कुमार - गुरु : ईशानपुत्र : मूषकवाहन : ।
सिद्धिप्रिय : सिद्धिपति : सिद्ध : सिद्धिविनायक : ॥११॥
४४ ) कुमारगुरु --- कुमार म्हणजे कार्तिकेयाचा ज्येष्ठ भ्राता म्हणून कुमारगुरू किंवा सनक - सनंदन - सनातन सनतकुमार ह्या अतिदिव्य ब्रह्मर्षींना आत्मविद्या प्रदान करणारा म्हणून कुमारगुरू .
४५ ) ईशानपुत्र --- ईशान म्हणजे शंकर . शंकरपुत्र .
४६ ) मूषकवाहन --- उंदीर ज्याचे वाहन आहे तो किंवा उंदीर हे काळाचे प्रतीक आहे . काळावर ज्याची सत्ता चालते तो . मायाकरासुर नावाचा दैत्य होता . त्याने सर्वांना जिंकले . तेव्हा त्याच्या नाशासाठी समस्त देवेश्वरादिकांनी मोठे तप करून , प्रार्थना केल्यावरून आणि विशेषत : पाताळ लोकांचा राजा , पृथ्वीला धारण करणारा नागराजा शेष , यानेही पुत्रप्राप्तीसाठी गणेशाचे तप केल्यावरून व वरबद्धतेमुळे त्याच्या पुत्ररूपाने , त्याच्या ध्यानापासून श्रीगणराजप्रभूंनी एक अवतार धारण केला . त्या अवतारातील गणेशाचे नाव ‘ मूषकग ’ म्हणजेच ‘ मूषकवाहन ’ असे ठेवले . मूषूक धातू चौर्यकर्माचा वाचक आहे . सर्वांतर्यामी जो सर्वव्यापक आत्मा , सर्वत्र प्राप्त अशा सर्वाधार - सर्वचालक अशा सत्तेच्या प्रत्ययाने कळून येतो . तोच ब्रह्मसत्तांश स्वमहिमास्थित गमनागमनशून्यशा परब्रह्याच्या परब्रह्यात्मगमनादिकाचे साधन ठरले असल्यामुळे तशा अर्थाचे बोधक असे मूषक नाम त्याला देऊन तेच त्या ब्रह्मणस्पति - गणेशाचे वाहन ठरविले गेले . या संज्ञेतील चौर्यकर्माचे सूचकत्व असे की जीवेश्वरांच्या हृदयात राहणारा बुद्धिचालक अंतरात्माच त्यांच्या शुभाशुभ कर्मांना प्रेरक सत्ताधारी ठरलेला आहे . अर्थात् त्यांच्याकडून घडणारी सर्व कृत्ये करवितो तोच . आपण मात्र अलिप्त . पण त्या सर्व कृत्यांचे पूर्ण फल जे सुख त्याचा उपभोग मात्र तो स्वत : च घेतो . मायामोहात गुरफटलेले लोक ते जीवेश्वरादी कोणीही त्याला जाणत नाहीत . हाच विशेषार्थ ‘ मूषक ’ संज्ञेमध्ये समजावयाचा . मूषक म्हणजे उंदीर . या लौकिक प्राण्याशी गणेशांच्या वाहनाचा काही एक संबंध नाही . मूषकग म्हणजे व्यापक सत्तेच्या निमित्ताने सर्वत्र गमनादी व्यवहार करणारा . असा हा शेषपुत्ररूपी मूषकवाहन अथवा मूषकग अवतार होय .
४७ ) सिद्धिप्रिय --- अणिमा , लघिमा , गरिमा , महिमा प्राप्ती , प्राकाम्य , ईशित्व , वशित्व या अष्टसिद्धी ज्याला प्राप्त आहेत आणि प्रिय आहेत असा .
४८ ) सिद्धिपति --- अष्टसिद्धींचा पालक . सर्वांच्या ठिकाणी असणारी सर्व प्रकारची ज्ञानसत्ता , एका गणेशाच्याच हाती आहे . त्याच्या बुद्धीचा चालक मात्र दुसरा कोणीच नाही . अर्थात् बुद्धियुक्त होऊन जे कर्म केले जाते त्याचे यथायोग्य फळही तोच देतो . म्हणून सर्व प्रकारची सिद्धि देणारा ‘ सिद्धिपति ’ तोच आहे .
दंभासुराच्या नाशासाठी ब्रह्मदेवादी परमेश्वरांनी तपश्चरण केल्यावरून ब्रह्मदेवाच्या ध्यानापासून गणेशाने ‘ सिद्धिबुद्धिपति ’ नावाचा अवतार धारण केला . येथील सिद्धिबुद्धिपति नामाचा अर्थ असा की भुक्तिसिद्धी , मुक्तिसिद्धी किंवा कैवल्यसिद्धी , जे जे काही मिळवावयाचे असते ते सर्व सिद्धीचे स्वरूप आहे . अशा रीतीने त्या सिद्धीचा पती गणेश सर्वस्वाचेच मूळ ठरतो . तसेच बुद्धीचे स्वरूप ज्ञानमय असते . नामरूपात्मक विश्व नानाकारांनी संपन्न असले तरी तद्रूप ज्ञानसत्ता एकाच अखंड स्वरूपाची असते . अशा बुद्धीचा पती गणेश . सारांश , त्याचे साक्षात् परब्रह्मस्वरूपत्वचया ‘ सिद्धिबुद्धिपति ’ नावावरून जाणावयाचे आहे .
हा समग्र विश्वविलास व ब्रह्मविहारसुद्धा स्वानंदनाथ प्रभूने आपल्या लीलाविलासासाठी निर्मिला आहे . स्वत : तोच मायेच्या आश्रयाने नानाकार झाला आहे . अर्थात् त्याचे नानाकार सत्तारूप ज्ञानमय असल्यामुळे तो बुद्धीचे स्वरूप ठरले आहे . तेथील भिन्न भिन्न स्वरूपाच्या प्रत्ययाचे भान हे सिद्धीचे स्वरूप आहे . अशा मोहदायिनी सिद्धी व मोहधारिणी बुद्धी या दोन मायांच्या आश्रयाने क्रीडा करणारा त्यांचा पति तो ‘ सिद्धिबुद्धिपति ’ नावाने वेदांनी स्तविला आहे .
४९ ) सिद्ध --- स्वत : सिद्ध . स्वसंवेद्य परब्रह्म .
५० ) सिद्धिविनायक --- भक्ताला धर्मार्थकाममोक्षाची , सिद्धींची प्राप्ती करून देणारा . ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मिळवून विष्णूच्या कानात दडून बसलेले मधु आणि कैटभ हे दैत्य एके दिवशी कानातून बाहेर पडले . साक्षात् वरदात्या ब्रह्मदेवावरच चालून गेले . त्यांनी विष्णूंकडे प्रार्थना केली . विष्णूंशीही त्यांनी युद्ध केले . विष्णूंनाही ते आवरेनात तेव्हा सर्वजण शिवांकडे गेले . युद्धावर जाण्यापूर्वी श्रीगणेशपूजन करावयाचे राहून गेले त्यामुळे विष्णूंना युद्धात यश मिळाले नसल्याचे शिवांनी सांगितले . तेव्हा भगवंतांनी दंडकारण्यातील सिद्धिक्षेत्र ठिकाणी अन्नपाणी वर्ज्य करून तपानुष्ठान केले . ‘ गणेशाय नम :’ या षडक्षरी मंत्राचे अनुष्ठान केले . विष्णूंनी मांडलेले सिद्धासन अनेक वर्षे लोटून देखील कधीही भंग पावले नाही . तेव्हा श्रीगणेशांनी संतुष्ट होऊन त्यांना दर्शन दिले . त्यानंतर विष्णूंच्या हातून ठरल्याप्रमाणे मधु - कैटभ दैत्यांचा नाश झाला . गणेशलोकी जाऊन विष्णूंनी श्रीगणेशांचे दर्शन घेतले . यापुढे कुठलाही दैत्य माजला तरी त्याचा वध करण्याची सिद्धी ॐ काराला प्रार्थना करून मागून घेतली . तेथून विष्णू परत सिद्धक्षेत्री आले . तेथे त्यांना स्वयंभू उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती प्रकट झाल्याचे दिसले . होमहवन करून यथाशास्त्र त्यांनी श्रीगणेशांची प्रतिष्ठापना केली व ‘ सिद्धिविनायक ’ असे त्याचे नामकरण केले .
पुणे - सोलापूर मार्गावर बोरीवेल हे स्टेशन आहे . तेथून अकरा कि . मी . वर सिद्धटेक तथा सिद्धिटेक हे क्षेत्र भीमा नदीच्या काठावर आहे . सिद्धिविनायकाची येथील मूर्ती तीन फूट उंच आणि सव्वादोन फूट रूंद आहे . हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक स्थान आहे .
अविघ्न : तुम्बरु : सिंहवाहन : मोहिनीप्रिय : ।
कटङ्कट : राजपुत्र : शालक : सम्मित : अमित : ॥१२॥
५१ ) अविघ्न --- विघ्ननाशक . विघ्नरहित , ‘ अवि ’ म्हणजे पशु . माणसातील पशुत्वाचा नाश करणारा .
५२ ) तुम्बरु --- तुंबरु म्हणजे तंबोरा . जसा संगीताला तंबोर्याचा आधार तसाच जीवनसंगीतास ज्याचा आधार असा तो . तुंबरु एका गंधर्वाचे नाव आहे म्हणून तुंबरु याचा अर्थ गायक असा येथे घ्यावा .
५३ ) सिंहवाहन --- कृतयुगात कश्यपगृही श्रीविनायक अवतारात ज्याचे वाहन सिंह होते असा तो .
५४ ) मोहिनीप्रिय --- मोहिनी म्हणजे माया . मायाशक्ती ‘ आवरण ’ आणि ‘ विक्षेप ’ या दोन रूपात कार्य करते . ‘ आवरण ’ म्हणजे मायेची अज्ञानाची शक्ती . आवरणामुळे जीव स्वत : ला परमात्म्यापासून वेगळा समजतो . आणि ‘ विक्षेपा ’ ने त्याला परमात्म्याच्या ठिकाणी जग अस्तित्वात नसताही भासते . (‘ विक्षेप ’ म्हणजे चित्ताची चंचलता . चित्तक्षोभ .)
सिद्धी जगाला मोहित करते . म्हणून तिला मोहिनी म्हणतात . त्या सिद्धीचा नाथ म्हणून तो मोहिनीप्रिय .
५५ ) कटङकट ---‘ कट ’ म्हणजे आवरण म्हणजेच अज्ञान . ज्ञान प्रदान करून अज्ञानाचे आवरण दूर करणारा .
५६ ) राजपुत्र --- राजा वरेण्याच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलेला किंवा चन्द्रास पुत्रवत् मानणारा .
५७ ) शालक ---‘ श ’ म्हणजे परमेश्वर . अलक म्हणजे अंश . परमेश्वरी अंश जो इंद्रियातीत आहे . ‘ श ’ म्हणजे परोक्ष . इंद्रियातीत . ‘ अलक ’ म्हणजे केस . केस हा शरीराचा अंतिम भाग . ज्याचा अंत , परिसीमा अज्ञात आहे . ज्याला पूर्णत : जाणणे इंद्रियांना अशक्य असे तत्त्व म्हणजे शालक .
५८ ) सम्मित --- अनंतकोटी ब्रह्माण्डांना व्यापूनही दशांगुले उरलेले परमतत्त्व .
५९ ) अमित --- मोजता न येणारा . सर्वव्यापक . लौकिक प्रमाणांना न कळणारा .
कूष्माण्ड - साम - सम्भूति : दुर्जय : धूर्जय : जय : ।
भूपति : भुवनपति : भूतानां पति : अव्यय : ॥१३॥
६० ) कूष्माण्डसामसंभूति --- कूष्माण्डयागात एक प्रसिद्ध साममन्त्र उच्चारला जातो . जो गणेशाची विभूती आहे . त्यावरून गणपतीचे कूष्माण्डसामसंभूती असे नाव प्रसिद्ध आहे .
६१ ) दुर्जय --- बलवानांकडून , दैत्यांकडून आणि मनानेदेखील जिंकून घेण्यास जो कठीण आहे असा .
६२ ) धूर्यय --- जगच्चक्राची धुरा विनासायास चालविणारा .
६३ ) जय --- जो साक्षात् जयच आहे .
६४ ) भूपति --- भूमीचा पालनकर्ता .
६५ ) भुवनपति --- भू . भुव :, स्व :, मह :, जन :, तप :, सत्यम् हे सात स्वर्ग आणि अतल , वितल , सुतल , तलातल , रसातल , महातल , पाताल असे सात पाताळ आहेत . या चौदा भुवनांचा पाल ,
६६ ) भूतानांपति --- यच्चयावत् समस्त सृष्टीचा , भूतांचा पालनकर्ता .
६७ ) अव्यय --- शाश्वत , अविनाशी , ज्याला व्यय नाही असा .
विश्वकर्ता विश्वमुख : विश्वरूप : निधि : घृणि : ।
कवि : कवीनाम् ऋषभ : ब्रह्मण्य : ब्रह्मणस्पति : ॥१४॥
६८ ) विश्वकर्ता --- विश्व निर्माण करणारा . अनंतकोटी ब्रह्माण्डांचा निर्माता .
६९ ) विश्वमुख --- विश्वाचा आरंभ ज्याच्यापासून होतो तो .
७० ) विश्वरूप --- संपूर्ण विश्व हेच ज्याचे रूप आहे तो . सर्वप्रपंचरूप असा .
७१ ) निधि --- महापद्म , पद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , कुंद , नील आणि खर्व ( हे सर्व कुबेराचे खजिने ) असा नवनिधिस्वरूप किंवा हय ( घोडा ), गज , रथ , दुर्ग , धनसंपदा , अग्नी , रत्न , धान्य आणि प्रमदा या भौतिक वैभवाच्या बाबी ( नवनिधी ) ज्याच्या चरणी लीन असतात असा , किंवा कामधेनू , दिव्यअंजन , सिद्धपादुका , अन्नपूर्णा , कल्पवृक्ष , चिंतामणिरत्न , घुटिका , कलक आणि परीस हा नवनिधी ज्याच्या आधिपत्याखाली असतो असतो असा तो .
७२ ) घृणि --- घृणि : म्हणजे तेजस्वी . स्वयंप्रकाशी .
७३ ) कवि --- सृष्टिरूप काव्याचा रचनाकार . सर्वज्ञ .
७४ ) कवीनाम् ऋषभ --- कवींमध्ये श्रेष्ठ .
७५ ) ब्रह्मण्य --- साक्षात् ब्रह्मतत्त्व . ब्राह्मण , तप , वेदवेदांगे , ब्रह्म इत्यादींशी सद्भाव ठेवणारा .
७६ ) ब्रह्यणस्पति --- अन्नब्रह्मापासून चिद्ब्रह्मापर्यंत सर्व ब्रह्मांचा स्वामी , पालक किंवा ज्ञानाचा राजा . ब्रह्मणस्पति शब्दाचा अर्थ यास्काचार्यांनी निरुक्त ग्रंथात असा केला आहे की ‘ ब्रह्मणांपाता वा पालयिता वा । ’ म्हणजे यावत्सर्व ब्रह्मगणांचा पाता म्हणजे रक्षणकर्ता अतएव स्वेच्छेने त्यांना निर्माण करून त्यांची स्थितिस्थापना करणारा आणि पालयिता म्हणजे त्यांना सत्ता देऊन त्यांच्याकरवी सृष्टयादी कार्ये करविणारा , एवंच रक्षण करविता असा जो कोणी असेल त्याला ‘ ब्रह्मणस्पति ’ म्हणावे अथर्ववेदातील गणेशतापिनी नामक उपनिषदामध्ये गणेशाला ब्रह्म व ब्रह्मणस्पति अशी संज्ञा दिली गेली आहे . अशा प्रकारचे ब्रह्मणस्पतित्वाचे स्तवन दुसर्या कोणाविषयीही झाले नाही . गणेशसूक्ताची देवता ब्रह्मणस्पति हीच मुख्य स्तविली असून गणेश नाम त्याचे विशेषण म्हणून योजले आहे . साक्षादात्मा ब्राह्मणस्पति , एक गणेशच असून तोच प्रत्यक्ष ब्रह्मैश्वर्यसत्ताधारी आहे . त्याला सत्ता देणारा कोणीच नाही .
वेदामध्ये अन्नब्रह्मापासून ते अयोगब्रह्मापर्यंत पुष्कळशी ब्रह्मे वर्णिली आहेत . त्यामध्ये तत् - त्वम् - असिस्वरूप त्रिपदांचे शोधन साधणारी सहाच ब्रह्मे मुख्य ठरली आहेत . ती अशी - असत्ब्रह्म किंवा शक्तिब्रह्म , सद्ब्रह्म - सूर्यब्रह्म , समब्रह्म - विष्णुब्रह्म , तुरीयब्रह्म - नेतिब्रह्म किंवा शिवब्रह्म , नैजगब्र्ह्म - गाणेशब्रह्म किंवा संयोगब्रह्म आणि निवृत्तिब्रह्म किंवा अयोगब्रह्म अशा ब्रह्मांना निर्माण करून म्हणजे वेगळेपणाने प्रकाशित करून क्रीडा करणारा . त्यांच्या शांतिपूर्ण स्थितीनेच लभ्य असणारा आणि त्यांच्या ठिकाणी संततात्म - शांतिरूपाने राहणारा पूर्णयोगशांति - महिमा असा जो त्याला ब्रह्मणस्पति म्हणतात .
ज्येष्ठराज : निधिपति : निधिप्रियपतिप्रिय : ।
हिरण्मयपुर - अन्तस्थ : सूर्यमण्डलमध्यग : ॥१५॥
७७ ) ज्येष्ठराज --- ज्येष्ठांमध्येही जेष्ठ किंवा कार्तिकेयाचा ज्येष्ठ बंधु . गजासुर नावाच्या दैत्यांनी विष्णु - शिवादी सर्वांनाच जिंकून धरून आणले व सांगितले की ‘ दोन्ही हातांनी दोन्ही कान धरून भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ’ असा विशेष नमस्कार माझ्या पायांजवळ दररोज करीत जा .’ श्री गजानन म्हणाले - दैत्याने ठरविलेला नमनरूप दंड मला फार प्रिय आहे . तेव्हा कान धरून व मस्तक टेकवून विष्णु - शंकरादी सर्व देवांनी श्रीगजाननचरणी नमन केले . गजानन प्रसन्न झाले . दैत्यांचा नाश झाला . सर्व सुखी झाले . या अवतारात सर्वश्रेष्ठत्व - सर्वपूज्यत्वसूचक ज्येष्ठराजत्वरूप ऐश्वर्य स्पष्ट झाले . असा नमस्कार गणेशावाचून अन्यत्र करावयाचा नसतो . कारण ज्येष्ठराजत्व इतरत्र कोठेही नाही .
संपूर्ण विश्वाचा , विष्णुशिवादी परमेश्वरांचा व सगुण निर्गुणादी समग्र ब्रह्मस्थितीचा निर्माता असल्यामुळे , जो सर्वांचाच मातापिता ठरलेला आहे . उलटपक्षी त्याला मात्र कोणी मातापिता नाही . कारण तो प्रत्यक्ष ब्रह्मरूप अज ठरलेला आहे . म्हणून वेदांनी त्याचेच मात्र स्तवन ज्येष्ठराज नावाने केले आहे .
७८ ) निधिपति --- नवनिधिंचा पालक . ( कुबेराचे नऊ खनिने म्हणजे नवनिधी होय . पाहा नाम क्र . ७१ )
७९ ) निधिप्रियपतिप्रिय --- वैभवाचे किंवा सर्व निधींचा संरक्षक जो कुबेर तो निधिप्रियपती आणि त्यालाही प्रिय असणारा असा तो .
८० ) हिरण्मयपुरान्तस्थ --- दहराकाशाच्या ( साधकाच्या हृदयाच्या ) मध्यभागी हिरण्यपुर विराजमान असते . चिन्मय ब्रह्माचे निवासस्थान . अन्तर्हृदयात विराजमान किंवा सोन्यारूप्याने मढविलेल्या पुरात ( नगरात ) विराजमान असणारा .
८१ ) सूर्यमण्डलमध्यग --- सूर्यमंडलाचे मध्यभागी स्थित असलेला .
कर - आहतिध्वस्त - सिन्धुसलिल : पूषदन्तभित् ।
उमाङ्क - केलि - कुतुकी मुक्तिद : कुलपालन : ॥१६॥
८२ ) कराहतिध्वस्तसिन्धुसलिल --- ज्याने आपल्या सोंडेच्या आघाताने समुद्रजलाचा नाश केला तो . किंवा कर म्हणजे सोंड . आहति : म्हणजे आघात . सिन्धुसलिल म्हणजे भवसागर . भवसागराचा विध्वंस करणारा .
८३ ) पूषदन्तभिद् --- दक्षयज्ञप्रसंगी वीरभद्ररूपात पूषा देवतेचे दात पाडणारा .
८४ ) उमाङ्ककेलिकुतुकी --- उमादेवीच्या मांडीवर खेळण्याचे औत्सुक्य ज्याला असे , असा .
८५ ) मुक्तिद --- संसारबंधनातून मुक्ती देणारा .
८६ ) कुलपालन --- धर्मनिष्ठ कुळांचे पालन करणारा . कौलतंत्रासारख्या तंत्रमार्गाचेही पालन करणारा . ‘ कु ’ म्हणजे पृथ्वीतत्त्व . ते ज्याच्या ठिकाणी लीन होते , ते आधारचक्र म्हणजे ‘ कुल ’ होय . या कुलासंबंधीचे शास्त्र ते ‘ कौल ’ होय . ‘ कुल ’ म्हणजे शक्ती आणि ‘ अकुल ’ म्हणजे शिव . शिवावाचून शक्ती व शक्तीवाचून शिव हे कार्यक्षम होत नाही . असे या कौलतंत्रमार्गात म्हटले आहे .
किरीटी कुण्डली हारी वनमाली मनोमय : ।
वैमुख्य - हत - दैत्यश्री : पादाहति - जितक्षिति : ॥१७॥
८७ ) किरीटी --- मस्तकावर मुकुट धारण करणारा किंवा अर्जुनरूप धारण करणारा .
८८ ) कुण्डली --- कानात कुंडले धारण करणारा .
८९ ) हारी --- गळ्यात मोत्यांच्या वा रत्नांच्या माळा घालणारा . भक्तांचे मन हरण करणारा मनोहारी . भक्तांचा विघ्न - हारी .
९० ) वनमाली --- पायांपर्यंत रूळणारी वनमाला घालणारा .
९१ ) मनोमय --- आपल्या मनाने जन्म घेणारा . आत्म्याच्या पाच कोशांपैकी ( अन्नमय - प्राणमय - मनोमय - विज्ञानमय आणि आनंदमय ) साक्षात् मनोमयकोश जो आहे तो .
९२ ) वैमुख्यहतदैत्यश्री --- नाराज होऊन दैत्यांचे वैभव नष्ट करणारा .
९३ ) पादाहतिजितक्षिति --- आपल्या पायाच्या आघाताने सूंपर्ण पृथ्वीला नमविणारा किंवा व्यापणारा .
सद्योजात - स्वर्ण - मुञ्ञमेखली दुर्निमित्तहृत् ।
दुःस्वप्नहृत् प्रसहन : गुणी नादप्रतिष्ठित : ॥१८॥
९४ ) सद्योजातस्वर्णमुञ्ञमेखली --- कोवळ्या सुवर्ण मुंजा गवताची मेखला धारण करणारा .
९५ ) दुर्निमित्तहृत् --- अपशकुन नाहीसे करणारा .
९६ ) दुःस्वप्नहृत् --- वाईट स्वप्नांचा नाश करणारा .
९७ ) प्रसहन --- भक्तांचे अपराध सहन करणारा . क्षमा करणारा .
९८ ) गुणी --- सकल सद्गुणांचा परम आधार असणारा .
९९ ) नादप्रतिष्ठित --- ॐ काराच्या अ उ म् नादात निवास करणारा .
सुरूप : सर्वनेत्र - अधिवासो वीरासन - आश्रय : ।
पीताम्बर : खण्डरद : खण्ड - इन्दुकृत - शेखर : ॥१९॥
१०० ) सुरूप --- सुंदर रूप असलेला .
१०१ ) सर्वनेत्राधिवास --- तेजतत्त्वरूपाने सर्वांच्या नेत्रात वास करणारा .
१०२ ) वीरासनाश्रय --- परमतृप्तीचे आसन जे वीरासन त्या आसनात बसलेला . डावा पाय गुडघ्याजवळ मोडून त्याची टाच कमरेखाली आणून , पायाच्या बोटांवर बसणे म्हणजे वीरासन .
१०३ ) पीताम्बर --- पीतवस्त्र धारण करणारा ; आकाशासही गिळून टाकणारा .
१०४ ) खण्डरद --- ज्याचा ( डावा ) दात तुटलेला आहे . डावा दात म्हणजे मायेची सत्ता . मायेची सत्ता जिथे खंडित होते तो .
१०५ ) खण्डेन्दुकृतशेखर --- खण्डेन्दु म्हणजे चंद्रकोर . मस्तकावर चंद्रकोर धारण करणारा .
चित्राङ्क - श्यामदशन : भालचन्द्र : चतुर्भुज : ।
योगाधिप : तारकस्थ : पुरुष : गजकर्णक : ॥२०॥
१०६ ) चित्राङ्कश्यामदशन --- दशन म्हणजे दात . हत्ती वयोवृद्ध झाला की त्याचे दात मलीन होत सावळे होतात . गणेश आद्यतम अस्तित्व . म्हणून त्याचे दात श्याम आहेत व त्यावर सुंदर चित्रकारी केली आहे . चित्रकारी केल्याने ज्याचे दात मलिन वाटतात . दात रत्नमंडित केले आहेत असा .
१०७ ) भालचन्द्र --- भालप्रदेशावर चंद्र धारण केलेला . सर्व देवांमध्ये अत्यंत रूपवान् म्हणून प्रसिद्ध असलेला चन्द्र दैवयोगाने दुर्बुद्धियुक्त होऊन गणेशाचे गजवक्त्रयुक्त स्वरूप पाहून उपहासबुद्धीने हसू लागला . त्या उपहासाचा परिणाम लागलीच त्याच्या प्रत्ययास आला . अत्यंत क्रुद्ध गणेशाने तत्काळ त्याला शाप दिला . ‘ अरे दुरभिमानी चंद्रा ! यापुढे तुझे तेज नष्ट होईल . तू कुरूप होशील अन् तुला जे पाहतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल .’ चंद्राचे तेज नष्ट झाले . तो कुरूप झाला . इतरांना तोंड दाखविण्याची त्याला लाज वाटू लागली . समुद्रकिनार्यावरच्या वाळूत तोंड खुपसून तो बसला . तोंड काळे करून जीवन कंठण्याचा त्याला कंटाळा आला . त्याची पत्नी रोहिणी हिच्या सांगण्यावरून त्याने ओंकारगणेशाची आराधना सुरू केली . ओंकारगणेश प्रसन्न झाले . चंद्राच्या याचनेवरून ‘ भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी लोक माझी प्रतिष्ठापना करतील मात्र रात्री जे तुझ्याकडे पाहतील त्यांच्यावर संकटे येतील . त्यांच्यावर मात्र चोरीचा आळ येईल . आणि एरव्ही दरमहा शुक्ल द्वितीयेला जे तुझे दर्शन घेतील त्यांची संकटे दूर होतील . शिवाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या पूजेची सांगता तुला अर्घ्य देण्याने व तुझ्या पूजनाने होईल व तुझ्या दर्शनानंतर जे उपवास सोडतील त्यांनाच या व्रताचे फळ मिळेल ’ असा वर दिला . गणेशाच्या भाली द्वितीयेची चंद्रकोर असते म्हणून तो ‘ भालचन्द्र ’!
गोदावरीच्या तीरावर भालचंद्र गणेशाचे गंगामासले हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे . मनमाड - काचीगुडा या रेल्वेमार्गावर सेलू नावाच्या स्टेशनपासून सुमारे बावीस कि . मी . अंतरावर हे गणेशक्षेत्र असून एकवीस पुराणोक्त गणपतीपैकी हे एक स्थान आहे .
१०८ ) चतुर्भुज --- चार हात असणारा . सामान्य जीवांपेक्षा अधिक क्षमता , शक्ती असणारा . पाशांकुश व परशू धारण करणारे दोन हात दुष्टनिर्दालन करणारे तर मोदक व वरदहस्त सज्जनांना संतोष देणारे . द्वापर युगात भगवंतांनी गजाननावतार धारण केला तेव्हा गणेश चतुर्भुज होता . चार पदार्थांची स्थापना करणारा . म्हणजे स्वर्गामध्ये देवांनी राहावे . मृत्युलोकात मनुष्यांनी राहावे व पाताळात दैत्यादिकांनी राहावे अशी मर्यादा ठरविणारा , अर्थात् त्यांचा स्थापक आणि या मर्यादेप्रमाणे वागणारांचे रक्षण करून विरुद्ध वागणारांना शिक्षा करणारा अशा अर्थी समग्र विश्वाधार अशा तत्त्वाची स्थितिस्थापना करणारा म्हणून चतुर्विधत्व स्थापक अशी विशेष सत्ता प्रकाशित करणारा एक अवतार . दैत्यांची माता जी दिती , तिने तपोबलाने प्रसन्न करून घेऊन वरदान मागितल्यावरून श्रीगणराजप्रभूंनी तिच्या घरी अवतार धारण केला . तोच ‘ चतुर्भुज ’ नामा गणेशाचा अवतार !
एकदा विष्णु आदी देवांनी दैत्यांना जिंकले . विश्वातील समस्त दैत्यांचा नाश करावयाचा या निश्चयाने देवांनी त्यांचा संहार चालू केला . तेव्हा ती सर्व दैत्यमंडळी दितीला शरण गेली . दिती अत्यंत दुःखी झाली . विश्वमर्यादेचा भंग व दितीची दुःखाकुलता यांमुळे तिचा पुत्र प्रभु चतुर्भुज गणेश क्रुद्ध झाला . त्याने देवांच्या नाशासाठी आपला परशू सोडून दिला . त्या दिव्य शस्त्राच्या अमोघ तेजामुळे समस्त देव अगदी होरपळून गेले तेव्हा सर्व देव चतुर्भुजास शरण आले व नानाप्रकारे स्तवन करून क्षमा मागू लागले . तेव्हा परशू शांत झाला . गणेश प्रसन्न झाले . सर्वांना आपापल्या स्थानी राहून . आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मर्यादा ठरवून देणारा हा ‘ चतुर्भुज ’ अवतार .
१०९ ) योगाधिप --- योगाच्या आरंभी व अंती ज्याची सत्ता चालते तो . योगारंभी मूलाधारचक्रात तर अंती सहस्रार चक्रातही गणेशज्ञान होते . गाणपत्य सांप्रदयात श्रीगणेशवर्णन - ‘ सहस्रारे पद्मे हिमशशिनिभे कर्णिकामध्यदेशे ’ असेच येते . अठ्ठावीस योगाचार्यरूप . ( श्वेत , सुतार , मदन , सुहोत्र , कंकण , लोगाक्षी , जैगीषव्य , दधिवादन . ऋषभ , मुनी , उग्र , अत्री , सुबलाक , गौतम , वेदशीर्ष , गोकर्ण , गुप्तपासी , शिखंडभृत , जटामाली , अट्टहास , दारुक , लांगली , महाकायमुनी , शूली , मुंडीश्वर , सहिष्णू , सोमशर्मा आणि नकुलीश हे २८ योगाचार्य होत .) ( शिवमहापुराण वायवीय संहिता )
११० ) तारकस्थ --- तारक असलेल्या प्रणव मन्त्रात विद्यमान असणारा . तेजतत्त्वाने तारकांमध्ये असणारा .
१११ ) पुरुष --- पुर म्हणजे शरीर . समस्त शरीरात साक्षित्वाने राहणारा .
११२ ) गजकर्णक --- ज्याचे कान हत्तीच्या कानासारखे विशाल आहेत असा . गज म्हणजे निर्गुण . निर्गुणस्तुतीचे जो श्रवण करतो तो .