प्रासंगिक कविता - भवानी देवीचें स्तोत्र
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
प्रपंचीं आमचे कूळीं तुळजा कुळदेवता । नेणत्या ऐकिलें होतें जाणतां स्मरलें मनी ॥१॥
श्रेष्ठांची कामना होती पुर्विली मनकमना । नवस जो नवसिला होता त्यापासूनच चूकला ॥२॥
पुत्र जो घेतला त्याचा जोगी करूनि सोडिला । ख्याति ते ऐकिली मोठी न्यायनीति चुकेचना ॥३॥
वैराग्य घेतलें पूर्ण सर्व संसार सोडिला । तूझिया दर्शना आलों कृपादृष्टि विलोकिजे ॥४॥
तुझिया कृपें वांचलों आहे महंत म्हणती तया । तुझेंचि सर्व हें देणें सर्वही तुजपासुनी ॥५॥
संसारीं मोकळें केलें आनंदीं ठाव दीधला । सांडिली सर्व ही चिंता माता तूं सत्य जाहलें ॥६॥
पूर्वील काय मी सांगूं इच्छा पूर्ण परोपरी । मागील आठवेनासें केलें आश्चर्य वाटतें मनीं ॥७॥
सदानंदीं उदय झाला सुखसंतोष पावलों । मत्परधीनता गेली सत्ता ऊदंड चालली ॥८॥
उदंड ऐकिले होतें रामासी वर दीधला । दास मी रघु-नाथाचा मजही वरदायिनी ॥९॥
श्रेष्ठांचा नवस जो होता फेडिला तोचि मी म्हणे । पुष्प देऊनी उतराई ऐसें हें कल्पिलें मनीं ॥१०॥
तुळजापुर टाकोन चालली पश्चिमेकडे । पारघाटीं जगन्माता सध्यां येऊन राहिली ॥११॥
ऐसें हें ऐकिलें होतें हेत एथेंचि पावला । पुष्पाची कल्पना होती पुष्प तेथेंचि वाहिलें ॥१२॥
ऐशी दयाळु तूं माता त्वां हें पुष्पचि घेतलें । संतुष्ट भक्तिभावाने त्रैलोक्यजननी पहा ॥१३॥
थोडयानें श्लाघ्यता मोठी थोर संतोष पावलों । तुझेंचि तुजला दिल्हें आणिलें सांग कोठुनी ॥१४॥
रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह इच्छिला । संकष्टें वारिलीं नाना रक्षिला बहुतांपरी ॥१५॥
जीवींचें जाणती माता तूं माता मज रोकडी । लोकांची चुकती माता अचूक जननी मला ॥१६॥
एकचि मागणें आतां द्यावें तें मजकारणें । तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हाचि देखतां ॥१७॥
दुष्ट संहारिले मागें ऐसें ऊदंड ऐकिलें । परंतु रोकडीं कांहीं मूळ सामर्थ्य दाखवी ॥१८॥
देवांचीं राहिलीं सत्त्वें सत्त्व तूं पाहसी किती । भक्तांसी वाढवी वेगीं इच्छा पूर्णचि ते करी ॥१९॥
रामदास म्हणे माझें सर्व आतुर बोलणें । क्षमावें तुळजे माते इच्छा पूर्ण परोपरी ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2014
TOP