प्रसादु केला : मग बाइसाकडे ‘लुडी’ ह्मणौनि घातलें : बाइसें खावों लागलीं : गोसावी भटाची वास पाहीली : डोळा घातला : आणि भटीं बाइसांचा तळां हातु हाणीतला : आणि वरिचा वरि झेलुनि घेतलें : मग भट खावों लागले : मग गोसावी इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इंद्रेया तुह्मी लुटलेति’ : मग इंद्रभटीं भटाचीये हातीचें झेलौनि घेतलें : मग इंद्रभट खावों लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया तुह्मी लुट जालेति’ : तीहीं ह्मणीतलें : ‘जी जी : मी गोसावी लुडी घातली कीं’ : मग गोसावी वाव्यकोणीं पटिसाळेचिए गुंफे बीजें केलें : तेथ वस्ति जाली : ॥

लीळा ३५७ : भटां ईश्वरप्रतीति करणें
गोसावीयांसि रात्रींचा पुजावस्वर : आरोगण जाली : गुळळा : सपुजीत आसनीं उपवीष्ट असति : बाइसीं फोडी वोळगवीलीया : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : परमेश्र्वरपुरोनि नागदेवों नावें ब्राह्मणू आला असे : तेयातें बाबा बोलावीत असति’ : दादोसीं ह्मणीतलें : ‘नागदेया : जाए पा : तुतें गोसावी काइसेया लागौनि बोलावीत असति’ : तैसेचि भट आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : वीनतकंदर होउनि गोसावीयांपुढें बैसले : मग गोसावी पूसीलें : ‘काइ गा : श्रीप्रभु देखीले गा : परमेश्र्वरपुर देखीलें’ : ‘जी जी’ : काइ श्रीप्रभु देखीले’ : ‘जी जी’ : ‘श्रीप्रभु केळि क्रीडा देखीली’ : ‘हो जी’ : ‘कैसी देखीली’ : ‘जी जी : तीया काइ सांघों जाणिजत असीजति : तें तैसेंचि’ : ‘पर तर्‍ही’ : मग अनुभवाचीया सांघों आदरीलिया : ‘‘जी जी : गोसावी उदीयांचि उठीति : वेढे करीति : मग आपविहिरीया बीजें करिति : मार्गी गुढेनिसीं खेळु करीति : पांचपींपळासीं खेळु करीति : मग नगरामध्ये बीजें करीति : घरोघरीं एति : श्रीकरीं उतरंडी उतरीति : शाकपाक चाखति : माघोती या रीति ऐसें अवलोकीति : मग ह्मणति : ‘ऐया : माझा आतां होए’ : गोसावी मार्गें बीजें करीत असति : आणि खदखदकरि हास्य करीति’’ : ऐसीया अनुभवाचिया सांत पाच सांघीतलिया : गोसावी अनूकरूनि आइकीलिया : ॥ ‘मग श्रीप्रभुवरि एथें माहात्मेयावरि कैसी प्रतीति आति’ : ‘जी जी : सारिखीचि’ : बाइसें कोपली : ‘मर मर पोरा : तुझा मढा बांधे घागरा : तथा किडीए : जो मसणवरि जाए बोबातु : बाबा आणि माहात्मेया वो सरि केली : रडौनि बाबातें आचारित्व मागीतलें : तेयांसि आणि बाबासि वो सरि केली’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘राहा : पूर्वी तुह्मींचि काइ केलें : पायपुसणें बैसावीयां घातलें : दुधीकरटां पाणीभातु घातला’ : बाइसीं ह्मणीतलें : ‘नको बाबा : बाबापासौनि ऐंसे हात वोडवीले’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘प्राणीयांसि काइ सतेव जाननें असे : एथौनि जाणविजैल तेव्हळि जाणैल कीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘श्रीप्रभुची केळि क्रीडा देखीली : माहात्मेयाचें चेष्टत देखीलें : येर्‍ह वीचारीतां काहीं अंतर न दीसे : होए’ : मग भट वीचारूं लागले : तवं गोसावीयांचिया आगाधा लिळा देखति : आणि दादोसाचिया कुचेष्टा देखति : मग ‘‘श्रीप्रभु तें निगुर्णब्रह्म : ह्मणीतलें : श्रीप्रभु तें निर्मुक्तवस्तु : श्रीप्रभु ते आत्माराम : श्रीप्रभुची केळिक्रीडा : कव्हणाइ जीवा क्षेणुपरियंत अनूकरेना : जीव आणि बांधावें : आणि सोडावे : ऐसेया जीवां श्रीप्रभु केधवा मोकलीति’’ : ऐसें गोसावी नीरूपण केलें : मग भटातें बिढारा पाठवीलें : तैसेंचि भटोबासीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग बीढारा गेले : तवं दादोस नीजैले असति : भटोबास बाहीरि बैसले : गोसावीयांसि पहुड : पस्यात पाहारीं उपहुड : परिश्रयो सारूनि गोसावीयांसि भीतरि आसन : गोसावी बाइसातें ह्मणीतलें : ‘बाइ : ब्राह्मणातें बोलावा’ : बाइसें गेलीं : तवं भटोबास बाहीर बैसले असति : बाइसीं ह्मणीतलें : ‘नागदेया : तुंतें बाबा बोलावीत असति’ : तैसेचि भटोबास आले : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयां पुढें विनतकंदर होउनि बैसले : गोसावी पुसीलें : ‘रात्रीं गेलेति : मग माहात्मा काइ ह्मणतु होता’ : ‘जी जी : मी गेलां तव दादोस नीजले असति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मग तुह्मीं जाउनि नीजैलेति’ : ‘ ना जी : मज निद्रा न येचि’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘कांहीं मशकाचा उपद्रो’ : ‘ना जी : तें नाहीं : गोसावी नीरूपीलें : तें आवांकीत होतां’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘कांहीं आवांकीया मीळत असे’ : ‘हो जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें जावों नेदीजे हो’ : ऐसें ह्मणोनि माघौतें रात्रीचें निरूपण केलें : ‘जी जी : ईश्र्वररूविभागु निरूपीला’ : तेणें भटोबासि बोधु जाला : ॥

लीळा ३५७ : आबयो रंगमाळीका
गोसावीयांसि उदयाचा पुजावस्वर : गोसावी आंगीटोपरें लेइलें : मग संगमेश्र्वरा बीजें केलें : तवं आबैया रंगमाळीका भरावेया : मां : जोगेश्वरीसि गोसावीयांतें उपाहारासि वीनवावेया जावें : ह्मणौनि पाहानपटीं एउनि देउळीं वोणवीं वोणवीं रंगमाळिया भरितें असति : गोसावी चौकीं उभे ठेले : फुटेयाचा सूरंगु लोळतु धरीला : मग बीजें केले : तेयाचीया रंगमाळीया नावेक पुसीलीया : आणि तेहीं फुटेयाचा पदरू वरता धरिला : मग ह्मणीतलें : ‘देशकाळिचिया देहीयांचिया वरतियांचि माना’ : मग गोसावी गाभारेयापासि बीजें केलें : माघौती गोसावी अधीका खोल बूंथि लोंबता पालवो घातला : माघौतें परतले : तवं वोळखीलें : श्रीचरणा लागलीं : ‘हें काइ बाइ : तुम्हां उचलौनि भेटी आले : तोंडें तोंड जाणतां : तुम्ही यासि सीवीया दीधलीया : मां : आतां उचललीं माणिके हळुवें होति’ : तैसींचि तियें आलीं : श्रीचरणा लागली : मग ह्मणीतलें : ‘जी जी : गोसावी एथ बीजें केलें : ऐसें मी जाणे ना : मियां एथ रंगमाळीका भरावीया : मग गोसावीयातें जोगेश्र्वरीसि विनवावेया जावें : ॥ गोसावींचि बीजें केलें’ : मग हातु धरूनि तेयाचां : बीजें करूं आदरिलें : तथा आंगुळी : ॥ तेंहीं वीनउं आदरिलें : ‘जी जी : आजिचा दीसू गोसावी राहावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : आतां हें तुमचीये चतुर्सीवे उभे न राये’ : वीनवीतें वीनवीतें दारवठेवरि आलीं : गोसावी पाइरीया उतरौनि मग हातां दो एकां खालि उभे राहीलें : मग श्रीचरणा लागली : तथा पालवीं धरूनि : ‘जी जी : उपासाहावें जी’ : मग निगाली : ॥

लीळा ३५८ : उपाधीया वीष्णूभटा भेटी
उपाधीये वीष्णूभट आले : गोसावीयांसि पूढीला खडकावरि नावेक आसन : उपाधीं विष्णूभटीं गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : कणीसाचे काटाळें दरिसनासि केलें : तैसेचि पूढीला कपाटासि बीजें केलें : तेथ आसन : पुढां कणीसें : वोळगवीली : तेथ गोसावी उपाधीयाकरवि हुरडा भाजविला : तवं आसन होते : मग अवघीं भक्तजनें खडकलिएसि पाठवीलीं : गोसावी मेघवर्णी पागेचा धाटा केला : अवधुताचेया खांदावरि आरोहण केलें : मग संगमु उतरलें : पैलाडिले घाटीं खांदावरौनि उतरले : वस्त्रें वेढीलीं : मग संगमेश्र्वरासि बीजें केलें : तेथ चौकीं नावेक आसन : एके ह्मणति : येरी देउळीये : उत्तरमुखे जाले : मग तेथौनि बीजें केलें : गोसावी थडीया थडीया कपाटें पाहत खडकुलियेसि बीजें केलें : गोसावियांसि आसन : बाइसीं हुरडा पाखुडिला : वाटां घातला : आणि साकर घातली : गोसावीयांसि वोळगवीला : गोसावी अवघेषां भक्तजनां दीधला : मग गोसावी प्रसादु केला : गोसावी हुरडा आरोगीला : गुळळा : वीडा : ॥  खडकुलीए अवस्थान : ॥ कपाटासि भीतीं घातलीया : दोनि गुंफा केलीया : पूर्वामुखें गुंफे आसन : ॥

॥ एवं पूर्वार्ध संपूर्णमभवतू ॥ 

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP