मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ४१ ते ५०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ४१ ते ५०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


स्तबक - आकार - कुम्भ - अग्र : रत्नमौलि : निरङ्कुश : ।

सर्पहारकटीसूत्र : सर्पयज्ञोपवीतवान्‌ ॥४१॥

२२८ ) स्तबकाकारकुम्भाग्र --- ज्याच्या मस्तकाचा अग्रभाग ( गंडस्थळ ) फुलांच्या गुच्छा ( स्तबक ) प्रमाणे आकर्षक व प्रफुल्लित आहे .

२२९ ) रत्नमौलि --- ज्याने मस्तकावर ( मौलि :) रत्नजडित मुकुट धारण केला आहे .

२३० ) निरङ्कुश --- ज्याच्या मस्तकावर कधीही अंकुशस्पर्श झालेला नाही . होत नाही . म्हणजेच ज्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही . अमर्याद .

२३१ ) सर्पहारकटीसूत्र --- ज्याने कमरेस सर्पहाराची मेखला धारण केलेली आहे .

२३२ ) सर्पयज्ञोपवीतवान्‌ --- ज्याच्या गळ्यात सर्परूपी जानवे आहे .

सर्प - कोटीर - कटक : सर्प - ग्रैवेयक - अङ्गद : ।

सर्प - कक्ष्य - उदराबन्धः सर्पराज - उत्तरीयकः ॥४२॥

२३३ ) सर्पकोटीरकटक --- कोटीर म्हणजे मुकुट आणि कटक म्हणजे हस्तभूषण . मुकुट आणि हस्तभूषण म्हणून सर्प धारण करणारा .

२३४ ) सर्पग्रैवेयकाङ्गद --- ग्रैवेयक म्हणजे कंठहार आणि अङ्गद : म्हणजे बाजूबंद म्हणून सर्प धारण करणारा .

२३५ ) सर्पकक्ष्योदराबन्ध --- कंबरपट्टा म्हणून ज्याने सर्पाला बांधले आहे .

२३६ ) सर्पराजोत्तरीयक --- उत्तरीय ( उपरणे ) म्हणून ज्याने नागराज वासुकीला धारण केले आहे .

रक्त : रक्ताम्बरधर : रक्त - माल्य - विभूषण : ।

रक्तेक्षण : रक्तकर : रक्ततालु - ओष्ठपल्लव : ॥४३॥

२३७ ) रक्त --- जो रक्तवर्ण आहे .

२३८ ) रक्ताम्बरधर --- लालवस्त्रे परिधान करणारा .

२३९ ) रक्तमाल्यविभूषण --- माल्य म्हणजे फूल किंवा माळ . लालपुष्पांच्या माळांनी अलंकृत झालेला .

२४० ) रक्तेक्षण --- रक्त ईक्षण : म्हणजे लाल डोळे असणारा .

२४१ ) रक्तकर --- ज्याचे हात लाल आहेत असा .

२४२ ) रक्तताल्वोष्ठपल्लव --- तालू आणि दोन्हीही ओठ लाल असणारा .

श्वेत : श्वेताम्बरधर : श्वेतमाल्यविभूषण : ।

श्र्वेत - आतपत्र - रुचिर : श्वेत - चामर - वीजित : ॥४४॥

२४३ ) श्वेत --- ज्याचा वर्ण शुभ्रधवल आहे . ( परब्रह्मरूपात उपासना करताना रक्तवर्णात तर विद्याधीशरूपात श्वेतवर्णात गजाननाची उपासना करतात म्हणून या श्लोकात गजाननाची श्वेतवर्णरूपाने नावे आलेली आहेत .)

२४४ ) श्वेताम्बरधर :--- शुभ्र वस्त्र परिधान केलेला .

२४५ ) श्वेतमाल्यविभूषण --- पांढर्‍या फुलांच्या माळांनी विभूषित असलेला .

२४६ ) श्वेतातपत्ररुचिर --- आतपत्र - आतप म्हणजे ऊन आणि आतप - त्र म्हणजे उन्हापासून संरक्षण करणारी छत्री . जो पांढर्‍या छत्रीने शोभून दिसतो .

२४७ ) श्वेतचामरवीजित --- पांढर्‍या शुभ्र चवर्‍यांनी ज्याला वारा घातला जातो असा .

सर्व - अवयव - सम्पूर्ण - सर्वलक्षण - लक्षित : ।

सर्व - आभरण - शोभाढय : सर्वशोभासमन्वित : ॥४५॥

२४८ ) सर्वावयवसम्पूर्णसर्वलक्षणलक्षित ---( सामुद्रिक शास्त्राप्रमाणे ) ज्याच्या शरीराचे सर्व अवयव शुभलक्षणसंपन्न आहेत असा . सामुद्रिक शास्त्राप्रमाणे शरीराची ३२ शुभलक्षणे होत . ती पुढीलप्रमाणे

पाच ठिकाणे सूक्ष्म म्हणजे बारीक असावी -

१ . त्वचा , २ . केस , ३ . अंगुली , ४ . दात , ५ . बोटाची पेरे .

पाच ठिकाणे दीर्घ म्हणजे लांब असावी -

६ . भुजा , ७ . नेत्र , ८ . हनुवटी , ९ . जांघ व १० . नाक .

सात ठिकाणे आरक्त असावीत -

११ . हातांचे तळवे , १२ . पायांचे तळवे , १३ . अधरोष्ठ , १४ . नेत्र , १५ . तालू , १६ . जीभ व १७ . नखे .

सहा ठिकाणे उन्नत असावीत .-

१८ . वक्ष : स्थळ , १९ . कुक्षी , २० . केस , २१ . खांदे , २२ . हात , २३ . तोंड .

तीन ठिकाणे विस्तीर्ण म्हणजे रुंद असावीत .

२४ . वक्ष : स्थळ , २५ . कटी , २६ . ललाट .

तीन ठिकाणे आखूड असावीत .

२७ . ग्रीवा , २८ . जंघा व , २९ . शिश्न .

तीन ठिकाणे गंभीर म्हणजे खोल असावीत .

३० . स्वर , ३१ . कर्ण , ३२ . नाभी .

२४९ ) सर्वाभरणशोभाढय --- जो सर्व आभूषणांनी विभूषित आहे असा .

२५० ) सर्वशोभासमन्वित --- सर्व प्रकारच्या लावण्यांनी शोभायमान असा .

सर्वमङ्गलमाङ्गल्य : सर्वकारणकारणम्‌ ।

सर्वदा - एककर : शार्ड्गी बीजापूरी गदाधर : ॥४६॥

२५१ ) सर्वमङ्गलमाङ्गल्य --- सर्व मंगलांचे मंगल करणारा . सर्व मंगलांमध्ये श्रेष्ठ मंगल .

२५२ ) सर्वकारणकारणम्‌ --- सर्व कारणांचे कारण असणारा . ज्यापासून निर्मिती होते ते म्हणजे कारण .

२५३ ) सर्वदैककर --- ज्याचा एकमात्र कर सर्व काही देणारा , धारण करणारा आहे .

२५४ ) शार्ङ्गी --- ज्याने शृंगनिर्मित ( शृंग = शिंग .) शिंशापासून बनविलेले धनुष्य धारण केले आहे .

२५५ ) बीजापूरी --- अनेक बीजांनी भरलेले डाळींब ज्याने हातात धारण केले आहे असा . डाळिंब हे बहुप्रसवद्योतक आहे . ते प्रजनन व समृद्धी यांचे प्रतीक आहे .

२५६ ) गदाधर --- हाती गदा धारण करणारा .

इक्षुचापधर : शूली चक्रपाणि : सरोजभृत्‌ ।

पाशी धृतोत्पल : शाली - मञ्जरी - भृत्‌ स्वदन्त - भृत्‌ ॥४७॥

२५७ ) इक्षुचापधर --- उसाचे धनुष्य धारण करणारा .

२५८ ) शूली --- हाती त्रिशूळ धारण करणारा .

२५९ ) चक्रपाणि --- हाती चक्र धारण करणारा .

२६० ) सरोजभृत्‌ --- हाती कमळ धारण करणारा . ( सरोज = कमळ )

२६१ ) पाशी --- हाती पाश धारण करणारा .

२६२ ) धृतोत्पल --- नीलकमल धारण करणारा . ( उत्पल = कमळ )

२६३ ) शालीमञ्जरीभृत्‌ --- ज्याच्या हातात साळीची लोंबी आहे .

२६४ ) स्वदन्तभृत्‌ --- आपला खंडित दात हाती धारण करणारा .

कल्पवल्लीधर : विश्व - अभयद - एककर : वशी ।

अक्षमालाधर : ज्ञानमुद्रावान्‌ मुद्‌गर - आयुध : ॥४८॥

२६५ ) कल्पवल्लीधर --- हाती कल्पवल्ली धारण करणारा .

२६६ ) विश्वाभयदैककर --- एका हाताने विश्वाला अभय प्रदान करणारा .

२६७ ) वशी --- विश्वाला वश करणारा .

२६८ ) अक्षमालाधर --- अक्षमाला धारण करणारा . ( रुद्राक्षांची माळ )

२६९ ) ज्ञानमुद्रावान्‌ --- ज्ञानमुद्रा धारण करणारा . अंगठा आणि तर्जनी संयोग म्हणजे ज्ञानमुद्रा .

२७० ) मुद्‌गरायुध --- मुद्‌गर नामक शस्त्र हाती असलेला .

पूर्णपात्री कम्बुधर : विधृत - अलि - समुद्‌गक : ।

मातुलिङ्गधर : चूत - कलिका - भृत्‌ कुठारवान्‌ ॥४९॥

२७१ ) पूर्णपात्री --- अमृतकलश धारण करणारा .

२७२ ) कम्बुधर --- हातात शंख धारण करणारा . ( कम्बु = शंख ) किंवा हातात कडे घालणारा कंबु याचा ‘ कडे ’ असाही अर्थ अहे .

२७३ ) विधृतालिसमुद्‌गक --- ज्याच्या मदरसाने युक्त अशा गण्डस्थलावर भ्रमरसमूहं गुंजारव करीत आहे असा . भुंग्यांचा समूह धारण करणारा .

२७४ ) मातुलिङ्गधर --- ज्याने आपल्या हातात महाळुंग नावाचे फळ धारण केले आहे . ( मातुलिङग = महाळुंग )

२७५ ) चूतकलिकाभृत्‌ --- ज्याच्या हातात आम्रमंजरी आहे . ( चूत = आम्रवृक्ष )

२७६ ) कुठारवान्‌ --- ज्याच्या एका हातात कुर्‍हाड आहे असा .

पुष्करस्थ - स्वर्णघटी - पूर्ण - रत्न - अभिवर्षक : ।

भारतीसुन्दरीनाथ : विनायक - रतिप्रिय : ॥५०॥

२७७ ) पुष्करस्थस्वर्णघटीपूर्णरत्नाभिवर्षक :---- सोंडेवर धरलेल्या काठोकाठ भरलेल्या सुवर्णकलशातून रत्नांचा वर्षात करणारा .

२७८ ) भारतीसुन्दरीनाथ --- भा म्हणजे सरस्वती , रती म्हणजे पार्वती , सुन्दरी म्हणजे लक्ष्मी यांचे नाथ अर्थात्‌ ब्रह्मा - महेश आणि विष्णू रूपात भक्तांसाठी लीला करणारा . भारतीरूपी सुंदरीचा नाथ . पती .

२७९ ) विनायकरतिप्रिय --- विनायक गणांमध्ये क्रीडेचा आनंद घेणारा किंवा विनायक म्हणजे नायकरहित म्हणजेच परब्रह्म . परब्रह्मानंदात असणारा .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP