गणाधिराज : विजयस्थिर : गजपतिर्ध्वजी ।
देवदेव : स्मरप्राणदीपक : वायुकीलक : ॥२१॥
११३ ) गणाधिराज --- गणांचा अधिराज . पद्यातील म , य , र , स इत्यादी गणांमध्ये विराजमान असणारा .
११४ ) विजयस्थिर --- कायम विजयी होणारा . भक्तांच्या विजयामध्ये स्थिर ( निश्चित ) असणारा .
११५ ) गजपतिध्वजी --- ध्वजावर गजश्रेष्ठाचे चिन्ह असणारा .
११६ ) देवदेव --- देवांचाही देव . देवांचाही देव असणार्या इंद्रादी देवांकडून ज्याची उपासना केली जाते तो .
११७ ) स्मरप्राणदीपक --- मदनाचा प्राणरूप असणारा . शंकराने जाळल्यावर ज्याच्या कृपेने अनंगाला म्हणजे अंगरहित मदनाला अस्तित्व प्राप्त झाले तो .
११८ ) वायुकीलक --- नवद्वार देहात ( दोन डोळे , दोन कान , दोन नाकपुडया , तोंड , गुदद्वार आणि मूत्रद्वार ) प्राणांचे स्तंभन करणारा . ज्याच्या कृपेने प्राण - अपानांचे स्तंभन होऊन प्राणवायू अन्तरात्म्यात विलीन होतो तो .
विपश्चित् - वरद : नाद - उन्नाद - भिन्न - बलाहक : ।
वराह - रदन : मृत्युजय : व्याघ्र - अजिन - अम्बर : ॥२२॥
११९ ) विपश्चिद्वरद --- राजा विपश्चिदास चतुर्वर्गांचा ( धर्म - अर्थ - काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ) वर देणारा . विपश्चित् म्हणजे विद्वान , ज्ञानी ; अशा माणसास वर देणारा .
१२० ) नादोन्नादभिन्नबलाहक --- बलाहक म्हणजे मेघ . आपल्या मंद आणि उच्च नादघोषाने मेघांना छिन्नभिन्न करणारा . मेघ हे आवरणाचे प्रतीक . मेघाने सूर्य़ आच्छादला जावा तसे अज्ञानाने , अविद्येने , मायेने आत्मतत्त्व झाकले जाते . ते मायापटल उध्वस्त करणारा किंवा बलाहकदैत्याचा नाश करणारा .
१२१ ) वराहरदन --- महावराहाच्या दाताप्रमाणे दात असणारा .
१२२ ) मृत्युञ्जय --- काळावर विजय मिळवणारा .
१२३ ) व्याघ्राजिनाम्बर --- वाघाचे कातडे धारण करणारा .
इच्छा - शक्ति - धर : देव - त्राता दैत्य - विमर्दन : ।
शम्भु - वक्त्र - उद्भव : शम्भुकोपहा शम्भुहास्यभू : ॥२३॥
१२४ ) इच्छाशक्तिधर --- जगत्सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाल्यावर इच्छेप्रमाणे शक्ती धारण करणारा .
१२५ ) देवत्राता --- देवांचे दैत्यभयापासून रक्षण करणारा .
१२६ ) दैत्यविमर्दन --- दैत्यांचे पारिपत्य करणारा .
१२७ ) शम्भुवक्त्रोद्भव --- श्रीशंकरांना श्रीगणेशज्ञान प्रथम झाले . वक्त्र म्हणजे . मुख . शम्भुमुखातून प्रकट झालेला .
१२८ ) शम्भुकोपहा --- आपल्या बाललीलांनी शंकराचा क्रोध हरण करणारा .
१२९ ) शम्भुहास्यभू --- आपल्या खटयाळपणाने शंकरास हसविणारा .
शम्भुतेजा : शिवा - शोक - हारी गौरीसुखावह : ।
उमा - अङ्ग - मलज : गौरीतेजोभू : स्वर्धुनीभव : ॥२४॥
१३० ) शम्भुतेजा --- कल्याणकारी तेजाने युक्त . शंकराच्या तेजापासून उत्पन्न झालेला . किंवा शंकराप्रमाणे तेजस्वी .
१३१ ) शिवाशोकहारी --- पार्वतीच्या शोकाचे निरसन करणारा .
१३२ ) गौरीसुखावह --- तपस्या करणार्या पार्वतीस सुख देणारा .
१३३ ) उमाङ्गमलज --- पार्वतीच्या अंगावरील मळापासून निर्माण झालेला किंवा पार्वती म्हणजे बुद्धी किंवा वृत्ती . त्यावर साचलेला अहंता आणि ममतारूप मळ दूर झाल्यावर प्रकट झालेला .
१३४ ) गौरीतेजोभू --- गौरीच्या तेजापासून उत्पन्न झालेला .
१३५ ) स्वर्धुनीभव --- स्वर्धुनी म्हणजे गंगा , तिच्या उत्पत्तीस कारणीभूत झालेला किंवा ज्याला प्रदक्षिणा घालताना पायाच्या धक्याने कमंडलू उडून त्या स्वर्गीय जलाने ब्रह्मकमंडलू नामक श्रीमोरेश्वरीची कर्हा नदी प्रकटली असा तो .
यज्ञकाय : महानाद : गिरिवर्ष्मा शुभानन : ।
सर्वात्मा सर्वदेवात्मा ब्रह्ममूर्धा ककुप्श्रुति : ॥२५॥
१३६ ) यज्ञकाय --- यज्ञ हेच ज्याचे शरीर आहे असा . यज्ञस्वरूप .
१३७ ) महानाद --- उच्च स्वरात गर्जना करणारा . उच्च स्वरात वषट्श्रौषट्कार ( आहुती देताना करावयाचे उच्चार ) ऐकविणारा .
१३८ ) गिरिवर्ष्मा --- पर्वतरूपी शरीर धारण करणारा . ( गणपतिपुळ्याचा संपूर्ण पर्वतच गणेशस्वरूप आहे . म्हणून त्याच्या स्तोत्रात ‘ गिरिवर्ष्मवन्तम् ’ असे त्या गणेशाचे एक नाव येते .) वर्ष्म = शरीर
१३९ ) शुभानन --- आनन म्हणजे मुख . ज्याचे मुख शुभ म्हणजे जो शुभदर्शन आहे असा .
१४० ) सर्वात्मा --- सर्व चराचराचा आत्मा .
१४१ ) सर्वदेवात्मा --- सर्व देवांचा आत्मा .
१४२ ) ब्रह्ममूर्धा --- ब्रह्म हेच ज्याचे मस्तक आहे असा .
१४३ ) ककुप्श्रुनि --- ककुप् म्हणजे दिशा आणि श्रुति : म्हणजे कान . दिशा हेच ज्याचे कान आहेत असा .
ब्रह्माण्ड - कुम्भ : चिद् - व्योम - भाल : सत्यशिरोरुह : ।
जगत् - जन्म - लय - उन्मेष - निमेष : अग्नि - अर्क - सोम - दृक् ॥२६॥
१४४ ) ब्रह्माण्डकुम्भ --- हत्तीच्या मस्तकावरील उंचवंटयांना कुंभ म्हणतात . परिपूर्ण ब्रह्माण्डच ज्याचे कुंभ आहेत तो .
१४५ ) चिद्व्योमभाल --- चिन्मय असे आकाश ( चिदाकाश ) हेच ज्याचे भाल अथवा कपाळ आहे .
१४६ ) सत्यशिरोरुह --- सत्यलोक ( चतुर्दशभुवनातील सर्वात वरचा लोक ) हेच ज्याचे शिरोरुह म्हणजे केस आहेत असा .
१४७ ) जगज्जन्मलयोन्मेषनिमेष --- जगत् - जन्म - लय - उन्मेष - निमेष : उन्मेष म्हणजे डोळे उघडणे आणि निमेष म्हणजे डोळे मिटणे . ज्याने डोळे उघडताच जगताचा जन्म होतो आणि डोळे मिटताच जगाचा लय होतो असा तो .
१४८ ) अग्न्यर्कसोमदृक् --- अग्नी , सूर्य ( अर्क ) व चंद्र ( सोम ) हे ज्याचे डोळे आहेत असा .
गिरीन्द्र - एकरदः धर्म - अधर्म - ओष्ठः सामबृंहितः ।
गिरीन्द्र - एकरद : वाणीजिह्व : वासवनासिक : ॥२७॥
१४९ ) गिरीन्द्रैकरद --- गिरीन्द्र म्हणजे मेरूपर्वत किंवा हिमालय हाच ज्याचा एक दात आहे असा .
१५० ) धर्माधर्मोष्ठ --- धर्म आणि अधर्म हे ज्याचे दोन ओठ आहेत . ज्याच्या वाणीतून धर्म आणि अधर्म स्पष्ट होतात तो .
१५१ ) सामबृंहित --- सामवेदरूप गर्जना करणारा . सामवेदाचा उच्चार हीच ज्याची गर्जना आहे . सामांनी वाढणारा .
१५२ ) ग्रहर्क्षदशन --- ग्रह , नक्षत्रे हे ज्याचे दात आहेत .
१५३ ) वाणीजिह्व --- परा , पश्यन्ती , मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणी हीच ज्याची जीभ आहे . पुराण - न्याय - मीमांसा - अथर्ववेद - ऋग्वेद - यजुर्वेद ज्याच्या जिभेवर आहेत असा .
१५४ ) वासवनासिक --- वासव म्हणजे इन्द्र . इन्द्र हेच ज्याचे नाक आहे .
कुलाचलांस : सोमार्कघण्ट : रुद्रशिरोधर : ।
नदीनदभुज : सर्प - अङ्गुलीक : तारकानख : ॥२८॥
१५५ ) कुलाचलांस --- महेन्द्र , मलय , सह्य , शुक्तिमान् , ऋक्ष , विन्ध्य आणि परित्राय हे पर्वतकुल ज्याचे खांदे आहेत . असा तो . ( असं म्हणजे खांदे )
१५६ ) मोमार्कघण्ट --- चन्द्र व सूर्य ज्याच्या खांद्यावरील घण्टास्वरूप आहेत असा .
१५७ ) रुद्रशिरोधर --- शिरोधरा म्हणजे मान . रुद्र हीच ज्याची मान असा तो .
१५८ ) नदीनदभुज --- गंगादी नद्या व शोणभद्रसारखे नद ( मोठी नदी ) हे ज्याच्या भुजा आहेत .
१५९ ) सर्पाङ्गुलीक --- शेष आदि नाग ज्याची बोटे आहेत असा तो .
१६० ) तारकानख --- स्वयंप्रकाशी तारका ही याची नखे आहेत असा .
भ्रमध्य़संस्थितकर : ब्रह्मविद्यामदोत्कट : ।
व्योमनाभि : श्रीहृदय : मेरूपृष्ठ ; अर्णव - उदर : ॥२९॥
१६१ ) भूमध्यसंस्थितकर --- भुवयांच्या मध्यभागी ज्याची सोंड आहे असा .
१६२ ) ब्रह्मविद्यामदोत्कट --- ब्रह्मविद्यारूपी मदस्रावाने ज्याचे गंडस्थल ओसंडून वाहत आहे असा .
१६३ ) व्योमनाभि --- आकाश हेच ज्याचे नाभिस्थान आहे .
१६४ ) श्रीहृदय --- ऋग्वेद - यजुर्वेद - सामवेद या वेदत्रयीला श्री असे म्हणतात . ही वेदत्रयी ज्याचे हृदय आहे असा . श्री : किंवा लक्ष्मी .
१६५ ) मेरुपृष्ठ --- सुमेरुपर्वत ही ज्याची पाठ आहे असा .
१६६ ) अर्णवोदर --- ज्याच्या उदरात सर्व समुद्र सामावले आहेत असा तो . ( अर्णव = समुद्र ) समुद्र हे उदर असणारा .
कुक्षिस्थ - यक्ष - गन्धर्व - रक्ष : किन्नरमानुष : ।
पृथ्वीकटि : सृष्टिलिङ्ग : शैलोरु : दस्र - जानुक : ॥३०॥
१६७ ) कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्ष : किन्नरमानुष --- यक्ष - गन्धर्व - राक्षस - किन्नर आणि मनुष्य इ . जीव ज्याच्या कुशील विसावले आहेत . ( अप्सरा - गंधर्व - यक्ष - राक्षस - किन्नर - पिशाच - गुह्यक आणि सिद्ध ह्या देवयोनी आहेत )
१६८ ) पृथ्वीकटि --- पृथ्वी ही ज्याची कंबर आहे असा तो .
१६९ ) सृष्टिलिङ्ग --- सृष्टी हे ज्याचे लिंग आहे किंवा ज्याच्या जननेंद्रियस्थानी सर्व प्रजा आहे .
१७० ) शैलोरू --- पर्वत हे ज्याच्या मांडया आहेत . ( शैल = पर्वत , ऊरू = मांडया )
१७१ ) दस्रजानुक --- अश्विनीकुमार हेच ज्याचे गुडघे आहेत . ( अश्विनीकुमार म्हणजे अश्चिनौ . हे एक देवतायुम्म आहे . हे देव नेहमी जोडीनेच असतात . हे देवांचे कुशल वैद्य आहेत . ते शक्तिशाली व चपळ आहेत . ‘ द्स्रा ’ हे त्यांचे विशेषण आहे . दस्रा म्हणजे चमत्कार करणारे , विपत्तींमधून प्राणिमात्रांचा उद्धार करणे हे त्यांचे प्रधानकार्य आहे . कोणत्याही प्रकारच्या अपघात प्रसंगी हे दोघे प्राण वाचविण्यासाठी धावून जातात . ते सर्वत्रसंचारी आहेत .) जानु = गुडघा .