मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ३१ ते ४०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ३१ ते ४०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


१६७ ) कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्ष : किन्नरमानुष --- यक्ष - गन्धर्व - राक्षस - किन्नर आणि मनुष्य इ . जीव ज्याच्या कुशील विसावले आहेत . ( अप्सरा - गंधर्व - यक्ष - राक्षस - किन्नर - पिशाच - गुह्यक आणि सिद्ध ह्या देवयोनी आहेत )

१६८ ) पृथ्वीकटि --- पृथ्वी ही ज्याची कंबर आहे असा तो .

१६९ ) सृष्टिलिङ्ग --- सृष्टी हे ज्याचे लिंग आहे किंवा ज्याच्या जननेंद्रियस्थानी सर्व प्रजा आहे .

१७० ) शैलोरू --- पर्वत हे ज्याच्या मांडया आहेत . ( शैल = पर्वत , ऊरू = मांडया )

१७१ ) दस्रजानुक --- अश्विनीकुमार हेच ज्याचे गुडघे आहेत . ( अश्विनीकुमार म्हणजे अश्चिनौ . हे एक देवतायुम्म आहे . हे देव नेहमी जोडीनेच असतात . हे देवांचे कुशल वैद्य आहेत . ते शक्तिशाली व चपळ आहेत . ‘ द्स्रा ’ हे त्यांचे विशेषण आहे . दस्रा म्हणजे चमत्कार करणारे , विपत्तींमधून प्राणिमात्रांचा उद्धार करणे हे त्यांचे प्रधानकार्य आहे . कोणत्याही प्रकारच्या अपघात प्रसंगी हे दोघे प्राण वाचविण्यासाठी धावून जातात . ते सर्वत्रसंचारी आहेत .) जानु = गुडघा .

पातालजङ्घ : मुनिपात्‌ कालाङ्गुष्ठ : त्रयीतनु : ।

ज्योति :- मण्डल - लाङगूल : ह्रदय - आलान - निश्चल : ॥३१॥

१७२ ) पातालजङ्घ --- सप्तपाताल ह्याच ज्याच्या पोटर्‍या आहेत असा . ( अतल - वितल - सुतल - महातल - रसातल - तलातल व पाताल व पाताल हे सप्तपाताल )

१७३ ) मुनिपात्‌ --- चरणांची सेवा करण्यात तप्तर असे मुनी हेच ज्याचे चरण आहेत असा .

१७४ ) कालङ्गुष्ठ --- महाकालरूपी आंगठे धारण करणारा .

१७५ ) त्रयीतनु --- ऋग्वेद - यजुर्वेद - सामवेद ही वेदत्रयी ज्याचे शरीर आहे .

१७६ ) ज्योतिर्मण्डललाङ्गुल --- तारकामण्डल हे ज्याचे शेपूट किंवा शिश्न आहे किंवा शिशुमारसंज्ञक तारकासमूह हेच ज्याचे शेपूट किंवा शिश्न आहे असा .

१७७ ) हृदयालाननिश्चल --- भक्तांच्या ह्रदयात बांधला गेलेला . आलान म्हणजे हत्ती बांधण्याचा खांब .

हृत्‌ - पद्य - कर्णिका - शाली - वियत्‌ - केलि - सरोवर : ।

सद्‌भक्तध्याननिगड : पूजावारिनिवारित : ॥३२॥

१७८ ) हृत्पद्यकर्णिकाशालिवियत्‌केलिसरोवर --- ह्रदयकमल पुष्पाने सुशोभित दहराकाश ( ह्रदय ) हेच ज्याचे क्रीडासरोवर आहे असा किंवा ह्रदयातील कर्णिकांनी शोभणारा आणि आकाश हेच ज्याचे क्रीडा सरोवर आहे असा .

१७९ ) सद्‌भक्तध्याननिगड --- भक्तश्रेष्ठांच्या ध्यानात जो बंदिस्त राहतो तो . ( निगड म्हणजे हत्तीचा साखळदंड )

१८० ) पूजावारिनिवारित --- पूजेने आपलासा करून घेता येणारा . वारी = गजबन्धनशृङखला .

प्रतापी कश्यपसुत : गणप : विष्टपी बली ।

यशस्वी धार्मिक : स्वोजा : प्रथम : प्रथमेश्वर : ॥३३॥

१८१ ) प्रतापी --- अत्यंत पराक्रमी

१८२ ) कश्यपसुत --- देवान्तक आणि नरान्तक राक्षसांच्या संहारासाठी कृतयुगात महर्षी कश्यपांच्या घरी देवी अदितीच्या पोटी महोत्कट किंवा विनायक रूपात ज्याने जन्म घेतला होता असा तो . हिमालय म्हणजे सर्वात मोठा पर्वत . त्याच्या तीरावर वराहमूलम्‌ क्षेत्री कश्यप - अदिती यांचा आश्रम होता . तेथेच त्यांनी ॐ काराची आराधना केली . श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाले . त्यावर ‘ तू आमचा पुत्र म्हणून जन्म घे ’ अशी मनात असलेली महाउत्कंठा त्यांच्यापाशी व्यक्त केली . पुढे याच नंदनवनात कश्यप - अदितींचा नंदन म्हणून ॐ कारगणेशाने जन्म घेतला व त्यांना लागलेली महाउत्कंठा पूर्ण केली तोच हा ‘ कश्यपसुत ’ ‘ महोत्कट ’ गणेश होय .

त्यांचे ( श्रीगणेशांचे ) अवतारकार्य संपल्यावर कश्यप - अदितींचा प्रेमळ निरोप घेऊन ते गणेशलोकी परतले . त्यांच्या परत जाण्यामुळे कश्यप - अदिती खिन्न झाले तेव्हा देवर्षी नारदांनी महोत्कट गणेशमूर्तीची स्थापना करावयास सांगितली . त्यानुसार कश्यपांनी गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली . श्रीनगरनजीकच्या बारामुला येथे महोत्कटाची मूर्ती आहे ती हीच होय . मूर्ती चतुर्भुज - वामशुण्ड आणि शेंदूरचर्चित आहे .

तारकासुरवधप्रसंगी कुमारसंभवासाठी देवादिकांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये कामदेव सहभागी होता . त्यामुळे शंकरांच्या क्रोधाला निमित्तमात्र होऊन तो जळून भस्म झाला . त्यावेळी दैवयोगाने योग्य अशा बोधयोगाला प्राप्त होऊन त्याने रतीसहवर्तमान गणेशाचे आराधन केले व तो पूर्ववत्‌ वैभवाने संपन्न झाला . त्याने जेथे गणेशाचे आराधन केले ते ‘ महोत्कट ’ गणेशक्षेत्र नाशिकक्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे .

१८३ ) गणप --- अध्वर्यु आणि होता आदी गणांचा पालक . यज्ञकर्म करीत असताना ऋग्वेदाच्या ऋचांचा विनियोग करणार्‍याला होता म्हटले जाते . यजुर्वेदाच्या ययुस्‌ चा विनियोग करणारा तो अध्वर्यू . सामवेदाची सामे म्हणणारा तो उद्‌गाता आणि अथर्ववेदाचे मंत्र म्हणणारा तो ब्रह्मा . या प्रत्येकाचे पुन्हा तीन तीन सहकारी असत . ते असे - होत्याचे - मैत्रावरूण - अच्छावाक्‌ - ग्रावस्तुत हे तीन सहकारी . अध्वर्यूचे - प्रतिप्रस्थाता - नेष्टा - उन्नेता हे तीन सहकारी . उद्‌गात्याचे - प्रस्तोता - प्रतिहर्ता - सुब्रह्मण्यम्‌ हे तीन सहकारी तर ब्रहम्याचे - ब्राह्मणाच्छंसी - अग्नीध्र - पोता हे सहकारी . असे १६ ऋत्विज आणि सदस्य नावाचा १ ऋत्विज हे यज्ञावर देखरेख करणारे १७ प्रधान ऋत्विज असत . अशा अध्वर्य़ू आणि होता गणांचा पालक असणारा तो गणप .

१८४ ) विष्टपी --- विष्टप म्हणजे आधार . अनंतकोटी ब्रह्माण्डांचा आधार असलेला .

१८५ ) बली --- बलवान्‌ .

१८६ ) यशस्वी --- कीर्तिमान्‌ .

१८७ ) धार्मिक --- धर्म आचरणारा . धर्मवृद्धी करणारा .

१८८ ) स्वोजा --- तेजस्वी . अष्ट धातूंच्या ( सोने - रूपे - तांबे - कथील - शिसे - पितळ - लोखंड - तिखे पोलाद किंवा पारा हे अष्टधातू देवाने मिर्मिले आहेत असे असे मानले जाते .) तेजाने शोभायमान असा . स्वयंप्रकाशी .

१८९ ) प्रथम --- आद्य . सर्व मंगलकार्यांमध्ये ज्याची पूजा प्रथम केली जाते असा .

१९० ) प्रथमेश्वर --- ब्रह्म - विष्णू - महेशादिकांपूर्वीही ज्याचे पूजन केले जाते असा . देवांचाही आदिदेव .

चिन्तामणिद्वीपपति : कल्पद्रुमवनालय : ।

रत्नमण्डपमध्यस्थ : रत्नसिंहासनश्रय : ॥३४॥

१९१ ) चिन्तामणिद्वीपपति --- चिन्तिले ते क्षणात देणारा तो चिन्तामणी . अशा चिन्तामणिरत्नांच्या द्वीपाचा म्हणजे जणू काही बेटाचाच अधिपती .

१९२ ) कल्पद्रुमवनालय --- कल्पवृक्षांचे वन हेच ज्याचे निवासस्थान आहे असा .

१९३ ) रत्नमण्डपमध्यस्थ --- रत्नजडित मंडपात मध्यभागी विराजमान असलेला .

१९४ ) रत्नसिंहासनाश्रय --- रत्नजडित सिंहासनावर विराजमान असलेला .

तीव्राशिरोद्‌धृतपद : ज्वालिनीमौलिलालित : ।

नन्दा - नन्दित - पीठश्री : भोगदा - आभूषित - आसन : ॥३५॥

१९५ ) तीव्राशिरोद्‌धृतपद --- तीव्रा नामक पीठशक्तीने ज्याचे चरण आपल्या मस्तकावर धारण केले आहेत असा .

१९६ ) ज्वालिनीमौलिलालित --- ज्वालिनीनामक शक्तीने आपले मुकुटधारी मस्तक मोठया प्रेमाने ज्याच्या चरणांवर ठेवले आहे असा .

१९७ ) नन्दानन्दितपीठश्री --- नन्दा नामक शक्ती ज्याच्या पीठाच्या शोभेची आनंदाने स्तुती करीत आहे असा तो .

१९८ ) भोगदाभूषितासन --- ज्याचे सिंहासन भोगदा नामक शक्तीने सुशोभित केले आहे असा .

सकामदायिनीपीठ : स्फुरत्‌ - उग्रासन - आश्रय : ।

तेजोवतीशिरोरत्न : सत्य - अनित्य - अवतंसित : ॥३६॥

१९९ ) सकामदायिनीपीठ --- ज्याचे पीठ कामदायिनी शक्तीने अलंकृत केले आहे असा .

२०० ) स्फुरदुग्रासनाश्रय --- उग्रा नामक शक्तीने चमकणार्‍या सिंहासनावर जो विराजमान आहे असा .

२०१ ) तेजोवतीशिरोरत्न --- तेजोवती नामक शक्ती ज्याच्या मस्तकावर रत्नरूपात सेवा करते असा तो .

२०२ ) सत्यानित्यावतंसित --- सत्या नामक शक्ती ज्याला नित्य आपल्या मस्तकावर आभूषण म्हणून धारण करते असा .

सविघ्ननाशिनीपीठ : सर्वशक्ति - अम्बुज - आश्रय : ।

लिपि - पद्मासन - आधार : वह्मि - धाम - त्रय - आश्रय : ॥३७॥

२०३ ) सविघ्ननाशिनीपीठ --- विघ्ननाशिनी शक्तीने ज्याचे पीठ सुशोभित केले आहे असा . वरील अष्टशक्तींनीयुक्त . तीव्रा - ज्वालिनी - नन्दा - भोगदा - कामदायिनी - उग्रा - तेजोवती - सत्या . कमळाच्या मध्यभागी विघ्ननाशिनी पीठदेवता असते .

२०४ ) सर्वशक्त्यम्बुजाश्रय --- अम्बुज म्हणजे कमळ . सर्व शक्तींनीयुक्त अशा कमलासनावर जो विराजमान आहे असा .

२०५ ) लिपिपद्‌मासनाधार --- जो अक्षरयुक्त कमलासनावर ( मातृकापद्‌मावर ) विराजमान आहे असा . क पासून ज्ञ पर्यंतचे वर्ण हे मंत्रशास्त्रातील बीजरूपात अतीव दिव्य प्रभावशाली आहेत . अशा समस्त मंत्रांवर श्रीगणेशाचीच सत्ता चालते .

२०६ ) वह्निधामत्रयाश्रय --- वह्नि म्हणजे अग्नी . वह्निधाम म्हणजे अग्निकुण्ड . यज्ञकुण्ड . अग्नीच्या तीन धामांचे म्हणजे स्थानांचे म्हणजे सूर्य , चन्द्र व अग्नी या तिघांचे आश्रयस्थान असलेला .

उन्नतप्रपद : गूढगुल्फ : संवृत्तपार्ष्णिक ; ।

पीण - जङ्घ : श्लिष्टजानु : स्थूल - ऊरु : प्रोन्नमत्कटि : ॥३८॥

२०७ ) उन्नतप्रपद --- भरगच्च पावले असणारा . ज्याच्या पायांचा चवडा कूर्मपीठाप्रमाणे उंच आहे असा .

२०८ ) गूढगुल्फ --- ज्याचे घोटे मांसात लपले आहेत . गुबगुबीत पावलांचा . ( गुल्फ = घोटे )

२०९ ) संवृत्तपार्ष्णिक --- ज्याच्या पायांच्या टाचा मांसल आहेत . गोलाकार आहेत असा . ( पार्ष्णि = टाच )

२१० ) पीनजङ्घ --- ज्याच्या पोटर्‍या मांसल आहेत असा . पीन म्हणजे पुष्ट . ( जङ्घा = पोटरी )

२११ ) श्लिष्टजानु --- ज्याचे गुडघे मांसात लपले आहेत . स्पष्ट दिसत नाहीत असा . ( जानु = गुडघा )

२१२ ) स्थूलोरु --- ज्याच्या मांडया स्थूल म्हणजे मांसल आहेत असा . ( ऊरू = मांडया )

२१३ ) प्रोन्नमत्कटि --- ज्याची कंबर ( कटिप्रदेश ) उंच व बाकदार आहे .

निम्ननाभि : स्थूलकुक्षि : पीनवक्षा : बृहद्‌भुज : ।

पीनस्कन्ध : कम्बुकण्ठ : लम्बोष्ठ : लम्बनासिक : ॥३९॥

२१४ ) निम्ननाभि --- न्याची नाभी खोल आहे असा . ( निम्न = खोल )

२१५ ) स्थूलकुक्षि --- ज्याचे पोट अतिविशाल आहे असा .

२१६ ) पीनवक्षा --- ज्याची छाती भरदार आहे असा . ( पीन = पुष्ट , वक्ष = छाती )

२१७ ) बृहद्‌भुज --- ज्याचे हात लांब आहेत .

२१८ ) पीनस्कन्ध --- ज्याचे खांदे भरदार आहेत .

२१९ ) कम्बुकण्ठ --- कम्बु म्हणजे शंख . ज्याचा गळा शंखाप्रमाणे गोलाकार व वर निमुळता होत जाणारा आहे . शंखाकार आहे .

२२० ) लम्बोष्ठ --- ज्याचे ओठ पसरट किंवा लोंबणारे आहेत .

२२१ ) लम्बनासिक --- ज्याचे नाक ( सोंड ) लोंबणारे आहे असा .

भग्न - वाम - रद : तुङ्ग - सव्य - दन्त : महाहनु : ।

र्‍हस्वनेत्रत्रय : शूर्पकर्ण : निबिडमस्तक : ॥४०॥

२२२ ) भग्नवामरद --- ज्याचा डावा दात तुटला आहे . डावा शब्द मायेसाठी वापरतात . ज्याच्यापाशी मायेची सत्ता खंडीत होते किंवा संपते . ( वाम = डावा , रद = दात )

२२३ ) तुङ्गसव्यदन्त --- ज्याचा उजवा दात लांब व उंच आहे .

२२४ ) महाहनु --- ज्याची हनुवटी मोठी आहे , पुष्ठ आहे असा .

२२५ ) र्‍ह्स्वनेत्रत्रय --- ज्याचे तीन डोळे बारीक आहेत . सूक्ष्मदृष्टीचे प्रतीक आहेत .

२२६ ) शूर्पकर्ण --- ज्याचे कान सुपासारखे आहेत . ज्याचे कान वाईटाचा त्याग करून चांगल्याचेच श्रवण करतात .

२२७ ) निबिडमस्तक --- ज्याचे मस्तक घट्ट व टणक आहे .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP