स्फुट श्लोक - श्लोक ७ ते १०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
७
आलेख जागतो जनीं । निजों नका निरंजनीं । बहुत चोर वागतो । उदास दास सांगतो ॥१॥
मनें मनीं झकाल रे । नका नका ठकाल रे । पडेल काळ काळ रे । घडेल हाल हाल रे ॥२॥
गुणी असोनि गूज रे । कळेचिना च तूज रे । तयांत वागणें घडे । म्हणोनि सांगणें पडे ॥३॥
चराचरीं अनंत रे । निरोपिताति संत रे । पाहा पाहा बरें पाहा । नसोनियां सुकें राहा ॥४॥
प्रमाण जाण जाण रे । खुणे विशेष बाण रे । बरा विचार पावसी । तरीच तूज फावसी ॥५॥
८
अखंड सावधान रे । प्रयोग प्रेत्न मान रे । प्रसंग हा तुफान रे । नकोचि वेवधान रे ॥१॥
मनीं धरूनि धारणा । करा बरी विचारणा । प्रेत्न मूळ कारणा । अतर्क्ये ते विचारणा ॥२॥
बहु विंधी विधान हो । परंतु सावधान हो । प्रमाण जाण उत्तरें । प्रत्योत्तरें निरोत्तरें ॥३॥क
आहो जना आहो जना । मनें मना विवंचना । आरत्र हो परत्र हो । प्रचीत पाववी मोहो ॥४॥
म्हणे उदास दास हा । बरें पाहा बरें पाहा । करील प्रेत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ॥५॥
९
सुगंध गौल्य साजिरीं । फळें रसाल तें बरीं । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥१॥
बहुत खाद्य घातलें । पुढें तयास ठेविलें । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥२॥
सुवर्णरत्नभूषणें । परोपरीं विभूषणें । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥३॥
सुवास द्रव्य खाद्य हो । बहु प्रकार गद्य हो । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥४॥
गुणी गुणास पाहिजे । आगुण ते न पाहिजे । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥५॥
अखंड राग रंग तो । विचार सार संग तो । समस्त मान्य पूरता । वृथा पदार्थ तो रिता ॥६॥
वदोनि काय फारसें । जना प्रत्यक्ष हें दिसे । हरीकथेसि मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥७॥
सगुण तो भला भला । सगुण दास बोलिला । विशेष धन्य पूरता । वृथां पदार्थ तो रिता ॥८॥
१०
करील व्याप तो भला । बहुत भाग्य लाधला । नसेल व्याप तो हळु । पडेल रे पळेंपळु ॥१॥
आरत्र हो परत्र हो । विचित्र काळसूत्र हो । अखंड सावधानता । सभाग्य तो नव्हे रिता ॥२॥
अनेक भाव भावना । सदा मनीं विवंचना । विशेष धारणा धरीं । उदंड चाळणा करीं ॥३॥
सखोल तो कळेंचिना । कदा लिळा तुळेचिना । परांतरासि जाणता । दिस जनास नेणता ॥४॥
कवी म्हणे बहु बरें । करील देव तें खरें । बरी धरूनु वासना । धरा मनीं उपासना ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2014
TOP