स्फुट श्लोक - भागवत १

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


( प्रमाणिका वृत्त. )

हरीजनकजन्ननी । प्रसुत कौंसभुवनीं । श्रीकृष्ण जन्मला गुणी । करी जनासि मोहनी ॥१॥
कितेक बंद मोचनें । तयासि काय बंधनें । करूनि पंथ मोकळा । श्रीकृष्ण जाये गोकुळा ॥२॥
रिपु म्हणे चला चला । प्रसुतकाळ सुचला । विशेष कौंस तो हटी । पदीं धरूनि आपटी ॥३॥
बळेंचि हस्त पीळिला । तडक वाजला भला । म्हणे रिपु तुझा रिपु । श्रीकृष्ण गोकुळाधिपु ॥४॥
मनांत कौंस खोचला । अपाय सुचला भला । उपाय कोण तो भटो । जिवांत काजळी तुटो ॥५॥
भटु वदे नृपापुढें । उकावला चढोवढें । बळें चि पैज सारितों । तुझा रिपु विदारितों ॥६॥
बळें चि लवितो कळी । खटयाळ भटमाभळी । उपाव्य चालवी कुळा । म्हणोनि वंद्य गोकुळा ॥७॥
बळाढय सुभटु भटु । भटें चि मांडिला हटु । बसोनि नीट नीकटु । प्रशस्त वाचितो पटु ॥८॥
हटें हटेंचि उधटें । कुटीळ कामलंपटें । उपायसा प्रयोजिला । मुलास घात योजिला ॥९॥
बहु मिळोनि सुंदरी । मुखें म्हणे हरी हरी । तुम्हांस वोखटी परी । कुमार हा मुळावरी ॥१०॥
बहु मिळोनियां वधु । कराल बाळका वधु । तरीच वौंश सावधु । येथार्थ सांगतों विधु ॥११॥
अनेक घात घातकी । वदे पतीत पातकी । शिणे मनांत बाळकु । समस्त चित्तचाळकु ॥१२॥
हळुच कृष्णनाटकें । चरित्र मांडिलें ठकें । उगाचि थोर मारकां । भटासि बैसला धका ॥१३॥
पदार्थमात्र चालवी । भटासि पाद्य घालवी । हरीलिळा कळेचिना । अचेतना सचेतना ॥१४॥
मिळोनियां भले भले । अचाट पाट चालिले । बहु करूनि तांतडी । भटावरी धडाधडी ॥१५॥
भटु भटु बळागळा । खिळी कितेक आगळा । उठावलीं सळें सळें । लोहो कितेक मुसळें ॥१६॥
साहाण खोड लाटणी । कितेक खुंट दाटणी । इळ्या पळ्या परोपरीं । उकावलीं भटावरी ॥१७॥
समस्त ही चढोवढी । इळे कुठार पावडी । पाल्हाण तंग तोबरे । लगाम जेरबंद रे ॥१८॥
बहु करीतसे टिका । म्हणोनि वाट कष्टिका । करून चोप चोपणी । कठीण मार खोरणी ॥१९॥
सदेव पाट हालिले । समस्त देव चालिले । बळावली कुटाकुटी । भटु बहुत हिंपुटी ॥२०॥
चरांट दोर सांकळ्या । कडया कितेक मोकळ्या । वाहाण खेटरें सळें । भटासि मारिती बळें ॥२१॥
कितेक मार कोरडे । भटासि लागतां रडे । बहु चुकावितां दडे । उठोनि चांचरी पडे ॥२२॥
बळें चि हस्त मोडिले । कितेक दंत पाडिले । फुटोन रक्त येतसे । रडोनि तोंड घेतसे ॥२३॥
बहुत पुष्टी कंदली । शरीरशक्ति मंदली । विटंबणा परोपरीं । किती क्षतें उरावती ॥२४॥
बहुतसी तडातडी । विशेष होये तांतडी । चरांट खुंट मोडिती । बळें भटासि झोडिती ॥२५॥
कितेक पातळा इटा । कितेक कातळा निटा । खडे कितेक खापरें । बहु पुजा परस्परें ॥२६॥
बळें शुभा धबाबिती । कितेक ढेंक लागती । धुळी मुखांत मृत्तिका । पुरे पुरे नका नका ॥२७॥
हरीचरित्र हें भले । बहु जनांत शोभलें । हरील दुष्टदंडणा । करील जन्मखंडणा ॥२८॥
श्रीकृष्ण देव द्रोहिला । जिहीं नर्‍हीं दुराविला । तया खळास हे गती । बळें चि येम तांडिती ॥२९॥
उदास दास तो कवी । बहु जनास सीकवी । उणें कदा वदों नका । न मानितां घडे धका ॥३०॥


References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP