मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ८१ ते ९०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ८१ ते ९०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


ओंकारवाच्य : ओंकार : ओजस्वान्‌ ओषधीपति : ।

औदार्यनिधि : औद्धत्यधुर्य : औन्नत्य - निस्स्वन : ॥८१॥

४२६ ) ओंकारवाच्या --- ओंकार अर्थात प्रणवाचे वाच्यार्थ रूप असणारा .

४२७ ) ओंकार --- ओंकारस्वरूप परब्रह्म . गणपती म्हणजे शब्दब्रह्म जो ॐ कार त्याचे प्रतीक होय . सृष्टीचा हा आदिकंद . परब्रह्याचे हे पहिले व्यक्त स्वरूप . यातील परब्रह्मापासून शुभारंभी गगन उत्पन्न झाले आणि त्यातून एकाक्षरी मंत्राचा नाद सर्वत्र घुमला . तो हा एकाक्षरी मंत्र म्हणजे ‘ ॐ ’ आकाशातून ॐ हा मंत्रनाद घुमल्यावर त्या ॐ काराच्या मनामध्ये सृष्टी निर्माण करावी असे आले . ओंकाराने या सृष्टीच्या उत्पत्ति - स्थिति - लयाचे कार्य अनुक्रमे ब्रह्मदेव - विष्णू आणि शंकरांवर सोपविले . पण सृष्टीची उत्पत्ति करायची म्हणजे नेमके काय करायचे असा प्रश्न ब्रह्मदेवाने ॐ कारासमोर मांडला . तेव्हा ओंकाराने ब्रह्मदेवाला आपल्या श्वासनलिकेतून आपल्या लंबोदरात आणून सोडले तेव्हा अनन्त ब्रह्माण्डातील चराचर सृष्टीचे दर्शन त्याला झाले . परंतु ते विराट दर्शन असह्य होऊन ब्रह्मदेवाने आपल्याला बाहेर काढावयास सांगितले . ॐ काराने त्याला उदरातुन बाहेर काढले . तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले - ‘ हे ओंकारा , तुम्ही मला मार्गदर्शन केले तर मी नक्की सृष्टी उत्पन्न करू शकेन असा मला गाढ आत्मविश्वास आहे .’ आपण अगदी सहज सृष्टी निर्माण करू शकतो असा गर्व ब्रह्मदेवाच्या मनात उत्पन्न झाला . त्यासाठी ॐ काराच्या मार्गदर्शनाची काही आवश्यकता नाही असा काही काळानंतर त्याच्या मनात ताठा निर्माण झाला . हे ॐ काराच्या लक्षात आले . त्याने आपल्या अद्‌भुत शक्तीने ब्रह्मदेव जेथे सृष्टी निर्माण करायला गेला होता तो हजारो मैलांचा आसमंत जलमय करून टाकला . प्रचंड खोली आणि व्याप्ती असलेल्या जलाशयात एकच एक वटवृक्ष मात्र ताठ उभा होता - अक्षयवट . त्याचे एक पान खाली पडले आणि जलाशयावर तरंगू लागले . त्या पानावर एक लहान बालक दिसू लागले . त्याला सुंदरशी सोंड होती . त्यातून एक दात दिसत होता . त्याला चार हात होते . त्याच्या डोक्यावर रत्नमुकुट होता . गळ्यात मोत्याची माळ होती . कपाळावर चंद्रकोर होती . त्या प्रचंड महासागरात वटपत्रावर पहुडलेले त्याचे रूप दिसताच ब्रह्मदेवाला या बाल ॐ काराच्या सामर्थ्याची कल्पना आली . तो नतमस्तक झाला . तेव्हा आकाशवाणी झाली - ‘ ब्रह्मदेवा , मनात ताठा निर्माण होणे हे कोणत्याही कार्यातील पहिले विघ्न असते . एकाक्षरी ॐ मंत्राने तुझे हे विघ्न दूर होईल .’ ब्रह्मदेवाने जलाशयात उभे राहून ॐ मंत्राचा जप सूरू केला . ते अनुष्ठान पूर्ण होताच तेथे प्र - याग म्हणजे मोठा याग सुरू केला . तो गणेशयाग होता . तेव्हा ब्रह्मदेवांपुढे ॐ कार गणेश येऊन उभा राहीला . ॐ कार स्वरूप गणेशाची ब्रह्मदेवांनी पूजा केली व दक्षिणा म्हणून ऋद्धी व सिद्धी या आपल्या दोन लाडक्या कन्या ॐ काराला दिल्या . त्यांचा विवाह लावून दिला . ॐ कार गणेश सिद्धिबुद्धिंसहित अंतर्धान पावला . हे क्षेत्र प्रयाग येथे अक्षयवटानजीक प्रतीकात्मक स्वरूपात आहे . हात तो ‘ ॐ कार ’ गणेश !

४२८ ) ओजस्वान्‌ :-- तेजस्वी आणि बलवान्‌ .

४२९ ) ओषधीपति --- ओषधी म्हणजे एकदा फळ येऊन गेल्यावर मरणारी वनस्पती म्हणजे धान्यांची पिके . पिकांचा पालनकर्ता . चंद्राची किरणे वनस्पतींना अमृतमय करतात म्हणून चंद्र हा ओषधीपती मानला जातो म्हणून चन्द्ररूप असलेला .

४३० ) औदार्यनिधि --- उदारतेचा सागर .

४३१ ) औद्धत्यधुर्य --- साहसकार्याची जबाबदारी घेणारा . भक्तांनी अंगीकारलेल्या साहसकार्याची जबाबादारी स्वत : हून पेलणारा .

४३२ ) औन्नत्यनिस्स्वन --- सर्वाधिक उन्नत ध्वनि करणारा . सर्वश्रेष्ठ आवाज असणारा . अन्तिमशब्दरूप .

अङ्कुश : सुरनागानाम्‌ अङ्कुश : सुरविद्विषाम्‌ ।

अ : समस्त - विसर्गान्त - पदेषु परिकीर्तित : ॥८२॥

४३३ ) सुरनागानाम्‌ अङ्कुश --- देवगजांचा अंकुश . सुर म्हणजे देव . नाग म्हणजे हत्ती . अंकुशाचे एक काम म्हणजे दिशादर्शन आहे . देवांना दिशा दाखविणारा .

४३४ ) सुरविद्विषाम्‌ अङ्कुश --- सुरविद्विष म्हणजे दैत्य . दैत्यांवर नियंत्रण ठेवणारा . किंवा देव व विद्वानांचा द्वेष करणार्‍यांना दण्डित करणारा .

४३५ ) अ : समस्तविसर्गान्तपदेषु परिकीर्तित --- अकार ते ज्ञकार असे विसर्गान्त असे ५१ वर्णस्वरूप असलेला .

कमण्डलुधर : कल्प : कपर्दी कलभ - आनन : ।

कर्मसाक्षी कर्मकर्ता कर्म - अकर्म - फलप्रद : ॥८३॥

४३६ ) कमण्डलुधर --- कमण्डलु धारण करणारा . सोंडेत अमृतकलश धारण करणारा .

४३७ ) कल्प --- प्रलयकालस्वरूप किंवा निर्माणात समर्थ .

४३८ ) कपर्दी --- कवडी अथवा जटाजूट धारण करणारा .

४३९ ) कलभानन --- कलभ म्हणजे हत्तीचे पिल्लू त्याच्यासारखे मुखं असणारा किंवा कल म्हणजे मंजुळ नाद . भा म्हणजे कान्ती , तेज . अनन म्हणजे प्राण . नाद - कान्ती व प्राणशक्तिंनी संपन्न असलेला .

४४० ) कर्मसाक्षी --- दृष्ट व अदृष्ट कर्मे पाहणारा .

४४१ ) कर्मकर्ता --- कर्म करणारा . कर्ता करविता . कर्म तडीस नेणार्‍यास प्रेरणा देणारा .

४४२ ) कर्माकर्मफलप्रद --- कर्म व अकर्माचे फळ देणारा .

कदम्बगोलकाकार : कूष्माण्डगण - नायक : ।

कारुण्यदेह : कपिल : कथक : कटिसूत्रभृत्‌ ॥८४॥

४४३ ) कदम्बगोलकाकार --- मूलाधारचक्राच्या अधोभागी स्थित , कदम्बवृक्षाच्या फळाप्रमाणे गोलाकार कन्द - सर्व नाडयांचे उगमस्थान जे हृदयस्थ आत्मसंवेशित आहे . त्याची अधिष्ठात्री देवता असणारा .

४४४ ) कूष्माण्डनायक ---‘ कूष्माण्ड ’ नामक दुष्ट ग्रहांचा नायक किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा .

४४५ ) कारुण्यदेह --- करुणामूर्ती .

४४६ ) कपिल --- कपिलमुनिस्वरूप . अजिंक्य व अवध्य असलेल्या शंखासुराचा नाश होत नाही असा निरूपाय झाल्यावर ब्रह्मदेव शंकरांकडे गेले . शंखासुराचा मृत्यू विष्णूच्या हातून होण्याचे ठरलेले होते . पण शंखासुराचा बंधु कमलासुर अतिप्रबळ व अवध्य असल्यामुळे शंखासुर अजिंक्य ठरत होता . शंकरांना शंखासुराचा वध करण्याविषयी विनविले . शंकरही भम्रात पडले . काय करावे काही सुचेना म्हणून त्यांनी श्रीगणराजप्रभूंचे ध्यान केले . तशाच स्थितीत चिंतामग्न असलेल्या शिवांचा जो श्वास साहजिकपणे बाहेर पडला त्याचवेळी त्यांचा अंत : साक्षी असलेला अंतरात्मा श्रीगणराजप्रभू त्यांच्या त्या नि : श्वासापासून अवतीर्ण झाले . शंखासुराने ब्रह्मदेवाजवळील समग्र वेदांचे हरण केले होते . सर्वत्र वैदिक ज्ञानसता लोप पावली होती . कपिलांच्या दर्शनाबरोबर सर्वांच्या अंत : करणात वेद प्रकाशित झाले . सर्वत्र वेदविद्यादिकांची समृद्धी झाली . सर्व देवांनाही अवध्य असलेल्या कमलासुराचा नाशही कपिलांनीच केला .

कपिलावतारामध्ये श्रीगणराजप्रभूंचे त्रिगुणातीतत्वसूचक ऐश्वर्य तर स्पष्ट होतेच त्याचबरोबर वेदादिविद्याप्रकाशकत्व आणि विष्णूच्या कार्यसिद्धीचे मूलभूतव्य सत्तादायकत्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते .

४४७ ) कथळ --- कानात उपदेश करणारा . ( संप्रदायप्रवर्तक ). वक्त्ता .

४४८ ) कटिसूत्रभृत्‌ --- कटिसूत्रधारक . रत्नखचित सुवर्णाचा कमरपट्टा धारण करणारा .

खर्व : खड्‌गप्रिय : खड्‌गखान्तान्त : स्थ : खनिर्मल : ।

खल्वाट - शृङ्ग - निलय : खट्‌वाङ्गी ख - दुरासद : ॥८५॥

४४९ ) खर्व --- वामनरूप . ( वामनरूपत्वात्‌ खड्‍ग : गण्डकसंज्ञक :)

४५० ) खड्‌गप्रिय --- खडग म्हणजे तलवार . ज्याला तलवार प्रिय आहे असा .

४५१ ) खड्‌गखान्तान्तस्थ --- गणेशबीज ‘ गं ’ आहे . खडग शब्दात ते शेवती आहे . या अर्थी खडगान्ती असणारा . सर्व विनाशाअंतीसुद्धा अस्तित्वभाव . बीजामध्ये राहणारा .

४५२ ) खनिर्मल --- आकाशाप्रमाणे निर्मल निर्लेप .

४५३ ) खल्वाटशृंगनिलय --- वृक्ष हे पर्वताचे केस . वृक्षविहीन . ओसाड पर्वतारवती राहणारा . ( खल्वाट = टक्कल )

४५४ ) खट्‌वाङ्गी --- खटवाङ्गनामक अस्त्र बाळगणारा . ( बाजेच्या खुरासारखे आयुध बाळगणारा .

४५५ ) खदुरासद --- आकाशाप्रमाणे हाताच्या पकडीत न येणारा . अमूर्त .

गुणाढय : गहन : गस्थ : गद्य - पद्य - सुधा - अर्णव : ।

गद्य - गानप्रिय : गर्ज : तीत - गीर्वाण - पूर्वज : ॥८६॥

४५६ ) गुणाढय --- आढय म्हणजे युक्त , संपन्न . गुणांनी संपन्न असणारा .

४५७ ) गहन --- गूढ . ज्याच्या यथार्थरूपांपर्यंत पोहोचणे कठीणतम .

४५८ ) गस्थ ---‘ ग ’ काररूप बीजाक्षरात स्थित . नाभिस्थानी कुंडलाकार गुंडाळी मारून बसलेली कुंडलिनी मेरूपृष्ठातून चढू लागते तेव्हा तिचा आकार गकारच असतो . त्या कुंडलीतून जागृत होणारा .

४५९ ) गद्यपद्यसुधार्णव --- गद्य व पद्य या साहित्यप्रकारांचा सागर .

४६० ) गद्यगानप्रिय --- पठनयोग्य ते गद्य . ते गाऊन पठण करणे या सामगानाची आवड असणारा .

४६१ ) गर्ज --- मेघगर्जनास्वरूप किंवा समुद्रगर्जनास्वरूप .

४६२ ) गीतगीर्वाणपूर्वज --- गीत आणि गीर्वाण म्हणजे देव यांचा पूर्वज . नादामुळे गीत आदी शब्द प्रकट झाले व नादाच्या अर्थाने देवता . म्हणून नाद आणि नादार्थस्वरूप होण्याच्या कारणामुळे गीत आणि देवतांचा ( गीर्वाण ) पूर्वज असलेला .

गुह्याचार - रत : गुह्य : गुह्यागम - निरूपित : ।

गुहाशय : गुहाब्धिस्थ : गुरुगम्य : गुरो : गुरु : ॥८७॥

४६३ ) गुह्याचाररत --- चैतन्यरूप आत्मा . ह्रदयरूपी गुहेत राहणारा तो गुह्य . अंतर्मुख होऊन या गुह्य आत्मतत्त्व चिंतनात रमून जाणारा .

४६४ ) गुह्या --- एकान्ती जाणला जाऊ शकणारा . अतिगुह्य असे गहनतत्त्वरूप .

४६५ ) गुह्यागमनिरूपित --- तन्त्रांनी ज्याचे रहस्य कथन केले आहे असा . गुह्य आगमतंत्राने निरूपित असा .

४६६ ) गुहाशय --- हृदय गुहेत शयन करणारा . ह्रदयस्थ परमात्मा .

४६७ ) गुहब्धिस्थ --- अगाध , अव्याकृत , गूढ अशा ह्रदयातील आकाशास ‘ गुहाब्धि ’ म्हणतात . तेथे राहणारा .

४६८ ) गुरुगम्य --- गुरुपदेशाने कळणारा .

४६९ ) गुरोर्गुरू --- ब्रहम्यालाही वेद शिकविणारा . शिवसूत्रात गुरुरूप म्हणून वर्णिलेला .

घण्टा - घर्घरिका - माली घटकुम्भ : घटोदर : ।

चण्ड - चण्डेश्वरसुहत्‌ चण्डीश : चण्डविक्रम : ॥८८॥

४७० ) घण्टाघर्घरिकामाली --- घंटा , किंकिणी यांच्या माळांनी बालरूपात क्रीड करणारा .

४७१ ) घटकुम्भ --- घटाप्रमाणे मस्तकावरील विशाल गंडस्थळे असणारा .

४७२ ) घटोदर --- घटाप्रमाणे विशाल उदर असणारा .

४७३ ) चण्ड --- महापराक्रमी . भयंकर .

४७४ ) चण्डेश्वरसुहृत्‌ --- शिवसखा

४७५ ) चण्डीश --- चण्डीनाथ शिव किंवा पार्वतीचा लाडका

४७६ ) चण्डविक्रम --- अत्यंत रागीट अशा चण्डेश्वर . चण्डेश्वरसखा , चण्डीश प्रभृति चण्डगणांना परास्त करून ताब्यात ठेवणारा . ज्याचा पराक्रम चंड म्हणजे प्रचंड आहे असा .

चराचरपति : चिन्तामणि - चर्वण - लालस : ।

छन्त : छन्दोवपु : छन्दोदुर्लक्ष्य : छन्दविग्रह : ॥८९॥

४७७ ) चराचरपति --- स्थावर आणि जंगम जगताचा स्वामी .

४७८ ) चिन्तामणिचर्वणलालस --- इच्छिलेले सर्व सहजपणे देणारा - एवढे की चिन्तामणी . कामधेनू . कल्पद्रुम यांनाही तितके देता येत नाही . त्यांचा गर्व ( चर्वण ) हरण करणारा .

४७९ ) छन्द --- गायत्री वगैरे छन्दरूप म्हणजे वेदरूप .

४८० ) छ्न्दोवपु --- छन्दोमय शरीर ( वपु :) धारण करणारा .

४८१ ) छन्दोदुर्लक्ष्य --- वेदांनाही ज्याचा अर्थ पूर्वत : आकलन होत नाही असा .

४८२ ) छन्दविग्रह --- स्वेच्छेनुसार किंवा भक्तांच्या इच्छेप्रमाणे नाना शरीरे धारण करणारा .

जगद्‌ - योनि : जगत्‌साक्षी जगदीश : जगन्मय : ।

जप : जपपर : जप्य : जिह्‌वासिंहासनप्रभु : ॥९०॥

४८३ ) जगद्‍योनि --- जगताचे कारणस्वरूप . विश्वनिर्मितिस्थान .

४८४ ) जगत्‌साक्षी --- जगताचा साक्षी , द्रष्टा .

४८५ ) जगदीश --- जगताचा स्वामी . रक्षक , पालक .

४८६ ) जगन्मय --- जगत्‌स्वरूपात , नानारूपात नटलेला .

४८७ ) जप --- जपस्वरूप . नामस्मरणरूप .

४८८ ) जपपर --- जपकर्ता . जप करण्यात तत्पर .

४८९ ) जप्य --- ज्याचा जप . ज्याचे नामस्मरण करावे असा .

४९० ) जिह्‌वासिंहासनप्रभु --- नामस्मरण करणार्‍याच्या जिभेवर नेहमी विराजमान असणारा .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP