स्फुट श्लोक - श्लोक ११ ते १५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
११
श्री राम राम राम रे । समर्थ योगधाम रे । दयाल तो दया करी । कवी जनासि वीवरी ॥१॥
कदापि जें घडेचिना । जनासि सांपडेचिना । करी तयापुढें दया । अपाय जाय वीलया ॥२॥
धनुष्यबाणधारकु । हरी जनासि तारकु । प्रचंड ध्यान तें धरा । मनांतरींच वीबरा ॥३॥
अखंड पार्वतीपति । रघोत्तमासि चिंतिती । प्रचीत बाणली मना । उपाय सूचला जना ॥४॥
जसा तसाचि काळ हो । मनीं धरा दयाळ हो । तुम्हांसि तो दया करु । अनन्य भाव वीवरु ॥५॥
१२
महंत हो नका नका । बहुत वैभवें धका । उदास दास तापसी । फिरे लिळा जसी तसी ॥१॥
विचार सार वीवरु । नव्हे विवेकु रुबरु । नरु नव्हे खरा खरु । किती सिणेल पामरु ॥२॥
प्रसंग हा तडतडी । करा विवेक तांतडी । सुचीत व्हा घडी घडी । प्रबोध घ्या खडाखडी ॥३॥
पाहा पाहा बरें बरें । करील देव तें खरें । अहंमती अनावरें । विवेकहीण पामरें ॥४॥
करील तो करील रे । तुम्हांसि काय बोल रे । उरों नका म्हणे कवी । उदास दास सीकवी ॥५॥
१३
अनंत हेत अंतरीं । उकावती मनांतरीं । अहेत हेत तो बरा । विचार सारसा धरा ॥१॥
कळेचिना कसें करुं । विशेष काय तें धरुं । अशेष तें विशेष रे । उरों नये चि लेश रे ॥२॥
विवेक पाहातां मुरे । विवंचितां नुरे नुरे । नुरेल तो उरेल रे । उरेल तो नुरेल रे ॥३॥
बहुत मेळ मात्रुका । विचार पाहातां फिका । असेल तो नसेल रे । नसेल तो असेल रे ॥४॥
अनन्यया नव्हे नव्हे । नव्हेचि तो नव्हे नव्हे । चढेचिना पढेचिना । घडेचिना दडेचिना ॥५॥
१४
भुतें भुतासि भाविती । भुतें भुतासि दाविती । भुतें भता विवंचिती । भुतें भुतासि विछिती ॥१॥
भुतासि भावितां लये । अनंत भावितां नये । भुतें भुतांसि जाणती । भुतें खुणेसि बाणती ॥२॥
भुतें समस्त वोळखा । उगाच संशयो नका । भुतें करूनि वावरे । पुढें कसा उपाव रे ॥३॥
भुतें चि अंतवंत रे । भुतें असंत संत रे । भुतांत शब्द तीतुका । भुतें चि हो नका नका ॥४॥
समस्त बोलती खरें । परंतु सार वीवरे । अनन्य भाव तो कसा । प्रचीतिनें जसा तसा ॥५॥
१५
अनेक साधना करुं । अनेक धारणा धरुं । उरेल जीवभाव तो । नुरेक देव तो चि तो ॥१॥
करील सर्व मीपणें । धरील तें दुजेपणें । उपाय रे भला भला । परंतु हेत चूकला ॥२॥
चूकोनियां चुका पडे । घडोन भक्त वीघडे । अनन्य हो अनन्य हो । अनन्य होत धन्य हो ॥३॥
अनन्यता नसे तुला । तरीच देव चूकला । विभक्त भक्त तुं कसा । अहंपणें जसा तसा ॥४॥
कळोन ही कळेचिना । वलोन ही वळेचिना । कसें करूं कसें करूं । मनें मनासि वीवरूं ॥५॥
विवंचना घडी घडी । विचार कोण नीवडी । विवेक पूरता असे । तयास सर्व वीलसे ॥६॥
गुणें गुणासि खंडिजे । मनें मनासिं दंडिजे । नव्हेचि अंतवंत रे । अनंत तो अनंत रे ॥७॥
न बोलतांचि जाणता । खुणे खुणेसि बाणता । मिळेल कोण तो गुणी । कळेचिना क्षणी क्षणी ॥८॥
उगा उगा उगाचि रे । नव्हेचि वाउगाचि रे । नका नका वदों नका । विवेक होतसे फिका ॥९॥
अनन्य भावितां धुरे । नुरोनि दास उधरे । नसोन पावला खुणा । म्हणाल तें सुखें म्हणा ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2014
TOP