भाग २ - लीळा २७१ ते २८०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २७१ : पाहाटां भादणें
मध्याने एके रात्रीं आबैसें उठीलीं : तथा वडिले रात्रीं उठीली : पाणीं ठेउं आदरिलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ रात्री वडिल असे : निद्रा करा’ : मग निजैली : वेळां दोनि उठीली : गोसावी निराकरिलेंचि : मग पाहाटां उठीलीं : वाति लावीली : पाणि ठेवीलें : गोसावी प्रश्रयासि बीजें केलें : परिश्रय सारूनि आले : गोसावीयांसि वोलणी दीधली : मग मर्दना मादनें जालें : आंगणि वस्त्रें वेढिलीं : भितरि वोटेयावरि आसन : उपवीष्ट जाले : तवं वीवळलें : वायेनाएकू सकुटंबी गोसावीयांचेया दरिसनासि आले : सांकडगुंफां : मग वायनायकें एकू पावों भितरि : एकू पावो बाहीरि : ऐसें उभे राहीले : एकांचीए हातीं वीडे होते : ते गोसावीयांसि दर्शन करीति : दंडवतें घातलीं : श्रीचरणां लागले : वाएनायकह्मणति : ‘जी जी : हें अमूकें : हें अमूकें’ : मग ते निगाले : ऐसीं अवघीं भेटवीलीं : मग कामाइसें आलीं : तथा पहीलेचि भेटलीं : तेहीं वीडे दर्शना केलें : दंडवतें घातलीं : श्रीकरें गोसावी त्याची पाठि श्रीकरें स्परिसीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘अष्टमंगळ्याबाइ : त्यें कें’ : वायनायकें ह्मणीतलें : ‘जी जी : मज दर्शन जालें : तरि या अवघेयां होआवें की : जी’ : मग तीं गोसावीयांचीये श्रीचरणीचे आंगुळीचें नख देखीलें : तें पातेंचि ठेलीं : मग कामाइसें निगाली : ऐसें आवघेया दर्शन जालें : वायनायकाचिये घरिची परिचारक दारवठेनसीं लागौनि गोसावीयांतें पाहात होतीं : मग त्या गोसावीयांसि वीडा वाइला : श्रीचरणा लागली : मग तीयें अवघीचि घरासि आलीं : गोसावीयांसि उदयाचा पुजावसर जाला : मग गोसावी सीधनाथासि बीजें केलें : बाहीरिली दोन्ही दारवंठा धरूनि भितरि अवलोकीलें : तव भितरि मासोपवासीनी बैसलिया होतीया : मग गोसावी तेथौनि बीजें केलें ॥

लीळा २७२ : रामनाथीं नरसींहीं अवस्थान
गोसावी ऐलाउल वडवेर्‍ही बीजें केलें : ओतीं उतारू नाहीं : ह्मणौनि गोसावी नावेक उभे होते : मग वोतावरिलीकडे उतरले : रामनाथीं नरसींही अवस्थान : ॥ : दीस दाहा : तथा नव : ॥

लीळा २७३ : वोतीं उमाइसीं संबोखू
गोसावीयांसि तेचि दीसीं रामनाथाचेया वडातळिं आसन : उमाइसें आलीं : वोता पैलाडि उभी असति : गोसावी नावेक थडीयेसि जेंबीं केलें : गोसावीयांतें वीनविलें : ‘जी जी : मीं येवों’ : तथा ‘जी जी : मीं गोसावीयां जवळि येइन’ : सर्वज्ञें म्हणीतलें : ‘एथौनि या ह्मणिजैल : तरि यवों यइल : पर तुह्मी व्रतस्तें : तुह्मांसि सीमालंघन करूं नैए’ : उमाइसीं ह्मणीतलें : ‘जी जी : ब्राह्मण भकत असति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुम्हां निवारवे तरि निवारिजे : पर तेयां न वचवे : तरि कानिं आंगोळिया सूइजति’ : (तथा शोधु) वोतीं उमाइसें नावेक साउमीं आलीं : ‘तें स्थान प्रत्येजीजे : मासोपवासीए हो : एथौनि या सीमा :’ ॥

लीळा २७४ : रामनाथीं अनुचरां वाळुक
वैजोबाचा गाउं पुरू : तेथें तेहीं वाळुकें तोडिली : पीकलीं वाळुकें डेरां घालुनि गंगे आंतु घालुनि आलें : एकें ह्मणति : एकू डेरा पीकलेयां वाळूकां भरिला : एकु डेरा हीरवेयां वाळुका भरिला : ऐसे दोनि डेरे वाळुकीं भरूनि पुर उतरौनि गंगेचेनि मध्यें घेउनि आले : वोतीं लाविले : गोसावीयांसि रामनाथीचां चौकीं आसन : खांदावरि डेरा ऐसें घेउनि येत असति : डेरा उतरिला : वाळुकें पुढां पुजा केली : गोसावी अवलोकिलीं । मग दोनि च्यारि बाइसीं नेलीं : मग वाळुकांचे वांटे केले : अनुचरां आपण वाळुकें दीधलीं : तवं राणा आला : मग गोसावीयांचा वीभागु तो राणेयांसि देववीला : ॥

लीळा २७५ : स्त्री काळस्फोट व्येथा हरण
एकुदीसीं : गोसावीयांसि रात्रीं नरसींही पहुड असे : रामनाथीचिं कठीये त्या नांव लळिताइसें : त्यांसि पाइं कळस्फोटु निगाला : तीयें रात्रीं वीवळों लागलीं : रामनाथा मागें : एक वाडळ गुंफा : बोबातु होती : ‘राख गा देवा : पोसि गा देवा : पोसीसना तरि मारि गा देवा’ : ऐसा च्यार्‍ही पाहार बोबात होतीं : उदीयां गोसावी तेणें ठायें बीजें केलें : गुंफेसि : तथा परिश्रयासि बीजें केलें : परिश्रयो सारूनि गुंफेसि बीजें केलें : सरिसीं बाइसें होतीं : तीये अरधीं गुंफे आंतु अरधीं गुंफे बाहीरि ऐसीं पडीलीं होतीं : गोसावी तो फोडु अवलोकीला : पावों श्रीकरें धरूनि पीक घातली : त्यांची व्येथा होती ते निवर्तली : दुखों ठेलें : त्यांसि निद्रा आली : बाइसीं ह्मणीतलें : ‘बाबा : फोडु तरि सानाचि : आणिक बाइल च्यार्‍ही पाहार वीवळतचि होती : आतां कांहींचि देखों ना’ : सर्वज्ञे ह्मणीतले : ‘बाइ : हा काळस्फोट : एथौनि पाहीला : ह्मणौनि हे वांचली : इयचे देह जाते’:॥

लीळा २७६ : काळदासभटां तांबोळग्रहण
मग एकादशींचां दीसीं : वीहरणा बीजें केलें : वडातळिं आसन : काळदासभट जागरणां लागि गोसावीयांचेया दर्शना आले : सरिसे नातु मुंजीयें : भानु आले : ते इंद्रोबाचे आधील संघानिचे पूत्र : एक ह्मणति : त्याचेचि पुत्र : सवे आले होते : तेंहीं गोसावीयांतें दंडवतें घातलीं : बैसले : तांबोळ प्रत्येजीतां तेंहीं गोसावीयांतें वीनविलें : ‘जी जी : मज तांबोळ दीयावें’ : ह्मणौनि आंजुळि वोडवीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथचें तांबोळ घेइजे : हा काइ वीधि’ : ‘नेणों जी : ॥ जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति :। जानामि धर्मं न च मे निवृत्ति :॥ केनापि देवेन हृदि स्थितेन । यथा प्रयुक्तश्र्च तथा करोमि ॥१॥ स्वधर्मपीडा’ ॥ सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आजि यकादशी जी’ : ‘ना जी : गुरुचें : तथा : मातापीतेयांचें : देवताचें : घेवों ए’ : ह्मणौनि पढीनले : ‘स्वधर्मपीडा’ हा श्र्लोकू : ॥ सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पैलीकडे लोक देखत असे कीं’ : ‘जी जी : घेवों’ ॥ ह्मणौनि घेतलें : तैसीचि त्यांसि स्तीति जाली : भोगीली : भंगली : गोसावी मढासि बीजें केलें : गोसावीयांसि पुजा : आरोगण : ॥ : गोसावी ह्मणीतलें : ‘बाइ यासि जेउं सूवा’ : ‘बाबा भातु नाहीं’ : मग मूंजीयासि पोळी तुप दीधलें : ॥

लीळा २७७ : उमाइ विज्ञापनें
एकू दीसीं एकादशीचां दीसीं : वैजोबा उमाइसातें नेवों आले : उमाइसातें घोडेया वाउनि घेउनि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग उमाइसीं वीनवीलें : ‘जी जी : गोसावी गावांसि बीजें करावें’ : गोसावी वीनवणि न स्विकरीतिचि ना : मग गोसावीयांसि उपाहारालागि वीनवीले : ‘गोसावी तेथ बीजें करावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें एइल तरि एइल : ना तरि : उपाहारू वैजो हातीं धाडावा : (शोधु) तथा भ्रींगी हातीं’ : मग तीये साडेगावांसि गेलीं : बारसीचा दीसीं : वैजो हातीं उपाहारू पाठवीला : ते मढासि घेउनि आले : एके ह्मणति : वैजोबासि नांव एथें ठेविलें : तेधवां वडातळि आसन : मागीला कडौनि आबौसें : उमाइसें : आलीं : (एकी वासना) वैजोबाचि मढासि घेउनि आले : मग गोसावियांसि पुजा : आरोगण : ॥

लीळा २७८ : सोभागाचा उपाहारू
सोभागबाइसाची बहिणि : भुंगावीं होती : तीहीं सोभागातें ह्मणीतलें : ‘ह्माइबाइ : गोसावीयांतें उपाहारालागि वीनवी कां : एथ घेउनि ये : मग मज गोसावीयांचे दर्शन होइल’ : मग तीहीं गोसावीयातें उपाहाराचें वीनवीलें : गोसावी वीनती स्वीकरिली : तीहीं उपाहारू निफजविला : मग तेहीं रात्रीं रांधीतां कांडीतां कांडीतां तेणें आइकीलें : उदीयांचि तो ब्राह्मणु धोत्रें धुवावेया गंगेसि जात असे : तव तो पाटीलु हुडेयावरि बैसला होता : तेणें पूसीलें : ‘तुमचां घरीं रात्रीं रांधीकांडि थोरि ऐसी होत होती’ : तेणे ह्मणीतलें : ‘आमचिए आकडसासूचे गुरू आले’ : ‘आतां तुमचिय ब्राह्मणिचे गुरू होती : आणि काइ’ : ऐसें कांहीं भकों लागला : मग तेणें एउनि घरीं सांघीतलें : मग तेंहीं ह्मणीतलें : ‘असों द्या परतीं’ : मग सोभागबाइसे गोसावीयांतें वीनवावीया आलीं : गोसावी वीनवणी स्विकरिली : गोसावी बीजें करूं आदरीलें : पाउलें च्यारि गेले : तथा पूर्वीलें दारवठेनहुनि पौळीचीया अग्न कोनापासि उभे राहीले : तेथौनि ते नगर अवलोकीलें : मग ह्मणीतलें : बाइ आता हें नैय’ : मग तीयें दुख करूं लागली : मग जाउनि बहीणीपुढें सांघीतलें : तीयेही दुख करूं लागली : ‘या पापीयांचीया गावीं : गोसावी काइसेया बीजें करीती’ : मग सोभागबाइसें : गोसावीयालागि उपाहारू घेउनि आली : गोसावीयांसि विळीचिया पाहारा एका : आरोगण : पांती : भक्तजनां जेवणें जालीं : रात्रीं बाइसीं व्याळीलागि वीनवीलें : जरि : व्याळी न करीतीचि : ॥

लीळा २७९ : उमाइ दर्शना एणें
यरी दीसीं उमाइसें गोसावीयाचेया दर्शना पोटें बांधौनि आली : तथा दुसरा दीसीं : गोसावीयासि वडाखालि आसन : बाइसीं एतां देखीलीं : आणि ह्मणीतलें : ‘बाबा : मासोपवासीनि  नव्हे : लाव होए : कैसी पोट बांधौनि एति असे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : यें एथचेया दर्शना येतें असति : तुह्मी यातें लाव म्हणत असा’ : आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा जवळि बैसलीं : गोसावीयांचा श्रीकरीं निंबू होतें : त्यांसि ऐसा मनोर्थ उपनला : ‘गोसावी हें निंबू मज देतु का’ : मग गोसावी त्यांसि निंबू दीधलें :॥

लीळा २८० : पाडीवां प्राएण
गोसावी पाडीवेयाचां दीसीं बीजें केलें : थोरी पाहाटें प्रायण केलें : बाइसें मुख्य : आवघीं भक्तजनें सवें निगालीं : देवताभवनीं प्रातपुजा जाली : आरोगण : पहुड : गोसावी दुपाहारा बीजें केलें : बोरीए आंतु : लाखाइसा : राणाइसा : भेटि जाली : बोरि उतरौनि थडीये डावेया हाता कांटीए तळि आसन : गोसावी त्यातें खेमवार्ता पुसीली : लाखाइसीं सांघीतली : ‘जी जी : बल्हेग्रामूनि निगाले : येहीं नेमू घेतला : गोसावीयांचें चरणोदक वांचौनि आणिक उदक न पीयें’ : तथा तीये बल्हेग्रामुनि निगालीं : ‘गोसावी भेटतीं तै चरणोदक : पाणिं पीन’ : थापडे केले : आली : भेटि जाली : ‘जी जी : तयां निमु केला’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : नयमु न कीजे कीं : वीपायें हें न भेटें पां : तरि काइ’ : मग बाइसीं चरणक्षाळण केलें : बाइसीं चरणोदक पेवों सूदलें : तेहीं चरणोदक घेतलें : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘बाइ मुर्धनी वरि घाला’ : मग बाइसीं त्याची टाळु सींपली : मग तीहीं थापडेयाची दुरडी गोसावीयां पूढां ठेविली : गोसावी श्रीकरें करूनि पाटीयचा पदरू फेडीला : श्रीकरीं थापडा घेतला : मग ह्मणीतलें : ‘बाइ : बल्हेग्रामीचें पक्वान्न’ : ‘जी काइसें पक्वान्न : लांकांचा थापडा’ : मग गोसावी करांगळीचेनि नखें करूनि बूडडा उचलिला : प्रसादु केला : मग गोसावीयांसी गुळळा : वीडा : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP