भाग २ - लीळा २४१ ते २५०
प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.
लीळा २४१ : वायनायका भेटि : नामकरण
वायनायक उमाइसांसि भेटविया आले : एकु पावो धुतला : एकू धुवावा असे : उमाइसीं ह्मणीतलें : ‘रूपैचे गुरू : श्रीचांगदेवो राउळ : आले असति’ : तैसीचि स्थिति जाली : पावो आसूडिला : आणि वेगें निगाले : हाटवटिएसि गेले : पानें : पोफळें : माळ घेतली : गोसावीयांचेया दरिसनासि येत असति : धोत्रीं अवघें घेतलें असे : तवं लोकू पूसे : ‘हें काइ नायको’ : ‘ना रूपैचे गुरु : श्रीचांगदेवो राउळ आले असति : तेयांसि भेटों जात असों’: संभ्रमें धोत्र वरतें करिति : तैसेचि गोसावीयाचेया दरिसना आले : गोसावीयांसि पटिसाळे पूर्विलीकडे पाठसरेयावरि आसन : ते संभ्रमें आडचि : गोसावीया उजुचि एत होते : सर्वज्ञें ह्मणीतले : ‘ऐसे या : ऐसे या’ : मग पाइरियावरौनि आले : पानें पोफळें दरिसना केलीं : फुलें : माळ : वोळगवीली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांपासि बैसले : पालखति घातली : आणि स्तीति जाली : भोगीली : मग ह्मणों लागले : ‘जी जी : रूपै गोसावीयांचे गुण सांघती असे ते थोडे : गोसावीयाचां ठाइ दीसत असेति ते बहुत : जी : ते सांघों नेणें’ : गोसावी तेयांतें पूसीलें : ‘आपणेयां नांव काइ’ : ‘जी जी : मातें वामनायेक ऐसें ह्मणति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तरि वामनाचार्य ह्मणा’ : ‘जी जी : रूपै अखड गोसावीयांची वाट पाहे : गोसावी कव्हणे ठाइं राज्य करीत असति ऐसें जाणे ना : तरि तियेतें बोलाउं धाडूं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुह्मां दरिसन जालें : तरि तुमचीए लेकींसि होआवे कीं’ : मग तेंहीं एकु मोलकै करूनि धाडिला : ॥
लीळा २४२ : महदाइसां भेटि : ॥ उपाहारू स्वीकारू
मग तेंहीं मोलकै करूनि पाठवीला : तो मोलकै महदाइसां वाटेसि भेटला : महदाइसीं गोसावीयांतें आइकीलें : मग ते मोलकै करूनि येतें होतीं : येर्हा येर्हा भेटि जाली : महदाइसीं पूसीलें : ‘आलेया : तुं कें जात असति’ : तेणें ह्मणीतलें : ‘पाडळीं गाउं : ते जात असे’ : ‘कां जात असति’ : ‘ना : वायनायकु : तेयाची लेंकी रूपाइसें : तेयांतें बोलाउं जात असे’ : ‘कां कां’ : ‘ना : तेयांचे गुरु आले असति’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘चाला : तें आह्मीचि’ : येरू मोलकै मागौता पाठवीला : तेयाचां हातीं पोतें दीधलें : आणि निगालीं : महदाइसें गोसावीयाचेया दरिसना आलीं : गोसावीयांसि पटिसाळे पाटसरेयावरि आसन : महदाइसीं गोसावीयांसि बैसलेया क्षेमालिंगन दीधलें : मग दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयां जवळि बैसलीं : गोसावीयां पुढें : वाटे मोलकै भेटला तें सांघीतलें : मग महादइसीं गोसावीयांलागि उपहारातें वीनवीलें : गोसावी वीनवणी स्वीकारिली : महदाइसीं वडे प्रधान करूनि उपहारू निफजवीला : गोसावीयांसि पुजावसरू केला : ताट केले : भक्तजनां आवघीयां ठायें केलें : गोसावी अवघेयाचीया ठायाकडे अवलोकीलें : महदाइसीं अवघां ठाइं वडे वाढीले : आपुला ठाइं न वाढतीचि : सर्वज्ञें म्हणीतलें : ‘बाइ : या अवघेयाचां ठाइं वडा असे : एथ नाहीं : तें काइ’ : महदाइसीं ह्मणीतलें : ‘जी जी : द्वारावतीये गेलीयें होतीयें : तेथ मज शूळ उपनला : ते दीउनि मज उडीदान न साहे’ : मग गोसावी आपुलीये ताटीचा वडा तेयासि वाढवीला : मग गोसावीयांसि आरोगण : अवघेया जेवणें जालीं : गुळळा जाला : वीडा वोळगवीला : मग वडा साहे ॥ महदाइसीं गोसावीयाते वीनवीले : ‘जी जी : मज मांद्ये असे : दीपन नाहीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ माखण करा : मग होइल’ : मग वडेप्रधान उपहारू केला : महादइसें पांतीं बैसलीं : गोसावी महदाइसातें अवलोकीलें : मग ह्मणीतलें : ‘बाइ : यांसि कांहीं वाढाना’ : (शोधु) थाळाचे फेडीले : ‘बाइ : वाढाना : दोनि वेळ’ : गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा तीये दीउनि महदाइसासि उडीदान साहे : भलेतें न साहे : दीपन जालें : ॥
लीळा २४३ : तथा श्राध.
एकुदीसीं गोसावीयांसि वृंदावन करावेयाची प्रवृत्ति जाली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ वृंदावन करावें’ : ‘जी जी : तुळसीया वृंदावन करू जाणे’ : ऐसें गोसावीयां पूढें सांधीतलें : तो टेंभूरणीए असे : मग भट बोलाउं धाडीले : मग भटोबास तेयातें बोलवावेया टेंभुरणीसि गेले : तुळसीयांतें ह्मणीतलें : ‘तुमतें गोसावी वृंदावन करावीयां बोलाविलें असे’ : तेहीं ह्मणीतलें : ‘आमचा घरीं आजि श्राध : आजीचा दीसू राहा : मग जाउं’ : भटीं ह्मणीतलें : ‘तुह्मीं पाहे या : मि आजि जाइन’ : तैसेचि भट देहाचेया देहा विळौनि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : उठीतां ह्मणीतलें : ‘जी जी : ते उदीयां येती’ : तैसचि भट नारायणाचेया देउळा गेले : तेथ पाठि घातली : महदाइसें गेली : तेयांचीए पाठिवरि पाए देतें असति : तवं गोसावी लघू परिहारासि बीजें केलें : तैसेचि तेथ बीजें केलें महदाइसीं गोसावीयांतें देखीलें : आणि भीयालीं : गोसावीयाचेया श्रीचरणा लागली : महदाइसीं गोसावीयांतें पुसीले : ‘जी जी : नागदेवो भागला असे : मग याचिये पाठीं मज रगडुं येइल’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : श्रमलेयाचें करूं ये’ : मग गोसावीयांसि तेथ आसन : दीवा लावीला : मग महदाइसांकरवि भटांची श्रमानिवृति करवीली : तथा ‘जी जी : ऐसें करूं ये’ :॥
लीळा २४४ : तुळसीया आंगुळीव्येथा हरण
मग यरी दीसीं तुळसीया आले : ते वृंदावन करूं लागले : चिरा उखलीतां बोटावरि पडीला : तेणें आंगुळीं रगडीलीं : तेणें तेयांसि मूर्छा आली : ‘तुळसीयांसि मूर्छा आली’ : ह्मणौनि भक्तजनें बोबाइलीं : ‘पडीलें : सरला व्यापारू’ : गोसावीयांसि पाटसरेयावरि आसन : गोसावी तेथ बीजें केलें : पीक घातली : सावदु जालें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आतां व्यापारू पुरा दीया गा’ : मग गोसावीयांसि पटिसाळेवरि आसन : भक्त बैसले : तुळसीए वृंदावनाचे तीन खण तीं दीसीं निर्वाळीले : पाहारूचि दी व्यापारू करीति : मग वृंदावन केले ॥
लीळा २४५ : आपलो भेटि
एकुदीसीं आपलोयें जूं हारवीलें : जुवारीं बोकणा बांधला : मग ते घरासि आले : तेयांचीया माता ह्मणीतलें : ‘जाए कां ऐसा : जैसी रूपै गेली श्रीचांगदेवो राउळा पाठीं : तैसा तुं जाए कां’ : तेयांसि स्तीति जाली : आणि ते तैसेचि नीगाले : ते अहोरात्रें गोसावीयांचेया दरिसनासि आले : गोसावीयांसि उदयाचा पुजावसर असे : सर्वांगीं चंदनाची भोरि आडा : गोसावी पूर्वीले सोंडीयेवरि उभे असति : आपलोयें गोसावी देखीले : दंडवते घातलीं : श्रीचरणा लागले : महदाइसीं काउरवाउरें देखौनि पुसों आदरिलें : ‘कांरे बा : ऐसा’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : हा जूं खेळिनला : जूं हारविलें : याची माता कोपली’ : महदाइसें भीयालीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तेसें कांही नाहीं : हा तान्हैला असे : भुकैला असे : पाणी पेवों सूआ : जेउं सूआ : पाठीं गोष्टि सांघा : बाइ : पूर्वी हें जुं खेळे : हें जुं जींके : परि हारवीना’ : मग या उपरि गोसावी जुतक्रीडेची गोष्टि सांघीतली : मग महदाइसीं उदक आणिलें : ते न पीयतीचि : ते ह्मणति : ‘मीं गोसावीयांचे चरणउदक वांचौनि न पीयें’ : मग गोसावीयांसि सोडीयेवरि आसन : महदाइसीं श्रीचरणक्षाळण केलें : मग चरणोदक पीयालें : मग तेही महदाइसा पुढें अवघें सांघीतलें : ॥
लीळा २४६ : उमाइ उपाहारू स्वीकारू
उमाइसे मास उपवास करावेयाची आइत करीतें असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मास उपवासीं बैसतां ब्राह्मणीं जेउं सूइजे’ : मग उमाइसीं गोसावीयांसि उपहारालागि विनवीले : दशमीचां दीसीं रात्रीं स्परिसें जाली : उदीयाचि गोसावीयांचेया दरिसना आलीं : अळगौनि गोसावीयांसि दंडवतें घातलीं : आबैसापुढे दुःख करूं लागली : गोसावी आबैसातें बोलाविलें : ‘बाई : मासउपवासीयें काइ ह्मणतें असति’ : मग उमाइसें गोसावीयां पुढें सांघों लागलीं : ‘जी जी : मीयां गोसावीयांलागि उपाहारू आपूलां हातीं निफजावा : मग गोसावीयांसि पुजा करावी : तें मज दैव नाही जी’ : ऐसें ह्मणौनि दुख करूं लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मास उपवासीए हो : पैर्हाचें पैर्हा असीजे : याची शुधि वार्ता नेणिजे : धोयें डोळे भरावें : तथा भरिजति : हें निकें : या जवळिकें असीजे : तें वोखटें : (शोधु) आराइजे : या जवळें असीजे तें वोखटें : वृधाबाइसें उपाहारू करीती : नागदेवो तुमचिया वारिया गृहीत द्वारे पुजा करीती : दुख न करा : तथा दुख कां करीतें असा : (शोधु) : तथा : शूधि वार्ता : एथें असेचि हे देखे : ॥ हो कां जी’ : मग गोसाचीयांसि वीरहणा जावेयाची प्रवृत्ति होती : मग ते भंगली : मग न वचतिचि : मग उमाइसें प्रधान करूनि गोसावी निरूपण केलें : तवं आबाइसीं उपाहारू निफजविला : भटोबासीं गोसावीयांसि पुजा केली : गोसावीयांसि ताट केलें : भक्तजनां ठाय केलें : गोसावीयांसि आरोगण : भक्तजनां जेवणें जालीं : उमाइसां पांतीं जेवण जालें : गोसावीयांसि गुळळा : वीडा : गोसावी आसनीं उपवीष्ट असति : उमाइसीं श्रीमूखीचें तांबूळ मागीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हे काम्यव्रत : एथचा विधि ऐसा नव्हे’ : मग भटोबासा करवि उमाइसासि वीडा देववीला : भट : उमाइसीं : चुळीं पाणि घातलें : मग ह्मणीतलें ‘जी जी : मी येकू मास उपवासू गोसावीयाचां ठाइं करीन : तथा मास उपवासीं बैसेन’ : तवं बाइसें कोपलीं : ‘हें काइ वो जालें : पोहा न धूणातें न तोंडें : बाबापासि उपवास : सातरिया काइसिया : पैर्हा जा : मग उपवास करा’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ रावसगांवा जा : हें तेथेंचि येइल’ : मग तीयें एकादशीसि नीगालीं ॥
लीळा २४७ : जोगीवेखें मनभुलि क्रीडा
एकुदीस गोसावीयांसि उदयाचा पुजावसर जालेया नंतरें मळेयाआंतु माहालक्ष्मीचेया देउळांतु वीहरणा बीजें केलें : गोसावीयांसि चौकीं आसन : तेथ जोगीयांची गळकंथा खापरी काठी आंधारीं होती : ते देखीली : गोसावी चौकीं वस्त्रें ठेवीलीं : वीभुती श्रीमूख माखीलें : भस्म आंगीं लाविलें : गळकंथा घातली : एके श्रीकरी खापरी : एके काठी घेतली : आणि गोसावी उभे ठेले : मग ह्मणीतलें : ‘‘कर धरि खपर : भिक्षापात्र : भस्म वीधुळीत : विगळसीत गात्र : नित्य चळ चित : मंद मंद मनसो विगळित गात्र : परमानंद : परमानंद : मन भुलिरे मन भुलिरे’’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : मागील सीध एणें वचनें भिक्षा करिति’ : मग बाइसें मेवों लागलीं : ‘फेडीजो जी बाबा : फेडीजो जी बाबा’ : ह्मणीतलें : मग तें गोसावी फेडीले : मग आपुली वस्त्रें प्रावर्ण केलीं : मग बीढारा बीजें केलें : ॥
लीळा २४८ : महदाइसीं वेवादें तिकवनाएका जैत्य
एकु दीस तीकवनाएकाचां घरीं श्राध जालें : गोसावीयांतें उपहारालागि वीनवीलें : गोसावी विनती स्विकरीली : दुपाहारचा : वीळिचां : गोसावीयांसि पुजावसर : आरोगणें उसीरू जाला : ह्मणौनि महदाइसें आलीं : ‘हे काइ तकवनाएको : गोसावीयांसि आरोगणे उसीरू जाला : आझूइं कैसें ताट नेयाना’ : तीकवनाएकें ह्मणीतलें : ‘ब्राह्मणांसी संकल्पु देवों : मग नेवों’ : महदाइसीं म्हणीतलें : ‘आधी तुमचे ब्राह्मण जेवीती : मग गोसावीयांसि ताट नेसी’ : ह्मणौनि महदाइसें भीतरि गेलीं : गोसावीयांलागि ताट वोगरीलें : घेउनि आलीं : गोसावीयांसि आरोगण : मग ताट घेउनि आली : तिकवनायकें ह्मणीतलें : ‘रूपै : ताटां सत सारिले कीं नाहीं’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘सत सारीलें ह्मणीजे काइ’ : ‘ना : गोसावीयांसि आरोगण ह्मणौनि’ : ‘मा गोसावी आरोगणा केली : तरि सत सारावें कां’ : ‘भक्तजना गोसावी काइ ऐसें ह्मणौनि नेणिजे’ : महदाहसीं ह्मणीतलें : ‘कैसें काइ गोसावी : ईश्र्वरू : आणि काइ’ : ‘होए होए : घीया : गोसावी ईश्र्वरू : आणि काइ’ : ‘होए होए : घीया : गोसावी ईश्र्वरू होति : परि काइ ह्मणौनि नेणिजेति’ : ऐसें वेळां दोनि उरोधीलें : मग महदाइसे ताट घेउनि निगालीं : उदीयांचि ते गोसावीयांचेया दरिसना आलें : भावें दंडवतें धातलीं : श्रीचरणा लागों बैसले : हळुचि महदाइसीं ह्मणीतलें : ‘घेइ : काइ घेवों तुझेया भावाचें’ : मग तिकवनाएकें गोसावीयां पुढें मागिल आवघे सांघीतलें : मग यावरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : नायक ह्मणत असति तें साचचि : बाइ : हें काइ ब्राह्मण : कीं क्षेत्रीं : कीं वैश्य : कीं शूद्र : हें नेणिजे कीं बाइ : नायक म्हणत असति तें साच’ : ऐसें गोसावी ह्मणीतलें : आणि तीकवनाएकासि जैत्य जालें ॥
लीळा २४९ भट वेवादें तीकवनाएकां जैत्य
भटोबासीं : तीकवनाएकें नदीसि धोत्रें धुतलीं : सीधनाथाकडे निगाले : तिकवनायेकें ह्मणीतलें : ‘ब्रह्मादीकां नीरसबोडी’ : ‘तुझा सीधनाथु कोणे ठाइं लागे’ : तीहीं ह्मणीतलें : ‘हें तुं ह्मणत अससि : कीं गोसावी ह्मणत असति’ : भटीं ह्मणीतलें : गोसावी’ : तीहीं ह्मणीतलें : ‘गोसावी जरि ऐसें म्हणती : तरि मी डोइ बोडुनि धोत्र फाडुनि उतरापंथें जाएं’ : तैसेंचि गोसावीयांपासि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग तिकवनाएकें गोसावीयांपासि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग तिकवनाएकें गोसावीयांपासि सांघों लागले : ‘जी जी : मीयां आणि नागदेनि’ : ऐसें आवघें सांघीतलें : ‘जी जी : तरि गोसावी काइ ऐसें सांघावें’ : गोसावी तिकवनायकाचें मानिलें : यावरि तीकवनायकें बाहे आफळीली : ‘हा होएं मी तीकवदेवो’ : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलें : मग नीगाले : मग भटीं ह्मणीतलें : ‘जी जी : गोसावी कैसे सीधनाथु’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा गा : हा उत्तरापंथें धोत्र फाडुनि डोइ बोडुनि जाये तें निकें कीं हे सीधनाथु होए तें निकें’ : ॥
लीळा २५० : माहादाइ अवतारू प्रतिभिज्ञा
पूर्वी महादाइसीं पुसीलें होतें : ‘हा जी : गोसावी कवणाचे पुत्र’ : सर्वज्ञ ह्मणीतलें : ‘हे गुजराथेचेया प्रधानाचें कुमर’ : मग द्वारावतिए जाउनि आली : मग एकुदीसीं पुसीलें : ‘जी जी : सर्वज्ञें ह्मणीतलें होतें : श्रीचांगदेवो राउळाचीं गुंफास्थानें पाहावीं : तरि मी तेथ गेलीयें होतीयें : तेथें पुरूखु येक बैसले होते’ : ‘जी जी’ : तेयाचीये तोंडीहुनि कीं रूपेचीया सरिया सरीया ऐसीया निगति’ : ‘हां जी’ : ‘तरि तें काइ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ते तेयांचि लाळ जी’: ‘‘मग मीयां तेयांतें पुसीलें : ‘आपणेयां नांव काइ’ तीहीं ह्मणीतलें : ‘आह्मां नांव महादमूनि’ : ‘आपण कवणाचे अनुग्रहीत’ : ‘ना : आह्मीं अनंतमूनिचे’ : ‘ते कवणाचे अनुग्रहीत’ : ‘ना : ते श्रीचांगदेवो राउळा गोसावीयांचे’ : ‘श्रीचांगदेवो राउळीं कवणेपरी बीजें केलें : तें तुह्मी जाणां’ : ‘ना : तें आह्मीं नेणों’ : ‘तरि तुमचे अनंतमुनि काइ म्हणति’: ‘ना : माहाराष्ट्ररीं पुरुषु आणि विद्या असे : ऐसे म्हणति’ : ‘तुह्मी काइ म्हणा’ : ‘ना : आम्ही अनंतु अनंतु ऐसें म्हणों’ : ’’ याउपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें कोण्हीचि नेणें : तें तों तर्ही केवि जाणे : तें एथौनि सांघीजैल : या उपरि गोसावी कामाक्षेची गोष्टि सांघीतलीं : मग पूर्वील गोष्टि : तवं महदाइसां ऐसें उमटलें : जें : द्वारावतीकार तेचि आमचे गोसावी : मग रात्रीं नीद्रा करावेया गेलीं : वृंदावनावरि बैसली : आबैसातें ह्मणीतलें : ‘आबै : आबै : द्वारावतिकार तेचि आमचे गोसावी’ : ऐसी अवघी गोष्टि सांघीतली : तेया सूख जालें : मग उदीयांचि गोसावीयांचेया दरिसनां आलीं : तेयांतें देखौनि : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तैशा स्थानीं तैसीया तैसीया गोष्टी न कीजति कीं’ : महादाइसीं म्हणीतलें : ‘हां जी : गोसावी केवि जाणितलें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘जाणिजे हेतु धातु करूनि’ : ‘हां जी : हेतु धातुतें कैसेनि जाणिजे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘जाणिजे तुह्मां उठीतां बैसतां’ : मग महदाइसां विस्मयो जाला : महदाइसीं ह्मणीतलें : ‘आबै जे आह्मी रात्रीं बोलिलों : तें गोसावी जाणीतलें’ : मग आबैसा विस्मो जाला : ॥
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2012
TOP